Monday, June 4, 2018

अश्वत्थामा



"अश्वत्थामा मला भेटला" ही कथा माझ्या "आदमची गोष्ट" या माझे मित्र व चपराक प्रकाशनचे घनश्याम पाटील यांनी आवर्जुन प्रकाशित केलेल्या कथासंग्रहात सामाविष्ट होती. या संग्रहात वेगवेगळ्या विषयांवरील, पण अंतत: मानवी मनाचा तळगर्भ उलगडण्यचा प्रयत्न करणा-या कथा आहेत. अश्वत्थामा मला भेटला ही कथा अणि त्यवर सलाम पुणेने निर्माण केलेला व मीच दिग्दर्शित आणि अभिनितही केलेला लघुपटाचा निमित्ताने मला माझ्या १९९१ साली प्रसिद्ध झालेल्या अश्वत्थामा आणि नंतर १९९८ साली लिहिलेल्या शुन्य महाभारत या कादंबरीची आठवण होणे स्वाभाविक आहे. या दोन्ही कादंब-या गाजल्या असल्या तरी अश्वत्थामाच्या आवृत्त्या जास्त (म्हणजे आठ) झाल्या. एका आवृत्तीच्या प्रकाशनाला प्रकाशकाने आचार्य व्यास आणि राम शेवाळकरांना बोलावले होते. अर्थात अश्वत्थाम्याला नायक करुन महाभारत युद्धाची खरी रुजुवात द्रोणाने घातली ही व या कादंबरीतील माझ्या अनेक भुमिकांना या दोघांचाही विरोध होता. पण असे असुनही ते आले. बोलले.

शुन्य महाभारतात तर मी महाभारत उलटे पालटे करुन टाकले. नवी गीताही लिहिली. कृष्ण अर्जुनाच्या वाट्याला न जाता दुर्योधनानेच मागून घेतला असता तर पुढचे महाभारत कसे घडले असते? आणि तेच मी तत्वज्ञानाच्या पातळीवर लिहिले होते. या कादंबरीची बरीच चर्चा झाली.

मला मृत्युचे आकर्षण आहे. या विषयावर मी द अवेकनिंगसह अनेक कादंब-या लिहिल्या. वेगवेगळ्या पैलुने मृत्यू या संकल्पनेची मी तपासणी करत राहिलेलो आहे. अश्वत्थामा हा मिथकांनुसार सप्त चिरंजीवांपैकी एक. चिरंजीवत्व शक्य नाही हे उघड आहे. पण ही मिथके सांभाळत मी अश्वत्थाम्याच्या अजरामरत्वात मानवी वेदनांचे चिरंजीवत्व शोधत "अश्वत्थामा मला भेटला" ही तत्वज्ञानात्मक काल्पनिका लिहिली. अश्वत्थाम्यावर कादंबरी लिहिलेल्या स्वत: वेदनांच्या छायेत जगणा-या लेखकाकडेच अश्वत्थामा येतो आणि जखमेवर तेल मागतो...आणि तत्वात्मक चर्चेतून मानवी जीवन, त्याच्या कल्पना यातील फोलत्व उलगडत वेदनांचे चिरंतनत्व ठळक करतो अशी ही कथा. कथेला चित्रीत करणे सोपे नसते. पण माझे मित्र सलाम पुणेचे शरद लोणकर एक जिद्दी माणूस. त्याने यावर लघुपट निर्माण करायचे ठरवले. मग मी पटकथा लिहिली. दिग्दर्शनही केले. मयुर लोणकर या ताज्या दमाच्या कलावंताने अश्वत्थामा साकार करायची तशी अवघड जबाबदारी पेलली आणि लेखकाच्या भुमिकेत मीच. हे अर्थात अद्भुतच आहे पण अशी अद्भुते माझ्या जीवनात अनेकदा घडली आहेत.




या लघुपटाच्या निमित्ताने एकंदरीतच मानवी जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळेल याचा विश्वास आहे.


No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...