Friday, July 23, 2021

धर्मांतराचा प्रश्न

 

माझा आक्षेप उपरेंकृत प्रायोजित धर्मांतराच्या आवाहनाबाबत आहे. ज्यांना स्वत:च्या आणि ज्या धर्मात इतरांनीही जावे याबाबतचा त्यांचा अभ्यास काय हाच माझा प्रश्न होता व आहे. हेच आवाहन बौद्ध भंतेंनी अथवा त्या धर्माच्या लोकांनी ओबीसींना करणे व का धर्मांतर करावे हे पटवून देणे ही वेगळी बाब आहे. प्रत्येकाला आपापल्या धर्माचा प्रचार-प्रसार करण्याचा अधिकार आहे. बाबासाहेबांनी वैदिक मंडळींनी त्यांच्या न्याय्य मागण्यांना प्रतिसाद न दिल्याने धर्मांतराचा निर्णय घेतल्यानंतर अन्य अनेक धर्मपर्यायांचा विचार करून विवेकाने बौद्ध धर्माची निवड केली होती. तत्पुर्वी महाड येथील परिषदेत त्यांनी हिंदू धर्मात "एक-वर्ण" असावा या आशयाचा ठरावही पारित करुन घेतला होता. वैदिकांना, ज्यांना वैदिक वर्णव्यवस्थेमुळेच हिंदू समाजाचे आपण अध्वर्यू ठरतो ही जाण असल्याने व तोवर तरी वैदिक धर्म आणि शुद्रातिशुद्रांचा धर्म वेगळा असल्याची माहिती शुद्रातिशुद्रांना नसल्याने त्यांनी "एकवर्ण" (म्हणजेच सर्व हिंदू समान) ही भुमिका मान्य होण्याची शक्यताच नव्हती. परंतू आता स्थिती बदललेली आहे.

त्रैवर्णिकांचा धर्म (ज्यांना वेद-वेदोक्तादिचा जन्मसिद्ध अधिकार आहे) वेगळा असून शुद्र व अतिशुद्रांचा धर्म वेगळा आहे हे स्पष्ट झालेले आहे. या स्पष्ट सीमारेषा लक्षात आल्यानंतर धर्मांतर नव्हे तर धर्मशुद्धीची आवश्यकता निर्माण होते. वर्णव्यवस्था हे वैदिक धर्माचे मूख्य अंग असल्याने व त्याचा पगडा हिंदूवर पडला असल्याने वैदिक धर्माला स्वतंत्र करणे आवश्यक बनले आहे ते यामुळेच. याउप्परही ज्यांना स्वेच्छेने धर्मांतर करायचे आहे त्यांना त्यांचे स्वातंत्र्य आहेच. माझ्या व्यक्तिगत जीवनात मी कोनताही धर्म पाळत नाही. संशोधनकार्याव्यतिरिक्त मी कोणत्याही धर्मस्थळी आजतागायत गेलेलो नाही. किंबहूना सारेच एक दिवस धर्मापार जावेत कारण धर्माची निर्मितीच भयातून झालेली आहे हे मीच माझ्या नीतिशास्त्र या ग्रंथात स्पष्ट केले आहे. परंतू ज्यांच्यासाठी आजही धर्म हा कळीचा मुद्दा आहे त्यांना त्यांचा धर्म मुळ कोणता आहे व त्यात भेसळ नेमकी कशी झालेली आहे हे स्पष्ट करत जाणेही तेवढेच आवश्यक आहे अन्यथा वैदिक वर्ण-कलमांचा फोफावा असाच राहील.

