१९७९. मी एफ. वाय. बी. कोमला होतो. डा. अशोक वैद्य यांचा कंपाउंडर म्हणून काम करायचो. नियमित कोलेज कधे केले नाही. फक्त सेमिनार व परिक्षेपुरता जायचो. पाबळ (तेच मस्तानीचे) येथे रहायचो. कोलेज राजगुरुनगरला. एसटीचा पास ४० रुपयांत मिळायचा. तेवढे पैसे नसायचेच. त्यामुले ते कधी शक्य झाले नाही. सेमिनार-परिक्षेला वाळूच्या ट्रकने जायचो. डा. अशोक वैद्य यांचे एक मित्र होते पुण्याला. कलतारसिंग पंजाबी. त्यांच्याबरोबर एकदा पुण्यात आलो. त्यांच्या घरी गेलो. तेथे भेट झाली पुष्पा पंजाबीशी. तिचा नववीचा रिझल्ट आला होता. उत्साहाने दाखवत होती. मी प्रेमात पडलो.
कधी व्यक्त केले नाही. डायरी मात्र लिहू लागलो. पुण्याला मला एकटे येता येणे शक्यच नसायचे. पैसे कोठायत? गेलो तर वैद्यजींबरोबर. आम्ही गप्पा खूप मारायचो. त्या काळात मी रशियन कादंब-या अनेक वाचत असल्याने इंप्रेशन मारायला टोल्स्टाय ते शोलोखोव यांच्यावरच जास्त बोलायचो. कपडे म्हणाल तर पायजमा व छपरी शर्ट. ( त्या शर्टाचीही एक कहाणी आहे.) आपल्यातल्या न्यूनता माणूस दुस-या अंगाने भरुन काढायचा प्रयत्न करतो म्हणतात...मी माझी अक्कल पाजळायचा उद्योग केला.
ती दहावी पास झाली. तिला अकरावीला प्रवेश मिळावा म्हणून अनेक कोलेजांचे फोर्म रांगेत उभे राहून आणले. पण प्रयत्न होता सेंट मीराजचा. आणि लागला नंबर सेंट मिराजमद्ध्ये. कारण ती फक्त मुलींची शाळा-कोलेज वगैरे. किमान संभाव्य स्पर्धकांचा मी असा बालीश बंदोबस्त केला.
अजून तिला मी तिच्यावर प्रेम करतो हे माहित नव्हते. मी सांगायची हिंम्मत करणे शक्य नव्हते. वर्षामागून वर्षे गेली. मी एम. कोम. करायला पुण्यात आलो. आधी एका मराठी नंतर हिंदी पेपरमद्ध्ये काम करत शिकत होतो. पगार होता दिडशे रुपये. तेंव्हा खानावळ होती महिना २५० ते ३०० रुपयांची. एक वेळचीच खानावळ लावत महिना ५ रुपये भाड्याचे शनिवार वाड्याजवळील शिक्षकांच्या मुलांच्यासाठी असलेल्या होस्टेलमधे आधी आणि नंतर खुद्द दैनिकाच्याच कार्यालयात राहत होतो. डा. वैद्य पाबळलाच सुटल्याने तिच्या घरी जायला निमित्तही नव्हते. माझ्या मित्रांना पिडत तिच्या इमारतीखाली तासंतास उभा रहात ती दिसेल या आशेने उभा रहायचो.
एकदा तिच्या घरी जायची संधी मिळवली. माझ्या हाती त्या दिवशी माझी डायरी होती. घरी ती होती. तिची मम्मीही होती. (बाप महाखडूस) गप्पा मारत बसलो. तिने मला अचानक माझी डायरी मागितली. मी काही देईना. तिने घेतलीच. दोनचार पाने उलटली. मी आता जातो जीव कि नंतर असा बसलो. म्हटलो आता खा खेटर. या घरातला आजचा शेवटचा दिवस नि हे शेवटचे दर्शन. तिचा चेहरा गंभीर झाला. डायरी माझ्या हाती दिली. "तुज्याकडून ही अपेक्षा नव्हती..." ती म्हणाली. मी गारेगार झालो होतो. मी "येतो..." म्हणून जे सटकलो तो सटकलोच.
आता तिला माझ्या मनात काय आहे हे तर माहित होतेच. माझी आर्थिक स्थिती तर दरिद्र वस्त्रे घालून बसलेली. पण म्हणतात ना...दिल है कि मानता नहीं. मी तिला कोलेजच्या बाहेर तिष्ठत भेटायचा प्रयत्न करायचो...तर ती झुरळाकडे टाकावा तसा कटाक्ष टाके. तिच्या मैत्रिणींना माझी दया येई. माझी निष्ठा पाहून तर एक मैतरणी मला म्हणाली, असला लवर मला मिळायला हवा होता. (कोणता चित्रपट पाहून आली होती कोणासठाऊक!) ती काही त्या लायकीची मला वाटलीच नाही पण मी तिलाच माझा पोस्टवुमन बनवले. माझी प्रदिर्घ (तेवढी मी कथाही लिहित नाही) पत्रे तिच्या माध्यमातून तिला पाठवे. उत्तर कधी आले नाही. तिच्या वाढदिवसाला तर मी एकदा कोलेजच्या पत्त्यावर चक्क तार पाठवली. तिच्या मास्तरणीने तिला झाप झाप झापले हे मला नंतर समजले. पण मामला काही केल्या फिट होईना. उलट बिघडला.
सात वर्ष गेली. तोवर माझी काही पुस्तके प्रसिद्धही झाली होती. आवर्जुन धाकाकत्या हृदयाने मैत्रीणीमार्फत पाठवलीही होती. तिला त्याचे कसले कौतूक?
पण १९८६ साल पावलं. माझा प्री-थिसीस एका इंग्लंडमधील विद्यापीठाने स्विकारला आणि मला आशिया खंडातील धर्मांवर तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी निमंत्रित केलं. माझा जीव तर इकडे. मी कळवळून शेवटचं पत्र लिहिलं. "आता तरी हो म्हण...नाहीतर मी चाललो इंग्लंडला..." आणि काय चमत्कार....दुस-या दिवशीच मला उत्तर मिळाले. पहिले उत्तर!
झाले. इंग्लंड रद्द! ती भेटली बाहेर. हृदय तळहातावर ठेवून बोललो. तशी ती भावनिक नाही. पण त्या दिवशी तीही भावूक होती. मी अजून दरिद्रीच होतो. भविष्याची स्वप्ने दाखवायची माझी लायकीच नव्हती.
नंतर मी व्यवसायात पडलो...जाहिरात व्यवसायात. आणि पैशांचा माझ्याकडे ओघ सुरु झाला. भाड्याच्या सायकलने पुणे पालथे घालणारा मी चक्क एम-५० चा मालक झालो. नंतर फियाटही घेतली. (नंतर माझ्या आयुष्यात सगळ्या अत्याधुनिक कार्स येवून गेल्या) एम्प्रेस गार्डन हे आमचे संकेतस्थळ बनले. दर सोमवारी आम्ही भेटायचो. हा सोमवार एवढा मित्र-मैत्रीणींत गाजलेला कि अमिता नायडू "Waiting on Monday!" नांवाची कादंबरी लिहिन म्हणत होती.
१९८९ आले. मी तिला एम्प्रेस गार्डनमधुन तिच्या घराच्या जवळ कोप-यावर सोडायला आलो. कसे कोणास ठाऊक कलतारसिंग पंजाबींनी आम्हाला पाहिलं. काही बोलले नाहीत. घरी जाऊन पोरीवर जाळ काढला. ते तिला घेऊन दुस-या दिवशी माझ्या कार्यालयात रिक्षाने आले. प्रशांत पोखरकरांसोबत मी तेंव्हा चित्रपट पहायला गेलेलो. वाचलो. कारण महाराज सुरा बरोबर घेऊन आलेले.
पण नंतर वार्ता समजली. मी हतबुद्ध झालो. मी आमचे दादाजी उर्फ दिनेश गंगावणेंना कळवले. ते म्हणाले...आलोच! आम्ही भेटलो. आम्ही तिच्या घरावर धाड घालायचा निर्णय घेतला. त्याच सायंकाळी मी आणि दादाजी तिच्या घरात हजर. बापाने मला पाहिले आणि सन्नकण त्यांच्या मुलीच्या थोबाडीत वाजवली. काही चर्चा करावी अशी स्थिती नव्हती. मी राणीला (हे तिचे घरातील नांव) म्हणालो..."चल..."
एका सेकंदात ती बाहेर पडली. आम्हीही बाहेर पडलो. दार बंद करून बाहेरची कडी लावली. खाली आलो. दादाजींनी रिक्षा करुन दिली. सरळ चिखली गाठली. आईने आम्हा उभयतांना पाहिले. आया मनकवड्या. घरात घेतले. काही विचारत बसली नाही. दादा घरात आले...वेगळे वातावरण पाहून बालसुलभ प्रश्न विचारले...पंचांग काढले...म्हणाले...परवा आळंदीला जावून लग्न लावून टाकु.
तिचा जीव किती भांड्यात पडला मला माहित नाही...पण मला तर स्वर्ग जिंकलो असे झाले होते. खिशात पैसे नव्हते. पिंपरीला माझा क्लायंट होते. परमानंद झमतानी. त्यांना परिस्थिती सांगितली. त्यांनी ड्रावरमधून एक सेकंदात ३,००० रुपये काढून दिले. खरे तर एक मराठी पोरगा सिंधी मुलीशी लग्न करतोय म्हटल्यावर त्यांनी, एकुणातील जातीय/प्रांतवादी स्थिती पाहता मदत नसती केली तरी वाईट वाटले नसते. पण केली. मी घरी येईपर्यंत माझ्या बहिणीचेही पिनाककांत दत्त यांच्याबरोबर प्रलंबित असलेले लग्न आळंदीलाच करायचे ठरले होते.
दुधात साखर.
आम्ही घरचे पाचसहा आणि नियोजित वधू-वर एका मालवाहतूक टेंपोत बसून-लटकून आळंदीला पोहोचलो. कोणत्यातरी देवळात आमचे लग्न लागले. दोन हजार रुपये खर्च आला. (दोन लग्नांचा, म्हणजे हजारी एक लग्न पडले.) सायंकाळी आम्ही नव्या भावनिक जगात जायला, नवी आव्हाने घ्यायला सज्ज झालो.
सासरे नंतर मुलगी झाल्यानंतरसुद्धा भेटायला आले नाहीत. सासू तर आईच. मी नसतांना लेकीला भेटून जायची. सास-यांना मी भेटलो लग्नानंतर तब्बल पंधरा वर्षांनंतर.
झमतानींना मी ३००० रुपये परत करू शकलो नाही...म्हणजे त्यांनी घेतलेच नाहीत. त्यांचा आणि माझा वाढदिवस एकाच दिवशी. त्यांचा फोन आला नाही असा एक वाढदिवस गेला नाही.
हे का सांगत आहे?
प्रेम ही शक्ती आहे. लग्नात तुम्ही किती उधळता याने तुमचे प्रेम किंवा प्रतिष्ठा ठरत नाही. प्रतिष्ठा ही नेक जगूनच मिळते. एकमेकांचे होऊनच मिळते. लग्न करतो म्हणजे आपण एकमेकांना वचन देतो...समाजासमोर! ते वैभव दाखवण्यासाठी नाही. निष्ठा आणि समर्पण दाखवण्यासाठी! मी नंतर चांगलाच वागलो असे नाही. मी रुढ सामाजिक संकेत धिडकारले आणि प्रेमाचे अद्वितीय आविष्कार भोगले...जगलो....पण तेही निष्ठेने,..सवंगपणे नाही.
लग्नात तुम्ही किती खर्च करता हे महत्वाचे नाही....तुम्हाला प्रेम करता येते का, निस्सीम मन:पूत जगता येते का...
हा खरा प्रश्न आहे!
very inspiring sanjayji. still feel the taste of the food babhi prepared for us. made for each other !!! going great !!1 lot more to come !!!
ReplyDeleteखूपच छान संजय जी...
ReplyDeleteSo beautiful !
ReplyDeleteCheers,
Niraj.
Nice Story Sir ...!
ReplyDelete