Wednesday, April 20, 2016

हेही आहे...!

शेतकरी आत्महत्या करतो म्हणून सर्वांनाच दु:ख होते. कोणी कविता करतो तर कोणी आतमहत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबांना उदार हृदयाने मदतही करतो. हे सारे चांगलेच आहे. मानवता जागी आहे याचे उत्तम उदाहरण आहे.

पण आत्महत्या थांबत नाहीत. आक्रोश आवरत नाहीत हेही आहे.

उदाहरणार्थ नाबार्ड ही कृषीपुरक उद्योगांना-व्यवसायांना अन्य राष्ट्रीयीकृत ब्यंकांच्या माध्यमातून वित्तपुरवठा करण्यासाठी स्थापन झालेली मध्यवर्ती ब्यंक आहे. पशुपालन/संवर्धन/शेतीपुरक उद्योग/शेतमाल प्रक्रिया उद्योग ईत्यादिसाठी कर्ज देणे त्यांना बंधनकारक आहे.

पण ब्यंका नाबार्ड प्रकरणे करायला उत्सूक नसतात हेही आहे.

नाबार्डही शिबीरे घेत आपण काय करतो आणि कशासाठी आहोत याचा प्रचार करत नाही हेही आहे.

बरे, प्रशिक्षण उपलब्ध आहे..घ्यायचेच असले तर...पण लोक जात नाहीत हेही आहे.

नाबार्डचा फायदा अधिकाधिक लबाड लोकच घेतात हेही आहे. (गेल्या वर्षी माझे नाबार्डच्या कर्मचा-यांसमोर शिवजयंतीनिमित्त भाषण झाले होते, तेंव्हा नाबार्डच्या अध्यक्षांनाही मी हे ऐकवले होते.)

भारतातील ९०% स्वयंसेवी संस्था fraud आहेत हे सर्वोच्च न्यायालयाचे निरिक्षण आहे हेही आहे.

अनेक शेतकरी कर्जे  शेतकामांसाठी नाही तर लग्न्समारंभादी कारणांसाठीच उधळतात व व्यापा-यांकडून बोगस बिले घेतात नि नंतर ते कर्ज फेडता येत नाही म्हणुन हताश होतात हेही आहे.

शेतक-यांना डायरेक्ट बाजारपेठ मिळावी, शेतकरी व ग्राहक यांत थेट संपर्क व्हावा यासाठी मी प्रयत्न केले हे सर्वांना माहितच आहे. पुढे तर अजून व्यापक प्रमाणात माझ्या एसबीपी पक्षामार्फत करणार आहे हेही खरे आहे. पण घरासाठी थेट माल घेऊन मीसुद्धा गेल्यावर्षी फसलो आहे...हेही आहे.

जलसंधारणाची कामे लोकच प्राचीन काळापासून करत आले आहेत. शासनाचा सहभाग गांवपातळीवर कमीच असे. आता सारे काही सरकारने करावे, आमदार-खासदारांनी ठरावीक चमच्यांना-गांवगुंडांना कंत्राटे द्यावी, त्यांनी माज करावा...पण दहा टक्केही धड काम करू नये...लोकांनीही काही करु नये...बोलू नये...नि म्हणून शेती-जनावरांसकट तहानलेलेच रहावे हेही आहे.

आम्ही चवचाल लोकांच्या बरळण्यावर एवढी काही चर्चा करतो कि जणू ही बरळणारी अथवा त्यांच्या विरुद्ध बो्लणारीच शहाणी आहेत...बोलले नाही किंवा प्रतिक्रिया दिली नाही तर जणू काही तुमचे अस्तित्वच नाही असे वाटायला लावणारी ही जखीण सर्वांच्या मस्तकावर हावी झाली आहे. आस्तिक असा कि नास्तिक....हेही आहे.

कोठेतरी लबाडी हाच आमचा ध्यास बनला आहे. आमच्या थोरामोठ्या कंपन्यांचे ताळेबंद बनावट असतात. आमच्या सरकारचे प्रगतीचे आकडे बनावट असतात. ब्यंका या ताळेबंदांना भुलून हमखास बुडणारी कर्जे देतात. आम्ही काळ्या धनाची वाट पाहत त्यावर
आधी भुलत, मोहात पडत, ते होत नाही बघत नंतर जोक करण्यात रममान होतो...हेही आहे.

धर्मपिपासू घातक आहेत. सर्वात घातक हे अर्थपिपासू लबाड नागरिक आहेत. खोट्या प्रतिष्ठांच्या मागे लागलेली नवी पिढी आहे आणि ती भागवायला उरापाड झटणारी जुनी पिढी आहे. हेही खोट्या कारंणांनी कर्जे घेतात तेही खोट्या कारणांनी कर्जे घेतात. हेही बुडवतात...तेही बुडवतात...कारण खोटी कर्जे बुडवण्यासाठीच असतात हेही आहे.

आम्ही भारतीय कामाच्या ठिकाणी नेहमी दुर्मुखलेले असतो. आमचे whattsap नि फेबू जोमात असते. आमचे मुड काम ठरवत नाही, आम्ही काय बेस्ट दिले हेही विचार नाहीत...तर बव्हंशी थुका लावण्यात आमचे महान कर्मकौशल्य दाखवतो हेही आहे.

बरेच लिहिता येईल. पण थांबतो. थांबलेच पाहिजे या पिपासुंच्या राज्यात हेही आहे.

Tuesday, April 19, 2016

या स्वप्नांना....

या स्वप्नांना टेकाया
जरा भुई मिळावी
घनघोर पावसाची
जरा गाज यावी
भुईतून उगवावी
स्वप्ने अशी की
स्वप्नांनाही जरा
साथ मिळावी....!

Monday, April 18, 2016

साम्यवाद....

इस्लाम, ज्यू, ख्रिस्ती हे सारे धर्म मुळत सेमेटिक मुळाचे/ तत्वज्ञानाचे आहेत. कम्युनिज़मही याच तत्वज्ञानाचे वर वर विरोधी वाटणारे पण अंतर्यामी समान सूत्र असणारे रूप आहे. हे सारेच तत्वज्ञान मुळात हिंसेच्या पायावर उभे आहे. युरोपियनांनी (ख्रिस्ती धर्म असुनही) सेमेटिकांशी सांस्कृतिक नाळ तोडण्याचा जो प्रबोधनकाळात अचाट उद्योग केला, ज्यासाठी आर्यवादही जन्माला घातला, त्याची विकासवादी फळे युरोपियनांना मिळाली. या आर्यवादातून युरोपात मोठे, हिटलरसारखे, अपघातही झाले. पण सेमेटिक मानसिकतेतून बाहेर पडण्याचा त्यांना फायदाही झाला.

साम्यवाद हाच मुळात अनैसर्गिक आहे. किंबहुना सेमेटिक आनुवांशिकीय मानसशास्त्राचा तो मोठा दुर्गुण आहे. साम्यवादी किती ढोंगी असतात (अपवाद क्षमस्व) हे जगभर पहायला मिळते. ज्युंचे शिर्कान जेवढे हिटलरने केले नाही तेवढे साम्यवादी रशियाने केले. विचारवंत-चळवळ्यांच्या किती हत्या केल्या ते आजही जगाला फारसे माहीत नाही. सैबेरियात तर अगणित सडले.

इस्लाम ज्या परिस्थितीत निर्माण झाला ती परिस्थिती वेगळी होती हे मान्य केले तरी इस्लामवर ज्यू तत्वज्ञानाचा प्रभाव स्पष्ट आहे. कम्युनिझमवरही ज्यू तत्वज्ञानाचा प्रभाव स्पष्ट आहे, पण ज्युंनी साम्यवादाला कधी विशेष जवळ केले नाही. नैसर्गिक अशा भांडवलशाहीचा हात धरत त्यांनी प्रगती साधली. साम्यवाद हा भुलावा आहे. शेतकरी-कष्टक-यांना त्यांच्या अंगभूत भांडवलाला अर्थव्यवस्थेचा सक्षम वाटेकरी बनवण्याऐवजी, त्यांना दुस-याचा वाटा कसा हडपता येईल हे भ्रामक सांगणारी ही व्यवस्था आहे. गरीबाला गरीबच ठेवणारी ही व्यवस्था आहे. ही व्यवस्था कोणाला कसलीही उत्थानाची आशा देत नाही. बाबासाहेबांचा बौद्ध धर्मावरही असाच (वेगळ्या परिप्रेक्षात आक्षेप होता.)

