Friday, May 25, 2012

धनगरांनी या घोर फसवणुकीचे काय करायचे?


महाराष्ट्र राज्य पुरोगामी आहे असा आपला समज आहे. म्हणजे सरकारही पुरोगामी आले. परंतु हेच सरकार जेंव्हा विविध जाती-जमातींवर अन्याय करत केंद्र सरकार, न्यायालये, विविध आयोग यांच्या आदेशांनाही कसे धाब्यावर बसवते याचा उत्तम नमुना म्हणजे धनगरांवरील अन्याय. असाच अन्याय अनेक जाती-जमातींवर होत असुन त्यांना कोणीही वाली नाही असेच चित्र स्वातंत्र्योत्तर काळापासुन दिसते आहे.

जात आणि जमात यात मुलभुत फरक आहे. ज्यांनी आपल्या जीवनव्यवहारात पुरातनता जपली आहे, नागरशैलीपेक्षा वैशिष्ट्यपुर्ण व स्वतंत्र अशी जीवनशैली, रुढी-परंपरा आणि धार्मिक श्रद्धा आहेत अशा समाज घटकास "जमात" (Tribe) असे म्हणतात. यानुसार असे भटके-निमभटके मानवी समुह हे अनुसुचित जमातींमद्धे असावेत हा घटनाकारांचा दृष्टीकोन होता. देशभरात धनगर (मेंढपाळ) समाज हा जरी विविध नांवांनी ओळखला जात असला तरी त्यांचा समावेश हा अनुसुचित जमातींमद्धे केलेला आहे. असे असतांनाही महाराष्ट्र सरकारने मात्र याच समाजाला अनुसुचित जमातींमद्धे आजतागायत प्रवेशु दिलेले नाही. सबब या समाजाचा आर्थिक/सामाजिक व सांस्कृतिक विकास होवु शकलेला नाही. असेच धोरण राहिले तर या समाजाला फक्त नशीबावर हवाला ठेवून जगावे लागणार आहे.

या समाजाचा व्यवसाय समान असला तरी प्रत्येक प्रांतात भाषाभेदामुळे वेगवेगळी नांवे या समाजाला मिळालेली आहेत. बव्हंशी त्यांची गणना अनुसुचित जमातींत केलेली असुन फक्त बंगाल, उत्तर प्रदेश व उत्तरांचलमद्धे त्यांची गणना अनुसुचित जातींमद्धे केलेली आहे. उदा. गुजराथमद्धे या समाजाला भारवाड म्हनतात तर कर्नाटकात व केरळात कुरुब, कुरमान. हिमाचल प्रदेशात यांना गड्डी म्हटले जाते तर तमिळनाडुत कोरमान व कुरुंबा. मध्यप्रदेशात या समाजाला कोठे धनगर तर कोठे धनगड असे संबोधले जाते.

भारतात भाषाभेदामुळे उच्चारपद्धतीत फरक पडतो. उदा. खडकीचे इंग्रजीत किरकी, जाखरचे जाखड होते तर यमुनाचे उच्चारण जमुना असेही होते. "र" चा "ड" असा कोठे केला जातो तर कोठे तो "ल" असाही होतो. ओरिसाला ओडीसा असेही उच्चारले जाते. याचे कारण म्हणजे प्रत्येक भाषेची स्वतंत्र अशी उच्चारशैली आहे. उदा. हिंदीत "ळ" हा शब्दच नाही. या विचित्र समस्येमुळे राज्य सरकारने गैरफायदा घेत महाराष्ट्रातील धनगर समाजाला अधांतरी लटकत ठेवले आहे. "आम्ही आहोत तरी कोण?" असा भिषण प्रश्न याच सरकारने त्यांच्यासमोर ठेवला आहे.

