Tuesday, October 29, 2013

दिवस फार वाईट आले आहेत.....!


पोरी
तो कुटुंबवत्सल
भला बापही असेल
जो देईल लेकीची माया
किंवा
तो
तुझ्या राखीला लायक
असा
भाऊही असेल
तो
तुझे हृद्गत समजावुन घेणारा
जसा कृष्ण द्रौपदीला
तसा सखाही असेल
किंवा
तो
ज्यांच्याशी बालकासम
क्रीडा
करावी वाटेल
असा सानुला लाडुला सवंगडीही असेल...
किंवा सर्वस्व अर्पण करावे
असा तो तुझ्या स्वप्नातला
राजकुमारही असेल!

पण गे माझ्या लाडक्या पोरी
आज शक्यताय
कि "तो" कोणीही
लिंगपिसाट
तुझ्या
आत्म्याचा खुन करणारा
वैरीही असू असेल...

पोरी...
काही सांगायला म्हणुन
कोणाहीकडे जाऊ नकोस....
तुझा धपापता भावनोत्कट उर
तुझ्यापुरताच  ठेव....
एकाकी

दिवस फार वाईट आले आहेत.....!

आपल्या सांस्कृतिक परिवर्तनांचा इतिहास!


आमच्या राष्ट्राची संस्कृती श्रेष्ठ आहे असा दावा जगातील सर्वच राष्ट्रे करत असतात. राष्ट्रीयतेच्या भावनेला चेतवण्यासाठी श्रेष्ठतावाद नेहमीच उपयुक्त ठरलेला आहे. जगातील एकही राष्ट्र या श्रेष्ठतावादाला अपवाद नाही. आमची संस्कृती श्रेष्ठ होती म्हणजे नेमके काय असा प्रश्न विचारला तर इतिहासातील महापुरुषांचे, साहित्याचे, महाकाव्ये व मिथ्थकथांच्या पुराणतेचे दाखले सहज दिले जातात. थोडक्यात आमची संस्कृती सर्वांत अधिक पुरातन आहे म्हणून ती श्रेष्ठ आहे असे ठसवायचा प्रयत्न होत असतो. राष्ट्रांतर्गत शालेय शिक्षणापासून या श्रेष्ठतेचे, पुरातनतेचे ज्ञान (?) दिले जात असते. पुरातनता म्हणजे श्रेष्ठता असा दावा खरे तर सांस्कृतीक परिप्रेक्षात टिकत नाही, तरीही श्रेष्ठतावाद जपण्यासाठी त्याची गरज असल्याने तो निर्माण केला जातो.

अगदी आधुनिक काळात आलो तरी आपल्याला अठराव्या शतकात जन्माला घातल्या गेलेल्या आर्य सिद्धांताची सहज आठवण होते. आर्य नामक इंडो-युरोपियन भाषा बोलणारा एक मानवगट उरल पर्वताच्या प्रदेशात अथवा उत्तर धृवानिकट इसपू २५०० च्या आसपास विखरत टोळ्या-टोळ्यांनी युरोप ते भारतीय उपखंडात पसरला. या टोळ्यांनी तेथील अडानी-आदिवासी जनांना पराजित केले व त्यांना दास-दस्यू बनवले असे या सिद्धांतात माडले गेले आहे. याच टोळ्यांनी भारतात वेद व संस्कृत, इराणमद्धे अवेस्ता ते ग्रीसमधील महाकाव्ये-मिथ्थकथा ते ल्यटिन भाषेला जन्म दिला व त्याच स्थानिय लोकांना स्वीकाराव्या लागल्या असे या सिद्धांतातून सांगितले जाते. आता आर्य सिद्धांत मागे पडला असला तरी हेच तत्वज्ञान सध्या "इंडो-युरोपियन भाषागट" सिद्धांतातून मांडले जात असते. आपली संस्कृती पुरातन व वर्चस्वशाली होती असेच अशा सिद्धांतनांतून ठसवायचे असते. या सिद्धांताने युरोपचा इतिहास बराच मागे जात असल्याने तेथील विद्वानांनी यावर उड्या मारणे स्वाभाविक होते. भारतीय हिंदुत्ववादीही वैदिक संस्कृतीचा काळ जितका मागे नेता येईल तितका मागे नेत आर्य सिद्धांताला कोणत्या ना कोणत्या प्रकारे चिकटुन राहतात तसेच बुद्धिस्ट संपुर्ण भारत एकेकाळी पूर्ण बौद्धधर्मीय होता अशा तत्वज्ञानांना जन्म देवू पाहतात. अन्य धर्मांची कथाही फारशी वेगळी नाही. यात तथ्य कितपत असते हे इतिहासाचा आढावा घेतल्याखेरीज समजणे सर्वसामान्यांना जवळपास अशक्यप्राय आहे.

संस्कृती म्हणजे नेमके काय? मानवी अभिव्यक्तीची सुरुवात जेथून झाली तेथुन संस्कृतीचा जन्म झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भाषा, धर्म, तत्वज्ञान, कायदे, शिल्पकला, चित्रे, काव्ये-महाकाव्ये, मिथ्थकथा, वास्तूकला, खाद्यकला, संगीत, नृत्य-नाटके, समाजरचना इत्यादिंतून संस्कृतीचे प्रकटन होत असते. किंबहूना सर्व प्रकारच्या मानवी कृत्रीम अभिव्यक्तींतून जे काही निर्माण होते त्याला संस्कृती म्हणतात. किंबहुना मनुष्य स्वत:च्या सुखासाठी, सोयीसाठी जेही काही कृत्रीमपणे निर्माण करतो ती संस्कृती.

संस्कृती ही स्थिर असते काय? त्याचे उत्तर स्पष्टपणे "नाही" असेच द्यावे लागेल. संस्कृती ही प्रवाही असते. कालसापेक्ष चौकटींतुन तिचा प्रवाह पुढे पुढे जात राहतो. परिवर्तन हा जसा निसर्गाचा नियम तसाच तो संस्कृतीचाही नियम आहे. प्रत्येक संस्कृतीत आहे ती अथवा होती तीच संस्कृती श्रेष्ठ होती असे दावे करत तिच राबवायचा थोपवण्याचा प्रयत्न होत असतो. असे प्रयत्न धर्मनेत्यांकडून जसे होतात तसेच राजसत्तांकडूनही होत असतात. या परिप्रेक्षात आपण भारतीय संस्कृतीने ज्ञात काळापासून कशी वळणे घेतली आहेत याचा धावता आढावा घेतला तर आपणच थक्क होऊन जाऊ.

भारतीय संस्कृतीचे ज्ञात पुरावे आपल्याला सिंधू संस्कृतीच्या सापडलेल्या अवशेषांवरुन मिळतात. सर्वप्रथम ती सिंधू खो-यात सापडली म्हणून तिचे नामकरण जरी "सिंधू संस्कृती" असे केले गेले असले तरी ते खरे नाही. या संस्कृतीचे अवशेष साडेबारा लक्ष चौरस किलोमीटर एवढ्या विस्तृत भुभागात मिळाले आहेत. महाराष्ट्र ते सुदूर दक्षीणेतही तिचे अवशेष सापडतात. म्हणजेच ही ख-या अर्थाने तत्कालीन भारतीय संस्कृती होती असे म्हणता येते.

प्रगत नगररचनाशास्त्र, नौकानयन, लिपी, विदेश व्यापार, मुर्तीकला, मातीची भांडी बनवण्याची कुंभारकला ते वस्त्रोद्योग ही या संस्कृतीची वैशिष्ट्ये. सिंधू संस्कृतीतील मुद्रा सुदूर इजिप्त-इराकमधेही सापडल्या असल्याने सिंधू संस्कृतीचा व्यापार किती व्यापक होता याची जाणीव होते. आपल्याला आज मिळालेले अवशेष जरी इसपू ३५०० एवढे जुने असले तरी ही प्रगती गाठायला या संस्कृतीला काही हजार वर्ष लागली असतील. त्या काळात काय काय बदल झाले हे आपल्याला पुराव्यांअभावी माहित नसले तरी हा विकास एकाएकी नक्कीच घडून आला नाही. मनुष्य प्रगती करत जातो ते असंख्य चुकांतून शिकत, नवनवे जीवनोपयोगी शोध लावत. खुद्द सिंधू संस्कृतीच्या अवशेशांतुन इसपु ३५०० ते इसपु १७५० या काळातील परिवर्तनाचे किमान तीन स्तर सापडतात. वेशभुषा, शेती ते अलंकार शैलीतील बदलही ठळकपणे जानवतो.

इसपू १७५० च्या आसपास वातावरणातील बदलामुळे हळुहळू सिंधू संस्कृतीच्या लोकांनी जुन्या वस्त्या सोडायला सुरुवात केली. ही प्रक्रिया जवळपास दोनशे वर्ष सुरू राहिली. काही शहरे नष्ट झाली म्हणजे मानवजात नष्ट होत नसते. त्यांनी नवी शहरे/वसाहती/गांवे वसवली. पण प्रगतीला आहोटी लागली हेही खरे. उत्तर सिंधू संस्कृतीचे आता अनेक पुरावे उजेडात आले असल्याने "आक्रमक आर्यांनी ही संस्कृती नष्ट केली" हा दावा कधीच फेटाळला गेलेला आहे.

सिंधू लोकांच्या विदेशव्यापारामुळे सांस्कृतीक देवाण-घेवाणीही झाल्या असणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्रातील अनेक उत्खननांत रोमन मद्यकुंभ मिळुन आले आहेत. कला आणि संस्कृतीवर अन्य सम्स्कृतींच्या साहचर्याचा काही ना काही परिणाम होतच असतो. आपण जसे विदेशाकडून घेतले तसेच दिलेही. अनेक भारतीय प्राकृत शब्द युरोपियन ते अरबी भाषांत सापडतात त्याला हा संपर्क कारणीभूत आहे.

सिंधू लिपीचे पुढे काय झाले याचे दुवे अद्याप सापडलेले नाहीत. सिंधू लिपी अद्याप वाचताही आलेली नाही. खरोष्टी अथवा ब्राह्मी लिपीची ती पुरातन अवस्था असावी या अंगानेही लिपिविद शोध घेत आहेत पण अद्याप त्यात यश आलेले नाही. परंतू एक लिपी जाऊन नवीन लिपी शोधली जाणे, ती वापरात आनली जाणे भारतात नवीन नाही. भारतात मध्ययुगात शारदा, ग्रंथ ई. अनेक लिप्या वापरात होत्या. नागरी लिपीने पुढे बाजी मारली असली तरी दक्षीणेत लिप्यांचा स्वतंत्र विकास होत गेल्याचेही चित्र आपल्याला दिसते. थोडक्यात सिंधू लिपीतील लेख आपल्याला उत्तरकालात मिळत नसले तरी लोकांची कोणतीही लिपी नव्हती हे विधान धाडसाचे ठरेल.