इस्लामही मध्ययुगीन मानसिकतेला चिकटून राहणे पसंत करतो. टो्ळी जीवनातील हिंसक व विषमतामुलक मुलतत्वे आज कुचकामी आहेत हे त्यांना समजत नाही. ते पाश्चात्य प्रगत जगाला आव्हान शस्त्रांनी नव्हे तर मुळ अरबांच्या ज्ञानपिपासू वृत्तीतुनच देवू शकतात हे त्यांना समजत नाही. अरबस्तान एके काळी भारत व पश्चिम यातील ज्ञानाचा मध्यबिंदू होता. आज तो हिंसेचा केंद्रबिंदू बनला आहे. याची खरे तर इस्लामियांना शरम वाटायला हवी. पण भारताला धोका जेवढा साम्यवाद्यांचा व माओवाद्यांचा आहे तेवढा पाकिस्तान-बांगला किंवा ओवेसीचाही नाही हे मी स्पष्ट नमूद करतो. आणि हे वैदिकवादी किंवा सावरकरवादी या वास्तवाचा गैरवापर करत स्वत:च्या हिंसक मनोवृत्तीचे क्षोभ निर्माण करत असतील तर त्यालाही विरोध आहे. या सर्व विचारधारांच्या पार जावून जागतिक आणि सामाजिक स्थितीचे अवलोकन करावे लागेल. धोका एकाचा अथवा फक्त दुस-याचा असा नाही. धोके चारी बाजुंनी आहेत.

हे म्हणतात, इस्लामची चिकित्स का करत नाही...मी म्हणतो...अमेरिकेची का करत नाही? जगातील सर्वात मोठे दहशतवादी राष्ट्र तर ते आहे. नरसिंह रावांबाबत मला आदर वाटतो कारण अमेरिकन संसदेत त्यांनी अमेरिकनांना भारत-पाक प्रश्नाबाबत बोलतांना सुनावले होते कि मुळ अमेरिकन (रेड इंडियन) यांचा समुळ विनाश करुन त्यांची भूमी बळकावणा-या उपटसुंभ अमेरिकनांना इतर राष्ट्रांच्या न्याय्य अधिकारांबाबत बोलायचा अधिकार काय? मीही २००२ मद्ध्ये अमेरिकन रेडियोवरून दोन मुलाखतीत अमेरिका हेच जगातील सर्वात मोठे दहशतवादी राष्ट्र आहे असे म्हटले होते. खरे तर मुलाखतकर्त्याला मी पाकिस्तानचे नांव घेईल असे वाटले होते.

मला वाटते आपण सारे दांभिक झालो आहोत व सोयीचे शत्रु शोधतो आहोत. साम्यवाद हा जगाला लागलेला काळा भावनिक धब्बा आहे हे मान्य करत असतांनाच इतरही ढोंगी, दांभिक आणि हिंसक मनोवृत्तींच्या सर्वच विचारधारांचा कठोर विरोध केला पाहिजे. हा मार्ग लोकप्रियतेचा नाही. स्वत:च स्वत:चे वाचक राहिलो तरी चालेल...पण हा विरोध होत राहिलाच पाहिजे.

Saturday, April 16, 2016

वैदिक-हिंदू वाद का?

कालपरत्वे समाज-संस्कृती अभ्यासाचे आकलन नवीन पुराव्यांच्या प्रकाशात बदलत जात असते. म. फुलेंच्या काळात सिंधू संस्कृती सापडलेलीच नव्हती त्यामुळे भारतीयांनी एवढ्या प्राचीन काळी केवढी भौतिक उंची गाठली होती हे समजणे शक्य नव्हते. शिवाय त्य कालात आर्य-आक्रमण सिद्धांत व "प्रगत आर्यांनी" येथील रानटी लोकांना कसे गुलाम बनवले, जातीव्यवस्था लादत शूद्र स्थान दिले याचेच वारे प्रबळ होते. त्यामुळे एतद्देशीय शुद्रातिशूद्र आणि आक्रमक परकीय आर्य अशी वैचारिक मांडणी होणे स्वाभाविक होते.

लो. टिळकांनी तर आर्यांचे मूळ आर्क्टिक प्रदेशात शोधले व अभ्यासपुर्ण ग्रंथ सिद्ध केला. किंबहुना आर्य हा भारतीय सांस्कृतिक संघर्षाचा एक कळीचा मुद्दा बनला. द्रविडांनी तर स्वतंत्र द्रविडस्थान मागितला व आर्य भाषांविरुद्ध बंड पुकारले. मुलनिवासीवादही यातून जन्माला आला. बाबासाहेबांनी आर्य-अनार्य हा संघर्ष वांशिक नसून धार्मिक होता असे नि:संदिघ्ध सांगुनही त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसत नाही. आदिवासी विद्वानही आक्रमक आर्यांने सिंधू संस्कृतीतील लोकांना पिटाळले म्हणून ते अरण्यात-गिरीकंदरांत रहायला गेले म्हणून आदिवासी बनले असे सिद्धांत मांडतात.

खरे तर आर्यवादाचे पाप युरोपियनांचे. सेमेटिक वंशाशी सांस्कृतिक-धर्मिक नाळ तोडायची म्हणून त्यांनी आर्य सिद्धांताला जन्म दिला. हा वंशश्रेष्ठतावाद हिटलर-मुसोलिनीने आत्यंतिक टोकाला नेला. यातून युरोपियन विद्वान अर्धवट शहाणे झाले. त्यांनी आर्यवंशऐवजी "आर्यभाषा गट" व ही आद्य भाषा बोलणा-यांचे आद्यस्थान या शोधयात्रेत बदलवले. लेबल बदलले पण छुपा वांशिक श्रेष्ठतावादाचा गंड गेला नाही. त्यांना उत्तर म्हणून एतद्देशिय तलागेरी, कल्याणरमणादि विद्वान आर्य भारतीयच असून त्यांनी युरोपापर्यंत जात आर्यभाषा पसरवल्या हे सिद्धांत मांडायला व वैदिकवाद्यांना वर्चस्ववादी बळ द्यायला सुरुवात केली. या वर्चस्वतावादाच्या संघर्षात आपण इतिहास आणि संस्कृतीचे हनन करत आहोत हे या अतिउत्साह्यांच्या लक्षात आले नाही.

एतद्देशिय व विदेशी विद्वानांच्या मते आर्य कोण तर ते ज्यांनी वेदांची व वैदिक धर्माची निर्मिती केली. त्यांना आपण वैदिक आर्य म्हणूयात. या वैदिक आर्यांनीच सिंधू संस्कृतीची निर्मिती केली असे ठासून सांगितले जायला लागले. थोडक्यात या देशात जेही काही आहे ते सर्व वैदिक आर्यांनीच निर्माण केले असा त्यांचा एकुण मतितार्थ. प्रत्यक्षात ऋग्वेद तर सोडाच पण ब्राह्मण ग्रंथांतही वैदिक लोक नागरी संस्कृतीचा भाग असल्याचे दिसत नाही. त्यांना भाजलेल्या वीटा माहित नाही. सिंधू संस्कृतीतील मुद्रांपासून ते स्नानगृहे, धान्याची कोठारे, अलंकार निर्मितीचे कारखाने, विदेश व्यापार, बंदरे ई. या कशाकशाचा त्यांना सुगावाही असल्याचे दिसत नाही. सिंधू संस्कृतीचे अवर्षनांमुळे झालेल्या -हासाचे व नागरी संस्कृती सोडत ग्रामीण संस्कृती स्विकारायचा प्रवासही कोठेही साधा ध्वनितही होत नाही. ते घग्गर नदीला सरस्वती समजतात. समजोत. पण पर्जन्यमान बदलल्याने बारमाही वाहणारी नदी शेकडो वर्षांच्या काळात (इसपू १७५० ते इसपू १५००) कशी क्रमश: आटत मोसमी बनली याचेही विवरण वेदांत अथवा ब्राह्मण ग्रंथांत नाही. वैदिकांना एवढी प्रिय, अंबीतमे, नदीतमे नदी एवढ्या बदलातून जाते याबाबत काहीएक विधान नाही. छोटीमोठी युद्धे नोंदवणा-या ऋग्वेदात व उत्तरकालीन ग्रंथांतही या प्रचंड बदलाचे पुसटसेही चिन्ह नाही. या बदलाने सिंधू संस्कृतीच्या लोकजीवनाची दिशाच पालटली. जुन्या संस्कृतीची मोडतोड झाली. हा बदल त्याच संस्कृतीच्या निर्मात्यांच्या साहित्यात जराही येत नाही याचे कारण हे लोक मुळात त्या संस्कृतीचे निर्माते सोडा, भागही नव्हते आणि त्या संस्कृतीला ओळखतही नव्हते हे आहे.

