Friday, April 1, 2016

आणि हाच आमचा राष्ट्रवाद आहे....

भारतात नेहमी राष्ट्रवादासंबंधात कसले ना कसले विवाद चालु असतात. पण यात सैद्धांतिक गांभिर्य मात्र सहसा नसते. राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती, राष्ट्रप्रेम व राष्ट्राबद्दलची नागरिकांची कर्तव्ये यातील मुलभूत फरक न समजावून घेतल्याने आपला राष्ट्रवाद हा म्हणजे उथळ घोषणंचा राष्ट्रवाद आहे. आमची मते ज्यांना मान्य नाहीत त्यांना सरळ देशद्रोही ठरवायचीही एक, कधी हिंसकतेकडे वळणारी टूम आहे. कधीकाळी "इस देशमें रहना होगा तो वंदेमातरम कहना होगा" अशा घोषणांचाही महापूर होता. अलीकडेच "भारत माता कि जय" वरुनही असेच वादळ उठले आहे. काय योग्य, काय अयोग्य हे समजावून घेण्यासाठी आपल्याला मुळात राष्ट्रवाद म्हणजे काय हे समजावून घेतले पाहिजे.

आज आपण ज्या अर्थाने राष्ट्र ही संकल्पना वापरतो ती अत्यंत नवीन आहे. राष्ट्राची सर्वमान्य एक अशी व्याख्या नाही. तरीही आपण आधी त्या व्याख्या पाहू आणि आपण भारतीय राष्ट्र म्हणतो म्हणजे आपल्याला काय अभिप्रेत असते तेही समजावून घेण्याचा प्रयत्न करुयात.

१. समान वंश, भाषा, संस्कृती, आणि इतिहास असणा-या लोकांचा समुदाय म्हणजे राष्ट्र होय. (या व्याख्येनुसार भौगोलिक सीमा असण्याचे बंधन नाही.)

२. जोसेफ स्ट्यलीनच्या व्याख्येनुसार (१९१३) "राष्ट्र म्हनजे वंश अथवा जमात नसून ऐतिहासिक दृष्ट्या संघटित लोकांचा समुदाय होय."

३. वर्ल्ड बुक शब्दकोशानुसार, अ) "समान देशात (भूभागात) राहणारे, एकाच शासनाखाली संघटित झालेले व साधारणतया समान भाषा बोलणा-या लोकांचे मिळुन राष्ट्र तयार होते." ब.)"सार्वभौम राज्य म्हनजे राष्ट्र होय. क) समान भाषा व पुर्वज असलेली जमात अथवा वंश म्हनजे राष्ट्र होय."

४. "विविध वंश, एक अथवा अनेक संस्कृती एकाच शासनाखाली संग्रहित होतात तेंव्हा त्यांचे राष्ट्र बनते." (Collins English Dictionery.)

५.  राजकीय इतिहासकार कार्ल ड्युशच्या मते, " राष्ट्र म्हणजे इतिहासाबाबतच्या गैरसमजातुन व शेजा-याच्या द्वेषातून एकत्र आलेले लोक म्हणजे राष्ट्र."

६. बेनेडिक्ट अंडरसन यांच्या मते राष्ट्र म्हणजे एक काल्पनिक राजकीय बंधयुक्त समुदाय.

७. राष्ट्र-राज्य म्हणजे जागतीक समुदायाकडुन मान्यताप्राप्त विशिष्ट भुभागावर अस्तित्वात आलेले सार्वभौम राजकीय अस्तित्व असलेले अस्तित्व ज्यात राष्ट्राचे सर्व किंवा काही वैशिष्ट्ये अंगभूत आहेत.

अशा रितीने राष्ट्राच्या अनेक व्याख्या करण्याचा प्रयत्न झाला आहे व या व्याख्यांत काळानुसार उत्क्रांतीही झालेली आहे असे आपल्या लक्षात येईल. अनेकदा राष्ट्र व राष्ट्र-राज्य हा शब्द समानार्थी घेतला जात असल्याने (मीही या लेखमालेत राष्ट्र हा शब्द राष्ट्र-राज्य या अर्थानेच वापरला आहे.) राष्ट्र या शब्दाच्या व्याख्याही तदनुषंगिक वेगवेगळ्या अर्थछ्टा सुचवत असतात हेही येथे लक्षात घ्यायला पाहिजे. सर्व व्याख्यांचा विचार करता आपण खालील निष्कर्ष काढु शकतो...

