Tuesday, November 24, 2015

सारे काही पुर्वनियोजितच?

यच्चयावत विश्वात जेही काही घडते ते पुर्वनियोजित असते. जे घडणारच आहे, अटळच आहे त्यात मानवी प्रयत्नांनी, कितीही पराकाष्ठा केली तरी यत्किंचितही बदल होत नाही. किंबहुना वैश्विक यंत्रणेत मानवी प्रयत्नांना काहीच स्थान नाही.  माणसाला भावी घटनांची पुर्वचाहूल लागली व त्याने ते अटळ भाग्य टाळण्यासाठीही कितीही प्रयत्न केले तरीही काही उपयोग होत नाही. यालाच "नियती" असे म्हणतात. 

आपले मराठी कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्यवर ग्रीक नियतीवादाचा प्रचंड प्रभाव होता हे आपल्याला माहितच आहे. नियती अटळच असल्याने नियतीवादी साहित्य हे शोकांतिकांकडेच झुकते. किंबहुना नियतीवाद हा ग्रीकांनी जन्माला घातला असा सर्वसाधारण समज आहे. त्याला कारण घडले ते महान ग्रीक नाटककार इस्खुलस, सफोक्लीज व युरिपिडस सारख्या नाटककारांनी नियतीवादी शोकांतिका लिहिल्या. या शोकांतिका त्यांनी अर्थातच ग्रीक पुराणकथांतून घेत आपल्या प्रतिभेने त्यावर साज चढवले. फेट (मोयरा) ही माणसांची नियती लिहिणारी वा घडवणारी एक शक्ती असे हिसियड हा कवी  (इसपू आठवे शतक) मानित असे. पुढे त्यांचे मानवी स्वरुपात दैवतीकरण केले गेले. त्यानुसार या तीन देवता चरख्यावरुन मानवी नियतीचे धागे विणत असतात. त्यात वेदना, दुर्दैवे, मृत्यू, व अन्य अटळ घटनांचा समावेश असून माणसाचा मृत्यू जेंव्हा व्हायचा असतो तेंव्हा यापैकी एक देवता कात्रीने त्याचा धागा कापून टाकत असते असेही या मिथ्थ्यकथेत मानले गेले आहे. देवतांनाही नियतीच्या धाग्यानेच बांधलेले असते असे हा नियतीवाद मानतो.

"इडिपस रेक्स" हे सफोक्लीजचे सर्वात प्रभावशाली शोकांतीक नियतीवादी नाटक. इडिपस हे थीब्जचा राजा लायस व जोकास्टा यांचे अपत्य. त्याच्या जन्मानंतर भविष्य कळते कि हा मोठ झाल्यावर बापाला मारून आईशी संग करणार आहे. हे भविष्य समजताच लायस त्याला ठार मारायचे ठरवतो. त्याचे पाय बांधून त्याच्या गुढघ्यांत खिळे ठोकले जातात व त्याला जोकास्टाने स्वहस्ते मारावे असे लायस सांगतो. जोकास्टा लहाणग्याला मारू शकत नाही. ती मग ते काम आपल्या एका नोकराला सांगते. नोकर मुलाला घेऊन पर्वतशिखरावर जातो व तेथेच सोडून देतो. मुल आपोआप मरेल असे त्याला वाटते. पण एक मेंढपाळ त्या मुलाला पहातो, त्याचे बंध मुक्त करून आपल्या घरी घेऊन जातो व त्याचे नांव "इडिपस" (सुजलेल्या गुढघ्यांचा) ठेवतो. पुढचा त्याचा सांभाळ कोरिंथचा राजा पोलिबस स्वत:च्या मुलाप्रमाणे करतो. 

तरुणपणी इडिपसच्या कानावर अफवा येतात कि तो पोलिबसचा मुलगा नाही. खरे काय हे जाणायला तो डेल्फीच्या देवतेला आपले भविष्य विचारतो.   डेल्फीची देवता त्याला तो खरेच पोलिबसचा मुलगा आहे कि नाही हे न सांगता त्याच्याकडून स्वत:च्या मातेशी संग होणार आहे असे भविष्य वर्तवते. यामुळे इडिपस हादरुन जातो. पोलिबस व मेरोपे हेच आपले खरेखुरे जन्मदाते आहेत व आपल्या हातून अघटित घडू नये म्हणून तो कोरिंथ शहराचा त्याग करतो. 

तो रथातून थीब्जकडे जात असता लायस आपल्या लवाजम्यासह समोरून येत असतो. आधी कोण जाणार यावरुन झलेल्या वादात इडिपस राजा लायसला ठार मारतो. लायस आपला जन्मदाता आहे हे त्याला माहित नव्हते. पण नियतीचे अटळ शब्द खरे झाले. त्याच्या हातून पित्याची हत्या झाली. 

तेथून तो थीब्जला जातो. स्फिंक्सचे कोडे सोडवल्याने (व प्रजेला भयमुक्त केल्याने) त्याला राजपद मिळते आणि आता विधवा झालेली राणी जोकास्टाही. नियतीचे हेही विधान खरे ठरते. पुढे सत्य सामोरे आल्यावर जोकास्टा आत्महत्या करते तर इडिपस स्वत:चे डोळे फोडून घेतो.

माणसाचे वर्तन अज्ञाताने एवढे झाकोळले असते कि ज्या गोष्टी आपण सहज सहज जीवनात करतो त्या अटळ नियतीमुळेच घडत असतात याचे भान माणसांना नसते. कदाचित जगातील तत्वज्ञ व लेखकांना या नियतीवादाने भुरळ घातली असल्यास नवल नाही. 

ग्रीक नियतीवाद कसा असतो हे वरील एका नाटकाच्या ढोबळ कथानकावरुन लक्षात येईल. पण नियतीवाद फक्त ग्रीकांचीच उपज आहे हा समज करुन घेण्याचे कारण नाही. भारतात प्राचीन काळापासून, अगदी बुद्धपुर्व काळापासून  नियतीवादी तत्वज्ञानाची पाठराखन करणारा संप्रदाय होता. त्याचे नांव आजीवक! या पंथाचे अनुयायी मोठ्या संख्येने होते. आजीवकांचे उल्लेख साहित्यात जसे येतात तसेच अशोकाच्या शिलालेखांतही. आजीवक हे वैदिक धर्माचे कट्टर विरोधक होते. बुद्ध आणि महावीर आजिवकांच्या संन्निध्यात आले होते. मंस्खली गोशाल हा त्या काळचा प्रख्यात नियतीवादी विद्वान होता. या पंथाचे तत्वज्ञान ग्रीक नियतीवादापेक्षा थोडे वेगळे होते. आजीवक म्हणत, सारेच जे घडणार आहे ते पुर्वनियोजित असल्याने आपण काही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मानवी स्वतंत्र इच्छेला व प्रेरणांना त्यात स्थान नाही. बीजातच जसे झाड लपलेले असते तसेचे नियतीतच माणसाचे जीवन बद्ध आहे. नियती ही मानवी प्रयत्नाने बदलत नाही. जैन व बौद्ध साहित्यात त्यांना "अकर्मवादी" असे म्हटले आहे. वैदिकांच्या कर्मविपाक सिद्धांताला आजीवकांचा कट्टर विरोध होता. ते म्हणत कर्मातून दुसरे कर्म जन्मत नसून वेदना, संकटे , आनंद हे सारे नियतीमुळेच माणसाला अनुभवायला मिळते. त्यामुळे माणसाला स्वतंत्र प्रयत्न करण्याची संभावनाच राहत नाही. आणि तो तसे करत असला तरी तीही त्याची नियतीच असते. 

आजीवक संप्रदायाचे लोक त्यामुळेच संन्यस्त जीवन जगत. रानावनात फिरत. वस्त्रांचीही काळजी ते करत नसत. एका अर्थाने हा संप्रदाय नियतीशरण होता. सम्राट बिंदूसार आजीवक संप्रदायाचा पाठिराखा होता. अशोकानेही आजीवकांना आपल्या शिलालेखांत सन्मानाने उल्लेखलेले आहे. या संप्रदायाच्या तर्त्वज्ञानावर सांख्य व वैशेषिक तत्वज्ञानाचाही प्रभाव जाणवतो किंवा सांख्य व वैशेषिक हे याच संप्रदायातील तत्वज्ञ असु शकतील. 

