Tuesday, May 8, 2012

आपल्याला नेमके कोठे जायचे आहे?






आपण आजपासुनच्या पुढच्या पन्नास वर्षात नेमके कोठे पोहोचायचे आहे यावर आपण विचार करायला हवा. "हा भविष्य नांवाचा इतिहास आहे..." अशी कादंबरी मी गतवर्षी लिहायला घेतली होती. ती पुर्ण होईल तेंव्हा होईल परंतु भविष्याचा वेध काही मापदंडांनुसार घेता येत असेल तर तो मी असा कल्पिला आहे. समजा आपण आजच सावध होत पुढच्या हाका ऐकल्या नाहीत तर ते भवितव्य अत्यंत अटळपणे आपल्याला चिकटणार आहे यात शंका बाळगायचे कारण नाही.



१. शेती, पशुपालन हा उद्योग शेतकरी, पशुपालकांच्या हातातुन पुरेपूर निसटुन अवाढव्य कंपन्यांच्या हाती जातील, तसे कायदेही बनतील. बहुमजली शेती ही कल्पना वास्तवात येईल. बहुमजली शेती करता येवू शकते याची प्रात्यक्षिके मी स्वता:च केलेली आहेत.

२. जगाचे नियंत्रण हे लोकनियुक्त सरकारांच्या हाती न रहाता बलाढ्य कंपन्या (ज्या चार-पाचच असतील) यांच्या हातात जाईल व कल्याणकारी राज्य ही संकल्पनाच नष्ट होईल.

३. याची प्रतिक्रिया म्हणुन माओवाद उफाळुन येईल व एकार्थाने अराजकाची परिस्थिती निर्माण होईल.

४. भारतापुरते बोलायचे तर पुढच्या पन्नास वर्षांत ब्राह्मण समाज हा देश सोडुन निघुन गेलेला असेल. त्यांना प्रतिक्षणी शिव्या घालणा-याची मोठीच पंचाईत होवून जाईल. पण मग ते आपला मोहरा अन्य सोबर पण धनाढ्य जातींकडे वळवतील आणि त्यांचे शिर्कान प्रत्यक्षपणे करण्याच्या मागे लागतील. यात झपाट्याने पुढे जाणारा दलित समाजच आज तरी असल्याने पुढच्या पन्नास वर्षांत ते सर्व क्षेत्रांत अग्रणी झालेले असतील. स्वाभाविकच द्वेषाची दिशा त्यांच्याकडे वळवणे सोपे जाईल.

५. खुरडत प्रगती करणारा ओबीसी समाज हा हत्यार म्हणुन वापरला जाईल.

६. सत्तांध जमाती भांडवदारांशी एकीकडे जुळवून घेत अप्रत्यक्षपणे अशा विखारी लढ्यांचे नेतृत्वही करतील. (जसे ते आजही करत आहेत. भविष्यात त्याची परिमाने वाढत जातील एवढेच!)

७. एके दिवशी या सत्तांधांचेच जाहीर खुन पडायला सुरुवात होईल. यांची घरेदारे पेटवायला सुरुवात होईल आणि याचे नेतृत्व कोणी व्यक्तिविशेष नव्हे तर साराच पिडीत समाज करेल.

८. भारतात प्रत्येक जात ही "टोळी धर्माचेच" अक्षरशा: पालन करत असल्याने नंतर हेच पिडीत जातीय एकमेकांचे गळे घोटायला सुरुवात करतील.



थोडक्यात जगाची लोकसंख्या कमी करायला अनिवार मदत करतील.



हे भवितव्य भीषण वातले, अगदी कवि-कल्पना जरी वाटली तरी त्या दिशेने आपण कशी वाटचाल करत आहोत याचे काही प्यरामीटर्स आहेत व ते असे:



१. सरकारे कंपन्यांच्या हातात जात आहेत...? होय. सेझ, बीटी, कामगारांवर संपबंदी आणि आताच प्रणब मुखर्जींनी एक वर्ष पुढे ढकललेला General Anti-avoidance Rule हा कायदा. कंपन्यांच्या दबावाखाली येत सरकार कसे नियम बनवते आणि रद्द वा स्थगितही करतेय याचे हे एक मामुली उदाहरण.

