Tuesday, March 28, 2023

इहवादी मानासिकतेशिवाय श्रीमंत होणे अशक्य!

  


 


श्रीमंत व्हावे असे कोणाला वाटत नाही? मनुष्य या धरातलावर अवतरला तेंव्हापासून त्याची प्रवृत्ती ही अधिकाधिक संग्रह करण्याची राहिलेली आहे.  संपत्तीचे मापदंड मनुष्याच्या प्रगतीसोबतच बदलत राहिल्याचेही आपण मानवजातीच्या इतिहासात पाहिले आहे. पशुपालक मानव हा आपले पशुधन कसे वाढेल याचाच प्रयत्न करत असायचा तर कृषी मानव आपले शेतीतील उत्पन्न कसे वाढेल याचीच चिंता करत असायचा. वस्तू-विनिमायातून त्याने व्यापार करायचे कलाही साध्य केली. आपल्याकडे जे अतिरिक्त आहे ते विकायचे आणि जे नाही ते खरेदी करायचे हा प्रकार जगभरच्या मानवी टोळ्यांत अस्तित्वात आला. वस्तुविनिमयात अडचणी जाणवल्या तसा चलनाचा शोधही लावला गेला.  व्यापार अधिक सुलभ झाला. शेतीसाठी धरणे/कालवे बांधायची कलाही मानवाने विकसित केली. मनुष्य जेंव्हा शिकारी मानव होता तेंव्हाही त्याने दगड/गारगोट्या/लाकूड/हाडे यांचा वापर करत हत्यारे बनवायचे शोध लावले. या शोधातून आद्य हत्यारनिर्मितीचे कारखाने निघू लागले. असे कारखाने अगदी महाराष्ट्रातही नद्यांच्या खोर्यांत सापडलेले आहेत. जेथे सुयोग्य असा कच्चा माल (म्हणजे कठीण खडक किंवा स्फटिक, तेथे तेथे माणसाने कल्पकतेने हे कारखाने काढले. कच्चा माल संपला कि त्या जागेचा त्याग करून अन्यत्र शोध घेण्यासाठी भटकंती केली. ही हत्यारे तो विकताही असणार हे उघड आहे. आणि कशाला हवी होती ही हत्यारे? तर शिकार करण्यासाठी तसेच शत्रू टोळ्यांशी युद्ध करण्यासाठी. मनुष्याने व्यापार सुरु केला याचा इतिहास अत्यंत पुरातन आहे. शिकारीसाठी लागत होती तशी दुस-या शत्रू टोळ्यंशी लढायलाही लागत होती हे उघड आहे. म्हणजे हत्यारे आणि शिकार असलेली जंगले हे त्याचे जगण्याचे भांडवल होते. आपल्या जंगलात शिकार कमी झाली कि दुस-या जंगलाचा शोध घेणे, इतर टोळ्याही त्यावर कब्जा करायला आल्या कि लढून त्यांना हुसकावने हे प्रकार होतेच. शिकारीचे वाटप/स्त्रीयांचेही वाटप टोळ्यांत समान होते असेही आपल्याला दिसत नाही.  म्हणजेच, नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करून, त्यावर प्रक्रिया करून संपत्तीची निर्मिते करणे, ही मानवाची आंतरिक ओढ होती व आहे. मनुष्यप्राणी हा मुळात:च भांडवलदारी मनोवृत्तीचा आहे असे यावरून आपल्याला दिसते.

 

पण संपत्ती निर्माण करायची आणि सुरक्षित रहायचे यासाठी नुसती प्राकृतिक साधने पुरेशी नव्हती. त्यासाठी स्वटोळी आठवा मित्र टोळ्यांचेही सहकार्य आवश्यक होते. त्यातूनच समाजव्यवस्था व समाजाअंतर्गाताचे नीतीनियमही अस्तित्वात आले. देव-धर्माचा शोध याच प्रेरणेतून लागत गेला. कालौघात त्या त्या काळच्या गरजांप्रमाणे त्यात बदलही होत गेले. शिकारी आठवा पशुपालक होता, विविध टोळ्यांत संघर्ष सुरु असायचे त्या काळातील देव हे युद्धखोर असायचे. शेतीच्या शोधानंतर उदयाला आलेले देव हे सृजन/सुफलन आदी क्रियांचे जनक आहेत अशी कल्पना करून देवता सुफलनात्मक व सृजनात्मक बनल्या. भारतातील शिव-शक्ती या सर्वदूर आजही लोकप्रिय असलेल्या देवता या सृजन क्रियेचे आद्य निर्माते  दैवतयुगल म्हणून निर्माण झाल्या. त्यांनीच सृष्टीला जन्म दिला गेला अशी मिथकेही निर्माण केली गेली. थोडक्यात जनन आणि सृजन या क्रियांना दैवी स्वरूप दिले गेले. असे असले तारे यातील निखळ श्रद्धेचा भाग वगळला तरी यामागे माणसाच्या भौतिक प्रेरणाच अधिक जबाबदार होत्या असे म्हणता येते. राज्य, गणराज्य, साम्राज्य या संकल्पनाही सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठे विकसित करण्यात आल्या. प्राचीन काळापासून जगातील बहुतेक  ही आर्थिक कारणांनीच झाली. व्यापारी मार्गावर ज्याचे स्वामित्व तोच श्रेष्ठ या कल्पनेचा उदय इसपू साडेतीन हजार वर्षांपूर्वीच झाला. जागतिक शेती उत्पादनांबरोबरच अलंकार ते शेतीउपयोगी उत्पादनांची शिस्तबद्ध वाढ आणि व्यापार सुरु झाला. राज्यकर्तेही तेवढेच कररुपी उत्पन्न मिळवण्यात अग्रेसर झाले. एका अर्थाने मानवजातीच्या प्रगती आणि अध:पतनाचाचा इतिहास म्हणजेच अर्थव्यवस्थेचा इतिहास आहे. पण आपल्याला राजकीय इतिहासातच अधिक रस असल्याने आर्थिक इतिहास हा आपल्याला माहित करून घेण्याची फारशी आवश्यकता वाटत नाही.

 

श्रीमंत व्हावे असे बहुतेक लोकांचे स्वप्न असले तरी “ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान” किंवा “बिकट वाट वहिवाट यशाची धोपट मार्गा सोडू नको” या सारखे ताताद्न्यान जेंव्हा प्रबळ होत समाजमनावर अधिराज्य गाजवू लागते तेंव्हा मात्र समाजाची अवस्था साचलेल्या डबक्यासारखी होऊ लागते. नवीन शोध घेणे, त्याचे व्यापारी पद्धतीने उत्पादन करत जेथे जेथे मागणी असू शकेल तेथे जात व्यापार वाढवणे अशा प्रेरणाच नष्ट होतात. जगण्याचे आहे तीच पद्धत चांगली वाटु लागते. हवी ती परिस्थिती बदलून भौतिक यश संपादन करावे या भावनेपेक्षा आध्यात्मिक यश श्रेष्ठ वाटू लागते. परलोकावर डोळा ठेवून आहे त्या जगण्यातील परवड सहन करण्यात धन्यता वाटू लागते. गरीबी हा कलंक न वाटता दागिना वाटू लागते. दहाव्या शतकानंतर मुळचा इहवादी भारत अध्यात्मवादी/भक्तीवादी जसा बनत गेला तसे जीवनोपयोगी नवे शोध थांबले. अर्थव्यवस्थेला बळकटी देणा-या उत्पादक व व्यापा-यांच्या श्रेण्यांचा अस्त होत गेला.  त्याचे विपरीत परिणाम समाजव्यवस्थेवरही झाले. बलुतेदारी पद्धतीचा उदय झाला, जातीव्यवस्था निर्माण झाली आणि सारेच आपल्या मर्यादित परिप्रेक्षात जगण्यापुरते कमावण्यात व्यस्त झाले. थोडक्यात अर्थव्यवस्था तर स्थितीस्थापक बनलीच पण समाजव्यवस्थाही दोषाग्रस्त होत गेली.

आजची स्थिती तरी काय आहे? श्रीमंत कसे बनावे, यशस्वी जीवन कसे जगावे यासारख्या विषयांवर असंख्य पुस्तके बाजारात आहेत. त्यांचा तडाखेबंद खप होतानाही दिसतो. प्रेरक व्याख्याने देणारे आपल्या रसाळ वाणीत जगातील धनाढ्याचे किस्से सांगून तरुणांमध्ये जोशही निर्माण करतात. कोणाला बिल गेट्स व्हायचे स्वप्न पडू लागते तर कोणाला एलन मस्क व्हावेसे वाटते. प्रत्यक्षात चित्र काय आहे? हेच क्षणभर प्रेरित झालेले तरुण काही प्रयत्न केल्यानंतर हतबल होतात आणि नाईलाजाने जगण्याच्या मळलेल्या वाटा चालू लागतात. श्रीमंत होणे हे स्वप्न उरात उरले तरी ते एखाद्या भळभळत्या जखमेप्रमाणे सलत राहते. दुस-यांच्या यशाकडे पाहण्याचा कुत्सित दृष्टीकोन विकसित होऊ लागतो. “रोगात श्रीमंतीपेक्षा धडधाकटी गरीबी बरी” या मताशी येऊन ठेपत स्वत:च्या स्थितीत खोटे समाधान शोधू लागतो अथवा गैरमार्ग वापरून का होईना संपत्तीसंचय करण्याचा प्रयत्न करू लागतो.

 

मुळात ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि “भांडवलदारी” ही माणसाची मुलभूत प्रवृत्ती आहे. श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करणे आणि रास्त मार्गाने श्रीमंत होणे यात लाज वाटण्याचे काहीएक कारण नाही.  भारतात एके काळी, अगदी विसाव्या शतकातही श्रीमंतीचा द्वेष करण्याची, श्रीमंती ही वाममार्गानेच मिळू शकते यावर दृढ विश्वास निर्माण होण्याची लाट आली होती. आजही या स्थितीत फारसा बदल झालाय असे नाही. त्याला अर्थात अनेक भ्रष्ट उद्योजक/राजकारणी/प्रशासकीय सेवेतील भ्रष्ट जबाबदार आहेतच. त्यात एखादा तरुण उद्योग-व्यवसाय  काढायचा विचार जरी करू लागला तर “हे काही आपले काम नाही...सरळ नोकरी शोध” असे सल्ले घरातूनच मिळू लागतात. अर्थप्रेरणांचे खच्चीकरण घरातूनच व्हायला सुरुवात होते. धोका पत्करण्याची भीती हे कारण तर असतेच असते. शिवाय इतरही अन्य घटक अर्थप्रेरणांवर परिणाम टाकत असतात, त्यात सरकारी धोरणे हे महत्वाचे कारण.

 

आज आहे त्या स्थितीत बदल घडवून प्रगती साधने, श्रीमंती प्राप्त करणे हे प्रत्येकाचे इहवादी धोरण असले पाहिजे. तशी मानसिकता निर्माण करायला पाहिजे. कशी? याबाबत आपण चर्चा करत राहूच!

 

-संजय सोनवणी

Saturday, March 18, 2023

शिक्षण ज्ञानासाठी कि रोजगारासाठी?


 

शाळा-कॉलेजांत दिले जाणारे शिक्षण हे शिक्षण नसून काय शिकावे याचे विद्यार्थ्याला दिशादिग्दर्शन करणारे असते असे इमर्सन या शिक्षणतज्ञाने अठराव्या शतकात म्हटले होते. शिक्षणाचा हा मुलभूत पाया आपल्या शिक्षणव्यवस्थेतून पुरता दुर्लक्षिला गेलेला आहे. लिहा-वाचायला शिकणे ही शिक्षणाची पहिली पायरी असली तरी विद्यार्थ्याचा एकुण कल लक्षात न घेता पहिली ते दहावी अभासक्रमातील सारेच विषय सर्वच विद्यार्थ्यांवर सरसकट थोपलेले असतात. प्रत्येक विषयात विद्यार्थ्याने अधिकाधिक गूण मिळवावेत एवढीच माफक अपेक्षा आपली शिक्षणव्यवस्था ठेवून असते. सर्वच विषयांत प्रत्येक विद्यार्थ्याला सारखाच रस असणे शक्य नसते. ज्यात रस आहे त्यात अभ्यासक्रमाबाहेर जात कुतुहल दाखवणे विद्यार्थ्याला शक्य असले तरी आपली शिक्षणपद्धती तसे करू देत नाही. किंबहूना कुतुहल वाढवणे हाच अभ्यासक्रमाचा हेतू असतो हेच लक्षात घेतले जात नाही.

 

त्यामुळे रस नाही असे विषय विद्यार्थी सोप्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतात व तो म्हणजे पाठांतर...! ज्यांची स्मरनशक्ती चांगली आहे असे विद्यार्थी चमकतात तर उर्वरीत घोकंपट्टीच्या आधारावर सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करतात. यात बव्हंशी विद्यार्थी शिक्षणातील रस गमावून बसतात व उरते एक औपचारिकशिक्षण नव्हे तर शिक्षा वाटणारी शिक्षणप्रक्रिया. जे शिकावे वाटतेज्यात अधिक प्राविण्य मिळवावे वाटते ते विषय बालवयातच मागे पडतात व विद्यार्थी हा शिक्षणाला कंटाळलेला पण नाईलाज म्हणुन शिकणारा असा घटक बनत जातो. या प्रक्रियेत पदवीपर्यंत पोहोचेपर्यंत अगणित विद्यार्थी शेवटी गळुन पडतात. तोवर शिक्षणाबद्दलचे विद्यार्थ्याचे मत हे "रोजगारार्थ शिक्षण" असेच बनून गेले असल्याने सहविद्यार्थीही त्याचे रोजगाराच्या जीवघेण्या शर्यतीतील महत्वाचे स्पर्धक बनलेले असतात. यातून जी असामाजिक मानसिकता बनते त्यावर आपल्याला गंभीरपणे विचार करावा असे वाटत नाही.

