Wednesday, October 9, 2013

ज्ञानवाद हाच खरा समाजवाद!

समाजवाद म्हणजे मला राजकीय फसवा समाजवाद अभिप्रेत नसून सर्व समाजांना ख-या अर्थाने जोडणारा, भावनिक, आर्थिक, सामाजिक समत्व आणि ञानप्रेरणांबाबत वर्धिष्णू प्रवृत्ती जोपासणारा समाजवाद अभिप्रेत आहे. आपला भारतीय समाज इतिहास-संस्कृतीबाबत वल्गना करण्यात नेहमीच आघाडीवर असतो. इतिहासाचा, संस्कृतीचा खरा-खोटा अभिमान नाही व त्यातून डोकावणारा छुपा वर्चस्वतावाद नाही असा आज तरी जगात एकही देश अथवा समाज नाही.  पण त्यात कसलीही स्वतंत्र भर न घालताही वर्चस्वतावाद जपणारा समाज म्हणून भारतियांचे, त्यातल्या त्यात अग्रक्रमाने हिंदुत्ववाद्यांचे नांव घ्यावे लागते.

त्याची कारणे आहेत. हिंदुत्ववाद्यांना (पक्षी वैदिकवाद्यांना) वेदांत आज आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले अथवा सिद्ध होऊ पहात असलेले शोध हे वेदांतच होते असे सांगण्याचा अनिवार सोस असतो. अगदी आजकाल प्रसिद्ध झालेली बिग ब्यंग थियरी उर्फ महाविस्फोट सिद्धांत  वेदांत आहे असे सांगितले तर जातेच पण कपिलाचा अणुवाद आणि डाल्टनचा अणुवाद केवळ शब्दसाधर्म्यांमुळे एकच असे सांगण्याचा मोह होतो. भारद्वाज मुनीने विमानशास्त्र ग्रंथ लिहिला असल्याने विमानांचा शोध भारतातच लागला असे दावे हिरिरीने केले जातात. त्यासाठी रामायणातील पुष्पक विमानाचा दाखला दिला जातो. मेघदूत या कालिदासाच्या नितांतसूंदर काव्यालाही वेठीला धरले जाते व कालिदासाने स्वत: विमानाने प्रवास केल्याखेरीज त्याने वरून धरती कशी दिसते याची केलेली वर्णने करताच येणार नाहीत असा दावा करत स्वत: विदेशात बनलेले छोटे विमान वापरत त्यातून प्रवास करत तो दावा सिद्ध करण्याचा प्रयत्नही केला जातो. एवढेच काय, आकाशातील वीज अंटेनाच्या सहाय्याने खाली खेचून विनाखर्चिक वीज वितरीत करता येईल असे दावे वेदांचा आधार घेतच केले जातात. त्याला आंधळे समर्थन देनारे गेली काही वर्ष "वैदिक विज्ञान" दिनही साजरा करत असतात. कुंभकर्ण हा पहिला रोबो (यंत्रमानव) होय...म्हणजे तेही विज्ञान भारतियांनी (पक्षी वैदिकांनी) सर्वात आधे आणि अगदी पुरातन काळ्दीच विकसित केले होते असा दावा पुण्यातील एका प्रतिष्ठित वृत्तपत्रात दोनेक वर्षांपुर्वी एका भद्र महिला संशोधकाने (?) केला होता.

अशी असंख्य उदाहरणे देता येतील.

याला मित्थ्या-वर्चस्ववाद म्हणतात. म्हणजे, ज्याचे कसलेही पुरावे देता येत नाहीत, कसलीही शास्त्रीय संकल्पना विषद करता येत नाही, ज्याला आज प्रत्यक्ष प्रयोग करून सिद्ध करता येत नाही असे दावे केवळ आपले सांस्कृतीक माहात्म्य ठसवण्यासाठी करणे हा मित्थ्या-वर्चस्वतावाद होय. याला ज्ञानवाद म्हणता येत नाही. यामागे सांस्कृतिक वर्चस्व तुलनेने अज्ञ समाजांवर गाजविण्यासाठीची चाल असते. यामागे खरेच ज्ञानाचे विकसन व्हावे, समाजाला त्याचे फायदे मिळत समाजातील प्रत्येक व्यक्तिचे हित व्हावे हा हेतुच नसल्याने त्यातून समाजवाद नव्हे तर विखंडणवाद निर्माण होतो.