भारताचा सिंधू कालापासून चालत आलेला धर्म म्हणजे शैवप्रधान प्रतिमा/लिंगपुजकांचा धर्म. . शिवलिंगाच्या अस्तित्वाचे अगणित पुरावे मिळालेले आहेत. आजही हाच भारतियांचा प्रधान धर्म राहिलेला आहे. परंतू इसपू हजार-अकराशेमद्धे निर्माण झालेला एक पहिला नवीन धर्म म्हणजे वैदिक धर्म. या धर्माचे मुख्य अंग म्हणजे यज्ञाद्वारे अग्नीत मांस-अन्नादि आहुत्या देत इंद्र-वरुणादि देवतांना संतुष्ट करणे. या धर्माचे निर्माते पशुपालक होते...नागर सम्स्कृतीचे नव्हेत. या धर्माचे ग्रंथ म्हणजे ऋग्वेदादिंची निर्मिती इसपू अकराशे ते ते सातवे शतक एवढा काळ सुरु राहिली. सरस्व्वती नदीचे खोरे एवढाच काय तो त्यांचा मर्यादित भूगोल.ही सरस्वती नेमके कोठली यावर विद्वानांत मतभेद आहेत. ही अफगाणिस्तानातील "हरहवती" (स चा उच्चार ह होतो) नदी असावी असे अनेक विद्वानांचे मत आहे.

या धर्मावर भारताचा शेजारी इराणमद्धे निर्माण झालेल्या झरथूष्ट्राच्या अहूर माझ्दा धर्माचा (पारशी धर्म) प्रभाव स्पष्टपणे दिसतो. वैदिकांच्या इंद्र, वरुण, मघवान वगैरे बहुतेक देवता झरथुष्ट्राच्याही पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या असूर संस्कृतीतील तिकडच्या माझ्दा धर्मात होत्याच. तिकडच्या दुय्यम देवतांना वैदिक धर्मात मात्र प्रमुखत्व मिळाले. ही झाली धार्मिक संकल्पनांची देवान-घेवाण. पण येथे ही देवान-घेवाण शत्रुत्वाच्या भावनेतून झालेली आहे. त्याचमुळे कि काय जी दैवते पारशी धर्मात दुष्ट आहेत तीच दैवते वैदिक धर्मात प्रेय म्हनून अवतरतात. झरथूष्ट्राबद्दलचा द्वेषही ऋग्वेदातील अनेक ऋचांत डोकावतो तसेच शैव लिंगपुजेबाबतही घडते. पुढील काळात (इ.स. दोनशेनंतर) वैदिक धर्मियांनी मुर्तीपुजेचा स्वीकार केल्याचेही चित्र आपल्याला दिसते. यज्ञसंस्थेचे माहात्य्म वैदिक धर्मियांनी कितीही गायले असले तरी यज्ञ मात्र अत्यल्प झालेले दिसतात. हेही एक वैदिक धर्मातील परिवर्तन आहे. याच प्रदिर्घ काळात भारतात पांचरात्र, नारायणीय असे अवाढव्य तांत्रिक पंथही निर्माण झालेले दिसतात. लोकायत, सांख्य, वैशेषिक असे स्वतंत्र इहवादी/जडवादी तत्वज्ञाने मांडनारे वैचारिक प्रवाह तसेच सुखवादाचा सर्वस्वी त्याग करणारे समनही याच प्रदिर्घ काळातले.

समन परंपरेतुनच इसपूच्या सहाव्या शतकात पुन्हा दोन धार्मिक प्रवाह निर्माण झाल्याचे आपल्याला दिसते. पहिला प्रवाह होता तो महावीराने सुस्थापित केलेला तर दुसरा प्रवाह होता जो गौतम बुद्धाने प्रवर्तीत केलेला. अहिंसा, सत्य, अस्तेय, सम्यक विचार, पंचशील ई. नवीन धर्म (नीति) तत्वे या दोन्ही धर्मांनी थोड्याफार फरकाने दिली. या कालातील राजव्यवस्था अत्यंत उदार आणि तुलनेने सहिष्णु होते असे आपल्याला दिसते. बिंबिसाराने बुद्धाला केवळ प्रस्थापित विचारांना आव्हान देतो म्हणून न नाकारता स्वीकारले व स्वत: त्या धर्माची दीक्षा घेतली. त्याचाच पुत्र अजातशत्रू जरी आधी बौद्ध धर्माविरुद्ध असला तरी त्यानेही आपले मतपरिवर्तन केल्याचे दिसते.

यावेळचे समाजजीवन काय होते? वर्णव्यवस्था-जातीव्यवस्थेचे स्थान काय होते? बुद्ध जन्माधारित नव्हे तर कर्माधारित वर्णव्यवस्था मानीत होते असे काही सुत्तांवरून दिसते. वैदिक धर्मियांच्या
ऋग्वेदातही वर्णव्यवस्था बळकट असल्याचे सूचन होत नाही. जे आहे ते फक्त तीन वर्णांचे आणि तेही सैल दिसतात. (पुरुषसूक्त अपवाद आहे, पण ते नंतर घुसवलेले आहे हे आता सिद्ध झाले आहे.) व्यवसायाधिष्ठित जाती या सिंधू काळापासूनच होत्या पण त्याही परिवर्तनीय होत्या. नवनवे उद्योग निर्माण झाले कि लोक आपले परंपरागत व्यवसाय सोडून त्यत पडू शकत. सर्वच
व्यवसायांना प्रतिष्ठा होती. त्यांच्या देशव्यापी श्रेण्या असत व राज्यव्यवस्थेवरही त्यांचा अंकुश असे. अगदी सहाव्या शतकातही बुरुड, चर्मकार, सोनार, कुंभार यांच्या श्रेण्या असल्याचे उल्लेख ताम्रपट/शिलालेखांत मिळतात. म्हणजे जन्माधारित बंदिस्त आणि आता अन्यायकारी म्हणवली जानारी जातीव्यवस्था तेंव्हा अस्तित्वातच नव्हती.

पुरातन काळी बव्हंशी राज्यव्यवस्था या गणसत्ताक पद्धतीच्याच होत्या. अजातशत्रूने साम्राज्यवादी आकांक्षा बाळगत तत्कालीन लिच्छवीदि ३६ गणराज्यांशी युद्ध पुकारले होते. पुढे मौर्य घराण्यानेही साम्राज्यवादच जोपासला. असे असले तरी नाणकशास्त्रीय इतिहासावरून इसपू ३५० ते जवळपास इसवीसनाचे दुसरे शतक या काळापर्यंत अनेक गणराज्ये (जानपदे/महाजानपदे) अस्तित्वात होती. योधेय गणराज्य हे त्यातल्या त्यात अधिक उल्लेखनीय आहे.

एकार्थाने पहायला गेलो तर गणराज्ये हा भारतीय राज्यव्यवस्थेचा पुरातन घटक होता असेच उपलब्ध पुराव्यांवरुन दिसते. ही गणराज्ये म्हणजे आजच्या लोकशाहीचे आदिम रूप होय. खुद्द गौतम बुद्धही शाक्य गणराज्यातील होते. गणराज्ये आकाराने फार छोटी असत व त्यात बव्हंशी निर्णय सर्वानुमताने घेतले जात. परंतू बिंबीसारानंतर मात्र हळूहळू राजाप्रधान एकतंत्री राज्यव्यवस्थेचा जन्म होत पुढे ती साम्राज्यवादात बदललेली दिसते.

पुढे येतो तो अलेक्झांडरच्या आक्रमणाचा काळ. जरी त्याचे आक्रमण सीमाभागापर्यंतच मर्यादित असले तरी त्याचा सांस्कृतीक परिणाम मात्र खूप मोठा होता. पुढे अनेक ग्रीक, शक, हुण, कुशाण राजवटींने भारताचा उत्तर भाग व्यापला. त्यात कुशाण राजवट सर्वात महत्वाची आहे.

कुशाण हे झरथुष्ट्राच्या धर्माचे अनुयायी. त्यांनी एतद्देशिय शिव स्वीकारला तसाच बुद्धही. भारतात सर्वप्रथम शिव आणि बुद्द्ध अवतरतो तो कुशाण नाण्यांवर. भाषाही ग्रीक जशी वापरली तशीच येथील प्रतिष्ठित प्राकृतही. (कनिष्काचा मात्र भाषेबाबत अपवाद...त्याने मात्र गांधार भाषाच वापरली.) संस्कृत भाषेचा उदय इसपू दुस-या शतकात सुरु झाला. प्राथमिक संस्कृत ही अनेक नाणी, शिलालेख ते निया येथील पाट्यांत अवतरत जात, विकासाचे टप्पे दर्शवत जात सन १५० च्या शक राजा रुद्रदामनच्या शिलालेखात विकसीत रुपात दिसते. पुढे सन २५० मद्धे पाणिनीने व्याकरण लिहित संस्कृत भाषेला ख-या अर्थाने प्रगल्भ वैभव दिले.

कुशाणांमुळे कलेतही क्रांती झाली. गांधार शैलीने आपले कलाजीवन व्यापून टाकले. सामाजिक जीवन कसे होते हे आपल्याला हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीतून समजते. सामाजिक कठोर बंधने न पाळनारा, मनसोक्त जीवन जगणारा, अत्यंत सहिष्णू आणि स्नेहमय समाजजीवनाचे चित्रण हालाच्या संकलित गाथांतून दिसून येते. धार्मिक बंधने कठोर नसल्याचे पुरावे त्यात ठायीठायी मिळतात. संस्कृत अजून पुरेशी विकसीत नसल्याने माहाराष्ट्री, शौरसेनी, गांधारी, मागधी, अर्धमागधी ई. प्राकृत भाषांनीच समाजजीवन व राजकीय जीवन व्यापलेले आपल्याला दिसते.

सातवाहनांनी डोंगरी किल्ले बांधायला सर्वप्रथम सुरुवात केली. अगदी रायरीही (रायगड) सातवाहन काळातील गिरीदूर्ग. अनेक बौद्ध लेणी (नाशिकचेही) त्यांच्याच काळात व आर्थिक मदतीने उभारली गेली. त्यांचे नौदल बलाढ्य होते. इतके कि तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले अश्व ज्याचे ते सातवाहन असे सार्थ अभिमानाने म्हटले गेले. लीलावई या काव्यग्रंथात हालाने श्रीलंकेवर स्वारी करून, तेथील राजाला हरवून त्याच्या कन्येशी कसा विवाह केला याचे विस्तृत वर्णन आहे. नगररचनाशास्त्रातही त्यांनी भर घातली. सातवाहनांनी महाराष्ट्रावर साडेचारशे वर्ष राज्य केले. आज महाराष्ट्राची भाषा आणि संस्कृतीत त्यांचे योगदान हिमालयाएवढे मोठे आहे.

यानंतर चवथ्या शतकात भारतात गुप्तकाळ अवतरला. हा काळ अत्यंत लक्षवेधी आणि अर्थपूर्ण आहे. या काळापावेतो संस्कृत भाषा पूर्ण विकसीत झाली होती व ग्रंथलेखनात तिचा वापर मोठ्या प्रमाणात होवू लागला होता. गुप्तांनी संस्कृतला राजाश्रय दिला. हजारो प्राकृत ग्रंथ सम्स्कृतमद्धे अनुवादित, रुपांतरीत होऊ लागले. विष्णु-लक्ष्मी या तोवर अज्ञात असलेल्या देवता गुप्तांच्या नाण्यांवर अवतरू लागल्या. एकार्थाने ही सांस्कृतीक उलथापालथ होती. रामायण-महाभारत याच काळात संस्कारीत केले गेले. अनेक स्मृत्यांचा जन्मही याच काळात झाला. वैदिक माहात्म्याचा उदो-उदो याच काळाने सुरू केला. शैव-वैष्णव वादाची मुहुर्तमेढ या काळाने तर रचलीच पण बौद्धधर्मविरोधाने याच काळात गती पकडली. एकार्थाने सहिष्णु भारत धार्मिक संघर्षात अडकला.

गुप्तकाळ हा भारताचा स्वर्णकाळ होय असे तत्कालीन स्थिरता आणि सुबत्तेमुळे म्हणता येत असले तरी त्यांनी जी धार्मिक उलथापालथ करायचा प्रयत्न केला त्यामुळे त्याला सांस्कृतीक अराजकाचा काळ म्हणता येईल. कारण पुढे गुप्त मावळले असले तरी ती विचारधारा अनेक राजसत्तांनी देशभर राबवली अथवा राबवण्याचा प्रयत्न केला असे आपल्याला तत्कालीन सांस्कृतीक संघर्ष व विचारधारांतून दिसून येते. याच काळाने वर्णभेदाच्या पायाला व्यापक केले आणि तो दहाव्या शतकानंतर समाजमनात रुजत गेला हेही येथे विसरून चालणार नाही.

असे असले तरी दहाव्या शतकापर्यंत तरी जातीव्यवस्था पुरेशी सैल होती असे दिसून येते. नव्या शोधांबरोबर नवे व्यवसाय जसे जन्म घेत तशा नव्या जाती बनत, जातबदल करता येत होते, जे व्यवसाय नष्ट झाले त्या जाती अन्य जातींत विखरून जावू शकत. म्हणजेच समाजव्यवस्था वेद अथवा स्मृतीप्रणित विधानांना गांभिर्याने घेत नव्हती. विविध परिवर्तने पचवत भारतीय समाज अग्रगामीच राहिला होता. अल मसुदीने दहाव्या शतकातील चेऊल, ठाणे बंदरांचे जे वर्णन केले आहे त्यावरून त्यावेळच्या भरभराटीचा अंदाज येतो. या काळात भारतीय उद्योजक/व्यावसायिक विदेशातही आपल्या वसाहती स्थापन करीत. एकट्या इजिप्तमद्धे दहा हजारापेक्षा अधिक भारतीय वसाहत करून राहिले होते.

परंतू पुढे स्थिती बदलली. १०२३ पासून भारतात दुष्काळांची रांग लागली. त्यात मुस्लिम आक्रमणांनी व नंतर त्यांच्या प्रस्थापित सत्तांनी सामाजिक, राजकीय व आर्थिक जीवन ढवळून काढले. यातून संस्कृतीनेही अधोगती गाठणे स्वाभाविक होते. वैदिक आणि शैव हे स्वतंत्र धर्म असतांनाही याच काळात वैदिक संस्कृतीने राजाश्रयांमुळे उचल खाल्ली. दुसरीकडे इस्लामी वर्चस्वाने उचल खाल्ली. लक्षावधी धर्मांतरे याच काळात झाली. बाराव्या शतकापर्यंत तुलनेने इहवादी असणारा भारतीय समाज तीव्र गतीने परलोकवादी बनू लागला. गाथा सप्तशतीतील, मृच्छकटिकातील मूक्त समाज बंदिस्त होत गेला. विजयांची सवय असलेल्या समाजाला भिषण, अमानवी पराजयांचा व शोषणाचा सामना करावा लागला. हा काळ हा सर्वस्वी सांस्कृतिक गोंधळाचा होता आणि त्याचे निराकरण होण्याऐवजी भारतीय माणूस अडकतच गेला.

याची परिणती धार्मिक जीवनात वैदिकसत्ता बळकट होण्यात झाली. आपलीच दैवते अपहृत होतांना भारतीय समाजाला पहावी लागली. दुष्काळ, थांबलेला विदेशव्यापार, जाचक बंधने यामुळे अर्थसत्ता हातातून गेल्याने निर्माणकर्त्या समाजांना बलुतेदारीच्या भिषण सापळ्यात अडकावे लागले. गांवगाडा हा आपण मानतो तसा पुरातन नाही. तथाकथित गावगाडा हा आहे त्या अपरिहार्य स्थितीतून निर्माण झाला पण त्यातून बाहेर पडायची संधी मिळायला साताठशे वर्ष गेली. त्यामुळे आर्थिक प्रेरणा संपल्या व केवळ जगणे महत्वाचे झाले. नवे शोध थांबले. व्यवसाय जातीअंतर्गत बंदिस्त होऊ लागले आणि त्याची भिषण परिणती म्हनजे जातीव्यवस्था जन्माधारित तर बनलीच पण क्रुरही बनली.

महाराष्ट्रापुरता विचार येथे करायचा तर, दहाव्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंत किमान साडेतिनशे भिषण दुष्काळ महाराष्ट्राने अनुभवले. देवगिरीचे साम्राज्य कोसळतांना पाहिले. यातून विद्रोही प्रेरणा मिळण्याऐवजी महाराष्ट्र हा आध्यात्मिक परलोकवादी चिंतनात अडकत गेला. ज्या महाराष्ट्रातून ज्ञानविज्ञानाच्या चर्चा होत असत त्या महाराष्ट्रात टाळ-मृदुंगाचे व हरीनामाचे प्रतिध्वनी उमटू लागले. तत्वचर्चा थांबत धर्मचर्चांना उत आला.

सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांच्या रुपात एक महामानव जन्माला आला व पराजितांची संस्कृती पुन्हा विजयांत बदलली. भले ती अल्प भुभागापुरती मर्यादित असेल. पण तिचे पडसाद देशभर उमटले नसतील तरच नवल. ही परिवर्तनाची अजून एक नांदी होती. पण दुर्दैवाने पुढील पिढ्यांना त्याचे भान राहिले नाही. दिल्लीश्वरांचे अंकित राहण्यात व त्यांच्याकडून सनदा मिळवण्यात ती मग्न राहिली. मोगली सत्ता मानसिक दृष्ट्या अपराजित राहिली.

पानिपत अपरिहार्यच होते तसेच इंग्रजांचे साम्राज्य निर्माण होणेही. यशवंतराव होळकर एकमेव अपवाद ज्या महावीराने इंग्रजांचा धोका ओळखला...एकहाती १८ विजयी युद्धे करत इंग्रजांना जेरीला आणले. पण अन्य भारतिय राजे-संस्थानिकांनी आपला हात आखडता घेतला. पुन्हा नवे पारतंत्र्य अपरिहार्यच होते.

इंग्रजी राज्याने भारताची संस्कृती बाह्यांगांनी का होईना आमुलाग्र बदलवली हे मान्य केलेच पाहिजे. त्यांच्यामुळे जशी स्थानिक अर्थव्यवस्था पुरती कोसळली तसेच आधुनिक ज्ञानविज्ञानाची दारेही उघडली. भारतीय प्रथमच नवीन दृष्टीकोणातून समाजजीवनाचा विचार करू लागले. धर्मसंस्थेने नागवल्या गेलेल्यांच्या विद्रोहाचे महान प्रतीक म्हणजे महात्मा फुले. त्यांनी जहाल भाषेत जी धर्मव्यवस्थेवर व समाजव्यवस्थेवर टीका केली तिला भारतीय समाजेतिहासात तोड नाही. लोकहितवादी, आगरकर, राजा राम मोहन राय....प्रभुतींनीही आपापल्या परीने समाजसुधारणेचे चंग बांधले.

हा भारतीय सांस्कृतीक उलथापालथीचा नवा काळ होता. तसाच राजकीय स्वातंत्र्य आणि राष्ट्रभावनेच्या उभारणीचाही काळ होता. तशी राष्ट्रभावना भारतियांना अपरिचित होती. राज्य-साम्राज्य-गणराज्य यांपार ती कधीही विकसीत झालेली नव्हती. येथीत भाषा भिन्न,. स्थानिक संस्कृत्या भिन्न. या देशाला आधुनिक काळातील "राष्ट्र" या संकल्पनेत सामाऊन घेणे निव्वळ अशक्य बाब होती.

पण हीही क्रांती केली ती मोहनदास करमचंद गांधी या दुर्बळ पण पराकोटीचे मनोबळ असणा-या माणसाने. भारतीय संस्कृतीतीलच अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह या उदात्त मुल्यांना नवा राजकीय आणि सामाजिक आशय देत या महात्म्याने सर्व भाषा, वंश, प्रांत, जाती-जमातींतील माणसे एकमय करून दाखवली आणि आजचा हा आपला देश आपला देश झाला. भारतीय मुल्यांशी ज्यांची एकनिष्ठता असू शकत नाही त्यांना तुकडा करून प्रांत देऊन टाकला. भारताने केलेली आजच्या आधुनिक जगातील ही सर्वश्रेष्ठ् क्रांती होय. तिचे पडसाद जगभर उमटले आहेत. आजही जगात हिंसा कि अहिंसा असा प्रश्न उद्भवतो तेंव्हा निर्विवादपणे गांधींच्या अहिंसामय तत्वज्ञानाचा जयघोष होतो.

हिंसात्मक जगाकडून अहिंसात्मक जगाकडे वाटचाल करण्यासाठी भारताने अखिल विश्वाला जर काही योगदान दिले असेल तर ते हेच होय. यातून जी सांस्कृतीक क्रांती/परिवर्तन घडले आहे ते मोलाचे आहे. काळ पुढे जात असतो....जात राहील...परिवर्तन हाच संस्कृतीचा नियम असतो...

याच काळात झालेल्या बाबासाहेब आंबेडकर या अलौकिक व्यक्तीमत्वाने भारतातील शोषित, वंचित, व्यवस्थेने नागवलेल्या पुर्वास्पृश्य समाजांत याच वेळी चेतना जागवली. आजवर हजार वर्ष तरी जो समाज अन्यायाचे गाडगे उरावर वागवित आला होता त्याच्यात प्राण भरले. भारतात झालेली ही अभूतपुर्व सामाजिक क्रांती होय. बाबासाहेब तेथेच थांबत नाहीत. ते अन्याय्य वैदिक वर्णव्यवस्थेला लाथ मारीत धर्मक्रांतीही घडवते झाले. म्हणजे त्यांनी आपल्या अनुयायांसह मानवतेचा, समतेचा, करुणेचा व मानवी जीवनाला आधारभूत ठरणा-या तत्वांचा बौद्ध धर्म स्वीकारला. भारताच्या इतिहासातील ही पहिली आधुनिक सामाजिक/धार्मिक क्रांती होय. यामुळे त्यांना आत्मविश्वास मिळाला. आत्मभान आले आणि या समाजातून भारताचे अनेक विद्वान, संशोधक, उद्योजक, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी तसेच मुक्त अभिव्यक्ती करणारे साहित्यिक-कवि-विचारवंत पुढे आले. त्यांनी समाजाला त्यांच्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन दिला. यामागे बाबासाहेबांची कठोर काटेरी मार्गावरील वाटचाल होती. बाबासाहेबांचे चिंतन, अभ्यास आणि स्वतंत्र प्रज्ञा होती. बाबासाहेबांची प्रज्ञा कोणाचीही कधीही बटीक झाली नाही. त्यामुळे सामाजिक पारतंत्र्यात जगणारे बांधव मुक्ततेचा श्वास घेऊ शकले.

