Tuesday, October 29, 2013

आपल्या सांस्कृतिक परिवर्तनांचा इतिहास!


आमच्या राष्ट्राची संस्कृती श्रेष्ठ आहे असा दावा जगातील सर्वच राष्ट्रे करत असतात. राष्ट्रीयतेच्या भावनेला चेतवण्यासाठी श्रेष्ठतावाद नेहमीच उपयुक्त ठरलेला आहे. जगातील एकही राष्ट्र या श्रेष्ठतावादाला अपवाद नाही. आमची संस्कृती श्रेष्ठ होती म्हणजे नेमके काय असा प्रश्न विचारला तर इतिहासातील महापुरुषांचे, साहित्याचे, महाकाव्ये व मिथ्थकथांच्या पुराणतेचे दाखले सहज दिले जातात. थोडक्यात आमची संस्कृती सर्वांत अधिक पुरातन आहे म्हणून ती श्रेष्ठ आहे असे ठसवायचा प्रयत्न होत असतो. राष्ट्रांतर्गत शालेय शिक्षणापासून या श्रेष्ठतेचे, पुरातनतेचे ज्ञान (?) दिले जात असते. पुरातनता म्हणजे श्रेष्ठता असा दावा खरे तर सांस्कृतीक परिप्रेक्षात टिकत नाही, तरीही श्रेष्ठतावाद जपण्यासाठी त्याची गरज असल्याने तो निर्माण केला जातो.

अगदी आधुनिक काळात आलो तरी आपल्याला अठराव्या शतकात जन्माला घातल्या गेलेल्या आर्य सिद्धांताची सहज आठवण होते. आर्य नामक इंडो-युरोपियन भाषा बोलणारा एक मानवगट उरल पर्वताच्या प्रदेशात अथवा उत्तर धृवानिकट इसपू २५०० च्या आसपास विखरत टोळ्या-टोळ्यांनी युरोप ते भारतीय उपखंडात पसरला. या टोळ्यांनी तेथील अडानी-आदिवासी जनांना पराजित केले व त्यांना दास-दस्यू बनवले असे या सिद्धांतात माडले गेले आहे. याच टोळ्यांनी भारतात वेद व संस्कृत, इराणमद्धे अवेस्ता ते ग्रीसमधील महाकाव्ये-मिथ्थकथा ते ल्यटिन भाषेला जन्म दिला व त्याच स्थानिय लोकांना स्वीकाराव्या लागल्या असे या सिद्धांतातून सांगितले जाते. आता आर्य सिद्धांत मागे पडला असला तरी हेच तत्वज्ञान सध्या "इंडो-युरोपियन भाषागट" सिद्धांतातून मांडले जात असते. आपली संस्कृती पुरातन व वर्चस्वशाली होती असेच अशा सिद्धांतनांतून ठसवायचे असते. या सिद्धांताने युरोपचा इतिहास बराच मागे जात असल्याने तेथील विद्वानांनी यावर उड्या मारणे स्वाभाविक होते. भारतीय हिंदुत्ववादीही वैदिक संस्कृतीचा काळ जितका मागे नेता येईल तितका मागे नेत आर्य सिद्धांताला कोणत्या ना कोणत्या प्रकारे चिकटुन राहतात तसेच बुद्धिस्ट संपुर्ण भारत एकेकाळी पूर्ण बौद्धधर्मीय होता अशा तत्वज्ञानांना जन्म देवू पाहतात. अन्य धर्मांची कथाही फारशी वेगळी नाही. यात तथ्य कितपत असते हे इतिहासाचा आढावा घेतल्याखेरीज समजणे सर्वसामान्यांना जवळपास अशक्यप्राय आहे.

संस्कृती म्हणजे नेमके काय? मानवी अभिव्यक्तीची सुरुवात जेथून झाली तेथुन संस्कृतीचा जन्म झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भाषा, धर्म, तत्वज्ञान, कायदे, शिल्पकला, चित्रे, काव्ये-महाकाव्ये, मिथ्थकथा, वास्तूकला, खाद्यकला, संगीत, नृत्य-नाटके, समाजरचना इत्यादिंतून संस्कृतीचे प्रकटन होत असते. किंबहूना सर्व प्रकारच्या मानवी कृत्रीम अभिव्यक्तींतून जे काही निर्माण होते त्याला संस्कृती म्हणतात. किंबहुना मनुष्य स्वत:च्या सुखासाठी, सोयीसाठी जेही काही कृत्रीमपणे निर्माण करतो ती संस्कृती.

संस्कृती ही स्थिर असते काय? त्याचे उत्तर स्पष्टपणे "नाही" असेच द्यावे लागेल. संस्कृती ही प्रवाही असते. कालसापेक्ष चौकटींतुन तिचा प्रवाह पुढे पुढे जात राहतो. परिवर्तन हा जसा निसर्गाचा नियम तसाच तो संस्कृतीचाही नियम आहे. प्रत्येक संस्कृतीत आहे ती अथवा होती तीच संस्कृती श्रेष्ठ होती असे दावे करत तिच राबवायचा थोपवण्याचा प्रयत्न होत असतो. असे प्रयत्न धर्मनेत्यांकडून जसे होतात तसेच राजसत्तांकडूनही होत असतात. या परिप्रेक्षात आपण भारतीय संस्कृतीने ज्ञात काळापासून कशी वळणे घेतली आहेत याचा धावता आढावा घेतला तर आपणच थक्क होऊन जाऊ.

भारतीय संस्कृतीचे ज्ञात पुरावे आपल्याला सिंधू संस्कृतीच्या सापडलेल्या अवशेषांवरुन मिळतात. सर्वप्रथम ती सिंधू खो-यात सापडली म्हणून तिचे नामकरण जरी "सिंधू संस्कृती" असे केले गेले असले तरी ते खरे नाही. या संस्कृतीचे अवशेष साडेबारा लक्ष चौरस किलोमीटर एवढ्या विस्तृत भुभागात मिळाले आहेत. महाराष्ट्र ते सुदूर दक्षीणेतही तिचे अवशेष सापडतात. म्हणजेच ही ख-या अर्थाने तत्कालीन भारतीय संस्कृती होती असे म्हणता येते.

प्रगत नगररचनाशास्त्र, नौकानयन, लिपी, विदेश व्यापार, मुर्तीकला, मातीची भांडी बनवण्याची कुंभारकला ते वस्त्रोद्योग ही या संस्कृतीची वैशिष्ट्ये. सिंधू संस्कृतीतील मुद्रा सुदूर इजिप्त-इराकमधेही सापडल्या असल्याने सिंधू संस्कृतीचा व्यापार किती व्यापक होता याची जाणीव होते. आपल्याला आज मिळालेले अवशेष जरी इसपू ३५०० एवढे जुने असले तरी ही प्रगती गाठायला या संस्कृतीला काही हजार वर्ष लागली असतील. त्या काळात काय काय बदल झाले हे आपल्याला पुराव्यांअभावी माहित नसले तरी हा विकास एकाएकी नक्कीच घडून आला नाही. मनुष्य प्रगती करत जातो ते असंख्य चुकांतून शिकत, नवनवे जीवनोपयोगी शोध लावत. खुद्द सिंधू संस्कृतीच्या अवशेशांतुन इसपु ३५०० ते इसपु १७५० या काळातील परिवर्तनाचे किमान तीन स्तर सापडतात. वेशभुषा, शेती ते अलंकार शैलीतील बदलही ठळकपणे जानवतो.

इसपू १७५० च्या आसपास वातावरणातील बदलामुळे हळुहळू सिंधू संस्कृतीच्या लोकांनी जुन्या वस्त्या सोडायला सुरुवात केली. ही प्रक्रिया जवळपास दोनशे वर्ष सुरू राहिली. काही शहरे नष्ट झाली म्हणजे मानवजात नष्ट होत नसते. त्यांनी नवी शहरे/वसाहती/गांवे वसवली. पण प्रगतीला आहोटी लागली हेही खरे. उत्तर सिंधू संस्कृतीचे आता अनेक पुरावे उजेडात आले असल्याने "आक्रमक आर्यांनी ही संस्कृती नष्ट केली" हा दावा कधीच फेटाळला गेलेला आहे.

सिंधू लोकांच्या विदेशव्यापारामुळे सांस्कृतीक देवाण-घेवाणीही झाल्या असणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्रातील अनेक उत्खननांत रोमन मद्यकुंभ मिळुन आले आहेत. कला आणि संस्कृतीवर अन्य सम्स्कृतींच्या साहचर्याचा काही ना काही परिणाम होतच असतो. आपण जसे विदेशाकडून घेतले तसेच दिलेही. अनेक भारतीय प्राकृत शब्द युरोपियन ते अरबी भाषांत सापडतात त्याला हा संपर्क कारणीभूत आहे.

सिंधू लिपीचे पुढे काय झाले याचे दुवे अद्याप सापडलेले नाहीत. सिंधू लिपी अद्याप वाचताही आलेली नाही. खरोष्टी अथवा ब्राह्मी लिपीची ती पुरातन अवस्था असावी या अंगानेही लिपिविद शोध घेत आहेत पण अद्याप त्यात यश आलेले नाही. परंतू एक लिपी जाऊन नवीन लिपी शोधली जाणे, ती वापरात आनली जाणे भारतात नवीन नाही. भारतात मध्ययुगात शारदा, ग्रंथ ई. अनेक लिप्या वापरात होत्या. नागरी लिपीने पुढे बाजी मारली असली तरी दक्षीणेत लिप्यांचा स्वतंत्र विकास होत गेल्याचेही चित्र आपल्याला दिसते. थोडक्यात सिंधू लिपीतील लेख आपल्याला उत्तरकालात मिळत नसले तरी लोकांची कोणतीही लिपी नव्हती हे विधान धाडसाचे ठरेल.

भारताचा सिंधू कालापासून चालत आलेला धर्म म्हणजे शैवप्रधान प्रतिमा/लिंगपुजकांचा धर्म. . शिवलिंगाच्या अस्तित्वाचे अगणित पुरावे मिळालेले आहेत. आजही हाच भारतियांचा प्रधान धर्म राहिलेला आहे. परंतू इसपू हजार-अकराशेमद्धे निर्माण झालेला एक पहिला नवीन धर्म म्हणजे वैदिक धर्म. या धर्माचे मुख्य अंग म्हणजे यज्ञाद्वारे अग्नीत मांस-अन्नादि आहुत्या देत इंद्र-वरुणादि देवतांना संतुष्ट करणे. या धर्माचे निर्माते पशुपालक होते...नागर सम्स्कृतीचे नव्हेत. या धर्माचे ग्रंथ म्हणजे ऋग्वेदादिंची निर्मिती इसपू अकराशे ते ते सातवे शतक एवढा काळ सुरु राहिली. सरस्व्वती नदीचे खोरे एवढाच काय तो त्यांचा मर्यादित भूगोल.ही सरस्वती नेमके कोठली यावर विद्वानांत मतभेद आहेत. ही अफगाणिस्तानातील "हरहवती" (स चा उच्चार ह होतो) नदी असावी असे अनेक विद्वानांचे मत आहे.

या धर्मावर भारताचा शेजारी इराणमद्धे निर्माण झालेल्या झरथूष्ट्राच्या अहूर माझ्दा धर्माचा (पारशी धर्म) प्रभाव स्पष्टपणे दिसतो. वैदिकांच्या इंद्र, वरुण, मघवान वगैरे बहुतेक देवता झरथुष्ट्राच्याही पुर्वीपासून अस्तित्वात असलेल्या असूर संस्कृतीतील तिकडच्या माझ्दा धर्मात होत्याच. तिकडच्या दुय्यम देवतांना वैदिक धर्मात मात्र प्रमुखत्व मिळाले. ही झाली धार्मिक संकल्पनांची देवान-घेवाण. पण येथे ही देवान-घेवाण शत्रुत्वाच्या भावनेतून झालेली आहे. त्याचमुळे कि काय जी दैवते पारशी धर्मात दुष्ट आहेत तीच दैवते वैदिक धर्मात प्रेय म्हनून अवतरतात. झरथूष्ट्राबद्दलचा द्वेषही ऋग्वेदातील अनेक ऋचांत डोकावतो तसेच शैव लिंगपुजेबाबतही घडते. पुढील काळात (इ.स. दोनशेनंतर) वैदिक धर्मियांनी मुर्तीपुजेचा स्वीकार केल्याचेही चित्र आपल्याला दिसते. यज्ञसंस्थेचे माहात्य्म वैदिक धर्मियांनी कितीही गायले असले तरी यज्ञ मात्र अत्यल्प झालेले दिसतात. हेही एक वैदिक धर्मातील परिवर्तन आहे. याच प्रदिर्घ काळात भारतात पांचरात्र, नारायणीय असे अवाढव्य तांत्रिक पंथही निर्माण झालेले दिसतात. लोकायत, सांख्य, वैशेषिक असे स्वतंत्र इहवादी/जडवादी तत्वज्ञाने मांडनारे वैचारिक प्रवाह तसेच सुखवादाचा सर्वस्वी त्याग करणारे समनही याच प्रदिर्घ काळातले.

समन परंपरेतुनच इसपूच्या सहाव्या शतकात पुन्हा दोन धार्मिक प्रवाह निर्माण झाल्याचे आपल्याला दिसते. पहिला प्रवाह होता तो महावीराने सुस्थापित केलेला तर दुसरा प्रवाह होता जो गौतम बुद्धाने प्रवर्तीत केलेला. अहिंसा, सत्य, अस्तेय, सम्यक विचार, पंचशील ई. नवीन धर्म (नीति) तत्वे या दोन्ही धर्मांनी थोड्याफार फरकाने दिली. या कालातील राजव्यवस्था अत्यंत उदार आणि तुलनेने सहिष्णु होते असे आपल्याला दिसते. बिंबिसाराने बुद्धाला केवळ प्रस्थापित विचारांना आव्हान देतो म्हणून न नाकारता स्वीकारले व स्वत: त्या धर्माची दीक्षा घेतली. त्याचाच पुत्र अजातशत्रू जरी आधी बौद्ध धर्माविरुद्ध असला तरी त्यानेही आपले मतपरिवर्तन केल्याचे दिसते.

यावेळचे समाजजीवन काय होते? वर्णव्यवस्था-जातीव्यवस्थेचे स्थान काय होते? बुद्ध जन्माधारित नव्हे तर कर्माधारित वर्णव्यवस्था मानीत होते असे काही सुत्तांवरून दिसते. वैदिक धर्मियांच्या
ऋग्वेदातही वर्णव्यवस्था बळकट असल्याचे सूचन होत नाही. जे आहे ते फक्त तीन वर्णांचे आणि तेही सैल दिसतात. (पुरुषसूक्त अपवाद आहे, पण ते नंतर घुसवलेले आहे हे आता सिद्ध झाले आहे.) व्यवसायाधिष्ठित जाती या सिंधू काळापासूनच होत्या पण त्याही परिवर्तनीय होत्या. नवनवे उद्योग निर्माण झाले कि लोक आपले परंपरागत व्यवसाय सोडून त्यत पडू शकत. सर्वच
व्यवसायांना प्रतिष्ठा होती. त्यांच्या देशव्यापी श्रेण्या असत व राज्यव्यवस्थेवरही त्यांचा अंकुश असे. अगदी सहाव्या शतकातही बुरुड, चर्मकार, सोनार, कुंभार यांच्या श्रेण्या असल्याचे उल्लेख ताम्रपट/शिलालेखांत मिळतात. म्हणजे जन्माधारित बंदिस्त आणि आता अन्यायकारी म्हणवली जानारी जातीव्यवस्था तेंव्हा अस्तित्वातच नव्हती.

पुरातन काळी बव्हंशी राज्यव्यवस्था या गणसत्ताक पद्धतीच्याच होत्या. अजातशत्रूने साम्राज्यवादी आकांक्षा बाळगत तत्कालीन लिच्छवीदि ३६ गणराज्यांशी युद्ध पुकारले होते. पुढे मौर्य घराण्यानेही साम्राज्यवादच जोपासला. असे असले तरी नाणकशास्त्रीय इतिहासावरून इसपू ३५० ते जवळपास इसवीसनाचे दुसरे शतक या काळापर्यंत अनेक गणराज्ये (जानपदे/महाजानपदे) अस्तित्वात होती. योधेय गणराज्य हे त्यातल्या त्यात अधिक उल्लेखनीय आहे.

एकार्थाने पहायला गेलो तर गणराज्ये हा भारतीय राज्यव्यवस्थेचा पुरातन घटक होता असेच उपलब्ध पुराव्यांवरुन दिसते. ही गणराज्ये म्हणजे आजच्या लोकशाहीचे आदिम रूप होय. खुद्द गौतम बुद्धही शाक्य गणराज्यातील होते. गणराज्ये आकाराने फार छोटी असत व त्यात बव्हंशी निर्णय सर्वानुमताने घेतले जात. परंतू बिंबीसारानंतर मात्र हळूहळू राजाप्रधान एकतंत्री राज्यव्यवस्थेचा जन्म होत पुढे ती साम्राज्यवादात बदललेली दिसते.

पुढे येतो तो अलेक्झांडरच्या आक्रमणाचा काळ. जरी त्याचे आक्रमण सीमाभागापर्यंतच मर्यादित असले तरी त्याचा सांस्कृतीक परिणाम मात्र खूप मोठा होता. पुढे अनेक ग्रीक, शक, हुण, कुशाण राजवटींने भारताचा उत्तर भाग व्यापला. त्यात कुशाण राजवट सर्वात महत्वाची आहे.

कुशाण हे झरथुष्ट्राच्या धर्माचे अनुयायी. त्यांनी एतद्देशिय शिव स्वीकारला तसाच बुद्धही. भारतात सर्वप्रथम शिव आणि बुद्द्ध अवतरतो तो कुशाण नाण्यांवर. भाषाही ग्रीक जशी वापरली तशीच येथील प्रतिष्ठित प्राकृतही. (कनिष्काचा मात्र भाषेबाबत अपवाद...त्याने मात्र गांधार भाषाच वापरली.) संस्कृत भाषेचा उदय इसपू दुस-या शतकात सुरु झाला. प्राथमिक संस्कृत ही अनेक नाणी, शिलालेख ते निया येथील पाट्यांत अवतरत जात, विकासाचे टप्पे दर्शवत जात सन १५० च्या शक राजा रुद्रदामनच्या शिलालेखात विकसीत रुपात दिसते. पुढे सन २५० मद्धे पाणिनीने व्याकरण लिहित संस्कृत भाषेला ख-या अर्थाने प्रगल्भ वैभव दिले.

कुशाणांमुळे कलेतही क्रांती झाली. गांधार शैलीने आपले कलाजीवन व्यापून टाकले. सामाजिक जीवन कसे होते हे आपल्याला हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीतून समजते. सामाजिक कठोर बंधने न पाळनारा, मनसोक्त जीवन जगणारा, अत्यंत सहिष्णू आणि स्नेहमय समाजजीवनाचे चित्रण हालाच्या संकलित गाथांतून दिसून येते. धार्मिक बंधने कठोर नसल्याचे पुरावे त्यात ठायीठायी मिळतात. संस्कृत अजून पुरेशी विकसीत नसल्याने माहाराष्ट्री, शौरसेनी, गांधारी, मागधी, अर्धमागधी ई. प्राकृत भाषांनीच समाजजीवन व राजकीय जीवन व्यापलेले आपल्याला दिसते.

सातवाहनांनी डोंगरी किल्ले बांधायला सर्वप्रथम सुरुवात केली. अगदी रायरीही (रायगड) सातवाहन काळातील गिरीदूर्ग. अनेक बौद्ध लेणी (नाशिकचेही) त्यांच्याच काळात व आर्थिक मदतीने उभारली गेली. त्यांचे नौदल बलाढ्य होते. इतके कि तीन समुद्रांचे पाणी प्यायलेले अश्व ज्याचे ते सातवाहन असे सार्थ अभिमानाने म्हटले गेले. लीलावई या काव्यग्रंथात हालाने श्रीलंकेवर स्वारी करून, तेथील राजाला हरवून त्याच्या कन्येशी कसा विवाह केला याचे विस्तृत वर्णन आहे. नगररचनाशास्त्रातही त्यांनी भर घातली. सातवाहनांनी महाराष्ट्रावर साडेचारशे वर्ष राज्य केले. आज महाराष्ट्राची भाषा आणि संस्कृतीत त्यांचे योगदान हिमालयाएवढे मोठे आहे.