२. यंदा पावूस चांगला झाला होता. पाटबंधारे खात्याला अचाट निधी दिला होता व काही वेळा अन्य निधी या खात्याकडे वळवलाही होता. पण पंधरा हजारांवरची गांवे साध्या पिण्याच्या पाण्यासाठी तरसत आहेत. पुण्यात पाणीनियंत्रण आहे. म्हणजे भविष्यात पाणी ही यादवीची बाब होणार आहे हे नक्कीच आहे. सत्तांध पाणी जिरवण्याऐवजी निधी जिरवतात...त्यांच्या हव्यासाची फळे त्यांना नाही (पन्नास वर्षांनंतर ते थोडेच हयात असनार आहेत?) तरी ती आपल्याच पुढच्या पिढ्यांना भोगावी लागणार आहेत याची ही पुर्वचिन्हे आहेत.

३. माओवाद्यांमुळे चक्क आमदार ते अन्य लोकप्रतिनिधी आजच अरण्यांतील निवासस्थाने सोडत अन्यत्र पळत आहेत...हा वाद खेडोपाड्यांत-शहरांत पसरायला पन्नास वर्ष खुप म्हणजे खुप आहेत.

४. आजच जातीयवाद टोकाला जावून पोहोचला आहे. अगदी एखाद्याने डोके थंड ठेवत आपापल्या जातींवरील अन्यायाकडे वा विखारी टीकेकडे दुर्लक्ष करायचे ठरवले तरी ते शक्य नाही अशी आपली सामाजिक स्थिती आहे. प्रत्येक जात अन्य जातींकडे संशयाने पहात आहे. आणि तसे घडावे यासाठी कोणती ना कोणती जात हातभार लावतच आहे. त्यामुळे प्रत्येक जात आपापल्या कोषात नाईलाजाने जात आहे.

५. आज लोक आपापले अधिकार मर्यादित परिप्रेक्षात मिळाले तरी काही प्रमाणात समंजसपणा दाखवत असले तरी असंतुष्टी नाही काय? तिचा उद्रेक पुढच्याच पिढीत होणार नाही याबाबत कोणी गाफील राहु नये. खरे तर आताच अनेक समाजघटकांत उद्रेकी परिस्थिती आहे. उदा. आज दबलेले, मूक असलेले आदिवासी, भटके-विमुक्त या पुढच्या पन्नास वर्षांत जेंव्हा सुबुद्ध होतील ते काय आवाज उठवल्याखेरीज राहतील?

६. माध्यमे ही नेहमीच भांडवलदारी व सत्ताधारी जमातींची हत्यारे असतात. आजही आहेत. सर्वसमावेषक वैचारिकतेचा उद्घोष त्यांना नेहमीच अडचणीचा असतो. हवे तसे जनमानस बनवण्यासाठी ते अविरत कार्यरत असतात. परंतु भविष्यात ते त्यांना जमेलच याची शक्यता नाही. खुद्द आज जे पत्रकार अशा वृत्तपत्रांत काम करतात त्यांचाच यावर विश्वास नाही. आजकाल चळवळीची म्हणुन जी वृत्तपत्रे निघतात ती तर एखाद-दुसरा अपवाद वगळला तर मुळातच विश्वासार्ह नाहीत. आणि हे आता वाचकांनाही समजु लागले आहे. एकच बातमी भिन्न विचारसरणीची वृत्तपत्रे अशा वेगळ्या पद्धतीने देतात वा ती बातमी सरळ गाळली जाते...हे आता वाचकांना समजु लागले आहे. भविष्यात प्रत्येक व्यक्ती हेच एक वृत्तपत्र बनेल व हा धंदा नष्ट होईल. थोडक्यात समाजनिष्थत्वाकडुन व्यक्तिनिष्ठेकडे परवास होईल. याची प्रचिती आजच हजारो सोशल नेटवर्कींग साईट्सवरुन येते आहे. भविष्यात त्याच जीवंत राहतील. आज जो विकृत विखार दिसतो त्यात उत्तरोत्तर भरच पडत राहील एवढेच!



