Sunday, January 18, 2015

विश्‍व कल्पनेतलं पण प्रवास अद्‌भुतरम्य!


विश्‍व कल्पनेतलं पण प्रवास अद्‌भुतरम्य!
- ब्रिजकुमार परिहार


हिरण्यदुर्ग... हजारो वर्षांपूर्वीच दंतकथा बनलेला एक दुर्ग, किंबहुना समृद्ध असं साम्राज्यच ! सातपुड्याच्या अतिदुर्गम पर्वत रांगांच्या खाली भूगर्भात, पाताळात गाडलं गेलेलं हे विश्‍व, संजय सोनवणी यांनी या कादंबरीत चितारलं आहे. पाताळात खोल कुठेतरी... जिथं भूगर्भाचा अंतिम बिंदूही संपतो, त्याच्याही किंचित पलीकडं, पाताळगंगेच्या कडेकडेनं जाणारा हा प्रवास निश्‍चितच थक्क करणारा आहे. इतिहास आणि पुराण कथांमध्ये कधीतरी ऐकून, वाचून माहीत असलेली अनेक पात्रं आपल्याला या प्रवासात भेटतात. त्यात प्रामुख्यानं सिंहभद्र, पुलामा, धर्मपाल, महाधम्मरक्‍ख, वज्रसेन, महाकेतू, नागवंशियांचा आद्य पुरुष मलंगा, शक्तीश्री सातवाहन, त्यांची कन्या देवसेना आणि पुत्र हाल आदींचा समावेश आहेच; जोडीला कन्या राशी ग्रहावरून अपघाताने पृथ्वीतलावर आलेले आणि पिढ्यान्‌पिढ्या येथेच स्थायिक झालेले बुटके आदिवासी मरुगणही आपल्याला भेटतात.

मुळातच सातपुड्याच्या पर्वत रांगांचा प्रदेश हा अतिदुर्गम आणि अभेद्य अशा भयावह पाषाण कातळांनी वेढलेला आहे. हजारो वर्षांपूर्वीचे त्याचे मूळ स्वरूप आजच्यापेक्षा कितीतरी विशाल आणि भव्य असणार हेही निश्‍चितच. दुरूनच पाहताक्षणी हृदयात धडकी भरावी असे हे विस्तीर्ण अन्‌ कल्पनातीत डोंगर, त्यांच्या कडा-सुळक्‍यांवरून कधी वर आसमंताकडे, तर कधी खोल भूगर्भात पाताळाच्या दिशेने जातानाचा प्रवास अनेकवेळा हृदयाचा ठोका चुकवतो, असा हा अतर्क्‍य, अकल्पित, गूढ आणि तितकाच रंजक, रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक प्रवास आहे.

सातवाहनांच्या वंशातील शक्तीश्री महाराज, त्यांचा पुत्र हाल आणि त्यांच्या पूर्वापार पिढ्यांचा हा कालावधी आहे. त्यात महाकेतूच्या महत्त्वाकांक्षी लालसेतून घडलेला संहार, सिंहभद्र- पुलोमा यांच्यात दोनशे वर्षांच्या अंतराने झालेले दोन युद्ध, दोघांतील तुल्यबळ संघर्ष क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणारा ठरतो. अकल्पनीय अशा घटनांच्या या श्रृंखलेत महाकेतूच्या महत्त्वाकांक्षी लालसेतून घडलेला संहार आणि सिंहभद्र- पुलोमा यांच्यात दोनशे वर्षांच्या अंतरानं झालेली दोन युद्धे जितकी उत्कंठा वर्धक आहेत, त्यापेक्षा जास्त रोमांचक ठरतो तो या दोघांतील तुल्यबळ संघर्ष. दैवी शक्ती विरुद्ध अघोरी शक्तींमधील हा संघर्ष वाचकाला पाताळगंगेच्या मार्गाने थेट सांब सदाशिवाच्या चरणापर्यंत घेऊन जातो.

दोन वेगवेगळ्या राज्यांतील दूत राजकार्याच्या निमित्ताने जलग्रामी जाण्यासाठी महाराष्ट्राच्या भूमीवर पाऊल ठेवतात. एकमेकांना पाहताही येणार नाही, अशा घनघोर अंधारात त्यांची अकस्मात भेट होते आणि ते सहप्रवासी बनतात. येथून सुरू होणारे हे कथानक अत्यंत अद्‌भुत वळणे घेत, क्षणाक्षणाला अतर्क्‍य अशा घटनांच्या माध्यमातून पुढे सरकत जाते. वाटेत त्यांना अनेक अनपेक्षित अनुभव येतात. आता आपण जिवंत परत जाऊच शकणार नाही, अशा भयंकर चकव्यात अडकल्याची जाणीव होत असतानाच काही आशादायक क्षणही त्यांच्या वाट्याला येतात. पण, त्याच वेगाने हे क्षण आपल्याला मागे, खूप मागे कुठेतरी घेऊन जाताहेत याची खात्री पटत जाते. या अद्‌भुतरम्य प्रवासातून श्री. सोनवणी यांनी, जितके भयंकर तितकेच गूढ असे कथानक विणले आहे, जे वाचकांना अखेरपर्यंत गुंतवून ठेवते. एका छोट्याशा, खटकणाऱ्या बाबीकडे मात्र लेखकाचं दुर्लक्ष झालं आहे, ते म्हणजे सिंहभद्र ज्या राजकार्यासाठी जलग्रामी निघाला होता, ते कार्य कादंबरीत कुठेच आलेले नाही. किंबहुना हे कार्य म्हणजेच दैवी योजना असावी, असा उल्लेखही कोठे सापडत नाही. कदाचित, एवढ्या मोठ्या कार्यापुढे ‘ते’ राजकार्य किरकोळही ठरलं असतं; पण तरीही त्याचं स्पष्टीकरण करणं गरजेचं वाटतं.