यानंतर चवथ्या शतकात भारतात गुप्तकाळ अवतरला. हा काळ अत्यंत लक्षवेधी आणि अर्थपूर्ण आहे. या काळापावेतो संस्कृत भाषा पूर्ण विकसीत झाली होती व ग्रंथलेखनात तिचा वापर मोठ्या प्रमाणात होवू लागला होता. गुप्तांनी संस्कृतला राजाश्रय दिला. हजारो प्राकृत ग्रंथ सम्स्कृतमद्धे अनुवादित, रुपांतरीत होऊ लागले. विष्णु-लक्ष्मी या तोवर अज्ञात असलेल्या देवता गुप्तांच्या नाण्यांवर अवतरू लागल्या. एकार्थाने ही सांस्कृतीक उलथापालथ होती. रामायण-महाभारत याच काळात संस्कारीत केले गेले. अनेक स्मृत्यांचा जन्मही याच काळात झाला. वैदिक माहात्म्याचा उदो-उदो याच काळाने सुरू केला. शैव-वैष्णव वादाची मुहुर्तमेढ या काळाने तर रचलीच पण बौद्धधर्मविरोधाने याच काळात गती पकडली. एकार्थाने सहिष्णु भारत धार्मिक संघर्षात अडकला.

गुप्तकाळ हा भारताचा स्वर्णकाळ होय असे तत्कालीन स्थिरता आणि सुबत्तेमुळे म्हणता येत असले तरी त्यांनी जी धार्मिक उलथापालथ करायचा प्रयत्न केला त्यामुळे त्याला सांस्कृतीक अराजकाचा काळ म्हणता येईल. कारण पुढे गुप्त मावळले असले तरी ती विचारधारा अनेक राजसत्तांनी देशभर राबवली अथवा राबवण्याचा प्रयत्न केला असे आपल्याला तत्कालीन सांस्कृतीक संघर्ष व विचारधारांतून दिसून येते. याच काळाने वर्णभेदाच्या पायाला व्यापक केले आणि तो दहाव्या शतकानंतर समाजमनात रुजत गेला हेही येथे विसरून चालणार नाही.

असे असले तरी दहाव्या शतकापर्यंत तरी जातीव्यवस्था पुरेशी सैल होती असे दिसून येते. नव्या शोधांबरोबर नवे व्यवसाय जसे जन्म घेत तशा नव्या जाती बनत, जातबदल करता येत होते, जे व्यवसाय नष्ट झाले त्या जाती अन्य जातींत विखरून जावू शकत. म्हणजेच समाजव्यवस्था वेद अथवा स्मृतीप्रणित विधानांना गांभिर्याने घेत नव्हती. विविध परिवर्तने पचवत भारतीय समाज अग्रगामीच राहिला होता. अल मसुदीने दहाव्या शतकातील चेऊल, ठाणे बंदरांचे जे वर्णन केले आहे त्यावरून त्यावेळच्या भरभराटीचा अंदाज येतो. या काळात भारतीय उद्योजक/व्यावसायिक विदेशातही आपल्या वसाहती स्थापन करीत. एकट्या इजिप्तमद्धे दहा हजारापेक्षा अधिक भारतीय वसाहत करून राहिले होते.

परंतू पुढे स्थिती बदलली. १०२३ पासून भारतात दुष्काळांची रांग लागली. त्यात मुस्लिम आक्रमणांनी व नंतर त्यांच्या प्रस्थापित सत्तांनी सामाजिक, राजकीय व आर्थिक जीवन ढवळून काढले. यातून संस्कृतीनेही अधोगती गाठणे स्वाभाविक होते. वैदिक आणि शैव हे स्वतंत्र धर्म असतांनाही याच काळात वैदिक संस्कृतीने राजाश्रयांमुळे उचल खाल्ली. दुसरीकडे इस्लामी वर्चस्वाने उचल खाल्ली. लक्षावधी धर्मांतरे याच काळात झाली. बाराव्या शतकापर्यंत तुलनेने इहवादी असणारा भारतीय समाज तीव्र गतीने परलोकवादी बनू लागला. गाथा सप्तशतीतील, मृच्छकटिकातील मूक्त समाज बंदिस्त होत गेला. विजयांची सवय असलेल्या समाजाला भिषण, अमानवी पराजयांचा व शोषणाचा सामना करावा लागला. हा काळ हा सर्वस्वी सांस्कृतिक गोंधळाचा होता आणि त्याचे निराकरण होण्याऐवजी भारतीय माणूस अडकतच गेला.

याची परिणती धार्मिक जीवनात वैदिकसत्ता बळकट होण्यात झाली. आपलीच दैवते अपहृत होतांना भारतीय समाजाला पहावी लागली. दुष्काळ, थांबलेला विदेशव्यापार, जाचक बंधने यामुळे अर्थसत्ता हातातून गेल्याने निर्माणकर्त्या समाजांना बलुतेदारीच्या भिषण सापळ्यात अडकावे लागले. गांवगाडा हा आपण मानतो तसा पुरातन नाही. तथाकथित गावगाडा हा आहे त्या अपरिहार्य स्थितीतून निर्माण झाला पण त्यातून बाहेर पडायची संधी मिळायला साताठशे वर्ष गेली. त्यामुळे आर्थिक प्रेरणा संपल्या व केवळ जगणे महत्वाचे झाले. नवे शोध थांबले. व्यवसाय जातीअंतर्गत बंदिस्त होऊ लागले आणि त्याची भिषण परिणती म्हनजे जातीव्यवस्था जन्माधारित तर बनलीच पण क्रुरही बनली.