परिवर्तनाचा आढावा घेत असतांना आपण आणीबाणीचा कालखंड विसरु शकत नाही. या देशात फक्त आणि फक्त लोकशाहीच टिकू शकते...या देशात हिंस्त्र हुकुमशाही प्रवृत्तींना थारा नाही हे देशाने जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या यशस्वी आंदोलनाने सिद्ध केले. लोकशाहीचे घटनात्मक तत्व अंतत: विजयी ठरले. भारतात जशा सामाजिक क्रांत्या झाल्या, धार्मिक क्रांत्या झाला तशीच अजून नवी सामाजिक आणि आर्थिक क्राती वाट पहात होती. मंडल आयोगाच्या निमित्ताने देशातील ५२% निर्माणकर्त्या ओबीसी समाजासाठी एक द्वार उघडले. त्यांना कधी नव्हे ते राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली. अर्थात हे सोपे नव्हते. ओबीसींचा लढा आजही संपला आहे असे नाही. त्यांना आपल्या निर्माणकर्त्या एकमयतेचे भान अजून आले आहे असे तर मुळीच नाही. परंतू हा समाज परिवर्तनाचा उंबरठ्यावर उभा आहे आणि या समाजात परिवर्तन घडेल अशी आशा बाळगायला पुरेसा वाव आहे.

आपण ज्याचा आढावा घेतलाच पाहिजे ती म्हणजे अर्थसंस्कृती. भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला त्यामुळे जे परिवर्तन घडते आहे ते अभुतपुर्व आणि भयभीत करणारे आहे. आपण एक जागतिक खेडे बनलो. जागतिक संस्कृतीला भारतात मूक्त द्वार मिळाले. भारतियांनी जगात गगनभरा-या घ्यायलाही सुरुवात केली. आपली पुर्वापार ग्रामीण व्यवस्थाही ढवळुन निघाली. समाजजीवन आणि नातेसंबंधांची नव्याने रचना व्हायला लागली. एका अर्थाने मानवी संबंध नव्याने आकार घेउ लागले. या गेल्या वीस वर्षांतील बदलांचे आपल्याला नीट विश्लेशन करायचे आहे.

कारण एकीकडे आधुनिकतेत घुसलेला भारतीय समाज, अर्थव्यवस्थेची फळे चाखनारा समाज दिवसेंदिवस जातीयवादी, धर्मवादी. असहिष्णु आणि क्रुर बनतांना आपण पहात आहोत. बाबरी मशिद ते मुस्लिम दहशतवादाने घातलेले थैमान आपण आठवतो. गुजरातमधील मुस्लिमांचा नरसंहार हे एक उदाहरण. खैरलांजीच्या कटू आठवणी शमतात न शमतात तोच दर दिवसाआड दलितांच्या हत्या...तरुणींवरचे बलात्कार...वस्त्या जाळणे हे प्रकार वाढतच चाललेले दिसतात. राजकारण...कोणत्याही पक्षाचे असो ते जातीयवादी, धर्मवादी बनतांना दिसतेय. विकृतपंथीय बुवा-बापुंचे स्तोम वाढतेय...सनातन प्रभातसारख्या संस्था धर्मविकृतीचे टोक गाठतेय...हा देश विज्ञानवादी होत नाही तर या जागतिकीकरणाला तरी मुळात अर्थ काय आहे हा प्रश्न आम्हाला जर पडत नसेल तर आधीच्या सर्व सामाजिक-धार्मिक क्रांत्यांना आम्हीच हरताळ फासला आहे असाच त्याचा अर्थ होत नाही काय?

आज आम्ही जिथे उभे आहोत तेथुन आमची संस्कृती महान म्हणायची असेल तर ती नेमकी कोणाची? कोणत्या कालातील? कोणत्या प्रांतातील? हे प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. संस्कृती सर्वत्रच सतत बदलत आलेली आहे. कधी तिने उच्च स्थान गाठले तर कधी ती अध:पतीत झालेली, विकृत व अमानुष झाल्याचे चित्र आपल्याला दिसते. त्यामुळे विगताचा अभिमान आपल्या कामी कितपत येवू शकतो? विगत आपल्याला आपला वर्तमान समजावून घ्यायला मदत करत भविष्यातील समतेची, एकमयतेची वाटचाल नव्याने सुरु करायला मदत करु शकतो. आपल्या चुका आणि तत्कालीन अपरिहार्यता आपल्याला दाखवू शकतो.

पण आजही गतकाळातील विशिष्ट संस्कृती म्हनजे भारतीय संस्कृती असे महिमान गात आपला वर्चस्ववादी अजेंडा राबवत असेल तर आपल्याला त्या प्रवृत्तींना नकार द्यावाच लागणार आहे.

आपल्याला अजून एका परिवर्तनवादी क्रांतीची गरज आहे.

प्रश्न फक्त आपण सज्ज असण्याचा आहे! आपण पुढेही बदलतरा
ाहु...नवनव्या ंत्रज्ञान/अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि राजकीय स्थित्यांतून जात राहु...

पण मानवतेचे चिरंतन गीत हेच आपले नित्य विश्वगीत असले पाहिजे! आणि "आमचीच संस्कृती श्रेष्ठ" असे काही नसते....संस्कृतीचे श्रेष्ठत्व बोलण्यात नसते तर आचरणात असते...!

Saturday, October 26, 2013

सातवाहन...प्राकृत आणि संस्कृत (१)

सातवाहन...प्राकृत आणि संस्कृत (१)


सातवाहनांचा काळ महाराष्ट्रच नव्हे तर राष्ट्रीय इतिहासाच्या दृष्टीनेही फार अर्थपूर्ण आहे. सातवाहनांनी सनपूर्व २३० ते इसवी सनाच्या २३० असे ४६० वर्ष राज्य केले. एवढा प्रदिर्घ काळ राज्य करणारा दुसरा वंश भारतात झाला नाही. प्रदिर्घ काळ राज्य केले एवढ्यापुरतेच या राजवंशाचे महत्व नाही तर धार्मिक, सामाजिक आणि साहितयसंस्कृतीच्यज़ क्षेत्रातही या घराण्याचे प्रत्यक्ष योगदान आहे. किंबहुना आजच्या महाराष्ट्राचा पाया सातवाहनांनी घातला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

सातवाहन हे प्राकृत भाषेचे आश्रयदाते होते व त्यांनी राजस्त्रीयांनाही प्राकृतातच बोलण्याचा नियम घातला होता असे वा. वि. मिराशी म्हणतात. याचाच अर्थ अन्य कोणती (संस्कृत) भाषा अस्तित्वात असल्याचा ते अस्पष्ट संकेत देतात परंतु त्यासाठी प्रमाण देत नाहीत. कथासरित्सागरातील सातवाहन राजाच्या एका पत्नीला संस्कृत येत होते व तिने चिडवल्यामुळे सातवाहन राजा संस्कृत शिकला अशी एक कथा गुणाढ्याच्या संदर्भात येते. पण कथासरित्सागरातीक्ल हा कथापेठ लंबक मुळचा गुणाढ्याचा नाही. तो उतरकाळात गुणाढ्याने पैशाची भाषेत बृहत्कथा का रचली याचे स्पष्टिकरण देण्यासाठे बनवली हे उघड आहे. सातवाहन काळात सन २०० च्या आसपास एकच मिश्र-संस्कृत शिलालेख मिळतो आणि तो सातवाहन राणी व रुद्रदामनची कन्या हिचा आहे. ब्रुहत्कथेची निर्मिती त्याच्या खूप आधी झाली असल्याने कथासरित्सागरची कथा विश्वसनीय मानता येत नाही.

एका बलाढ्य राजघराण्याची नाणी आणि शिलालेख ते तत्कालिन साहित्य प्राकृतातच असावे हे संस्कृतविदांना खटकणारे असणार हे नक्कीच. किंबहुना वा. वि. मिराशी नाणेघाट लेखाबद्दल म्हणतात, ".....पण त्या श्रौत यज्ञांचे वर्णन असलेला लेख मात्र संस्कृत भाषेतील नसून प्राकृत भाषेत आहे. किंबहुना,  एकाही सातवाहन राजाचा एकही लेख संस्कृतात नाही ही आश्चर्याची गोष्ट आहे...." याचे उत्तर मी वेळोवेळी दिलेले आहे...जी भाषा अस्तित्वातच नाही त्या भाषेत लेख कसे असू शकतील? आपण उत्तर भारतातील नाणी आणि शिलालेखांतही इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून हायब्रिड (मिश्र) संस्कृत नाणी आणि शिलालेखांतुन अवतरु लागल्याचे पाहिले आहे. आणि असाच प्रकार सातवाहनकालीन शिलालेखांत दिसतो याला कोणीही योगायोग म्हणु शकत नाही. म्हणजेच संस्कृत भाषा इसवी सनाच्या पहिल्या शतकात विकसीत होऊ पाहत होती...ती अस्तित्वात नव्हती.

सातवाहन काळात उत्तर भारताप्रमाणे फक्त सामान्यांचीच नव्हे तर राजभाषाही प्राकृत होती.  सातवाहनांच्या चारशे साठ वर्षांच्या कारकिर्दीतील सर्व नाण्यांवरील मजकुर प्राकृत भाषेतील आहे. सर्व शिलालेख प्राकृत भाषेतील आहेत. पण या प्राकृत भाषेत क्रमशा: झालेली परिवर्तनेही आपल्याला दिसुन येतात. याला आपण भाषिक उत्क्रांती म्हणतो. आणि एवढ्या प्रदिर्घ काळात ती तशी होणे स्वाभाविक आहे. कोणत्याही जीवंत भाषेचा तो एक महत्वाचा निकष असतो.

वररुचीने माहाराष्ट्री प्राकृताचे "प्राकृत प्रकाश" हे व्याकरण लिहिले. प्रत्यक्षात आपल्याला वररुचीचे मूळ व्याकरण उपलब्ध नसून भामहाने केलेला त्या व्याकरणाचा संस्कृत अनुवाद/टीका उपलब्ध आहे. माहाराष्ट्री प्राकृत हे सर्वश्रेष्ठ मानले जात होते. शौरसेनी, मागधी ई. प्राकृत भाषांचे व्याकरण देतांना "शेष माहाराष्ट्रीवत" असे वररुची म्हणतो. प्रत्यक्षात प्राकृत शब्द हा मुळचा "पाअड" (प्रकट) या शब्दाचे संस्कृतीकरण आहे. त्यामुळे प्रस्तुत लेखमालेत आपण सोयीसाठी "प्राकृत" हा शब्द वापरत असलो तरी तो पाअड भाषानिदर्शक आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. असो.

माहाराष्ट्री प्राकृत अथवा पाअड श्रेष्ठ का मानली जात होती? कवि दंडी तिला "प्रकृष्टं प्राकृत" म्हणजे उत्कृष्ठ प्राकृत म्हणतो. काव्यरचना माहाराष्ट्री प्राक्रुतातच करावी असा आग्रह धरला जात असे. (साहित्यदर्पण) याचे उत्तर सातवाहनांच्या प्रदिर्घ स्थिर सत्ताकाळामुळे त्या भाषेत मौलिक ग्रंथरचना होत राहिली या वास्तवात आहे. स्थिर शासनाच्या अंमलाखाली कला-संस्कृती बहरत असते आणि सातवाहनांमुळे महाराष्ट्रात नेमके तेच झाले.

