Saturday, March 18, 2023

शिक्षण ज्ञानासाठी कि रोजगारासाठी?


 

शाळा-कॉलेजांत दिले जाणारे शिक्षण हे शिक्षण नसून काय शिकावे याचे विद्यार्थ्याला दिशादिग्दर्शन करणारे असते असे इमर्सन या शिक्षणतज्ञाने अठराव्या शतकात म्हटले होते. शिक्षणाचा हा मुलभूत पाया आपल्या शिक्षणव्यवस्थेतून पुरता दुर्लक्षिला गेलेला आहे. लिहा-वाचायला शिकणे ही शिक्षणाची पहिली पायरी असली तरी विद्यार्थ्याचा एकुण कल लक्षात न घेता पहिली ते दहावी अभासक्रमातील सारेच विषय सर्वच विद्यार्थ्यांवर सरसकट थोपलेले असतात. प्रत्येक विषयात विद्यार्थ्याने अधिकाधिक गूण मिळवावेत एवढीच माफक अपेक्षा आपली शिक्षणव्यवस्था ठेवून असते. सर्वच विषयांत प्रत्येक विद्यार्थ्याला सारखाच रस असणे शक्य नसते. ज्यात रस आहे त्यात अभ्यासक्रमाबाहेर जात कुतुहल दाखवणे विद्यार्थ्याला शक्य असले तरी आपली शिक्षणपद्धती तसे करू देत नाही. किंबहूना कुतुहल वाढवणे हाच अभ्यासक्रमाचा हेतू असतो हेच लक्षात घेतले जात नाही.

 

त्यामुळे रस नाही असे विषय विद्यार्थी सोप्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न करतात व तो म्हणजे पाठांतर...! ज्यांची स्मरनशक्ती चांगली आहे असे विद्यार्थी चमकतात तर उर्वरीत घोकंपट्टीच्या आधारावर सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करतात. यात बव्हंशी विद्यार्थी शिक्षणातील रस गमावून बसतात व उरते एक औपचारिकशिक्षण नव्हे तर शिक्षा वाटणारी शिक्षणप्रक्रिया. जे शिकावे वाटतेज्यात अधिक प्राविण्य मिळवावे वाटते ते विषय बालवयातच मागे पडतात व विद्यार्थी हा शिक्षणाला कंटाळलेला पण नाईलाज म्हणुन शिकणारा असा घटक बनत जातो. या प्रक्रियेत पदवीपर्यंत पोहोचेपर्यंत अगणित विद्यार्थी शेवटी गळुन पडतात. तोवर शिक्षणाबद्दलचे विद्यार्थ्याचे मत हे "रोजगारार्थ शिक्षण" असेच बनून गेले असल्याने सहविद्यार्थीही त्याचे रोजगाराच्या जीवघेण्या शर्यतीतील महत्वाचे स्पर्धक बनलेले असतात. यातून जी असामाजिक मानसिकता बनते त्यावर आपल्याला गंभीरपणे विचार करावा असे वाटत नाही.

पास होणे व पुढे जाणे या प्रक्रियेत पास होण्याला अनन्यसाधारण महत्व दिले जाते ते शिक्षकपालक ते समाजाकडून. नापास होणारा विद्यार्थी हा कुचकामी असतोबुद्धीहीन असतो असा समज आपण करुन घेत असतो तेंव्हा "बुद्धी"च्या व्याख्येबद्दल आपला सनातन गैरसमज असतो. दरवर्षी दहावी-बारावीनंतर नापास झालेल्या अनेक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या आपल्या समाजमानसाच्या मानसिक असंतुलनाचा अपरिहार्य भाग आहे.

