कोणतेही नवे तत्वज्ञान जन्माला येते तेंव्हा भवतालाचा त्यावर अपरिहार्य प्रभाव असतो. भवताल जेवढा उद्रेकी तेवढेच तत्वज्ञान तीक्ष्ण असते. अस्तित्ववाद जेंव्हा पाश्चात्य जगात जन्माला आला त्याला दुस-या महायुद्धातील उध्वस्त राष्ट्रे, समाजव्यवस्थेची, हिंसेची आणि त्यातूनच निर्माण झालेली मानवी जगाकडे उपहासाने पाहण्याची मानसिकता होती. तो उध्वस्त मनांचा उद्गार होता. ते स्वाभाविक तत्वज्ञान होते. तत्वज्ञान हे नेहमीच समुहाचा मानसिक उद्गार असते. मांडणारा एक असेल कि अनेक. दोन्ही महायुद्द्धांनी पाश्च्यात्य जगाची मानसिकता बदलवली आणि तीच मानसिकता श्रेष्ठ आहे हे ठसवण्याचा अवाढव्य प्रयत्न अनेक मार्गांनी झाला.
भारतीय त्या मानाने नशीबवान होते खरे. युद्धे झाली जगभर पण त्याचे परिणाम जीवन-मृत्युच्या तांडवी संघर्षरुपात त्यांना भोगावे लागले नाहीत. महात्मा गांधींनी युद्ध केले पण ते मानवी प्रवृत्तीविरोधात शांततामय मार्गाने. जो देश कधीच अखंड नव्हता त्याला स्वातंत्र्याच्या उर्मीने पेटवून उठवत पण मानवतेची कास न सोडता एक देश म्हणून अस्तित्व दिले. भारतीय तत्वज्ञान यावर आधारित पुढे जात एक ठसा उमटवू शकत होते पण भारतीय लेखक-कवींनी काही काळ सोडला तर त्याचा आधार घेत अजरामर कलाकृती निर्माण करण्याचा मुळीच प्रयत्न केला नाही. उलट पाश्चात्य तत्वज्ञानावर आधारित आपले पोरकट सृजन करत राहिले. उसने तत्वज्ञान कधीही कोणाच्या अंतरात सृजनाचे महामेरू जन्माला घालू शकत नाही. भारतीय साहित्याचे तेच झाले.
प्रश्न गांधींचा नव्हता. प्रश्न भारतीय विचारप्रणालीचा होता. हिंसा कि अहिंसा हा सनातन प्रश्नाचा होता. शाश्वत समाजव्यवस्थेचा होता. आज आम्ही ना अरत्र ना परत्र या अवस्थेला आलो आहोत कारण अनुकरण नेमके कशाचे करायचे हेच आम्हाला समजलेले नाही. आम्हाला आमची अशी व्यवस्था निर्माण करण्यात घोर अपयश आले असेल तर आज आमचे काहीच नाही असे वाटण्याची वेळ आली आहे कारण आम्ही जे अनुसरायचे त्यापासूनच फारकत घेतलेली आहे. आमचे काहीच उरलेले नाही...उरले असतील तर फार दूरच्या भूतकाळाचे वांझ विलाप जे आजच्या काळाशी सुसंगत नाहीत. आणि जे सुसंगत आहेत त्यांना आम्हीच नाकारण्याचा प्रमाद करत आहोत.
आम्हाला आमचे तत्वज्ञान आणि अभिव्यक्ती हवी आहे!
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment