Saturday, March 4, 2023

“हजार तोंडाचा रावण”


May be an illustration of book and text that says "हजार तोंडांचा रावण! विश्वनाथ शिरढोणकर"


 प्रस्तावना

विश्वनाथ शिरढोणकर हे मध्य प्रदेशात स्थायीक असलेले ज्येष्ठ मराठे साहित्त्यिक आणि कवी आहेत. हिंदी भाषेतही त्यांच्या अनेक साहित्यकृती प्रसिद्ध आहेत. लेखनातील सातत्य आणि त्यावरील निष्ठा वाखानन्यायोग्य तर आहेच पण त्यांनी जे जीवनदर्शन आपल्या साहित्यातून घडवले आहे ते अलौकिक आहे. मध्य प्रदेशातील समाजजीवन, संस्कृती आणि महाराष्ट्रीय संस्कृतीचा मिलाफ त्यांच्या साहित्यातून दिसून येतो. मराठी साहित्यिक सहसा आपल्या प्रांताबाहेर पडण्याचे नावच घेत नसल्याने खरे तर त्यांच्या अभिव्यक्तीवर मर्यादा येते. पण शिरढोणकर यांनी त्या मर्यादा ओलांडून मराठी साहित्याच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत.
बृहन्महाराष्ट्रातील मराठी साहित्यीकांबाबत आणि त्यांच्या साहित्यासेवेबाबत महाराष्ट्र आजवर कृपण राहिला असल्याचे दिसून येईल, आणि ही अनास्था आजची नाही. १९३८ साली "मध्यभारतीय मराठी वाड:मय" या कै. कृष्णाजी गंगाधर कवचाळे यांच्या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत कै. नरहर रहाळकरांनी म्हटले होते, "येथे नको असलेल्या अप्रिय गोष्टीचाही निर्देश करणे काही कारणांमुळे आम्हास आवश्य वाटते. ती गोष्ट म्हणजे आपल्या धाकट्या मालव बंधूंविषयी ज्येष्ठ महाराष्ट्रीय बंधूंना वाटणारी अनास्था ही होय......इकडील साहित्यिकांची सदाच कुचंबणा होत राहून त्यांना आपला लेखनरुपी माल वाचकांपुढे मांडण्यास आपल्या ज्येष्ठ महाराष्टीय बंधूकडे धावावे लागते व त्यात अधिकत: निराशाच त्यांच्या पदरी येते." (संदर्भ: अनुबंध, मराठी साहित्य मंडळ, गुलबर्गा प्रकाशित त्रैमासिक-२०१२) शिरढोणकर यांनी आजवर सातत्याने मराठी साहित्याची सेवा करून, उत्तमोत्तम ग्रंथ लिहून मराठीचे तेज मध्य प्रदेशातही फाकवले असले तरी त्यांची घ्यावी तशी दखल मराठी साहित्याच्या कम्पुंनी घेतलेली नाहे हे एक दुर्दैव आहे. “हजार तोंडाचा रावण” या सशक्त कृतीबद्दल तरी असे होणार नाही अशी मला अशा आहे.
“हजार तोंडाचा रावण” हा लघुकथा संग्रह आहे. शीर्षक कथेतूनच त्यांची समाजातील चाललेल्या भ्रष्टाचार रुपी रावणाचा आणि अशक्त लोकशाह्वीचा संघर्ष एक नवी मिथककथा निर्माण करून दाखवलेला आहे. लोकशाहीची नवी मुल्यव्यवस्था समाजात रुजवण्याची आवश्यकता त्यांनी या कथेतून अधोरेखित केली आहे. त्यांच्या इतर कथाही कधी व्यक्तीगत तर कधी सामाजिक सुख-दु:खांचा तलस्पर्शी रंग घेऊन येतात आणि वाचकाला अंतर्मुख करतात. स्वत:च स्वत:शी संवाद करून आपले आहे ते जीवन सुसह्य करण्याची कसरत कशी केली जाते हे “गलगले” या स्व-संवादात्मक कथेतून दिसते आणि जीवनाची दाहकता अंगावर येते. “रडायचं नाही” ही तर अंत:कर्णाला स्पर्शून जाणारी कथा. लेखकाला राजकारण ते समाजकारण हे विषय वर्ज्य तर नाहीतच पण दाम्पत्यजीवनातील तानेबानेही त्यांना आकर्षित करतात, चिंतन करायला भाग पाडतात. या सर्वातून एकाच बाब प्रकर्षाने जानाच्वते ती म्हणजे शिरढोणकर या सर्जक व्यक्तीची अस्वस्थता. खरे तर जो अस्वस्थ होत नाही तो कधीच उत्तम साहित्यकृती लिहू शकत नाही. अशा प्रतिभावान्ताने लिहिलेले साहित्यही वाचकांना पुरेसे अस्वस्थ करू तर शकतेच पण जगण्याकडे पाहण्याची सशक्त दृष्टी बहाल करू शकते. शिरढोणकर यात यशस्वी झालेले आहेत. वाचकांनी या कथा मुळातूनच वाचल्या पाहिजेत व आपली दृष्टी विस्तारून घ्यायला पाहिजे.
या संग्रहातील “बदली” ही कथा विशेष लक्षवेधी आहे. महिला कर्मचा-याच्या बदलीचा प्रश्न सोडवण्याऐवजी तिला अमेरिकेतील ढासळलेली आर्थिक स्थिती ते शेयर मार्केट कोसळणे अशी कारणे देत रहाणारा तिचा खडूस बॉस आणि एक सहकारी या मध्यवर्ती कल्पनेभोवती फिरणारी ही कथा अगडी खाजगी कार्यालयांतील अमानवी व्यवहाराना लक्ष्य करते. ही कथा मध्यप्रदेशातील सर्व विद्यापीठात बीए पार्ट -२ (मराठी विषय)साठी २०२१-२०२२ वर्षा पासून पाठयक्रमात सामील केलेली आहे. या कथेचा हिंदी अनुवादही झाला असून ती आकाशवाणीवरून तीनदा प्रसारित झालेली आहे, यावरून शिरढोणकर यांच्या मध्य प्रदेशातील लोकप्रियतेचे कल्पना येईल. ते आजवरचे सर्व साहित्य हिंदीतूनच लिहू शकत असताना त्यांनी मराठी माध्यमाशी असलेली आपली नाळ तुटू दिलेली नाही.
या कथा संग्रहाला वाचक उदंड प्रतिसाद देतील आणि बृहन्महाराष्ट्रातील प्रतिभाशाली साहित्यीकांवर आजवर झालेला अन्याय दूर करतील ही अपेक्षा आहे.
धन्यवाद,
संजय सोनवणी
May be an illustration of book and text that says "हजार तोंडांचा रावण! विश्वनाथ शिरढोणकर"
All reactions:
Hari Narke, Sudhakar Jadhav and 30 others

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...