Monday, April 23, 2018

पुस्तके काही देतात?


Image result for readers


पुस्तके काही देतात हे म्हणणे पुर्णांशाने खरे नाही. पुस्तके खूप काही काढुनही घेतात. कधी वाचकांची बुद्धी तर कधी वाचकांचे गैरसमज.
स्वत:चा मेंदू गहाण ठेवून काहीही ऐकले किंवा वाचले आणि त्याआधारित आपले मत प्रबळ केले तर ते वाचन निरर्थक असेच आहे.
पुस्तके वाचण्याआधी स्वत:लाच "वाचन-तयार" केले नाही तर वाचन निरर्थक ठरते.
अनेकदा प्रसिद्ध होणारी पुस्तके ही विचार-बंदिस्त करण्यासाठी असतात, विचारप्रवण करण्यासाठी नव्हेत. त्यामुळे त्या त्या प्रकारच्या पुस्तकांचा बंदिस्त वाचकवर्गही असतोच. बंदिस्त विचारांच्या व्युहात जेरबंद करणे हा पुस्तकाचा (म्हणजेच लेखनाचा) खरा उद्देश्य नसतो.
वाचकांनी आपले विचार तपासुन पहावेत, त्यातील त्रुटी असल्या तर त्या शोधाव्यात आणि स्वत:चे खुले विचार बनवत आपले कुतुहल शमवण्यासाठी अजुन निरलस मनाने वाचत जावे हा पुस्तकांचा उद्देश्य असतो.
घरात पुस्तकांचा ढीग आहे पण घरातील माणसं विचारशुन्य आहेत असेही चित्र आपण ब-याचदा पाहतो. कोणी लाख पुस्तके वाचली म्हणून तो विचारक बनतो असे होत नाही. कोणी एकही वाचले नाही म्हणून तो विचारशून्य असतो असेही नाही.
शेवटी पुस्तके वाचुन त्यातील काय घेतले, ते कसे विकसीत केले हे महत्वाचे. नाहीतर अशी माणसे फक्त अभिनिवेशी वाचक असतात...बाकी शुन्य.
त्यांनी काहीच वाचले नसते तरी त्यांचे किंवा कोणाचेही काही अडले असते अशातील भाग नाही. वाचणारे दिव्य विचारांचे असतात असेही नाही.
वाचन हे स्वत:ला समृद्ध करण्यासाठी असते. समृद्ध वाचकच अधिक समृद्ध लेखक घडवतात. ही प्रक्रिया दुतर्फा असते. उथळ वाचक ज्या समाजात असतात तेथील लेखकही उथळच राहणार आणि त्यांच्या लेखनश्रेष्ठत्वाच्या कल्पना पानचट असणार हे उघड आहे.
पुस्तके काही देत असतील तर केवळ पुर्णतेतील अपुर्णत्वाचा आभास. वैचारिक पुस्तके देत असतील तर ज्ञानातील अज्ञानाचा अहसास.
पुस्तकांचे महत्व तेवढेच आहे आणि ते मान्य असले तरच पुस्तकांच्या विश्वात जावे!

1 comment:

  1. Excellent and thanks for above writings, sir u may have experience us glorious wisdom path

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...