ओराव व धनगड या जमाती केंद्र सरकारने अनुसुचित जमातींमद्धे टाकल्या होत्या. मध्यप्रदेश सरकारने विशेष अध्यादेश जारी करुन "धनगड" हा शब्द "धनगर" असाही वाचण्यात यावा असा अध्यादेश प्रसिद्ध केल्यानंतर तेथील धनगरांची परवड नाहीशी झाली. धनगर, हाटकर धनगर या जमातींचा अनुसुचित जमातीत समावेश केला गेला. अलाहाबाद उच्च न्यायालयानेही या संदर्भात "धनगड व धनगर हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत असाच निर्णय दिला आहे. केंद्र सरकारच्या अधिसुचनेतही तीन वेळा असेच निर्णय दिले आहेत. कालेलकर आयोगाने व नंतर मंडल आयोगानेही अनुक्रमे  १९५५ व १९७९ साली धनगर व धनगड एकच होत असा अभिप्राय नोंदवला आहे.

आता महाराष्ट्र सरकारची बदमाशी पहा. महाराष्ट्रातील अनुसुचित जमातींमद्धे ओराव व धनगड यांचा समावेश केला आहे. संपुर्ण महाराष्ट्रात ओराव जमातीचे फक्त एक कुटुंब १९९१ च्या जनगणनेत नोंदले आहे तर "धनगड" असे उच्चारली जाणारी/म्हनवणारी एकही जात-जमात महाराष्ट्रात नाही. तरीही धनगड व धनगर या वेगळ्या पृथक अशा जमाती आहेत असाच घोषा महाराष्ट्र सरकारने राज्याच्या स्थापनेपासुन लावलेला आहे.

दुसरी बाब अशी कि १९६८ साली केंद्र सरकारने प्रसिद्ध केलेल्या Bibliography on SC and ST and marginal tribes (पृष्ठ क्र. २९४)  वर धनगर (धनगड नव्हे) ही अनुसुचित जमात आहे असे प्रसिद्ध केलेले आहे. १९८२ साली प्रसिद्ध झालेल्या याच ग्रंथाच्या आवृत्तीतही अशीच नोंद आहे. याचीही दखल राज्य सरकारने घेतलेली नाही.

महाराष्ट्र सरकारने जनतेचा दबाव वाढल्यावर केंद्र सरकारला २६ मार्च १९७८ रोजी शिफारस केली होती कि धनगरांचा समावेश अनुसुचित जमातींमद्धे करावा. पण गम्मत पहा, ९-२-८१ रोजी केंद्र सरकारने या संदर्भात आपल्या राज्य सरकारला पत्र लिहिले कि ७-३-८१ पुर्वी याबाबत आपले म्हणणे मांडा. महाराष्ट्र सरकारने उत्तरच दिले नाही. उलट ६-११-८१ रोजी महाराष्ट्र सरकारने आपला मुळ प्रस्तावच मागे घेतला. त्यामागील एकही कारण आजतागायत महाराष्ट्र सरकारने दिलेले नाही.

१९८९ मद्धे महालेखायुक्तांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातींमद्धे सामाविष्ट करा असा सल्ला दिला तोही महाराष्ट्र सरकारने फेटाळुन लावला.

याच वर्षी (१९८९) खासदार सुर्यकांता पाटील यांनी धनगर समाजाला अनुसुचित जमातींत का घेत नाही असा प्रश्न विचारला असता या खात्याचे तत्कालीन मंत्री श्री रामविलास पासवान यांनी धनगर आणि धनगड एकच असुन त्यांचा समावेश पुर्वीच अनुसुचित जमातींमधे केला असल्याचे निवेदन २२ डिसेंबर १९८९ रोजी संसदेत दिले. काय केले महाराष्ट्र सरकारने? काही नाही. याच वर्षी धनगर समाजाने राजीव गांधी महाराष्ट्र दौ-यावर आले असता धनगरांनी निदर्शने केली. राजीव गांधींनी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले खरे, पण ते दिल्लीला जाताच विसरले असावेत.