परंतू बौद्ध व धर्माने वैशेशिकांचा अकर्मवाद स्विकारला नाही. जीवनात दु:ख आहे हे त्यंनी मान्य केले पण त्यावर मात करता येते, ते अटळ नाही अथवा नियतीने घडवलेले नाही असे या धर्मांनी सांगायला सुरुवात केली. पुढे हा पंथ हळू हळू विरत गेला व इसवी सनाच्या दुस-या-तिस-या शतकानंतर मात्र तो नामशेष झाला. असे झाले म्हणून नियतीवादाचा प्रभाव गेला नाही. "ठेविले अनंते तैसेची रहावे" असे जेंव्हा तुकोबा म्हणतात तेंव्हा त्यांचा निर्देश आजीवक तत्वज्ञानाकडेच असतो हेही लक्षात ग्य्ह्यावे लागते. नियतेवादात मानवी प्रयत्नांना स्थान नाही. "कर्ता-करविता परमेश्वर" हे आपण साधारणपणे नियमित ऐकत-बोलत आलेले विधानही नियतीवादीच आहे. 

जी. ए. कुलकर्णींचेच काय पुरातन काळातील भारतीय साहित्यकारांचे आजिवक तत्वज्ञानावर साहित्यकृती निर्माण कराव्यात याकडे लक्ष गेले नाही. किंबहुना सुखांतिका हाच भारतीय साहित्याचा गाभा राहिलेला आहे. रामाला शरयुत प्राणार्पण करावे लागते हा नियतीचाच संकेत. पण त्यातील शोकांतिका कोणी पाहिलेली नाही. या उलट ग्रीक साहित्यकारांनी नियतीवर आधारित अजरामर शोकांतिका निर्माण केल्या. 

आधुनिक काळात अनेक तत्वज्ञ नियतीवादावर चिंतन करत असतात. खंडण अथवा मंडन करत असतात. नियतीवाद मान्य करणे हे आजच्या काळात अंधश्रद्धाळूपणाचे लक्षण मानले जात असल्याने जाहिरपणे नियतीवाद मान्य करणा-यांची संख्या तशी थोडीच आहे.

येथे नशिब, भाग्य व नियती या वरकरणी समान वाटणा-या शब्दांतील फरकही समजावून घ्यायला पाहिजे. प्रत्येकाचे नशीब ठरलेले असते पण त्यात मानवी प्रयत्नांनी अथवा देवतांना प्रसन्न केल्याने बदलही घडून येतो. नियतीच्या बाबतीत मात्र असे घडत नाही. सारे काही पुर्वनियोजितच असून त्यात मानवाला कसलाही हस्तक्षेप करण्याचे स्वातंत्र्य नाही. ते काहीही केल्याने बदलत नाही. थोडक्यात एका अर्थाने ईश्वरी सत्ता हीच सार्वभौम असून मानव हा नियतीच्या इशा-यावर चाललेले खेळणे आहे असे नियतीवाद मानतो. आणि असा निखळ नियतीवाद भारतात फक्त आजीवकांनी मानला. 

नित्शे, कांट, शोपेनहायमर इत्यादि तत्वज्ञांच्या नियतीविषयक चर्चेत जाण्यापेक्षा आपण नियती ही खरेच असू शकते काय याचा विचार करुयात.  नियती ही ईश्वरनिर्मित व कार्यान्वित संकल्पना आहे असे मान्य करण्याचे काही कारण नाही. कारण त्याला श्रद्धा सोडता अद्यापतरी कसलाही आधार नाही. श्रद्धेच्या आधारावर विश्व चालत नाही. पण हे विश्व तरी पुर्वनियोजित आहे काय?

विश्वनिर्मिती ही महाविस्फोटाने झाली असा समज सध्या प्रबळ आहे. त्याला आव्हान देणारे (अगदी माझाही) अनेक सिद्धांत आहेत. ज्या कारणाने महाविस्फोट घडला त्या कारणाचे समाधानकारक स्पष्टीकरण अद्याप देता आलेले नाही. ते कारण संघनित द्रव्यात होते कि बाहेर हेही सांगता आलेले नाही. महाविस्फोट एका विशिष्ट स्थीतीत झाला. जर अशी स्थिती निर्माण झाली असेल तर विश्वनिर्मिती हीही विश्वाची नियती होती काय असा प्रश्न उद्भवला तर नवल नाही. जे विश्व आपल्याला आज समजले आहे ते सुसंबब्ध असून त्यात कसलाही गोंधळ नाही. त्यामुळे ही सारी रचना पुर्वनियोजित पद्धतीने झाली असेल का असाही प्रश्न या संदर्भात विचारता येतो. याची कारणे वस्तुमानातच दडलेली असली, बाह्य अथवा त्रयस्थ नसली, तरीही एकुणात रचनेतच सुसूत्र योजनाबद्धता आहे हे तर वास्तव आहे. आणि जेंव्हाही पुर्वनियोजितता येते तेंव्हा तिथे नियती असते.

