Wednesday, April 18, 2018

पाळं-मुळं


आमची पाळं-मुळं
कोठे आहेत
हे काहुन विचारतोस भावा...?
या बांधाबांधावर
अलंघ्य डोंगररांगा आणि डोंगर उतारांवर
माळरानांवर
आमची मुळे घट्ट रुजलेली आहेत
आज ती आमच्या हातात नसली तरी...

आमचे चुकले एवढेच की
कधी मालकी नाही सांगितली
सातबारा नाही बनवला
या धरतीचा
आमच्या नांवानं
येथुन तेथे
राहिलो भटकत
जीवनाच्या शोधात
संस्कृतीचे...भाषेचे नि धर्माचे
सृजन करत
नि विसावलो वाड्यांवरच्या कुडांच्या भिंतीआड
विश्वव्यापी भावनांच्या घोंगडीला
पांघरून.

तुमच्याकडे जेही काही आहे भावांनो
त्याचे निर्माते आम्ही आहोत
ज्यांनाही तुम्ही पुजता
त्यांची पुजा आम्ही सुरु केली
तुम्ही आता त्यावरच डल्ला मारुन मोठमोठी धर्मतत्वे सांगता
ती आम्ही केंव्हापासुनच जगतो आहोत....
खंडोबाच्या-बिरोबाच्या-मायाक्काच्या काळजात
डोंगरांत...आता नाहिशा होऊ लागलेल्या
माळरानांत
रुजलेली पाळेमुळे
खस्ता खात
प्राणापलीकडे जपत आहोत...

तेंव्हा लै शहाणे झाल्याचा आव आणु नका...
आमची पाळेमुळे कोठे
हे आगाऊ सवाल विचारु नका!

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...