Friday, January 21, 2022

मानवाच्या अचाट धैर्याचा अविष्कार


 


मानवाचे भूतलावर आगमन झाले तेंव्हा त्याला अन्न आणि शिकारीसाठी भटकावे लागायचे. अनुभवाने कोठे जास्त शिकार मिळेल वा कोठे फळे-कंदमुळे विपुल प्रमाणात असतील हे त्याला माहित झाल्याने त्याची भ्रमंती अशाच भागांमध्ये व्हायची. स्थलांतरे व्हायची ती दुष्काळ, रोगराई, किंवा एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे. पण आपत्ती दूर झाली को टोळ्या आपापल्या ज्ञात प्रदेशात परतत असत. तो शिकारीसाठी पत्थर, लाकडी सोटे हत्यार म्हणून वापरत असे. त्यांचा उपयोग तो फळे-कंदमुळे काढण्यासाठीही करत असे. नंतर तो हाडांपासून शस्त्रे, ते अगदी टोचण्याही बनवू लागला. नंतर कठीण दगड तासून अणकुचीदार हत्यारे बनवायची कला विकसित केली. पण त्यासाठी विशिष्ट प्रकारचे कठीण पत्थर, स्फटिके, गारगोट्या लागत. त्यांची ठिकाणे सीमित होती. पाचीन मानव अशा ठिकाणी जाऊन आपली हत्यारे बनवत राहिल्याने अशा ठिकाणांना कारखान्यांचे स्वरुप आले. जगभरात अनेक ठिकाणी असे अश्मयुगातले हत्यारांचे व उपकरणांचे कारखाने सापडलेले आहेत. महाराष्ट्रात गोदावरी नदीकाठीही असे कारखाने सापडले आहेत. म्हणजे अन्न्संकलक मानव हा तीस-पस्तीस लाख वर्षांपूर्वीच उत्पादक मानव व्यापारीही बनला तो जगण्याच्या अनिवार जिजीवीषेने.

जगातील पहिल्या व्यापाराची नि उत्पादनस्थळांवर ताबा मिळवण्यासाठी युद्धांची सुरुवातही तेवढीच प्राचीन आहे. आपल्या आजच्या मानवप्रजाती आधीच्या आज नष्ट झालेल्या निएन्दरथल प्रजातीही आपल्या आपल्या भागात मिळणा-या नैसर्गिक संसाधनांपासून निर्मित हत्यारे, अलंकार ते शोभिवंत खनिजे यांचा विनिमयाने व्यापार करत असत याचे पुरावे आता उपलब्ध होऊ लागले आहेत. सरासरी दोन लक्ष वर्षांपूर्वी आपल्या आजच्या मानवाचा पूर्वज होमो सेपियन भूतलावर अवतीर्ण झाला. त्याने निएन्दरथल मानवाला नष्ट तरी केले किंवा तो होमो सेपियंसशी स्पर्धा न करू शकल्याने नष्ट झाला याबाबत विद्वानांत मतभेद असले तरी तो नष्ट झाला हे वास्तव आहे.

असे म्हणतात कि विविध मानवी गटांत संभाषण सुरु झाले ते मुळात व्यापाराच्या गरजेतून. भाषेची निर्मिती आणि विकास यात व्यापाराचा मोठा हात आहे यात शंका नाही. एका अर्थाने जग हे सरासरी वीस हजार वर्षांपूर्वी आलेल्या हिमयुगापर्यंत स्थिर झाले होते. त्यांच्या भ्रमंतीच्या, शिकारीच्या आणि विनिमयाच्या मार्गांतही स्थैर्य आलेले होते. पण हिमयुगामुळे स्थिती बदलली. समुद्राची पातळी चारशे फुटांनी खालावली. बहुसंख्य प्रदेश हिमाने भरून गेले. या काळात अनेक महाकाय प्राण्यांचा भूतलावरून अस्तही झाला. माणसाला जगण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरे करावी लागली. या विपरीत हवामानाला तोंड देण्यासाठी माणसाने कल्पकतेने कातड्याचे कपडे शिवणे आदी काही शोधही लावले.  या काळात मानवी लोकसंख्याही लक्षणीयरीत्या घटली. पण हळूहळू उबदार वातावरण पसरू लागले. गोठलेल्या नद्या वाहू लागल्या. जगातील सृष्टीच हिमयुगाच्या अस्तानंतर बदलून गेली. ती माणसाला सहाय्यक होती. या स्थितीने माणसाला शिकवलेही खूप. हिमयुगाच्या अस्तानंतर मानव पुन्हा नव्याने जगात वितरीत झाला. स्थिर होण्याची गरज भासल्याने त्याने शेतीचाही शोध लावला आणि शेतीसाठी उपयुक्त ज्ञान-तंत्रद्न्यानातही विस्फोट झाला. एकाच ठिकाणी राहायचे तर तशा टिकावू निवा-यांचीही आवशक्यता होती. भोवताली उपलब्ध नैसर्गिक साधनांतून त्याने तसे निवारेही बनवले. जीवनव्यवहार गुंतागुंतीचा बनला तशी भाषाही प्रगत होत गेली. शेतीमुळे असंख्य नव्या शब्दाची निर्मिती या काळापासून व्हायला जगभरच सुरुवात झाली. त्यातूनच प्राथमिक व्याकरणही साकार होऊ लागले. शेतीमुळे अधिकचे उत्पादन शक्य झाल्याने अतिरिक्त उत्पादन अन्यत्र विकणे आणि आपल्याकडे नसलेले विकत घेणे याचे गरज निर्माण झाली. तोवर तांब्याचाही शोध लागला होता. तांबे काही सर्वच ठिकाणी उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्या धातूचा व्यापारही होऊ लागला. त्याबरोबरच धातू शुद्ध करणे ते त्यापासून वस्तू बनवणे या आद्य तंत्रज्ञानाचाही प्रसार होत गेला. व्यापारांची ठिकाणेही निश्चित होऊ लागली. या ठिकाणांना आणि मानवी वस्त्यांना जोडणा-या आद्य व्यापारी मार्गांच्या निर्मितीची सुरुवात अशी झाली.

त्या काळात सुसज्ज रस्त्यांची गरज भासली नव्हती. मालाची वाहतूक ही ओझेवाहू जनावरांच्या पाठीवरून किंवा माणसांच्या श्रमाने होत असे. या मर्यादांमुळे हा व्यापार जवळच्या प्रदेशातच सीमित असे. अतिदुरचा व्यापार अजून शक्य झालेला नव्हता. दूरच्या भूगोलाचे आणि तेथील माणसांबाबतचे अज्ञान हेही त्याला कारण होते. पण मनुष्य हा निरंतर साहसी आणि कल्पक राहिलेला आहे. काही धाडशी आद्य प्रवाशांनी अपार जिज्ञासेतून किमान आपल्या खंडांतील दूरच्या प्रदेशांची ओळख करून घेतली आणि व्यापारी त्याचा लाभ घ्यायला पुढे सरसावले.

बैलगाडीच्या शोधाने मालवाहतूक सुलभ झाली. जगातील आद्य बैलगाडी सिंधू संस्कृतीत बनल्याचे इसपू ३५०० मधील पुरावे हरप्पा येथे सापडले आहेत. हा शोध फार लवकर आशिया खंडात पसरला. जुब्लीजाना (स्लोवेनिया) येथे इसपू ३२०० मधील गाडीचा पुरावा उपलब्ध आहे. मेसोपोटेमिया आणि इजिप्तमध्ये या पाठोपाठ आपल्याला मालवाहू गाड्यांचा प्रसार झालेला दिसतो. या गाड्या बैल, उंट किंवा खेचरांकरवी ओढल्या जायच्या. अधिक माल दूरवर वाहून नेणे त्यामुळे सोपे झाले. त्यामुळे जुन्या वाटांचीही पुनर्रचना झाली. पायवाटा रस्ते बनू लागले. गाड्यांचे तंत्रज्ञान संपूर्ण आशिया खंडात पसरले ते व्यापारामुळे होणा-या संपर्कामुळे.

अर्थात दुर्गम डोंगराळ आणि वाळवंटी प्रदेशांत बैलगाड्या कुचकामी होत्या. मुळात पर्वतांपलीकडे जाण्यासाठी खिंडी शोधणे आणि त्या वापरण्यायोग्य बनवणे हे एक आव्हान होते. त्यात रानटी लुटारू टोळ्या, हिंस्त्र श्वापदे आणि बदलती हवामाने यांचे संकट सतत डोक्यावर असे. तरीही जीवावरचे धोके पत्करत लोकांनी सुदूर देशांशी व्यापार का केला असेल? असे कोणते अचाट वेड आणि धैर्य त्याच्यात होते? मानवाचा इतिहास हाच मुळात त्याच्या अचाट धैर्याचा आणि संयमाचा आहे हे आपल्याला या निमित्ताने लक्षात येईल.

-संजय सोनवणी




Wednesday, January 19, 2022

तो मी नव्हेच... - संजय सोनवणे

 (सोनवणेसाहेब, भन्नाट. असं खरोखरच घडत नसेल याची मला खात्री आहे. पण लेखनशैलीचा उत्कृष्ठ नमुना म्हणून दाद देतो!)

 

तो मी नव्हेच...

 - संजय सोनवणे

संजय सोनवणी समजून माझा (संजय सोनवणे) सत्कार होण्याचा अतीप्रसंग मी अनेकदा शिताफीनं टाळला आहे. पण अडचण पुढं होते. नावातल्या सारखेपणामुळे अनेकदा विविध परिसंवादात, साहित्य संमेलनात आयोजक, साहित्यीक, वाचक लोक इतर मान्यवर नेहमीच एक वाक्य कौतूकानं बोलतात. तुमचं लेखन मी अनेकदा वाचलं आहे. तुमची पुस्तकं..त्यावरचं विश्लेषणं करायला लावतात. त्यातल्या भूमिकेविषयी चर्चा करायला सांगतात, अचानक मला...मंचावर, विचार, व्यासपीठावर बोलायला बोलावतात. आता त्यांनी मला सोनवणी समजून खिंडीत गाठलेलं असतं, आणि मला धारातीर्थी पडल्याशिवाय गत्यंतर नसतं... संजय सोनवणी यांच्या पुस्तकांचा वाचक म्हणून मी माझं मत मांडू शकतो. पण मीच संजय सोनवणी असल्याचा आविर्भाव मला कधीही परवडणारा नसतो. पैशांचं सोंग करता येत नाही, तसं सोनवणींच सोंगही मला परवडणारं नस्तं, आडातंच नस्त तर पोह-यात आणण्याचा प्रयत्न करणं धोक्याचं असतं. पण मी सोनवणी नसलो म्हणून काय झालं...सोनवणे तरी आहे ना...केवळ एका वेलांटीची मात्रा झाल्यानं...संजय सोनवणींच्या नावानं तुम्हीच केलेला भ्रमाचा भोपळा संजय सोनवणेवर फोडण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला..हा प्रश्न मनात पेटलेला असतो. तिथं सोनवणी नसल्याचं बिल या सोनवणेवर फाडून इतक्या कमालीच्या नृशंस, अमानवी, तुच्छतापूर्ण वैचारिक हिंसेने इतक्या उंचावर (चढवून) इतक्या सहजतेनं निर्दयपणे तळागाळातल्या रसातळावर ढकलून देण्याचा मी मनातल्या मनात निषेध केलेला असतो. सोनवणे असल्याचा आणि सोनवणी नसल्याचा अहंकार किंवा स्वाभिमान म्हणतात तो काय...मनात अचानक जागा झालेला असतो. शिवाय कार्यक्रमात चक्क सोनवणी आलेले आहेत, हा त्यांच्या चेह-यावरचा आनंद मला इतक्या निर्दयपणे हिसकावून घ्यायचा नसतो. तुम्हाला मी उंच उंचावरील स्वर्गात नेलं नाही..हे कबूल पण अगदी नर्कातही ढकलेलं नाही...हे विषय दिलेल्या व्याख्यानातून पटवण्याचा प्रयत्न करण्याशिवाय माझ्याकडे गत्यंतर नसतं. पण असं विचारणारे अनेकदा वाचन क्षेत्रातले मान्यवर असतात. सोनवणींना न भेटलेले, पण केवळ त्यांच्या लेखनावरून त्यांना अोळखणारे असतात. सुरुवातीलांच मी सोनवणी नसल्याचं सांगितल्यावर त्यांच्या , अरे रे..च्च, च्च..च्च हा तो नाही..अशा तुच्छतापूर्ण नजरांचा सामना मला सुरुवातीलांच करायचा नसतो. बरं ही आलीया भोगासी...अशी परिस्थिती तयार होण्यात माझा जाणीवपूर्वक व्यक्तीगत दोष कधीच नसतो. असलाच तर माझा परिस्थितीजन्य नाईलाज असतो. मी स्वतःला सोनवणी असल्याचं कुठंही, कुणालाही, कधीही.. सांगितलेलं नस्तं, हा वैचारिक अब्रू घालवणार बैल कोण का म्हणून अंगावर अोढून घेईल..सोनवणींबाबत थोडी इर्ष्या वाटू लागलेली असतानांच....प्रत्येकाचं आपलं स्वतंत्र व्यक्तीमत्व असतं या सिद्धांतावरचा विश्वास आठवत मी मनाला समजावलेलं असतं. आता मी सोनवणींच्या लेखनाविषयी जितकं मला समजतं तेवढी चर्चा सुरू केलेली असते.

 

या अडचणीच्या वेळी मला आईन्स्टाईनच्या ड्रायव्हरची कथा आठवलेली असते. एका ठिकाणी आईन्स्टाईनला त्याच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतावर चर्चा करायला जायचं असतं. सोबत गाडीत ड्रायव्हर असतो. आईन्स्टाईनला आराम करण्याची धोकादायक इच्छा होते. त्यावेळी ड्रायव्हरला ख-या आईन्स्टाईनकडून खोटा आईन्स्टाईन बनवलं जातं. खरा आईन्स्टाईन ड्रायव्हरला म्हणतो.. ज्या ठिकाणी आपण चाललो आहोत, त्या गावातल्या लोकांनी मला पाहिलेलं नाही. त्यामुळे मी आता आराम करेन, जरा तब्बेत ठिक नाही माझी... आणि तुला आईनस्टाईन म्हणून माझ्या या सापेक्षतावादारचं व्याख्यान द्यावं लागेल. नोकरी धोक्यात येईल या भीतीनं, साहेबांचा आदेश म्हणून ड्रायव्हर आईन्स्टाईन बनतो. गाडीत साहेबांकडून सापेक्षवादाविषयी इतरांशी झालेल्या चर्चेत ड्रायव्हरनं मोडकं तोडकं एेकलंलं असतं, त्याच भरवशावर आता ख-या खु-या आईन्स्टाईनची जागा ड्रायव्हरला घ्यायची असते. हे सगळं प्रवासातंच ठरतं, कारमधल्या जागा बदलतात. ड्रायव्हर असलेले आईन्स्टाईन साहेब मागं बसतात आणि खरा संशोधक आईन्स्टाईन ड्रायव्हरच्या सीटवर,गाडी पुढं न्यायला, व्याख्यानाचं गाव येतं. हारतुरे सत्कार होतात, तिथपर्यंत सगळं ठिक असतं. पण विषय व्याख्यानाचा येतो. ड्रायव्हर आईन्स्टाईनसाहेब सापेक्षतावादावर दोन अडीच तास छान बोलतात. मग प्रश्नउत्तरांचा तास..श्रोत्याकडून आलेल्या सापेक्षवादाच्या एका किचकट, कठिण प्रश्नावर ड्रायव्हर आईन्स्टाईनची अडचण होते. पण ड्रायव्हरसाहेब अवसान आणून वेळ मारत, म्हणतात... तुम्ही इतका सोपा प्रश्न विचारला आहे की त्याचं उत्तर माझा ड्रायव्हरही देऊ शकतो. आणि ड्रायव्हर म्हणजे खराखुरा आईन्स्टाईन त्या प्रश्नाचं उत्तर देऊन व्याख्यान संपवल्याचं जाहीर करतो.

 

ती सोय कथेतल्या आईन्स्टाईनच्या भाग्यवान ड्रायव्हरला होती...तशी मला नसते. नावातल्या सारखेपणामुळे मला तसंही करता येत नसतं...पण सोनवणींच्या लेखनाविषयी चर्चा करता करता काळ वेळ पाहून, कुणाच्या भ्रमभावना दुखावणार नाहीत हे पाहून... हळूच मी संजय सोनवणे असल्याचं कार्यक्रमात बोलून टाकलेलं असतं, आणि या प्रेमानं लादलेल्या या वैचारिक सोंगातून स्वतःची कशीबशी सुटका केलेली असते. त्यावेळीही कशासाठी टाळ्या पडतात हे समजलेलं नसतं...(त्या टाळ्या नक्कीच सोनवणींच्या मालकीच्या असतात) ज्यांना मी सोनवणी असल्याचं वाटलेलं असतं, ज्यांनी तसा ठाम समज करून घेतलेला असतो.. त्यांच्या वैचारीक भ्रमनिरासाचं दुःख पाहून मला, उगाचंच मी सोनवणी नसल्याची खंत वाटते. पण दुस-या क्षणी हा अपराध जर असेल तर तो सोनवणींचाच आहे. त्यांनीच इथं असायला हवं होतं, असं वाटून मी माझी या वैचारिक विवंचनेतून सुटका करून घेतो. त्यावेळी मी फक्त आणि फक्त संजय सोनवणे असतो..सोनवणी नाही

 

 

Saturday, January 15, 2022

भाषा ही सामर्थ्यवंताचीच असते

 भाषा अनेकदा अर्थसत्तेची गुलाम असते. मुंबईतील अमेरिकन कौन्सुलेटमध्ये व्हिसासाठी गुजराती भाषेत पाट्या असतात. आज मुंबईतील ७०% व्यवहार गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेत चालतात. मराठी भाषा सर्वांना शिकणे अपरिहार्य तेंव्हाच वाटेल जेंव्हा मराठी भाषा रोजी-रोटीचे साधन बनेल आणि हे तेंव्हाच शक्य आहे जेंव्हा मराठी माणूस अर्थसत्तेची सूत्रे हाती घेईल. केवळ भाषिक अस्मिता पोट भरू शकत नाही. बव्हंशी मराठी लेखक-कलाकारही जेथे आर्थिक विवंचनेत असतात त्यांनीही कितीही मराठीचा जयघोष केला तरी सामान्य माणसे त्या भाषेकडे वळण्याची शक्यता नाही. भाषा ही सामर्थ्यवंताचीच असते हे वास्तव विसरून चालणार नाही.

आज स्टोरीटेलसारखी आंतरराष्ट्रीय कंपनी मराठीतही अवाढव्य प्रमाणावर साहित्य उपलब्ध करून देवू लागली आहे. मराठी प्रकाशक-लेखकही आपापल्या परीने उत्कृष्ठ साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण ग्रंथ विक्री आणि अगदी स्वस्तात ऐकण्याची संधी देवूनसुद्धा ग्राहकांची या बारा कोटीच्या महाराष्ट्रात एकुणातील विक्रीचे प्रमाण पाहिले तर लाज वाटावी अशी स्थिती आहे. साहित्याबाबतची अनास्था हे कारण जसे देता येईल त्यापेक्षा लोकांची कमी असलेली क्रयशक्ती हेसुद्धा यामागील महत्वाचे कारण आहे हे आपल्या लक्षात येईल. ज्या भाषेत विपुल विविधांगी लेखक आणि तेवढेच उत्साही वाचक नसतात त्यांची भाषा ही दुय्यम होत जाणार यात शंका बाळगायचे कारण नाही.
भाषा वर्धिष्णू व्हायची असेल तर आपले अर्थजगतातील स्थानही मजबूत व्हायला हवे. आमच्या तरुण पिढ्या स्पर्धा परीक्षांसाठी विपुल वाचतात. कशीबशी कायमची सरकारी आणि तीही नाही मिळाली तर खाजगी नोकरी पटकावणे हेच ज्या समाजाचे ध्येय बनलेले आहे त्यांच्यात “साहित्य” आणि “आपली भाषा” हा काही प्राधान्यक्रमाचा विषय असू शकत नाही. उद्या चीनमध्ये रोजगाराच्या संधी आहेत हे लक्षात आले तर गल्ली-बोळात चीनी भाषा शिकवणारे वर्ग निघतील. जेथे पोटासाठी राष्ट्राभिमान गौण ठरतो तेथे मातृभाषा आणि तिचे वर्धन-जतन महत्वाचे मानले जाईल ही आशा व्यर्थ आहे.
मराठी भाषा अभिजात म्हणून घोषित व्हावी यासाठी माझे परममित्र प्रा. हरी नरके आणि त्यांचे सहकारी प्राणपणाने प्रयत्न करत आहेत. संस्कृतनिष्ठांचे सारे अडथळे
ओलांडून आज ना उद्या ती होइलही. शिक्षण मातृभाषेत नसले तर विद्यार्थ्यांचे आकलन अशक्त होते हा जागतिक शिक्षणतज्ञांचा निर्वाळा आहे. शिक्षण मराठीतच (ज्यांचे मातृभाषा मराठी भाषा आहे त्यांच्यासाठी) असले पाहिजे. अन्य भाषाही त्याच सामर्थ्याने नंतर शिकता येतात. पण हे समजावे ही महाराष्ट्रच काय पण भारतातील पालकांची इच्छा नाही आणि याला जबाबदार आमचेच तथाकथित शिक्षणतद्न्य आणि अडाणी राजकारणी आहेत. विचारवन्तांनीही अपवाद वगळता यात काही फारसे दिवे लावलेले आहेत असे नाही.
इंग्रजी भाषिक स्तंभ लेखन करणा-या लेखकाला १००० शब्दांसाठी किमान पाच हजार मिळतात तर मराठीत अधिकाधिक एक हजार. (अनेकांना तर तेही मिळत नाहीत.) इंग्रजी वृत्तपत्रांचा खप प्रादेशिक भाषांपेक्षा कमी असून ही विसंगती आहे. मग अभ्यासू-दर्जेदार लेखन लिहिले जाण्याची शक्यता नाही. पण वाचकांनाही त्याचा फरक पडत नसेल तर दर्जाचा विचार कोण करतो? भाषा यामुळे उलट अपंग होते हा विचारही लेखक कशाला करतो? मग अक्षरश: पाट्या टाकल्या जातात. जसा समाज तसा नेता हे विधान खरे मानले तर समाजाच्या लायकीप्रमाणेच लेखकही मिळणार हे ओघाने आलेच. यातून कोणतीही भाषिक क्रांती होत नसते. विकास तर दूरची बाब. उलटे अध:पतन होत राहणार हे ओघाने आलेच.
राजकीय कारणासाठी कधी भाषिक, कधी ऐतिहासिक मुद्दे काढणे हा आपल्या राजकारन्यांचा नीच धंदा झालेला आहे. मराठीतील पाट्या हा त्यातीलच एक प्रकार आहे. कायद्याने जबरदस्ती करून भाषिक अहंकाराचा/अस्मितेचा राजकीय कंड शमवता येईल, मतेही गोळा करता येतील, पण त्यातून भाषेचे कल्याण होण्याची शक्यता नाही. अनेक मराठी पाट्यांवरील मराठी हास्यास्पद आणि लाज आणणारी असते हे सर्वांना माहीतच आहे. मुळात मातृभाषेची आणि राजभाषेची जगण्यासाठीची गरज, महत्व जोवर लोकांनाच समजत नाही (मग ते परभाषी का असेनात) तोवर अशा नियमांचा आणि मराठीचे कल्याण होण्याचा संबंध नाही. तोडफोड करणे, धमकावणे ही तर असंवैधानिक कृती झाली, ज्याचे समर्थन कोणीही भारतीय करू शकणार नाही.
मराठी माणसाने आपली अर्थसत्ता (जी आज नाहीच) ती कशी विस्तारता येईल हे पाहिले पाहिजे. आपल्या समाजजाणीव आणि साहित्य जाणीवा कशा विस्तारता येतील, प्रगल्भ बनवता येतील हे पाहिले पाहिजे. मातृभाषेतले शिक्षणच पाल्याला मिळावे असा रास्त आग्रह धरला पाहिजे. यासाठी सर्वांनीच कंबर कसली पाहिजे.
भाषा हा राजकारणाचा विषय नाही. हा समाजाचा आणि भावी पिढ्यांच्या मानसिक विकासाचा प्रश्न आहे हे सर्वांना समजावून घ्यावे लागेल. नुसते “माय मराठी” करून चालणार नाही. ही बनचुकवेगिरी झाली. ख-या मुद्द्यांना आम्हाला भिडावे लागेल. अन्यथा "पाट्या टाकणारी मराठी" असे स्वरूप येईल आणि ते परवडणारे नाही.
-संजय सोनवणी

Friday, January 7, 2022

पुरातन काळापासुनचे सांस्कृतिक सेतू!

 पुरातन काळापासुनचे सांस्कृतिक सेतू!



रेशीम मार्ग हा जगभरच्या लोकांच्या अपार कुतूहलाचा विषय आहे. चीन पासून युरोपपर्यंत जाणा-या या प्राचीन मार्गावर स्वामित्वासाठी आजवर असंख्य युद्धे झडलेली आहेत. चीनने “वन बेल्ट वन रोड” (ओबोर) हा महत्वाकांक्षी प्रकल्प हातात घेऊन प्राचीन व्यापारी मार्गांचे पुनरुज्जीवन करण्याचा चंग बांधलेला आहे. भारत-चीन हे १९६२ चे युद्ध झाले तेच मुळात चीनने भारतीय हद्दीतून (अक्साई चीनमधून) जाणा-या प्राचीन व्यापारी मार्गावरील १५८ किलोमीटर रस्त्यावर आधुनिक रस्ता बनवायला सुरुवात केल्याने. आताही लदाखमध्ये चीनची जे घुसखोरी सुरु आहे ते तेथून मध्य आशियाला जाणा-या पुरातन मार्गांवर कब्जा मिळवण्यासाठी व आधुनिकीकरण करून ते पुन्हा वापरात आणण्यासाठी. थोडक्यात चीनचा जागतिक व्यापार व लष्करी वर्चस्व वाढवणे हाच हेतू त्यामागे आहे. गिलगीट – बाल्टीस्थान या पाकिस्तानने बळकावलेल्या भारतीय भागातून मध्य आशियातील मुख्य रेशीममार्गाला जोडणारे तीन प्राचीन व्यापारी मार्ग होते. चीनने तेथून काराकोरम हायवे तयार करून पाकिस्तानला जोडून घेतले आहे. अरुणाचल प्रदेशातीलही घुसखोरीला हीच परिमाणे आहेत. म्हणजे व्यापारी मार्ग हे केवळ आर्थिक भरभराट व्हावी यासाठी बनवले जात नसून त्यामागे लष्करी वर्चस्व निर्माण करणे हाही महत्वाचा हेतू असतो हे आपल्या लक्षात येईल.

भारत पुरातन काळापासून पश्चिमोत्तर, उत्तर आणि पूर्वोत्तर भागातून जाणा-या अनेक व्यापारी मार्गांनी जोडला गेलेला होता. हे मार्ग हिमालयीन व हिंदुकुश पर्वतराजीतून जात असल्याने अत्यंत दुर्गम होते. तरीही साहसी व्यापा-यांनी जीवावरची संकटे पेलत जगाशी भारताची नाळ जुळवली. व्यापाराच्या निमित्ताने झालेली सर्वात महत्वाची बाब म्हणजे सांस्कृतिक व तंत्रज्ञानाची देवान-घेवाण. जगभरच्या अनेक पुराकथांमध्ये जे साम्य आढळते ते याच देवान-घेवाणीतून. अनेक शब्द, तांत्रिक सद्न्या, यांचाही प्रसार व्हायला या व्यापारी मार्गांची मदत तर झालीच पण बौद्धादी धर्म याच व्यापारी मार्गांनी आशिया खंडात पसरले हे आपल्याला पाहता येते. पश्चिमोत्तर भागातून जाणा-या चार व्यापारी मार्गांचा वापर तर सिंधू काळापासून सुरु आहे. याच मार्गांनी सिंधूजणांनी प्राचीन इराण, मेसोपोटेमिया ते इजिप्तपर्यंत आपला व्यापार वाढवला. एवढेच नव्हे तर ऑक्सस नदीचे खोरे ते पार सुमेरमध्येही आपल्या व्यापारी वसाहती वसवल्या. प्रसंगी त्यासाठी युद्धेही केली. नंतरच्या काळात भारतीय राजांनी पार बल्ख (Bactria) ते समरंकंदपर्यंत आपल्या सत्ता विस्तारल्या त्या याच मार्गांवरून स्वा-या करत. भारतावर झालेली विविध आक्रमनेही याच मार्गांनी झाली. याला उत्तर भागातून हिमालयाच्या अतिदुर्गम अशा व्यापारी मार्गांचाही अपवाद नाही.

पूर्वोत्तर भारतातून जाणारे व्यापारी मार्ग चीन (युनान) आणि दक्षिण-पूर्व आशियातील पार थायलंडपर्यंत पोचत होते. या मार्गांवरून अनेक मानवी स्थलांतरेही झालेली आहेत. भारतात वैदिक, शक, हूण, कुशाण, अरब, मोगल, तुर्क इ. आक्रमणे व स्थलांतरे झाली तीही उत्तरेतून, अथवा पश्चिमोत्तर भागातून येणा-या मार्गांनीच. या सा-यांचा आर्थिक व सांस्कृतिक प्रभाव अर्थातच भारतीय, विशेष करून उतर भारतीय संस्कृतीवर पडला. संस्कृतिचा प्रवास हा कधीच एकतर्फी नसतो. कारण आपले व्यापारी जसे बाहेर जात तसेच तिकडील व्यापारीही भारतात येत. भारतीयांनीही आशिया व युरोप खंडाच्या संस्कृतीवर विलक्षण प्रभाव टाकला. तो केवळ व्यापार आणि या मार्गांवरून जाणा-या साहसी प्रवाशांमुळे. आक्रमणे हेही एक कारण आहेच. भारताने बाह्य भूभागावर कधी आक्रमण केले नाही ही एक वदंता आहे. त्यात सत्य नाही. पश्चिम आशिया व मध्य आशियावर भारतीय भाषा व संस्कृतीचा प्रभाव अमिट असा आहे. उत्तर भारतीय भाषांवर बाहेरून आलेल्या तथाकथित आर्यांच्या भाषांचा प्रभाव नसून खरा प्रकार त्या उलट आहे हे भारताचे पुरातन काळापासुनचे मध्य व पश्चिम आशियाशी असलेले व्यापारी संबंध पाहिले कि सहज लक्षात येईल अर्थातच भारतीयांनीही आपल्या भाषेत अनेक शब्द व सद्न्या उधार घेतले असणारच आहेत. तीच बाब धार्मिक संकल्पनांची. भारतात सूर्यपूजा आली ती पश्चिम आशियातून. शिवलिंगपूजा पश्चिम आशियात गेली ती भारतातून. अर्थात संकल्पनांची देवान-घेवाण होत असतांना त्या स्वीकारणारे त्या जशाच्या तशा स्वीकारत नाहीत तर आपले संस्कारही करतात. यातूनच संस्कृती नव्या नव्या स्वरूपात फुलत गेली आहे. वास्तुशास्त्रावरचेही असेच प्रभाव आपल्याला प्राचीन काळापासून पहायला मिळतात. अंकगणित, भूमिती ते ग्रह-ता-याबद्दलचे ज्ञानही याच मार्गांमुळे पसरू शकले.

थोडक्यात प्राचीन व्यापारी मार्ग हे केवळ अर्थ समृद्धीचे साधन नव्हते. त्यातून सांस्कृतिक प्रवासही मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. व्यापारी मार्ग हे अनेक युद्धांचे कारणही बनले आहेत. प्राचीन काळात ज्याची व्यापारी मार्गावर सत्ता त्याची भवतालच्या भूभागावर सत्त्ता असाच नियम असल्याने बव्हंशी युद्धे ही या मार्गांवर स्वामित्व मिळवण्यासाठी झालेली आहेत. भारतावर महम्मद कासीमचे आक्रमण धर्मप्रसारासाठी झाले नव्हते तर देवल येथील व्यापारी बंदर व अफगानिस्तानातून जाणा-या व्यापारी मार्गांवर स्वामित्व मिळवण्यासाठी झाले होते. अरब, इराणी, भारतिय, मध्य आशियातील नगरसत्ता, तिबेट, चीन यांनी मध्ययुगापर्यंत केलेली युद्धे ही या व्यापारी मार्गांवरील स्वामित्वासाठी होती. चीन आजही या मार्गांचे पुनरुज्जीवन करत असेल तर त्यामागील अर्थ आपण समजावून घ्यायला हवा.

दुर्दैवाने भारतीय अभ्यासकांनी भारतातील अंतर्गत प्राचीन व्यापारी मार्गांचा काही प्रमाणात अभ्यास केला असला तरी भारतातून जगाला जोडणा-या मार्गांबद्दल फारच नगण्य संशोधन केले होते. माझ्या संशोधन प्रस्तावाला भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंडळाने मान्यता दिल्याने मी हे संशोधन करू शकलो. या प्राचीन व्यापारी मार्गांचा इतिहास समजावून घेतल्याखेरीज आपण वर्तमानातले त्यांचे व्यापारी आणि सामरिक महत्व समजावून घेऊ शकणार नाही. या सदरातून मी आपणासमोर या मार्गांचा प्राचीन काळापासूनचा चित्तथरारक इतिहास ठेवणार आहे. गतवर्षीच्या “इतिहासाचे कवडसे” या सदराला आपण जसा प्रतिसाद दिला तसाच याही सदराला द्याल आणि एक महत्वाचा इतिहास समजावून घ्याल ही आशा आहे.

-    संजय सोनवणी

 

“पउमचरिय”: रामकथेवरील आद्य महाकाव्य

          भारतीयांवरील रामकथेची मोहिनी अचाट आहे. रामकथेचे मूळ नेमक्या कोणत्या स्त्रोतात आहे हे शोधण्याचाही प्रयत्न झाला आहे. परंपरेने वाल्...