कृत्रिम बुद्धिमत्ता (ए.आय) हा जगभरच्या गंभीर चर्चेचा विषय बनलेला आहे. ए.आय. आता आपल्या दैनंदिन जीवनात घुसलेले असून आता तर ते मशीन लर्निंग, डीप लर्निंग सारख्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्रातही पाय रोवू लागले आहे. त्यामुळे अचूक विश्लेषण आणि वेगवान निर्णय व त्याची अंमलबजावणी मानवी नियंत्रणाशिवायही साध्य करणे माणसाला जमू लागले आहे. माहितीच्या अवाध्वाय ढिगा-याचे क्षणात विश्लेषण करून निर्णय घेण्यास योग्य ठरतील असेच विश्लेषण प्राप्त करण्याचे कार्य साध्य करण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (ए.आय.) सोपे बनत चालले असून किचकट निर्णय प्रक्रिया त्यातल्या त्यात सुलभ बनवणेही शक्य होत आहे. ए.आय. मानवाप्रमाणेच सद्न्यात्मक विश्लेशन करून निर्णयसुद्धा घेऊ शकेल या दिशेने आता वेगाने वाटचाल होते आहे. संगणक शास्त्रातील कृत्रिम बुद्धीमत्ता ही एक शाखा असून प्राथमिक गणना करण्यापासून ते ए.आय. पर्यंत घेतलेली ही झेप मानवी बुद्धीचेच एक प्रकट पण कृत्रिम रूप आहे. रोबोटिक्स (यंत्रमानव) ही कृत्रिम बुद्धीच्याच पायावर निर्माण झालेली आंनी वेगाने वाढत असलेली शाखा आहे. आता तर जटील शस्त्रक्रियाही रोबोटिक्सच्या मार्फत केल्या जातात मानवी श्रमिक/कामगारांची जागा रोबोटिक्स आणि व्यवस्थापनातील साधे अकाउंटीग ते विश्लेषणही आता ए.आय.च करू लागल्याने याही क्षेत्रात मानवी आवश्यकता कमी होत चालली आहे. यामुळे संपूर्ण मानवजातच धोक्यात आली असून त्यामुळे अनेक नैतिक/सामाजिक आणि आर्थिक समस्या उद्भवतील अशी भीती विचारवंत व्यक्त करत आहेत. आता शालेय निबंध, प्रबंध ते कादंब-याही Chatbot सारखी ए.आय. साधने लिहू शकत असल्याने जगातील अनेक शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यावर ए.आय. बंदी घातलेली आहे. ए.आय. व रोबोटिक्समुळे जगातील आर्थिक आणि सामाजिक फेररचना होणार याबाबत मात्र शंका बाळगायचे कारण नाही. आणि माझ्या मते भीतीही बाळगण्याचे कारण नाही, कारण जगाच्या रचनेत बदल घडवू शकणारा हा पहिलाच क्रांतीकारक शोद्झ नाही.
ए.आय. मुळे उडू शकणा-या हाहा:काराबाबत चर्चा करणारे तेच लोक आहेत ज्यांचा या ज्ञानात भर घालण्यात काहीही वाटा नाही. शेतीचा शोध लागून भटका माणूस स्थिर आणि अधिक सुसंस्कृत बनला ही आद्य क्रांती मात्र आपण विचारात घेत नाहे. जगण्याचे म,आर्ग मात्र बदलले होते. जुन्यालाच चिकटून बसणारे लोक आपसूक मागे फेकले जातात हाही जगाचा इतिहास आहे. औद्योगिक क्रांतीमुळे यंत्रयुग सुरु झाले आणि पूर्वी जी उत्पादने हातांनी प्राथमिक यंत्रांच्या सहाय्याने केली जात तीच स्वयंचलित यंत्रांमार्फत होऊ लागली. त्याचा सुरुवातीला जगातील अनेक अप्रगत व्यवस्थांना जोरदार फटका बसला. बेरोजगारीचा विस्फोट झाला. भारतासारखा पारंपारिक उत्पादन व्यवस्थेत कुशल असलेला देश हा हा म्हणता दरिद्री झाला. पण काही काळात भारत तसेच जगही सावरले आणि नव्या बदलाशी जुळवून घेत यंत्रयुगाची क्लास धरली आणि प्रगत राष्ट्रात जरी समावेश नाही झाला तरी वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली.
नंतर आले संगणक युग. संगणकामुळे बेरोजगारी वाढेल असा आधी फार मोठा गैरसमज पसरलेला होता. संगणकीकरणास विरोध करणा-या संघटना जगभर होत्या. विचारवंतांनी तेंव्हाही सामाजिक व आर्थिक नितीमत्तेबद्दल प्रश्न उठवले होते. संगणक आले. त्याने एका क्षेत्रात जशी बेरोजगारी वाढवली तशीच अन्य क्षेत्रात फार मोठ्या रोजगाराची निर्मितीही केली. रोजगाराचे स्वरूप बदलले एवढेच. पण जशी भीती व्यक्त केली जात होती तसा हाहा:कार उडाला नाही. उलट मानवी जीवन अधिक सुलभ झाले. आर्थिक अधोगती न होता प्रगतीच झाली. प्रगतीचे वितरण समान प्रमाणात झाले नाही असा आक्षेप घेतला जातो, पण कोणतीही अर्थव्यवस्था आजवर संपत्तीचे समान वितरण करू शकलेली नाही हेही एक वास्तव आहे. या क्रांतीत जे सहभागी होऊ शकले नाहीत ते मागेच राहिले व त्यांची प्रगत वर्गाच्या तुलनेत अधिक अवनती झाली असेही चित्र आहे. पण ही अवनती जर सापेक्ष दृष्टीने पाहिले तर त्यांच्या पूर्वीच्या अवनतीपेक्षा बरी होती असेच चित्र दिसते. म्हणजे संपत्तीचा काही का होईना हिस्सा त्यांच्याही वाट्याला आला. आपण गेल्या सत्तर वर्षातील गरिबीच्या उत्पन्न मर्यादेची आकडेवारी पाहिली तर गरीबचेही उत्पन्न वाढले आहे असेच चित्र दिसेल.
आता कृत्रिम बुद्धीमत्ता किंवा यंत्रमानव आलेले आहेत व ते जगाचे एकंदरीत रूप बदलणार आहेत हे वास्तव आहे. रोजगार व नैतिकतेचे सापेक्ष निर्देशांक तर बदलणार आहेतच पण मानवी कार्याच्या एकुणातील दिशाही बदलणार आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता मानवी बुद्धीमत्तेची जागा घेईल ही एक व्यर्थ अशीच भीती आहे कारण मानवात विकसनशील बुद्धीसोबतच प्रतिभा व कल्पकता वावरत असते आणि यामुळेच मनुष्य संवेदनशीलही आहे. हे कार्य ए.आय. करू शकत नाही. पण कृत्रिम बुद्धिमत्ता बोजड कामात वेळ वाया घालवत मग निर्णय घेतल्या जाणा-या किंवा उत्पादनपद्धतीत आमुलाग्र बदल घडवेल. मानवाची निर्णयक्षमता विचार-अभ्यास प्रक्रिया अधिक गतिमान करू शकेल. आणि या सोबतच अनेक नवे व्यवसाय/उद्योग निर्माण होत जातील आणि एकुणातील मानवजात बेरोजगार झाली आहे असे चित्र निर्माण होणार नाही. यंत्रमानव जरी अगदी स्वयंपाकघरात घुसले तरी त्यांची व्यवस्था पहायला मानवच लागतील. शेती ते सर्व कारखाने यंत्रमानव नियंत्रित करू लागले तर काय ही भीती नाका-या लोकांनी निर्माण केलेली आहे. प्रत्यक्षात मानवी श्रम अजून कमी करून मानवी बुद्धीमत्तेला ही प्रगती अधिक वाव देऊ शकते हे लक्षात घेतले पाहिजे.
म्हणजेच उद्याचे जग अधिकाधिक बुद्धीमान लोकांचे असेल तर जे फक्त श्रम देऊ शकतात त्यांचाच वाटा कमी होत जाईल, पण संपणार नाही. अशा लोकांच्या जीवनासाठी नवी व्यवस्था होईल व कदाचित ती आताच्या व्यवस्थेपेक्षा अधिक चांगली असेल. आणि समजा वाईट झाली तरी कोणालाही खंत करत बसण्याचे कारण नसेल कारण आजवर व्यवस्था बदलल्या तेंव्हाही सामाजिक उलथापालथ झालेली आहे व तिची खंत कोणी केलेली दिसत नाही. तेंव्हा या नव्या क्रांतीने काहीतरी भयंकर घडणार आहे ही भीती निरर्थक आहे.
ज्ञान हाच उद्याच्या जगाचा पाया असणार आहे हे कोणीही विसरून चालणार नाही. आता “ज्ञान” कशाला नेमके म्हणायचे यावर ज्ञानात्मक चर्चा अभिप्रेत आहे. जुने विचार येथे कुचकामी ठरणार आहेत. मानवी जग बदलत राहिलेले आहे. ते बदलत राहणार. ते या पृथ्वीवर असेतोवर तरी. त्यामुळे नैतिकतेच्या आजच्या कल्पना उद्यावर लादून चालेल काय हा खरा प्रश्न आहे. कालच्या नैतिकता आजच ढासळून पडलेल्या आपल्याला पहाव्या लागत असतील तर आजच्या नैतिकता उद्यावर लादून कसे चालेल? आणि उद्याचा मार्ग रोखून कसे चालेल?
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment