Friday, May 11, 2012

जेंव्हा पुरुष "सता" जात होते....



स्त्रीयांनी पतिनिधनानंतर सती जाण्याची (वा बळजबरीने घालवण्याची) रीत आपल्या देशात होती हे सर्वांनाच माहित आहे. परंतु दहाव्या शतकात निदान कोकणात तरी पुरुष स्वेच्छेने आत्मदहन करून प्राणत्याग करायचे हे मी आज अल मसुदी या अरबी प्रवाशाच्या "मिडोज ऑफ गोल्ड" या प्रवासवर्णनात वाचले आणि चकितच झालो. अर्थात ही आत्मदाह प्रथा पत्नी मेली म्हणुन जात नसून अक्षरशा स्वेच्छेने व्हायची.
मसुदीने चेऊलला सन ९१५-१६ च्यादरम्यान भेट दिली होती. त्यवेळी चेऊल बंदर अत्यंत प्रसिद्ध होते व चेऊल आयात-निर्यात व्यापाराचे फार मोठे केंद्र म्हणुन जगभर गाजत होते. कोकण भागात बराच फिरुन मसुदी मग सिंधला निघुन गेला. त्याने जवळपास १५ ग्रंथ लिहिले, पण त्यातील गाजलेला मी वर उल्लेख केलेला ग्रंथ. त्याने दिलेली माहिती अशी-
तो म्हणतो त्याने भेट दिली तेंव्हा कोकणात स्वत:ला (फक्त पुरुष) जाहीरपणे समारंभपुर्वक जाळुन घेण्याची प्रथा सर्व-सामान्य होती. ही बळीप्रथा नव्हती हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. अर्थात स्वत:हून बळी जाण्यासाठी त्या व्यक्तीला राजाची अनुमती घ्यावी लागे. राजाने अनुमती दिल्यानंतर गांवात (वा नगरात) चिता रचली जाई. त्या व्यक्तीच्या मस्तकाचा गोटा करुन तुळशीच्या पानांचा मुकुट त्याच्या मस्तकावर ठेवला जायचा. त्याची वस्त्रे या प्रसंगी रेशमाची असत. त्याची मग समारंभपुर्वक वाद्यांच्या घोषात मिरवणुक काढली जायची. त्याचे मित्र त्याच्या सोबत असत. मिरवणुक संपल्यानंतर तो पेटत्या चितेजवळ येई व स्वत:ला आगीत झोकुन देत असे. अशा प्रसंगी त्याला ऐन वेळीस भिती वाटली तर त्याचे मित्रच त्याला आगीत ढकलुन देत असत. (ही परवानगी त्याने आपल्या मित्रांना अधेच दिलेली असे.)
मसुदीने स्वत: प्रत्यक्ष पाहिलेला आत्मदहन प्रसंग तर अगदीच भिषण व अंगावर काटे आणनारा आहे. एका तरुणाची चिता पेटलेली असता, किंचितही भयभीत व अस्वस्थ न होता, त्या तरुणाने मित्राकडुन तलवार घेतली व आपले पोट फाडले, स्वत:च्या हाताने आपले यकृत ओढुन काढले व ते मित्राच्या हाती दिल्यानंतर त्याने आगीत उडी घेतली.
मसुदी पुढे अशी माहिती देतो कि जेंव्हा राजा (वा स्थानिक माडलिक) मरण पावायचा वा युद्धात ठार मारला जायचा तेंव्हा त्याचे अनेक निकटतम मित्रही असेच स्वेच्छेने राजाबरोबर आत्मदाह करायचे.
अल मसुदीच्या या माहितीला पुष्टी देणारी माहिती १८८३ च्या कोलाबा ग्यझेटियरमद्धे आलेली आहे. शहापुर (ठाणे) येथे मिळालेल्या एका स्मारकशिळेवर अनेक माणसे भडकलेल्या अग्नीत उड्या मारत असल्याचे दृष्य कोरलेले आहे व यामुळे मसूदीचे निरिक्षण व अनुभव बरोबर आहे असा नि:ष्कर्ष काढलेला आहे.