बरे...यात पाश्चात्य देश खूप मागे आहेत असे नाही. याला उदाहरण म्हनून आपण आर्यवाद आणि "इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांत" आधाराला घेऊ शकतो. अठराव्या शतकात म्यक्स्मुल्लर, बोप्प इ. लोकांनी आर्यवंश वादाची मुहुर्तमेढ रोवली. यामागील छुपे कारण म्हणजे युरोपचा ज्ञात इतिहास इसपू आठव्या शतकापलिकडे जात नाही. बरे इंग्लंड-जर्मन ई. युरोपातील राष्ट्रे पाहिली तर त्यांचा इतिहास फार-फारतर सहाव्या शतकापासून सुरु होतो. जगावर राज्य करण्याच्या इर्षेने पेटलेल्या या राष्ट्रांनाही आपले पुरातनत्व हवे होते. इतिहास जेवढा पुरातन तेवढी संस्कृती महान हा भ्रम जोपासण्यात युरोपियन पंडितही मागे नव्हते. त्यांना संस्कृत व ल्यटिन या भाषांत काही साधर्म्ये सापडली. त्यावरून त्यांने अंदाज (तर्क) बांधला कि कोणे एके काळी (म्हणजे इसपू १५००) आर्यभाषा बोलणारे लोक उरल प्रदेश अथवा उत्तर ध्रुवानिकट रहात होते. पुढे या "सुसंस्कृत" (?) टोळ्या  भारत व युरोपात घुसल्या, तेथील स्थानिक समाजांना पराजित केले व आपली संस्कृती दिली....आजचे युरोपियन व भारतातील वैदिकधर्मिय त्या पुरातन आर्यांचे वंशज होत.

यातून युरोपियन विद्वानांनी दोन बाबी साध्य केल्या...अथवा करायचा प्रयत्न केला. पहिला म्हणजे युरोपचा इतिहास वैदिक इतिहासाइतकाच पुरातन आहे. आणि दुसरा म्हणजे युरोपियन हे पुरातन काळापासुनचे विजेते असल्याने व वंशदृष्ट्या श्रेष्ठ असल्याने जगावर आजही राज्य करण्याचा त्यांचाच अधिकार आहे. म्हणजेच साम्राज्यवादी मानसिकतेला बळ पुरविण्यासाठी मिथ्थाज्ञान निर्माण केले गेले, खोटे सिद्धांतन केले गेले. त्याचीच री स्वाभाविकपणे टिळकांनी उचलली आणि आर्य (पक्षी वैदिक ब्राह्मण) हे उत्तर धृवावरून भारतात आले अशी मांडनी करणारा "आर्क्टिक होम इन वेदाज" असा ग्रंथही सिद्ध करून बसले. याचा फटका वैदिक समाजाला पुढे कसा बसला हे नंतर. पण एक राष्ट्रीय नेता असा सिद्धांत स्वीकारतो, सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ते खरेच असले पाहिजे असे भारतिय वैदिकांना न वाटल्यास नवल नाही. त्यामुळेच कि काय विष्णुशास्त्री चिपळूनकर आपल्या एका पत्रात इंग्रजांना "आमचे (ब्राह्मणांचे) पुरातन रक्तबांधव" असे संबोधतांना दिसतात. म्हणजेच युरोपियन आणि भारतीय वैदिकजन हे एकच होत असा त्याचा अभिप्राय होता.

याची सामाजिक परिणति अशी झाली कि ब्राह्मण हे विदेशी आणि अन्य सारे ते मुलनिवासी अशी मांडणी करणारी तात्विक रचना आपसूक बनली. आजवरच्या धार्मिक संघर्षाला वांशिकतेचे परिमान लाभले. त्याची फळे आजही आपला समाज खातो आहे.

प्रत्यक्षात काय वस्तुस्थिती होती हे शोधण्याचा प्रयत्न ना आर्यवाद्यांनी केला ना बहुजनवाद्यांनी. मुळात आर्य नावाचा वंश धरातलावर अस्तित्वात असल्याचा एकही पुरावा आजतागायत मिळालेला नाही. कुर्गन संस्कृती हीच आर्यन संस्कृती असे दावेही केले गेले पण त्या भागात तथाकथित आर्यभाषेचा अंश असलेली एकही भाषा अस्तित्वात नाही. तीच बाब आर्क्टिक प्रदेशाची. दुसरे म्हणजे सारेच्या सारे एक भाषा बोलणारे लोक आपले मुलस्थान सोडून का चालते झाले याचे एकही उत्तर या विद्वानांना देता आलेले नाही. दुसरे म्हनजे वैदिक जन हेही आर्य होते, युरोपियनांचे रक्तबांधव होते तर भारताला लागून असलेल्या इरान वगळता ऋग्वेदसदृष रचना व वैदिक कर्मकांडे युरोपियनांनी का नाकारली याचेही उत्तर दिले गेले नाही. ज्याहे३ए बाबी वर्चस्वतावाद टिकवतात त्यांना चिकटून राहणे याला काही केल्या ज्ञानवाद म्हणता येणार नाही हे उघड आहे.

म्हणजेच ही सर्व संशोधने व कथित ज्ञान हे एन-केनप्रकारेन वर्चस्वतावाद टिकविण्यासाठीच होते. आजही "इंडो-युरोपियन भाषागट " सिद्धांत नुसता जिवित नव्हे तर युरोपियन परिघाबाहेरील छॊटी-मोठी राष्ट्रेही आपल्याही भाषा त्या गटांत बसवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असल्याचे दिसते.

पण वास्तव काय आहे? ज्या संस्कृत भाषेवर व युरोपियन भाषांतील काही शब्दसाधर्म्यांवर (म्हणजे पितर-पातेर-फादर) या सिद्धांताचा डोलारा उभा आहे ती भाषाच मुळात इसपू पहिले शतक ते  तिसरे शतक या काळात क्रमाक्रमाने विकसित झाली, तिचे निर्माते वैदिक नसून शैव व बुद्धिस्ट होते हे असंख्य पुराव्यांनिशी मीच सिद्ध केले आहे. उपलब्ध सर्व पुराव्यांवर संस्कृतचा श्रेष्ठ व्याकरणकार पाणिनीचा काळ इसवी सनाच्या २५० च्या आसपास झाला, वैदिक विद्वान सांगतात त्याप्रमाणे इसपू ८०० मद्धे नव्हे हेही मी सिद्ध केले आहे.

मग आता युरोपियन भाषेतील काही शब्द संस्कृतात कसे आले याचा उलगडा होतो. त्याला अलेक्झांडर व नंतरचे इराणी, अफगाणी, शक-हूणादि आक्रमक/राजे व क्षत्रप जबाबदार आहेत. याचा सबळ पुरावा म्हणजे अर्धविकसीत संस्कृतमधील म्हनता येईल असा पहिला शिलालेख सापडतो तो शक क्षत्रप राजा रुद्रदामनचा आहे. त्यचा काळ इसवी सनाचा १५० असा आहे. ही बाब अन्य असंख्य शिलालेख, निया येथे सापडलेल्या राजकीय आदेशांच्या प्राकृतांतील पाट्या ते इसपू ३५० ते इसवी सनाच्या दुस-या शतकांतील अगणित नाण्यांवरील बदलत्या भाषेवरुनच सिद्ध होते.

म्हणजेच जर संस्कृतच पुरातन नाही तर कथित आर्य/वैदिक व युरोपियन पुरातन कसे? 

पण वर्चस्वतावाद्यांचा दोष हा असतो कि आपापला इतिहास मागे मागे ढकलत नेणे, आणि तो इतिहास हा विजेत्यांचाच इतिहास होता हे सांगणे एवढे आवडत राहते कि ते अशा सम्शोधनांकडे निरलसपणे न पाहता त्याला परत वर्गीय संदर्भ देत नाकारत जातात. जगभर हे झाले आहे. काळे (निग्रो) हे बौद्धिकदृष्ट्या गो-यांपेक्षा मागासलेले असतात हे सिद्ध करण्याचे प्रयत्न आधुनिक जेनेटिक विज्ञानाचाच अर्धवट आधार घेत आजही होत असतात. कु-क्लक्स-क्लानसारखी अमेरिकेतील दहशतवादी संघटना ज्यु-द्वेष केवळ याच वांशिक भेदाच्या आधारावर करत जाते. यात सेमेटिक (इजिप्त/अरब इ.) भाषा व त्यांची भौतिक पुराव्यांनिशी सिद्ध झालेली पुरातनता मात्र सर्वस्वी नाकारली जाते. त्या भाषांवर इंडो-युरोपियन भाषागटांइतके सोडा अल्पांशही संशोधन होत नाही कारण सेमेटिक लोक हे आपल्या बरोबरीचे आहेत हे मान्य करण्याची युरोपियन/अमेरिकनादि गो-या लोकांची मानसिक तयारीच नाही. सेमेटिकांच्या दहशतवादाला  याही वादाचा एक आधार आहे हेही येथे आपण लक्षात घेतले पाहिजे.

आता यात ज्ञानवाद कोठे राहिला?

ज्ञान हे जाती/धर्म/वंश/राष्ट्र निरपेक्ष असले पाहिजे ही अपेक्षा अस्थानी नाही. आपण अशा ज्ञानाला व त्यासाठी केल्या जाणा-या संशोधनांना विशुद्ध ज्ञान व त्यासाठीची निरपेक्ष संशोधने म्हणू शकतो.

परंतू प्रत्यक्षात, मग ते मित्थ्या ज्ञान असो कि सापेक्ष-संशोधित ज्ञान हे समाजवादाच्या संदर्भात निरुपयोगी असणार हे उघड आहे.

यात उरणारा महत्वाचा मुद्दा म्हणजे, मित्थ्या-ज्ञानाला प्रत्युत्तर म्हणून अजून एक अहंवादी मिथ्थ्याज्ञानाला जन्म दिला जातो. आर्यवादाला उत्तर म्हनून मुलनिवासी वाद जन्माला कसा आला हे आपण वर थोडक्यात पाहिले. जसा आर्यवादाला अर्थ नाही तसाच मुलनिवासीवादालाही अर्थ नाही. याचे कारण म्हणजे मनुष्य पुरातन काळापासून भटका राहिलेला आहे. अन्न-शिकारीच्या शोधात हे भटकणे स्वाभाविक होते. काही कोटी वर्षांपुर्वी या धरातलावर मनुष्य प्राण्याचा उदय झाला. तेंव्हापासून ही भटकंती त्याला जडली. आधीचा अन्न-संकलक माणुस शिकारी मानव झाला. नंतर तो पशुपालक मानव बनला. तो सतत भटकतच होता. कोणत्याही प्रदेशात त्याचे पाऊल दीर्घकाळ टिकणे शक्य नव्हते. मनुष्य स्थिर झाला तो शेतीचा शोध लागला तेंव्हा. आणि मानवाला शेतीचा शोध लागला तो केवळ पंधरा हजार वर्षांपुर्व्ची. म्हणजे मानवाच्या कोट्यावधी वर्षांच्या इतिहासात त्याचा स्थिरतेच कालखंड आहे तो केवळ पंधरा हजार वर्षांचा! याही काळात युद्ध-व्यापारादि कारणांनी त्याची भटकंती काही प्रमाणात राहिलीच.

त्यामुळे कोणी स्वत:ला मुलनिवासी जसे समजू शकत नाही तसेच एखादा समाजगट आक्रमक होता आणि त्या एका गटानेच अन्यांना पराजित करून आपली संस्कृती लादली असाही अर्थ होऊ शकत नाही. दोन्ही विचार हे एक तर वर्चस्वतावाद टिकविण्यासाठीचे तरी असतात अथवा नवा वर्चस्वतावाद निर्माण करण्यासाठीचे तरी असतात. त्यामागे राजकीय प्रेरणा असतात हे उघड आहे.

या प्रक्रियेला आपल्याला ज्ञानवाद म्हणता येणार नाही. मिथ्थ्याज्ञानवाद समाजांना महात्मा फुलेंच्या शब्दातील "एकमय" समाज निर्माण करू देणार नाही हे तेवढेच सत्य आहे.

