श्रीमंत व्हावे असे कोणाला वाटत नाही? मनुष्य
या धरातलावर अवतरला तेंव्हापासून त्याची प्रवृत्ती ही अधिकाधिक संग्रह करण्याची
राहिलेली आहे. संपत्तीचे मापदंड
मनुष्याच्या प्रगतीसोबतच बदलत राहिल्याचेही आपण मानवजातीच्या इतिहासात पाहिले आहे.
पशुपालक मानव हा आपले पशुधन कसे वाढेल याचाच प्रयत्न करत असायचा तर कृषी मानव आपले
शेतीतील उत्पन्न कसे वाढेल याचीच चिंता करत असायचा. वस्तू-विनिमायातून त्याने
व्यापार करायचे कलाही साध्य केली. आपल्याकडे जे अतिरिक्त आहे ते विकायचे आणि जे
नाही ते खरेदी करायचे हा प्रकार जगभरच्या मानवी टोळ्यांत अस्तित्वात आला. वस्तुविनिमयात
अडचणी जाणवल्या तसा चलनाचा शोधही लावला गेला. व्यापार अधिक सुलभ झाला. शेतीसाठी धरणे/कालवे
बांधायची कलाही मानवाने विकसित केली. मनुष्य जेंव्हा शिकारी मानव होता तेंव्हाही
त्याने दगड/गारगोट्या/लाकूड/हाडे यांचा वापर करत हत्यारे बनवायचे शोध लावले. या
शोधातून आद्य हत्यारनिर्मितीचे कारखाने निघू लागले. असे कारखाने अगदी
महाराष्ट्रातही नद्यांच्या खोर्यांत सापडलेले आहेत. जेथे सुयोग्य असा कच्चा माल (म्हणजे
कठीण खडक किंवा स्फटिक, तेथे तेथे माणसाने कल्पकतेने हे कारखाने काढले. कच्चा माल
संपला कि त्या जागेचा त्याग करून अन्यत्र शोध घेण्यासाठी भटकंती केली. ही हत्यारे
तो विकताही असणार हे उघड आहे. आणि कशाला हवी होती ही हत्यारे? तर शिकार करण्यासाठी
तसेच शत्रू टोळ्यांशी युद्ध करण्यासाठी. मनुष्याने व्यापार सुरु केला याचा इतिहास
अत्यंत पुरातन आहे. शिकारीसाठी लागत होती तशी दुस-या शत्रू
टोळ्यंशी लढायलाही लागत होती हे उघड आहे. म्हणजे हत्यारे आणि शिकार असलेली जंगले
हे त्याचे जगण्याचे भांडवल होते. आपल्या जंगलात शिकार कमी झाली कि दुस-या जंगलाचा
शोध घेणे, इतर टोळ्याही त्यावर
कब्जा करायला आल्या कि लढून त्यांना हुसकावने हे प्रकार होतेच. शिकारीचे
वाटप/स्त्रीयांचेही वाटप टोळ्यांत समान होते असेही आपल्याला दिसत नाही. म्हणजेच, नैसर्गिक
साधनसंपत्तीचा वापर करून, त्यावर प्रक्रिया करून संपत्तीची निर्मिते करणे, ही
मानवाची आंतरिक ओढ होती व आहे. मनुष्यप्राणी हा मुळात:च भांडवलदारी मनोवृत्तीचा
आहे असे यावरून आपल्याला दिसते.
पण संपत्ती निर्माण करायची आणि सुरक्षित
रहायचे यासाठी नुसती प्राकृतिक साधने पुरेशी नव्हती. त्यासाठी स्वटोळी आठवा मित्र
टोळ्यांचेही सहकार्य आवश्यक होते. त्यातूनच समाजव्यवस्था व समाजाअंतर्गाताचे
नीतीनियमही अस्तित्वात आले. देव-धर्माचा शोध याच प्रेरणेतून लागत गेला. कालौघात
त्या त्या काळच्या गरजांप्रमाणे त्यात बदलही होत गेले. शिकारी आठवा पशुपालक होता,
विविध टोळ्यांत संघर्ष सुरु असायचे त्या काळातील देव हे युद्धखोर असायचे. शेतीच्या
शोधानंतर उदयाला आलेले देव हे सृजन/सुफलन आदी क्रियांचे जनक आहेत अशी कल्पना करून
देवता सुफलनात्मक व सृजनात्मक बनल्या. भारतातील शिव-शक्ती या सर्वदूर आजही
लोकप्रिय असलेल्या देवता या सृजन क्रियेचे आद्य निर्माते दैवतयुगल म्हणून निर्माण झाल्या. त्यांनीच सृष्टीला
जन्म दिला गेला अशी मिथकेही निर्माण केली गेली. थोडक्यात जनन आणि सृजन या
क्रियांना दैवी स्वरूप दिले गेले. असे असले तारे यातील निखळ श्रद्धेचा भाग वगळला
तरी यामागे माणसाच्या भौतिक प्रेरणाच अधिक जबाबदार होत्या असे म्हणता येते. राज्य,
गणराज्य, साम्राज्य या संकल्पनाही सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठे विकसित करण्यात
आल्या. प्राचीन काळापासून जगातील बहुतेक ही
आर्थिक कारणांनीच झाली. व्यापारी मार्गावर ज्याचे स्वामित्व तोच श्रेष्ठ या कल्पनेचा
उदय इसपू साडेतीन हजार वर्षांपूर्वीच झाला. जागतिक शेती उत्पादनांबरोबरच अलंकार ते
शेतीउपयोगी उत्पादनांची शिस्तबद्ध वाढ आणि व्यापार सुरु झाला. राज्यकर्तेही तेवढेच
कररुपी उत्पन्न मिळवण्यात अग्रेसर झाले. एका अर्थाने मानवजातीच्या प्रगती आणि अध:पतनाचाचा
इतिहास म्हणजेच अर्थव्यवस्थेचा इतिहास आहे. पण आपल्याला राजकीय इतिहासातच अधिक रस
असल्याने आर्थिक इतिहास हा आपल्याला माहित करून घेण्याची फारशी आवश्यकता वाटत
नाही.
श्रीमंत व्हावे असे बहुतेक लोकांचे स्वप्न
असले तरी “ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान” किंवा “बिकट वाट
वहिवाट यशाची धोपट मार्गा सोडू नको” या सारखे ताताद्न्यान जेंव्हा प्रबळ होत
समाजमनावर अधिराज्य गाजवू लागते तेंव्हा मात्र समाजाची अवस्था साचलेल्या डबक्यासारखी
होऊ लागते. नवीन शोध घेणे, त्याचे व्यापारी पद्धतीने उत्पादन करत जेथे जेथे मागणी
असू शकेल तेथे जात व्यापार वाढवणे अशा प्रेरणाच नष्ट होतात. जगण्याचे आहे तीच
पद्धत चांगली वाटु लागते. हवी ती परिस्थिती बदलून भौतिक यश संपादन करावे या भावनेपेक्षा
आध्यात्मिक यश श्रेष्ठ वाटू लागते. परलोकावर डोळा ठेवून आहे त्या जगण्यातील परवड
सहन करण्यात धन्यता वाटू लागते. गरीबी हा कलंक न वाटता दागिना वाटू लागते. दहाव्या
शतकानंतर मुळचा इहवादी भारत अध्यात्मवादी/भक्तीवादी जसा बनत गेला तसे जीवनोपयोगी
नवे शोध थांबले. अर्थव्यवस्थेला बळकटी देणा-या उत्पादक व व्यापा-यांच्या
श्रेण्यांचा अस्त होत गेला. त्याचे विपरीत
परिणाम समाजव्यवस्थेवरही झाले. बलुतेदारी पद्धतीचा उदय झाला, जातीव्यवस्था निर्माण
झाली आणि सारेच आपल्या मर्यादित परिप्रेक्षात जगण्यापुरते कमावण्यात व्यस्त झाले.
थोडक्यात अर्थव्यवस्था तर स्थितीस्थापक बनलीच पण समाजव्यवस्थाही दोषाग्रस्त होत
गेली.
आजची स्थिती तरी काय आहे? श्रीमंत कसे बनावे,
यशस्वी जीवन कसे जगावे यासारख्या विषयांवर असंख्य पुस्तके बाजारात आहेत. त्यांचा
तडाखेबंद खप होतानाही दिसतो. प्रेरक व्याख्याने देणारे आपल्या रसाळ वाणीत जगातील
धनाढ्याचे किस्से सांगून तरुणांमध्ये जोशही निर्माण करतात. कोणाला बिल गेट्स व्हायचे
स्वप्न पडू लागते तर कोणाला एलन मस्क व्हावेसे वाटते. प्रत्यक्षात चित्र काय आहे?
हेच क्षणभर प्रेरित झालेले तरुण काही प्रयत्न केल्यानंतर हतबल होतात आणि नाईलाजाने
जगण्याच्या मळलेल्या वाटा चालू लागतात. श्रीमंत होणे हे स्वप्न उरात उरले तरी ते
एखाद्या भळभळत्या जखमेप्रमाणे सलत राहते. दुस-यांच्या यशाकडे पाहण्याचा कुत्सित
दृष्टीकोन विकसित होऊ लागतो. “रोगात श्रीमंतीपेक्षा धडधाकटी गरीबी बरी” या मताशी
येऊन ठेपत स्वत:च्या स्थितीत खोटे समाधान शोधू लागतो अथवा गैरमार्ग वापरून का
होईना संपत्तीसंचय करण्याचा प्रयत्न करू लागतो.
मुळात ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि “भांडवलदारी”
ही माणसाची मुलभूत प्रवृत्ती आहे. श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न करणे आणि रास्त
मार्गाने श्रीमंत होणे यात लाज वाटण्याचे काहीएक कारण नाही. भारतात एके काळी, अगदी विसाव्या शतकातही
श्रीमंतीचा द्वेष करण्याची, श्रीमंती ही वाममार्गानेच मिळू शकते यावर दृढ विश्वास
निर्माण होण्याची लाट आली होती. आजही या स्थितीत फारसा बदल झालाय असे नाही. त्याला
अर्थात अनेक भ्रष्ट उद्योजक/राजकारणी/प्रशासकीय सेवेतील भ्रष्ट जबाबदार आहेतच.
त्यात एखादा तरुण उद्योग-व्यवसाय काढायचा
विचार जरी करू लागला तर “हे काही आपले काम नाही...सरळ नोकरी शोध” असे सल्ले
घरातूनच मिळू लागतात. अर्थप्रेरणांचे खच्चीकरण घरातूनच व्हायला सुरुवात होते. धोका
पत्करण्याची भीती हे कारण तर असतेच असते. शिवाय इतरही अन्य घटक अर्थप्रेरणांवर
परिणाम टाकत असतात, त्यात सरकारी धोरणे हे महत्वाचे कारण.
आज आहे त्या स्थितीत बदल घडवून प्रगती साधने,
श्रीमंती प्राप्त करणे हे प्रत्येकाचे इहवादी धोरण असले पाहिजे. तशी मानसिकता
निर्माण करायला पाहिजे. कशी? याबाबत आपण चर्चा करत राहूच!
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment