भय हा मानवी जीवनाला आदिम काळापासून बळकट मिठी मारून बसलेला घटक आहे. आदिम भय हे नैसर्गिक प्रकोप, सृष्टीतील अनाकलनीय घडमोढी, वन्य प्राणी ते अंध:काराच्या गुढगर्भात लपलेल्या काल्पनिक अदृष्य अशा शक्तींचे जसे होते तसेच स्त्रीच्या जननशीलतेचे कोडे माहित नसल्याने स्त्रीबद्दलही होते. मृत्यू कधीही केंव्हाही जीवन हिरावून घेते त्यामुळे मृत्यूभय तर सर्वव्यापी बनले. जीवनातील अकल्पनियता, अनिश्चितता याने आदिम काळापासून ग्रासलेला मानूस आजही त्यातून सुटला नाही.
धर्माची निर्मिती झाली तीच मुळात या भयावर मात करण्याचे उपाय शोधायला. माणसाने सुष्ट शक्तींना देव मानत त्यांची अर्चना केली. त्यांना बळी दिले तर दुष्ट शक्तींचा नायनाट होईल या भावनेने त्याने आदिम कर्मकांड निर्माण केले. प्रार्थनांच्या वेगवेगळ्या पद्धती बनवल्या. आपलीच दैवते श्रेष्ठ कशी हे सिद्ध करण्यासाठे त्याने अन्य मानवी टोळ्यांनाही वेठीला धरले. कधी आपली दैवते लादली तर शत्रू प्रबळ असेल तर त्याची स्विकारली. भयाची एक दुसरी मानसशास्त्रीय प्रतिक्रिया असते व ती म्हणजे स्वत:ला भयमुक्त दाखवण्याची केविलवानी धडपड. जर दैवी शक्ती श्रेष्ठ आहेत व ज्याचे अपत्य मानव (म्हणजे आपले लोक) आहेत असे मानतो तर आपणही इतरांचे जीवन आपल्या कह्यात त्यांना जिंकून आणू शकतो ही भावना जगभरच्या लोकांत प्रबळ दिसते ती यामुळेच. धर्माचा, देवतांचा जन्म ही मानवी भयाची अपरिहार्य उपज होय. भयावर मात करण्यासाठी, आयुष्य़रेखा अचानक खंडित होऊ नये यासाठी देवतांची त्याला गरज होतीच. आणि देवतांना संतुष्ट करायचे तर कर्मकांडेही आवश्यक. यामुळे यातुनच धर्माची निर्मिती झाली असे आपल्याला दिसते. आदिम काळी टोळीगणित धर्म होते. टोळीगणिक म्रूत्युनंतरच्या जीवनाबद्दलच्या वेगवेगळ्या कल्पना होत्या. महाराष्ट्रातील आदिम दफनांत मयताचे घोट्यापासून पाय तोडून मगच दफन केले जाई असे उत्खननांतुन दिसते. मृताचे भूत नंतर चालत परत येऊ नये अशी कल्पना त्यामागे असावी. म्हणजे मृतांबद्दलचेही जीवंतांना भय होतेच!
नैतिकता ही समाजांतर्गत सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक झालेली दुसरी अपरिहार्य बाब. स्त्री-पुरुष संबंध कसे असावेत, एकमेकांत चोरी करावी कि नाही, शत्रु असेल तर त्याची चोरी केलेली चालेल कि नाही, स्वटोळीअंतर्गत एखाद्याने खून करणे, त्याची संपत्ती लुटने न्याय्य कि अन्याय्य, न्याय्य असेल तर कोणत्या स्थितीत आणि अन्याय्य असेल तर कोणत्य स्थितीत, जिंकलेल्या गुलामांचे काय करायचे, जिंकलेल्या धनाचे वाटप कसे करायचे....या बाबतीतही नियमन गरजेचेच होते. कारण त्यावरून होणा-या संघर्षात टोळीअंतर्गतही अव्यवस्था माजत होती. नीतितत्वे व त्यातुनच जन्मलेले आदिम कायदे टोळीअंतर्गत संघर्षाने सुरक्षितता धोक्यात येवू नये म्हणून आवश्यक बनून गेली. यातुनच हळुहळू राजव्यवस्था/गणराज्यव्यवस्थांचा उदय झाला हे खरे असले तरी मानवी आदिम भयाने माणसाची पाठ कधीच सोडली नाही, कारण नित्याने अनुभवायला येणा-या असुरक्षिततेला त्याला कधीच तोडगा सापडला नाही.
मानवी तत्वज्ञानाचा जन्मच मुळी या अनिश्चिततेची कारणे शोधत त्यावर तात्विक उपाय शोधण्यासाठी झाला. कोणत्यही धर्माचे आदिम तत्वज्ञान हे मृत्यूभोवतीच फिरते, अनिश्चिततेभोवतीच फिरते हा योगायोग नाही. हे जग माया आहे, मिथ्या आहे असे तत्वज्ञान जसे उगवले तसेच भरपुर मजेत जगुन घ्या...स्वर्ग नाही कि नरक नाही असेही सांगत जीवनाला आधार देणारे तत्वज्ञ होतेच. ग्रीक तत्वज्ञ हे नहमीच जडवादी राहिले व भयावर मात करण्यासाठी त्यांनी निसर्गालाच वापरुन घ्यायचे ठरवले. त्याउलट भारतीय तत्वज्ञान हे बव्हंशी परलोकवादी, अध्यात्मवादे व भक्तीवादी राहिले. कोनते तत्वज्ञान श्रेष्ठ हा येथे मुद्दा नसून मानवी जीवनाला भयावर मात करण्यासाठी कसे सामोरे जायचे यासाठी लावल्या गेलेल्या या सोयी होत्या. कर्ताकरविता परमेश्वरच असल्याने जेही काही घडते ते पुर्वनियोजितच असते हा नियतीवाद ग्रीकांत होताच. म्हणजे जे घडणार ते अटळ आहे, ते ठरलेले आहे व त्यात कोणीही हस्तक्षेप करू शकत नाही हे एकदा ठरल्यावर परलोकाची चिंता पाश्चात्य जगाने फारशी केलेली दिसत नाही. भारतियांनी पूजा, भक्ती, जप-तप यातून विधीलिखित बदलता येते, मोक्षाचा मार्ग गाठता येतो या श्रद्धेवर भयावर मात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कर्मकांडांची रेलचेल वाढणे स्वाभाविकच होते.
परंतू येथे हे लक्षात घ्यायला पाहिजे कि धर्माने अथवा तत्वज्ञानाने वा नीतिशास्त्राने मानवी भयावर आजही उतारा दिलेला नाही. अनिश्चितता आणि असुरक्षितता यातून कोणीही मूक्त झाला नाही. देव-धर्मावर हल्ला करणारे पुरोगामी जर या असुरक्षिततेच्या भावनेला सुयोग्य पर्याय देवू शकले असते तर देवा-धर्माची गरजही लोकांना पडली नसती. तसा पर्याय न देताच केवळ नकारात्मक टीका करत ते जातात तरीही ९९.९९९९९% लोक कोणत्या ना कोणत्या प्रमाणात धार्मिक/श्रद्धाळू राहतात असे का याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. मुळात माणसाला देवा-धर्माची मानसिक गरज का भासते या प्रश्नाच्या मुळाशी भिडल्याखेरीज देव-धर्माविरुद्धचा पुरोगामीपणा हे अवघे थोतांड आहे हे समजुन चालावे.
असुरक्षितता
माणसाला प्रत्यही अगणित घडामोडींतून जावे लागते व बहुतांशी वेळा त्याचा ज्या घडामोडींशी संबंधही नसतो अशा घडामोडींतून निर्माण होणा-या स्थितीचे लाभ-तोटे सहन करावे लागतात. म्हणजे पुढच्या क्षणी नेमके काय होनार आहे याचे निश्चित गणित त्याच्याकडे नसते. तो गरीब होणार कि श्रीमंत, तो जीवंत राहणार कि मरणार यापासून आज बायको/पती तरी कसे वागणार...हे प्रश्न कधी उघड तर कधी सुप्त पातळीवर त्याच्या मनात चालुच असतात.
