वैदिक धर्मव्यवस्थेत ब्राह्मण हा अग्रगण्य वर्ण म्हणून ओळखला जातो. भारतीय समाजव्यवस्थेत या वर्णाने जसा सन्मान मिळवला तसेच जन्माधिष्ठित श्रेष्ठत्ववादाचे वर्चस्वही गाजवल्याचे आपल्याला दिसते. बहुतेक वैदिक धर्मग्रंथांत ब्राह्मण अपरंपार ब्राह्मण माहात्म्य आपल्याला दिसते. अठराव्या शतकानंतर मात्र ब्राह्मणविरोधी लाटही उठल्याचे दिसते. आर्य वंश सिद्धांताच्या वर्चस्वाखाली आपण बाहेरचे, भारतावरील आद्य आक्रमक, एतद्देशिय असंस्कृतांना आपली संस्कृती व भाषा देणारे अशा समजापोटी वांशिक भेद करवून घेतल्याने एक सांस्कृतिक संघर्षही त्यांनी सुरु केला. त्यामागील कारणे वगैरेंचा येथे विचार करण्याऐवजी आपण भारतातील ब्राह्मणांचा इतिहास समजावून घेण्याचा प्रयत्न करुयात.
ऋग्वेदकाळात ब्राह्मण हा वर्ण नव्हता. ब्रह्म या शब्दाचा वैदिक संस्कृतातील अर्थ "मंत्र" अथवा "स्तोत्र" असा आहे. जो मंत्र अथवा स्तोत्र रचतो तो ब्राह्मण एवढाच ब्राह्मण या शब्दाचा अर्थ होता. थोडक्यात वैदिक मंत्र ज्यांनी रचले तेवढेच ब्राह्मण येथे अभिप्रेत होते. ऋग्वेदकाळात ब्राह्मण हा जन्माधिष्ठित वर्ण बनलेला नव्हता त्यामुळे मंत्रकर्त्या ब्राह्मणाची मुले मंत्रकर्ती नसतील तर ते ब्राह्मण नव्हेत. पुढे वेदरचना संपल्यानंतर वेदाधारित यज्ञकांडाला अधिक शिस्त आली. मंत्रांचा उपयोग यज्ञादी धार्मिक कर्मकांडात करणारा वर्ग पुढे विकसीत झाला. त्यासाठी वेदाध्ययन व पाठांतर आवश्यक होते. हे काम तसेच यज्ञांचे विधान समजावून घेणे किचकट होते. या गरजेपोटी जो वर्ग वेदाध्ययनाकडे वळाला तोही स्वत:ला ब्राह्मण म्हणवून घेऊ लागला. पुढे ब्राह्मण हा वर्ण जन्माधारित बनत गेला. यज्ञाभोवती गुढतेचे वलय निर्माण करण्यात यश आल्याने वैदिक धर्मसंस्थेत ब्राह्मणांना अननयसाधारण महत्व मिळाले. त्यांच्या उपजीविकेची सोय लावण्याचे कार्य अर्थात राजे व धनाढ्यांवर आले. अर्थात या वर्णावर उपजिविका कशी करावी यापासून ते जीवनआचार व्यवहारांवरही खूप बंधने आली. पण हे खूप नंतर घडले. तो प्रवास पाहणेही रोचक ठरेल.
उपनिषदांमधील ब्रह्म व वेदामधील ब्रह्म या शब्दांचे अर्थ एकच नव्हेत. वेदांतील ब्रह्म या शब्दाचा अर्थ मंत्र असा होतो हे आपण पाहिले. उपनिषदांत मात्र "ब्रह्म" हा शब्द मंत्र म्हणून येत नसून आध्यात्मिक गुढार्थाने, चिद्शक्ती किंवा विश्वनिर्मितीमागील एक चैतन्य अशा अर्थाने येतो. "ब्रह्म" जाणतो, म्हणजे ब्रह्मविद्या जाणतो तो ब्राह्मण नव्हे तर उपनिषदकाली ब्रह्मविद्येला जन्म क्षत्रियांनी दिला असे छांदोग्य उपनिषदात प्रावाहण जैवालीने स्पष्टपणे म्हटलेले आहे. काही लोकांनी ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण असा अर्थ लावला असला तरी ते खरे नाही.
