Saturday, May 12, 2012

इतिहासाचा मर्मग्राही अभ्यासक...

"पानिपत असे घडले..." हा पानिपत युद्धाचा सर्वांगीण वेध घेणारा ग्रंथ १७ मे रोजी ठाणे येथे प्रकाशित होत आहे. या निमित्ताने आज दै. नवशक्तीच्या "ऐसी अक्षरे" या रविवारीय पुरवणीत या ग्रंथाचे लेखक श्री. संजय क्षीरसागर यांची रुपाली पेठकर जोशी यांनी घेतलेली ही मुलाखत...या तरुण इतिहास संशोधकास व त्याच्या ग्रंथास मन:पुर्वक शुभेच्छा!

=========================================

पानिपतच्या युद्धात जेवढं लढणं कठीण होतं, तेवढंच आज या विषयावर लिहणंही कठीण आहे. कारण या इतिहासावरचे पूर्वसुरींचे गारूड आणि त्याला जोडलेली मराठी मनाची अस्मिता. पण या ग्रंथात लेखकानं अत्यंत तारतम्यानं, शेकडो संदर्भ देत, पानिपत युद्धापर्यंतचा आणि नंतरचा प्रवास अत्यंत तटस्थतेनं नोंदवत ज्याचं माप त्याच्या पदरी घातलं आहे. अशा या तरुण इतिहास लेखकाशी नवशक्तिच्या प्रतिनिधी रुपाली पेठकर यांनी साधलेला हा संवाद…



इतिहास हा माझ्या आवडीचा विषय असे म्हणणारा विद्यार्थी विरळाच. त्यातच अगदी शालेय जीवनात पानिपतच्या इतिहासाचा ध्यास घेतलेला विद्यार्थी म्हणजे शिक्षकांसाठीदेखील डोकेदुखी ठरावा. पण संजयला भेटून त्याच्याशी गप्पा मारल्या आणि त्याचं पानिपत असे घडले.. हे पुस्तक वाचलं की, ही एक नव्या इतिहासकाराची नांदी आहे असं वाटतं.



खरं तर इतिहासकार म्हटलं की, डोळ्यासमोर उभं राहतं ते भिंग लावून सतत कुठल्यातरी जुनाट पुस्तकातून पुरावे शोधत असलेली व्यक्तिमत्व. त्यातच जाड भिंगांचा चष्मा, वाढलेली दाढी, पोक्त वय आणि मीच काय तो याचा अभ्यासक अशी शेखी मिरवणारी व्यक्ती समोर येते. पण संजयकडे पाहिले की, 29 वर्षांचा हा उमदा तरूण असा इतिहासात कसा बरे शिरला याबाबत कतुहल वाटतं. अर्थात त्याच्याशी गप्पा मारल्या की, आपणही या इतिहासात कसे शिरतो हे कळतच नाही. खरं तर ऍट्रोपीसारख्या व्याधीमुळे व्हिल चेअरवर बसून जावे लागूनही या दुर्धर आजाराला न जुमानता पानिपतच्या इतिहास लेखनाचे शिवधनुष्य पेललेल्या संजयचं निश्चितच कौतुक करावंसं वाटतं.



न्यू इंग्लिशमध्ये शिक्षण झालेल्या संजयला लहानपणापासून चांदोबासारखे बालसाहित्य वाचायला आवडायचे तर अभ्यासातही इतिहास आवडीचा होता. परंतु इतिहासाची आवड नेमकी कधी निर्माण झाली हे सांगता येत नाही. किंबहुना पहिल्यांदा इतिहासाचे कोणते पुस्तक किंवा प्रकरण वाचले असे सांगणे म्हणजे, मी पहिल्यांदा काय जेवायला शिकलो, असे विचारण्यासारखे आहे.. असे त्याला वाटते. इतिहासाखेरीज अन्य अभ्यासात मी हुशार नक्कीच नव्हतो असेही तो मोकळ्या मनाने सांगतो.



इतिहास आवडायला लागतो तो ऐतिहासिक स्थळे पाहिल्यानंतर. पण संजयने मात्र फारशी ऐसिहासिक स्थळे बघितली नाही असे तो सांगतो. परंतु इतिहासाबाबतची त्याची जिज्ञासा आणि ज्ञान मात्र निश्चितच वाखाणण्यासारखे आहे.



सातवीला असताच संजयला पानिपतच्या धडय़ाने वेड लावले होते. लहान वयातच त्याने विश्वास पाटील यांच्या कादंबरीसह पानिपतावरील अनेक पुस्तके वाचून काढली. यामुळेच पुढेही इतिहासत जे काही वाचनात येईल त्याची एका वहीत टिपणे करून ठेवण्याची सवय संजयला लागली. तसेच वाचनात येणारी पुस्तके, पत्रांतील उतारे, खलिते सगळेच त्याने जमा करण्यास सुरुवात केली. दरम्यान टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून इतिहास हा विषय घेऊन त्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. मग काय `अभ्यासात प्राप्तते दृष्टी’ या उक्तीनुसार इतिहासात मुरत जाणार्या संजयची स्वतःचा दृष्टीकोन आणि मते तयार झाली. आता आपली मते कुठेतरी मांडावीशी वाटणे स्वाभाविक असते. संजयलाही तसे वाटले आणि त्याने 2009 मध्ये `पेशवेकालीन इतिहास’ या ब्लॉगच्या माध्यमातून पानिपतबाबतची आपली मते मांडण्यास सुरुवात केली. शेजवलकरांच्या मतांना काहीशी छेद देणारी ही मतं होती. त्यामुळे स्वतःची ओळख त्याने टाळली आणि केवळ निष्पक्षपाती चर्चा घडावी हाच उद्देश ठेवला. अपेक्षेप्रमाणे या ब्लॉगला प्रतिसादही प्रचंड मिळाला. म्हणता म्हणता एकूण 17 प्रकरणे संजयने ब्लॉगवर लिहली. दरम्यान ब्लॉगचे वाचक आणि `पुष्प प्रकाश’नचे संजय सोनवणी यांना हा ब्लॉग आवडला. त्यांनी संजयची प्रत्यक्षात भेट घेतली आणि `पुन्हा पानिपत’ घडणार हे निश्चित झालं.



लिखाणाचा कोणताही अनुभव नसलेला आणि भविष्यात असं काही विचारही न केलेल्या संजय क्षीरसागरला ही पुस्तक लिहण्याची कल्पना फारच अवास्तव वाटत होती. पण सोनवणींनी त्याचा पिच्छा पुरवला आणि अर्थात पुन्हा पानिपत घडलेच. यासाठी शाळेतील शिक्षकांपासून ते ठाणे महाविद्यालयातील ग्रंथपाल, ठाण्यातील प्राच्य विद्या अभ्यासालय ते पुण्यातील विविध संस्था, भाऊ आणि बहीण यांच्या मदतीने संजयने प्रचंड संदर्भ ग्रंथालय स्वतःकडे जमवलं आहे.



हे भलते अवघड असते



पुस्तक लिहणं हे तसं सोपं नाही. त्यात त्र्यं. शं. शेजवलकर, ना. वि बापट, चि. विं, वैद्य अशा प्रस्थापितांनी लिहलेल्याच पुस्तकाबाबत नवीन ‘ते ‘ांडणे, संदर्भांचे नवीन अर्थ लावून त्यांची सांगड घालून इतिहास नव्याने उलगडून दाखविणं म्हणजे नवलेखकांनी हातात जळता निखारा घेण्यासारखं. पण इतिहास ही कोणा एकटय़ाची ‘मक्तेदारी नाही. त्यामुळं यासगळ्यांची अनेक पुस्तकं, संदर्भ वाचूनही कोणाच्याही लिखाणाचं ओझं न बाळगता, त्या विषयात तटस्थ लेखन करणं कठीणच. पण भक्कम’ पुराव्यांमुळं संजयनं हे तटस्थ लेखन खूपच चांगल्या पद्धतीनं जमवून आणलं आहे.



भाऊ धारातिर्थीच पडले



भाऊ युद्धात मेले की नंतर याबाबत इतिहासातील पुराव्यांवरून वेगवेगळे निष्कर्ष निगतात. अनेकांच्या मते ते नंतर मेले. पण संजयच्या मते ते युद्धातच धारातिर्थी पडले. या मुद्यावरून आमच्या अनेक चर्चांच्या फैरी झडल्या अशी आठवण सोनावणी सांगतात. तर युद्ध कधी झाले, त्या दिवशी सूर्योदय केव्हा झाला होता, धुके होते की नव्हते, अशाही अनेक घटनांचा ऊहापोह संजयने साग्रसंगीत केला आहे. त्यामुळंच या युद्धाला एक जिवंतपणा प्राप्त झाला आहे.



इतिहास म्हणजे कादंबरी नव्हे



पुस्तक वाचकाभिमुख व्हावे यासाठी लेखक अनेकदा रंजकतेचा वापर करतात. पण यामुळं इतिहासाची कादंबरी होते. त्यामुळे इतिहास कठीण असला तरी रटाळ होऊ नये यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. पण संजयला मात्र तसे करावे लागलं नाही. कारण जे वाटलं, पटलं तेच त्यानं शब्दात मांडलं. कोणालाही जाणून बुजून टार्गेट केलं नाही. पण प्रस्थापितांविरोधी लिहिताना तो बावरलाही नाही. चर्चा, संशोधन आणि निष्कर्ष काढण्याची वेगळी दृष्टी हे संजयच्या कादंबरीची मुख्य वैशिष्टय़े आहेत.



हा शोध न संपणारा…



पानिपतच्या एवढय़ा मोठय़ा युद्धानंतर त्याबाबत कोणालाच काहीच लिहावेसे वाटले नाही. हे युद्ध म्हणजे मराठीजनांना आजही आपल्या अस्मितेची लढाई वाटते. त्यामुळे संजय सांगतात, की पानिपतातील अनेक प्रश्न पन्नास वर्षांपूर्वीही (जेव्हा शेजवलकरांनी पुस्तक लिहिले) अनुत्तरीत होती आणि आजही अनुत्तरीत आहेत. मला जे संदर्भ सापडले, पत्रे सापडली त्याचा अभ्यास करून मी पानिपत लिहिले. पण यापेक्षा कुठली वेगळी वाट अन्य कोणाला सापडली, अन्य निष्कर्ष सापडले तर तेही मला वाचायला तितकेच आवडतील.

-रुपाली पेठकर-जोशी

2 comments:

  1. दैनिक नवशक्ती मधील बातमीची थेट लिंक : http://navshakti.co.in/2012/05/13/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%98%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A4/

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...