धर्म जेंव्हा व्यावहारिक कारणांमुळे अथवा राजकीय कारणांमुळे बदलला जातो त्याला मी धर्मांतर मानत नाही कारण धर्माच्या मुळ हेतुशीच ते विसंगत आहे. धर्मबदल हा नैतीक पायावर व स्वयंनिर्णयाने झाला तरच तो चिरंतन टिकतो. अन्य कारणांमूळे झालेल्या धर्मांतरामुळे किती मुळचे संस्कार पुसले गेले हा प्रश्न समाजशास्त्रीय अभ्यास केला तर तो ब-यापैकी अनुत्तरीत राहतो. आजही भारतीय इस्लाम, जैन, ख्रिस्ती ते शिख धर्मात ओबीसी वर्ग-प्रवर्ग आहेत यावरून मला काय म्हनायचे हे समजून येईल. तेंव्हा धर्मांतर हे उत्तर नसून धर्मात घुसलेल्या वर्णीक वैदिक धर्मियांचे विलगीकरण हे खरे उत्तर आहे असे मला वाटते. हिंदू ओबीसींनी बौद्ध ओबीसी झाल्याने काय सामाजिक बदल घडणार आहे?

मला कल्पना आहे कि स्पष्ट भुमिका अनेकांना आवडत नाही. आपापल्या धर्मावर प्रत्येकाचे प्रेम असते व तो वाढावा असे वाटणे वावगे नाही. परंतू ज्यांना धर्मांतराचे आवाहन केले जात आहे त्यांचीही भुमिका असू शकते याचे भान ठेवले जात नाही. असे आवाहन करायला आपण कोणाची निवड करत आहोत याचेही भान गमावले जाते. कोणाला खूष करण्यासाठी मी तरी लिहित नाही. एक साहित्यिक आणि संशोधक म्हणून बौद्ध समाजाला माझे काहीच योगदान नाही असे ज्यांना वाटते त्याबद्दल मी काही बोलु इच्छित नाही...किंवा त्याचे भांडवलही आजतागायत मी कधी केलेले नाही. मी माझे काम करत आहे...तुम्ही तुमचे काम करत रहा. एवढेच...

उपटसुंभाप्रमाणे हनुमंत उपरे नामक गृहस्थाने कोणाची तरी सुपारी घेऊन ओबीसी धर्मांतराची मोहीम सुरू केली आहे. अलीकडेच याच गृहस्थांनी "कर्मकांडाला नाकारण्यासाठी धर्मांतर" असेही विनोदी विधान केले आहे. आजच दै. लोकसत्ताने प्रा. देवल बुक्क नामक धर्मांतर विरोधक गृहस्थांचे या सम्दर्भात विरोधी पत्रही प्रसिद्ध केले आहे. असो. कर्मकांड नाकारण्यासाठी धर्म बदलावा लागतो हे अत्यंत विनोदी विधान आहे. कर्मकांड नसलेला धर्म यच्चयावत विश्वात नाही. कर्मकांड नाकारण्याचा हक्क कोणत्याही धर्माने हिरावून घेतला नाही. मशीदीत गेलेच पाहिजे अथवा पाच वेळा नमाज पढलाच पाहिजे असा हट्ट मुस्लिमांसाठी इस्लामही धरत नाही. हिंदू धर्मात पूजा हेच एकमेच कर्मकांड आहे. वैदिक धर्म, जो हिंदू धर्माला प्यरासाइटप्रमाणे चिकटला आहे, त्यामुळे काही बिनडोक कर्मकांडे हिंदू धर्मात घुसली आहेत हे वास्तव आहे. पण ती पाळलीच पाहिजेत असाही हट्ट नाही. पाप-पुण्याला भिनारी भेकड माणसे ती पाळायला जातात हेही खरे आहे, पण त्यांना विरोध होतो आणि होत राहील. वैदिकांनी आपली काही कर्मकांडे सोडली तर यज्ञादी कधीच सोडली आहेत. इतरांवर लादलेली छद्म कर्मकांडे झिडकारायला आम्ही सज्जच आहोत. वैदिकांच्या वर्णव्यवस्थेवर लाथ मारत एकमय समाजाकडे आम्ही वाटचाल करतच आहोत. मग धर्म बदला म्हणजे काय? आम्ही आमच्या धर्मातील घुसखोरांना हाकलण्याऐवजी आम्ही आमचा धर्म का म्हणुन बदलायचा? आमच्या धर्मात आम्हाला त्रुटी सापडल्या तर आम्ही एक तर त्या दुरुस्त करायला सक्षम असले पाहिजे किंवा एखाद्या धर्माची मुलतत्वे पटली तर व्यक्तिगत पातळीवर धर्म बदललाही पाहिजे. सुपा-या घेऊन उपरे यांच्यासारख्या उपरा उद्योग कोणी करत असेल तर त्याला ठासून विरोध होणारच. मी वैदिक धर्मियांना हिंदू मानत नाही हे सर्वांना माहितच आहे. वैदिकांची हिंदू धर्मातुन हकालपट्टी क्रमप्राप्त आहे. ती यथावकाश होईलच याचीही खात्री आहे. हिंदुंनी आपापल्या कोनत्याही धार्मिक कार्यास (जन्म, लग्न, मृत्यु) वैदिकांना बोलावू नये त्यांना पौरोहित्य देवू नये. रुद्राभिषेक ते सत्यनारायण या भाकड वैदिकोपजीवी प्रथा तात्काळ बंद कराव्यात. आपला धर्म नीट समजावून घ्यावा. परधार्मिकांच्या वर्चस्वास बळी पडू नये.
आणि त्याच वेळीस उपरेसारख्या सुपारीबाज माणसाला दूर ठेवावे. ओबीसी ही काय उपरेची वा त्याला सुपारी देणा-यांची मालमत्ता नाही. माझे आवाहन आहे कि धर्मांतर नव्हे तर कुप्रव्रुत्तींना आणि वैधर्मियांना धर्मातून बाहेर करा. धर्म साधा सहज आणि सर्वांना कवेत घेता येणारा...आणि म्हणुणच...कधीही धर्मापार होता येणारा बनवा.
यासाठी धर्मांतर हे उत्तर कधीही नव्हते आणि नाही. धर्म ही व्यक्तिगत बाब आहे आणि ती तशीच राहण्यात "धर्म" आहे.
All reactions:
Sanjay Kshirsagar, Sandip Fargade and 79 others
137 comments
12 shares
Share

Monday, July 19, 2021

कोण अनाम महाकवी

 कोण अनाम महाकवी

ईश्वराचे हे चिरंतन गीत
माझ्याअंत:करणात
चैतन्याचे अंकुर फुलवत
गातोय?
मी मोहोरलोय
नम्रातीनम्र झालोय
या अनंत विश्वात भरून राहिलेल्या
ईश्वरी आविष्कारासमोर...
पाउस कोसळतोय
जसा परमपित्याचा आशीर्वाद!
Shailesh Wadekar, Dinesh Sharma and 27 others
2 comments
Like
Comment
Share

कधी कधी

 कधी कधी

जीवनच असे बनून जाते

कि रात्रीचे पावसाळे होतात
कालांधाराचा पाऊस झेलत
उजेडाचे आडोसे शोधावे लागतात...
उजेडाची व्याख्याही बदलत जाते
काजव्यांनाच सूर्य म्हणायची वेळ येते!
(सूर्य पाहिलाच नाही कधी...)
अशा काळात जगतोयत आम्ही
ज्या काळात फक्त आग ओकत्या हिंस्त्रतेचे
डोळे दशदिशांतून
ओसंडत येतात
ती श्वापदे आपले बळी शोधण्यासाठी आपली ओंगळ
बोटे अंधाराच्या फटींत घुसडतात
...
खूप सूर्य
गर्भांतच
मरून पडलेले सापडतात...
आम्ही अंधार-वर्षा
तुडवत राहतो
या क्षितीजापासून
त्या क्षितीजापर्यंत
एक गर्भ-सूर्य जपण्याच्या प्रयत्नात...