एकमय समाज हा इतिहास अथवा संस्कृती सापेक्ष असू शकत नाही. कोणत्याही समाजाचा अत्यंत तथ्यपुर्ण इतिहास अस्तित्वात नसतो म्हणून खोट्या सिद्धांतनांचा आधार घ्यावा लागतो हे आपण वर पाहिले. संस्कृती म्हणाल तर संस्कृती ही कोणा एका समाजघटकाची निर्मिती नसते. संस्कृतीचे निर्मितीतत्व हे नेहमीच सामुदायिक असते. खरे तर संस्कृती आधी जनसामान्यांत निर्माण होते व ती अधिकाधिक प्रगल्भ होत वरच्या समाजघटकांपर्यंत पोहोचते. आधी भाषा प्राकृतच असते व तिचा विकास होत संस्कृत भाषा जन्माला येते. उलटा प्रवास नसतो. सम्स्कृतपासून प्राकृत भाषा बनल्या हे सांगितले जाणे आणि मान्य केले जाने या दोहोंत अज्ञानवाद आहे. भाषा, गीत-संगीत, चित्रकला या आधी आदिमानवाने आपापल्या गरजांनुसार विकसित केल्या व त्यांचा विस्तार व विकसनाचा प्रवास हजारो वर्ष होत राहिला. संस्कृतींचे काही अवशेष टिकले तर काही अनेक कारणांनी नष्ट झाले. त्यामुळे भारतीय सम्स्कृती म्हणजे वैदिकांनी निर्माण केलेली संस्कृती हा वर्चस्वतावादी अभिप्राय स्वीकारला तर एकमयतेचे तत्व अस्तित्वात येत नाही. समाजवादाचे अस्तित्व येत नाही.

भारताने ज्ञानवादाची कास कधीच धरली नसल्याने विज्ञानाचा स्वतंत्र विकास झाला नाही. आजतागायत जगाला भौतिक जीवनात उपयुक्त ठरेल अशी खाद्यसंस्कृती वगळता अन्य जीवनोपयोगी योगदान दिलेले नाही. वेद पुरातन आहेत एवढेच सांगितले पण ते नेमके किती पुरातन हे त्यांना कधीही सांगता आलेले नाही. सिंधू संस्कृती ही अवैदिकांची आहे हे अगणित पुराव्यांवरून सिद्ध झालेले असतांनाही आधी सिंधु संस्कृती आक्रमक आर्यांनीच नष्ट केली असे सांगणा-यांनी कोलांटउडी मारत सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिकच होते असे सांगायला सुरुवात करत मिथ्थ्याज्ञानाचे प्रदर्शन अगणित वेळा घदवले. आणि बहुजनवादी म्हनवणारे तर ज्ञानवादापासून भरकटत आपापल्या जातीच्या कथित महामानवांच्या संशोधनांनाच अंतिम समजत राहिले. ज्ञान ही एक प्रक्रिया असते. ती सतत पुढे जाणारी व निरपेक्ष आणि नव्य पुराव्यांच्या आधारावर विकसित होत राहणारी संस्कृती असते.

आणि तिलाच आपण ज्ञानसंस्कृती म्हणतो. परंतू आपण (आणि काही प्रमानात जागतिक समुदायही) ज्ञानसम्स्कृतीच्या बाबतीत मागासच राहिला असे म्हनने भाग आहे. ज्ञानसंस्कृतीच्या अभावात समाजसापेक्ष, एकमयतेचे खरे तत्वज्ञान अस्तित्वात आले नाही. केवळ शाब्दिक संज्ञा समाजाचे हित करत नाही कारण तसे करण्यासाठी, होण्यासाठी जी तत्वधारा सातत्याने प्रसृत करत रहावी लागते ते न झाल्याने असे होणे स्वाभाविक आहे. ग्रंथप्रामाण्य जेवढे वाईट त्यापेक्षा व्यक्तिप्रामाण्य अधिक घातक असते हे आजच्य समाजाला समजावून घ्यावे लागणार आहे. कोणतेही ज्ञान अथवा संस्कृती व्यक्तिकेंद्रित असू शकत नाही...त्यामागे सर्वांचाच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असतो....त्यामुळे ज्ञान व संस्कृती ही नेहमीच समाजनिर्मित असते. व्यक्ती या त्या त्या काळातील घटनांचे व सामाजिक वातावरनाचे अपत्य असतात.

त्यामुळेच व्यक्तिमाहात्म्य गाणारा समाज स्वत:चीच वंचना करीत असतो. त्यासाठीच आवश्यकता आहे ती मुळात ज्ञानवाद हाच समाजवादाचा पाया आहे हे समजण्याची. समजावून सांगण्याची. आणि त्या दिशेने अविरत प्रयत्न करण्याची.

अन्यथा भौतिक अथवा अधिभौतिक प्रगती अशक्य आहे. त्याशिवाय आम्ही स्व-निर्मित आभासांत जगत अविरत विखंडित होत जाणा-या अमीबासारखे आहोत. वर्चस्वतावादासाठी खोटी मिथके निर्माण करणे हे जेवढे घातक आहे त्याहीपेक्षा याच मिथकांना स्वीकारत न्युनगंडात्मक समाजांचे तुकडे बनणे अधिक विघातक आहे. हे आम्हा भारतीय समाजाला समजावून घ्यावे लागेल. ज्ञानवादी बनावे लागेल...

तरच आमचा समाज एकमय होईल...!

5 comments:

 1. सर,

  मी आपले भाषा इतिहासावरील बरेच लेख वाचले आणि बहुतांशी ते पटलेदेखिल. तरी मला एक प्रश्न पडला आहे तो असा:

  एक मुद्दा मांडला जातो की संस्कृत ही कधी लिहिण्यात आली नव्हती. तदनुषंगाने आपण वैदिकांचे साहित्य हे स्मृतीवगैरे म्हणून समजतो. आपण यावर थोडा प्रकाश घालू शकाल का?

  कारण जर आपल्याला माहितीय की संस्कृत सुरुवातीच्या काळात लिहिली गेली नाही, तर आपण अस म्हणू शकतो का की संस्कृत पुरातन आहे?

  धन्यवाद.
  कुश.

  ReplyDelete
 2. I have recently started reading your works. This article is very thoughtfully written and provokes a thought process.

  Regards

  Ajay R. Bidwe

  ReplyDelete
 3. या लेखात फारच मर्मभेदीपणा,अचुकता समाज संस्कृतीचे विकसनतेचे विविध टप्पे हे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याच्या चढउताराप्रमाणे वाटतात.योग्य दिशादिग्दर्शन व विचारांचा प्रवास तसेच ज्ञानवाद हाच महत्वाचा पाया समाजवादाचा असावा असे इच्छा व्यक्त केली आहे. ग्रंथप्रामाण्याबरोबरच व्यक्तीकेंद्रीतता, व्यक्तीच्या आयुष्यांना येणाऱ्या मर्यादा यांचा गंभीर विचार केला आहे. केवळ उथळपणा व बाबा वाक्य प्रमाणंम हे टाळावे हे सांगितले आहे.जीवनाचे समत्वाने संशोधन करुन ानमार्गाच्याच साहयाने मार्गक्रमण करण्याचा मुलगामी चिंतन आढळते.बरे वाटते. संबधितांनी यावर आपल्या सामाजिक संघर्ष त्यातील यशापयाशाचय हिंदोळयाचा विचार करतांना सोनवणीसरांनी व्यक्त केलेल्या बाबी नक्कीच गांभीर्याने घेऊन जीवनाची प्रगल्भता अनुभवावी ज्यात सम्यकत्व न्याय चित्तवृत्ती जाणीवा जोपासून वैज्ञानिक पध्दतीने निरपेक्ष चिकित्सा अनुभव करीत पुढे जावे.सेमेटीकांच्या समस्या खरच दाबल्या जात आहेत.वर्चस्वता वाद तर नक्कीच सगळीकडे आढळतो. तेव्हा वरील मार्गदर्शन मोलाचे ठरुन ज्ञानवादाचीच कास धरु या. अभय वांद्रे, मुंबई.

  ReplyDelete
 4. काय हे...! स्वतःच्याच संस्कृतीचा किती दुस्वास...! आणि तुम्ही कितीही निंदा केली, तरी आपली संस्कृती किती विज्ञानवादी होती, प्रत्येक शास्त्राचा किती सखोल अभ्यास केला होता, हे सत्य झाकले जाणार आहे का? जरा उपनिषदांचा अभ्यास करा...म्हणजे तुमच्या लिखाणातला फोलपणा तुमचा तुम्हालाच कळेल. आणि कृपा करून लोकांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न थांबवा.

  ReplyDelete