वरील व आताच्या मुद्द्यांत भर घालता येतील असे अगणित मुद्दे आहेत व यावरुन मी फारच नकारार्थी विचार करत आहे असे वाटणे स्वाभाविक आहे.



आज आपण जे चालले आहे तसे चालुद्यात, थोडे भांडा-थोडॆ वैचारिक व्हा, पण मर्यादेबाहेर...आपापले उद्योग सोडुन नको...अशीच भूमिका आपण ठेवली तर आपले भवितव्य वर सांगितल्यापेक्षा वेगळे असू शकत नाही. थोडाफार फरक पडेल एवढेच! पण ते चांगले नसणार यात शंका बाळगायचे कारण नाही.



आमचा वर्तमान हा नेहमीच भवितव्याचा पाया असतो.



आमचा वर्तमान जर कलुषित असेल, विकृत असेल, तर भवितव्य आहे त्यापेक्षा विदारक व संहारकर्ते असेल यात काय संशय?



आमचे इतिहासाचे आकलन हे संदर्भहीण होत जातीय बनत असेल तर आमचा वर्तमान आम्हीच विकृत केला आहे.



मग आमचे भवितव्य उदात्त भव्य आणि मानवतावादी कसे असेल?



मला वाटते आजच आम्ही बदलायला सुरुवात केली पाहिजे. मानवी स्वभाव बदलांना अनुकुलच असतो. फक्त विचारांची दिशा सकारात्मक करायला हवी. आज असे सकारात्मक तरुण विचारवंत खूप आहेत. त्यातील काही आधी नकारार्थी असले तरी नंतर त्यांनीही आपला विचारौघ सकारात्मक केला आहे. काही नांवे घ्यायची तर सचीन परब, श्रीरंग गायकवाड, संजय क्षीरसागर, सागर भंडारे, प्रकाश पोळ, महावीर सांगलीकर, मधुकर रामटेके, श्रावण देवरे, गणेश अटकळे, शुद्धोदन आहेर, जयंत पवार, पराग पाटील, मुकुंद कुळे...प्रगती बाणखिले, डा. आनंद दाबक, डा. क्रांती गवळी, वैभव छाया ...किती नांवे घेवू? हे सारे चाळीशीच्या आतबाहेरचे. ही मंडळी आज ज्या पद्धतीने सम्यक मांडणी करत समाजाला एक दिग्दर्शन देत आहेत ती एक अद्भुत आणि पराकोटीचे स्वागत करावे अशी बाब आहे. अशा सर्वांचेच स्वागत आम्ही एक समाज म्हणुन कसे करतो, आम्ही विकृतांना प्राधान्य देतो कि खरे समाजहित कळवळ्याने मांडणा-यांना यावर आमचेच सामाजिक भवितव्य अवलंबुन आहे. यांना आम्ही एकाकी पाडु तर आम्ही वर लिहिलेले दुर्दांत भवितव्य वास्तवात आनण्याच्या पापातील सहभागी असू हे नक्कीच!

एक सांगतो...रडावे असे वाटले तरी अश्रु पुसणारेही अहेत. हे आपले भाग्यच आहे.

पण जर आपण डोळे बंद करुन द्वेषांध होणार असू तर डोळे पुसनारे नव्हेत तर गळे घोटणा-यांचीच संख्या अगणित असेल हे नक्कीच आहे!

धन्यवाद!

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...