 

बरेहे शिकलेलेपदवीधरज्या शाखांमद्धे शिकतात त्यात किती प्राविण्य मिळवलेले असतातजगण्यासाठीचे असे कोणते कौशल्य त्यांनी शिक्षनपद्धतीमुळे आत्मसात केलेले असतेतज्ञांच्या मते अशिशिक्षित व्यक्ती या उलट सुशिक्षितांपेक्षा जगण्याची साधने प्राप्त करण्यात अधिक कुशल असतात. सुशिक्षित बेरोजगार अशी जशी एक व्यापक अवस्था आहे तशी अशिक्षित बेरोजगार मिळणे अवघड आहे कारण किमान अशिक्षिताला जगण्याची साधने मिळवण्यासाठी सामाजिक लाज वाटत नाही. आज कोट्यावधी शिक्षीत बेरोजगार आपल्या पारंपारिक व्यवसायात पडु इच्छित नाहीत. शेतक-यांची मुले शेतीवर राबण्यातआहे त्या शेतीकामाला विकसीत करण्यात कमीपणा मानतात. हीच बाब अन्य पारंपारिक व्यवसायांची. मग नवीन संधी शोधणेविकसीत करणे ही तर खुपच दुरची बाब झाली. याचे महत्वाचे कारण म्हणजे सफेदपोश नोक-यांचे आपल्या समाज व शिक्षणसंस्थांनी वाढवलेले अनिवार आकर्षण.

 

आणि यामुळेच आपली शिक्षणपद्धती ही निष्क्रीयअनुत्पादक बेरोजगार निर्माण करणारी संस्था बनली आहे. कोणतीही व्यवस्था समस्त शिक्षीत समाजाला रोजगार देवू शकत नाही. रोजगार निर्माण करणारेही तेवढ्याच प्रमाणात (मग तो स्वयंरोजगार का असेना) कसे निर्माण होतील अशी शैक्षणिक रचना करावी लागते. श्रमप्रतिष्ठा व ज्ञानप्रतिष्ठा यांच्यात संतुलन साधावे लागते. ज्ञान तर नाहीच नाही आणि श्रमप्रतिष्ठाही नाही अशा विचित्र परिस्थितीत आपली शिक्षणव्यवस्था अडकलेली आहे.

 

याची परिणती पहायला हवी. केंद्रीय श्रममंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारतीय एकुण रोजगार क्षेत्रात फक्त ७% रोजगार संघटित क्षेत्र देते तर ५% असंघटित क्षेत्र देते. उर्वरीत रोजगार हा अजुनही शेती, पशुपालन व मासेमारी क्षेत्रावर अवलंबून आहे आणि हा रोजगार बव्हंशी अर्धवेळ स्वरुपाचा आहे. जरी सध्या खाजगी क्षेत्र वाढत असले तरी त्याच वेळीस शासकीय नोक-या कमी होत आहेत. एकुणात जेवढ्या प्रमाणात शिक्षितांची संख्या वाढत आहे त्याच्या व्यस्त प्रमानात रोजगाराच्या संधी वाढत आहेत...म्हणजेच शेतीक्षेत्र हेच आजही रोजगाराचे प्रमूख माध्यम आहे.

 

ज्ञाननिष्ठातर्कनिष्ठाकल्पनाशक्ती व निर्मितीक्षमता ही शिक्षणपद्धतीची चतु:सुत्री असायला हवी होती. आता तरी असायला हवी. पण दुर्दैव हे आहे कि आपले अगदी विज्ञानाचे शिक्षण आणि धर्मशिक्षण यात फरक उरलेला नाही. धर्मशिक्षक जसे शंका व्यक्त करण्यावर बंदी घालतात तसेच आमचे विज्ञानशिक्षकही विद्यार्थ्याला शंका विचारायला बंदी घालतात. नैसर्गिक कुतुहलाची हत्या ही अशी होते. ज्ञानाची वाढ थांबते ती अशामुळे. अगदी चित्रकला शिकवनारे शिक्षकही रेखाटने व रंगभरणाच्या तांत्रीक बाजुंनाच महत्व देतातसृजनाला नाही. प्रयोगशीलतेला नाही. चित्रकारितेतही जेथे "कुशल कामगार" निर्माण केले जातात तेथे चित्रकारांची आणि कला-अविकसीत रसिकांची काय गत असेल?

 

प्रगल्भ समाज घडवण्याच्या कार्यात आपली शिक्षणपद्धती अत्यंत अपयशी ठरते आहे. डेसिडिरयस इ-यस्मस यांनी "शिक्षण हे ज्ञानतर्कशुद्धता आणि अनुभव मिळवण्यासाठी दिले जावे..." असे म्हटले होते. युरोपात ज्ञानक्रांती झाली तिला आमचे एतद्देशीय विद्वान "भौतिक क्रांती म्हणुन त्याज्ज्य" असे आजही हीनवत असतात आणि आमच्या अस्तित्वात कधीही नसलेल्या आध्यात्मिक क्रांतीलाच सर्वोपरी मानत आपले मानसिक समाधान करुन घेत असतात.

 

खरे तर माणसाला प्रगल्भ बनवतजगण्यासाठी सक्षम बनवतसंध्या निर्माण करत प्रत्येक क्षेत्रात अग्रगामी राहनारा समाजच खरा आध्यात्मिक असतो हे लक्षात घ्यायला हवे.

याउलट आमची समाजरचना ही लबाडढोंगी आणि पथभ्रष्टांची कशी आहे याचे चित्र शिक्षणव्यवस्थेतीलच (आर्थिक ते नैतीक) अपार भ्रष्टाचारातुन सहज पाहता येते...इतर क्षेत्रांबद्दल मग काय बोलावेज्या समाजात विद्यार्थी आणि शिक्षकही भ्रष्ट असतातज्यांच्या शिक्षणप्रेरणा या ज्ञानप्रेरणा नसून शैक्षणिक अडाणीपनातुन व पोटभरु वृत्तीतून निर्माण होतात त्या समाजाचे भवितव्य काय असू शकते?

 

पोट भरण्यासाठी व इतरांचेही पोट भरण्यासाठी सक्षम बनवणेस्वावलंबी बनवणे हे जेवढे आवश्यक आहे तेवढेच...किंबहुना त्याहीपेक्षा जास्त आवश्यक असते ते हे कि भावी पिढ्यांना एक प्रगल्भ विकासशील नागरीक बनवणे. तसे आम्ही करत नाही आहोत. एका अज्ञानाच्या व्यामोहात सापडलेलो आहोत...जसे मध्ययुगात होतो त्याच मानसिकतेत आहोत. त्यामुळेच कि काय आम्ही अपवादात्मक एखाददुसरी उदाहरणे वगळता जागतीक ज्ञानसंपदेत भर घालु शकलेलो नाही. आणि आमची शिक्षणपद्धती मुळात तशी इच्छाही निर्माण होवू देत नाही.

 

मग स्वत:चे व्यक्तिगत भवितव्य हे जर एका फक्त रोजगाराभिमुख स्पर्धकाचे असेल तर आम्ही कोणत्या जोरावर महासत्ता बनण्याच्या वल्गना करतोमहासत्ता ही ज्ञानसत्तेच्याच जोरावर बनू शकते. ज्ञानसत्ताच अर्थसत्ता निर्माण करू शकते कारण अर्थोत्पादन ही ज्ञानाचीच तार्किक व अंतिम परिणती असते. तिची परिमाणे वेगवेगळी असू शकतात. बापजाद्यांच्या जमीनी विकून अथवा दुस-यांच्या हडपुन अर्थोत्पादन होत नसते. देशी नैसर्गिक साधनसामग्री उध्वस्त करुनम्हणजे बाहेर विकूनअर्थोत्पादन होत नसते. उसशेती ज्याप्रमाने इतर शेती उत्पादनांसाठी न्याय्य वाटा न देता जलसंपत्ती उधळते...तसे करुनही शाश्वत अर्थोत्पादन होत नसते. आपल्याला "अर्थ" कळाला नाही कारण आपली शिक्षणपद्धतीच मुळात अर्थाला समजण्यात अपेशी ठरलेली आहे!

 

आपल्याला आपल्या शिक्षणविचारांच्या दिशा बदलाव्या लागतील!

 

संजय सोनवणी


(दै. नवशक्तीमध्ये प्रकाशित)

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...