उदा. महाभारतातील व्याख्येनुसार- " जातकर्मादी संस्कारांनी जो सुसंस्कृत झाला आहे, जो शुद्ध व वेदाध्ययन संपन्न आहे, जो षट्कर्मे करतो, आचरण शुद्ध ठेवतो, यज्ञ करून उरलेले अन्न जो भक्षण करतो, जो गुरुला प्रिय असतो ; नियमशील, सत्यनिष्ठ, दानशील, अद्रोही, दयाळू, सलज्ज, दुष्कृत्यांची घृणा करणारा व तपस्वी असतो, त्यालाच ब्राह्मण असे म्हणतात." (म.भा. शांतिपर्व १८९.२-४) ही व्याख्या उपनिषदांतील ब्रह्मशी सुसंगत नाही हे उघड आहे.
भारतात ब्राह्मण हा वर्ण कसा विकसित होत गेला हे आपण पाहुयात.
भारतात वैदिक धर्माचा प्रवेश विदेघ माथवाच्या व त्याच्या सहकारी-अनुयायांच्या माध्यमातून सरासरी इसपू १२०० ते इसपू हजार या काळात झाला. त्यांनी जरी पहिली वस्ती सिंध प्रांतात केली असली तरी त्यांना राजाश्रय मिळाला तो कुरु-पांचालांचा. शतपथ ब्राह्मणात ही प्राचीन दंतकथा जपून ठेवली असून त्यावरून यांची पहिली वस्ती सदानीरा नदीकाठी पानथळ परिसरात आधी झाली असे दिसते. शतपथ ब्राह्मणातील ही पुराकथा अशी : विदेघ माथव हा सरस्वती नदीच्या तीरावर राहत होता. आपला पुरोहित गौतम राहुगण आणि अग्नी सोबत घेऊन तो पर्वत (उत्तर गिरी) नद्या व अरण्ये ओलांडत सदानीरा नदीपर्यंत आला. आता कोठे वसायचे असे विचारल्यावर अग्नीने त्याला या नदीच्या पुर्वेकडे वसती कर असे सांगितले. (पहा शतपथ ब्राह्मण १.४.१, १४-१७) शतपथ ब्राह्मणाच्या या पुराकथेवरून दक्षीण अफगाणिस्तानातील सरस्वती (हरक्स्वैती) नदीपासून कोणत्यातरी अज्ञात कारणाने (बहुदा राजकीय घडामोडींमुळे) वैदिक धर्मियांचा एक गट उत्तरगिरी (हिंदुकूश पर्वत) व अनेक नद्या जंगले ओलांडत एका नदीजवळ आले, तेथे वस्ती केली व त्या नदीला सदानीरा नदी हे नांव दिले. येथे काही काळ वसती केल्यानंतर त्यांना कुरुंनी राजाश्रय दिला.
येथे या वैदिक अनुयायांनी सर्वप्रथम मिळेल तेवढा वेद एकत्र केला व त्याची शिस्तबद्ध विभागणी केली. वेद पुर्वी एक लाख ऋचांची राशी होती असे विष्णू पुराणाने नोंदवलेले आहे. परंतु स्थलांतरामुळे सर्वच वेद या शिष्यांना सोबत आनता आला नाही. अनेक वेद शाखा (अथवा मंडले) राहुनच गेली. वेद व्यासांनी वेदांचे चार भाग केले व चार शिष्यांना (पैल, सुमंतू, वैशंपायन व व जैमेनी) हे करत असतांना त्यावर स्थानिक भाषांचे संस्कारही केले, यज्ञसंस्थेला काटेकोर रुप दिले. ब्राह्मण ग्रंथांचीही सुनियोजित मांडणी याच काळात केली गेली. पुढे धर्मप्रसारासाठी म्हणून वेदाच्या २७ पाठशाखा तयार करण्यात आल्या. यातील आता फक्त शाकल व बाष्कल शाखा उपलब्ध आहेत.
या काळाला आपण वैदिकांचा भारतातील आरंभ काळ म्हणू शकतो. या काळात वैदिक ब्राह्मणांत फक्त चार गोत्रे होती. हे आपण मुळचे वैदिक ब्राह्मण म्हणू शकतो. हे लोक कुरु-पांचाल प्रदेशात स्थायिक होते. कुरू राजांनी सर्वप्रथम वैदिक धर्माला आश्रय दिला असावा असे मत टी. एच. ग्रिफिथ (The Hymns of the Rig Veda, पहा प्रस्तावना) यांनीही व्यक्त केलेले आहे. मनुस्मृतीचे आद्य रुपही याच परिसरात उदयाला आले हे आपल्याला मनुस्मृतीत पहिल्याच अध्यायात दिलेल्या भुगोलावरून लक्षात येते.