महाराष्ट्रापुरता विचार येथे करायचा तर, दहाव्या शतकापासून ते सोळाव्या शतकापर्यंत किमान साडेतिनशे भिषण दुष्काळ महाराष्ट्राने अनुभवले. देवगिरीचे साम्राज्य कोसळतांना पाहिले. यातून विद्रोही प्रेरणा मिळण्याऐवजी महाराष्ट्र हा आध्यात्मिक परलोकवादी चिंतनात अडकत गेला. ज्या महाराष्ट्रातून ज्ञानविज्ञानाच्या चर्चा होत असत त्या महाराष्ट्रात टाळ-मृदुंगाचे व हरीनामाचे प्रतिध्वनी उमटू लागले. तत्वचर्चा थांबत धर्मचर्चांना उत आला.

सोळाव्या शतकात शिवाजी महाराजांच्या रुपात एक महामानव जन्माला आला व पराजितांची संस्कृती पुन्हा विजयांत बदलली. भले ती अल्प भुभागापुरती मर्यादित असेल. पण तिचे पडसाद देशभर उमटले नसतील तरच नवल. ही परिवर्तनाची अजून एक नांदी होती. पण दुर्दैवाने पुढील पिढ्यांना त्याचे भान राहिले नाही. दिल्लीश्वरांचे अंकित राहण्यात व त्यांच्याकडून सनदा मिळवण्यात ती मग्न राहिली. मोगली सत्ता मानसिक दृष्ट्या अपराजित राहिली.

पानिपत अपरिहार्यच होते तसेच इंग्रजांचे साम्राज्य निर्माण होणेही. यशवंतराव होळकर एकमेव अपवाद ज्या महावीराने इंग्रजांचा धोका ओळखला...एकहाती १८ विजयी युद्धे करत इंग्रजांना जेरीला आणले. पण अन्य भारतिय राजे-संस्थानिकांनी आपला हात आखडता घेतला. पुन्हा नवे पारतंत्र्य अपरिहार्यच होते.

इंग्रजी राज्याने भारताची संस्कृती बाह्यांगांनी का होईना आमुलाग्र बदलवली हे मान्य केलेच पाहिजे. त्यांच्यामुळे जशी स्थानिक अर्थव्यवस्था पुरती कोसळली तसेच आधुनिक ज्ञानविज्ञानाची दारेही उघडली. भारतीय प्रथमच नवीन दृष्टीकोणातून समाजजीवनाचा विचार करू लागले. धर्मसंस्थेने नागवल्या गेलेल्यांच्या विद्रोहाचे महान प्रतीक म्हणजे महात्मा फुले. त्यांनी जहाल भाषेत जी धर्मव्यवस्थेवर व समाजव्यवस्थेवर टीका केली तिला भारतीय समाजेतिहासात तोड नाही. लोकहितवादी, आगरकर, राजा राम मोहन राय....प्रभुतींनीही आपापल्या परीने समाजसुधारणेचे चंग बांधले.

हा भारतीय सांस्कृतीक उलथापालथीचा नवा काळ होता. तसाच राजकीय स्वातंत्र्य आणि राष्ट्रभावनेच्या उभारणीचाही काळ होता. तशी राष्ट्रभावना भारतियांना अपरिचित होती. राज्य-साम्राज्य-गणराज्य यांपार ती कधीही विकसीत झालेली नव्हती. येथीत भाषा भिन्न,. स्थानिक संस्कृत्या भिन्न. या देशाला आधुनिक काळातील "राष्ट्र" या संकल्पनेत सामाऊन घेणे निव्वळ अशक्य बाब होती.

पण हीही क्रांती केली ती मोहनदास करमचंद गांधी या दुर्बळ पण पराकोटीचे मनोबळ असणा-या माणसाने. भारतीय संस्कृतीतीलच अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह या उदात्त मुल्यांना नवा राजकीय आणि सामाजिक आशय देत या महात्म्याने सर्व भाषा, वंश, प्रांत, जाती-जमातींतील माणसे एकमय करून दाखवली आणि आजचा हा आपला देश आपला देश झाला. भारतीय मुल्यांशी ज्यांची एकनिष्ठता असू शकत नाही त्यांना तुकडा करून प्रांत देऊन टाकला. भारताने केलेली आजच्या आधुनिक जगातील ही सर्वश्रेष्ठ् क्रांती होय. तिचे पडसाद जगभर उमटले आहेत. आजही जगात हिंसा कि अहिंसा असा प्रश्न उद्भवतो तेंव्हा निर्विवादपणे गांधींच्या अहिंसामय तत्वज्ञानाचा जयघोष होतो.

हिंसात्मक जगाकडून अहिंसात्मक जगाकडे वाटचाल करण्यासाठी भारताने अखिल विश्वाला जर काही योगदान दिले असेल तर ते हेच होय. यातून जी सांस्कृतीक क्रांती/परिवर्तन घडले आहे ते मोलाचे आहे. काळ पुढे जात असतो....जात राहील...परिवर्तन हाच संस्कृतीचा नियम असतो...

याच काळात झालेल्या बाबासाहेब आंबेडकर या अलौकिक व्यक्तीमत्वाने भारतातील शोषित, वंचित, व्यवस्थेने नागवलेल्या पुर्वास्पृश्य समाजांत याच वेळी चेतना जागवली. आजवर हजार वर्ष तरी जो समाज अन्यायाचे गाडगे उरावर वागवित आला होता त्याच्यात प्राण भरले. भारतात झालेली ही अभूतपुर्व सामाजिक क्रांती होय. बाबासाहेब तेथेच थांबत नाहीत. ते अन्याय्य वैदिक वर्णव्यवस्थेला लाथ मारीत धर्मक्रांतीही घडवते झाले. म्हणजे त्यांनी आपल्या अनुयायांसह मानवतेचा, समतेचा, करुणेचा व मानवी जीवनाला आधारभूत ठरणा-या तत्वांचा बौद्ध धर्म स्वीकारला. भारताच्या इतिहासातील ही पहिली आधुनिक सामाजिक/धार्मिक क्रांती होय. यामुळे त्यांना आत्मविश्वास मिळाला. आत्मभान आले आणि या समाजातून भारताचे अनेक विद्वान, संशोधक, उद्योजक, राजकारणी, प्रशासकीय अधिकारी तसेच मुक्त अभिव्यक्ती करणारे साहित्यिक-कवि-विचारवंत पुढे आले. त्यांनी समाजाला त्यांच्याकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन दिला. यामागे बाबासाहेबांची कठोर काटेरी मार्गावरील वाटचाल होती. बाबासाहेबांचे चिंतन, अभ्यास आणि स्वतंत्र प्रज्ञा होती. बाबासाहेबांची प्रज्ञा कोणाचीही कधीही बटीक झाली नाही. त्यामुळे सामाजिक पारतंत्र्यात जगणारे बांधव मुक्ततेचा श्वास घेऊ शकले.

परिवर्तनाचा आढावा घेत असतांना आपण आणीबाणीचा कालखंड विसरु शकत नाही. या देशात फक्त आणि फक्त लोकशाहीच टिकू शकते...या देशात हिंस्त्र हुकुमशाही प्रवृत्तींना थारा नाही हे देशाने जयप्रकाश नारायणांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या यशस्वी आंदोलनाने सिद्ध केले. लोकशाहीचे घटनात्मक तत्व अंतत: विजयी ठरले. भारतात जशा सामाजिक क्रांत्या झाल्या, धार्मिक क्रांत्या झाला तशीच अजून नवी सामाजिक आणि आर्थिक क्राती वाट पहात होती. मंडल आयोगाच्या निमित्ताने देशातील ५२% निर्माणकर्त्या ओबीसी समाजासाठी एक द्वार उघडले. त्यांना कधी नव्हे ते राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली. अर्थात हे सोपे नव्हते. ओबीसींचा लढा आजही संपला आहे असे नाही. त्यांना आपल्या निर्माणकर्त्या एकमयतेचे भान अजून आले आहे असे तर मुळीच नाही. परंतू हा समाज परिवर्तनाचा उंबरठ्यावर उभा आहे आणि या समाजात परिवर्तन घडेल अशी आशा बाळगायला पुरेसा वाव आहे.

आपण ज्याचा आढावा घेतलाच पाहिजे ती म्हणजे अर्थसंस्कृती. भारताने जागतिकीकरणाचा स्वीकार केला त्यामुळे जे परिवर्तन घडते आहे ते अभुतपुर्व आणि भयभीत करणारे आहे. आपण एक जागतिक खेडे बनलो. जागतिक संस्कृतीला भारतात मूक्त द्वार मिळाले. भारतियांनी जगात गगनभरा-या घ्यायलाही सुरुवात केली. आपली पुर्वापार ग्रामीण व्यवस्थाही ढवळुन निघाली. समाजजीवन आणि नातेसंबंधांची नव्याने रचना व्हायला लागली. एका अर्थाने मानवी संबंध नव्याने आकार घेउ लागले. या गेल्या वीस वर्षांतील बदलांचे आपल्याला नीट विश्लेशन करायचे आहे.

कारण एकीकडे आधुनिकतेत घुसलेला भारतीय समाज, अर्थव्यवस्थेची फळे चाखनारा समाज दिवसेंदिवस जातीयवादी, धर्मवादी. असहिष्णु आणि क्रुर बनतांना आपण पहात आहोत. बाबरी मशिद ते मुस्लिम दहशतवादाने घातलेले थैमान आपण आठवतो. गुजरातमधील मुस्लिमांचा नरसंहार हे एक उदाहरण. खैरलांजीच्या कटू आठवणी शमतात न शमतात तोच दर दिवसाआड दलितांच्या हत्या...तरुणींवरचे बलात्कार...वस्त्या जाळणे हे प्रकार वाढतच चाललेले दिसतात. राजकारण...कोणत्याही पक्षाचे असो ते जातीयवादी, धर्मवादी बनतांना दिसतेय. विकृतपंथीय बुवा-बापुंचे स्तोम वाढतेय...सनातन प्रभातसारख्या संस्था धर्मविकृतीचे टोक गाठतेय...हा देश विज्ञानवादी होत नाही तर या जागतिकीकरणाला तरी मुळात अर्थ काय आहे हा प्रश्न आम्हाला जर पडत नसेल तर आधीच्या सर्व सामाजिक-धार्मिक क्रांत्यांना आम्हीच हरताळ फासला आहे असाच त्याचा अर्थ होत नाही काय?

आज आम्ही जिथे उभे आहोत तेथुन आमची संस्कृती महान म्हणायची असेल तर ती नेमकी कोणाची? कोणत्या कालातील? कोणत्या प्रांतातील? हे प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. संस्कृती सर्वत्रच सतत बदलत आलेली आहे. कधी तिने उच्च स्थान गाठले तर कधी ती अध:पतीत झालेली, विकृत व अमानुष झाल्याचे चित्र आपल्याला दिसते. त्यामुळे विगताचा अभिमान आपल्या कामी कितपत येवू शकतो? विगत आपल्याला आपला वर्तमान समजावून घ्यायला मदत करत भविष्यातील समतेची, एकमयतेची वाटचाल नव्याने सुरु करायला मदत करु शकतो. आपल्या चुका आणि तत्कालीन अपरिहार्यता आपल्याला दाखवू शकतो.

पण आजही गतकाळातील विशिष्ट संस्कृती म्हनजे भारतीय संस्कृती असे महिमान गात आपला वर्चस्ववादी अजेंडा राबवत असेल तर आपल्याला त्या प्रवृत्तींना नकार द्यावाच लागणार आहे.

आपल्याला अजून एका परिवर्तनवादी क्रांतीची गरज आहे.

प्रश्न फक्त आपण सज्ज असण्याचा आहे! आपण पुढेही बदलतरा
ाहु...नवनव्या ंत्रज्ञान/अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था आणि राजकीय स्थित्यांतून जात राहु...

पण मानवतेचे चिरंतन गीत हेच आपले नित्य विश्वगीत असले पाहिजे! आणि "आमचीच संस्कृती श्रेष्ठ" असे काही नसते....संस्कृतीचे श्रेष्ठत्व बोलण्यात नसते तर आचरणात असते...!

4 comments:

  1. Sanjayaji ,

    Very good article. Related to this , I have question for you which is troubling me for last few years.
    It appears that Vedic or Brahmanical system was responsible for lots of wrong practices and was injust to some classes. But is history. Indian society was changing again after 1857. Dr. Ambedkar , Mahatma Phule were well educated and shown path to society. Education was not denied to any caste or class or to women. All cates were free to follow occupation of their choice.
    This was and is situation for almost last 150 years. It means almost 5 generations have freedom of education and occupation. ( I am saying freedom and not opportunity ).
    Considering above , is it fair to accuse today's Brahmins that they are responsible for all ills ? Is it right to spread hatred against Brahmins
    ?

    ReplyDelete
    Replies
    1. No. Blame Brahmin" is a game and is worst. If there is wrong in society, everyone is responsible. Our social mentality is not shaped in liberal way...all are feudal to some or larger extent. Blaming only Brahmins for this is entirely wrong.

      Delete
  2. really good article sirji. really best amoung your all articles ! or we can say that the summarization of all !

    ReplyDelete
  3. "जगाकडून त्यांची कार्यसंस्कृती घेण्याऐवजी चंगळवादी भाग विकृत पद्धतीने घेतला आहे." एकदम पटले !!
    या विषयावर अजून एक शंका होती कि द्रविड संस्कृति या सगळ्या घटनांमध्ये काय रोल होता ? कि आर्य वाद प्रमाणे द्रविड हा सुद्धा नंतर चा घुसलेला मुद्दा ?
    अर्थात द्रविड सुद्धा शैव आहेत ते नाकारत असतील / असतील तरी , कारण रावण हा सुद्धा एक शिवभक्त होता येव्डेच काय तर श्री रामाने सुद्धा शिवाची आराधना केली म्हणून रामेश्वर झाले ! हा एक मुद्दा
    दुसरे म्हणजे , इस्लामी लोकांचे हिंदू , बौध्द , सिख यांच्या कडे बघण्याचे चष्मे अजूनही बदल ले नाहीयेत , अजूनही तोच दहशतवाद आहे जो खिलजी , घौरी ने माजवला होता मार्ग आणि व्यक्ती बदलल्या असतील पण उद्धिष्ट राजकीय सत्ता हस्तगत करणे आणि पर्यायाने धार्मिक !! लव्ह जिहाद सारखे अनेक षड्यंत्र उघडकीस आले आहेत … हि मंडळी गैर इस्लामिकांना एकाच तराजूत तोलतात. अश्या वेळी हिंदू , बौध्द , सिख ज्यांचा इतिहास आणि संस्कृती खर्या अर्थाने एकमेकात मिसळून एक भारतीय संकृती अथवा ज्याला आपण हिंदू संस्कृती म्हणतो ती , संस्कृती मानणाऱ्या आपण सर्वांनी काय आणि कसा पवित्रा घ्यावा ?
    बदलत्या कला नुसार अनेक वाईट प्रथा जश्या बंद झाल्या तश्याच चांगल्या गोष्टी सुद्धा , मग ज्या काही गोष्टी आपण जतन करू इच्छितो त्या बाबत नेमका काय पवित्रा घ्यावा ?

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...