पुस्तकाचे नाव : हिरण्यदुर्ग
लेखक : संजय सोनवणी
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन, पुणे (९८९०९५६६९५)
पृष्ठं : ३५२ मूल्य : ३५० रुपये.

(आज "सप्तरंग" (सकाळ) मद्धे अलेल्या माझ्या "हिरण्यदुर्ग" या अद्भुतरम्य कादंबरीवरील परिक्षण.....

विश्‍व कल्पनेतलं पण प्रवास अद्‌भुतरम्य!
- ब्रिजकुमार परिहार
रविवार, 18 जानेवारी 2015 - 12:00 AM IST)

4 comments:

  1. "हिरण्यदुर्ग" हि कादंबरी कधी प्रकाशित झाली?
    अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!

    ReplyDelete
    Replies
    1. गेल्या महिन्यातच ३ डिसेंबरला प्रकाशित झाली. या बरोबरच जातिसंस्थेचा इतिहासही प्रकाशित झाले. धन्यवाद.

      Delete
  2. संजयजी ,
    हिरण्यदुर्ग कादंबरी आणि जाति संस्थेचा इतिहास वाचताना पदोपदी प्रा मामाजी देशमुख यांची आठवण होत गेली
    संजयजी आपण प्रा मामाजी देशमुख यांच्या बरोबर शनिवारवाडा बहुजनांच्या ताब्यात मिळण्यासाठी आमरण उपोषण का करत नाही ? ते आपणा दोघांचे इतिहास क्षेत्रात एक महान काम ठरेल .

    प्रा मामाजी देशमुख यांचे कार्य आज सर्वत्र गौरवले जात आहे , आज समाज जागृत होत आहे
    बहुजन समाज आज पर्यंत झोपलेला होता तोवर सवर्णांची सद्दी होती परंतु आज बहुजनाना अगदी सोप्या शब्दात त्यांच्या हक्कांची आणि अन्यायाची जाणीव प्रा मामाजी देशमुखांनी करून दिली आहे . त्यांचे यौ ट्यूब वरील भाषणाचे चिंतन मनन करावेसे वाटते
    आपण सर्वांनी एकत्र येउन त्यांचा भव्य सत्कार केला पाहिजे
    तसेच आज हा समाज दारू मटका आणि अत्यंत विखारी व्यसनात बुडाला आहे त्यासाठी सर्व श्रीमंत बहुजनांनी या पद दलिताना प्रत्येकी १ लाख वर्गणी काढून मदत करून चांगल्या उपक्रमाची सुरवात करायला पाहिजे तसेच आपली सरकारी नोकरी व्ही आर एस घेऊन या पद दलिताना दिली पाहिजे त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल
    चला तर आपण सर्व आपल्या नोकर्यांचे राजीनामे देऊन त्यांची प्रगतीची वात मोकळी करुया
    त्यांचे " शनिवारवाडा हाच खरा लाल महाल " हे संशोधन फारच अभ्यास करण्या सारखे आहे ,
    याबाबत दुसरे श्रेष्ठ इतिहास तज्ञ प्रा संजय सोनवणी यानिपण काही लिहावे असे विनंतीवजा सांगावे आपण सर्वांनी २०१५ मध्ये शनिवार वाड्यावर आमरण उपोषण करून तो ताब्यात घेतला पाहिजे या आमरण उपोषणाची सुरवात प्रा मामाजी देशमुख स्वतः करतील याबद्दल शंका नाही

    मला खात्री आहे की प्रा मामाजी देशमुख त्याचे नेतृत्व करतील आणि प्रत्येकी १ लाख रुपये
    पद दलिताना वाटतील या उपक्रमाला संजय सोनावणी सक्रिय सहाय्य करतील अशी खात्री आहे
    त्यातूनही काही उणीव राहिल्यास अनिता पाटील विचार मंच आपणास निश्चित सहाय्य करेल

    ReplyDelete
  3. Congrats Sir,I will definitely have that one...!!!

    ReplyDelete

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...