Saturday, July 17, 2021

संघ “सेक्युलर” कसा होणार?

 

संघ “सेक्युलर” कसा होणार?

लेखक: संजय सोनवणी

चित्रकुट येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची चार दिवसीय गुप्त बैठक १३ जुलै रोजी संपली. या बैठकीचा जो वृत्तांत प्रसिद्धीसाठी देण्यात आला त्यानुसार संघाने काही महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सामोरे आले आहे. या बैठकीआधीच गाझियाबाद येथे सरसंघकचालक मोहन भागवतांनी केलेल्या एका भाषणात “हिंदू आणि मुस्लीम यांचा डीएनए एकच आहे, मुस्लिमांनी घाबरण्याची आवश्यकत्ता नाही, मॉब लीन्चिंग करणारे हिंदू असू शकत नाहित...” अशी विधाने केली होती. आता या बैठकीचा जो वृत्तांत बाहेर आला आहे तो पाहता भागवतांची विधाने ही प्रांत प्रचारकांच्या बैठकीत काय होणार याची पुर्वसूचनाच होती असे म्हणता येईल.

या बैठकीत प्रामुख्याने मुस्लिमाबद्दलचा परंपरागत विद्वेषाचा दृष्टीकोन बदलत मुस्लिमांना संघ प्रवाहात ओढून घेण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याबाबत बरेच विचारमंथन झाले. मुस्लिम वस्त्यांमध्ये संघ शाखा सुरु करण्याचेही ठरले आहे. संघप्रवर्तित राष्ट्रीय मुस्लीम मंच या दिशेने आधीही काम करतच होता पण आता स्वत: संघाने मुस्लिमांना संघधारेत सामावून घेण्यासाठी पावले उचलण्याचे ठरवले आहे. या बैठकीत संघप्रसाराबाबत इतरही मुद्द्यांवर मंथन झाले तशीच रूपरेखाही ठरवण्यात आली असली तरी आत्ताच संघाला मुस्लिमांबाबत कशी उपरती झाली याबाबत चर्चा सुरु झाली आहे. कारण मुळात संघाचा पायाच मुस्लीम द्वेष राहिलेला आहे. अशा स्थितीत संघाने आपल्या भूमिकेत यु टर्न कसा घेतला याबाबत खुद्द संघ कार्यकर्त्यांत संभ्रम असला तरी उत्तर प्रदेशासहित पाच राज्यांच्या आगामी निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून भाजपला थेट रसद पुरवण्यासाठी संघाने केलेला हा तात्पुरता समझोता आहे हे स्पष्ट आहे. भाजप सरकार येईपर्यंत संघाने इतिहास संकलन समिती मार्फत देशाचा इतिहास वैदिकवाडी करण्याचा चंग बांधला होता. वैदिक आर्य भारतातीलच, सिंधू संस्कृती वैदिकांचे निर्मिती, संस्कृत भाषा हीच सर्व भाषांची जननी, मुस्लीम हे भारताचे आणि विशेषत: हिंदूंचे (पक्षी वैदिकांचे) मुख्य शत्रू, मुस्लीम कसे जगभर हिंसा माजवत राहिले आहेत अशा स्वरुपाचे लेखन आपल्या पेड संशोधकांकरवी करवून घेत वैदिक संस्कृतीचा टेंभा मिरवत होते. मुस्लीम द्वेषातून बाबरी प्रकरण घडले आणि देशभर हिंसेचा आगडोंब उसळला. संघटीत दहशतवाद भारतात प्रवेशला. रामाशी कसलाही संबंध नसलेल्या वैदिकांनी राममंदिर उभारण्याचा चंग बांधला ते केवळ राजकीय हेतूंनी प्रेरित होउन. त्यात रामभक्ती कोठेही नव्हती. असती तर राममंदिर उभारणीत जमा केलेल्या देणग्यांत भ्रष्टाचार झाला नसता. राम हे केवळ भोळ्या हिंदूंना संघटीत करण्याचे आणि त्यांना राजकीय हेतुसाठी वापरण्याचे एक साधन होते हे हिंदूंच्याही लक्षात आले नाही. किंबहुना, सामाजिक मानसशास्त्र कसे वापरायचे याची पक्की जाण भोळेपणोचे सोंग घेणाऱ्या संघाला आहे. आता हिंदूंना वापरून घेतले तसेच मुस्लिमांनाही वापरून घेता यावे यासाठी बाष्कळ विधाने संघ आणि संघचालक करत असतील तर कोणाला आश्चर्य वाटायचे कारण नाही. कारण या बैठकीत संघाचा कट्टर हिंदुत्ववादी चेहरा बदलला आणि स्वत:चे समन्वयवादी सहिष्णू रूप धारण केले तर भाजपला निवडणुकांत फायदा होईल काय यावर या बैठकीत व्यापक मंथन झाले. “सेक्युलर” संघ ही कल्पना हास्यास्पद वाटत असली तरी संघाने त्याच्या इतिहासात आपली प्रतिमा बदलण्यासाठी वेळोवेळी अनेक मुखवटे घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे आपल्या लक्षात येईल. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रात:स्मरणीयांच्या यादीत समावेश करणे हा त्या प्रयत्नांतीलच एक भाग होता. हे सारे ढोंग आहे हे सहज लक्षात यावे अशीच चर्चा वेगळ्या मुद्द्यांच्या बहाण्याने या बैठकीत झाली.