कुरु राजांचे अथवा त्या परिसरातील काही राजांनी वैदिक धर्माला आश्रय दिल्याने स्वाभाविकपणे त्यांनी धर्मप्रचाराचे कार्यही हाती घेतले. या प्रचारात त्यांनी अनेक स्थानिक भारतीयांना वैदिक धर्मात घेत ब्राह्मण, काहींना क्षत्रीय व तर काहींना वैश्य करून घेतले. अगदी उत्तर भारतातील ब्राह्मणांमद्ध्येही भिन्न आनुवांशिकी दिसते ती या धर्मांतरामुळेच होय. ही प्रक्रिया आधी उत्तरेत सुरु झाली. द्रविड ब्राह्मण या प्रक्रियेत सर्वात शेवटी आले. त्यामुळे वैदिक धर्मावरही या धर्मांतरित स्थानिकांमुळे (वेदपुर्व शिवप्रधान मुर्तीपुजकांचा धर्म पाळणारे) खूप संस्कार झाले. विविध स्मृत्या निर्माण झाल्या त्या वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या प्रांतात. आचार-विचार बंधनांतील स्म्रुतींतील विधाने प्राय: विसंगत अथवा परस्परविरोधी येतात ती त्यामुळेच. पण ते पुढे.
या आरंभकाळात धर्मप्रसार व धर्मजतन हेच मुख्य हेतू वैदिक ब्राह्मणांसमोर असल्याने ब्राह्मण माहात्म्य वाढवत असतांना ब्राह्मणांवर असंख्य बंधनेही लादली गेली. "ब्राह्मण म्हणजे परम तेज व तप होय. ब्राह्मणांच्या नमस्कारामुळेच सूर्य दिव्य लोकात विराजतो..." (म. भा. वनपर्व, ३०.३.१६), "जे कृद्ध झाले असता अन्य स्वर्गादि लोक व लोकपाल निर्माण करू शकतात, जे देवांनाही शाप देवून मनुष्य योनीत जन्म घ्यायला लावतात, ज्याचा आश्रय धरून लोक व देव नेहमी आपल्या जागी स्थिर राहतात....." (मनुस्मृती, ९.३१५-१६), ब्राह्मण हा राजापेक्षा श्रेष्ठ असून राजाची त्याच्यावर सत्ता चालत नाही असे गौतमही (९.१) म्हणतो. असे ब्राह्मणांचे महत्व सिद्ध करत अन्य स्थानिक धर्मियांचे या धर्माबाबत व त्यातल्या त्यात ब्राह्मण वर्णाचे आकर्षण निर्माण केले. पण नवांगतूक वैदिक धर्म नियमांचे कटाक्षाने पालनही करतील यासाठी त्यांच्यावर कठोर बंधनेही घातली. ती अशी:
ब्राह्मणाने सतत वेदाध्ययन करावे, एका दिवसाच्या गरजेपेक्षा जास्त धनसंचय करू नये, शस्त्रे हाते धरणे तर दुरच, त्याचे दर्शनही घेऊ नये, कसलाही व्यापार करू नये, राजद्रोक केला तर त्याला जलसमाधी द्यावी, गुरुपत्नीगमन-सुरापान असे गुन्हे केले तर मस्तकावर डाग देवून देशाबाहेर हाकलावे ई.
आरंभकालीन वैदिक स्वत:वर स्वत:हून बंधने घालतील ही शक्यता नव्हती. पण नवधर्मांतरीत लोक वैदिक धर्माशी अपरिचित असल्याने त्यांना धर्मात घेतांना, विशेषत: ब्राह्मण वर्णात घेतांना अशी कठोर बंधने घालणे त्यांना योग्य वाटले असल्यास नवल नाही. घुर्ये म्हणतात कि धर्मांतरीत वैदिक ब्राह्मण हे मुळच्या वैदिकांपेक्षा कडवे होते. कारण ही बंधने पाळण्यात त्यांना होणारे लाभही खूप होते. सर्वात मोठा लाभ म्हणजे प्रतिष्ठा.