नवलाची बाब ही कि आपल्याकडे ही माहिती पुरवणरे एकही संदर्भ साधन नाही. कोणत्याही धर्मग्रंथात, पुराणात, स्थलपुराणांत ही माहिती मिळत नाही. ही प्रथा कशी सुरु झाली? कधी बंद पडली, यावर तर्कच बांधावा लागतो. पुढे मुस्लिम सत्ता कोकणात प्रस्थापित झाल्यानंतर ही चाल बंद पदली असावी असे दिसते. ही प्रथा देशभर होती कि फक्त कोकणात हेही आपल्याला समजायला मार्ग नाही. यामागे कोणत्या धार्मिक भावना होत्या, ही प्रथा कोकणात नेमक्या कोणत्या समाजात होती, हेही समजायचे साधन आज आपल्या हातात नाही. चेऊल येथे त्या काळी जवळपास दहा हजार मुस्लिम होते. शेकडो ग्रीक, हबशी लोकही स्थाईक झालेले होते. परंतु एकंदरीत या आत्मदाह करणा-या व्यक्तींचे वर्णन पहाता ते हिंदु असल्याचेच दिसते. मसुदीने भेट दिली तेंव्हा झंझा हा शिलाहार शाखेतील पाचवा वंशज राजा होता असे त्याने नमुद केले आहे. ही माहिती इतिहासाशी जुळते. असो.
अशी प्रथा होती हे मात्र या अरब प्रवाशामुळे आपल्याला माहित होते. बरे हा स्वेच्छेचा मामला होता. राजा मेल्यावर कोणी आत्मदाह करणे एकवेळ समजता येवू शकते...पण स्वेच्छेने, अन्य काही लौकिक कारण नसतांना एखाद्याने स्वत:ला समारंभपुर्वक जाळुन घेणे हे मात्र अजबच म्हणावे लागेल. राजे कोणत्या धर्मनियमाने अशी परवानगी देत असतील? ते अशा आत्मदाह प्रस्तावकाला नेमके काय विचार करुन परवानगी देत असतील वा नाकारत असतील? अगणित प्रश्न या निमित्ताने उठतात हे मात्र खरे.
येथे एक बाब नीट लक्षात घ्यायला हवी. इजिप्तमधील असोत कि भारतातील...राजाच्या शवाबरोबर बरोबर दास-दासी जीवंत गाडणे अथवा जाळणे ही सर्रास प्रथा होती. यात स्वेच्छा किती आणि जबरदस्ती किती हा विचार व्हायला हवा. कोकणातील या प्रथेत राजा/सामंताबरोबर येथे नोकर नव्हेत तर मित्र जाळुन घेत असत हा संदर्भ नीट लक्षात घ्यायला हवा. त्यातही समजा विशेष नाही...असे समजा हवे तर...पण स्वेच्छेने अगदी स्वतंत्रपणे, तीही राजाची परवानगी घेवुन पुरुष आत्मदहन करत असत. स्त्रीसत्ताक कालात (ग्रीक उदाहरण आहे हे) राणी दरवर्षासाठी एकाची पती म्हणुन निवड करी आणि वर्षांती त्याचा विधीपुर्वक बळी दिला जात असे व त्याचे मांस-रक्त शेतांत विखरुन फेकले जात असे. अर्थात हा एक प्रकारचा सुफलताविधी होता. (संदर्भ: महाभारताचे मुळ पश्चिम आशिया- अ.ज. करंदीकर) असे प्रकार पुरातन काळी जगभर होत असत. ऋग्वेदातही पुरुषमेध आहेच. शुन:स्चेपाची कथा सर्वांना माहित असेलच. परंतु ते "बळी" असत. प्रासाद, किल्ले, तळी बांधतानाही भारतात बळी दिले जात याचे अस्पष्ट का होईना उल्लेख आढळतात.
पण मसुदी जे सांगतोय त्यात रीतसर परवानगी घेवून समारंभपुर्वक (विधीपुर्वक नव्हे) तरुण आत्मदहन करत व ही चाल सर्रास होती असे मसुदी म्हणतो. त्यामुळेच ही स्वैच्छिक आत्मदहनाची चाल विचार करण्यासारखी बाब आहे. जीवनाला वैतागलेले वा देवी अथवा देवाला खुष करण्यासाठीची ही चाल वाटत नाही...अन्यथा असे आत्मदहन देवी-देवता मंदिरासमोर झाले असते...येथे रीतसर अनुमत्या घेतल्या जात होत्या...दिल्याही जात होत्या...व नंतरच असे आत्मदहनीय कार्यक्रम होत असत असे दिसते. याकडे आपल्याला म्हणुनच वेगळ्या दृष्टीने पहावे लागते.
अलेक्झांडरने आपल्या सोबत नेलेल्या कलानस (कल्याण?) या जैन साधूने शेवटी स्वेच्छेने आत्मदहन करून प्राणत्याग केला होता अशी माहिती ग्रीक इतिहासकार पुरवतात. ही इसपूच्या तीस-या शतकातील घटना आहे.
असो. आपल्याला आपला समाज-सांस्कृतिक इतिहास अजुन किती शोधायचा आहे हे मात्र या निमित्ताने लक्षात यायला हरकत नाही.
-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...