बरे, हे व्यक्तीपुरते मर्यादित नसते. समाज एकमय अभंग असा कधीच नसतो. असावा हे नैतिक स्वप्न झाले. पण प्रत्यक्षात तो जात, धर्म, वंश, विचारधारा, पंथ, देवता, नास्तिकता, पुरोगामित्व, राजकीय पक्ष, व्यावसायिक तथा कामगार संघटना वगैरेंमद्ध्ये सुद्धा विचित्रपणे विभागलेला असतो. समजा एखादी व्यक्ती अमूक धर्माची व दुसरी दुस-या धर्माची. धर्म म्हनून ते स्वाभाविकपणे दोन वेगळ्या पातळ्यांवर वाटले गेलेले असतात. पण व्यावसायिक संघटना म्हणून दुस-या धर्माची व्यक्ती व एका विशिष्ट धर्माची व्यकी समव्यावसयिक असेल तर तिथे दोघे मात्र व्यावसायिक हितासाठी एकत्र येतात. आधी धर्मिक कारणांसाठी ते विरोधी पातळीवर असतात तर दुसरीकडे व्यावसायिक हितासाठी मात्र एकत्र असतात. हा विरोधाभास आहे आणि मनुष्य प्रत्यही या विरोधाभासात जगतो. कारण त्याला धार्मिकही हित हवे आणि व्यावसायिकही.
आणि नेमके या हितसंबंधातच जेंव्हा संघर्ष होतो तेंव्हा मनुष्य धर्म/जात/पंथ संघटन निवडतो....व्यावसायिक क्वचित. असे नेमके का होते यावर विचार करायला हवा. खरे तर व्यवसाय ऐहिक सूख देणारी प्रत्यक्ष बाब झाली. धर्म/जात/पंथ/विचारधारा नाही. धर्माच्या नांवाखाली अब्जधीश व्यावसायिक असो कि मजूर, खांद्याला खांदा लावून संघर्षात उतरु शकतात एक वेळ, पण व्यवसायांच्या नांवाखाली नाही. कारण हितसंबंधांचे वेगळेच कडबोळे जन्माला आलेले असते.
धर्म/देवतांची निर्मिती भयापासून मुक्तता करण्यासाठी झाली हे जरे खरे असले तरी धर्मही मानसाचे भय वाढवण्यात हातभारच लावत राहिले आहेत हेही आपण सहज पाहू शकतो. धर्माचे काम म्हणजे मानसाला खरे स्वातंत्र्य बहाल करत त्याला जीवनाचे सौंदर्य उलगडून दाखवत वस्तुत: भय अस्तित्वात नसू न त्या मिथ्या कल्पना आहेत हे समजावून सांगण्यासाठी व्हायला हवा होता. पण धर्माने उलत अधिकाधिक बंधनेच निर्माण केली असे आपण इतिहासात डोकावता पाहू शकतो. युरोपातील प्रबोधनाची चळवळ धर्माच्या अतिरेकी बंधनांच्या विरुद्ध उमटलेली बुद्धीवादी प्रतिक्रिया होती. धर्माने माणसाने कोणते कपडे घालावेत, काय खावे-काय प्यावे यापासून ते कय पहावे यावरही बंधने आणत त्याला भयमुक्त नव्हे तर भययुक्त करण्याचा चंग बांधला. पण ज्यांना धर्म हाच आपला तारणहार, मुक्तिदाता वाटतो त्यांनी ही बंधने विनातक्रार स्विकारली. जे बुद्धीवादी होते त्यांनी यातील भंपकपणा ओळखला. त्यांची चूक ही झाली कि त्यांना, ज्यामुळे धर्म निर्माण झाले ते भय, याला सक्षम पर्याय त्यांना देता आला नाही. जोवर मानवी जीवनावर पुढच्या क्षणाला काय होईल या असुरक्षिततेचे, अनिश्चिततेचे सावट आहे तोवर त्याला मानसिक आधाराची गरज आहे ही जाणीव त्यांनी ठेवली नाही. त्यामुले धर्म विरुद्ध बुद्धीवाद हाही संघर्ष जगभर उभा राहिला आहे. दोन्हीही बाजू बव्हंशी टोकाच्या असून यात सर्वसामान्य मानसांची ससेहोलपट होते याचे मात्र भान उभय पक्षी नही हेही एक वास्तव आहे.