१. जेंव्हा आपण फक्त निखळपणे "राष्ट्र" हा शब्द वापरतो तेंव्हा विशिष्ट भौगोलिक, राजकीय बंधनातीत विशिष्ट वंशीय, भाषिक अथवा धार्मिक समुदायाचे मिळुन राष्ट्र होते असे म्हणु शकतो.  भारतातील स्वातंत्र्यपूर्व कालातील द्विराष्ट्रीय सिद्धांत हा भारतात हिंदू व मुस्लिम ही दोन राष्ट्रे आहेत या गृहितकावर आधारीत होता असे आपण पाहु शकतो. त्यात भाषा, वंश व संस्कृत्यांचा विचार केला गेलेला दिसत नाही, अन्यथा अनेकराष्ट्र सिद्धांत अस्तित्वात येणे सहज शक्य होते. युरोपात राष्ट्र व वंश, भाषा, संस्कृतीचा एकत्रीत विचार करता येणे सहज शक्य होते. परंतू तसे एकसंघ युरोपचे एकराष्ट्र बनले नाही. असे असले तरी आज युरोपियन युनियन अस्तित्वात आली आहे. एक पायरी ओलांडली आहे असे आपल्याला म्हणता येईल.  पाकिस्तान हे वांशिकदृष्ट्या (वांशिक सिद्धांत मान्य केला तर) एकसमान नसूनही पाकिस्तानला राष्ट्र-राज्य मान्यता आहे तशीच ती भारतालाही आहे. जगात अशी अनेक राष्ट्रे आहेत जेथे समान वंश-धर्म संकल्पना राबवता आलेली नाही.

२. राष्ट्र संकल्पनेत समान संस्कृतीचा वैशिष्ट्यपुर्ण आग्रह असतो. एकाच संस्कृतीच्या लोकांना एकमेकांबद्दल एक समान आत्मबंधाची भावना असते असे गृहितक या तत्वामागे आहे. परंतु इतिहास या तत्वाला मान्यता देत नाही. रोमन संस्कृती ही ग्रीक संस्कृतीचीच पडछाया होती असे म्हणने वावगे ठरणार नाही, तरीही इटली व ग्रीस हे ऐतिहासिक काळापासून सर्वस्वी पृथक राजकीय अस्तित्वे म्हणुनच राहिलेली आहेत. दुसरे असे कि कोणतीही सर्वस्वी स्वतंत्र संस्कृती पुराऐतिहासिक काळापासून अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. जरी प्रादेशिक म्हणुन काही वैशिष्ट्ये जागतिक संस्कृत्यांनी जपली असली तरी त्यावर कोणत्या ना कोणत्या बाह्य संस्कृतीचा प्रभाव पदलेला आहे. कधी कधे तो एवढा पडलेला आहे कि मुळच्या संस्कृत्या त्या प्रभावात वाहून गेलेल्या आहेत. भारतापुरते पहायचे तर सिंधू संस्कृती, वैदिक संस्कृती, बौद्ध संस्कृती, आदिवासी संस्कृत्या, द्रविड संस्कृती म्हणुन ज्याही संस्कृत्या येथे जन्मल्या त्या प्रवाही राहिल्याने कालौघात एवढ्या बदललेल्या आहेत कि मूळ संस्कृत्यांचे अवशेष शोधावे लागतात. एक-संस्कृतीचा देश म्हणजे भारत हा आपण जोपासलेला भ्रम आहे, वास्तव नाही. जपानचेच उदाहरण घेतले तर जपानी संस्कृतीवर चीनी संस्कृतीचा अमिट प्रभाव आहे. चीनवर बौद्ध संस्कृतीचा प्रभाव आहे. ग्रीक संस्कृतीचा प्रभाव आजही युरोपियन राष्ट्रांच्या संस्कृतीवर (व म्हणुन जागतीक संस्कृतीवर)  आहे. थोडक्यात संस्कृत्या या परिवर्तनीय असतात व त्या सर्वस्वी स्वतंत्र अशा कधीच नसतात. त्यामुळे "समान संस्कृती" हे तत्व राष्ट्र या संकल्पनेला पुरेसे लागू पडत नाही.

३. एक धर्म हे तत्व राष्ट्र (व म्हणुन राष्ट्र-राज्य) संकल्पनेचा पाया ठरु शकतो काय यावरही विचार करायला हवा. जगात सर्वात आधी गौतम बुद्धाने सर्व जगभर आपला धम्म पसरवण्याची आकांक्षा बाळगली. अर्थात त्यात राजकीय भाग नव्हता. ख्रिस्ती धर्माने तशी स्वप्ने पाहिली व काही प्रमाणात यशस्वीही केली असे वरकरणी दिसते, पण सर्व ख्रिस्त्यांचे एकच एक राष्ट्र निर्माण झाले असे इतिहासातही दिसत नाही. मुस्लिमांनी त्यावर कडी केली. तुर्कस्थानच्या खलिफाला आपला सार्वभौम सम्राट मानत जगभरच्या वेगवेगळ्या प्रदेशांत मुस्लिम सत्ता प्रस्थापित झाल्या. भारतातही मोगल सम्राट ते पार टिपू सुलतानापर्यंत खलिफाकडुन वस्त्रे घेण्याची प्रथा होती...म्हनजेच एकार्थाने ते खलिफातर्फे राज्य करत असत. आधुनिक काळात मौलाना जमालुद्दिन अफगानी यांनी तर विश्व-इस्लामवादाची संरचना केली. शिया-सुन्नी विभागणीमुळे इस्लामी राष्ट्र-राज्यांतही कसा संघर्ष पेटत असतो हे आपण आताही पाहत आहोत. म्हणजेच इस्लामलाही इस्लामच्या झेंड्याखाली सर्व मुस्लिमांचे एकच एक राष्ट्र निर्माण करता आलेले नाही. त्यामुळे धर्म हा राष्ट्रवादाचा पाया बनू शकत नाही.