मानवी जनुके माणूस कसा घडणार याचा जैविक आराखडाच असतो असे म्हटल्यास वावगे नाही. मानवी स्वभाव, संस्कृती, भाषा, विचारसरण्यांची बीजे जनुकांतच असतात. मानवी वर्तनाचा वारसा आपल्याला आपल्या जनुकांतुनच मिळतो असे Human Behavious Genetics मद्धे मानले जाते व मानसशास्त्रात याचा आता मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. जनुके हा मानवी वर्तनशास्त्राच्या भविष्याचा आराखडा असतील तर जनुके आपली नियती काही प्रमाणात तरी घडवतात असे मानता येईल. यात अर्थातच जीवनातील घटनांचा समावेश नाही. कारण घटना या असंख्य घटनांच्या व्यामिश्र परिप्रेक्षात निर्माण होत जातात. पण सर्वच घटनांचे परस्परसंबंध मोजता येतील एवढे आपले गणित प्रगत नाही आणि एका घटनेच्या अभावात दुसरी घटना निर्माण होणार नाही हे मान्य केले तर प्रत्येक घटनेचे अनंत घटनांतील सहभाग, परिणाम आणि नव्या घटनांना जन्म हे जर चक्र असेल तर प्रत्येक घटना ही नवी नियती निर्माण करते असे म्हणावे लागेल. 

म्हणजे मग प्रत्येकाच्या नियतीचे परिमाण वेगळे होणे स्वाभाविक होत जाईल.  यात पुर्वनियोजन आहे कि नाही हे समजणे अवघड असले तरी प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी अकल्पनीय घटना घडत असल्याने व त्यांचे स्पष्टीकरण समाधानकारकपणे मिळत नसल्याने नियती असते कि नसते, ती पुर्वनियोजित असते कि नसते याबाबत मोठा खल करता येईल. प्रत्येकाच्या दृष्टीने उत्तरेही वेगवेगळी येतील हेही नक्कीच आहे.

या संदर्भत शास्त्रज्ञ असलेले डा. एडवर्ड ओ. विल्सन यंचे मत विचारात घेणे आवश्यक आहे. आपल्या "सोशल बायोलोजी : द न्यू सिंथेसिस" या ग्रंथात त्यांनी आगामी संकटाचे पुर्वसंकेत सजीवांना कळत असतात व त्यांचा संबंध जनुकांशी असतो असे म्हटले आहे. त्यांच्या मते जनुकांतच माणसाला संकटांची चाहूल घेण्याची उपजत यंत्रणा असते. या विधानाबद्दल त्यांना वैज्ञानिक जगातुन प्रचंड विरोध झाला होता. कारण यामुळे सर्व घटना नियत असतात व माणसाला त्याची या ना त्याप्रकारे चाहूल लागते हे मान्य केले कि नियतीवादही मान्य करावा लागतो. येथे हेही लक्षात घ्यायला हवे कि जर भविष्यात होणा-या घटनांचे पूर्वसंकेत मिळत असतील तर घटनाही पुर्वनियोजितच असण्याची संभावना आहे. अन्यथा पूर्वसंकेत मिळण्याची शक्यताच नाही. यालाच जुन्या लोकांनी नियती म्हटले असेल का?

असे असले तरी मी माझा अनुभव सांगतो. असे अनेक अनुभव आहेत. एक लक्षात घ्या, मी अंधश्रद्धाळू नाही. पण जे घडले आहे त्यातील अन्वयार्थ लावायला घाबरण्याइतपत मी दांभिकही नाही. 

घटना १९९५ मधील आहे. गडचिरोली येथे माझ्या कारखान्याचे उद्घाटन होऊन केवळ एक महिना उलटला होता. मी गडचिरोलीला त्यापुर्वीही अनेकदा माझी ११८ एन. ई. ही कार घेऊन स्वत: चालवत जायचो नि काम संपताच परत न थांबता परत यायचो. एप्रिल १९९६ मद्ध्ये मी असाच गडचिरोलीला कारखान्याला भेट देण्यास गेलो होतो. सोबत माझा कर्मचारीही होता. दोन दिवस तेथे थांबून परत निघणार होतो. पण का कोणासठाऊक सकाळपसून मला अस्वस्थ वाटत राहिले. कारने जाण्यात काही धोका आहे असे उगाच वाटत राहिले. खरे तर मी शंभरेक वेळा कारने गडचिरोलीला ये जा केली होती. पण अशी संवेदना कधीही झाली नव्हती. तरीही समजते तेवढी कार चेक केली. टायर तपासले. सारे ठीकठाक होते. तरीही मला एका टायरबद्दल शंका वाटत रहिली. पण डिकीत चांगला स्पेयर टायर होताच. नागपुरपर्यंत वाटेल काही पेट्रोल पंप आणि पंक्चरवाल्यांची दुकाने होती. कोठेतरी टायर बदलून घ्यायचा व अत्यंत सावकाश जायचे असे ठरवले व दुपारी निघालो. 

गंमत अशी झाली नेमक्या त्याच दिवशी नागपुरपर्यंत एकाही पंपावरचा टायरवाला उपस्थित नव्हता. यामुळे मीही चक्रावलो. मी कार नागपुरला एखाद्या ठिकाणी ठेवून बसने जायचा निर्नय घेतला. प्रसन्न ट्र्यव्हल्सची दोन तिकिटेही काढली व गराज शोधायच्या मागे लागलो. ते यासाठी कि ते कारही तपसून ठेवतील आणि पुन्हा येईपर्यंत कारही सुरक्षित राहिल. पण जवळपासच्या एकाही गराजवाल्याकडे जागा नसल्याने कार ठेवता आली नाही. नागपुरमधे कोनी परिचितही नव्हता कि सुरक्षित पार्किंगही. शेवटी तसेच पुढे जायचे ठरवावे लागले. 

नागपुरमधून बाहेर पडत असता एक टायरवाल्याचे टपरी दिसली. थांबलो. ११८ एन.ई. ची डिकी उघडायला स्वतंत्र चावी असे. टायरवाल्याने ती उघडायचा प्रयत्न केला तर चावीच तुटुन अडकून बसली. डिकी काही केल्या उघडेना. टायरवाल्याने सारे टायर तपासले. सारे ठीकठाक आहेत अशी ग्वाही दिली. हवाही चेक केली. तरीही चरफडत अत्यंत सावकाश निघालो. 

पुण्यापासून केवळ तीस किलोमिटरपर्यंत सुरक्षित पोहोचलो. आणि काय झाले हेच समजले नाही. एका सुमोने जोरदार धडक दिली...इतकी कि ११८ एन.ई. सारख्या कारची पुरती दामटी (१००% Loss) झाली. मी गंभीर जखमी झालो. बेशुद्ध पडलो. दोन दिवसांनंतर शुद्धीवर आलो तेच रुबी हालमद्ध्ये. डोक्यावर १७ टाके, उजवी बाजु कामातुन गेलेली. पायात प्लास्टर....

ज्यांनी अपघातग्रस्त दामडी झालेली कार पाहिली त्यांना या अपघातातून कोणी जीवंत राहिला असेल असे वाटत नव्हते. मी जखमी असलो तरी वाचलो. माझ्यासोबतच्या सहका-याला मात्र खरचटलेही नाही. 

यातून खूप विचार करुनही मला एक कोडे उलगडले नाही. मला चाहूल लागली होती हे खरे. मी संभाव्य अरिष्ट टाळण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येणे शक्य होते ते सर्व केले. पण तरीही जे व्हायचे ते झाले. हा अपघात होणे ही नियती होती काय? माझ्याकडे समाधानकारक स्पष्टिकरण नाही. प्रत्येकाच्या जीवनात अशा स्वरुपाच्या घटना घडत असतात. प्राण्यांना तर मानसापेक्षा आगामी संकटची चाहूल घेण्याची क्षमता असते हे आपल्यालाही माहित आहे. 

माणसाला स्वत:चे निर्णय घेण्याची व घटना घडवायचे अथवा त्या बदलायचे स्वातंत्र्य असते आणि नियती अथवा भाग्य त्यात कसलीही भुमिका बजावत नाही असे मानण्याकडे बुद्धीनिष्ठ तत्ववेत्ते व शास्त्रज्ञांचा भर असतो. मानवी स्वातंत्र्याचा विचार करता तसे स्वतंत्र्य त्याला असायला हवे असे मान्य करता येत असले तरी प्रश्न हा उद्भवतो कि माणूस ज्याला स्वतंत्र कृती म्हणतो तिही पुर्वनियोजितच असेल तर?