शरद पवारांनी खास गेम केला. २५ मे १९९० रोजी त्यांनी धनगरांना नोम्यडिक ट्राइब्जमद्धे टाकले (भटके विमुक्त), साडेतीन टक्के आरक्षणात बांधले  आणि मुळ न्याय्य मागणीतील सारी हवाच काढुन घेतली. कोणत्या सर्वेक्षणाने, कोणत्या मानववंश शास्त्राने, कोणत्या इतिहासाने धनगरांना भटके विमुक्त ठरवले हा प्रश्नच मुळात आजतागायत उपस्थित केला गेलेला नाही. आता तो विचारावा लागणार आहे. आणि याच सरकारने "कुंबी आणि कुनबी मात्र एकच" असा निर्णय १९९४ साली घेतला. पण धनगड व धनगर एकच, या राज्यात धनगड नांवाची जमातच नाही, हिंदीत र चा उच्चार ड होतो हे लक्षात घेतले नाही. पण कुंबी आणि कुणबी मात्र एकच असा निर्णय घेण्यात मात्र तत्परता दाखवली. जे भाषाशास्त्र कुंबी व कुणबी यांच्याबाबत लावायला हे पुढे सरसावले त्यांना मात्र धनगरांबाबतची भाषाशास्त्रीय समस्या दिसली नाही, व ज्याबाबत वारंवार एवढी स्पष्टीकरणे झाली आहेत तीही ग्राह्य धरायची बुद्धी झाली नाही...ती का? यामागील कारणे वाचक समजु शकतात म्हणुन त्यावर मी भाष्य करत नाही.

२००२ मधे The Scheduled Castes and Scheduled Tribes Orders (Second Amendment) Bill आले. या बिलानुसार समान व्यवसाय पण जमात-जातीनामे वेगळी यांचा समावेश करण्याची तरतुद होती. तसे अनेक जमातींबाबत झालेही. महाराष्ट्र सरकारने मात्र आपला हट्ट सोडला नाही. धनगड व धनगर या वेगळ्या पुर्णतया स्वतंत्र जमाती आहेत अशीच भुमिका रेटली. त्यामुळे Standing Committee on labour and Welfare ने ताशेरा ओढला कि महाराष्ट्र सरकारने सुधारीत अनुसुचित जमातींच्या यादीत धनगरांचा समवेश करावा अशी शिफारसच केली नसल्याने त्यांचा समावेश सुधारीत यादीत झालेला नाही.

असो. याच स्वरुपाच्या घडामोडी पुढेही चालु राहिल्या आहेत. हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे असा समज म्हणा कि गैरसमज, आपल्या मंत्र्यांचा व आमदारांचाही आहे. ते खरे नाही. वरील घटनाक्रम पाहिला असता आपल्या सर्वांच्याच लक्षात येईल कि महाराष्ट्र सरकार वेड्याचे सोंग घेत पेडगांवला चालले आहे. जी धनगड अथवा ओरा जमातच महाराष्ट्रात अस्तित्वात नाही ती मात्र अनुसुचित जमातींच्या यादीत ३६ व्या क्रमांकावर आहे. धनगड व धनगर एकच होत असे नि:ष्कर्ष सर्वच आयोगांनी, केंद्र सरकारने काढुनही महाराष्ट्र सरकार आपलाच हट्ट रेटत आले आहे. सरकारचे हे कृत्य असांसदीय, घटनेचा, उच्च्च न्यायालयांचा व केंद्र सरकारचा अवमान करणारे आहे यात शंका नाही.

असे का झाले यावरही विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील राजकारण हे विशिष्ट जातीयांच्या हाती एकवटु लागण्याची सुरुवात राज्याच्या स्थापनेपासुनच झाली आहे. राजकीय गणितांतच मुलात धनगरांना अनुसुचित जमातींमद्धे घेणे त्यांना व सध्या जे अनुसुचित जमातींत आहेत त्यांनाही अडचणीचे ठरणार असल्याने व धनगर समाज मुळात विखुरलेला असल्याने त्यांच्या तोंडाला पाने पुसत पुढे सरकण्याचे अनिवार कौशल्य दाखवले जात आहे. अशाच रितीने अन्यही जाती-जमातींवर महाराष्ट्र सरकारने त्यांच्या अद्न्यानाचा, असंघटीतपणाचा फायदा घेतल्याचेच चित्र आपल्याला दिसेल.