उपनयन
वैदिक धर्मात उपनयन हा अत्यंत महत्वाचा संस्कार मानला जातो. आरंभकाळात स्त्रीयांचेही उपनयन होत असे. पण याकडेही वेगळ्या दृष्टीने पाहिले पाहिजे. वैदिक धर्मात मुळात हा संस्कार नव्हता. उपनयन म्हणजे स्नातकाला आचार्याकडे शिक्षणासाठी पाठवणे अथवा आचार्याने त्याला पुन्हा गर्भात धारण करून नवीन जन्म देणे. दोनदा जन्म म्हनून वैदिक लोकांना द्विज म्हणतात. उपनयन संस्कारात जानवे (यज्ञोपवित) घालणे व गायत्री मंत्राची दीक्षा घेणे हे महत्वाचे विधी आहेत. परंतू ऋग्वेदात कोठेही हा संस्कार येत नाही. जानवे , तेही तृणांचे अथवा लोकरीचे बनवलेले यज्ञप्रसंगीच पुरोहित घालत म्हणूनच त्याला "यज्ञोपवित" म्हणतात. ते नेहमी घालणे आवश्यक नव्हते.
परंतू हा नंतर वैदिक धर्मातील महत्वाचा संस्कार बनला. याचे मुळ धर्मांतरितांसाठीच्या विधीत आहे. इतर धर्मियांपेक्षा आपण वेगळे आहोत हे दर्शवण्यासाठी काही खुणांची गरज होती. जानवे ही महत्वाची खुण बनली. किंबहुना उपनयन संस्कार झाल्याखेरीज ब्राह्मण आजही ब्राह्मण बनत नाही. तो अन्यधर्मीय, म्हणजे शुद्रच, राहतो. ज्ञानेश्वर व त्यांचा भावंडांनी मुंजीसाठी संघर्ष का केला हे आपण यातून समजावून घेवू शकतो. याचाच अर्थ असा कि उपनयन हा मुळात धर्मांतराचा विधी होता. नंतर तो स्नातकाने गुरूगृही जाण्यापुर्वीचा विधी बनवण्यात आला.
"उपनयन" या शब्दाचा अर्थच मुळात "जवळ घेणे, सन्निकट करणे" असा आहे आणि हा धर्मांतराचा पर्यायवाची शब्द आहे हे उघड आहे. ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य यांचे जानवे कसे वेगवेगळे असावे याचेही निर्देश वैदिक धर्मशास्त्रकारांनी दिले आहेत. थोडक्यात मुळात उपनयन विधी हा धर्मांतराचा विधी होता. आजही त्याचे स्वरूप, अर्थ वेगळा घेत जात असला तरी, बदललेले नाही. उपनयन न झालेल्या वैदिकांस "व्रात्य" अशीही संज्ञा एके काळी होती. व्रात्यांना वैदिक धर्मात स्थान नसे.
गोत्र
गोत्र म्हणजे या ऋषींच्या वंशातील माणसे. हा वंश जैविक असून अन्य गोत्र संस्थापकही यापैकीच कोणत्या ना कोणत्या ऋषीचे वंशज असून त्यांच्या नांवानेही गोत्रे निघाली आहेत. ही गोत्रे फक्त ब्राह्मण वर्णांना लागू असून क्षत्रीय व वैश्यांना ब्राह्मणांचीच गोत्रे दिली जातात. त्यांना स्वत:चे मुळ पुरुष नाहीत असा त्याचा एक अर्थ होतो. शुद्रांना गोत्र नसते कारण ते वेदबाह्य संस्कृतीचे लोक. पण आजकाल अनेक शुद्रांनाही आपली गोत्रे ब्राह्मण गोत्रांत शोधायची हौस असते असे दिसते.
बाराव्या शतकातील प्रवरमंजिरी या पुरुषोत्तम पंडिताच्या ग्रंथावरून दिसते कि ब्राह्मणांमद्ध्ये मुख्य फक्त सोळा गोत्रे होती. या जाती भारतात आलेल्या मुळ वैदिक आर्यांपैकी असाव्यात असे घुर्ये म्हणतात. (Gotra, पान २२८). पण महाभारतात मात्र प्रथम चारच गोत्रे (१-अंगिरा, २- कश्यप। ३- वशिष्ठ ४- भृगु ) होती असे सांगुन पुढे ती जमदग्नी, अत्री, विश्वामित्र आणि अगस्त्य यांची भर पडत आठ झाली असे उल्लेखले आहे. (महाभारत, शान्तिपर्व २९६ -१७ , १८ ) बौधायनही या आठच मुख्य गोत्रांचा स्पष्ट निर्देश करतो.
गोत्र संकल्पना मुळात ऋग्वेदात नाही. वेदकर्त्या ऋषीचे आनुवांशिकी जैविक वंश म्हणजे गोत्र हाही अर्थ बरोबर नाही. गोत्र म्हणजे खरे तर गायींचा गोठा. पाणिनी म्हणतो, ऋषीच्या पुत्रापासुन उत्पन्न होत गेलेल्या पुत्रांची शृंखला. (अष्टाध्यायी- ४.१.१७८). हा जैविक अर्थ नंतर आला असला तरी ज्या ऋषीच्या लोकांची सुक्ते पाठांतरीत ठेवीत, अध्यापन करीत अशा शिष्यांना त्या ऋषीचे गोत्र दिले जात होते असा अर्थ स्पष्टपणे काढता येतो. त्यामुळे सुरुवातीला बापाचे आणि मुलाचे गोत्र एक असण्याची शक्यता नाही. परंतू पुढे मात्र गोत्रेही वंशपरंपरागत (जन्माधारित) बनत गेल्याचे दिसते. यामुळेच क्षत्रीय व वैश्यांनाही ब्राह्मण गोत्रे (ऋषी मुळात ब्राह्मणही नव्हते कि कोणत्या अन्य वर्णाचे कारण वेद निर्माण होत असतांना जन्माधारित वर्णव्यवस्थाच अस्तित्वात आलेली नव्हती.) दिली जात होती हे उघड आहे. थोडक्यात गोत्र म्हणजे वंश नव्हे. ती एक भ्रामक समजूत आहे.
बाराव्य शतकापर्यंत केवळ १६ प्रमुख गोत्रे होती हे प्रवरमंजिरी सांगते. महाभारतात मुळात केवळ चार गोत्रे होती ती पुढे आठ बनली असे सांगितले आहे. पण पुढे गोत्रे ब्राह्मणांतही खूप वाढत गेली. आधीच्या धर्मांतरितांना एखाद्या वैदिक ऋषीचेच गोत्रनाम दिले जात असे. पण जसजसा धर्मांतरांचा विस्तार वाढला तसतसा ब्राह्मण वर्णातही गोंधळ सुरु झाला. आधी वैदिक धर्म कुरु-पांचाल व नंतर राजाश्रय मिळाल्याने गंगेच्या खो-यातही पसरला.
मुळात भारतात आलेले मुळचे वैदिक संख्येने अल्पसंख्य असल्याने त्यांनी आपल्यातीलच जवळपास २७ व्यक्तींना धर्मप्रसाराचे कार्य दिले. हे प्रचारक इतरत्र पसरू लागले. परंतु उत्तर भारतात, कुरु-पांचाल व नंतर बिहार प्रांत वगळता त्यांना सहजासहजी बस्तान बसवता आले नाही. बालेय देश (महात्मा बळीच्या वंशजांची राज्ये, अंग, वंग, कलिंग ई.) वैदिक प्रचारकांना प्रवेशही करू देत नव्हते. दक्षीण भारत (विंध्याच्या पलिकडील प्रदेश) त्यांना माहितही नव्हता हे शतपथ ब्राह्मण व मनुस्मृतीवरूनच दिसते. अगस्ती (ऋग्वेदातील अगस्ती नव्हे) हा दक्खनेतील पहिला प्रचारक मानला जातो. सर्व पुराकथा या बाबीकडेच निर्देश करतात. वैदिक धर्माचा परिचय दाक्षिणात्यांना इसवी सनाच्या पहिल्या-दुस-या शतकाच्या दरम्यान झाला हे वि. का. राजवाडेंनी राधामाधवविलासचंपुच्या प्रस्तावनेत नोंदवलेले आहे.
एक येथे लक्षात घेतले पाहिजे, वैदिक आर्य आक्रमण वा निर्गमण सिद्धांत जरी गृहित धरला तरी तरी वरील विवेचनास काहीही बाधा येत नाही. कारण आक्रमक असले अथवा स्थलांतरीत तरी त्यांची मुळ संख्या ही कमीच होती. वैदिक आर्य भारतातीलच हा तलगेरींसारख्या पुनरज्जीवनवादी संशोधकाचा सिद्धांत खरा मानला तरी वरील मतांना बाध येत नाही. कारण वैदिक धर्म हरियाणात स्थापन झाचे ठाम प्रतिपादन आहे. त्या स्थापनेनंतर धर्म अन्यत्र पसरला असे त्यांचेच प्रतिपादन आहे. याचाच अर्थ असा कि धर्म प्रचारानेच पसरला हे कोणताही सिद्धांत गृहित धरला तरी अमान्य करता येत नाही.
घुर्ये म्हणतात कि वैदिक धर्मात अन्य विविध प्रदेशात राहणारे लोक घुसु लागले, त्यात ब्राह्मण वर्णात शिरणा-यांची संख्या अधिक होती. घुर्ये या लोकांना New recruits अशी संज्ञा देतात. ते म्हणतात कि अन्य प्रांतांतील ब्राह्मण आनुवांशिकी शरीररचना, चेहरेपट्टी व त्वचेचा रंग याबाबतीत एकमेकांशी कसलेही साम्य दर्शवत नाहीत, त्यामुळे ते मुळचे वैदिक आर्य होते असे म्हणता येत नाही. उलट एकाच प्रातातील ब्राह्मण मात्र त्याच प्रांतातील खालच्या जातीतील माणसांशी जास्त शारिरीक (आनुवांशिकी) साधर्म्ये दर्शवतात. म्हणजेच प्राचीन काळी त्या त्या भागातील लोक हे एकमेकांशे जैविक दृष्ट्या अधिकाधिक जवळचे असले पाहिजेत. आर्यपुर्व भारतियांचा वैदिक धर्मातील प्रवेश हेच यामागील कारण होय. (पहा- Caste and Race). एस. देवदास पिल्लै म्हणतात कि स्वत:ला ब्राह्मण म्हणवून घेणारे अनेक ब्राह्मण हे ना वैदिक कर्मकांडांचा गाभा जाणत ना त्यांना पुरोहितकार्याचे ज्ञान आहे, अनेक ब्राह्मण पोटजातींत ब्राह्मणांना एरवी निषिद्ध असलेल्या खाद्यप्रथाही आहेत. यावरून घुर्येंचे मत बरोबर वाटते. (Indian Sociology Through Ghurye, a Dictionary, By S. Devadas Pillai)
घुर्ये यांनी एपिग्राफिका इंडिका या ग्रंथात प्रकाशित दिडशे दानपत्रे (ताम्रपट व शिलालेक) यांचे विश्लेशन जे केलेय ते महत्वाचे आहे. या पटांत एकूण ३१६१ ब्राह्मणांचा उल्लेख आहे ज्यांना जमीनी दान केल्या गेल्या. यात आसाम, राजस्थन व मध्यप्रदेश धरून उत्तर भारत, गुजराथ, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व तमिळनाडू प्रांतांत दिल्या गेलेल्या दानपत्रांचा समावेश आहे. हे ताम्रपट/लेख इ.स. पाचव्या शतकापासून ते सतराव्या शतकापर्यंतचा कालातील आहेत.घुर्येंची निरिक्षणे अशी:
१) या दानलेखांत ज्यांना दान दिलेले अहे अशांची एकूण १२४ गोत्रे नोंदलेली आहेत. त्यातील ७७ गोत्रे ही अन्य प्रांतांत, अगदी निकटच्या प्रांतातीलही, लेखांतही पुनरोल्लिखित नाहीत.
२) फक्त १२ गोत्रे ही सर्व प्रांतात (वर उल्लेखलेल्या) सारखी मिळून येतात. त्या १२ पैकी भरद्वाज व कश्यप ही गोत्रे सर्वाधिक वेळा उल्लेखलेली आहेत. म्हणजे ही गोत्रे अधिक चलनात होती. ("Widest curency" त्यांचे शब्द)
३) या १२४ गोत्रांपैकी २१ गोत्रे ही गोत्र-प्रवरांची माहिती देणा-या समकालीन धर्मग्रंथात आढळून येत नाहीत.
४) छत्तीसगढ भागातील गोत्र-प्रवरे शंका प्रबळ करतात कि ही गोत्रे सर्वस्वी अनार्य (अवैदिक) परंपरेतून आलेली आहेत.
५) जुन्या काळातील ताम्रपटांत गोत्रे व प्रवरे यांची सांगड इतक्या चुकीच्या पद्धतीने घातलेली आहे कि जणू काही कोणी ब्राह्मण म्हणवण्याचा केवळ फायदा उचलण्यासाठी ती "बनवून" टाकलेली आहेत. (पहा, Gotra, डा. जी.एस. घुर्ये)
घुर्येंची निरिक्षणे खालील बाब अधोरेखित करतात.
१) भारतातील असंख्य ब्राह्मण उपजाती या मुळच्या वैदिक नाहीत.
२) अनेक मुळचे धर्मांतरीतही ब्राह्मण नसतांना बनावटगि-या करत ब्राह्मण बनले.
३) त्यामुळेच ब्राह्मण समुदायात विविध प्रांतांत आनुवांशिकी साम्य मिळत नाही.
(आर्य-अनार्य हे शब्द घुर्येंनी वापरले आहेत. या शब्दांना वांशिक रंग असल्याने वैदिक-अवैदिक या संज्ञा मी वापरल्या आहेत.)
वाचक सहजपणे माध्व ब्राह्मण, दीक्षितार, नंपुतीरी, ओडिया, चित्पावन, देशस्थ ब्राह्मणात शारिरिक तुलना करून पाहू शकतात. भारतीय संस्कृती कोशसुद्धा (खंड ६, पान ३२३) म्हणतो कि ब्राह्मण वर्णातील लोक एकवंशीय नव्हते. अनेक अनार्य तसेच द्रविडांनाही ब्राह्मणत्व दिले गेले. म्हणजेच त्यांचे धर्मांतर केले गेले. धर्म प्रचार करायचा तर हे स्वाभाविक होते.गुप्त राजांनी वैदिक धर्माला राजाश्रय दिल्यामुळे वैदिक ब्राह्मण महत्ता वाढल्यावर त्या धर्मात जाण्याची प्रथा वाढली असू शकते.
येथे आपल्याला तीन प्रकारचे ब्राह्मण भेटतात. पहिले म्हणजे मुळचे वैदिक स्थलांतरितांपैकीचे, पण कालौघात येथील स्थानिकांत रक्तसंबंधाने मिसळून गेलेले ब्राह्मण. दुसरे म्हणजे धर्मांतरीत ब्राह्मण व तिसरे म्हणजे केवळ ब्राह्मण असण्याचे फायदे लाटण्यासाठी बनावटगि-या करत बनलेले ब्राह्मण. आरंभ काळातील ब्राह्मण हे आपल्याला कट्टर वैदिक दिसतात. त्यांच्या मुळच्या ग्रंथांत मुर्तीपुजेचा साधा उल्लेखही येत नाही. पण गुप्तकालोत्तर ग्रंथांत श्रौत-स्मार्त असे फरक दिसायला लागतात. कारण वैदिक धर्माला मुर्तीपुजा मान्य नसतांना, केवळ यज्ञ हे कर्मकांड निहित असतांनाही नंतर वैदिक झालेले काही प्रांतातील ब्राह्मण आपल्या मुळच्या पुजेलाही चिकटून बसले याचे कारण ते धर्मांतरित आहेत व मुळचे संस्कारही सोडू शकले नाहीत यात आहे. एका अर्थाने ते द्वैधर्मी ठरतात. म्हणजे एकीकडे ते सर्व संस्कार वैदिक पद्धतीने करतात तर दुसरीकडे वेदांना निषिद्ध अशी मुर्तीपुजाही करतात. काही तर तेही न करता केवळ स्वार्थभावनेने जुन्या काळातच स्व्यंघोषित ब्राह्मण बनले आहेत. भुमिहार, सांचोरा, नंपुतीरी, चित्पावन वगैरे असे ब्राह्मण आहेत. घुर्येंनी जे ताम्रपट अभ्यासलेत ते पाचव्या शतकानंतरचे, गुप्तकाळ व गुप्तकालोत्तर आहेत हेही उल्लेखनीय आहे. अर्थात धर्मांतराची परंपरा उत्तरेत सर्वात आधी सुरु झाली. नंतर ती अन्य प्रांतात क्रमश: पसरत गेली असे एकंदरित प्रसाराचे जे टप्पे मिळतात त्यावरून दिसते.
वैदिक धर्म विरोधी बुद्ध-महावीर-चार्वाकादी गंगेच्याच खो-यात (बिहार) इसपू सहाव्या शतकात उदयाला आले कारण त्यांच्या काळात वैदिक धर्म तेथेच तेवढा प्रचलित होता. अन्यत्र नाही म्हणून त्याला विरोधाचे कारनही नव्हते. अन्यत्र हा धर्म जसजसा पसरत गेला तसतसे धर्म स्विकारणारे जसे मिळाले तसेच विरोध करणारे मुळ धर्माचे लोकही त्यांच्या विरोधात उभे ठाकले हे आपल्याला दुस-या तिस-या शतकानंतरच घडलेले दिसते. कारण अन्यत्र प्रचार होण्याचा काळ याच्या एक-दोन शतके आधीचा.
गुप्त काळात वैदिक धर्माला राजाश्रय मिळाला आणि त्यामुळे वैदिक धर्माचा तिसरा टप्पाही सुरु झाला. वैदिक धर्मात दक्षेण ते उत्तर भारतातील अनेक लोक दाखल होऊ लागल्याने स्मृत्यांतील बंधने सर्वांवर लादता येणे शक्य नव्हते. त्यामुळे श्रौत व स्मार्त असे दोन गट वैदिक धर्मात पडले तसेच पंचद्रविड व पंचगौड असे प्रादेशिक दोन विभेदही पडले. श्रौत हे वैदिक धर्माच्या अधिक निकटचे तर स्मार्त हे मुर्तीपुजक व अद्वैत सिद्धांतही मानणारे. आल्फ हिल्टेबिटल यांच्या मतेही वैदिक परंपरेत अवैदिक परंपरा मिसळुण स्मार्त शाखेचा उदय झाला. खरे तर अवैदिकांनी वैदिक धम स्विकारतांना आपल्याहे परंपरा तेवढ्याच ताकदीने कायम ठेवल्याने जी परिस्थिती निर्माण झाली त्यातुनच ही परंपरा निर्माण झाली. थोडक्यात स्मार्त ब्राह्मण हे सर्वात शेवटी धर्मांतरीत झालेले वैदिक होत. पण कर्मठ वैदिकांनी जी परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न केला त्यांन श्रौत ब्राह्मण असे म्हटले जावू लागले. हे ब्राह्मण वैदिकांची वेदपरंपरा व यज्ञविधान जपण्यात अग्रेसर राहिले. थोडक्यात मुळ वैदिक धर्म यांनी कायम ठेवला. अर्थातच श्रौत ब्राह्मण भारतात अत्यल्प असेच आहेत.
यावरुन एक बाब स्पष्ट होते व ती म्हणजे वैदिक धर्मात सर्वात आधी जे मुलभारतीय प्रवेशले त्यांनी हिरीरीने वैदिक धर्म परंपरा जपल्या. उत्तरकाळात जे वैदिक धर्मात आले त्यांनी वैदिक धर्म तर स्विकारला पण आपल्या अवैदिक परंपराही कायम ठेवल्या. त्यासाठी नवे तत्वज्ञान जन्माला घातले.
यामुळे एक बाब लक्षात घ्यावी लागते ती अशी कि भारतीय ब्राह्मण हे बाहेरचे आहेत या मान्यतेला काही अर्थ नाही. ब्राह्मण हे स्वत:च जवळपास साडेतिनशे जाती-पोटजातींत विखुरले असल्याने ते जातीसंस्थेचे निर्माते आहेत या मतातही तथ्य नाही. आज ब्राह्मणांत वर्णानुसार ते समान असले तरी वैदिक ब्राह्मण (म्हणजे जो यज्ञयाग करतो तो) श्रेष्ठ मानला जात मग दैवज्ञ कुटुंबांचे पौरोहित्य करणारे, ज्योतिषी, पंचाक्षरी व पुजारी अशी जातीय उतरंडही त्यांच्यात आहे. ब्राह्मणात देशभर जवळपास ३५० पोटजाती असून त्यांच्यातही उच्च-नीचतेचा दुराभिमान आहेच.
असे असले तरी वेदोक्त संस्कारांचे व वेदांवरचे अधिकार या सर्वच ब्राह्मणांनी मान्य केलेले असल्याने जरी अनेक हिंदू परंपरा ते त्यांचे वैदिकीकरण करत पाळत असले तरी त्यांचा धर्म मात्र हिंदू नसून वैदिकच ठरतो.