Monday, March 6, 2023

चीन आणि तांग घराणे





चीनमधील तांग घराण्याची सत्ता हा एक सुवर्णकाळ मानायची प्रथा आहे पण तांग घराण्याने जरी चीनचे सुमारे चार शतकांपासून झालेले विखंडण थांबवत एकत्रीकरण केले असले तरी चीन हा सन ६१७-१८ पासुनच अंतर्गत बंडाळ्या आणि राजकीय उठावांमुळे त्रस्त झालेला होता. तांग घराण्याचा दुसरा सम्राट तायझोंगच्या अर्धशतकाच्या सत्ताकाळात चीनने जरा शांती आणि सुबत्तेचा अनुभव घेतला. तत्पुर्वी सुई राजघराण्याविरुद्ध झालेल्या बंडात चीनमधील फार मोठी लोकसंख्या नष्ट झाली होती. तांग राजघराणे सुइ घराण्याला हरवत सत्तेवर आले असले तरी अंतर्गत आणि बाह्य कटकटींपासून चीन मुक्त झाला नव्हता. तुर्कांच्या आक्रमणांनी चीनला बेजार केलेले होते. चीन दुर्बळ झाला होता. चीनवरील आर्थिक संकटही गहिरे होऊ लागले होते. करसंकलनात वाढ व्हावी म्हणून शेतीक्षेत्रातही नव्या सुधारणा आणल्या जाऊ लागल्या होत्या. बनावट चलनाच्या सुळसुळाटाला थांबवण्यासाठीसुद्धा नवी धोरणे आखली जात होती. सातव्या शतकातच (सन ६६८) चीनने विस्तारवादी धोरणही एकीकडे सुरु केले व तिबेटचे वर्चस्व हटवत काश्मीरच्या सीमेपर्यंत येऊन ठेपले. असे असले तरी चीनला कोणताही प्रांत आपल्या संपुर्ण अंमलाखाली आणता आला नाही. उलट तिबेट जास्तच आक्रमक झाला आणि चीनला आव्हान देत पश्चिम चीनचा भाग कुरतडू लागला.
त्यात सन ६८२ मध्ये चीनवर निसर्गाचाही कोप झाला. काही भागात महापूर तर काही भागांत दुष्काळांची रांग लागली. प्लेगच्या साथी पसरल्या. एवढे मृत्यू झाले की प्रेतांनी रस्ते ओसंडू लागले. अन्नाचा भिषण तुटवडा पडल्याने माणसे पोट भरण्यासाठी माणसांच्या प्रेतांवर तुटून पडली. चीन अजुनच दुबळा झाला.
तिसरा तांग सम्राट डिसेंबर ६८३ मध्ये मृत पावल्यानंतर सम्राज्ञी वूने साम्राज्याचा ताबा घेतला. तिचा नवरा गाओझोंग हा दृष्टीने क्षीण, अपंग आणि नेहमी अर्धशुद्धीत असायचा. गाओझोंगच्या या अपंगत्वामुळे तिने शासक बदलायचे ठरवले. थोरला राजपूत्र झोंगझोंगला त्याचा सम्राट व्हायचा अधिकार नाकारत अज्ञातवासात पाठवून दिले आणि दुसरा राजपुत्र रुईझोंगला पदासीन करत त्याचा मुखत्यार म्हणून पुढची सहा वर्ष स्वत:च राज्यकारभार पाहिला. सन ६९० मध्ये तिने रुईझोंगलाही राजपदावरुन हाकलले आणि स्वत:च्या झोऊ घराण्याची सत्ता स्थापन केली. असं कृत्य करु धजणारी ही चीनच्या इतिहासातील एकमेव महिला. पण तिच्या कार्यकालातच बंड झाले. या बंडवाल्यांविरोधात ती अत्यंत क्रूर वागली. स्वत:चे व्यक्तीगत गुप्तचर खाते काढले आणि विरोधकांचा नायनाट करायला सुरुवात केली. तांग घराण्यातील माणसांसहित सर्व विरोधकांना ठार मारण्याचा किंवा विजनवासात पाठवण्याचा तिने सपाटा लावला. त्यात या स्थितीचा फायदा घेत सन ६९६ मध्ये तिबेटी सेना राजधानी चंगनपासून दोनशे मैलावर येवुन ठेपली आणि चिनी सैन्याचा पराभव केला. तेवढ्यात चीनच्या उत्तरपूर्व भागातील खितान प्रांतातील पशूपालकांनीही तेथील जुलमी गव्हर्नरविरुद्ध उठाव केला आणि चिनी सैन्याची कत्तल केली. आजच्या बिजींगजवळील खोरे प्रेतांनी भरले. बंडखोर तांग विभागांत घुसू लागल्यानंतर सम्राज्ञीला जाग आली आणि तिने बंडखोरांशी लढण्याच्या अटींवर तुरुंगांत खितपतत पडलेल्या कैद्यांनाही मूक्त करायला सुरुवात केली.
खितानमधील बंड शमवण्यासाठी सम्राज्ञी वूने दोन लाखांची फौज पाठवली. बंडखोर तेथुन पळाले आणि तुर्कांना सामील झाले. तुर्कांनीही मग त्यांना सोबत घेऊन चढाई केली आणि चीनचा पराभव केला. याचा अंत शेवटी सन ७०५ मध्ये तांग घराण्याच्या समर्थकांनी वूला पदच्यूत करण्यात झाला. सन ७१३ मध्ये तिला तांग समर्थकांनी आत्महत्या करण्यास भाग पाडले. त्यानंतर हुएनत्संग हा सम्राट बनला. तेही बंड करून. त्याने सत्तेवर आल्यानंतर चीनला आर्थिक शिस्त लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. सम्राज्ञी वूच्या काळात पळून गेलेल्या पशुपालक/ शेतकऱ्यांना परत आणण्याच प्रयत्न केला. महागाई दरही आटोक्यात आणला. थोडक्यात त्याचा बराचसा कार्यकाळ अंतर्गत व्यवस्था सुरळीत करण्यात गेला.
या काळात चीनने आपले मुळचे आक्रमक धोरण सोडुन दिले आणि शेजारी राज्यांशी
राजनैतीक हितसंबंध वाढवण्यावर भर दिला. पण सन ७३७ पासून मात्र सैन्यदलांची पुनर्रचना करण्यास सुरुवात झाली. आधीचे सैन्य फारसे प्रशिक्षित नसल्याने कमजोर होते. आता सक्तीची लष्करभरती तीन वर्षांपुरती मर्यादित केली गेली. ती मुदत संपली की नवे उमेदवार सैन्यात भरती केले जाऊ लागले. सन ७४२ पर्यंत चीनच्या लष्करात सैनिकांची संख्या पाच लाखांपर्यंत गेली. कोरियन सेनाधिका-यांचा सैनिकी प्रशिक्षणासाठी समावेश करण्यात आला.
सन ७४० मध्येच हुएन्त्संग आपल्या यांग गुइफेई या आपल्या सुनेच्याच प्रेमात पडला. तिला रखेली बनवले. सम्राट तिच्या सहवासातच अधिकाधिक वेळ घालवू लागला. तिने अनेक अधिकार हाती घेत आपले नातेवाईक मोक्याच्या पदांवर नेमायला सुरुवात केली. त्याच वेळीस एका भयंकर बंडाची बीजे रोवली जात होती. उत्तरपूर्व चीनमधील आताच्या बिजींग येथे तीन सैन्यदलांचे मुख्यालय होते आणि अन लुशान हा त्या दलांचा प्रमूख होता. यांग गुइफेईमुळे आपल्या पदाला धोका होईल अशी शंका त्याला येताच त्याने सन ७५५ मध्ये बंडाचा झेंडा उभारला. दीड लाख सैन्यानिशी त्याचे रक्तरंजित बंड सुरु झाले. त्याने दक्षीण ताब्यात घेत स्वत:लाच सम्राट घोषित केले. सम्राट हुएन्त्संगने त्याच्यावर चाल करुन जायचे ठरवले. तो पिवळ्या नदीच्या दिशेने आपल्या सैन्यासह निघाला असता त्याच्याही सैन्याने बंड केले. बंडवाल्यांनी मुख्यमंत्री यांगला ठार मारले आणि सम्राटाची रखेली यांग गुइफेई हिला सम्राटानेच देहांत शासन द्यावे अशी मागणी केली.
सम्राटासमोर कोणताही पर्याय नव्हता. गुईफेईला चाबकाच्या वादीने गळफास देऊन ठार मारण्यात आले. सन ७५७ मध्ये लुशानचीही हत्या झाली. पण बंड थांबले नाही. विखुरलेल्या बंडवाल्यांनी लुटालुट करणे सुरुच ठेवले. तरीही चिनी सम्राटाने शेवटी बंड शमवण्यात व विविध प्रांतांच्या राजधान्या पुन्हा ताब्यात घेण्याचे काम पुर्ण केले. पण यात चीनच्या लष्कराची मोठी हानी झाली. चीन आंतरराष्ट्रीय प्रश्नांत लक्ष घालण्याच्या स्थितीतच राहिला नाही. त्याचा फायदा तिबेट व तुर्कांनीही घेतला. ही स्थिती ७६८ पर्यंत कायम राहिली.
-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

Vrata: An ancient name of Yoga

Long before the time when the compositions of Vedas began, Yoga was known to the Samana (equanimity or Jin) thinkers as Vrata (vow) whic...