पास होणे व पुढे जाणे या प्रक्रियेत पास होण्याला अनन्यसाधारण महत्व दिले जाते ते शिक्षकपालक ते समाजाकडून. नापास होणारा विद्यार्थी हा कुचकामी असतोबुद्धीहीन असतो असा समज आपण करुन घेत असतो तेंव्हा "बुद्धी"च्या व्याख्येबद्दल आपला सनातन गैरसमज असतो. दरवर्षी दहावी-बारावीनंतर नापास झालेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या आपल्या समाजमानसाच्या मानसिक असंतुलनाचा अपरिहार्य भाग आहे.

 

बरेहे शिकलेलेपदवीधरज्या शाखांमद्धे शिकतात त्यात किती प्राविण्य मिळवलेले असतातजगण्यासाठीचे असे कोणते कौशल्य त्यांनी शिक्षनपद्धतीमुळे आत्मसात केलेले असतेतज्ञांच्या मते अशिशिक्षित व्यक्ती या उलट सुशिक्षितांपेक्षा जगण्याची साधने प्राप्त करण्यात अधिक कुशल असतात. सुशिक्षित बेरोजगार अशी जशी एक व्यापक अवस्था आहे तशी अशिक्षित बेरोजगार मिळणे अवघड आहे कारण किमान अशिक्षिताला जगण्याची साधने मिळवण्यासाठी सामाजिक लाज वाटत नाही. आज कोट्यावधी शिक्षीत बेरोजगार आपल्या पारंपारिक व्यवसायात पडु इच्छित नाहीत. शेतक-यांची मुले शेतीवर राबण्यातआहे त्या शेतीकामाला विकसीत करण्यात कमीपणा मानतात. हीच बाब अन्य पारंपारिक व्यवसायांची. मग नवीन संधी शोधणेविकसीत करणे ही तर खुपच दुरची बाब झाली. याचे महत्वाचे कारण म्हणजे सफेदपोश नोक-यांचे आपल्या समाज व शिक्षणसंस्थांनी वाढवलेले अनिवार आकर्षण.

 

आणि यामुळेच आपली शिक्षणपद्धती ही निष्क्रीयअनुत्पादक बेरोजगार निर्माण करणारी संस्था बनली आहे. कोणतीही व्यवस्था समस्त शिक्षीत समाजाला रोजगार देवू शकत नाही. रोजगार निर्माण करणारेही तेवढ्याच प्रमाणात (मग तो स्वयंरोजगार का असेना) कसे निर्माण होतील अशी शैक्षणिक रचना करावी लागते. श्रमप्रतिष्ठा व ज्ञानप्रतिष्ठा यांच्यात संतुलन साधावे लागते. ज्ञान तर नाहीच नाही आणि श्रमप्रतिष्ठाही नाही अशा विचित्र परिस्थितीत आपली शिक्षणव्यवस्था अडकलेली आहे.

 

याची परिणती पहायला हवी. केंद्रीय श्रममंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतीय एकुण रोजगार क्षेत्रात फक्त ७% रोजगार संघटित क्षेत्र देते तर ५% असंघटित क्षेत्र देते. उर्वरीत रोजगार हा अजुनही शेती, पशुपालन व मासेमारी क्षेत्रावर अवलंबून आहे आणि हा रोजगार बव्हंशी अर्धवेळ स्वरुपाचा आहे. जरी सध्या खाजगी क्षेत्र वाढत असले तरी त्याच वेळीस शासकीय नोक-या कमी होत आहेत. एकुणात जेवढ्या प्रमाणात शिक्षितांची संख्या वाढत आहे त्याच्या व्यस्त प्रमानात रोजगाराच्या संधी वाढत आहेत...म्हणजेच शेतीक्षेत्र हेच आजही रोजगाराचे प्रमूख माध्यम आहे.

 

ज्ञाननिष्ठातर्कनिष्ठाकल्पनाशक्ती व निर्मितीक्षमता ही शिक्षणपद्धतीची चतु:सुत्री असायला हवी होती. आता तरी असायला हवी. पण दुर्दैव हे आहे कि आपले अगदी विज्ञानाचे शिक्षण आणि धर्मशिक्षण यात फरक उरलेला नाही. धर्मशिक्षक जसे शंका व्यक्त करण्यावर बंदी घालतात तसेच आमचे विज्ञानशिक्षकही विद्यार्थ्याला शंका विचारायला बंदी घालतात. नैसर्गिक कुतुहलाची हत्या ही अशी होते. ज्ञानाची वाढ थांबते ती अशामुळे. अगदी चित्रकला शिकवनारे शिक्षकही रेखाटने व रंगभरणाच्या तांत्रीक बाजुंनाच महत्व देतातसृजनाला नाही. प्रयोगशीलतेला नाही. चित्रकारितेतही जेथे "कुशल कामगार" निर्माण केले जातात तेथे चित्रकारांची आणि कला-अविकसीत रसिकांची काय गत असेल?

 

प्रगल्भ समाज घडवण्याच्या कार्यात आपली शिक्षणपद्धती अत्यंत अपयशी ठरते आहे. डेसिडिरयस इ-यस्मस यांनी "शिक्षण हे ज्ञानतर्कशुद्धता आणि अनुभव मिळवण्यासाठी दिले जावे..." असे म्हटले होते. युरोपात ज्ञानक्रांती झाली तिला आमचे एतद्देशीय विद्वान "भौतिक क्रांती म्हणुन त्याज्ज्य" असे आजही हीनवत असतात आणि आमच्या अस्तित्वात कधीही नसलेल्या आध्यात्मिक क्रांतीलाच सर्वोपरी मानत आपले मानसिक समाधान करुन घेत असतात.

 

खरे तर माणसाला प्रगल्भ बनवतजगण्यासाठी सक्षम बनवतसंध्या निर्माण करत प्रत्येक क्षेत्रात अग्रगामी राहनारा समाजच खरा आध्यात्मिक असतो हे लक्षात घ्यायला हवे.

याउलट आमची समाजरचना ही लबाडढोंगी आणि पथभ्रष्टांची कशी आहे याचे चित्र शिक्षणव्यवस्थेतीलच (आर्थिक ते नैतीक) अपार भ्रष्टाचारातुन सहज पाहता येते...इतर क्षेत्रांबद्दल मग काय बोलावेज्या समाजात विद्यार्थी आणि शिक्षकही भ्रष्ट असतातज्यांच्या शिक्षणप्रेरणा या ज्ञानप्रेरणा नसून शैक्षणिक अडाणीपनातुन व पोटभरु वृत्तीतून निर्माण होतात त्या समाजाचे भवितव्य काय असू शकते?

 

पोट भरण्यासाठी व इतरांचेही पोट भरण्यासाठी सक्षम बनवणेस्वावलंबी बनवणे हे जेवढे आवश्यक आहे तेवढेच...किंबहुना त्याहीपेक्षा जास्त आवश्यक असते ते हे कि भावी पिढ्यांना एक प्रगल्भ विकासशील नागरीक बनवणे. तसे आम्ही करत नाही आहोत. एका अज्ञानाच्या व्यामोहात सापडलेलो आहोत...जसे मध्ययुगात होतो त्याच मानसिकतेत आहोत. त्यामुळेच कि काय आम्ही अपवादात्मक एखाददुसरी उदाहरणे वगळता जागतीक ज्ञानसंपदेत भर घालु शकलेलो नाही. आणि आमची शिक्षणपद्धती मुळात तशी इच्छाही निर्माण होवू देत नाही.

 

मग स्वत:चे व्यक्तिगत भवितव्य हे जर एका फक्त रोजगाराभिमुख स्पर्धकाचे असेल तर आम्ही कोणत्या जोरावर महासत्ता बनण्याच्या वल्गना करतोमहासत्ता ही ज्ञानसत्तेच्याच जोरावर बनू शकते. ज्ञानसत्ताच अर्थसत्ता निर्माण करू शकते कारण अर्थोत्पादन ही ज्ञानाचीच तार्किक व अंतिम परिणती असते. तिची परिमाणे वेगवेगळी असू शकतात. बापजाद्यांच्या जमीनी विकून अथवा दुस-यांच्या हडपुन अर्थोत्पादन होत नसते. देशी नैसर्गिक साधनसामग्री उध्वस्त करुनम्हणजे बाहेर विकूनअर्थोत्पादन होत नसते. उसशेती ज्याप्रमाने इतर शेती उत्पादनांसाठी न्याय्य वाटा न देता जलसंपत्ती उधळते...तसे करुनही शाश्वत अर्थोत्पादन होत नसते. आपल्याला "अर्थ" कळाला नाही कारण आपली शिक्षणपद्धतीच मुळात अर्थाला समजण्यात अपेशी ठरलेली आहे!

 

आपल्याला आपल्या शिक्षणविचारांच्या दिशा बदलाव्या लागतील!

 

संजय सोनवणी


(दै. नवशक्तीमध्ये प्रकाशित)

Monday, March 6, 2023

चीन आणि तांग घराणे





चीनमधील तांग घराण्याची सत्ता हा एक सुवर्णकाळ मानायची प्रथा आहे पण तांग घराण्याने जरी चीनचे सुमारे चार शतकांपासून झालेले विखंडण थांबवत एकत्रीकरण केले असले तरी चीन हा सन ६१७-१८ पासुनच अंतर्गत बंडाळ्या आणि राजकीय उठावांमुळे त्रस्त झालेला होता. तांग घराण्याचा दुसरा सम्राट तायझोंगच्या अर्धशतकाच्या सत्ताकाळात चीनने जरा शांती आणि सुबत्तेचा अनुभव घेतला. तत्पुर्वी सुई राजघराण्याविरुद्ध झालेल्या बंडात चीनमधील फार मोठी लोकसंख्या नष्ट झाली होती. तांग राजघराणे सुइ घराण्याला हरवत सत्तेवर आले असले तरी अंतर्गत आणि बाह्य कटकटींपासून चीन मुक्त झाला नव्हता. तुर्कांच्या आक्रमणांनी चीनला बेजार केलेले होते. चीन दुर्बळ झाला होता. चीनवरील आर्थिक संकटही गहिरे होऊ लागले होते. करसंकलनात वाढ व्हावी म्हणून शेतीक्षेत्रातही नव्या सुधारणा आणल्या जाऊ लागल्या होत्या. बनावट चलनाच्या सुळसुळाटाला थांबवण्यासाठीसुद्धा नवी धोरणे आखली जात होती. सातव्या शतकातच (सन ६६८) चीनने विस्तारवादी धोरणही एकीकडे सुरु केले व तिबेटचे वर्चस्व हटवत काश्मीरच्या सीमेपर्यंत येऊन ठेपले. असे असले तरी चीनला कोणताही प्रांत आपल्या संपुर्ण अंमलाखाली आणता आला नाही. उलट तिबेट जास्तच आक्रमक झाला आणि चीनला आव्हान देत पश्चिम चीनचा भाग कुरतडू लागला.
त्यात सन ६८२ मध्ये चीनवर निसर्गाचाही कोप झाला. काही भागात महापूर तर काही भागांत दुष्काळांची रांग लागली. प्लेगच्या साथी पसरल्या. एवढे मृत्यू झाले की प्रेतांनी रस्ते ओसंडू लागले. अन्नाचा भिषण तुटवडा पडल्याने माणसे पोट भरण्यासाठी माणसांच्या प्रेतांवर तुटून पडली. चीन अजुनच दुबळा झाला.
तिसरा तांग सम्राट डिसेंबर ६८३ मध्ये मृत पावल्यानंतर सम्राज्ञी वूने साम्राज्याचा ताबा घेतला. तिचा नवरा गाओझोंग हा दृष्टीने क्षीण, अपंग आणि नेहमी अर्धशुद्धीत असायचा. गाओझोंगच्या या अपंगत्वामुळे तिने शासक बदलायचे ठरवले. थोरला राजपूत्र झोंगझोंगला त्याचा सम्राट व्हायचा अधिकार नाकारत अज्ञातवासात पाठवून दिले आणि दुसरा राजपुत्र रुईझोंगला पदासीन करत त्याचा मुखत्यार म्हणून पुढची सहा वर्ष स्वत:च राज्यकारभार पाहिला. सन ६९० मध्ये तिने रुईझोंगलाही राजपदावरुन हाकलले आणि स्वत:च्या झोऊ घराण्याची सत्ता स्थापन केली. असं कृत्य करु धजणारी ही चीनच्या इतिहासातील एकमेव महिला. पण तिच्या कार्यकालातच बंड झाले. या बंडवाल्यांविरोधात ती अत्यंत क्रूर वागली. स्वत:चे व्यक्तीगत गुप्तचर खाते काढले आणि विरोधकांचा नायनाट करायला सुरुवात केली. तांग घराण्यातील माणसांसहित सर्व विरोधकांना ठार मारण्याचा किंवा विजनवासात पाठवण्याचा तिने सपाटा लावला. त्यात या स्थितीचा फायदा घेत सन ६९६ मध्ये तिबेटी सेना राजधानी चंगनपासून दोनशे मैलावर येवुन ठेपली आणि चिनी सैन्याचा पराभव केला. तेवढ्यात चीनच्या उत्तरपूर्व भागातील खितान प्रांतातील पशूपालकांनीही तेथील जुलमी गव्हर्नरविरुद्ध उठाव केला आणि चिनी सैन्याची कत्तल केली. आजच्या बिजींगजवळील खोरे प्रेतांनी भरले. बंडखोर तांग विभागांत घुसू लागल्यानंतर सम्राज्ञीला जाग आली आणि तिने बंडखोरांशी लढण्याच्या अटींवर तुरुंगांत खितपतत पडलेल्या कैद्यांनाही मूक्त करायला सुरुवात केली.
खितानमधील बंड शमवण्यासाठी सम्राज्ञी वूने दोन लाखांची फौज पाठवली. बंडखोर तेथुन पळाले आणि तुर्कांना सामील झाले. तुर्कांनीही मग त्यांना सोबत घेऊन चढाई केली आणि चीनचा पराभव केला. याचा अंत शेवटी सन ७०५ मध्ये तांग घराण्याच्या समर्थकांनी वूला पदच्यूत करण्यात झाला. सन ७१३ मध्ये तिला तांग समर्थकांनी आत्महत्या करण्यास भाग पाडले. त्यानंतर हुएनत्संग हा सम्राट बनला. तेही बंड करून. त्याने सत्तेवर आल्यानंतर चीनला आर्थिक शिस्त लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सम्राज्ञी वूच्या काळात पळून गेलेल्या पशुपालक/ शेतकऱ्यांना परत आणण्याच प्रयत्न केला. महागाई दरही आटोक्यात आणला. थोडक्यात त्याचा बराचसा कार्यकाळ अंतर्गत व्यवस्था सुरळीत करण्यात गेला.
या काळात चीनने आपले मुळचे आक्रमक धोरण सोडुन दिले आणि शेजारी राज्यांशी
राजनैतीक हितसंबंध वाढवण्यावर भर दिला. पण सन ७३७ पासून मात्र सैन्यदलांची पुनर्रचना करण्यास सुरुवात झाली. आधीचे सैन्य फारसे प्रशिक्षित नसल्याने कमजोर होते. आता सक्तीची लष्करभरती तीन वर्षांपुरती मर्यादित केली गेली. ती मुदत संपली की नवे उमेदवार सैन्यात भरती केले जाऊ लागले. सन ७४२ पर्यंत चीनच्या लष्करात सैनिकांची संख्या पाच लाखांपर्यंत गेली. कोरियन सेनाधिका-यांचा सैनिकी प्रशिक्षणासाठी समावेश करण्यात आला.
सन ७४० मध्येच हुएन्त्संग आपल्या यांग गुइफेई या आपल्या सुनेच्याच प्रेमात पडला. तिला रखेली बनवले. सम्राट तिच्या सहवासातच अधिकाधिक वेळ घालवू लागला. तिने अनेक अधिकार हाती घेत आपले नातेवाईक मोक्याच्या पदांवर नेमायला सुरुवात केली. त्याच वेळीस एका भयंकर बंडाची बीजे रोवली जात होती. उत्तरपूर्व चीनमधील आताच्या बिजींग येथे तीन सैन्यदलांचे मुख्यालय होते आणि अन लुशान हा त्या दलांचा प्रमूख होता. यांग गुइफेईमुळे आपल्या पदाला धोका होईल अशी शंका त्याला येताच त्याने सन ७५५ मध्ये बंडाचा झेंडा उभारला. दीड लाख सैन्यानिशी त्याचे रक्तरंजित बंड सुरु झाले. त्याने दक्षीण ताब्यात घेत स्वत:लाच सम्राट घोषित केले. सम्राट हुएन्त्संगने त्याच्यावर चाल करुन जायचे ठरवले. तो पिवळ्या नदीच्या दिशेने आपल्या सैन्यासह निघाला असता त्याच्याही सैन्याने बंड केले. बंडवाल्यांनी मुख्यमंत्री यांगला ठार मारले आणि सम्राटाची रखेली यांग गुइफेई हिला सम्राटानेच देहांत शासन द्यावे अशी मागणी केली.
सम्राटासमोर कोणताही पर्याय नव्हता. गुईफेईला चाबकाच्या वादीने गळफास देऊन ठार मारण्यात आले. सन ७५७ मध्ये लुशानचीही हत्या झाली. पण बंड थांबले नाही. विखुरलेल्या बंडवाल्यांनी लुटालुट करणे सुरुच ठेवले. तरीही चिनी सम्राटाने शेवटी बंड शमवण्यात व विविध प्रांतांच्या राजधान्या पुन्हा ताब्यात घेण्याचे काम पुर्ण केले. पण यात चीनच्या लष्कराची मोठी हानी झाली. चीन आंतरराष्ट्रीय प्रश्नांत लक्ष घालण्याच्या स्थितीतच राहिला नाही. त्याचा फायदा तिबेट व तुर्कांनीही घेतला. ही स्थिती ७६८ पर्यंत कायम राहिली.
-संजय सोनवणी

Saturday, March 4, 2023

“हजार तोंडाचा रावण”


May be an illustration of book and text that says "हजार तोंडांचा रावण! विश्वनाथ शिरढोणकर"


 प्रस्तावना

विश्वनाथ शिरढोणकर हे मध्य प्रदेशात स्थायीक असलेले ज्येष्ठ मराठे साहित्त्यिक आणि कवी आहेत. हिंदी भाषेतही त्यांच्या अनेक साहित्यकृती प्रसिद्ध आहेत. लेखनातील सातत्य आणि त्यावरील निष्ठा वाखानन्यायोग्य तर आहेच पण त्यांनी जे जीवनदर्शन आपल्या साहित्यातून घडवले आहे ते अलौकिक आहे. मध्य प्रदेशातील समाजजीवन, संस्कृती आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचा मिलाफ त्यांच्या साहित्यातून दिसून येतो. मराठी साहित्यिक सहसा आपल्या प्रांताबाहेर पडण्याचे नावच घेत नसल्याने खरे तर त्यांच्या अभिव्यक्तीवर मर्यादा येते. पण शिरढोणकर यांनी त्या मर्यादा ओलांडून मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत.
बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्यीकांबाबत आणि त्यांच्या साहित्यासेवेबाबत महाराष्ट्र आजवर कृपण राहिला असल्याचे दिसून येईल, आणि ही अनास्था आजची नाही. १९३८ साली "मध्यभारतीय मराठी वाड:मय" या कै. कृष्णाजी गंगाधर कवचाळे यांच्या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत कै. नरहर रहाळकरांनी म्हटले होते, "येथे नको असलेल्या अप्रिय गोष्टीचाही निर्देश करणे काही कारणांमुळे आम्हास आवश्य वाटते. ती गोष्ट म्हणजे आपल्या धाकट्या मालव बंधूंविषयी ज्येष्ठ महाराष्ट्रीय बंधूंना वाटणारी अनास्था ही होय......इकडील साहित्यिकांची सदाच कुचंबणा होत राहून त्यांना आपला लेखनरुपी माल वाचकांपुढे मांडण्यास आपल्या ज्येष्ठ महाराष्टीय बंधूकडे धावावे लागते व त्यात अधिकत: निराशाच त्यांच्या पदरी येते." (संदर्भ: अनुबंध, मराठी साहित्य मंडळ, गुलबर्गा प्रकाशित त्रैमासिक-२०१२) शिरढोणकर यांनी आजवर सातत्याने मराठी साहित्याची सेवा करून, उत्तमोत्तम ग्रंथ लिहून मराठीचे तेज मध्य प्रदेशातही फाकवले असले तरी त्यांची घ्यावी तशी दखल मराठी साहित्याच्या कम्पुंनी घेतलेली नाहे हे एक दुर्दैव आहे. “हजार तोंडाचा रावण” या सशक्त कृतीबद्दल तरी असे होणार नाही अशी मला अशा आहे.
“हजार तोंडाचा रावण” हा लघुकथा संग्रह आहे. शीर्षक कथेतूनच त्यांची समाजातील चाललेल्या भ्रष्टाचार रुपी रावणाचा आणि अशक्त लोकशाह्वीचा संघर्ष एक नवी मिथककथा निर्माण करून दाखवलेला आहे. लोकशाहीची नवी मुल्यव्यवस्था समाजात रुजवण्याची आवश्यकता त्यांनी या कथेतून अधोरेखित केली आहे. त्यांच्या इतर कथाही कधी व्यक्तीगत तर कधी सामाजिक सुख-दु:खांचा तलस्पर्शी रंग घेऊन येतात आणि वाचकाला अंतर्मुख करतात. स्वत:च स्वत:शी संवाद करून आपले आहे ते जीवन सुसह्य करण्याची कसरत कशी केली जाते हे “गलगले” या स्व-संवादात्मक कथेतून दिसते आणि जीवनाची दाहकता अंगावर येते. “रडायचं नाही” ही तर अंत:कर्णाला स्पर्शून जाणारी कथा. लेखकाला राजकारण ते समाजकारण हे विषय वर्ज्य तर नाहीतच पण दाम्पत्यजीवनातील तानेबानेही त्यांना आकर्षित करतात, चिंतन करायला भाग पाडतात. या सर्वातून एकाच बाब प्रकर्षाने जानाच्वते ती म्हणजे शिरढोणकर या सर्जक व्यक्तीची अस्वस्थता. खरे तर जो अस्वस्थ होत नाही तो कधीच उत्तम साहित्यकृती लिहू शकत नाही. अशा प्रतिभावान्ताने लिहिलेले साहित्यही वाचकांना पुरेसे अस्वस्थ करू तर शकतेच पण जगण्याकडे पाहण्याची सशक्त दृष्टी बहाल करू शकते. शिरढोणकर यात यशस्वी झालेले आहेत. वाचकांनी या कथा मुळातूनच वाचल्या पाहिजेत व आपली दृष्टी विस्तारून घ्यायला पाहिजे.
या संग्रहातील “बदली” ही कथा विशेष लक्षवेधी आहे. महिला कर्मचा-याच्या बदलीचा प्रश्न सोडवण्याऐवजी तिला अमेरिकेतील ढासळलेली आर्थिक स्थिती ते शेयर मार्केट कोसळणे अशी कारणे देत रहाणारा तिचा खडूस बॉस आणि एक सहकारी या मध्यवर्ती कल्पनेभोवती फिरणारी ही कथा अगडी खाजगी कार्यालयांतील अमानवी व्यवहाराना लक्ष्य करते. ही कथा मध्यप्रदेशातील सर्व विद्यापीठात बीए पार्ट -२ (मराठी विषय)साठी २०२१-२०२२ वर्षा पासून पाठयक्रमात सामील केलेली आहे. या कथेचा हिंदी अनुवादही झाला असून ती आकाशवाणीवरून तीनदा प्रसारित झालेली आहे, यावरून शिरढोणकर यांच्या मध्य प्रदेशातील लोकप्रियतेचे कल्पना येईल. ते आजवरचे सर्व साहित्य हिंदीतूनच लिहू शकत असताना त्यांनी मराठी माध्यमाशी असलेली आपली नाळ तुटू दिलेली नाही.
या कथा संग्रहाला वाचक उदंड प्रतिसाद देतील आणि बृहन्महाराष्ट्रातील प्रतिभाशाली साहित्यीकांवर आजवर झालेला अन्याय दूर करतील ही अपेक्षा आहे.
धन्यवाद,
संजय सोनवणी
May be an illustration of book and text that says "हजार तोंडांचा रावण! विश्वनाथ शिरढोणकर"
All reactions:
Hari Narke, Sudhakar Jadhav and 30 others

विचार आणि भाषा!

 विचार करायला भाषेची गरज आहे काय आणि हाच खरे तर अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मुळात मनुष्य विचार करतो म्हणजे काय करतो? विचार आधी मनुष्यप्राण्यात अवतरला कि मन? मन नेमके काय असते? विचाराचा विचार होऊ शकतो काय? खरे आहे. प्रश्न अनंत आहेत आणि खरे तर या प्रश्नांची अंतिम उत्तरे अजुन मिळालेली नाहीत.


पण एक बाब अत्यंत स्पष्ट आहे ती ही कि विचारांना भाषेची गरज नसते. किंबहुना भाषेत बद्ध होऊ शकणारे विचार हे नेहमीच अत्यल्प असतात. भाषा ही नेहमीच तोकडी असते. विचार नाही. त्यामुळे भाषेत बद्ध न होऊ शकणारे, भाषेची पुरेशी प्रगल्भता न येणा-यांचे विचार हे जगासाठी नेहमीच अनुपलब्ध राहतात. पण म्हणून विचार नसतात असे नाही. भाषा ही कृत्रीम अवस्था आहे. मनुष्याने ती गरजेसाठी पुराकाळापासून विकसीत केलेली आहे. त्याची, पुराकाळातील माणसाची, अभिव्यक्ती आपण आजच्या परिप्रेक्षात समजावून घेऊ शकण्यात तोकडे पडतो ते त्यामुळेच. पुरातन मानव मिथ्गकांतुनच जगाकडे पहात होता. शब्दांत (भाषेत) उतरलेली मिथके आणि त्याला अभिप्रेत मिथके यात पुरेसे साम्य असण्याची शक्यता नाही, कारण कोणत्या शब्दाने त्याला काय अभिप्रेत होते हे आपण नीट समजावून घेऊ शकत नाही, घ्यायचे झाले तर खुप प्रयास करावे लागतात, थोडे आदिम बनावे लागते. कारण आपले विचार, आजचे, वरकरणी भाषेत झाले आहेत असे वाटले तरी अगणित विचार भाषाविहिन असतात, आणि त्यांना आपण सुप्त पण परिणामकारक (व्यक्तित्वावर) विचार म्हणतो.

भाषा ही माणसाची नैसर्गिक आणि मुलभूत गरज आणि उपज आहे असे मानशास्त्रज्ञही मानतात. भाषेचा प्रवास हा विलक्षण आहे. तो प्रत्येक काळात, प्र्तत्येक मानवी समुहाच्या आणि व्यक्तीकेंद्रित संस्कृतीचा उद्गार आहे. एक उदाहरण देतो, कारस्थान हा शब्द एकोणिसाव्या शतकापर्यंत, खटपटी-लटपटी करुन बुद्धीमानता दाखवत यश मिळवणारा/री यंना उद्देशुन वापरला जाइ. आता मी कोणाला कारस्थानी म्हटले तर तो माझा गळाच आवळायला धावेल.

इतिहासात अनेक शब्द आणि संज्ञांचे असे झाले आहे, याला कारण शब्द हे काळाप्रमाणे, त्या काळच्या सांस्कृतिक गरजांप्रमाणे अर्थ बदलत जातात, वेगवेगळ्या छटा धारण करत जातात किंवा भाषेतुनच बाद होत जातात. जसे जाते, उंबरा, उखळ ई अनेक शब्द मराठीतुन बाद होत चालले आहेत. किंवा उद्या हे शब्द राहतीलही कदाचित पण त्या शब्दांनी निर्दिष्ट होणारे अर्थ वेगळे असतील.
हा भाषेचा प्रवास पिढी-दर-पिढी बदलत जातो, आणि तीच भाषेची गंमत आहे. आता आपण प्राचीन काळात जाऊ. गो, म्हणजे गाय, या शब्दातुन गाय, आकाश, ढग, नदी, झरे ई अनेक अर्थ परिस्थितीजन्य भेद दाखवतात. यात त्या काळच्या माणसाने कशी कल्पना केली असेल हे आपण (समजायचे असेल तरच) समजु शकतो. पण पर्यायी शब्दांची अडचणही एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरायची सवय लावत असेल असेही आहे.

शब्द किंवा भाषा ही नेहमीच तोट्की असते. नवीन शब्द निर्माण करण्यात आजचा आधुनिक माणूस कमी पडतो असे म्हटले जाते., व्याकरणाची मोडतोड करत व्यामिश्र नि गुंतागुंतीचा, विद्यमान भाषेत न मांडता येणारा विचार, मांडायचा तर भाषेला आहे तशी वापरुन ते साध्य करता येत नाही.

थोडक्यात विचार भाषेत येत नसून भाषा हे विचारांचे माध्यम आहे. म्हणजेच आपण नकळत विचार भाषेत अनुवाद करुन मांडतो. नि म्हणूनच विचार हे मुलार्थाने कधीही मांडता येत नाहीत, तीच भाषेची सर्वात मोठी अडचण आहे. भाषेच्या उपयुक्ततेसहित ही सर्वात मोठी असलेली भाषेची अडचण समजावून घेता आली पाहिजे, रुढ व्याकरण अथवा शब्दमाला यापार जात व्यक्त व्हायला हवे!

- संजय सोनवणी

Friday, March 3, 2023

“अंगविज्जा”- कुशाणकालीन समाजव्यवस्थेचे दर्शन!



आजच्या मराठीच्या उगमस्त्रोतांचा विचार करतांना भाषाविदांनी आजवर माहाराष्ट्री प्राकृतातील शिलालेख व हाल सातवाहनाच्या गाथा सप्तशतीला मानाचे स्थान दिलेले आहे. पण कुशाण काळातील पहिल्या ते दुस-या शतकादरम्यान अज्ञात लेखकाकडून लिहिल्या गेलेल्या साठ अध्यायी "अंगविज्जा" (अंगविद्या) या माहाराष्ट्री प्राकृतातील गद्य ग्रंथाकडे कसे दुर्लक्ष केले हे समजत नाही. पण त्या काळातील समाजजीवनाची एवढी इत्यंभूत माहिती देणारा अन्य कोणताही ग्रंथ आज अस्तित्वात नाही. आजच्या मराठीचा स्त्रोत म्हणूनही या ग्रंथाचे मोल अपरंपार आहे. या ग्रंथामुळे आपला समाजेतिहास नव्याने उलगडतो आणि अनेक कुटप्रश्नांवर प्रकाश टाकतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. या ग्रंथातील भविष्यकथनाला वगळत आपण या ग्रंथात दिसणा-या समाज/धर्म जीवनाची चर्चा करणे अधिक योग्य व उद्बोधक राहील.


अंगविज्जावरून प्रतीत होणारी सर्वात महत्वाची बाब म्हणजे जन्माधारित जातीव्यवस्था कुशाणकाळापर्यंतही जन्माला आलेली नव्हती. ग्रंथकार असंख्य व्यवसायांची कोशाप्रमाणे जंत्रीच देतोपण त्यांना "जात" हा शब्द कोठेही वापरत नाही. जातिसंस्थेच्या अभ्यासकांनी याची नोंद घेतली पाहिजे. अंगविज्जेत "गृहपती" या संज्ञेने हिंदू धरातील (वैदिक ज्यांना शुद्र म्हणत त्या) प्रतिष्ठितांची ओळख मिळते. दिक्षा अथवा संन्यास घेतलेल्या बौद्धांना मुंडक म्हणत तर जैनांना समन (श्रमण) म्हणत. तिसरा धर्म म्हणजे आर्य. या आर्य धर्मात (आज ज्याला आपण वैदिक धर्म म्हणतो) ब्राह्मणक्षत्रीय व वैश्य यांचा समावेश होता. चवथा मोठा धर्म-समूह म्हणजे म्लेंच्छ. या म्लेंच्छात ग्रंथकाराने शूद्रयवनशककुशाणक्षत्रपादि लोकांचे धर्म सामाविष्ट केलेले आहेत. थोडक्यात जे वैदिक अथवा श्रमण. मुंडक नाहीत त्यांना शूद्र अथवा म्लेंच्छ संबोधायची तेंव्हाचीही परंपरा होती. पतंजलीच्या महाभाष्यातही अगदी हीच मांडणी आहे. एवढेच नव्हे तर मनुस्मृतीही काही ठिकाणी म्लेंच्छांतर्गत जे वैदिक नाहीत त्या सर्वांचा समावेश करते. म्हणजेच वैदिक धर्म हा बौद्धजैन व शुद्रांच्या धर्मापेक्षा वेगळा व स्वतंत्र होता याचा वेगळा स्वतंत्र पुरावा "अंगविज्जा" देतो. म्लेंच्छ या शब्दाने दचकून जायचे कारण नाहीम्लेंच्छ हा शब्द मुळच्या मेलुहा अथवा मेलुक्खा या शब्दाचा वैदिक भाषेतील अपभ्रंश आहे हे ए. एच. दानी व बी. के. थापर यांनी दाखवून दिले आहे. मेलुहा हे भारताचेच प्राचीन नांव होय.

त्या काळात देवतांमध्ये शिवउमा. वैश्रवण (यक्षाधिपती कुबेर)यक्षगंधर्ववासुदेवसंकर्षणस्कंदकुमारविशाख इत्यादिंची जनसामान्य पूजा करत असे. त्यांची मंदिरेही असत. तीर्थंकरांची मंदिरे बनण्याची मात्र सुरुवात झालेली दिसत नाही. गिरिपूजा हे एक जैनांचे तत्कालीन महत्वाचे अंग दिसते. त्यांचे गिरिमह नामक सणही असत व त्यात सर्वच भाग घेत असे अंगविज्जावरुन दिसते.  काही लोक इंद्रवरूणयम यांचीही उपासना करीतपण ही वैदिक दैवते तोवर दुय्यम झालेली दिसतात. आज जशी ग्रामदैवते आहेत तसेच नगरांचेही यापैकीच एखादे नगरदैवत असे. काही पारशी व ग्रीक देवतांचीही पूजा कुशाण राजवटीमुळे सुरु झालेली दिसते. अनाहिता (पारशी)ऐरादित्ती (अफ्रोडायटी-ग्रीक देवता) यात नांव घेण्यासारख्या आहेत. कनिष्काच्या राबटक शिलालेखातील अभिवादनात इंद्र-वरुणादि अशी एकही वैदिक दैवते येत नाहीत पण उमाकुमारविशाख ही नांवे तर येतातच पण कुशाणांच्या बव्हंशी नाण्यांवर नंदीसहितची शिवप्रतिमाही आहे. काही नाण्यांवर बुद्धाच्याही प्रतीमा आहेत. यावरून वैदिक धर्माला कनिष्काने राजाश्रय दिला नव्हता असे दिसते. अंगविज्जातही यज्ञाचे येणारे अगदीच तुरळक उल्लेख पाहता हा धर्म तेंव्हा अत्यंत मर्यादित लोकांत सीमित होता समाजावर त्याचा विशेष प्रभावही नव्हता असे दिसते.

त्या काळात मातृकांचीही पूजा होत होती. महत्वाचे म्हणजे असूर-असूरकन्याराक्षस-राक्षसीयक्ष-यक्षीणीनाग-नागीणगिरीदेवता यांचीही पूजा होत असे. धनिक व्यापा-यांत वैश्रवणाची पूजा चालत असे. दिवाळीत नंतरही दिर्घकाळ लक्ष्मीपूजन नव्हे तर वैश्रवण (कुबेर) पूजनच होत असे तर दिवाळीला यक्षरात्री म्हणत असत. यक्षअसूरराक्षसनाग आदि प्राचीन संस्कृतीचे पुजनाच्या रुपात लोकांकडून आदरात्मक भान ठेवले गेल्याचे दिसते. वैदिकेतर सर्व धर्मात या दैवतांना कमी-अधिक प्रमाणात महत्वाचे स्थान दिल्याचे दिसते. असूरपिशाच्चनाग आदिंना देवयोनीत गणले गेलेले आहे. त्यांच्यावर आधारित व्यक्तीनामेही ठेवली जात. पुराणांनी नंतर जरी असूरराक्षसादिंना बदनाम केले असले तरी कुशाणकाळात तशी स्थिती नव्हती

 

अंगविज्जाच्या ग्रंथकर्त्याने त्याच्या काळातील व्यवहारात असलेल्या व्यक्तीनामांची सुची दिली आहे व ती समाजेतिहासाच्या अभ्यासासाठी अत्यंत उपयुक्त आहे. कुशाणकालीन शिलालेखांतही काही नावे तशीच्या तशीच मिळतात हेही येथे उल्लेखनीय आहे.


कुशाणकालीन नाण्यांबद्दल "अंगविज्जा" अत्यंत महत्वाची माहिती पुरवतो. कुशाणांच्या काही नाण्यांवर नना देवीची प्रतिमा असल्याने त्यांना नाणक म्हणत. आज आपण त्यालाच नाणे म्हणतो. त्या काळात कार्षापण चलनाला "पुराण" म्हणू लागले होते. कुशाणाधिपती हुविष्काच्या पुण्यशाला लेखात ११०० पुराण नाण्यांची देणगी दिल्याचा उल्लेख आहे.  कुशाणांनी प्रचलित केलेले दीनारही तेंव्हा चलनात होते. या दीनारांचा उल्लेख मनुस्मृतीतही येतो. छोट्या नाण्यांना मासकअर्धमासकररय मासक म्हणत असत असेही दिसते. चलनाची विविधता पाहता हा काळ आर्थिक दृष्ट्या सुबत्तेचा होता. वस्त्रअलंकारमद्याचे अनेक प्रकारपानगृहेव्यापारी नौकांची वर्णने यावरूनही त्या सुबत्तेची कल्पना येते. अंगविज्जाने दिलेल्या नौकांचे काही प्रकार पेरीप्लसच्या  (सन ७८) प्रवासवर्णनातही येतात. नौकांची ही नांवे नंतरच्या काळात दिसून येत नसल्यामुळे अंगविज्जाचे लेखन कुशाणकाळातच झाले या निष्कर्षाला अधिक बळ मिळते.   

अंगविज्जात येणारा समाज हा मनमोकळा आहे. स्त्रीयांचे स्थान समाजात उच्चीचेच होते. समाज श्रेणींच्या माध्यमातून आपापले व्यवसाय चालवतांना दिसतो. पेयपानाबद्दलही विधीनिषेध नव्हते. गाथा सप्तशतीतही असाच मोकळा ढाकळा समाज आपल्याला दिसतो. बौद्ध धर्मही या काळत सुस्थापित होता हे स्तुपांच्या वर्णनावरून दिसते. हा राजकीय ग्रंथ नसल्याने समाजव्यवस्थेची भरपूर माहिती या ग्रंथात येत असली तरी राजव्यवस्थेबाबत माहिती येत नाही. असे असले तरी समाजावर फारशी राजबंधने नव्हती. नागरिक जेवढ्या प्रकारांच्या वाहनांचा उपयोग करत त्यांचीच संख्या पाहिली तर एकंदरीत समाज संपन्न होता याची साक्ष पटते.

अंगविज्जा हा जैन धर्मियाने लिहिलेला ग्रंथ असुनही त्याने विषयाच्या अनुषंगाने सगळ्यांच्याच स्थितीची चर्चा केली आहे. या ग्रंथाचा हेतू धर्मप्रचार नव्हता. आरंभीच्या अध्यायात सिद्ध व जिनांना अभिवादन करण्याशिवाय ग्रंथकाराने कोठेही जैन धर्माचा पुरस्कार येत नाही. खरे तर अंगविद्या शास्त्राला जैन व बौद्धांनी त्याज्जच मानले. तरीही अत्यंत आकर्षणातून हा ग्रंथ लिहिला गेला असल्याने अन्य जैनबौद्ध व वैदिक ग्रंथांत जो धार्मिक अभिनिवेष दिसतो त्याचा स्पर्शही या ग्रंथाला झालेला नाही. हा या विषयावरील टिकून राहिलेला एकमेव ग्रंथ. प्राकृत टेक्स्ट सोसायटीने १९५७ साली मुनी पुण्यविजय तथा श्री आत्मारामजी महाराज यांनी या ग्रंथाच्या अनेक हस्तलिखित प्रती मिळवत तो प्रसिद्ध केला. हा ग्रंथ त्र्ययस्थाने लिहिलेला असल्याने यातील माहिती ही ऐतिहासिक सत्याजवळ जाणारी आहे. आपला इतिहास नव्याने संशोधित करण्याची केवढी गरज आहे हे हाच ग्रंथ दाखवून देतो. त्यासाठी सर्वच प्राकृत भाषांतील पुरातन ग्रंथ मिळवत त्याचे तटस्थ परिशिलन केले पाहिजे एवढे भान जरी "अंगविज्जा"मुळे आले तरी पुरेसे आहे.

-
संजय सोनवणी

(Published in Navshakti)


जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...