Chronicals of Higher Education या नियतकालिकात याच विषयावर सहा विद्वानांनी धमासान चर्चा केली होती. माणसाची स्वतंत्र इच्छा कि नियती यावर विविध मते न्युरोसायंस, तत्वज्ञान व समाजविज्ञान या अंगाने मांडली गेली. मानवी स्वतंत्र प्रेरना (फ़्री विल) हा भ्रम असून नियती हे वास्तव आहे हे सहापैकी चार विद्वानांनी मान्य केले. जेरी कोएन या शास्त्रज्ञाने मत मांडले कि, ज्याला आपण स्वतंत्र निर्णय म्हणतो तो म्हणजे अन्य काही नसून मेंदुतील मोलेक्युल्समधील जैव-विद्य़ुत-रसायनी प्रक्रियेचा शृंखलाबद्ध आविष्कार असतो. आणि ही प्रक्रिया प्रत्येकाच्या मेंदुत कशी घडेल हे जनुकांनीच पुर्वनियोजित केलेले असते. मानवी मेंदुतील निर्णयप्रक्रिया गुंतागुंतीची असली तरी ती भौतिकशास्त्राच्या नियमांनीच आधीच बद्ध असते...पुर्वनियोजित असते, त्यामुळे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हाच एक भ्रम आहे.

परंतू हे झाले निर्णयांबद्दल अथवा माणसाच्या स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या शक्यतांबाबत. निर्णय जर पुर्वनियोजितच असतील तर मानवी जीवनात घडणा-या जन्मापसून मृत्युपर्यंतच्या घटनाही मग पुर्वनियोजित असतील काय? दैववादी अथवा नियतीवादी असे मानतात हे खरे आहे. नियतीवाद्यांच्या तर्कांत काही भाबडेपणा असला तरी वैज्ञानिकदृष्ट्या नियतीचे असणे, म्हणजे सारे काही पुर्वनियोजित असने असंभाव्य नाहे असे आपण विज्ञानाच्या पायावरही म्हणू शकतो हे आपण वर पाहिलेच आहे. संपुर्ण विश्व हेच मुळात जर पुर्वनियोजित असेल तर त्याचाच घटक असलेला माणूस त्यापासून अलिप्त राहू शकत नाही. 

नियतीवाद मान्य केला कि भविषवेत्त्यांचे काय? त्यावरही मग विश्वास ठेवायचा कि काय असा प्रश्नही यातून निर्माण होईल. मुळात कोणी कोणाचे भविष्य पाहू शकतो ही संकल्पनाच अवैज्ञानिक आहे. ग्रह-ता-यांच्या स्थित्यांमुळे मानसाचे भविष्य घडत नाही. त्यांच्या चुंबकीय व गुरुत्वेय लहरींचा परिणाम अटळपणे जीवसृष्टीवर होतच असला तरी विश्वातील ता-यांची व आकाशगंगांची संख्या एवढी अचाट आहे कि त्यांच्या लहरींचा एकुणातील भविष्यावरचा परिणाम वर्तवता येणे अशक्यच आहे. 

मानवी जनुकांत माणसाची नियती असण्याची संभावना सर्वाधिक आहे हे आपण पाहिले. माणसाचा भवताल, माणसांचे परस्परसंबंध आणि जनुकीय प्रेरणा मिळत नियती घडवत असते असेही आपल्याला मानता येईल.  या वैश्विक आणि गुंतागुंतीच्या अगणित प्रभावांतून माणूस निर्णय घायला स्वतंत्र असतो असे विधान करता येत नाही हे उघड आहे. किंबहूना मुळात निर्णय घेण्याची वेळ व घटना याच पुर्वनियोजित असता व त्याचे परिणामही. अन्यथा मानवी जीवनात अनपेक्षित, अकल्पनिय अशअ सुखद अथवा दु:खद घटना घडल्या नसत्या.

नियतीवाद जर हा असा असेल तर देवांची भक्ती-पुजा करुन भले होईल अथवा न केल्याने वाईट होईल ही धर्मश्रद्धा कुचकामी आहे हेही आपल्या लक्षात येईल.

पण यावर तुमचा तर्क असा असू शकतो कि...

भक्ती-पुजा करणे हीच माझी नियती असेल तर?

असो! 

(Article published in मीडिया वॉच दिवाळी अंक २०१५. Editor- Mr. Avinash Dudhe)

1 comment:

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...