विज्ञानामुळे धर्माची गरज कमी होईल हा भ्रमही दूर झाला आहे. मंगळयानाच्या प्रक्षेपणाआधी इस्रोच्या शास्त्रज्ञांनीच तिरुपतीला जावून प्रार्थना केली होती ही घटना या संदर्भात बोलकी आहे. पहिल्याच प्रयत्नात यश मिळेल कि नाही हे अनिश्चितता शास्त्रज्ञांतही असल्यामुळे त्यांनीही अखेर दैवी शक्तीलाच शरण जायचे ठरवले असेल तर येथे एक विरोधाभास व द्वंद्व दिसते. खुद्द भौतिकशास्त्रात अनिश्चिततेचे तत्व हे मुलकणांच्या वर्तनासंदर्भात वापरले जाते. मानवी मानसिकतेवर तर याचा प्रचंड पगडा आहे. पण या मानसिकतेचा फायदा धर्मवादी खुबीने करुन घेत माणसांनाच नागवतात, अधिक असुरक्षित करुन सोडतात हेही तेवढेच खरे आहे.
याचे कारण मुळात आपल्या आदिम भावनांत आहे. असुरक्षिततेचे कारण आपण मुळात ऐहिक घटनांत न शोधता पारलौकिक घटनांत शोधतो याची आपल्या जागृत मनाला अनेकदा जाणीवही नसते. ऐहिक घटनाच एवढ्या अनेकदा अनाकलनीय असतात कि त्यांचे निरपेक्ष विश्लेशन करण्यात माणूस अयशस्वी होतो अथवा तसा प्रयत्न तो करत नाही. याचीच एक प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया म्हणून तो घटनांवरच आपले अधिकाधिक नियंत्रण कसे राहिल या प्रयत्नांना लागतो. मग ते आर्थिक क्षेत्र असेल, राजकीय असेल, राष्ट्रीय असेल, धार्मिक असेल, जातीय असेल किंवा पंथिक. यादी मोठी होऊ शकते. परंतू किमान काही लोक आपल्या भयातूनच वेगळा मानसिक नृशंसपणा जन्माला घालतात व वेगळ्याच गुलाम्या लादण्याचा प्रयत्न करत अन्य घटकांत वेगळीच असुरिक्षतता उत्पन्न करण्याच्या मागे लागतात. आणि यातून कोणताही घटक कसा सुटत नाही हे आपण सध्यकालातील काही घटनांचा आढावा घेत पाहुयात.
संघटन का होते?
आदिम काळात माणूस टोळ्या करून रहायचा ही त्याची अपरिहार्यता होती. पण टोळी म्हणजे संघटनच असते. हे संघटन बाहेरुन होणा-या हल्ल्यांना संघटितपणाखेरीज तोंड देता येणार नाही यातुनच होते. अगदी राजे, सरदार यांचेही संघ कसे असायचे हे आपण इतिहासावरुन पाहू शकतो. महाराष्ट्रातील "राजमंडळ’ हा प्रयोग अशाच समविचारी नसले तरी सम-उद्दिष्टांना साध्य करणा-यांचा संघच होता. कार्ल मार्क्सनंतर श्रमिक-कामगारांचेही संघ बनायला लागले. भारतात जातीय/धार्मिक/पंथीय संघ पुर्वांपार होतेच. प्रत्येक संघाचे शत्रुसुद्धा ठरलेले असत. किंबहुना शत्रु असल्याखेरीज संघ बनत नाही हेच संघाच्या उत्पत्तीचे प्रमुख कारण आहे. संघ हे अभेद्य राहतात असेही नाही. प्रसंगोपात्त त्यांच्यातही फूट पडते. आपापसातही संघर्ष उभे राहतात याचीही जगभरातील अनेक उदाहरणे आहेत.
बरे, कोणते ना कोणते तत्वज्ञान हे कोणत्याही संघाचा आधारभूत पाया असतो. त्यात अलौकिक, उदात्त अशी वाटणारी ध्येये जशी असतात तशी ऐहिक विचारसरणीही असते. धर्मवाद्यांचे जसे तत्वज्ञान असते तसे ते निधर्मिवाद्यांचेही असते. साम्यवाद्यांचे असते तसेच समाजवाद्यांचे व भांडवलशाहीवाद्यांचेही असते. प्रत्येक गटाला वाटते कि विश्वाचे कल्याण करण्याची क्षमता त्यांच्याच तात्विक व ऐहिक मार्गाबाबतच्या विचारसरणीत आहे.
