Saturday, January 9, 2016

विरोध नेमका कशाचा हवा?

खेद...विरोध नेमका कशाचा हवा?
गतकाळात रमवत, त्याच चश्म्यातून भविष्याकडे पाहत आपल्या अनुयायांना पुढे नेण्याची स्वप्ने दाखवत मागेच ओढत राहणा-या विचारधारांचा.
यातून प्रगतीही होत नाही आणि मानसिकता पुराणपंथी बनत जाते. मानवी स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय हे ते समजुच देत नाहीत कारण त्यांना अबौद्धिक गुलामच हवे असतात. ते अनुयायांचे असे काही ब्रेन वाशिंग करुन टाकतात कि त्यांची स्वतंत्र विचार करण्याची प्रेरणाच नष्ट होते.
किंबहुना विचार करायचीच त्यांना भिती वाटू लागते.
असे एका साच्यात घडलेले लोक काही नवनिर्मिती करू शकतील याची सुतराम शक्यता नसते. ते कधी स्वातंत्र्याचा मुक्त श्वास घेऊ शकतील याचीही संभावना नसते.
आणि इतरांनीही स्वतंत्र विचार केलेला त्यांना आवडत नाही. किंबहुना इतरांचेही स्वातंत्र्य बंदिस्त करत त्यांनाही आपल्या झापडबंद अविचारशील विचारधारेत आणण्याचा त्यांचा जबरदस्त प्रयत्न असतो.
येत नसतील तर त्यांना संपवुनच टाकायचे हेच काय ते धोरण असते.
कारण ते भेकड असतात. त्यांना विचारांचीच भिती वाटते, प्रकाशाला घाबरणा-या दिवाभितांसारखी.
ते प्रकाशावरच तुटून पडू पाहतात.
खेद या अविचा-यांचा असायला हवा. विरोधही. कारण ते इतरांनाच घातक आहेत म्हणून नव्हे तर स्वत:च्या अनुयायांसाठी तर जास्तच घातक आहेत.
रक्तशोषक किड्यांप्रमाणे ते आपल्या अनुयायांचा आत्मा आधी शोषतात मग नंतर बाह्य कक्षेतील माणसांवरही तेच प्रयोग करायला सिद्ध होतात.
अनुयायांनीही किमान झापडबंद होऊ नये असा प्रयत्न करायला हवा. स्वत:चे स्वातंत्र्य म्हणजे पारतंत्र्यातील स्वातंत्र्य नव्हे हे समजावून घ्यायला हवे.
जगात आजवर अगणित अशा राज्यव्यवस्था, हुकुमशहा, संघटना झाल्या आहेत, मानवी दुर्दैव कायम असेल तर पुढेही होत राहतील.
यात माणसाचे माणुसपण कोठे राहिले?
आमचा विरोध अशा माणुसपणाला हिरावणा-या अविचारी, एककल्ली, एका साच्यातले माणसे बनवण्याचा अहर्निश प्रयत्न करत राहत, खोट्या आशा, खोटी स्वप्ने आणि खोटे शत्रू समोर ठेवत हिंस्त्र प्रेरणा देत माणसाने माणसांनाच फसवत राहणारी व्यवस्था आणण्याच्या प्रयत्नांना असला पाहिजे.
आम्हाला अखिल मानवांचे स्वातंत्र्य हवे आहे.

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...