त्यातील पहिला मुद्दा म्हणजे लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा आणण्यासाठी केंद्रावर दबाव वाढवण्याची रणनीती. उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने तशी पावले उचललेली आहेतच. या कायद्यामागे “लोकसंख्या नियंत्रण” हा खरा हेतू नसून मुस्लीम बागुलबुवा हिंदूंसमोर सतत टांगता ठेवणे हाच हेतू आहे. कारण मुस्लिमांना चार विवाह करण्याचे अनुमती असल्याने त्यांची लोकसंख्या भरमसाठ वाढत असून या देशात हिंदूच अल्पसंख्य होण्याचा धोका आहे हा भयगंड हिंदूंमध्ये पसरवून त्यांचे ऐक्य साधने आणि त्या ऐक्याचा राजकीय लाभ उठवणे ही संघाची रणनीती राहिलेली आहे. सत्य आणि संघ यांच्यात ३६ चा आकडा आहे कारण प्रत्यक्षात आकडेवारी सांगते की बहुपत्नीकत्व भारतीय मुस्लिमांत ५.७%, बुद्धिस्टांत ७.९%, आदिवासींत १५,२५%, हिंदुंत ५.८% असे होते. म्हणजे बहुपत्नीकत्व प्रत्यक्षात मुस्लिमांत तुलनेने थोडे तरी कमी आहे तर आदिवासींत सर्वात जास्त आहे. (संदर्भ: जनगणना १९६१). १९७६ मध्ये मुस्लिमांच्या बहुपत्निकत्वाचे हेच प्रमाण ५.६ % तर हिंदुंत ५.८% एवढे होते. (संदर्भ: गोखले इन्स्टिट्यूट ने प्रसिद्ध केलेला १९९३ मधील मल्लिका मिस्त्री यांचा शोधनिबंध.) हे प्रमाण २००६ मध्ये अजून खाली आले. हिंदुत १.७%, मुस्लिमांत २.५% तर ख्रिस्त्यांत हेच प्रमाण २.१% एवढे होते. (संदर्भ: Third National Family Health Survey-2006)