येथे प्रश्न असा आहे कि केंद्रीय सत्तेच्याच निर्देशांना जुमानण्याचा अघटनात्मक अधिकार महाराष्ट्र सरकारला कोणी दिला? केंद्राच्या कोर्टवर चेंडु फेकुन आणि परत तोच मागे घेवुन उबवत बसायचे धोरण कशासाठी आहे? कालेलकर आयोग, मंडल आयोग जे स्पष्ट करतो ते नाकारण्याचा अधिकार यांना कोणी दिला? केंद्रीय सत्तेपेक्षा महाराष्ट्र राज्याची सत्ता मोठी कधीपासुन झाली?

येथे एक उदाहरण देतो. कर्नातकात धनगरांनाच कुरुब म्हणतात. तेथील सरकारने कुरुबांना अनुसुचित जमातीच्या यादीतुन वगळण्याचा निर्णय घेतला होता, जो त्यांना दुस-याच दिवशी फिरवावा लागला होता. यामागील कारण असे कि केंद्र सरकारने ज्या जमातींना अनुसुचित जमतींत घेतले आहे त्यांना वगळण्याचा अधिकार राज्य सरकारांना नाही. (दै. हिंदु, दि. १५ आगस्ट २०००) कुरुब व धनगर एकच आहेत असे ज्येष्ठ संशोधक डा. रा. चिं. ढेरे यांनी वारंवार आपल्या ग्रंथात (उदा. श्रीविट्ठल: एक महासमन्वय) सिद्ध केलेले आहे. कर्नातक सरकार कुरुबांना आधीपासुनच अनुसुचित जमातेंमद्धे घेते व त्यांना वगळण्याचा निर्णयही मागे घ्यावा लागतो यात सारे काही आले. आणि आमचे राज्य सरकार मात्र केंद्राचा निर्णय अंमलात आणायचाच नाही असा निर्णय केवळ बाहुबळावर/सत्ताबळावर रेटत रहाते याला "हे सरकार शुद्धीवर आहे काय?" असाच प्रश्न विचारावा लागणार आहे.

घटनेने ज्याही समाजाला जेही अधिकार दिले असतील ते त्या-त्या समाजाला मिळणे बंधनकारक आहे. तो टाळणे हा एक अक्षम्य प्रकारचा गुन्हा असुन तो महाराष्ट्र सरकार करत आहे. या सरकारला जाब विचारणे त्यामुळेच क्रमप्राप्त आहे. धनगरांना त्यांचा न्याय्य वाटा मिळायलाच हवा याबाबत कोणत्याही सुबुद्ध नागरिकाच्या मनात शंका असु नये. राज्य सरकार सरळ सरळ धनगरांची फसवणुक करत असून त्यांना विकासाच्या गंगेपासुन दुर ठेवत आहे. आपण त्या गंगेपासुन असेच फसत दुर रहायचे कि आपला न्याय्य हक्क मिळवायचा याचा विचार याच समाज बांधवांना करावा लागणार आहे.

12 comments:

  1. धनगर समाज व त्यांच्या अद- न्यानाचा गैर फायदा घेऊन काही ठवाविक घराणे शाही - व जातीयवाद जपणाऱ्या राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय शक्तीचा वापर करून शासकीय यंत्राने माफत उगवलेया सूडाचा मुद्देसूद घेतातेला आढावा .....धन्यवाद सर तुमचे खरच खूप कूप आभार तुमची लेखणी एकंदरीत बहुजन समाजासाठी तारणहार म्हणून खूप उपयुक्त आहे....आम्हाला आपल्या इतिहास संशोधन व लेखणीचा मनापासून आदर आहे ......

