Saturday, March 24, 2012

संजय सोनवणी किती आहेत?

शिर्षक वाचुन गोंधळात पडु नका. हा प्रश्न मला गेली १५-२० वर्ष विचारला जातो आहे. थोडक्यात हा मुद्दा स्पष्ट करायचे म्हणजे...

१. थरारकथा लिहिणारा संजय सोनवणी कोणी वेगळाच असून ऐतिहासिक कादंब-या लिहिणारा संजय सोनवणी वेगळाच असला पाहिजे याबाबत...

२. ऐतिहासिक कादंब-या लिहिणारा संजय सोनवणी आणि वेद ते धर्म याची चिकित्सा करणारा सोनवणी एक असू शकत नाहीत...

३. गायक, संगीतकार आणि दिग्दर्शक-अभिनेता असणारा हा कोण सोनवणी आहे?

४. नेटवर सर्च घेतला कि अनेक लिस्टेड-अन्लिस्टेड कंपन्यांचा मालक दिसनारा सोनवणी आणि हा सोनवणी यांच्यात नेमके काय नाते आहे?

५. एक संजय सोनवणी चित्रेही काढतो तो कोण आहे?

६. शेतक-यांबदल पुस्तक/लेख लिहिणारा सोनवणी आणि विश्वनिर्मितीचा सिद्धांत सांगनारा सोनवणी एक असुच शकत नाही...

७. आणि हा माणुस खाजगी गुप्तहेर संस्थाही चालवतो?

८. जेलमद्धे जावून आलेला सोनवणी विचारवंत सोनवणी असुच शकत नाही...

इइइइइइइइइइइ

छे...अशक्य...!

सोनवणी अनेक असले पाहिजेत...किवा सोनवणी अनेकांकडुन लिहुन घेत असले पाहिजेत...

यातील काय खरे?

हसु नका. खरोखरच अशा प्रश्नांचा व आरोपांचा सामना मी करत आलो आहे. माझ्या ब्लोगवरील विषयही एवढे व्यामिश्र आहेत कि गेल्याच महिन्यात जेंव्हा माझ्या "महार कोण होते?" या पुस्तकावर परिसंवाद झाला त्या कार्यक्रमाआधीच संयोजकांंपैकी एकाने मला विचारले..." साहेब, ब्लोगवर एवढे विषय...तुमच्याकडे लेखकांची टीम आहे काय?"

मला या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही. मी एवढेच म्हणालो..."एवढी दुर्दशा अजुन माझी झालेली नाही."

एक पुस्तक वाचुन मला फोन करणारे विचारतात...अहो ते अमुक पुस्तक लिहिणारे सोनवणी तुमचे कोण लागतात?...मी "मीच तो" म्हटलो कि त्यांचा विश्वास बसत नाही कारण दोन्ही पुस्तकांचे विषय पराकोटीच्या टोकाचे असतात.

असे का होते? मी लोकांना/वाचकांना दोष देत नाही. आपल्याकडे ब्रांडिंग करुन टाकणे वा करवून घेणे यात व आपापली दुकाने बनवायला भाग पाडनारे वा बनवणारे अशांचीच रेलचेल असते. जेंव्हा मी थरार कादंब-या लिहायचो तेंव्हा तुम्ही सामाजिक वा ऐतिहासिक कादंब-यांच्या फंदात पडु नका, वाचक गमावाल असे सांगणारे प्रकाशक आले तसे मी स्वत:ची प्रकाशन संस्था काढुन मोकळा झालो. मी एका क्षणाशी कधी थांबलो नाही. जे लिहिले वा व्यावसायिकही कर्म केले त्याच्या प्रेमात पडत तेथेच अदकुन राहिलो नाही. क्लीओपात्रा लिहिली कि मी शुन्य महाभारत लिहायला मोकळा झालो. मी नंतर माझी प्रकाशित पुस्तके कधीही शक्यतो (नवीन आव्रुत्ती निघण्याचा अपवाद वगळता) वाचत नाही. त्याबाबत बोलत रहात नाही. तो मला फालतु टाईमपास वाटतो. आजवर माझे शेकडो लेख प्रसिद्ध झाले असतील, पण माझ्याकडे त्यांची कात्रणेही जवळपास नाहीत. माझी नेमकी किती पुस्तके प्रकाशित झालीत याची यादी मी कधीही सांगु शकत नाही. कारण ती लिहिली, प्रसिद्ध झाली, आणि मी त्यांना तेथेच वाचकांच्या भरवशावर सोडुन दिली. माझ्या जवळपास प्रत्येक पुस्तकाच्या किमान दोन ते सात-आठ आव्रुत्त्या प्रसिद्ध झाल्यात. मी त्यांचे कौतुक करत बसलो नाही. नवीन आणि नवीन या अथक शोधामागे लागत राहिलो. जे लिहिले ते मागे सोडुन दिले. त्यांचा गवगवा करत बसलो नाही...कारण त्यासाठी वेळ घालवणे मला मान्य नव्हते व नाही.

हा जीवनाचा अथक शोध आहे. संस्क्रुतीचा आहे तसाच मानवी मुल्ल्यांचा आहे,. त्याचे अगणित पदर आहेत. गुंते आहेत. नीच प्रव्रुत्तींशी संघर्ष आहे तसाच शोषितांचा आत्माभिमान जागवण्याचा स्वल्प प्रयत्नही आहे. विषय टोकाचे नसतात...ते कोठेतरी एका समानस्थळी एकच होतात...पण मानवी स्वभाव टोकाचा आहे...आणि तो त्यालाच धरुन बसतो.

मी तसे कधीच केले नाही. माझ्यातच अनेक माणसे दडलीत काय? तर तसेही नाही. मी काही मल्टिपल पर्सोनिलिटी डिसओर्डरचा शिकार नाही. माझ्यात सारा मानवी समुदाय, त्यांची सम्स्क्रुती आणि विचारधारा वास करते आहे. एका अर्थाने मी मानवी मनाचा एक सारांश आहे.

सोनवणी किती आहेत? निरर्थक प्रश्न आहे. खरा प्रश्न असा आहे कि सोनवणी किती असावेत? किती नसावेत?

कि हेही निरर्थक प्रश्न आहेत?

नाही. खरे तर मानवी जीवनात काहीही सार्थक नसते तसेच काहीही निरर्थकही नसते. प्रत्येक मानसात असंख्य विचार व संभावना दडलेल्या असतात. सर्व त्या संभावना वेळोवेळी व्यक्त करु शकत नाहीत एवढेच. परिस्थितींची दडपणेच एवढी असतात कि आपापल्या सर्वच आविष्कारांना अभिव्यक्त करता येतेच असे नाही. मी मात्र सर्वच अभिव्यक्ती मन:पुर्वक केल्या आणि तेथेच त्या सोडुनही दिल्या. अडकुन पडलो नाही. न लोभ ना खंत...

मी कोण आहे? को अहं? हा खरा प्रश्न. मी कोणीच नसतो तर मी हा नेहमीच एका संस्क्रुतीचा अपरिहार्य असा उद्गार असतो. हे प्रत्येक "मी" ला लागु आहे. काही उद्गार क्षीण असतात तर काही मध्यम...काही उग्र तर काही रडवेले...उदास...हताश...खिन्न...

आणि या सा-या उद्गारांचा जन्मदाता असतो अखिल समाज. हौस असते म्हणुन कोणी क्रांती करायला निघत नाही. व्यवस्थाच तशी निर्मिती करत असते. व्यवस्थाच व्यवस्थेला उभारत असते वा कोसळवत असते.

सोनवणी हे एक नांव आहे...परिस्थितीने दिलेले...तसे मला माझे काही स्वत:चे असे नांवच नाही...तसे ते कोणालाही नसते...आडनांव परंपरेतुन येते व नांव कोणीतरी पाळण्यात ठेवलेले असते. पण ते आपले आहे आणि ते कसे उभारायचे या भ्रमात आपण अनेकदा असतो. हेही अनेकदा आपल्या मुळावर येते. मला नांवाचा कसलाही अभिमान नाही. जातीचाही नाही. आणि मी जेही काही लिहितो त्याचाही नाही. माझ्यावर लिहिण्याची कोणी सक्ती केली नाही आणि करुही शकत नाही. मला वाटले...मी लिहिले...लिहिले आणि ते तेथेच सोडत नव्याच्या मागे गेलो...मला काही करावे वाटले...ते मी केले...केले आणि त्यात अडकलो नाही...परिणामांना मुक्तपणे सामोरा गेलो...जात राहील...

संजय सोनवणी किती?

खरे तर एकही अस्तित्वात नाही!

2 comments:

  1. Nice Article: या लेखातून आणखी एक संजय सोनवणी बघायला मिळतो......

    ReplyDelete
  2. चला, आत्मशोध घेणारा संजय सोनवणी इथे अवतीर्ण झाल्यामुळे इतक्या सर्व संजय सोनवणींच्यामध्ये आणखी एका संजय सोनवणीची भर पडली !

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...