एके काळी जवळपास समान असलेला हिंदू-मुस्लीम लोकसंख्यावाढीचा दर शिक्षण, राहणीमान यातील पडलेल्या तफावतीमुळे मुस्लिमांचा जन्मदर हिंदुंच्या तुलनेने अजूनही किंचित अधिक आहे. तो खाली आणायचा असेल तर हिंदू आणि मुस्लिमांत जनजागृती सोबतच शिक्षण, आरोग्य आणि अर्थस्थिती यात व्यापक सुधारणा करण्याचे गरज आहे. कारण एकुणातील लोकासंख्यावाढीची जबाबदारी कोणा एकाच गटावर टाकता येत नाही. पण त्यावर भर न देता दंडनीतीचा उपयोग हा सर्वधर्मीय नागरिकांना त्रासदायक होईल हे उघड आहे. शिवाय हिंदूंनी दहा मुले प्रसावावीत असले फतवे शंकराचार्य ते साध्वी अधून मधून काढत असतांना लोकसंख्या वाढीबद्दल यांना कितपत गांभीर्य आहे हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. मग मुस्लीमद्वेषाचा पाया ठेवून कोणती सेक्युलर इमेज बनवण्याचा प्रयत्न होतो आहे?

याच बैठकीत धर्मांतर रोखण्यासाठी कायदा आणि घरवापसी यावरही खल झाला. संघाचा हा नवा मुद्दा नाही. बळजबरीने होणारे धर्मांतर आजही कायद्याच्या कक्षेतच आहे हे संघाला माहित नसावे असे नाही. हिंदूंनी बौद्ध, जैन वा शीख धर्मात प्रवेश केला तरी संघाची त्याला कधी हरकत नसते पण कोणी मुस्लीम धर्मात प्रवेश केला की जळफळाट होतो. हिंदू-मुस्लीम तरुण-तरुणीनी आपापसात लग्न केले की “लव्ह जिहाद” चा संतप्त थयथयाट चालू होतो. लव्ह जिहाद ही संघाने बनवलेली संज्ञा सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत विघातक आहे. याबाबतचे भूमिका संघाने या बैठकीतही बदललेली नाही. धर्मांतराला विरोध करतांना “घरवापसी”ला मात्र मुक्त द्वार द्यायचे हा भाग तर दुटप्पीपणाचा कळस म्हणता येईल. ज्याही कोणाला हिंदू व्हायचे आहे त्याला तसे करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. म्हणजे तुम्ही बळजबरीने “घरवापसी” करणार आहात काय? आणि तसे केले तर तुम्ही बनवलेल्या भयकारी मुस्लीम प्रतिमेत आणि तुमच्या प्रतिमेत काय फरक राहतो? हे सेक्युलर होऊ पाहण्याचे कोणते लक्षण आहे?

याच आठवड्यात संघ प्रभावाखालील युनिव्हर्सिटी ग्रांट कमिशनने इतिहासातून मुघल काळ वगळायचे ठरवले असल्याचे वृत्त आहे. केवळ हिंदू राजांच्या पराक्रमांच्या गाथा शिकवणे, वैदिक आणि पौराणिक इतिहासाला महत्व देणे हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य आहे. थोडक्यात इतिहासाचे वैदिकीकरण करत मुस्लीमांसहित इतरांचा (उदा. द्रविड संगम संस्कृती, आदिवासी संस्कृती, उत्तरपूर्व राज्यांचा इतिहास) इतिहास गायब करण्याचे अथवा ते नाही जमले तर धूमील करण्याचे षड्यंत्र यामागे आहे. यामागेही प्रामुख्याने मुस्लीम द्वेष हेच कारण आहे हे उघड आहे अन्यथा मुघल इतिहास वगळण्याचे काही कारण नव्हते. इतिहास हा असा तुकड्यांत वाटता येत नाही. कारण मुघलांबरोबरच तो त्यांच्या हिंदू सरदार, वैदिक सल्लागार, मंत्री इत्यादींचाही इतिहास असतो. राणा प्रतापचा पराभव करणारा अकबराचा सेनापती मानसिंग असतो. इतिहास हा कोण्या एका जातीधर्मापुरता मर्यादित नसून त्याचे पदर सर्व समाजांपर्यंत पसरलेले असतात. किंबहुना इतिहास हा एकाच वेळेस सर्वच समाजघटकांतून व प्रदेशांतून आकाराला येत असतो आणि तो परस्परसंबब्ध आणि म्हणूनच सामायिक इतिहास असतो. इतिहासात बरे-वाईट असते पण ते निरपेक्षपणे अभ्यासून त्यापासून शिकायचे असते. वाटणाऱ्या, आवडणाऱ्या कल्पना इतिहासावर लादता येत नाहीत. तसा प्रयत्न केला तर तो अंगलट येतो हा इतिहासाचाच निर्वाळा आहे. तटस्थातेतून येतो त्यालाच आपण इतिहासाचे समग्र चित्र समजतो जे आपल्याला आपला गतकाळ समजावून घेत भविष्याची रचना करायला सहाय्यभूत ठरते.

आता तर भाजप सरकारने गेल्या बारा हजार वर्षांचा इतिहास लिहिण्यासाठी समिती नेमली आहे. त्या समितीत केवळ उत्तर भारतीय ब्राह्मण आहेत. विशेष म्हणजे ते सर्व संघ विचारांचे आहेत. वेदकाळ मागे नेणे, रामायण-महाभारत खरेच घडले होते हे सिद्ध करणे आणि महत्वाचे म्हणजे सिंधु संस्कृतीचे जनक वैदिक धर्मीयच होते हे दाखवणे आणि हेच वैदिक आर्य जगभर पसरत इंडो-युरोपियन भाषा आणि संस्कृतीचे वाहक कसे झाले हे दाखवणे हा या समितीचा हेतू आहे. यात द्रविड संस्कृती, जैन-बौद्ध संस्कृती, उत्तरपूर्वेची संस्कृती, फार कशाला महिलांची संस्कृती याला स्थानच नाही कारण या समितीत यातील एकालाही प्रतिनिधित्व नाही. प्राकृत पाली भाषा त्यांच्या दृष्टीने अस्तित्वातच नाही. असा हा संघ आणि संघ प्रणीत भाजप सरकार आहे. यात शास्त्रीयपणा कोठेही नाही. वैदिक आर्यांना आणि धर्मियांना वाटतो तो इतिहास ही भावना आहे. सर्वच बाबतीत अशास्त्रीय असलेल्या संघाकडून इतिहासाची हत्या होण्यापलीकडे काहीही होत नाहीय. सहिष्णू म्हणजे काय याची व्याख्या ज्यांना माहित नाही त्या संघाने सेक्युलर चेहरा घ्यायचा प्रयत्न करणे हास्यास्पद आहे हे कोणीही सुज्ञ म्हणेल.

मतापुरते मुस्लिमांना आपल्या “धारेत” खेचण्याचा प्रयत्न हा विचार संघाच्या मुखवटा-बदलूपणाला शोभणारे असले तरी संघेतर सर्वच भारतीय त्याला भुलण्याची शक्यता नाही. संघाचा इतिहासही तसा नाही. मुळात संघाची वैदिक धर्माधारीत सांस्कृतिक वर्चस्ववादाची मुलभूत नीती जोवर कायम आहे तोवर संघाची प्रत्येक कृती अथवा वक्तव्ये प्रश्नांकितच राहणार. चित्रकुटचे “राजकीय” विचारमंथन तसेच प्रश्नांकित आहे. उत्तर प्रदेशमधील निवडणुकीवर त्याचा काय परिणाम होणार हे लवकरच समोर येईल! पण संघाचा “डीएनए” हाच मुळात “असत्य” हा आहे हे सर्वांनी समजावून घेण्याची आवश्यकता आहे.

sanjaysonawani@gmail.com




शेरशहा सुरी: एक कुशल प्रशासक

  शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषि...