Wednesday, October 26, 2016

कथा बळीराजाची!

बळीराजावर एकही महाकाव्य नाही. बळीचे पुराणही नाही. नाटक-खंडकाव्येही नाहीत. बळी नेमका कधी व कोठे झाला याचीही स्मृती हरपली आहे. ज्या आहेत त्या लोककथा, लोकगीते व महाभारत-पुराणांतुन येणा-या भ्रष्ट वैदिकीकरण झालेल्या कथा. बळीच्या मस्तकावर पाय ठेवून त्याला पातालात पाठवणा-या (अथवा गाडणा-या) वामनाच्या नांवे मात्र संपुर्ण पुराण आहे, पण या देशात तो काही केल्या वंदनीय झाला नाही. मात्र बळीएवढी अपार लोकप्रियता भारतीय जनमानसात कोणाचीही नाही हेही वास्तव आहे. एवढी कि दिवाळीचा नुसता एक दिवस त्याला दिला आहे असे नव्हे तर नववर्षारंभच बळीच्याच नांवाने होतो. सात चिरंजीवांपैकी त्याला एक मानले जाते. हा एक चमत्कार आहे. असूर संस्कृतीचे अवशेष बळीच्या स्मृतीने कालजेयी ठेवले आहेत.  किंबहुना बळीराजा हा भारतीय संस्कृतीचे प्रतीकस्वरूप बनून बसला आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.

असे असले तरी वैदिक कलमे झालेल्या कथांमुळे बळीचे चरित्र आपल्यासमोर विपर्यस्त स्वरूपात समोर येते. असे का झाले याचा अंदाज कोणीही बांधू शकतो. पण त्यात जाण्यावपेक्षा आपण बळीला पाताळात पाहणा-या वामनावताराचाच आधी धांडोळा घेऊयात!

वामन हा विष्णुचा अवतार मानला जातो. किंबहुना सारेच अवतार या ना त्या कारणासाठी विष्णुने घेतले असे सर्व पुराणे उच्च रवात सांगत असली तरी ते वास्तव नाही. मुळात विष्णुचा संप्रदाय जन्माला यायच्या आधीही वैदिकांत अवतार कल्पना होती. मुळात विष्णुचा संप्रदाय जन्माला यायच्या आधीही वैदिकांत अवतार कल्पना होती. पण अवतार घ्यायचे कार्य विष्णुकडे नव्हे तर प्रजापती या देवतेकडे होते. पहिल्या मत्स्य, कुर्म व वराह या तीन अवतारांचे स्पष्ट सूचन शतपथ ब्राह्मण (२.९.१.१) तैत्तिरिय आरण्यक व तैत्तिरिय ब्राह्मणात आहे. हे तिन्ही अवतार प्रजापतीचे. पण ते नंतर विष्णुच्या नांवावर खपवण्यात आले.
अवतार घेण्याचे कार्य पुढे उत्तरकालात (तिस-या-चवथ्या शतकानंतर, गुप्तकाळात) पुरांणांनी वैष्णव पंथ वर आला तेंव्हा विष्णुकडे सोपवले. अवतारांचेच पहाल तर महाभारतातील नारायणीय उपाख्यानात फक्त सहा अवतारांचा निर्देश आहे. पुढे ती दहा, नंतर बुद्ध आणि हंस अवतार धरुन बारा तर भागवत पुराणात हीच संख्या २४ एवढी आहे. पुढच्या पुराणांत मात्र दहा ही संख्या नक्क्की केली गेली. का, याचे उत्तर नाही. बरेचसे अवतार काल्पनिकही आहेत. इसपुचा पहिल्या शतकापर्यंत कृष्ण हा पांचरात्र (नारायणीय)या  आगमिक संप्रदायातील एक मुख्य व्यूह (दैवत नव्हे) होता. त्याचे अपहरण तिस-या चवथ्या शतकाच्या आसपास झाले. वासूदेव आणि कृष्ण एक नव्हेत. देवकीपुत्र कृष्ण हा महाभारतपुर्ब साहित्यात ज्ञानी यती मानला गेला आहे व त्याच्या आईचे नांव (देवकी) असले तरी त्याच्या पित्याचे नांव उल्लेखलेले नाही. रामाचे म्हणाल तर अवतार या स्वरुपात रामोपासनेचा प्रचार बाराव्या शतकानंतर झालेला आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नारायण व विष्णू या देवताही वेगळ्या आहेत, एक नव्हेत. (महाभारतातील नारायणीय उपाख्यान पहा).

वामन अवताराची कल्पना एकाएकी विकसीत झालेली नाही हेही येथे लक्षात ठेवले पाहिजे. किंबहुना या कथेचा विकास तीन टप्प्यांत झालेला आहे. ते कसे हे पाहुयात.

ऋग्वेदात विष्णु तीन पावलांत त्रिभुवन व्यापतो (ऋ. १.२२.१७) असे म्हटले आहे. तेथे विष्णु हा सुर्याचे रुपक म्हणून येतो. सकाळ-दुपार-सायंकाळ ही त्याची रुपकात्मक तीन पावले. या तीन पावलांत तो विश्व आक्रमतो ही मुलची वैदिक निसर्ग-रुपकाची संकल्पना. येथे बळीचा काहीही संबंध नाही.

ऋग्वेदानंतर ज्या साहित्याचा नंबर लागतो त्या शतपथ ब्राह्मणात वामनावताराची येणारी कथा तर वेगळीच आहे. तिचाही बळीशी काडीइतकाही संबंध नाही. शतपथ ब्राह्मण एक पुराकथा सांगते. ते असे कि देवासूर युद्धात देवांचा पराभव झाला. घाबरलेले सारे देव पळून गेले. मग देवांना हाकलल्यावर रिक्त झालेली पृथ्वी वाटुन घ्यायला समस्त असूर बसले. या वाटपात देवांना जागाच मिळेना त्यामुळे असहाय झालेले देव पुन्हा असुरांकडे गेले आणि पृथ्वीचा किमान छोटा तरी हिस्सा आम्हास मिळावा अशी विनवणी केली. तेंव्हा असुरांनी एका बटु वामनाच्या तीन पावलांएवढी भुमी देवांना द्यायची तयारी दर्शवली. तो बटू वामन खरे तर विष्णु होता. मग वामनरुपधारी विष्णुने विशाल होत तीन पावलात त्रिभुवन व्यापले व असुरांनाच भुमीपासून वंचित केले. (शतपथ ब्राह्मण १.२.२.१-५).

या कथेत समस्त असूर आहेत. विष्णु आहे व त्याची तीन पावलेही आहेत. नाहीय तो बळीराजा!

पुढे हीच कथा अजून विकसीत करत मुळच्या कथेचा आधार घेऊन वामन आणि त्याला बळीराजाचे तीन पाऊल दान ही पुराणपंथी कथा बनवण्यात आली. येथे वामनाच्या रुपातील विष्णू न येता विष्णुचा वामनावतार आला. बळीच्या कथा महाभारत व अनेक पुराणांत वेगवेगळ्या स्वरुपात येतत. बळीचे महाबलाढ्य असूर असणे व वामनाची तीन पावले हा भाग वगळला तर कोणत्याही कथेत एकवाक्यता नाही. बळीने स्वर्ग जिंकून देवांना हरवले. ते घाबरून रुपे बदलून परागंदा झाले. पौराणिक कथा बळीने यज्ञ केला व त्या प्रसंगीच वामनाने तीन पावले जमीन दान मागितली असे सांगतात. यातही गफलत अशी कि असूर्त हे यज्ञविरोधक व यज्ञविध्वंसक होते, यज्ञकर्ते वैदिक नव्हे. पण एनकेनप्रकारेन यज्ञमाहात्म्य वाढवण्यासाठी ही क्लुप्ती केली गेली आहे हे उघड आहे.

सर्व कथा पाहिल्या तर हे स्पष्ट आहे कि वामन अवतार कथा जुन्याच (बळीशी संबंध नसलेल्या) कथांत बळीची भर घालवून बनवल्या आहेत. वामन अवतारात कसलेही तथ्य नाही त्यामुळे वामनाने बळीचा खून केला किंवा पाताळात पाठवले यातही तथ्य नाही. बळी महान राजा होता याबाबत एकाही पुराणकथेतही दूमत नाही. पण वाईट हे होते त्यांच्या दृष्टीने कि तो देवांचा (म्हणजे वैदिकांचा) शत्रू होता.

बळीची घटना भृगूकच्छमध्ये घडली म्हणजे तो तेथीलच असावा असा एक अंदाज वर्तवला जातो व त्रिपाद भुमीची घटना घडल्यावर तो केरळात गेला असेही मानण्यात येते. केरळमधील लोक आजही बळीला आपला राजा मानतात. कन्याकुमारीच्या दक्षिणेस कित्त्येक कोसांवर समुद्रात घुसलेल्या भुशिरावर बळीची राजधानी होती व नैसर्गिक उत्पातात महान बळीची राजधानी समुद्रात बुडाली असे उल्लेख प्राचीन तमिळ वाड्मयात येतात.

शतपथ ब्राह्मणात वर्तमानकालीन देश म्हणून प्राच्य देश व लोकांचा उल्लेख येतो. निर्वासित वैदिक लोक भारतात आले तेंव्हा ते कुरु-पांचाल विभागात वसले व धर्मप्रचारही सुरु केला. प्राच्य देशात असूरांची राज्ये असून ते यज्ञ करत नाहीत, त्यांचे स्वत:चे पुरोहित आहेत. दक्षिण दिशा त्याज्ज्य नंतर झाली असली तरी या काळात वैदिकांनी प्राच्य त्याज्ज्य मानली. हा प्राच्य देश म्हणजे आजचे बिहार व त्यापलीकडील पुर्वेचा प्रदेश. वैदिकांना तेंव्हा तो भुगोल माहितच नव्हता. महाभारतात या भागांतेल अंग, वंग, कलिंगादि पाच राज्यांचा उल्लेख आला आहे व ही पाचही राज्ये बळीच्या त्याच नांवाच्या पुत्रांनी स्थापन केली असा उल्लेख आहे. त्यामुळे या प्रदेशाला "बालेय क्षेत्र" असे नांव होते. त्यामुळे असूर ही कविकल्पना न मानता ती खरीच वेगळ्या संस्कृतीची माणसेच होती असे मानावे लागते. (Some Aspects of Ancient Indian Culture by D. R. Bhandarkary, पृष्ठ-३५)

इतिहासात बळी नांवाचा राजा तरी खरेच घडला होता काय हाही प्रश्न उद्भवने स्वाभाविक आहे. यच्चयावत देशात त्याच्याबद्दल आदरभाव असणे, त्याच्या नांवाचे राजकीय विभाग असने, त्याला अनेक राजवंशांनी पुर्वज मानने, त्याच्या वंशातील राजांचे उल्लेख मिळणे या बाबी तो खरेच होऊन गेला हे ठामपणे ठरवायला पुरेसे नसले तरी वामनावतारात जशी गफलत आहे तशी बळीच्या बाबतीत नाही. वैदिकांनाही बळीचे माहात्म्य खोडुन काढता आले नाही. त्यांना त्यांच्या विपर्यस्त कथांतही ते मान्य करावेच लागले.

वैदिक भारतात आले तेंव्हा  त्याचे वंशज राज्य करत होते असे वैदिक साहित्यावरुनच दिसते. म्हणजे वैदिक भारतात येण्यापुर्वीच बराच काळ आधी बळीराजा होऊन गेला होता. बळीराजा झाला तेंव्हा भारतात वैदिकांचा धर्मही नव्हता नि वैदिकही जर नव्हते तर बळीला पाताळात पाठवायला त्यांचा विष्नू कसा येईल हा विचार आपल्या विद्वानांनी केलेला दिसत नाही. अवतार संकल्पना हीच मुळात वैदिक धर्मातही उशीराची आहे. वेदातील विष्णू हा उपेंद्र व दुय्यम देवता आहे. त्याला महत्व प्राप्त झाले तेच मुळात गुप्तकाळात. असे जर स्पष्ट आहे तर मग विष्णूचा अवतार वामनाचा संबंध आम्ही कसा मान्य करतो? की आम्हाल आमच्या अवहेलनेच्या कथा अधिक प्रिय आहेत...तेही सत्यासत्यता तपासून न पाहता?

अर्थात महाबळी आज सर्व भारतीयांचा अधिराज आहे. त्याचा कोणी खून केला, पाताळात गाडले वगैरे वैदिकांनी आपले माहात्म्य वाढवण्यासाठी बनवलेल्या भाकडकथा आहेत. वामनाची कोणी पुजाही करत नाही. ही काल्पनिक व्यक्ती माहित आहे ती बळीशी जोडली गेल्याने. या वैदिक मिथककथांच्या जाळ्यात अडकणे योग्य नसून सत्यशोधन करणे गरजेचे बनून जाते ते यामुळेच.

आज आपण आपलीच संस्कृती जपत असतांना "पुर्वजांचा पराभव झाला होता" या मिथककथांत रमत सांस्कृतिक व्यूहरचना करतो, समजतो, न्यूनगंड जोपासतो हे समूळ चुकीचे आहे. सांस्कृतिक वर्चस्वतावादाला थारा न देता स्वमुळांचा शोध महत्वाचा बनून जातो तो यामुळेच.  देव -असूर युद्धे ही काल्पनिक भासली तरी ती एका सांस्कृतिक संघर्षाची प्रतीकरुपे आहेत. आजही तो संघर्ष वेगळ्या रुपाने अस्तित्वात आहे. बळीराजासंदर्भातील कथा मुळात कशा पद्धतीने विकसीत केल्या गेल्या हे पाहिले कि देव संस्कृती व असूर संस्कृतीतील युद्धे फक्त रणात लढली गेली नाहीत तर साहित्यातुनही कशी लढली गेली याचे प्रत्य्यंतर येते, व युद्धात जय कोणाचाही होवो, लेखणीत जो जिंकतो तोच कसा जिंकतो हेही दिसून येते. पण प्रत्यक्ष कोण जिंकले हे आपण आज जी संस्कृती जपतो त्यावरुनही समजून येते.

बलीप्रतिपदेच्या हार्दिक शुभेच्छा!

7 comments:

  1. वामन पूजा केली जाते. त्या मध्ये 12 बटू बोलवून त्यांना सोन्याची वामन प्रतिमा दान केली जाते. माझ्या कडे मला मिळालेली याशी एक प्रतिमा आहे

    ReplyDelete
  2. Thanks Sanjay ji .... This is your job & not politics.... concentrate on it..... Thanks again

    ReplyDelete
  3. Leased ji Vaman puja keva, kaun karatat

    ReplyDelete
  4. SURWA-SAMANYA LOK HALU-HALU RAJACHA DHARMA SWEEKARTAT .B.J.P

    JASHI-JASHI MAJBUT HOIL TAS-TASA HE PRAMAN WADHEL.EK MOTHA WARG

    HALU HALU WAIDIK SANSKAR APLE KARUN GHEIL.(EX.AJ BURYACH BAHUJAN JATI PUJA KARTANA SOWALE NESU LAGLYA AHET.ETC.ETC.)

    ReplyDelete
  5. बळीराजा संदर्भही अधिक माहितीसाठी वाचा "बळीवंश" लेखक डॉ. आ. ह. साळुंखे, लोकायत प्रकाशन, सातारा.

    ReplyDelete
  6. प्राचीन भारतीय इतिहास सत्यशोधन *कलम कसायानी महान बहुजनास लहान क्षुद्र बनवले:अन् आपण ना खेद ना खंत बेफिकिर * समस्त महाराष्ट्रीय बहुजन क्षत्रिय मराठा जाती जमाती ओबीसी मागास जाती ह्यांचे मूळ एकच असुन वैभवशाली मराठोळा भूतकाळ आहे!
    उदाहरणार्थ: सातवाहन: नाणेघाट शिलालेखात अर्धामुर्धा ब्रह्मणेन शब्द दिसला की ठरवलेच त्याना ब्राह्मण: सातवाहनानी ब्राह्मण भट भिक्षु अन् बौद्ध भिक्षु ह्याना समान लेखुन मुबलक दक्षिणा दिल्या!➡ मराठा ९६ कुलनामापैकी अत्यंत महत्वपूर्ण राजवंश आहे➡ सातव=स्वस्तिवाहन=सातव** पण मराठे आहेत आपल्याच प्राचीन वारशाविषयी बेफिकिर* तसेच:कर्नाटकी अर्क़ पंडित:कदम=कदंब ह्या। देखिल ब्राह्मण करुन दाखवतात* असले कलमकसाई अजुन आहेत*

    ReplyDelete
  7. बळी राजा शुक्राचार्य व शुक्रनिती यांचा परस्पर संबंध काय ?

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...