प्राकृत भाषेचा व्याकरणकार वररुची नेमका कधी झाला याबाबत विद्वानांत बरेच मतभेद आहेत. त्याबाबत मी स्वतंत्र लेखात विचार करणारच असलो तरी येथे हे नमूद करुन ठेवतो कि हालाची "गाथा सतसइ" वररुचीचे नियम कटाक्षाने पाळते. व्यंजनांचे द्वित्व व त्यांचा लोप हे वररुचीच्या माहाराष्ट्री प्राकृताच्या व्याकरणातील महत्वाचा नियम होय. गाथा सप्तशतीतील रचना हा नियम पाळतात. हाल हा सातवाहन वंशातील अठरावा राजा होय. (तो सतरावा राजा होता असे डा. अजय मित्र शास्त्री म्हणतात) तो गौतमीपुत्र सातकर्णीच्या पुर्वी सहाव्या (किंवा पाचव्या) पिढीत होऊन गेला अशी मान्यता आहे. गौतमीपूत्र सातकर्णी इसवी सनाचा पहिल्या शतकात होऊन गेला. सरासरी इसवी सनाच्या साठ साली त्याचे राज्यारोहन झाले असा तर्क आहे. तो काही वर्ष मागे-पुढे होऊ शकतो हे गृहित धरले तरी हाल सातवाहन इसपु च्या पहिल्या शतकातील उत्तरार्धात झाला असे अनुमान करता येते. पुराणांनी जरी हालाने फक्त ५ वर्ष राज्य केले असे म्हटले असले तरी ते खरे नाही, हालाने प्रत्यक्षात दिर्घ काळ राज्य केले असावे असे वा. वि. मिराशींनी सिद्ध करुन दाखवले आहे.

म्हणजे इसपूच्या पहिल्या शतकात हालाने गाथा संग्रह सुरु केला हे आपल्याला निश्चयाने म्हणता येते. वररुचीचे व्याकरण या काळात कवि-साहित्यकारांत प्रचलित झाले होते हे वररुचीच्या व्याकरणाचे नियम गाथा सत्तसई व अन्य ग्रंथ पाळतात त्यावरुन सिद्ध होते. कोणतेही व्याकरण प्रचलित व्हायला तत्कालीन प्रचार-प्रसारावरील मर्यादा लक्षात घेता किमान शंभरेक वर्ष लागु शकतात. म्हणजेच प्राकृत प्रकाशकार वररुची हा इसवी सनापुर्वीचा दुस-या शतकातील किंवा तत्पुर्वीचा असावा असा तर्क बांधता येतो. इतिहासात अनेक वररुची नांवाच्या व्यक्ति झाल्या आहेत, पण पाअड भाषांचे व्याकरण रचणारा वररुची ही स्वतंत्र व्यक्ति होय.

असे असले तरी शिलालेखीय प्राकृतात मात्र वररुचीच्या व्याकरणाचा द्विस्तर व्यंजन लोप या नियमाचा वापर केला गेलेला नाही. शिलालेखीय गद्य भाषा आणि ग्रांथिक काव्य-भाषा यांतील भेदामुळे गद्यात व्याकरणीय नियम कटाक्षाने पाळले न जाणे स्वाभाविक आहे.

आता आपल्याला सातवाहन नाण्यांवरील भाषेकडे वळत चारशे साठ वर्षांच्या प्रदिर्घ काळात भाषेत काही बदल दिसतोय काय हे शोधायचे आहे.

(क्रमश:)

Friday, October 18, 2013

फक्त सत्ताकेंद्रे टिकवण्यासाठी मराठा आरक्षण?



मराठा आरक्षणाच्या मागणीवरून रण पेटले आहे. शासनाने राज्य मागासवर्गीय आयोग अस्तित्वात असतांनाही नारायण राणेंच्या अध्यक्षतेखाली याबाबत शिफारशी करण्यासाठी एक समिती नेमली आहे. राणे समिती जेथेजेथे जात आहे तेथे तेथे मराठा संघटना व व्यक्ति मोठ्या प्रमाणावर निवेदने देत आहेत. मराठा समाजाचे निवेदने जेवड्या मोठ्या प्रमाणावर जात आहेत त्या प्रमाणात मात्र ज्यांचा या आरक्षणाला विरोध आहे त्यांची निवेदने मात्र जात नाहीत याची खंत व संताप काही ओबीसी विचारवंतांत आहे. मुळात ही मागणी न्याय्य आहे काय? घटनेच्या चौकटीत बसू शकते काय? आरक्षणाचे गाजर मराठा तरुणांना दाखवत त्यांची भावनिक फसवणूक करत मतपेट्या फुगवण्याची तर ही चाल नाही ना? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात व त्यांवर तारतम्याने विचार केला पाहिजे. 

मराठा समाजात आता बेरोजगारीमुळे व शेतीचे पिढ्यानुपिढ्या तुकडीकरण होत आल्याने दारिद्र्याचे प्रमाण वाढले आहे हे खरे आहे. शिक्षनात हा समाज मोठ्या प्रमाणावर मागे राहिला आहे हेही खरे आहे.राजकीय क्षेत्रात मात्र या समाजाकडे आज जवळपास ७०% वाटा आहे हेही एक वास्तव आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील बहुतेक शिक्षणसम्राटही याच समाजातून आले असून पतसंस्था, सहकारी ब्यंका, साखर कारखाने, सूतगिरण्या आदिंच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या नाड्याही याच समाजाच्या हातात आहेत. ओबीसींच्या आरक्षणामुळे ग्रामपंचायतींवरील सत्ता मात्र कमी होत चालली आहे. या समाजाची नेमकी खंत काय आहे? शिक्षण-रोजगारातील वाटा कमी होतोय ही कि सत्तेत वाटेकरी निर्माण झालेत ही?

मराठा समाजाचे ओबीसीकरण करण्यासाठी मराठा व कुणबी हे एकच असा दावा करण्यात येत आहे. खुद्द कुणबी समाजाचा याला विरोध आहे कारण बेटीव्यवहाराच्या वेळीस मराठा व कुणबी यांच्यात साम्य मानले जात नाही हे एक सामाजिक वास्तव आहे. "आम्हाला राजकीय आरक्षण नको...फक्त शिक्षण व नोक-यांत हवे" ते "आम्हाला ओबीसींच्या कोट्याला कसलाही धक्का न लावता स्वतंत्र आरक्षण द्या" अशा स्वरुपाच्या मागण्या कधी हिरीरीने तर कधी दडपशाहीच्या जोरावर होत आहेत. मराठा आरक्षण याच विषयावर आमदार बनलेले विनायक मेटे निवडणुका जवळ आल्या कि मराठा आरक्षनाचा विषय पेटवतात असा आता मराठा समाजानेच आरोप करणे सुरू केले आहे. "आर्थिक आधारावर आरक्षण द्यावे" असे शरद पवार यांचे म्हणणे आहे. मराठ्यांना एक टक्काही वेगंए आरक्षण दिले जावू नये कारण त्यामुळे खुला प्रवर्गाची, ज्यावर सर्वांचाच अधिकार असतो, टक्केवारी घटणार आहे असे ओबीसी विचारवंतांचे म्हणने आहे. आपण जरा या सर्वच बाजू तपासून पहायला हव्यात.

पहिली बाब म्हणजे घटनेप्रमाने फक्त शिक्षण व नोक-यांत आरक्षण देता  येत नाही. आरक्षण हेच मुळात राजकीय प्रतिनिधित्वासाठी असून शिक्षण व नोक-या हे त्याचे उपविभाग आहेत. ते एक प्यकेज आहे व तोडून देता येत नाही. द्यायचे झाले तर सर्वात आधी घटनादुरुस्ती करावी लागेल याचेही भान कोणाला नाही. आरक्षन हे गरीबी हटावचा कार्यक्रम राबवण्यासाठी नसून सर्व उपेक्षित व मागास समाजघटकांना शासकीय व राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी व समतेचे तत्व अबाधित ठेवण्यासाठी आहे. राजकीय सत्तेत मराठा समाज त्यांच्या लोकसंख्येपेक्षा दुप्पटीपेक्षा अधिक असल्याने ही मागणी कशी मान्य होणार हा प्रश्न मेटेंना का पडला नाही? केवळ मराठ्यांना घटनात्मक तरतुदींमुळेच आरक्षण मिळू शकत नाही असे प्रसिद्ध विचारवंत प्रा. हरी नरके यांनी वारंवार स्पष्ट केल्यानंतर व्यक्तिगत शत्रू असल्याप्रमाने नरकेंवर व्यक्तिगत हल्ले करत त्यांना मराठाद्वेष्टा ठरवण्याचा प्रयत्न मेटेंनी वारंवार केला आहे, हे कोणत्या लोकशाहीत बसते?

दुसरी बाब म्हणजे आरक्षण हा मुळात गरीबी हटावचा कार्यक्रम नसल्याने "आर्थिक आधारावर आरक्षण द्यावे" असे शरद पवार कसे म्हणतात हे त्यांनाच ठाऊक. आर्थिक आधारावर आरक्षनाची घटनात्मक तरतूद नाही. गरीबी हटावसाठी अनेक शासकीय योजना खूप आधीपासूनच अस्तित्वात आहेत. शिक्षणात आर्थिक मागासांना फी माफीची तरतूद आहे. 

तिसरी सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे मराठा आरक्षनाच्या मागणीमुळे आजवर ओबीसी ज्या समाजाला थोरल्या भावाप्रमाणे मानत होते ते मराठ्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. समाजातील ही उभी फूट किती धोकेदायक आहे हे आरक्षणवादी मराठा नेत्यांना समजत नाही कि काय? याचे परिनाम दीर्घ काळात सामाजिक विद्वेष वाढण्यात होनार नाही याची काय हमी आहे? 

नारायण राणे समिती बेकायदेशीर आहे कारण राज्य मागास वर्ग अस्तित्वात असतांना अशी समांतर समिती नेमता येत नाही असा दावा ओबीसी नेते करत असले तरी राज्य शासनाने या समितीच्या अध्यादेशात शब्दात न अडकण्याची दक्षता घेतलेली आहे. राणे समितीचे कार्य मराठा समाजाचे सर्वेक्षण करणे व शिफारशी करण्याइतपत मर्यादित आहे. प्रत्यक्षात राणे फक्त निवेदने स्वीकारण्यातच व्यस्त दिसत आहेत. मराठा समाजात राजकीय जागृती ओबीसींपेक्षा अधिक असल्याने साहजिकच मराठ्यांचे आरक्षण समर्थक अर्ज अधिक येत आहेत हे उघड आहे. निवडणुकीच्या तोंडावर राणे समिती आपल्या शिफारशी जाहीर करून पुन्हा सत्तेत येण्यासाठीचा मार्ग खूला करण्याच्या प्रयत्नांत असले तरी ओबीसी मोठ्या प्रमाणावर सध्याच्या सरकारविरोधात जातील आणि मतपेट्यांतून आपला रोष व्यक्त करतील हा धोका नाही काय? शिवाय ५२% ही आरक्षणाची मर्यादा ओलांडता येत नसल्याने समजा असे अधिकचे आरक्षण राज्य सरकारने ही मर्यादा ओलांडत दिले तरी ते उच्च न्यायालयात तरी टिकणार आहे काय? यावर "नचियप्पन समितीच्या शिफारशी केंद्र सरकारने मान्य केल्यास मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा होईल" असा सल्ला एका ओबीसी विचारवंताने दिला आहे. तसे केले तर आरक्षनाची मर्यादा वाढवता येईल हेही खरे आहे पण त्यामुळे आरक्षनाच्या मुलतत्वालाच धक्का लागनार असल्याने नचियप्पन समितीच्या शिफारशी केंद्र सरकार स्वीकारत नाही व स्वीकारण्याची शक्यताही नाही. 

आजवरच्या सर्वच राज्य मागासवर्ग आयोगांनी व उच्च न्यायालयांनीही मराठ्यांना कोणत्याही निकषावर आरक्षण देता येत नाही म्हणुन मराठा आरक्षनाची मागणी फेटाळली आहे हे वास्तव आरक्षणवादी मराठा नेत्यांना माहित नाही असे नाही. परंतू तरुणांच्या भावना गैरवाजवी मागण्यांच्या मार्फत भडकावण्यात हे नेते व्यस्त आहेत.  

गेल्या काही निवडणुकांपासून मराठा समाजातील अनेक नेत्यांनी कुणबी असल्याचे प्रमाणपत्रे मिळविण्याचा सपाटा लावला आहे. अनेकांच्या निवडणुका या बोगसगिरीमुळे बाद झालेल्या आहेत. पण असे केल्याने ख-या ओबीसींच्या नैसर्गिक व घटनात्मक अधिकारांवर आपण अतिक्रमण करत आहोत याचे भान मराठा नेत्यांनी ठेवलेले नाही. सर्वत्र अशी प्रमानपत्रे मिळणे आता अडचणीचे झाल्याने मराठा आरक्षण हा पर्याय पुढे आला आहे हे वास्तव समजावून घ्यावे लागणार आहे. शिक्षण व नोक-या हे वरकरणीचे कारण आहे. असे आरक्षण मिळू शकत नाही, मिळाले तर ते राजकीय प्रतिनिधित्वासह असेल हे आरक्षणवाद्यांना चांगलेच माहित आहे. याबाबतीतील घटनादुरुस्ती शक्य नाही हेही वास्तव आहे. राजकीय प्रक्रियेत आत्ता कोठे प्रवेशू लागलेल्या ओबीसींना हा धोका चांगलाच माहित असल्याने आरक्षनाला विरोध होतो आहे याचे भान ठेवले जायला हवे. आणि मराठा समाजाचे सत्तेबद्दलचे पराकोटीचे आकर्षन अन्य समाजघटकांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठीच या आरक्षणाच्या मागण्या करत आहे हे एक छुपे असले तरी वास्तव आहे. शिक्षण व नोक-यांतील आरक्षण ही फक्त मराठा तरुणांची व अन्य समाजांची दिशाभूल करनारी मागणी आहे.

मराठा समाजात दारिद्र्य वाढत आहे व शिक्षणाचे प्रमाणही साधारण आहे. या वास्तवामुळे आरक्षनाच्या मागणीबाबत मराठा तरुण आक्रमक करता येणे सोपे आहे हे आरक्षनवादी नेते जाणतात. परंतू असे आरक्षण मिळू शकत नाही हे सत्य मात्र ते सातत्याने लपवत आले असल्याने मराठा तरुणांची जी भावनिक फसवणुक केली जात आहे ती नक्कीच निषेधार्ह आहे.

एक बाब आरक्षणवादी विसरत आहेत ती ही कि मुळात आरक्षणाने एकाही समाजाचे नीट भले केलेले नाही. आजवर एस.सी./एस.टी
समाजघटक देशात जवळपास २५ कोटींपेक्षा अधिक असुनही आजवर शासकीय नोक-या मिळाल्यात २५ लाखाच्या आसपास. ओबीसींना २७% आरक्षण असुनही प्रत्यक्षात आजवर ४.८% एवढेच ते वापरले गेले आहे. अनुशेषाचे प्रमाण अवाढव्य वाढलेले आहे. याचे कारण म्हणजे सरकार जागतिकीकरणामुळे एकमागोमाग एक क्षेत्रातून काढता पाय घेत आहे. नवीन भरत्या कमी झालेल्या आहेत. शिक्षण व आरोग्याचे खाजगीकरनही वेगाने वाढत चालले असून अनुदानेही कमी करण्याच्या मागे सरकार आहे. त्यामुळे शिक्षण हे दिवसेंदिवस महागच होत जाणार आहे. सध्याची शिक्षणपद्धती फक्त बेरोजगार निर्माण करणारे अवाढव्य कारखाने होऊन बसले आहेत. आज बेरोजगारी हा सर्वच समाजांपुढे प्रश्नचिन्ह बनून उभी आहे. आरक्षण शिक्षण व नोक-यांचे प्रश्न सोडवू शकेल हा एक भ्रम आहे. आरक्षनाने प्रश्न सोडविण्याऐवजी अनेक प्रश्न उभे केले असून आरक्षण लवकरात लवकर संपावे असे मतप्रवाह ओबीसी व एस.सी. समाजांतील काही विचारवंत निर्माण करत असतांना मराठा आरक्षनाच्या जोर पकडत चाललेल्या मागण्यांमुळे त्या दिशेने समाजमन तयार करण्याच्या प्रयत्नांना खिळ बसली आहे हेही एक कटू वास्तव आहे. आरक्षनाने फायदा विशेष नसला तरी आपल्या आडातले (नसलेले) पाणी दुसरा पळवून नेईल या असुरक्षित भावनेचा जन्म ओबीसींच्या मनात झालेला आहे व त्यातून मराठा विरुद्ध ओबीसी अशी अवांछनीय फूट समाजात पडली आहे.  ती सर्वस्वी चुकीची आहे. अशी फुट निर्माण होऊ नये यासाठी जाणत्या नेत्यांनी तरी प्रयत्न केले पाहिजेत. 

खरे तर आपल्याला नेमके कशावर लक्ष केंद्रीत करायला हवे हेच कोनाला समजेना झाले आहे. सर्वात प्रथम आपली शिक्षनपद्धती बदलावी लागनार आहे. जगण्याचे कसलेही कौशल्य अथवा कोणत्याही एका विषयातील तज्ञता न देणारी आपली शिक्षनपद्धतीच समूळ बदलवण्याची गरज असतांना त्याबाबतचे प्रबोधन करण्याऐवजी त्यात आरक्षण मागत जाणे हे सामाजिक आरोग्याचे चांगले लक्षण नाही. आज भारतात हाताला काम मागणा-यांचीच संख्या अवाढव्य आहे...काम देनारे हात वाढवण्यासाठ्दी मात्र कसलेही प्रयत्न होत नाहीत...हे कसले विचित्र चित्र आहे?
   
खरे तर बळावत चाललेली जातिव्यवस्था हे आपल्या समाजासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. जातिआधारीत आरक्षणाला संपुर्ण नकार देत व्यापक आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी जी इच्छाशक्ति आणि आत्मविश्वासाची आवश्यकता असते तिचा भारतीय समाजात आणि म्हणुनच राजकीय नेतृत्वात पुरेपुर अभाव आहे हे स्वातंत्र्योत्तर ६५ वर्षांच्या इतिहासाने सिद्ध केले आहे. भारतीय समाजव्यवस्थेतील एक कीड मानली जाणारी जातिव्यवस्था समूळ नष्ट करत सशक्त, स्वाभिमानी आणि समतेच्या एकाकार तत्वावर उभारलेला बलशाली भारत निर्माण करण्याचे स्वप्न हे स्वप्नच उरले. देशाचा काही प्रमाणात विकास झाला परंतू तो आपल्या बळावर नव्हे तर परकीय भांडवलावर व परकीय कंपन्यांच्या जीवावर केला जातो आहे. सर्वच रोख आरक्षणावर ठेवल्याने विकासाच्या इतरही पर्यायांवर व्यापक चर्चा घडवुन आणत वंचितांचे आर्थिक व सामाजिक उत्थान घडवण्यासाठी समांतर अर्थव्यवस्था निर्माण करता येणे शक्य होते, पण ते झालेले नाही. आता जे झाले नाही त्याबाबत उरबडवेपणा करण्यात अर्थ नसून आज आम्ही कोणत्या दिशेने जाण्यासाठी कटिबद्ध असायला हवे यावर चर्चा करायला नको काय? तसे न करता तरुणांची दिशाभूल करणे आणि आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणे, समाजात फूट पाडणे कोणत्या सुज्ञपणाचे लक्षण आहे? 

खरे तर सर्वच समाजांनी सत्ता ते रोजगार याबाबत परस्पर सहाय्यक होत आरक्षनाच्या कुबड्यांना फेकून देण्याची वेळ आली आहे. आज ओबीसींना फक्त आरक्षनामुळेच सत्तेत थोडाफार तरी वाटा मिळू लागला आहे. तो आरक्षनाशिवायच दिला गेला असता तर आज सौहार्दमय सामाजिक चित्र दिसले असते. सत्ताकेंद्रे आपल्या हातातून निसटू नयेत यासाठीचा हा आटापिटा आहे....मराठा तरुणांना खरोखर शिक्षण व नोक-यांत अधिक संध्या मिळाव्यात यासाठी नाही हेही या निमित्ताने समजावून घ्यावे लागणार आहे. 

Friday, October 11, 2013

हा चिंब भिजला...

हा चिंब भिजला
ओला
प्रणयी गवताळ माळ
घेऊन मिठीत
वाट ओलेती
नाजूक
आणि झुकलेले
स्नेहल
सावळे मेघाळ
आभाळ
त्यात ही रहस्यमयी
सायंकाळ
करून देत आठवण मला
तुझ्यासवेचे
ओलावेदार
आठवणींनी चिंब भिजलेले
अगणित क्षण....

सखे गं
मी स्तब्ध
नि:शब्द
निसर्गाच्या या अविरत प्रणयाने
विश्व आणि आपल्यातील प्रणयी
एकमयतेने......!

Wednesday, October 9, 2013

ज्ञानवाद हाच खरा समाजवाद!

समाजवाद म्हणजे मला राजकीय फसवा समाजवाद अभिप्रेत नसून सर्व समाजांना ख-या अर्थाने जोडणारा, भावनिक, आर्थिक, सामाजिक समत्व आणि ञानप्रेरणांबाबत वर्धिष्णू प्रवृत्ती जोपासणारा समाजवाद अभिप्रेत आहे. आपला भारतीय समाज इतिहास-संस्कृतीबाबत वल्गना करण्यात नेहमीच आघाडीवर असतो. इतिहासाचा, संस्कृतीचा खरा-खोटा अभिमान नाही व त्यातून डोकावणारा छुपा वर्चस्वतावाद नाही असा आज तरी जगात एकही देश अथवा समाज नाही.  पण त्यात कसलीही स्वतंत्र भर न घालताही वर्चस्वतावाद जपणारा समाज म्हणून भारतियांचे, त्यातल्या त्यात अग्रक्रमाने हिंदुत्ववाद्यांचे नांव घ्यावे लागते.

त्याची कारणे आहेत. हिंदुत्ववाद्यांना (पक्षी वैदिकवाद्यांना) वेदांत आज आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले अथवा सिद्ध होऊ पहात असलेले शोध हे वेदांतच होते असे सांगण्याचा अनिवार सोस असतो. अगदी आजकाल प्रसिद्ध झालेली बिग ब्यंग थियरी उर्फ महाविस्फोट सिद्धांत  वेदांत आहे असे सांगितले तर जातेच पण कपिलाचा अणुवाद आणि डाल्टनचा अणुवाद केवळ शब्दसाधर्म्यांमुळे एकच असे सांगण्याचा मोह होतो. भारद्वाज मुनीने विमानशास्त्र ग्रंथ लिहिला असल्याने विमानांचा शोध भारतातच लागला असे दावे हिरिरीने केले जातात. त्यासाठी रामायणातील पुष्पक विमानाचा दाखला दिला जातो. मेघदूत या कालिदासाच्या नितांतसूंदर काव्यालाही वेठीला धरले जाते व कालिदासाने स्वत: विमानाने प्रवास केल्याखेरीज त्याने वरून धरती कशी दिसते याची केलेली वर्णने करताच येणार नाहीत असा दावा करत स्वत: विदेशात बनलेले छोटे विमान वापरत त्यातून प्रवास करत तो दावा सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला जातो. एवढेच काय, आकाशातील वीज अंटेनाच्या सहाय्याने खाली खेचून विनाखर्चिक वीज वितरीत करता येईल असे दावे वेदांचा आधार घेतच केले जातात. त्याला आंधळे समर्थन देनारे गेली काही वर्ष "वैदिक विज्ञान" दिनही साजरा करत असतात. कुंभकर्ण हा पहिला रोबो (यंत्रमानव) होय...म्हणजे तेही विज्ञान भारतियांनी (पक्षी वैदिकांनी) सर्वात आधे आणि अगदी पुरातन काळ्दीच विकसित केले होते असा दावा पुण्यातील एका प्रतिष्ठित वृत्तपत्रात दोनेक वर्षांपुर्वी एका भद्र महिला संशोधकाने (?) केला होता.

अशी असंख्य उदाहरणे देता येतील.

याला मित्थ्या-वर्चस्ववाद म्हणतात. म्हणजे, ज्याचे कसलेही पुरावे देता येत नाहीत, कसलीही शास्त्रीय संकल्पना विषद करता येत नाही, ज्याला आज प्रत्यक्ष प्रयोग करून सिद्ध करता येत नाही असे दावे केवळ आपले सांस्कृतीक माहात्म्य ठसवण्यासाठी करणे हा मित्थ्या-वर्चस्वतावाद होय. याला ज्ञानवाद म्हणता येत नाही. यामागे सांस्कृतिक वर्चस्व तुलनेने अज्ञ समाजांवर गाजविण्यासाठीची चाल असते. यामागे खरेच ज्ञानाचे विकसन व्हावे, समाजाला त्याचे फायदे मिळत समाजातील प्रत्येक व्यक्तिचे हित व्हावे हा हेतुच नसल्याने त्यातून समाजवाद नव्हे तर विखंडणवाद निर्माण होतो.

बरे...यात पाश्चात्य देश खूप मागे आहेत असे नाही. याला उदाहरण म्हनून आपण आर्यवाद आणि "इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांत" आधाराला घेऊ शकतो. अठराव्या शतकात म्यक्स्मुल्लर, बोप्प इ. लोकांनी आर्यवंश वादाची मुहुर्तमेढ रोवली. यामागील छुपे कारण म्हणजे युरोपचा ज्ञात इतिहास इसपू आठव्या शतकापलिकडे जात नाही. बरे इंग्लंड-जर्मन ई. युरोपातील राष्ट्रे पाहिली तर त्यांचा इतिहास फार-फारतर सहाव्या शतकापासून सुरु होतो. जगावर राज्य करण्याच्या इर्षेने पेटलेल्या या राष्ट्रांनाही आपले पुरातनत्व हवे होते. इतिहास जेवढा पुरातन तेवढी संस्कृती महान हा भ्रम जोपासण्यात युरोपियन पंडितही मागे नव्हते. त्यांना संस्कृत व ल्यटिन या भाषांत काही साधर्म्ये सापडली. त्यावरून त्यांने अंदाज (तर्क) बांधला कि कोणे एके काळी (म्हणजे इसपू १५००) आर्यभाषा बोलणारे लोक उरल प्रदेश अथवा उत्तर ध्रुवानिकट रहात होते. पुढे या "सुसंस्कृत" (?) टोळ्या  भारत व युरोपात घुसल्या, तेथील स्थानिक समाजांना पराजित केले व आपली संस्कृती दिली....आजचे युरोपियन व भारतातील वैदिकधर्मिय त्या पुरातन आर्यांचे वंशज होत.

यातून युरोपियन विद्वानांनी दोन बाबी साध्य केल्या...अथवा करायचा प्रयत्न केला. पहिला म्हणजे युरोपचा इतिहास वैदिक इतिहासाइतकाच पुरातन आहे. आणि दुसरा म्हणजे युरोपियन हे पुरातन काळापासुनचे विजेते असल्याने व वंशदृष्ट्या श्रेष्ठ असल्याने जगावर आजही राज्य करण्याचा त्यांचाच अधिकार आहे. म्हणजेच साम्राज्यवादी मानसिकतेला बळ पुरविण्यासाठी मिथ्थाज्ञान निर्माण केले गेले, खोटे सिद्धांतन केले गेले. त्याचीच री स्वाभाविकपणे टिळकांनी उचलली आणि आर्य (पक्षी वैदिक ब्राह्मण) हे उत्तर धृवावरून भारतात आले अशी मांडनी करणारा "आर्क्टिक होम इन वेदाज" असा ग्रंथही सिद्ध करून बसले. याचा फटका वैदिक समाजाला पुढे कसा बसला हे नंतर. पण एक राष्ट्रीय नेता असा सिद्धांत स्वीकारतो, सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ते खरेच असले पाहिजे असे भारतिय वैदिकांना न वाटल्यास नवल नाही. त्यामुळेच कि काय विष्णुशास्त्री चिपळूनकर आपल्या एका पत्रात इंग्रजांना "आमचे (ब्राह्मणांचे) पुरातन रक्तबांधव" असे संबोधतांना दिसतात. म्हणजेच युरोपियन आणि भारतीय वैदिकजन हे एकच होत असा त्याचा अभिप्राय होता.

याची सामाजिक परिणति अशी झाली कि ब्राह्मण हे विदेशी आणि अन्य सारे ते मुलनिवासी अशी मांडणी करणारी तात्विक रचना आपसूक बनली. आजवरच्या धार्मिक संघर्षाला वांशिकतेचे परिमान लाभले. त्याची फळे आजही आपला समाज खातो आहे.

प्रत्यक्षात काय वस्तुस्थिती होती हे शोधण्याचा प्रयत्न ना आर्यवाद्यांनी केला ना बहुजनवाद्यांनी. मुळात आर्य नावाचा वंश धरातलावर अस्तित्वात असल्याचा एकही पुरावा आजतागायत मिळालेला नाही. कुर्गन संस्कृती हीच आर्यन संस्कृती असे दावेही केले गेले पण त्या भागात तथाकथित आर्यभाषेचा अंश असलेली एकही भाषा अस्तित्वात नाही. तीच बाब आर्क्टिक प्रदेशाची. दुसरे म्हणजे सारेच्या सारे एक भाषा बोलणारे लोक आपले मुलस्थान सोडून का चालते झाले याचे एकही उत्तर या विद्वानांना देता आलेले नाही. दुसरे म्हनजे वैदिक जन हेही आर्य होते, युरोपियनांचे रक्तबांधव होते तर भारताला लागून असलेल्या इरान वगळता ऋग्वेदसदृष रचना व वैदिक कर्मकांडे युरोपियनांनी का नाकारली याचेही उत्तर दिले गेले नाही. ज्याहे३ए बाबी वर्चस्वतावाद टिकवतात त्यांना चिकटून राहणे याला काही केल्या ज्ञानवाद म्हणता येणार नाही हे उघड आहे.

म्हणजेच ही सर्व संशोधने व कथित ज्ञान हे एन-केनप्रकारेन वर्चस्वतावाद टिकविण्यासाठीच होते. आजही "इंडो-युरोपियन भाषागट " सिद्धांत नुसता जिवित नव्हे तर युरोपियन परिघाबाहेरील छॊटी-मोठी राष्ट्रेही आपल्याही भाषा त्या गटांत बसवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचे दिसते.

पण वास्तव काय आहे? ज्या संस्कृत भाषेवर व युरोपियन भाषांतील काही शब्दसाधर्म्यांवर (म्हणजे पितर-पातेर-फादर) या सिद्धांताचा डोलारा उभा आहे ती भाषाच मुळात इसपू पहिले शतक ते  तिसरे शतक या काळात क्रमाक्रमाने विकसित झाली, तिचे निर्माते वैदिक नसून शैव व बुद्धिस्ट होते हे असंख्य पुराव्यांनिशी मीच सिद्ध केले आहे. उपलब्ध सर्व पुराव्यांवर संस्कृतचा श्रेष्ठ व्याकरणकार पाणिनीचा काळ इसवी सनाच्या २५० च्या आसपास झाला, वैदिक विद्वान सांगतात त्याप्रमाणे इसपू ८०० मद्धे नव्हे हेही मी सिद्ध केले आहे.

मग आता युरोपियन भाषेतील काही शब्द संस्कृतात कसे आले याचा उलगडा होतो. त्याला अलेक्झांडर व नंतरचे इराणी, अफगाणी, शक-हूणादि आक्रमक/राजे व क्षत्रप जबाबदार आहेत. याचा सबळ पुरावा म्हणजे अर्धविकसीत संस्कृतमधील म्हनता येईल असा पहिला शिलालेख सापडतो तो शक क्षत्रप राजा रुद्रदामनचा आहे. त्यचा काळ इसवी सनाचा १५० असा आहे. ही बाब अन्य असंख्य शिलालेख, निया येथे सापडलेल्या राजकीय आदेशांच्या प्राकृतांतील पाट्या ते इसपू ३५० ते इसवी सनाच्या दुस-या शतकांतील अगणित नाण्यांवरील बदलत्या भाषेवरुनच सिद्ध होते.

म्हणजेच जर संस्कृतच पुरातन नाही तर कथित आर्य/वैदिक व युरोपियन पुरातन कसे? 

पण वर्चस्वतावाद्यांचा दोष हा असतो कि आपापला इतिहास मागे मागे ढकलत नेणे, आणि तो इतिहास हा विजेत्यांचाच इतिहास होता हे सांगणे एवढे आवडत राहते कि ते अशा सम्शोधनांकडे निरलसपणे न पाहता त्याला परत वर्गीय संदर्भ देत नाकारत जातात. जगभर हे झाले आहे. काळे (निग्रो) हे बौद्धिकदृष्ट्या गो-यांपेक्षा मागासलेले असतात हे सिद्ध करण्याचे प्रयत्न आधुनिक जेनेटिक विज्ञानाचाच अर्धवट आधार घेत आजही होत असतात. कु-क्लक्स-क्लानसारखी अमेरिकेतील दहशतवादी संघटना ज्यु-द्वेष केवळ याच वांशिक भेदाच्या आधारावर करत जाते. यात सेमेटिक (इजिप्त/अरब इ.) भाषा व त्यांची भौतिक पुराव्यांनिशी सिद्ध झालेली पुरातनता मात्र सर्वस्वी नाकारली जाते. त्या भाषांवर इंडो-युरोपियन भाषागटांइतके सोडा अल्पांशही संशोधन होत नाही कारण सेमेटिक लोक हे आपल्या बरोबरीचे आहेत हे मान्य करण्याची युरोपियन/अमेरिकनादि गो-या लोकांची मानसिक तयारीच नाही. सेमेटिकांच्या दहशतवादाला  याही वादाचा एक आधार आहे हेही येथे आपण लक्षात घेतले पाहिजे.

आता यात ज्ञानवाद कोठे राहिला?

ज्ञान हे जाती/धर्म/वंश/राष्ट्र निरपेक्ष असले पाहिजे ही अपेक्षा अस्थानी नाही. आपण अशा ज्ञानाला व त्यासाठी केल्या जाणा-या संशोधनांना विशुद्ध ज्ञान व त्यासाठीची निरपेक्ष संशोधने म्हणू शकतो.

परंतू प्रत्यक्षात, मग ते मित्थ्या ज्ञान असो कि सापेक्ष-संशोधित ज्ञान हे समाजवादाच्या संदर्भात निरुपयोगी असणार हे उघड आहे.

यात उरणारा महत्वाचा मुद्दा म्हणजे, मित्थ्या-ज्ञानाला प्रत्युत्तर म्हणून अजून एक अहंवादी मिथ्थ्याज्ञानाला जन्म दिला जातो. आर्यवादाला उत्तर म्हनून मुलनिवासी वाद जन्माला कसा आला हे आपण वर थोडक्यात पाहिले. जसा आर्यवादाला अर्थ नाही तसाच मुलनिवासीवादालाही अर्थ नाही. याचे कारण म्हणजे मनुष्य पुरातन काळापासून भटका राहिलेला आहे. अन्न-शिकारीच्या शोधात हे भटकणे स्वाभाविक होते. काही कोटी वर्षांपुर्वी या धरातलावर मनुष्य प्राण्याचा उदय झाला. तेंव्हापासून ही भटकंती त्याला जडली. आधीचा अन्न-संकलक माणुस शिकारी मानव झाला. नंतर तो पशुपालक मानव बनला. तो सतत भटकतच होता. कोणत्याही प्रदेशात त्याचे पाऊल दीर्घकाळ टिकणे शक्य नव्हते. मनुष्य स्थिर झाला तो शेतीचा शोध लागला तेंव्हा. आणि मानवाला शेतीचा शोध लागला तो केवळ पंधरा हजार वर्षांपुर्व्ची. म्हणजे मानवाच्या कोट्यावधी वर्षांच्या इतिहासात त्याचा स्थिरतेच कालखंड आहे तो केवळ पंधरा हजार वर्षांचा! याही काळात युद्ध-व्यापारादि कारणांनी त्याची भटकंती काही प्रमाणात राहिलीच.

त्यामुळे कोणी स्वत:ला मुलनिवासी जसे समजू शकत नाही तसेच एखादा समाजगट आक्रमक होता आणि त्या एका गटानेच अन्यांना पराजित करून आपली संस्कृती लादली असाही अर्थ होऊ शकत नाही. दोन्ही विचार हे एक तर वर्चस्वतावाद टिकविण्यासाठीचे तरी असतात अथवा नवा वर्चस्वतावाद निर्माण करण्यासाठीचे तरी असतात. त्यामागे राजकीय प्रेरणा असतात हे उघड आहे.

या प्रक्रियेला आपल्याला ज्ञानवाद म्हणता येणार नाही. मिथ्थ्याज्ञानवाद समाजांना महात्मा फुलेंच्या शब्दातील "एकमय" समाज निर्माण करू देणार नाही हे तेवढेच सत्य आहे.

एकमय समाज हा इतिहास अथवा संस्कृती सापेक्ष असू शकत नाही. कोणत्याही समाजाचा अत्यंत तथ्यपुर्ण इतिहास अस्तित्वात नसतो म्हणून खोट्या सिद्धांतनांचा आधार घ्यावा लागतो हे आपण वर पाहिले. संस्कृती म्हणाल तर संस्कृती ही कोणा एका समाजघटकाची निर्मिती नसते. संस्कृतीचे निर्मितीतत्व हे नेहमीच सामुदायिक असते. खरे तर संस्कृती आधी जनसामान्यांत निर्माण होते व ती अधिकाधिक प्रगल्भ होत वरच्या समाजघटकांपर्यंत पोहोचते. आधी भाषा प्राकृतच असते व तिचा विकास होत संस्कृत भाषा जन्माला येते. उलटा प्रवास नसतो. सम्स्कृतपासून प्राकृत भाषा बनल्या हे सांगितले जाणे आणि मान्य केले जाने या दोहोंत अज्ञानवाद आहे. भाषा, गीत-संगीत, चित्रकला या आधी आदिमानवाने आपापल्या गरजांनुसार विकसित केल्या व त्यांचा विस्तार व विकसनाचा प्रवास हजारो वर्ष होत राहिला. संस्कृतींचे काही अवशेष टिकले तर काही अनेक कारणांनी नष्ट झाले. त्यामुळे भारतीय सम्स्कृती म्हणजे वैदिकांनी निर्माण केलेली संस्कृती हा वर्चस्वतावादी अभिप्राय स्वीकारला तर एकमयतेचे तत्व अस्तित्वात येत नाही. समाजवादाचे अस्तित्व येत नाही.

भारताने ज्ञानवादाची कास कधीच धरली नसल्याने विज्ञानाचा स्वतंत्र विकास झाला नाही. आजतागायत जगाला भौतिक जीवनात उपयुक्त ठरेल अशी खाद्यसंस्कृती वगळता अन्य जीवनोपयोगी योगदान दिलेले नाही. वेद पुरातन आहेत एवढेच सांगितले पण ते नेमके किती पुरातन हे त्यांना कधीही सांगता आलेले नाही. सिंधू संस्कृती ही अवैदिकांची आहे हे अगणित पुराव्यांवरून सिद्ध झालेले असतांनाही आधी सिंधु संस्कृती आक्रमक आर्यांनीच नष्ट केली असे सांगणा-यांनी कोलांटउडी मारत सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिकच होते असे सांगायला सुरुवात करत मिथ्थ्याज्ञानाचे प्रदर्शन अगणित वेळा घदवले. आणि बहुजनवादी म्हनवणारे तर ज्ञानवादापासून भरकटत आपापल्या जातीच्या कथित महामानवांच्या संशोधनांनाच अंतिम समजत राहिले. ज्ञान ही एक प्रक्रिया असते. ती सतत पुढे जाणारी व निरपेक्ष आणि नव्य पुराव्यांच्या आधारावर विकसित होत राहणारी संस्कृती असते.

आणि तिलाच आपण ज्ञानसंस्कृती म्हणतो. परंतू आपण (आणि काही प्रमानात जागतिक समुदायही) ज्ञानसम्स्कृतीच्या बाबतीत मागासच राहिला असे म्हनने भाग आहे. ज्ञानसंस्कृतीच्या अभावात समाजसापेक्ष, एकमयतेचे खरे तत्वज्ञान अस्तित्वात आले नाही. केवळ शाब्दिक संज्ञा समाजाचे हित करत नाही कारण तसे करण्यासाठी, होण्यासाठी जी तत्वधारा सातत्याने प्रसृत करत रहावी लागते ते न झाल्याने असे होणे स्वाभाविक आहे. ग्रंथप्रामाण्य जेवढे वाईट त्यापेक्षा व्यक्तिप्रामाण्य अधिक घातक असते हे आजच्य समाजाला समजावून घ्यावे लागणार आहे. कोणतेही ज्ञान अथवा संस्कृती व्यक्तिकेंद्रित असू शकत नाही...त्यामागे सर्वांचाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असतो....त्यामुळे ज्ञान व संस्कृती ही नेहमीच समाजनिर्मित असते. व्यक्ती या त्या त्या काळातील घटनांचे व सामाजिक वातावरनाचे अपत्य असतात.

त्यामुळेच व्यक्तिमाहात्म्य गाणारा समाज स्वत:चीच वंचना करीत असतो. त्यासाठीच आवश्यकता आहे ती मुळात ज्ञानवाद हाच समाजवादाचा पाया आहे हे समजण्याची. समजावून सांगण्याची. आणि त्या दिशेने अविरत प्रयत्न करण्याची.

अन्यथा भौतिक अथवा अधिभौतिक प्रगती अशक्य आहे. त्याशिवाय आम्ही स्व-निर्मित आभासांत जगत अविरत विखंडित होत जाणा-या अमीबासारखे आहोत. वर्चस्वतावादासाठी खोटी मिथके निर्माण करणे हे जेवढे घातक आहे त्याहीपेक्षा याच मिथकांना स्वीकारत न्युनगंडात्मक समाजांचे तुकडे बनणे अधिक विघातक आहे. हे आम्हा भारतीय समाजाला समजावून घ्यावे लागेल. ज्ञानवादी बनावे लागेल...

तरच आमचा समाज एकमय होईल...!

Sunday, October 6, 2013

अंगाई गाऊ नकोस...

आई...
अंगाई गाऊ नकोस
मला झोपायचे नाहीय
वाटले कितीही तरी
डोळ्यांवर झोपेचे गारुड कितीही
तरी
मला सूर्य
उगवायच्या आत
तो हैवानांचा होण्याआत
त्याला दिठीत जक्ख पकडायचेय
ही रात्र विधात्याने मला
त्यासाठीच
क्षितीजाकडे
बेदम
धावण्यासाठीच दिलीय...
अंगाई गाऊ नकोस
ही आजची गहन
क्रूर रात्र
तुझ्या कुशीत निवांत झोपण्यासाठीची नाहीय...

अनंत सूर्य असेच माझ्या अनंत
बांधवांसाठी
येऊ देत जरा हृदयात
कोणाहीसाठी
अंगाई गाऊ नकोस....
प्लीज....




Tuesday, October 1, 2013

ते माझे अक्षरलेणे!

जीवनात सुखाच्या
येतील जातील राशी
पाझरतील नयनी 
तुझ्या नि माझ्या गोष्टी
लक्ष सूर्य तेजाळत
ओघळतील तुझिया गालांवर
सुख-दु:खांचे मिलन मी 
पाहीन याच धुकट नेत्रांतून....

तू अशीच असते मजला
प्रिय सखे गे माझी
थांबत नाही गूज विश्वाचे 
फक्त तुझ्या नि माझ्यासाठी
हा श्वास नव्हे...आभास नव्हे...
तुझ्यातच माझे जगणे
नयनांतून तुझ्या जे झरते 
ते माझे अक्षरलेणे!

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...