सिंधू संस्कृती शिव, मातॄदेवता, वृक्ष व विविध शेतीउपयोगी पशू पुजत होते हे उत्खनित पुराव्यांवरून स्पष्ट आहे. ऋग्वेदात या धर्मकल्पनांचे अस्तित्व नाही. किंबहूना ते लिंगपुजकांचा द्वेष करत. ते मुर्तीपूजा निषिध मानत. त्यांचे इंद्र-वरुणादि देव हे अमूर्त असून यज्ञाच्या माध्यमातून त्यांना हवी देत संतुष्ट करणे हे त्यांचे कर्मकांड. यजुर्वेदात स्पष्ट म्हटले आहे, "ना तस्य प्रतिमा अस्ति". म्हणजे देवाची प्रतिमा असू शकत नाही. थोदक्यात वैदिक धर्म अथवा वैदिक आर्यांचा सिंधू संस्कृतीशी काही संबंध नव्हता. ऋग्वेदाचा भुगोल अभासला असता तो दक्षीण अफगाणिस्तानातील असून अवेस्त्याचा भुगोल आजच्या उत्तर अफगाणिस्तान आहे हे स्पष्ट दिसते. ज्या नद्यांचा वारंवार ऋग्वेदात उल्लेख आहे त्या सर्व अफगाणिस्तानातील आहे. गंगा-यमुनेचा उल्लेख फक्त एकदाच येतो. तोही उत्तरकालीन ऋग्वेदात...त्यांना माहित असलेल्या नद्यांची नांवे त्यांनी त्यात नोंदली आहेत. त्यांनी नोंदलेल्या टोळ्या, म्हणजे पर्शू (पर्शियन) तुर्वसू (तुराणी), गांधार (गांधार), पख्त (पख्तून), पार्थव (पार्थियन) इत्यादि) या सर्व प्राचीन पर्शियातील आहेत. इतकेच नव्हे तर खुद्द जरथुश्ट्र ऋग्वेदात उल्लेखला आहे आणि गाथांतही वैदिक लोकांची नांवे आहेत. याचे कारण एकच व ते म्हणजे हे लोक निकट राहत होते, त्यांच्यात धार्मिक व म्हनून राजकीय संघर्ष होता. या संघर्षाचे प्रतिबिंब पुरेपूरपणे दोन्ही धर्मांच्या धर्मग्रंथात पडले आहे. 

म्हणजेच वैदिक धर्म हा मुलभारतीय नाही.

तसेच त्यांचे आक्रमण झाले याचाही पुरावा नाही. विदेघ माथवाच्या कथेनुसार काही लोक भारतात आले व त्यांनी येथे धर्मप्रसार केला हे स्पष्ट होते. धर्मप्रसार ही पुरातन काळापासून आजतागायतपर्यंत नवी बाब नाही. बौद्ध धर्मही प्रचारित होत पार ब्यक्ट्रियापर्यंत गेल्याचे पुरावे उपलब्ध आहेतच.

पण समस्या निर्माण झाली ती आर्यवादामुळे, वर्चस्वतावादामुळे. येथील वैदिक हे बव्हंशी धर्मांतरित आहेत. काही तर बनावट वैदिक आहेत कारण का तर प्रतिष्ठा वाढते. वैदिक वर्णव्यवस्थेने निर्माण केलेले ते समाजमानसशास्त्रीय संकट आहे. वेद, यज्ञ याला एवढी प्रतिष्ठा मिळाली ती त्यातील गुढानेच नव्हे तर डामडौलाने. मुलात यज्ञ हे साधे होते. पण धर्मप्रसारासाठी यज्ञ हे पार बारा बारा वर्ष चालवणारे बनवले गेले. नवीन गोष्टींचे आकर्षण सर्वांनाच असते. अनेक लोक वैदिक बनले ते यामुळे, त्यातल्या त्यात ब्राह्मण वर्णात जाण्याचा अट्टाहास अधिक होता. पण पुढे अनेक कारणांनी यज्ञ थांबले. गौतम बुद्धाने खरे तर वैदिक धर्मात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण पुढे बौद्ध परंण्परागत तंत्रप्रधान शैवधर्माचेच अनुकरण करू लागल्याने वैदिकांनाही परंपरागत लोक-दैवतांना शरण जाण्याखेरीज पर्याय राहिला नाही. प्रश्न आर्थिक...जगण्याचा असतो. यज्ञ परवडणारे वा करून घेऊ इच्छ्घिणरे राजे-धनिकच यज्ञांना "रामराम" ठोकू लागल्यावर पोटार्थी सांग्रसंगित यज्ञ करणा-या वैदिकांचे काय होणार?

धर्मांतरितच असल्याने त्यांनी सोडलेल्या दैवतांची पूजा-अर्चा स्विकारणे मानसिक व धर्मदृष्ट्या त्यांना किती जड गेले असेल याची आपण कल्पना करू शकतो.

मग त्यांनी जी शक्कल लढवली त्याला तोड नाही. शिवाला रुद्राभिषेक सुरु केला. तेही पुरे पडेना म्हणून ऋग्वेदातील विष्णू समोर आणत पराक्रमी अवैदिक पण लोकप्रिय राजांना विष्णुचे अवतार ठरवले. हिंदू (शैव) देवता पुजतांना पुरुषसूक्त (ज्याचा कोणत्याही दैवताशी काही संबंध नाही)  म्हणायला सुरुवात केली. हा धार्मिक व्यभिचार नव्हता असे कोण म्हणेन?

बरे, हरकत नाही. पोट भरण्यासाठी अशी नाटके करावी लागतात असे समजू. पण येथे ही समस्या झाली कि पोट जाळतांना स्वत:चा वांझ श्रेष्ठतत्वतावादही जपला गेला. तो जपण्यासाठी पुरेपुर काळजीही घेतली गेली. म्हणजे त्यांच्या धर्मग्रंथांना जाणुन घेण्याचा मार्गच बंद केला. वेदाज्ञा-वेदप्रामाण्य नांवाखाली जे वेदातही उल्ल्लेखलेही नाही त्याचा धाक निर्माण केला.

हे लोक परके नव्हते. येथीलच होते. स्वार्थासाठी ते सांगत गेले आणि येथलेच...आपलेच म्हणून लोकही विश्वास ठेवत गेले. तसेही भारतीय लोक "इश्वरी संविधान" येते तेंव्हा गप्पच बसतात, निमुटपणे स्विकारतात. येथल्याच लोकांना ती मानसिकता माहित कशी नसेल?

आणि आजही वैदिक आर्यांचा (येथील किंवा बाहेरील) नंगानाच अशुद्ध विद्वत्तेच्या नांवाखाली चालुच आहे. ज्या देवता वैदिक नाहीत त्या देवतांच्या पुजा-अर्चनाबाबत हे लोक नियम बनवत धार्मिक हुकूमशाही निर्माण करत आहेत. त्यांनी त्यांचे यज्ञ त्यांना हव्या त्या पद्धतीने करावेत. मुर्तीपुजाच मुळात अवैदिक असल्याने आणि ब्राह्मण हे वैदिक धर्माज्ञेप्रमाणे फक्त यज्ञ करण्यास (पूजा नव्हे) पात्र असल्याने त्यांनी अवैदिक देवतांचे पुजारपण करून स्वत:चा धर्म बुडवू नये. करायचेच असले तर ते पुजारपण अवैदिक पद्धतीनेच करा. तुमचे वैदिक नियम घुसडायचे काम नाही. तुमचा धर्म बुडवता ते ठीक आहे...आमचा बुडवू नका.

Thursday, April 14, 2016

अस्मितांच्या बाजारात.....

भारत आधुनिक तेंव्हाच होईल जेंव्हा आम्ही भारतीय नागरिक आचार-विचार प्रगल्भ, जिज्ञासू आणि भविष्यवेधी होऊ. आम्हाला महापुरुष बोट धरुन चालवतात. पुढची दिशाही दाखवतात. काळाचा घाला कोणाला सोडत नाही. बोट सुटते. आम्ही ज्या दिशेला बोट दाखवले त्या दिशेकडे जायचा मात्र प्रयत्न करत नाही. जेथे साथ सुटली तेथेच रेंगाळत राहतो. स्मारके बनवणे अथवा जयघोषात रममान होणे हाच जणू आमच्या अनुयायी असंण्याचा एकमेव निकष बनतो. आम्ही पुढे जात नाही. आम्ही त्यांचे काम, विचार पुढे नेत नाही. अजुन वरचे मजले बांधायचे बाकी आहेत हे आमच्या गांवीही नसते. 

आम्ही स्मरण करतो म्हणजे नेमके काय करतो? अभिवादन करतो म्हणजे नेमके काय करतो? खरे तर यातुन आम्ही काहीच करू शकत नाही हेच सिद्ध करतो. म्हणून आमच्या समस्या त्याच जुनाट आणि बुरसटलेल्या आहेत. आमच्या जातीअंतांच्या सभा वक्त्यांच्या जातीची नांवे घेतच होतात. आमचा पाण्याचा प्रश्न स्वातंत्र्यपुर्व काळात होता तो आजही तसाच आहे. आमच्या अर्थिक आणि जातीय विषमता यात काही बदल झालेला नाही. वैचारिक प्रगल्भता आली असावी असे वाटावे अशी सामाजिक, शास्त्रीय, आर्थिक संशोधनेही आम्ही केली नाहीत. ज्ञानाची कोठारे एका टिचकीवर आज उपलब्ध झाली पण आम्ही त्या साधनांचा गैरवापरच जास्त केला. आमचेच पंख आम्ही वांझ, खोटारड्या अस्मितांच्या लालसेपायी कापून घेतले. खरे म्हणजे जीवंत बोट जी दिशा दाखवत होते ती दिशा आम्ही सोडली आणि काल्पनिक बोटाच्या छत्रछायेत आमचे गौरव शोधत राहिलो.

गौरवात भर घालु न शकणारे नागरिक ज्या देशात होतात त्या देशाला भविष्य नसते. अभिवादन सार्थ कृतीतून होते. ज्ञान-विचार-समग्र सामाजिकतेत भर घालून होते, पोकळ आठवणी काढत आणि त्यातच रमत होत नसते याचे भान आम्हाला आजही नाही. अस्मितांच्या बाजारात महापुरुष हरवले आहेत. आम्ही दिग्भ्रमित माणसे बनलो आहोत नि त्यामुळेच स्वजातीय महापुरुषांना घट्ट कवटाळुन बसत स्वत: तर प्रतिगामी होतच आहोत, महापुरुषांनाही छोटे बनवत आहोत. त्यांच्यात अस्मिता शोधणे महत्वाचे असले तरी त्यांच्या पेक्षाही किमान दोन पावले पुढे जाण्याचे व खरी आदरांजली वाहण्याचे आपल्याला भान नाही. बाबासाहेबांना दर वर्षी जयंती नि पुण्यतिथीला अभिवादनाचे कार्यक्रम होतात. पण आमच्यात कोणती वैचारिक प्रगल्भता आली याचा आम्ही कधी विचार करणार? त्यांनी ज्या वैचारिक, सामाजिक स्वातंत्र्याकडे बोट दाखवले त्या दिशेने कधी वाटचाल करणार?

( 13.4.2016. सिंहगड टेक्निकल इंस्टिट्यूट, आंबेगांव -पुणे येथे विद्यार्थ्यांसमोर बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त बोलतांना मांडलेले विचार.)

Saturday, April 9, 2016

क्यलिफोर्निया...मराठवाडा आणि दुष्काळ!



 (आटलेल्या नद्या-क्यलिफोर्निया)

क्यलिफोर्निया या अमेरिकेतील राज्यात गेली चार वर्ष भिषण दुष्काळ पडलेला आहे. जानेवारी २०१५ मद्ध्येच क्यलिफोर्नियाच्या गव्हर्नरांना दुष्काळी आणिबाणी जाहीर करावी लागली एवढी भिषण स्थिती सलग दुष्काळाने निर्माण झालेली आहे. ओसंडुन वाहणा-या नद्या प्रचंड आक्रसलेल्या आहेत. धरणांतील जलसाठेही सुकले आहेत. भूजलपातळी खालावल्याने खाजगी विहिरींनीही तळ गाठलेला आहे. यंदाही स्थिती उत्साहवर्धक नाही. खरे म्हणजे क्यलिफोर्निया हे अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील महत्वाचे शेतमाल-फळफळावळ उत्पादक राज्य आहे. आपणही कोकणचा क्यलिफोर्निया करु अशी स्वप्न पाहत होतो हे आठवत असेलच. आज तोच क्यलिफोर्निया भकास-ओसाड झाला आहे. प्यायच्या पाण्याचेही वांधे आहेत. थोडक्यात क्यलिफोर्नियाचा मराठवाडा झाला आहे. वन्य जीवनावरही या दुष्काळाने भयानक परिणाम केलेला आहे. क्यलिफोर्नियातील हा गेल्या चारशे वर्षातील सर्वात जीवघेणा दुष्काळ आहे असे तज्ञ म्हणतात. यंदाही दुष्काळ संपेलच याची आशा हवामानतज्ञांना नाही.

दुष्काळाशी संघर्ष करण्यासाठी अमेरिका काय मार्ग वापरत आहे हे पाहणे आपल्यालाही प्रबोधक ठरेल. त्यातील काही मार्ग आपल्याकडे आपल्या भौगोलिक व पर्यावरणीय स्थितीमुळे उपयुक्त नाहीत. पण जे मार्ग आपण अनुसरू शकतो ते पाहुयात.



 १) सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते शेतीयोग्य बनवणे. क्यलिफोर्नियात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी प्रक्रिया करुन समुद्रात सोडण्यात येत होते, ते आता समुद्रात सोडून न देता शेतीकडे वळवण्यात येत आहे. आम्ही मुळात सांडपाण्यावर प्रक्रियाच करत नाही किंवा केली तरी ती तोंडदेखली असते. शेतीसाठी त्याच्व्हा वापर तर दूरची गोष्ट झाली. आपल्याला नदी-नाल्यांत सोडले जाणारे सांडपाणी शुद्धीकरण करावेच लागणार आहे.

२) पीकपद्धतीत बदल : कोणत्या प्रकारच्या पीकांना किती पाणी लागते याचा अभ्यास करून पाणीपिऊ पीके बंद करण्याचा अथवा क्षेत्रबंदीचा निर्णय. ज्यांना ही पीके घ्यायचीच आहेत त्यांच्यावर अवाढव्य जलकर लावण्यात आला आहे. क्यलिफोर्निया राज्य हे बदामांचे मोठे उत्पादक आहे. ही झाडे क्यलिफोर्नियातील उपलब्ध पाण्यापैकी १०% पाणी पितात. अशी काही इतर अनेक पीके आहेत. सर्वच पीकांचे नीट नियोजन करणे, काही पीके घेणे बंद करत पर्यायी पीकांकडे जाण्याचे त्यांनी नियोजन केले आहे. नागरिकांनीही आपल्या खाद्य सवयीही बदलाव्यात यासाठी प्रबोधन केले जात आहे.

आपल्याकडे हे करावेच लागणार आहे. ७०% पाणी पिणा-या उसाबाबतच आमची भुमिका धड नाही. उसाला पर्याय असुनही ते वापरले जात नाहीत. द्राक्षे, मोसंबी ईत्यदिबद्दल तर भुमिकाच नाही. आम्हाला प्रत्येक विभाग, त्यातील पाण्याची एकंदरीत उपलब्धता याचा शास्त्रीय अंदाज घेतच पीकनियोजन करावे लागणार आहे.

३) हवेतील बाष्पापासून पाणी मिळवणे, कृत्रीम पाऊस पाडणे हेही उपाय केले जातात पण ते तितकेसे यशस्वी ठरलेले नाहीत. उघड्या क्यनालमधून पाणी नेण्यापेक्षा बंद पाईपलाईनचा वापर करण्याचे प्रमाण मात्र वाढवण्यात येत आहे.

४) बाटलीबंद पाणी देणा-या कंपन्यांविरुद्ध कठोर उपाययोजना. नेस्लेसारखी क्यलिफोर्नियातील सर्वात अवाढव्य कंपनी आहे व तिच्या अनिर्बंध पाणीवापरावर (म्हणजेच पाणीचोरीवर) कोणी पुर्वी लक्ष देत नव्हते. आता मात्र कायद्याचा बडगा कठोर करण्यात आला आहे. बाटलीबंद पाण्यावरच निर्बंध आणले गेले आहेत.

विशेष म्हणजे नेस्लेनेही या निर्बंधांचे स्वागतच केले असून आम्ही मर्यादेत राहून आमच्या प्लांट्समद्धे पाण्याचे वाया जाण्याचे प्रमाण किमन मर्यादेत राहू असे लेखी अभिवचन सरकारला दिलेले आहे. असे असले तरी नेस्लेचे राज्यातील सर्व प्लांट बंद करावेत यासाठी जनमताचा रेटा वाढत आहे.

आपल्याकडेही अशा निर्बंधांची तातडीने गरज आहे. आणि जनतेचा दबाव काय असतो हे आम्हाला अशा कामांत समजत नाही. आमची आंदोलने राजकीय हेतुंनीच प्रभावित असतात नि म्हणूनच आमचे खरे प्रश्न सुटत नाहीत.

५)  घरगुती व घरबागेसाठी पाण्याच्या वापरावर निर्बंध, प्रतिमाणसी किती ग्यलन पाणी पुरवले जाईल याचा निश्चित आराखडा व त्याप्रमाणेच पुरवठा.

६) क्यलिफ़ोर्निया वाटर बोर्डाचा सर्वात महत्वाचा नागरिकांना सल्ला म्हणजे थेब थेंब पाणी वाचवा. पाण्याबाबतची आपली जीवनशैली प्रत्येकाने बदलावी यासाठी विशेष अभियान राबवले जात आहे.

या सा-या प्रयत्नांमुळे २३.९% पाणी वाचवता आले (ध्येयापेक्षा फक्त १.१% मागे पडले) जे साठ लाख नागरिकांना वर्षभर पुरू शकते.

अमेरिका हे जगातील सर्वात तंत्रप्रगत राष्ट्र आहे. दुष्काळावर मात करण्याचे मार्ग म्हणजे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे, सांडपाणी पुन्हा वापरात आणने हेच उपाय त्यांनाही महत्वाचे वाटतात. पाणी कृत्रीमरित्या तयार करता येत नाही. आम्ही आमच्या जीवनदायी पाण्याची बेपर्वा उधळपट्टी करण्यात मशगूल आहोत. क्यलिफोर्नियासारख्या अमेरिकेतील शेतीप्रगत राज्याला आज पाण्यानेच विकलांग केले आहे. पाणी काटकसरीने वापरायची बुद्धी त्यांना फार लवकर झाली. आमच्याकडे आजवर दुष्काळाच्या एवढ्या रांगा लागून गेल्यात पण आम्हाला पाण्याचे महत्व अजुनही समजलेले नाही.

आमचे कामच असे असते कि तहान लागली कि विहिर शोधायची. नियोजनाची गरजच मराठवाड्यात उरलेली नाही कारण नियोजनासाठी किती पाणी उपलब्ध आहे आणि त्याचे नेटके वितरण कसे करायचे हेच माहित नाही. ट्यंकर पाणी विकतात. ते कोठून पाणी आणतात? कोणते स्त्रोत वापरतात? तेथील साठ्यांची काय अवस्था आहे? त्या पाण्याच्या शुद्धीबाबत काही खात्री आहे काय? काही नाही.

क्यलिफोर्नियासारख्या जगातील सर्वात शेतीसधन राज्याची आजची अवस्था केविलवाणी आहे हे खरे, पण त्यांनी त्यावर कठोर उपाययोजनाही सुरु केल्या आहेत. दुष्काळ आमच्या पाचवीला पुजलेला असुनही आमचे डोळे अद्यापही उघडलेले नाहीत. क्यलिफोर्नियासारखा सलग दुष्काळ आमच्या वाट्याला आला तर महाराष्ट्र ओस पडेल याची खात्री बाळगा. सावध व्हा. स्वत: पाणी नियंत्रणात तर वापराच पण व्यापक जलधोरण असलेच पाहिजे व ते पाणीमाफिया, उसमाफियांच्या कचाट्यात जाणार नाही याची काळजी घ्या. पाण्यचा गैरवापर करणारे खरे देशद्रोही आहेत हेही लक्षात घ्या.

यंदाचा मान्सून तरी चांगला जाईल या आशेवर बसणे मुर्खपणाचे आहे. पावसाळा चांगला जाओ कि वाईट...आम्हाला जणू दुष्काळच आहे असे समजत पाण्याचे नियोजन करावे लागेत तरच दुष्काळी वर्षेही आम्ही धडपणे निभाऊन नेवू शकू व आमचे जल-भविष्य सुखकर राहील.


Friday, April 1, 2016

आणि हाच आमचा राष्ट्रवाद आहे....

भारतात नेहमी राष्ट्रवादासंबंधात कसले ना कसले विवाद चालु असतात. पण यात सैद्धांतिक गांभिर्य मात्र सहसा नसते. राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम व राष्ट्राबद्दलची नागरिकांची कर्तव्ये यातील मुलभूत फरक न समजावून घेतल्याने आपला राष्ट्रवाद हा म्हणजे उथळ घोषणंचा राष्ट्रवाद आहे. आमची मते ज्यांना मान्य नाहीत त्यांना सरळ देशद्रोही ठरवायचीही एक, कधी हिंसकतेकडे वळणारी टूम आहे. कधीकाळी "इस देशमें रहना होगा तो वंदेमातरम कहना होगा" अशा घोषणांचाही महापूर होता. अलीकडेच "भारत माता कि जय" वरुनही असेच वादळ उठले आहे. काय योग्य, काय अयोग्य हे समजावून घेण्यासाठी आपल्याला मुळात राष्ट्रवाद म्हणजे काय हे समजावून घेतले पाहिजे.

आज आपण ज्या अर्थाने राष्ट्र ही संकल्पना वापरतो ती अत्यंत नवीन आहे. राष्ट्राची सर्वमान्य एक अशी व्याख्या नाही. तरीही आपण आधी त्या व्याख्या पाहू आणि आपण भारतीय राष्ट्र म्हणतो म्हणजे आपल्याला काय अभिप्रेत असते तेही समजावून घेण्याचा प्रयत्न करुयात.

१. समान वंश, भाषा, संस्कृती, आणि इतिहास असणा-या लोकांचा समुदाय म्हणजे राष्ट्र होय. (या व्याख्येनुसार भौगोलिक सीमा असण्याचे बंधन नाही.)

२. जोसेफ स्ट्यलीनच्या व्याख्येनुसार (१९१३) "राष्ट्र म्हनजे वंश अथवा जमात नसून ऐतिहासिक दृष्ट्या संघटित लोकांचा समुदाय होय."

३. वर्ल्ड बुक शब्दकोशानुसार, अ) "समान देशात (भूभागात) राहणारे, एकाच शासनाखाली संघटित झालेले व साधारणतया समान भाषा बोलणा-या लोकांचे मिळुन राष्ट्र तयार होते." ब.)"सार्वभौम राज्य म्हनजे राष्ट्र होय. क) समान भाषा व पुर्वज असलेली जमात अथवा वंश म्हनजे राष्ट्र होय."

४. "विविध वंश, एक अथवा अनेक संस्कृती एकाच शासनाखाली संग्रहित होतात तेंव्हा त्यांचे राष्ट्र बनते." (Collins English Dictionery.)

५.  राजकीय इतिहासकार कार्ल ड्युशच्या मते, " राष्ट्र म्हणजे इतिहासाबाबतच्या गैरसमजातुन व शेजा-याच्या द्वेषातून एकत्र आलेले लोक म्हणजे राष्ट्र."

६. बेनेडिक्ट अंडरसन यांच्या मते राष्ट्र म्हणजे एक काल्पनिक राजकीय बंधयुक्त समुदाय.

७. राष्ट्र-राज्य म्हणजे जागतीक समुदायाकडुन मान्यताप्राप्त विशिष्ट भुभागावर अस्तित्वात आलेले सार्वभौम राजकीय अस्तित्व असलेले अस्तित्व ज्यात राष्ट्राचे सर्व किंवा काही वैशिष्ट्ये अंगभूत आहेत.

अशा रितीने राष्ट्राच्या अनेक व्याख्या करण्याचा प्रयत्न झाला आहे व या व्याख्यांत काळानुसार उत्क्रांतीही झालेली आहे असे आपल्या लक्षात येईल. अनेकदा राष्ट्र व राष्ट्र-राज्य हा शब्द समानार्थी घेतला जात असल्याने (मीही या लेखमालेत राष्ट्र हा शब्द राष्ट्र-राज्य या अर्थानेच वापरला आहे.) राष्ट्र या शब्दाच्या व्याख्याही तदनुषंगिक वेगवेगळ्या अर्थछ्टा सुचवत असतात हेही येथे लक्षात घ्यायला पाहिजे. सर्व व्याख्यांचा विचार करता आपण खालील निष्कर्ष काढु शकतो...

१. जेंव्हा आपण फक्त निखळपणे "राष्ट्र" हा शब्द वापरतो तेंव्हा विशिष्ट भौगोलिक, राजकीय बंधनातीत विशिष्ट वंशीय, भाषिक अथवा धार्मिक समुदायाचे मिळुन राष्ट्र होते असे म्हणु शकतो.  भारतातील स्वातंत्र्यपूर्व कालातील द्विराष्ट्रीय सिद्धांत हा भारतात हिंदू व मुस्लिम ही दोन राष्ट्रे आहेत या गृहितकावर आधारीत होता असे आपण पाहु शकतो. त्यात भाषा, वंश व संस्कृत्यांचा विचार केला गेलेला दिसत नाही, अन्यथा अनेकराष्ट्र सिद्धांत अस्तित्वात येणे सहज शक्य होते. युरोपात राष्ट्र व वंश, भाषा, संस्कृतीचा एकत्रीत विचार करता येणे सहज शक्य होते. परंतू तसे एकसंघ युरोपचे एकराष्ट्र बनले नाही. असे असले तरी आज युरोपियन युनियन अस्तित्वात आली आहे. एक पायरी ओलांडली आहे असे आपल्याला म्हणता येईल.  पाकिस्तान हे वांशिकदृष्ट्या (वांशिक सिद्धांत मान्य केला तर) एकसमान नसूनही पाकिस्तानला राष्ट्र-राज्य मान्यता आहे तशीच ती भारतालाही आहे. जगात अशी अनेक राष्ट्रे आहेत जेथे समान वंश-धर्म संकल्पना राबवता आलेली नाही.

२. राष्ट्र संकल्पनेत समान संस्कृतीचा वैशिष्ट्यपुर्ण आग्रह असतो. एकाच संस्कृतीच्या लोकांना एकमेकांबद्दल एक समान आत्मबंधाची भावना असते असे गृहितक या तत्वामागे आहे. परंतु इतिहास या तत्वाला मान्यता देत नाही. रोमन संस्कृती ही ग्रीक संस्कृतीचीच पडछाया होती असे म्हणने वावगे ठरणार नाही, तरीही इटली व ग्रीस हे ऐतिहासिक काळापासून सर्वस्वी पृथक राजकीय अस्तित्वे म्हणुनच राहिलेली आहेत. दुसरे असे कि कोणतीही सर्वस्वी स्वतंत्र संस्कृती पुराऐतिहासिक काळापासून अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. जरी प्रादेशिक म्हणुन काही वैशिष्ट्ये जागतिक संस्कृत्यांनी जपली असली तरी त्यावर कोणत्या ना कोणत्या बाह्य संस्कृतीचा प्रभाव पदलेला आहे. कधी कधे तो एवढा पडलेला आहे कि मुळच्या संस्कृत्या त्या प्रभावात वाहून गेलेल्या आहेत. भारतापुरते पहायचे तर सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, बौद्ध संस्कृती, आदिवासी संस्कृत्या, द्रविड संस्कृती म्हणुन ज्याही संस्कृत्या येथे जन्मल्या त्या प्रवाही राहिल्याने कालौघात एवढ्या बदललेल्या आहेत कि मूळ संस्कृत्यांचे अवशेष शोधावे लागतात. एक-संस्कृतीचा देश म्हणजे भारत हा आपण जोपासलेला भ्रम आहे, वास्तव नाही. जपानचेच उदाहरण घेतले तर जपानी संस्कृतीवर चीनी संस्कृतीचा अमिट प्रभाव आहे. चीनवर बौद्ध संस्कृतीचा प्रभाव आहे. ग्रीक संस्कृतीचा प्रभाव आजही युरोपियन राष्ट्रांच्या संस्कृतीवर (व म्हणुन जागतीक संस्कृतीवर)  आहे. थोडक्यात संस्कृत्या या परिवर्तनीय असतात व त्या सर्वस्वी स्वतंत्र अशा कधीच नसतात. त्यामुळे "समान संस्कृती" हे तत्व राष्ट्र या संकल्पनेला पुरेसे लागू पडत नाही.

३. एक धर्म हे तत्व राष्ट्र (व म्हणुन राष्ट्र-राज्य) संकल्पनेचा पाया ठरु शकतो काय यावरही विचार करायला हवा. जगात सर्वात आधी गौतम बुद्धाने सर्व जगभर आपला धम्म पसरवण्याची आकांक्षा बाळगली. अर्थात त्यात राजकीय भाग नव्हता. ख्रिस्ती धर्माने तशी स्वप्ने पाहिली व काही प्रमाणात यशस्वीही केली असे वरकरणी दिसते, पण सर्व ख्रिस्त्यांचे एकच एक राष्ट्र निर्माण झाले असे इतिहासातही दिसत नाही. मुस्लिमांनी त्यावर कडी केली. तुर्कस्थानच्या खलिफाला आपला सार्वभौम सम्राट मानत जगभरच्या वेगवेगळ्या प्रदेशांत मुस्लिम सत्ता प्रस्थापित झाल्या. भारतातही मोगल सम्राट ते पार टिपू सुलतानापर्यंत खलिफाकडुन वस्त्रे घेण्याची प्रथा होती...म्हनजेच एकार्थाने ते खलिफातर्फे राज्य करत असत. आधुनिक काळात मौलाना जमालुद्दिन अफगानी यांनी तर विश्व-इस्लामवादाची संरचना केली. शिया-सुन्नी विभागणीमुळे इस्लामी राष्ट्र-राज्यांतही कसा संघर्ष पेटत असतो हे आपण आताही पाहत आहोत. म्हणजेच इस्लामलाही इस्लामच्या झेंड्याखाली सर्व मुस्लिमांचे एकच एक राष्ट्र निर्माण करता आलेले नाही. त्यामुळे धर्म हा राष्ट्रवादाचा पाया बनू शकत नाही.

धर्म हे एकमेव राष्ट्र-राज्याचे कारण असू शकत नाही हे आपण प्रत्यक्ष उदाहरनांवरुन पाहु शकतो. आज युरोपियन युनियन ही ढोबळपणे ख्रिस्ती राष्ट्रांची मिळुन बनलेली दिसते. परंतु त्यांच्यातील आंतरकलह हे "एक धर्म" या तत्वाने मिटत नाहीत हेही आपल्याला दिसते. म्हणजे एकधर्मतत्व हे कोणत्याही सध्याच्या सार्वभौम राष्ट्राच्या अस्तित्वासाठीचे एकमेव प्रेरक कारण आहे असे दिसत नाही अन्यथा सध्याच्या एकुणातील राष्ट्रांची संख्या ब-यापैकी घटल्याचे चित्र आपल्याला दिसले असते.

४. समान इतिहास हेही एक महत्वाचे तत्व राष्ट्र संकल्पनेत येते. कार्ल मार्क्सच्या मते राष्ट्र ही संकल्पना खोट्या वा भ्रामक इतिहासाच्या जीवावर बेतलेली असते. समान इतिहास अस्तित्वात नसतो असा मतितार्थ काढायचा नाही. परंतू समान इतिहास हा अत्यंत व्यापक परिप्रेक्षात जातो तेंव्हा तो एकार्थाने जागतीक इतिहास बनतो हे आपण लक्षात घ्यायला हवे. बव्हंशी इतिहासाकडे आपण "आमचे व परके यांच्यातील संघर्ष" या दृष्टीकोनातुन पहात जो इतिहास आम्हाला हवासा असतो तो आमचा इतिहास हा समान इतिहास असतो. पण आमचा म्हणजे नेमक्या कोणाचा? जित-विजित घटनांत सामाविष्ट समाजांनी अनेकदा बाजु बदललेल्या असतात. भारतासारख्या खंडप्राय देशात तर असे घडणे स्वाभाविक असते. भारतात हिंदू व मुस्लिमांनी एकार्थाने समान इतिहास उपभोगला आहे. म्हणुन पाकिस्तानची निर्मिती थांबत नाही कारण इतिहासाकडे आमचा व तुमचा ही सरळ विभागणी आहे व दोन्ही बाजु इतिहासाचा अन्वयार्थ आपापल्या हिताचाच काढनार हे उघड आहे. हेच आपण जागतीक पातळीवर पुरातन काळापासून झालेले पाहू शकतो. आपापल्या इतिहासाला सापेक्ष स्वरूप देवून त्याला गौरवशाली, प्रेरक बनवत राष्ट्रभावना वाढवण्यासाठी सर्रास उपयोग केला जातो हे एक वास्तव आहे. त्यामुळेच लोर्ड अक्टन (Lord Acton) म्हणतो कि "राष्ट्राचा सिद्धांत म्हणजे इतिहासाची पीछेहाट आहे." आणि ते खरेच आहे.

इतिहासाचे असे प्रांतनिहाय, देशनिहाय तुकडे पडु शकत नाहीत. नि:पक्षपातीपणे लिहायला गेलो तर सध्याच्या प्रत्येक राष्ट्राचा इतिहास हा जागतीक इतिहास आहे हे लक्षात येईल. तोच खरा समान इतिहास होय. समान इतिहासाच्या तत्वावर राष्ट्र ही संकल्पना उभी रहात नाही याला जगातील अनेक राष्ट्रे साक्षी आहेत.

या व अशा अनेक कारणांमुळे राष्ट्र म्हणजे भाषिक, वांशिक, राजकीय अथवा प्राणिज एकता नसून ती भावनात्मक एकता असते असे जर्मन तत्वज्ञ ओस्वल्ड स्पेंग्लर म्हणतो ते मान्य करावे लागते. एवढेच नव्हे तर बेनेडिक्ट अंडरसन म्हणतो कि राष्ट्र म्हणजे अन्य काही नसून ती एक काल्पनिक भावना आहे. ही भावना नैसर्गिक नसून ती जोपासावी लागते. अनेकदा ती भडकवलीही जाते. राष्ट्रवादाचा अतिरेक आपण फ्यसिस्ट इटली आणि नाझी जर्मनीच्या रुपात पाहिला आहे. वंशवाद, सांस्कृतीकता, भाषा, सीमा ई.च्या आधारावर भावना भडकावणे सोपे असते. त्यामुळे लोक एकत्र येतात व समानतेची भावना जागी करतात हे आपण वारंवार पहात असतो. अनुभवत असतो. एक अर्थव्यवस्था, एक राजकीय सत्ता, समान कायदे व प्रत्यक्ष व काल्पनिक राष्ट्रीय सीमा या भौतिक पातळीवर राष्ट्राचे भावनात्मक अस्तित्व ठरवत असतात. याच भावनांवर राष्ट्रांतर्गतच्याही प्रांतीय अस्मिता जोपासल्या जात असतात. त्यामुळेच तत्वार्थाने कोणतेही सार्वभौम राष्ट्र हे अनेक राष्ट्रांचा समूह असते. भारतासारखा देश हा असंख्य जातींनी बनलेल्या राष्ट्रांचा समुह आहे असेही म्हटले जाते ते यामुळेच.

राष्ट्र म्हणजे विशिष्ट कायदा, विशिष्ट शासनपद्धती, प्रशासनपद्धती, अर्थव्यवस्था (तीही बदलती) असलेला आणि संरक्षणव्यवस्थेने संरक्षित केलेला एक भौगोलिक तुकडा एवढेच राष्ट्र या संकल्पनेचे प्रत्यक्ष वास्तव स्थान राहते. बाकी इतर सा-या कृत्रीमरित्या जोपासल्या गेलेल्या, जोपासायला भाग पाडल्या गेलेल्या भावना होत.

राष्ट्रांच्या विविध व्याख्यांच्या आधाराने विवेचन केल्यानंतर आपण भारतीय राष्ट्रवादाकडे येवू. भारत एकधर्म, एकवंश, एकच एक संस्कृती, एकच एक भाषा असलेले राष्ट्र नाही. भावनिक राष्ट्रवाद कितीही जोपासायचा प्रयत्न केला तरी तो कसा ठिसुळ आहे हे काही उदाहरणांवरुन लक्षात येईल.

पुर्वोत्तर राज्ये आमच्या राष्ट्रीय नेत्रपटलासमोर (नकाशा वगळता) किती असतात हा प्रश्न आहे. वंश वेगळा असल्याने देशात अन्यत्र शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना विदेशी समजून पासपोर्ट मागितला जाणे तर सर्रास आहे. मणीपुरचे एक माजी मंत्री मला दिल्लीत २००२ साली भेटले होते. ते चर्चेत म्हणाले होते, लाख हम भारत को अपना माने, भारतीय हमें अपना नहीं मानते. राष्ट्र ही एक भावना असेल तर आम्ही पुर्वोत्तर राज्यांतील लोकांच्या कितीदा भावना दुखावल्या आहेत याची आपल्याला जाण असायला हवी. तीच गोष्ट लेह-लडाखची. १९९८ साली पहिल्याने लेहला गेलो. तत्पुर्वी पुण्यातील; एका सभ्य चार्टर्ड अकाउंटंटने मला, लेहला जायचे तर व्हिसा काढून घ्या असा दीव्य सल्ला दिला होता. म्हणजे लेह भारतात आहे हेच कारगिल होण्यापुर्वी कितींना माहिती होते? दुसरी बाब पर्यटकांची. लेहला साधारणपणे दीडेक लाख पर्यटक दरवर्षी येतात, त्यात भारतीयांचा वाटा जेमयेम २०% असतो, बाकी सारे विदेशी पर्यटक असतात. पुर्वोत्तर राज्यांची गत वेगळी नाही. तिकडेही देशी पर्यटक कमीच फिरकतात. 

म्हणजे आमची भावनिक नाळ लोकांशी हवी कि नकाशातील भुभागाशी? राष्ट्र म्हणजे भुभाग नसतो तर त्या-त्या राष्ट्राच्या सीमांतर्गत राहणा-या नागरिकांमुळेच राष्ट्र बनते. भावनिक ओलावा हा या नागरिकांत असला तर राष्ट्र बनते, प्रबळ व प्रगल्भ बनते. घोषणबाजी करून राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती दाखवायचा प्रयत्न हा खुळचटपणा असतो. घोषणांनी कोणाचे पोट भरत नाही. न दिल्याने काहीएक अनर्थ घडत नाही.

याचा अर्थ असा नव्हे कि राष्ट्रप्रेम नको. हो. पण राष्ट्रात राहणा-या लोकांवरती प्रेम नसेल, कोणत्या तरी गटाचा/पंथाचा/धर्माचा/विचारसरणी
चा द्वेष करत राहिलो तर मग राष्ट्रवाद कोठे राहिला? राष्ट्रभक्तीला काय अर्थ राहिला?

खरे तर ज्या राष्ट्रातील जेही नागरिक राष्ट्राच्या आर्थिक, सांस्कृतिक, बौद्धिक बाबींत भर घालतात ते राष्ट्रप्रेमी असतात. जे तोडफोड, हिंसा, जाळपोळ करतात व देशाची हानी करतात तेच आणि तेच राष्ट्रद्रोही असतात. कारण ते राष्ट्रातील नागरिकांचे अहित करत असतात. त्यांच्यात भय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. याला आपण उन्मादी राष्टद्रोही राष्ट्रवाद म्हणू शकतो. त्यात कोणाचेही हित नाही.

"आम्ही लोक ही घटना स्वता:प्रत अर्पण करत आहोत" हे घटनेच्या प्रास्तविकातील विधान आहे. ही घटना कोनत्या देवाला, अल्लाला, आकाशातील बापाला, मातृभू अथवा पितृभुला अर्पण केलेली नाही. ती लोकांनी लोकांनाच अर्पण केलेली आहे. देश म्हणजे देशातील माणसे. त्यांचे इहवादी निरंतर कल्याण करण्यासाठी, स्वातंत्र्य, समता व बंधुता देण्यासाठी घटना आहे. राष्ट्रातील माणसांचे परस्परसंबंध कसे असतील याचे घटना दिग्दर्शन करते व कायद्यांमार्फत नियमन करते. काळानुसार त्यात बदल घटनेलाच अभिप्रेतच आहेत. अपरिवर्तनीय असायला तो कोणता धर्मग्रंथ नाही. विवेक घटनेची भावी दिशा ठरवतो...धर्म नाही. देशातल्या नागरिकंनी स्वत:लाच अर्पण केली ही जगातील अभूतपुर्व घटना आहे आणि तिचा आम्हाला सार्थ अभिमान असला पाहिजे.

ही घटना कोणा एका व्यक्तीने तयार केलेली नाही, जवळपास चारशे सदस्य व अठरा प्रमूख समित्यांनी वादळी चर्च्घा करत भारतीय राष्ट्राचे स्वरुप कसे असेल यावर वादळी चर्चा करत घटनेचे अंतिम प्रारुप स्वीकृत केले. कोणाचे योगदान अधिक व कोणाचे कमी या वादात पडायचे काहीएक कारण नाही. या सर्वांचेच घटना बनवण्यात योगदान आहे. आपले राष्ट्र कसे असेल, कोणत्या दिशेने जाईल व कोणती तत्वधारा घटनेचा (म्हणजेच राष्ट्राचा) प्राण असेल हे घटनेत निहित आहे. त्य अर्थाने भारतीय राष्ट्रवाद हा घटनात्मक राष्ट्रवाद आहे. घटना इहवादी आहे. घटनेने आपल्या नागरिकांना धर्म, संस्कृती, प्रथा-परंपरा पाळायचे स्वातंत्र्य दिले आहे, पण ते कायद्याच्या चौकटीत. स्वत: घटना (म्हणजेच सरकार) कोणत्याही धर्म-पंथाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. ते घटनेला अभिप्रेत नाही.

सांस्कुतिक, धर्मवादी, वंशिक व कम्युनिस्ट राष्ट्रवाद जगाला कधीच परवडलेला नाही. थर्ड राईश अन्यथा कोसळले नसते. सोव्हिएट रशियाचे विघटन घडले नसते. नागरिकांना सांस्कृतिक अथवा कोणत्या विचारधारेची गुलाम बनवू इच्छिणारा कोणताही राष्ट्रवाद टिकत नाही कारण तो माणसाच्या स्वतंत्र प्रेरणांच्या विरोधात आहे. त्यातून राष्ट्राचा विकास होत नसून अध:पतनच होते. याला जगाचा इतिहास साक्षी आहे.

घटना एखाद्या धर्मग्रंथासारखी अपरिवर्तनीय नाही. काळाप्रमाने अनेक संदर्भ बदलतात. त्यानुसार घटना बदलू शकते. घटना बदलवण्यात नेहमीच विवेक असेल असेही नाही. विवेकानेच समजा देशाची साथ सोडली तर घटनाही मान टाकणार हे उघड आहे. भारत अविवेकी झालेली उदाहरणे नवीन नाहित. शाहबानो केसमध्ये तेच अविवेकाचे दर्शन घडले. तत्पुर्वीची आणिबाणी अविवेकाचेच लक्षण होती. आता चालु असलेला अविवेक वरताण आहे. न्यायसंस्थाही त्यांची अधिकारकक्षा अनेकदा ओलांडतांना आपल्याला दिसतात हे कन्हय्याच्या जामीणावर निर्णय देतांना न्यायालयाने जी संदर्भहीण शेरेबाजी केली त्यावरुन व अनेक जनहितार्थ याचिकांवरील शेरेबाजींवरुन दिसून येते. प्रत्येक खांब आपल्या कक्षा कोठेतरी सोडत आहे. सर्व लोकांची लोकशाही काही लोकांचे लोकशाही बनू पाहत आहे. माध्यमेही आपल्या भुमिका संधीसाधू बनवत आहेत.

यातून राष्ट्रवादाचे स्थान काय राहिल? राष्ट्रवादही अविवेकी आणि म्हणून अंततोगत्वा हिंसक होणार नाही काय? एक झुंड राष्ट्रवादी आहे आणि दुसरी नाही हे ठरवायचे नेमके मापदंड काय आहेत? एखाद्या गटाला समजा भारत हे आपले राष्ट्र वाटत नाही तर ते तसे वाटावे अशी नेमकी कोनती परिस्थिती आहे याचा तारतम्याने विचार करावा लागतो. काही राज्यांना भारत हे आपले राष्ट्र वाटत नाही कारण आहे कि आम्ही पुरेसा भावनिक जिव्हाळा तेथील लोकांप्रती निर्माण केला नाही. दुसरी कारणे आर्थिकही आहेत. मी उल्लेखिलेल्या राज्यांत पुरेसा रोजगार उपलब्ध नाही. काश्मिरमद्ध्ये मी १९९८ ते २००२ पर्यंत उद्योग उभारायचा अथक प्रयत्न केला. तो अयशस्वी झाला तो राजकारण्यांमुळे. काश्मिर ओस पडलेले आहे. शिकारे दल लेकमद्ध्ये रिकामटेकडे हेलकावत आहेत. हस्तोद्योग घसरला आहे. रिकामे हात बंदुकी धरत असतील, अफजल गुरुला हिरो मानत असतील तर ही मानसिकता आली कोठून या प्रश्नाच्या मुळापर्यंत आम्ही कधी जाणार? काश्मिरमद्ध्ये सैन्यदलांवर आम्ही दरवर्षी जेवढा खर्च करतो त्याच्या दहा टक्के जरी आम्ही तेथे उद्योगौभारणीवर खर्च् केले, मुबलक रोजगार उपलब्धतेची शाश्वती दिली तर मला खात्री आहे कश्मिरी तरुण बंदुका फेकतील आणि सुस्थिर जीवन जगायचा प्रयत्न करतील.

पण आम्ही "काश्मिर आमचा आहे" असे म्हणतो पण काश्मिरींचाच द्वेष करतो. काश्मिरीही आमचा द्वेष करतात. भारताविरोधी कारवाया करतात, घोषणा देतात. यात आमचा राष्ट्रवाद कोठे राहतो?

हे खरे आहे कि घटनेत आता तरी काही बदलांची गरज आहे. समान नागरी कायदा ही आपले प्राथमिकता आहे. कलम ३७० तसेही आता कुचकामी ठरलेले आहे, ते सहमतीने रद्द करता येईल. त्यासाठे काश्मिरींना विश्वासात घ्यावे लागेल. सैन्याला दिलेले नागरिकांवरचे अमर्याद अधिकार तेथुन (आणि अन्य राज्यांतुनही) काढून घ्यावे लागतील. पण पुर्व अट ही आहे कि काश्मिरींच्या व अन्य पुर्वोत्तर राज्यांतील नागरिकांच्या जीवनाची हमी कोण देणार?

ती आम्हालाच द्यावी लागेल. राष्ट्रावर प्रेम म्हणजे राष्ट्राच्या नागरिकांवर प्रेम. द्वेषाच्या पायावर राष्ट्र एकसंघ कसे राहील? अशात निखळ लोकशाही कशी राहील? घटनेचे स्थान नेमके काय राहील? इहवाद कि धर्मवाद हा प्रश्न राष्ट्रवादाच्या संदर्भात आला तर संघर्ष अटळ आहे. राष्ट्राने लोकांच्या ऐहिक प्रश्नांतच लक्ष घालावे, जोवर कायद्याच्या कक्षा ओलांडल्या जात नाहीत तोवर धार्मिक व आध्यात्मिक प्रश्नांत लक्ष घालायचे मुळात काही कारणच नाही. कोणत्याही धर्माची अथवा संस्कृतीची बाजुही घ्यायचे कारण नाही. धर्म व संस्कृतीचे जतन-वर्धन करण्याचे काम नागरिकांचे अहे. सरकारचे नाही. तो सरकारचा उद्योगच नाही. लोकांचे ऐहिक कल्याण होईल, स्वातंत्र्य, समता व बंधुता टिकेल असे कायद्याचे कल्याणकारी राज्य राहील हे कटाक्षाने पाहणे हीच घटनेची सरकारकडुनही अपेक्षा आहे.

आणि नागरिकांचे कर्तव्य हे आहे कि कायद्याच्या चौकटीत राहून देशबांधवांप्रती ममता बाळगत स्वत:चे राष्ट्राला काही ना काही सकारात्मक योगदान राहील. स्वत:ची प्रगती करतील.

समजा असे झाले नाही तर आमचा राष्ट्रवाद अपरिपक्व आणि उथळ आणि म्हणुनच त्याज्ज्य असेल. घोषणांनी राष्ट्रप्रेम सिद्ध होत नाही. ते कृतीतून सिद्ध होते. कृती तर करायची नाही पण घोषणांचा उन्माद करायचा यातून आपण राष्ट्रद्रोहच करतो आहोत याचे भान एकविसाव्या शतकातील भारतियांना येत नसेल तर आपला राष्ट्रवाद केरात टाकायच्या लायकीचा आहे हे समजून चालावे.

बळजबरीचे राष्ट्रप्रेम आणता येत नाही. किंबहुना कोणताही राष्ट्रवाद राष्ट्रप्रेमाच्या अशा बळजबरीचा दहशतवाद नाकारतो. कारण घोषणा म्हणजे राष्ट्र नसते. राष्ट्र ही एक भावनिक व भौतिक बाब आहे. कशा पद्धतीने राष्ट्रप्रेम व्यक्त करायचे हे व्यक्ती ठरवेल, समुह, घटना अथवा कायदा नाही. ते प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. अमुकच म्हणा तरच राष्ट्रप्रेमी असा अट्टाहास करत याच देशातील अन्य नागरिकांना कोणी भयभीत करत असतील तर तेच राष्ट्रद्रोही आहेत असे मानून चालावे.

कारण राष्ट्राचे कल्याण कोणत्या घोषणांनी अथवा प्रतीकांनी होत नसते तर राष्ट्राचे कल्याण होते ते सर्जनात्मक कार्य करणा-या नागरिकांच्या एकत्रीत प्रयत्नांतून.

आम्ही असे प्रयत्न करु...करत राहु...कोणी करत नसेल तर त्यांनीही करावेत यासाठी अविरत प्रयत्न करु...सकारात्मक मदतही करु...

आणि हाच आमचा राष्ट्रवाद आहे. नांव काहीही द्या... पण हेच आमचे राष्ट्रप्रेम आहे आणि हीच आमची राष्ट्रभक्ती आहे....!

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...