आणि एकदा विचारसरणीने जन्म घेतला कि अनुयायी वाढवण्याची जबाबदारीही अर्थातच आली. आणि हे सोपे नसते. म्हणजे धर्म/पंथाची झुंड "भले तरी होईल...आणि नाही झाले तरी प्रयत्न करुन पहायला काय हरकत?" या विचाराने वाढते. या झुंडीतील लोक आज दत्ताला दिसले तर उद्या तेच लोक तुळजाभवानीलाही किंवा साईबाबालाही दिसनार नाही असे नाही. पण नव्या विचारसरणीच्या लोकांना मात्र प्रयत्नपुर्वक प्रयत्न करून अनुयायी मिळवावे लागतात. मिळवले तर ते टिकवावेच लागतात. कम्युनिस्टांनी त्यासाठे केवढे उपद्व्याप केलेत हा आता जागतिक इतिहास आहे. असो.
पण मुळात संघटन होण्यामागे मानवी जीवनातेल असुरक्षितता आहे व त्यावर मात करण्यासाठी माणूस धर्म किंवा विचारधारा यांच्याशी अक्षरश: "नियतीशरणता" दर्शवतो हे वास्तव नाही काय? देव/धर्म मानणारे व देव/धर्म न मानणारे यांच्या संघटनांत मौलिक भेद नाही कारण दोन्हींचा जन्म मुळात मानवाला मुक्ती/मोक्ष देत संकटमूक्त करण्यासाठी होत असतो. किंबहुना वरकरणी तरी ते तसे दाखवण्यात यशस्वी होतात. खरे हेतू काहीही असोत. स्वत: भारतातील बाबा-साध्व्या अत्याचार करत जात कोठडीबंद होतात. म्हणजेच स्वत:चे जीवन जे सुरक्षित करु शकले नाहीत ते दुस-यांचे काय करणार? पण अनुयायी हे समजावून घेण्याच्या मानसिकतेत नसतात. किंबहुना अनुयायांची विचारशक्तीच या मंडळीने एवढी खंडित केलेली असते कि त्यांच्या विवेकाचा मृत्यू झालेला असतो. अशा स्थितीत ज्या बाबींनी धर्म अथवा अन्य संघ निर्माण केले त्या बाबीचे निराकरण कसे होणार?
पण सर्वात महत्वाची बाब येथे समजावून घ्यावे लागते. एक संघटन होते तिचा स्वसंघटनेतील लोकांच्या हिताचा जरी असला तरी परसंघटनेतील हिताचा नसतो तर ते उध्वस्त व्हावे, नष्ट व्हावे हाच असतो. या द्वैतातून जो संघर्ष निर्माण होतो तो आपण सोव्हियेट रशिया व अमेरिका या दोन वेगळ्या, परस्परविरोधी राष्ट्रांतील दिर्घ काळ चाललेल्या शीतयुद्धातून पाहिला आहे. परस्परांनी एकमेकांना संपवण्यासाठी काय कारवाया केल्यात तेही पाहिले आहे. अण्वस्त्रस्पर्धा ही एकमेकांत भय/असुरक्षितता माजवण्यासाठीच होती हे उघड आहे. भयभितांनी भयभितांवर राज्य करण्याचा हा एक अश्लाघ्य, पण अपरिहार्य मार्ग होता असेच म्हणावे लागेल!
असुरक्षितता आणि दहशतवाद
दहशतवादही असुरक्षिततेच्या भावनांतून जन्म घेतो हेही आपल्याला समजावून घ्यावे लागेल. दुस-या विरोधी गटाला असुरक्षित वाटावे यासाठी दहशतवादी कारवाया केल्या जातात असे दहशतवादाचे मानसशास्त्र सांगते. परंतू दहशतवादीही टोकाच्या असुरक्षित भावनेतुनच निर्मण कसे होतात यावर फारसा विचार केला जात नाही. "धर्म संकटात आहे" अशी हाळी दिली कि धर्मवादी भयभित होत एकत्र येतात. मुळात संघटन अथवा झुंड ही नेहमीच भयग्रस्तांची असते. भय निर्माण करणारी समाजनिर्मित कारणे अनंत असतात. महाराष्ट्राचे एक उदाहरण घेऊ. संभाजी ब्रिगेडच्या उदयापुर्वी ब्राह्मण समाज जातीच्या आधारावर कधीही संघटित होण्याच्या प्रयत्नांत नव्हता. पण ब्रिगेडने समस्त ब्राह्मणांनाच सातत्याने विद्वेषपुर्ण टार्गेट केल्यामुळे ब्राह्मणांची संघटना बनली. एवढेच नव्हे तर ब्राह्मण जातीला अत्यंत विसंगत असे परशुरामाचे प्रतीक निवडले गेले. आम्हीही हत्यार उचलू शकतो हा संदेश त्यातून द्यायचा होता. मध्यपुर्वेतेल मुस्लिम आज ज्या संघर्षातून जात लाखोंचे बळी चाललेत त्यामागेही युरोपिय/अमेरिकन जगाने त्यांच्यात निर्माण केलेली पराकोटीची असुरक्षिततेची भावना आहे. असुरक्षिततेतुन माणसे एकत्र येतात. ते एकतर दबून जगायचा प्रयत्न करतात किंवा त्याउलटची हिंसक प्रतिक्रिया देतात. आम्ही असुरक्षित आहोत तर तुम्हीही सुरक्षित राहू शकणार नाही हा इशाराच त्यांना द्यायचा असतो.
भारतात मुस्लिम द्वेषने मुस्लिम संघटित झाले, हिंसक कारवायाही त्यांनी केल्या. ब्राह्मण द्वेषामुळे जशी ब्रिगेड अवतरली तसेच ब्राह्मणही संघटित झाले. दलित द्वेषामुळे दलितही संघटित झाले. संघटन सकारात्मक क्वचित होते. विध्वंसकता व इतर समाजघटकांवर/राष्ट्रांवर जरब बसवणे, दबाव गट निर्माण करणे, म्हनजेच इतरांत भय निर्माण करणे हेच छुपे हेतू त्यामागे असतात. उद्योजकांच्या संघटनाही काही वेगळे वागत नाहीत.
थोडक्यात सर्वांनीच सर्वांना असुरक्षिततेलाच जन्म द्यायचा घाट घातला असेल तर नैसर्गिक असुरक्षिततेवर/भयावर मात करण्याची पर्यायी साधने माणूस कसा शोधणार? देव/धर्म या कृत्रीम मार्गांनी ते साध्य झालेले नाही हे आपण इतिहासाचा आढावा घेतला तर सहज सिद्ध होते. पण वैज्ञानिक मार्गांनीही ते ध्येय साध्य होत नाही हेही तेवढेच खरे आहे. सर्वसामान्य माणूस अजून एवढा प्रगल्भही झालेला नाही कि मुळात अनिश्चितता हाच निसर्गाचा नियम आहे आणि ती कोणीही, अगदी विज्ञानही संपवू शकत नाही. भयावर मात करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जीवन आहे तसे स्विकारत प्रयत्नांतून जेही साध्य करायचे ते प्रयत्न करावेत. माणसाच्या जीवनात माणसांनी ढवळाढवळ करत त्याला अधिक असुरक्षित बनवू नये. यासाठी माणसांना निरिश्वरवादी/निधर्मवादी बनवायचे घाट घालण्यापेक्षा माणसांना माणसांचे मानवी जीवन सामाजिक व कायद्यांच्या चौकटीत जगण्याचे स्वातंत्र्य द्यावे. पुरोगामी म्हणवणारे स्वत:चे संघ बनवतात.
श्रद्धेचे मुळकारण समजावून न घेता त्यामुळे प्रा. शेषराव मोरे जर "पुरोगाम्यांचा दहशतवाद" अशी सज्ञा वापरत असतील तर तो त्यांचा दोष नाही. पुरोगाम्यांचा आहे. माणसाला प्रगल्भ करणे, विचारी बनवणे हे पुरोगाम्यांचे खरे कार्य आहे. त्यांच्या श्रद्धांवर हल्ले करण्याचा तेंव्हाच अधिकार आहे जेंव्हा तुम्ही त्यांच्या भयाच्या आदिम भावनेवर मात करण्याचा पर्याय देवू शकाल. मनुष्य जेंव्हा प्रगल्भ होतो तेंव्हा त्यालाच देव-धर्माच्या बंधनांची गरज भासत नाही. नाहीतर जसा परंपरागत कर्मकांडांचा एक धर्म आहेच तसाच पुरोगाम्यांचाही धर्म बनेल आणि माणसाची मुलभूत समस्या सुटण्याऐवजी ती अधिक गुंतागुंतीची बनेल.
मनुष्य यावज्जीव असुरक्षित व भयग्रस्तच राहिल!
-संजय सोनवणी
(साहित्य चपराक, दिपावली विशेषांक - २०१५ मद्ध्ये प्रसिद्ध झालेला लेख.)