धर्म हे एकमेव राष्ट्र-राज्याचे कारण असू शकत नाही हे आपण प्रत्यक्ष उदाहरनांवरुन पाहु शकतो. आज युरोपियन युनियन ही ढोबळपणे ख्रिस्ती राष्ट्रांची मिळुन बनलेली दिसते. परंतु त्यांच्यातील आंतरकलह हे "एक धर्म" या तत्वाने मिटत नाहीत हेही आपल्याला दिसते. म्हणजे एकधर्मतत्व हे कोणत्याही सध्याच्या सार्वभौम राष्ट्राच्या अस्तित्वासाठीचे एकमेव प्रेरक कारण आहे असे दिसत नाही अन्यथा सध्याच्या एकुणातील राष्ट्रांची संख्या ब-यापैकी घटल्याचे चित्र आपल्याला दिसले असते.

४. समान इतिहास हेही एक महत्वाचे तत्व राष्ट्र संकल्पनेत येते. कार्ल मार्क्सच्या मते राष्ट्र ही संकल्पना खोट्या वा भ्रामक इतिहासाच्या जीवावर बेतलेली असते. समान इतिहास अस्तित्वात नसतो असा मतितार्थ काढायचा नाही. परंतू समान इतिहास हा अत्यंत व्यापक परिप्रेक्षात जातो तेंव्हा तो एकार्थाने जागतीक इतिहास बनतो हे आपण लक्षात घ्यायला हवे. बव्हंशी इतिहासाकडे आपण "आमचे व परके यांच्यातील संघर्ष" या दृष्टीकोनातुन पहात जो इतिहास आम्हाला हवासा असतो तो आमचा इतिहास हा समान इतिहास असतो. पण आमचा म्हणजे नेमक्या कोणाचा? जित-विजित घटनांत सामाविष्ट समाजांनी अनेकदा बाजु बदललेल्या असतात. भारतासारख्या खंडप्राय देशात तर असे घडणे स्वाभाविक असते. भारतात हिंदू व मुस्लिमांनी एकार्थाने समान इतिहास उपभोगला आहे. म्हणुन पाकिस्तानची निर्मिती थांबत नाही कारण इतिहासाकडे आमचा व तुमचा ही सरळ विभागणी आहे व दोन्ही बाजु इतिहासाचा अन्वयार्थ आपापल्या हिताचाच काढनार हे उघड आहे. हेच आपण जागतीक पातळीवर पुरातन काळापासून झालेले पाहू शकतो. आपापल्या इतिहासाला सापेक्ष स्वरूप देवून त्याला गौरवशाली, प्रेरक बनवत राष्ट्रभावना वाढवण्यासाठी सर्रास उपयोग केला जातो हे एक वास्तव आहे. त्यामुळेच लोर्ड अक्टन (Lord Acton) म्हणतो कि "राष्ट्राचा सिद्धांत म्हणजे इतिहासाची पीछेहाट आहे." आणि ते खरेच आहे.

इतिहासाचे असे प्रांतनिहाय, देशनिहाय तुकडे पडु शकत नाहीत. नि:पक्षपातीपणे लिहायला गेलो तर सध्याच्या प्रत्येक राष्ट्राचा इतिहास हा जागतीक इतिहास आहे हे लक्षात येईल. तोच खरा समान इतिहास होय. समान इतिहासाच्या तत्वावर राष्ट्र ही संकल्पना उभी रहात नाही याला जगातील अनेक राष्ट्रे साक्षी आहेत.

या व अशा अनेक कारणांमुळे राष्ट्र म्हणजे भाषिक, वांशिक, राजकीय अथवा प्राणिज एकता नसून ती भावनात्मक एकता असते असे जर्मन तत्वज्ञ ओस्वल्ड स्पेंग्लर म्हणतो ते मान्य करावे लागते. एवढेच नव्हे तर बेनेडिक्ट अंडरसन म्हणतो कि राष्ट्र म्हणजे अन्य काही नसून ती एक काल्पनिक भावना आहे. ही भावना नैसर्गिक नसून ती जोपासावी लागते. अनेकदा ती भडकवलीही जाते. राष्ट्रवादाचा अतिरेक आपण फ्यसिस्ट इटली आणि नाझी जर्मनीच्या रुपात पाहिला आहे. वंशवाद, सांस्कृतीकता, भाषा, सीमा ई.च्या आधारावर भावना भडकावणे सोपे असते. त्यामुळे लोक एकत्र येतात व समानतेची भावना जागी करतात हे आपण वारंवार पहात असतो. अनुभवत असतो. एक अर्थव्यवस्था, एक राजकीय सत्ता, समान कायदे व प्रत्यक्ष व काल्पनिक राष्ट्रीय सीमा या भौतिक पातळीवर राष्ट्राचे भावनात्मक अस्तित्व ठरवत असतात. याच भावनांवर राष्ट्रांतर्गतच्याही प्रांतीय अस्मिता जोपासल्या जात असतात. त्यामुळेच तत्वार्थाने कोणतेही सार्वभौम राष्ट्र हे अनेक राष्ट्रांचा समूह असते. भारतासारखा देश हा असंख्य जातींनी बनलेल्या राष्ट्रांचा समुह आहे असेही म्हटले जाते ते यामुळेच.

राष्ट्र म्हणजे विशिष्ट कायदा, विशिष्ट शासनपद्धती, प्रशासनपद्धती, अर्थव्यवस्था (तीही बदलती) असलेला आणि संरक्षणव्यवस्थेने संरक्षित केलेला एक भौगोलिक तुकडा एवढेच राष्ट्र या संकल्पनेचे प्रत्यक्ष वास्तव स्थान राहते. बाकी इतर सा-या कृत्रीमरित्या जोपासल्या गेलेल्या, जोपासायला भाग पाडल्या गेलेल्या भावना होत.

राष्ट्रांच्या विविध व्याख्यांच्या आधाराने विवेचन केल्यानंतर आपण भारतीय राष्ट्रवादाकडे येवू. भारत एकधर्म, एकवंश, एकच एक संस्कृती, एकच एक भाषा असलेले राष्ट्र नाही. भावनिक राष्ट्रवाद कितीही जोपासायचा प्रयत्न केला तरी तो कसा ठिसुळ आहे हे काही उदाहरणांवरुन लक्षात येईल.

पुर्वोत्तर राज्ये आमच्या राष्ट्रीय नेत्रपटलासमोर (नकाशा वगळता) किती असतात हा प्रश्न आहे. वंश वेगळा असल्याने देशात अन्यत्र शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना विदेशी समजून पासपोर्ट मागितला जाणे तर सर्रास आहे. मणीपुरचे एक माजी मंत्री मला दिल्लीत २००२ साली भेटले होते. ते चर्चेत म्हणाले होते, लाख हम भारत को अपना माने, भारतीय हमें अपना नहीं मानते. राष्ट्र ही एक भावना असेल तर आम्ही पुर्वोत्तर राज्यांतील लोकांच्या कितीदा भावना दुखावल्या आहेत याची आपल्याला जाण असायला हवी. तीच गोष्ट लेह-लडाखची. १९९८ साली पहिल्याने लेहला गेलो. तत्पुर्वी पुण्यातील; एका सभ्य चार्टर्ड अकाउंटंटने मला, लेहला जायचे तर व्हिसा काढून घ्या असा दीव्य सल्ला दिला होता. म्हणजे लेह भारतात आहे हेच कारगिल होण्यापुर्वी कितींना माहिती होते? दुसरी बाब पर्यटकांची. लेहला साधारणपणे दीडेक लाख पर्यटक दरवर्षी येतात, त्यात भारतीयांचा वाटा जेमयेम २०% असतो, बाकी सारे विदेशी पर्यटक असतात. पुर्वोत्तर राज्यांची गत वेगळी नाही. तिकडेही देशी पर्यटक कमीच फिरकतात. 

म्हणजे आमची भावनिक नाळ लोकांशी हवी कि नकाशातील भुभागाशी? राष्ट्र म्हणजे भुभाग नसतो तर त्या-त्या राष्ट्राच्या सीमांतर्गत राहणा-या नागरिकांमुळेच राष्ट्र बनते. भावनिक ओलावा हा या नागरिकांत असला तर राष्ट्र बनते, प्रबळ व प्रगल्भ बनते. घोषणबाजी करून राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती दाखवायचा प्रयत्न हा खुळचटपणा असतो. घोषणांनी कोणाचे पोट भरत नाही. न दिल्याने काहीएक अनर्थ घडत नाही.

याचा अर्थ असा नव्हे कि राष्ट्रप्रेम नको. हो. पण राष्ट्रात राहणा-या लोकांवरती प्रेम नसेल, कोणत्या तरी गटाचा/पंथाचा/धर्माचा/विचारसरणी
चा द्वेष करत राहिलो तर मग राष्ट्रवाद कोठे राहिला? राष्ट्रभक्तीला काय अर्थ राहिला?

खरे तर ज्या राष्ट्रातील जेही नागरिक राष्ट्राच्या आर्थिक, सांस्कृतिक, बौद्धिक बाबींत भर घालतात ते राष्ट्रप्रेमी असतात. जे तोडफोड, हिंसा, जाळपोळ करतात व देशाची हानी करतात तेच आणि तेच राष्ट्रद्रोही असतात. कारण ते राष्ट्रातील नागरिकांचे अहित करत असतात. त्यांच्यात भय निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. याला आपण उन्मादी राष्टद्रोही राष्ट्रवाद म्हणू शकतो. त्यात कोणाचेही हित नाही.

"आम्ही लोक ही घटना स्वता:प्रत अर्पण करत आहोत" हे घटनेच्या प्रास्तविकातील विधान आहे. ही घटना कोनत्या देवाला, अल्लाला, आकाशातील बापाला, मातृभू अथवा पितृभुला अर्पण केलेली नाही. ती लोकांनी लोकांनाच अर्पण केलेली आहे. देश म्हणजे देशातील माणसे. त्यांचे इहवादी निरंतर कल्याण करण्यासाठी, स्वातंत्र्य, समता व बंधुता देण्यासाठी घटना आहे. राष्ट्रातील माणसांचे परस्परसंबंध कसे असतील याचे घटना दिग्दर्शन करते व कायद्यांमार्फत नियमन करते. काळानुसार त्यात बदल घटनेलाच अभिप्रेतच आहेत. अपरिवर्तनीय असायला तो कोणता धर्मग्रंथ नाही. विवेक घटनेची भावी दिशा ठरवतो...धर्म नाही. देशातल्या नागरिकंनी स्वत:लाच अर्पण केली ही जगातील अभूतपुर्व घटना आहे आणि तिचा आम्हाला सार्थ अभिमान असला पाहिजे.

ही घटना कोणा एका व्यक्तीने तयार केलेली नाही, जवळपास चारशे सदस्य व अठरा प्रमूख समित्यांनी वादळी चर्च्घा करत भारतीय राष्ट्राचे स्वरुप कसे असेल यावर वादळी चर्चा करत घटनेचे अंतिम प्रारुप स्वीकृत केले. कोणाचे योगदान अधिक व कोणाचे कमी या वादात पडायचे काहीएक कारण नाही. या सर्वांचेच घटना बनवण्यात योगदान आहे. आपले राष्ट्र कसे असेल, कोणत्या दिशेने जाईल व कोणती तत्वधारा घटनेचा (म्हणजेच राष्ट्राचा) प्राण असेल हे घटनेत निहित आहे. त्य अर्थाने भारतीय राष्ट्रवाद हा घटनात्मक राष्ट्रवाद आहे. घटना इहवादी आहे. घटनेने आपल्या नागरिकांना धर्म, संस्कृती, प्रथा-परंपरा पाळायचे स्वातंत्र्य दिले आहे, पण ते कायद्याच्या चौकटीत. स्वत: घटना (म्हणजेच सरकार) कोणत्याही धर्म-पंथाचे प्रतिनिधित्व करू शकत नाही. ते घटनेला अभिप्रेत नाही.

सांस्कुतिक, धर्मवादी, वंशिक व कम्युनिस्ट राष्ट्रवाद जगाला कधीच परवडलेला नाही. थर्ड राईश अन्यथा कोसळले नसते. सोव्हिएट रशियाचे विघटन घडले नसते. नागरिकांना सांस्कृतिक अथवा कोणत्या विचारधारेची गुलाम बनवू इच्छिणारा कोणताही राष्ट्रवाद टिकत नाही कारण तो माणसाच्या स्वतंत्र प्रेरणांच्या विरोधात आहे. त्यातून राष्ट्राचा विकास होत नसून अध:पतनच होते. याला जगाचा इतिहास साक्षी आहे.

घटना एखाद्या धर्मग्रंथासारखी अपरिवर्तनीय नाही. काळाप्रमाने अनेक संदर्भ बदलतात. त्यानुसार घटना बदलू शकते. घटना बदलवण्यात नेहमीच विवेक असेल असेही नाही. विवेकानेच समजा देशाची साथ सोडली तर घटनाही मान टाकणार हे उघड आहे. भारत अविवेकी झालेली उदाहरणे नवीन नाहित. शाहबानो केसमध्ये तेच अविवेकाचे दर्शन घडले. तत्पुर्वीची आणिबाणी अविवेकाचेच लक्षण होती. आता चालु असलेला अविवेक वरताण आहे. न्यायसंस्थाही त्यांची अधिकारकक्षा अनेकदा ओलांडतांना आपल्याला दिसतात हे कन्हय्याच्या जामीणावर निर्णय देतांना न्यायालयाने जी संदर्भहीण शेरेबाजी केली त्यावरुन व अनेक जनहितार्थ याचिकांवरील शेरेबाजींवरुन दिसून येते. प्रत्येक खांब आपल्या कक्षा कोठेतरी सोडत आहे. सर्व लोकांची लोकशाही काही लोकांचे लोकशाही बनू पाहत आहे. माध्यमेही आपल्या भुमिका संधीसाधू बनवत आहेत.

यातून राष्ट्रवादाचे स्थान काय राहिल? राष्ट्रवादही अविवेकी आणि म्हणून अंततोगत्वा हिंसक होणार नाही काय? एक झुंड राष्ट्रवादी आहे आणि दुसरी नाही हे ठरवायचे नेमके मापदंड काय आहेत? एखाद्या गटाला समजा भारत हे आपले राष्ट्र वाटत नाही तर ते तसे वाटावे अशी नेमकी कोनती परिस्थिती आहे याचा तारतम्याने विचार करावा लागतो. काही राज्यांना भारत हे आपले राष्ट्र वाटत नाही कारण आहे कि आम्ही पुरेसा भावनिक जिव्हाळा तेथील लोकांप्रती निर्माण केला नाही. दुसरी कारणे आर्थिकही आहेत. मी उल्लेखिलेल्या राज्यांत पुरेसा रोजगार उपलब्ध नाही. काश्मिरमद्ध्ये मी १९९८ ते २००२ पर्यंत उद्योग उभारायचा अथक प्रयत्न केला. तो अयशस्वी झाला तो राजकारण्यांमुळे. काश्मिर ओस पडलेले आहे. शिकारे दल लेकमद्ध्ये रिकामटेकडे हेलकावत आहेत. हस्तोद्योग घसरला आहे. रिकामे हात बंदुकी धरत असतील, अफजल गुरुला हिरो मानत असतील तर ही मानसिकता आली कोठून या प्रश्नाच्या मुळापर्यंत आम्ही कधी जाणार? काश्मिरमद्ध्ये सैन्यदलांवर आम्ही दरवर्षी जेवढा खर्च करतो त्याच्या दहा टक्के जरी आम्ही तेथे उद्योगौभारणीवर खर्च् केले, मुबलक रोजगार उपलब्धतेची शाश्वती दिली तर मला खात्री आहे कश्मिरी तरुण बंदुका फेकतील आणि सुस्थिर जीवन जगायचा प्रयत्न करतील.

पण आम्ही "काश्मिर आमचा आहे" असे म्हणतो पण काश्मिरींचाच द्वेष करतो. काश्मिरीही आमचा द्वेष करतात. भारताविरोधी कारवाया करतात, घोषणा देतात. यात आमचा राष्ट्रवाद कोठे राहतो?

हे खरे आहे कि घटनेत आता तरी काही बदलांची गरज आहे. समान नागरी कायदा ही आपले प्राथमिकता आहे. कलम ३७० तसेही आता कुचकामी ठरलेले आहे, ते सहमतीने रद्द करता येईल. त्यासाठे काश्मिरींना विश्वासात घ्यावे लागेल. सैन्याला दिलेले नागरिकांवरचे अमर्याद अधिकार तेथुन (आणि अन्य राज्यांतुनही) काढून घ्यावे लागतील. पण पुर्व अट ही आहे कि काश्मिरींच्या व अन्य पुर्वोत्तर राज्यांतील नागरिकांच्या जीवनाची हमी कोण देणार?

ती आम्हालाच द्यावी लागेल. राष्ट्रावर प्रेम म्हणजे राष्ट्राच्या नागरिकांवर प्रेम. द्वेषाच्या पायावर राष्ट्र एकसंघ कसे राहील? अशात निखळ लोकशाही कशी राहील? घटनेचे स्थान नेमके काय राहील? इहवाद कि धर्मवाद हा प्रश्न राष्ट्रवादाच्या संदर्भात आला तर संघर्ष अटळ आहे. राष्ट्राने लोकांच्या ऐहिक प्रश्नांतच लक्ष घालावे, जोवर कायद्याच्या कक्षा ओलांडल्या जात नाहीत तोवर धार्मिक व आध्यात्मिक प्रश्नांत लक्ष घालायचे मुळात काही कारणच नाही. कोणत्याही धर्माची अथवा संस्कृतीची बाजुही घ्यायचे कारण नाही. धर्म व संस्कृतीचे जतन-वर्धन करण्याचे काम नागरिकांचे अहे. सरकारचे नाही. तो सरकारचा उद्योगच नाही. लोकांचे ऐहिक कल्याण होईल, स्वातंत्र्य, समता व बंधुता टिकेल असे कायद्याचे कल्याणकारी राज्य राहील हे कटाक्षाने पाहणे हीच घटनेची सरकारकडुनही अपेक्षा आहे.

आणि नागरिकांचे कर्तव्य हे आहे कि कायद्याच्या चौकटीत राहून देशबांधवांप्रती ममता बाळगत स्वत:चे राष्ट्राला काही ना काही सकारात्मक योगदान राहील. स्वत:ची प्रगती करतील.

समजा असे झाले नाही तर आमचा राष्ट्रवाद अपरिपक्व आणि उथळ आणि म्हणुनच त्याज्ज्य असेल. घोषणांनी राष्ट्रप्रेम सिद्ध होत नाही. ते कृतीतून सिद्ध होते. कृती तर करायची नाही पण घोषणांचा उन्माद करायचा यातून आपण राष्ट्रद्रोहच करतो आहोत याचे भान एकविसाव्या शतकातील भारतियांना येत नसेल तर आपला राष्ट्रवाद केरात टाकायच्या लायकीचा आहे हे समजून चालावे.

बळजबरीचे राष्ट्रप्रेम आणता येत नाही. किंबहुना कोणताही राष्ट्रवाद राष्ट्रप्रेमाच्या अशा बळजबरीचा दहशतवाद नाकारतो. कारण घोषणा म्हणजे राष्ट्र नसते. राष्ट्र ही एक भावनिक व भौतिक बाब आहे. कशा पद्धतीने राष्ट्रप्रेम व्यक्त करायचे हे व्यक्ती ठरवेल, समुह, घटना अथवा कायदा नाही. ते प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. अमुकच म्हणा तरच राष्ट्रप्रेमी असा अट्टाहास करत याच देशातील अन्य नागरिकांना कोणी भयभीत करत असतील तर तेच राष्ट्रद्रोही आहेत असे मानून चालावे.

कारण राष्ट्राचे कल्याण कोणत्या घोषणांनी अथवा प्रतीकांनी होत नसते तर राष्ट्राचे कल्याण होते ते सर्जनात्मक कार्य करणा-या नागरिकांच्या एकत्रीत प्रयत्नांतून.

आम्ही असे प्रयत्न करु...करत राहु...कोणी करत नसेल तर त्यांनीही करावेत यासाठी अविरत प्रयत्न करु...सकारात्मक मदतही करु...

आणि हाच आमचा राष्ट्रवाद आहे. नांव काहीही द्या... पण हेच आमचे राष्ट्रप्रेम आहे आणि हीच आमची राष्ट्रभक्ती आहे....!

6 comments:

  1. तुमचं सगळं बरोबर आहे हो सर!
    पण आम्ही "भारत माता कि जय" असं म्हणणार नाही,हे सतत ओरडून सांगण्यात काय हाशिल आहे??
    म्हणणार नाही आहात तर गप्प बसा ना! फतवे कशाला काढताय?

    ReplyDelete
  2. जबरदस्त लेख सर !!

    ReplyDelete
  3. लेख अतिशय उत्तम विचारप्रवर्तक उत्कृष्ट wisdom चा अविष्कारच आहे. परंतू संजयसर यांत दोन्ही बाजूंच्या कटटर लोकांचा उन्माद हा विवेकशक्ती घालवून बसणारा आहे. त्यासाठी प्राथमिक शिक्षणापासूनच CiViC Sense हा विषय निर्माण करुन तसेच सकाळच्या साडेसातच्या शाळांत सुरुवातीच्या तास हा भले एखादा विषय कमी शिकवावा पण शाळेची सुरुवात योग, प्राणायाम आनापान व इतर श्वसनाचे प्रकार यातून जाणीवेची जोपासना त्यातून उत्तम नागरीकत्वाची शिकवण तसेच सार्वजनिक ठिकाणी कसे वागणे, बोलणे, धर्म जात विषयक तटस्थपणा इतिहासाचे तटस्थ अवलोकन संशोधन वैज्ञानिक विचारसरणी स्त्री/वृध्द लहान मुले यांचेसमोर कसे वागणे बोलणे,त्यांची सुरक्षा, कायद्याचे थोडे फार ज्ञान, कारण बऱ्याच गुन्हयांमध्ये आरोपीना मग तो संघटीत असो वा सिंगल गुन्हयांच्या शिक्षेविषयी माहितीच नसते, किंवा कारवाईबाबत भविष्यावर होणारा परिणामाबाबत अनभिज्ञ असणे, आरोग्य, बलसंवर्धन, गट चर्चा, प्रेजेंटेशन, (माझ्या शाळेत मी कधीही अनुभवल्या नाहीत इतरांचे माहित नाही.) व्यावहारीक जीवनातील कौशल्ये बँका इतर संस्था याविषयी मार्गदर्शन, राग हटट, अग्रेसिव्हनेस यांचे सकारात्मक उर्जेत रुपांतर करणेबाबत मार्गदर्शन, यापेक्षाही बऱ्याच विषयांचा अंतर्भाव वयपरत्वे इयत्ता परत्वे वाढवता येईल. ज्यामुळे बालपणापासून कटटर जाती धर्मविषयक विचार आपल्या मुलांत रुजविणाऱ्या पालकांना यामुळे फार मोठा शह बसेल. वास्तविक या बहुसंख्य व अल्पसंख्य कटटरवाद्यामध्ये त्यांचे मागच्या पिढया त्यांचे पालक हे या सगळया संकुचिततेचे वाहकच मी मानतो. त्यामुळे प्रबोधनाची सुरुवात ही बाल वयातच सुरु झाली तर बरीच व्यसने, वय परत्वे होणारे मानसिक रोग किंवा शारिरीक आजार जसे ब्लडप्रेशर, वजन वाढणे, निराशा, कामात निरुत्साह, स्वत:चे घर कुटुंब पैसा वगळता सार्व.जीवनात बेफिकीर वागण्याची प्रवृत्ती, राष्ट्र धारणेबाबत अनभिज्ञता, व इतरही बरेच ही सर्व प्रवृत्ती अल्पसंख्य, बहुसंख्य यांतील फार मोठया गटांमध्ये दिसते. त्यामुळे योग्‍य मार्गदर्शन अभावी त्यांचे संजय सरांनी उल्लेख केलेले पोकळ घोषणावादी प्रचारक निर्माण होऊन फसव्या,संधीसाधु राजकीय प्रवृत्तींना बळी पडून घटनात्मक /सामाजिक जबाबदारीचे उत्तरदायित्वाचे नवीन पिढी घडवतांना अडसर निर्माण होत भारताच्या ऐक्याला फार मोठा धोका आहे. अर्थात यामागे राजकीय अनास्था, कश्मिर प्रश्नाबाबत प्रत्यक्ष विकासापेक्षा विशेष दर्जाचे राजकारण व भारत पाक या देशातल्या दोन्ही राजकीय फायदेशीर असणारी धोरणे हीच जबाबदार आहेत. वास्तविक काश्मिर प्रश्नाचे राजकारणच फार झाले आहे. त्याचे परिणाम भारताला भोगावे लागत आहेत. पाकिस्तानचे झेंडे, त्या देशाचे कौतुक आदर, भारताविषयी निराशेची व तक्रारीची भावना तेथील विद्यार्थ्यामध्ये /जनतेमध्ये पध्दतशीर रुजविण्याचे व राजकीय फायदा घेण्याचे भारत व पाकिस्तानच्या राजकीय धुरिणांचे प्रयत्न फार जुनेच आहेत. म्हणून नवीन पिढीमध्येच नवा भारत, सक्षम विकसित भारत निर्माण करण्याचे सामर्थ्य आता आहे. त्यासाठी त्यांची मनोधारणा प्रथम बळकट करणे, त्यांच्या जाणीवांना स्थान देणे, त्यांचे प्रशिक्षण, त्यांचे मनोव्यापार, त्यांची आकलन, व्यक्त होण्याचे मार्ग यांवर विवेक, समत्वाने वैज्ञानिक पध्दतीने विचार करण्याची वृत्ती, त्यांची पर्यावरणाचे जतन करण्याची उच्च दर्जाची समज त्याबाबतचे सक्रिय आग्रह, गतिशीलता एकूण माणुसकीच्या मूल्यांबाबतच्या जाणीवा विकास होण्यास मदत होईल. मग असा उथळ राष्टवाद निर्माणाला तेथेच प्रत्युत्तर / फोल ठरविण्यात अडचण होणार नाही. अभय वांद्रे,मुंबई.

    ReplyDelete
  4. कधी कधी काहीही लिहिता तुम्ही....वाईट वाटतं ..घटनेचे शिल्पकार बाबासाहेबांबद्दल एवढा द्वेष बरा नाही

    ReplyDelete
    Replies
    1. मिलिंदजी, तुम्हाला या लेखात बाबासाहेबांबाबत "द्वेष" कसा आणि कोठे दिसला हे मला माहित नाही. मला वाटते तुम्ही तुमची दृष्टी स्वच्छ करुन घ्यावी.....!

      Delete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...