    ReplyDelete
  2. राज्य घटनेतील तरतुदीनुसार राज्यातील धनगर समाज अनुसूचित जमातीत आहे. परंतु, देशातील व राज्यातील राज्यकर्त्यांनी जाणीवपूर्वक धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवले आहे. धनगर समाजाचा हा प्रलंबित हक्क मिळावा म्हणून राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय आदिवासी कल्याण मंत्री, महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटून धनगड व धनगर ही एकच जमात असल्याचे शासन दफ्तरी नोंद असलेले अनेक पुरावे सादर केले आहेत. तरी देखील धनगर समाजाची घोर फसवणूक चालूच आहे...

    ReplyDelete
  3. Sir mulat chukach amchya samajachi ahe ek tar te jast shikalele nahi and sarvat mahtwache samajat eki nahi samajat mothya pramanat pot-jati ahet tyamule konihi ekhadya mudyavar ekatra yet nahi.... Bakichya jatinmadhe bhagitale tar tyanna je hakka magnyacha adhikarch nahi tyasathi sudhha te ektra yetat ani sarkarkadun te pass karun ghetat.... Anna dange swatahala Dhangaranche nete mhantat tyannisuddha mantri astana ha prastav pass karun nahi ghetala. Rajkarnat gelyavar ekhadyala swatchya parivarachi ani samajachi kahich athavan rahat nahi yache Anna Dange he ek mothe udaharan ahe......

    ReplyDelete
  4. समाज पांगळा होतो जेव्हा समाजाचे तथा कथित नेते / विचारवंत विचाराने धोरणाने पांगले असतात ......हेच धनगर समजा बाबतीत घडले /घडते आहे ....समाजातून कोणी विचारवंत / नेता वा अस्थावंत कार्यकर्ता फार क्वचित पाने दिसतो .....धनगर समाजाचे तथाकथित नेते आपल्या वैयक्तिक स्वार्थ (नेते वा पाटील बोलले आणि रात्रीचे जेवण ,दारू आणि गाडी फिरायला मिळाली कि साहेब एकदम टाईत ) या पायी आपला समाज घाण टाकतात आणि त्याच्या मागे धावणारे सच्चे कार्यकर्ते देसोधडीला लागतात .. नाराज होऊन त्याला शिव्या देतात आणि भावी पीडिला या गोस्तीन पासून दूर ठेवता ... या उलट तर आहे ती शिकल्या सावरल्याची.....३.५% मधेच हे खुश आहेत त्यांना न्याय व आण्याय काही देणे घेणे नाही .(खरतर या नालायक सरकारनेच महागाई /भ्रष्टाचार /बेरोजगारी / दडपशाही वापरून सगळ्याचे पार कंबरडेच मोडून काढले आहे ..इथे रोजचा संघर्ष आहे जगण्या साठी ) ..लोकशाही भीमुख देशात राजा मतपेटीतून जन्म घेतो हे यांना अजून कळलेच नाही .. राजकारणाशी जसे यांचे बाप जन्मीचे घेतलेले वैरत्वच आहे जणू ....जर महाराजा यशवंतराव होळकर यांच्या सारखा योद्ध हा धनगराचा पूर्वज असून सुधा जगायचे कसे हेच या समजाला कळले नाही ..पण आता दिवस बदलेल आहेत ....समाज जागा होत आहे तरुण समाजातील युवक जागृत होत आहेत... जर ते संघटीत झाले कि परिवर्तन गंगा वाहू लागेल. जेव्हा त्यांना त्यांचे खरे घर कळेल तेह्वा कठीण असे वाटणारी बरीच कामे अगदी सहज पाने होताना दिसतील .....धनगर समाजाचा ST मध्ये लवकर समावेश करणे हाच सत्ता धर्यांपुढे आता पर्याय उरणार आहे .....समाजातीत सर्व युवकांना एकाच सागणे आहे कि वेळ बदलत आहे तुम्ही पण आता बदलला सामोरे जा ...जय मूलनिवासी

    ReplyDelete
  5. reservation is a very difficult problem. and with so many caste-sub-caste the whole country is divided, still you have raised a good point .

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  8. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  9. मराठी मध्ये १ प्रचलित वाक्य आहे "झोपी गेलेल्याला जागे करणे सोपे आहे पण ज्यांनी झोपेचे सोंग घेतले आहे त्यांना कोण जागे करणार ??"
    मुळातच कोणताही समाज किंवा समुदाय ,संघटना या गोष्टी एका system सारख्या असतात आणि कोणतीही system अनेक स्तर मिळून बनलेली असते .उदाहरन आंपण एका automobile vehicle किंवा वाहनाचे घेऊ शकतो ..वाहन हे चाकं,स्टेअरिंग ,इंजिन ,मेटल बोडी,गिअर बॉक्स या सर्व स्तरांवर बनलेली असते . पण वाहन कितीही चांगल्या प्रतीचे असू दे ,त्याला चांगला चालक नसेल तर काय उपयोग त्या वाहनाचा ?ते वाहन भंगारच होईल फक्त ...
    प्रत्येकाचे आपले कार्य ठरले आहे ...वाहनामध्ये चाकाची जागा इंजिन घेऊ नाही शकत आणि स्टेअरिंग चाकाची जागा !!!...ज्यावेळी लोक निस्वार्थीपणे काम करतात तेंव्हा सगळे काही सुरळीत चालते .
    पण ज्यावेळी या निस्वार्थीपणाची जागा जेंव्हा स्वार्थ घेतो ,तेंव्हा सगळे काही संपून जाते आणि राहतो फक्त प्रत्येकाचा वैयक्तिक स्वार्थ !
    असेच काही झाले आहे धनगर समाजाचे ...काही नेते/चालक समाजाचा गाडा हाकायचा प्रयत्न करत आहेत पण फक्त स्वताच्या स्वार्थासाठी ...आणि काही जन ...महादेव जानकर यांचे सारखे लोक समाजा साठी जीव तोडून काम करत आहेत ...पण त्यांना साथ मिळत नाही ....आणि उठसुठ गल्ली बोळात स्वयं घोषित नेते तयार होत आहेत आणि समाज कार्याच्या नावाखाली हिडीसपणा करत आहेत .समाजा मध्ये ,डॉक्टर ,इन्जिनीअर ,वकील ..सगळे लोक आहेत पण कोणाला काही करायला नको आहे ..आणि जे करत आहेत त्यांना कोण साथ देत नाहीत .
    एकंदरीत समाजाची अवस्था एका बंद पडलेल्या अथवा एकाच गाडी ला १० वाहन चालक असले सारखी झाली आहे .प्रत्येकाची दिशा वेगळी आहे .

    आणि संजय सोनवणी सर !!!!! या भंगार झालेल्या (व इंधन संपलेल्या ) गाडी मध्ये वेळोवेळी starter लाऊन स्पार्क देण्याचा प्रयत्न करत आहेत ..कि काही तरी करून यांची गाडी रुळावर यावी ....
    म्हणून च वर "झोपी गेलेल्या चे " उदाहरण दिले .
    सगळ्या गोष्टीचा विचार केला की मन विषन्न ,उद्विग्न होऊन जाते !...पण काही जरी झाले तरी थांबायचे नाही ,आपले कर्तव्य करत च राहायचे .हा एकच विचार मनी !!
    एवढ्यासाठी च हा सगळा प्रपंच !
    लोक प्रबोधन हा एकच उपाय यावर आहे . मुडदार,अडाणी ,स्वार्थी लोक हे तर पदोपदी भेटत च राहणार ...आणि काही चांगले लोक ही ...
    ज्यांना परिस्थीची जाण आहे अश्या लोकांना सोबत घेऊन शक्य तेवढे समाज प्रबोधन करणे हाच एक उपाय आहे . आज जर ४ समविचारी आणि जाण असलेले लोक असतील तर त्या ४ रचे ४० ,४०० आणि ४००००० करणे हा च एक उपाय आहे . ज्यावेळी हे होईल त्या वेळी आरक्षन च काय समाजाचा राष्ट्रपती ,पंतप्रधान होण्यास पण वेळ लागणार नाही .....
    प्रश्न आहे समाजाच्या सध्य परिस्थीची जाणीव असलेले लोक एकत्र येण्याची किंवा शोधण्याची !! असे म्हणतात कि विश्वनिर्मिती नंतर आदान काळी, देव दानवाणी वासुकी नागाच्या मदतीने समुद्र मंथन केले आणि १४ रत्ने त्यातून बाहेर पडली ......सांगण्याचे तात्पर्य एवढेच की ..आपल्याला सुद्धा असेच सगळा समाज ढवळून काढावा लागेल व अशी रत्ने किंवा समाजाविषयी सजग,जागृत लोक शोधून काढावी लागतील,एकत्र आणावी लागतील .अंततः एकी हेच बळ आहे .
    सर्वात शेवटी ; संजय सोनवणी सर यांचे मनापासून आभार .....वेळोवेळी खूप अप्रतिम लेखन केले आहे व धनगर समाजामध्ये जागृतीच प्रयत्न केला आहे .पण करंट्या लोकाना हे वाचायला पण वेळ नाही .
    मल्हारराव व यशवंत होळकर यांच्यावरील लिखाण पाहून तर मला खूप वेळा असे वाटते कि,हे नक्कीच मागील जन्मी यशवंत किंवा मल्हारराव होळकर असावेत .
    सोनवणी सर तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात!!असेच लिखाण करत राहा ......
    आम्ही आपल्या सेवेत तत्पर राहू ...
    जय मल्हार !!!

    -- अविनाश ---

    ReplyDelete
  10. 25डिसेंबर १९५२ रोजी बाबासहेब बेळगांव येथील भाषणात म्हणाले-चणा कोण खातो हे पाहावयाचे आहे.मराठ्यांचा घोडा नवीन आहे.दुसर्या वेळेस मराठे सर्वच चणे खातील.पुढे ब्राह्मणांना काहीच उरणार नाही व ते परत आपणाकडे परत फिरतील.
    दुसर्या एका ठिकाणी ते म्हणाले:संयुक्त महाराष्ट्र नको,हे राज्य मराठा राज्य होईल,त्याऐवजी महाराष्ट्राची ३ छोटी राज्ये करा.

    ReplyDelete
  11. Sarva Dhangar Smaj Bandhvani ekatra yevun ladha dila pahije..Congress-Rashtrawadine hakkache aarakshan nahi dile tar vidhansabhet tyana dhada shikavyla tayarraha..Sharad Pawar ne aapla wapar karun ghetla aahe..tyla sutti devu naka..Marath Samajyatil Maratha Kunabi, Maratha-Khatik, va itar Maratha jatina already aarkshan astana,,tyanchech rahjya astana,sarva sansthamadhe hyanchech lok nokrit pradhanyane ghet astana..he punha aarakshan ka magat aahet??..Rajyanech Bhik Magitlyavar..itar Bhaujan samajane kay karayche??

    ReplyDelete
  12. आपण हा प्रश्न फार व्यवस्थित मांडला आहे. त्यावरील प्रतिक्रिया पाहता यात मतभेदाला कुठे जागाच दिसत नाही. दुर्दैवाची गोष्ट ही की त्या त्या समाजाची व्यथा त्याच समाजातील लोकांना मांडावी लागते. प्रत्येक समाजात आपल्याबद्दल सहानुभूती असणारे, मदत करणारे लोक सापडतील. त्यांची मदत घेण्याची सवय आपण लावून घेतली पाहिजे. असे झाले तर लढा व्यापक होईल व त्याची दखल लवकर घेतली जाईल. राजकारणी जमातीशी कसे वागावे व योग्य ते करवून घ्यावे याचे नवे मार्ग शोधले पाहिजेत. एका समाजासाठी अन्य समाजही उभे राहत नाहीत तोवर लढे कमी काळाचे होणार नाहीत.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...