Saturday, January 21, 2017

आव्हाने स्वीकारतांना!

Image result for challenges of future

अनेकदा असे म्हटले जाते कि आजकाल तंत्रज्ञानाचा वेग अचाट वाढला आहे. एक व्हर्जन येते न येते तोच त्याहीपेक्षा प्रगत व्हर्जन बाजारात हजरच असते. हे खरे आहे कि मानवी जीवनाला सुखद व्हावे यासाठी तंत्रज्ञाने नवनवीन संशोधन करत प्रगत होतात व त्यामुळे नवनवीन उत्पादने आपल्यासाठी आणत असतात. तंत्रज्ञानाचा वेग अधिक नसून ते शिकण्याचा आपला वेग कमी आहे हेही एक वास्तव आहे हे मात्र आम्ही विसरत असतो. शिवाय तंत्रज्ञानांची गरज कितपत आहे याचाही अंदाज आम्हाला कधीच येत नाही. कारण ते ठरवणारी साधने नेहमीच बाह्य असतात. आम्ही तंत्रज्ञान वापरू अथवा न वापरू, ती शिकण्यात आम्हाला रस असतो काय, तेवढी जिज्ञासा असते काय हा प्रश्न मात्र अवश्य असतो.

मागील लेखात मी यंत्रमानव व कृत्रीम बुद्धीच्या आव्हानाबाबत लिहिले होते. हे खरे आहे कि भविष्यात अगदी शेतीची कामेही यंत्रमानव करतील. यंत्रमानवीकरणाची हीच गती कायम राहिली तर येत्या पंधरा-वीस वर्षात आज आहे तिच्या दहा टक्केही श्रमिकांची गरज राहणार नाही. चीनमद्ध्ये उपसंपादकाचे काम अत्यंत वेगात व अधिक अचूक करु शकतील अशी कृत्रीम बुद्धीमत्ता वापरण्याचा प्रयोग नुकताच झाला. तो यशस्वीही ठरला. म्हणजे कल्पक, जिज्ञासू , अभ्यासू व बौद्धिक मेहनत घेऊ शकणा-यांचीच फक्त भविष्यात गरज असेल काय हा प्रश्न आपल्यासमोर आजच उभा ठाकला आहे व तशी स्थिती निर्माण झालीच तर तिला कसे तोंड द्यायचे याचीही खबरबात आपल्याला नाही हे वास्तव आहे. आज जी स्मार्ट मशिन्स निर्माण होताहेत त्यांचा सरासरी आयक्यू १०० एवढा आहे. तंत्रज्ञानातील प्रगती याच वेगाने सुरु राहिली तर पुढील पंचविस वर्षात अमेरिकन नागरिकांच्या सरासरी आयक्यूच्या ९०% पेक्षा जास्त आयक्यू असणारी कृत्रीम बुद्धीमत्ता तयार होईल. म्हणजेच एकट्या अमेरिकेतील पाच कोटी रोजगार जातील असा तज्ञांचा होरा आहे. जगात काय होईल याची कल्पना केलेली बरी.

या स्मार्ट मशिन्स, म्हणजे कृत्रीम बुद्धीमत्ता असलेले यंत्र वा संगणक मानव काय काय करू शकतील? काही उदाहरणे आपण येथे अवश्य पाहुयात. श्रमिकांची जागा घेणे हा एक भाग झाला. तेथे अधिक बुद्धीमत्तेची गरज नसते. आजकाल फोकल्यंड वगैरे ब-यापैकी श्रमिकांची जागा घेतच आहेत व त्यामुळे रोजगार कमी होतोय असेही फारसे दिसत नाही. पण सध्या मुळात श्रमिकांचीच कमतरता जगभर भेडसावते आहे. त्यामुळे त्यांचा परिणाम न जाणवता उलट काम वेगाने होऊ लागले आहे असे एकीकडे चित्र आहे. पण ही झाली आजची अवस्था. मनुष्याची गरज असते नियंत्रण ठेवण्यासाठी व स्थिती पाहून त्वरित निर्णय घेण्यासाठी. 

पण आता तंत्रज्ञान फार पुढे जाते आहे. अगदी वैद्यकिय क्षेत्रातही कृत्रीम बुद्धीमत्ता वापरात येवू लागली आहे. उदाहरणार्थ जॉन्सन एंड जॉन्सन या कंपनीने २०१३ मध्येच सिड्यसिस मशीन बनवली आहे. आता कोणत्याही भूलतज्ञाची गरज राहणार नाही अशा पद्धतीने हे वैद्यकिय मशीन काम करते. रेडिओलोजीसारख्या अत्यंत तज्ञतेची गरज असलेल्या क्षेत्रातही संगणकीय कृत्रीम बुद्धीमत्ता डायग्नोसिस करण्यासाठी वापरता येईल असे संशोधन पुर्ण झाले आहे. मानसशास्त्रासारख्या क्षेत्रातही मानसिक समस्यांचे विश्लेशन नजिकच्याच काळात संगणक करू लागतील अशी चिन्हे आहेत. म्हणजे भविष्यात जनरल फिजिशियनची तर मुळीच गरज राहणार नाही अशी ही चिन्हे नाहीत काय?

थोडक्यात हे होणारच आहे. यावर काही नीतिविदांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. कृत्रीम बुद्धीमत्ता कविता करु शकेल काय? तत्वज्ञानाची स्वतंत्र निर्मिती करू शकेल काय? मानवी प्रतिष्ठा यामुळे लयाला जावून उलट एक विलक्षण संघर्ष भुतलावर माजणार नाही काय? यामुळे तिसरे महायुद्ध होईल काय? मला वाटते या प्रश्नांपेक्षा महत्वाचे हे आहे कि मानवाचेच नेमके काय होईल. भस्मासुरासारखी मानवजातीची अवस्था होऊ शकेल असे अनेक सायंस फिक्शनमद्ध्ये दाखवले जाते. अनेक भयपटही या थीमवर निर्माण झालेत. पण एक बाब येथे लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे एकीकडे रोजगार जातील हे जितके खरे आहे तितकेच अनेक रोजगारही उपलब्ध होणार आहेत. फक्त रोजगाराचे स्वरूप मात्र पुर्णतया बदललेले असेल. मानवाकडून अपेक्षित असलेले कामही तितकेच बदललेले असेल. कारण मानवाच्या गरजाही बदललेल्या असतील. अर्थव्यवस्था चालते ती मानवी गरजांवर. गरजा सातत्याने बदलत आलेल्या आहेत. अगदी जागतिकीकरणाआधी आपल्या ज्या गरजा होत्या त्यात व आजच्या गरजांत जमीन अस्मानाचा फरक पडलेला आहे. 

खरे म्हणजे मानवी गरजांचा वेग भागवायला तंत्रज्ञान मागुन पळत असते. किंवा अनेक गरजा कृत्रीमरित्याच अशा उत्पन्न केल्या जातात कि सगळ्यांना ती जणू आपली नैसर्गिक गरजच आहे असे वाटू लागते. त्यामुळे त्यावेळीस उपलब्ध असलेले उच्च आयक्युचे कृत्रीम बुद्धीधारी संगणक वा यंत्रमानवही जी कामे करू शकणार नाहीत त्यांची निर्मिती होईल हे ओघानेच आले. किंबहुना अर्थव्यवस्थाच एक असे नवे रुप घेईल जे आजच्या अर्थव्यवस्थांपेक्षा संपुर्ण वेगळे असेल. रोजगार हा शब्दही कदाचित मानवी शब्दकोशातुन हद्दपार होइल. कसा यावरही आपण पुढे विचार करणारच आहोत. पण येथे लक्षात घ्यायचा प्रश्न असा कि आम्ही भविष्यातील जीवनाबाबत किती सजग आहोत? त्यासाठीच नव्हे तर ज्या क्रांतीकडे जग निघालेलेच आहे, त्यात आम्ही कोणती भर घालू शकतो? आम्ही एका तरी क्षेत्रात कृत्रीम बुद्धीमत्ता व बुद्धीमान यंत्रमानव निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न करत आहोत काय? अशा यंत्रमानवांचे कारखाने काढत जगाला पुरवठा करण्याचा विचार तरी करत आहोत काय? 

दुस-याच भागात मी म्हटल्याप्रमाणे मुळात आमची शिक्षण व्यवस्थाच इतकी बंदिस्त आणि आदिम आहे कि त्यापुढे गुरुकुलांतील शिक्षण बरे वाटावे. मुळात आमच्या शिक्षणपद्धतीला मुळात कसल्या शैक्षणिक तत्वज्ञानाचा आधार नाही. व्यावहारिक/जीवन स्पर्धेत अडकलेले पालक आपले अपत्य अमुकच का शिकावे तमुक का नाही या विचारांनी नव्हे तर आपले अपत्य काय शिकले तर त्याला व म्हणुन पालकांना भविष्यात व्यावहारिक फायदा होईल त्याचाच विचार करतात आणि शिक्षणपद्धती त्याला साथ देते. नव्हे त्या विचारसरण्यांना प्रोत्साहन देते. बरे, व्यावहारिक फायदा म्हणजे तरी काय? तर आज ज्या क्षेत्रात मागणी आहे त्यातच पोरा-पोरींना कसेबसे ढकलत त्यांना एकदाचे एखाद्या नोकरीला चिकटवायचे. हे झाले कि त्यांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटते. दशकापुर्वी आयटी क्षेत्रात मोठी मागणी होती म्हणून कोणीही त्या क्षेत्रात शिक्षण मिळवायला धडपडू लागले होते. फायदा झाला तो शिकवणा-या संस्थांचा. आज या क्षेत्रातील मागणी-पुरवठा पार बदलून गेला आहे हे जीवंत उदाहरण आहे. अनेक क्षेत्रांचे तसे झाले आहे. 

आपल्याला भविष्य हे नेहमीच अनिश्चित असते आणि आज जे व्यवहार्य शिक्षण वाटते ते उद्या तसे राहणार नाही याचे भान क्वचितच येते. पाल्याला "योग्य ते सर्व काही बदलत्या स्थितीत शिकू शकेल...सर्व स्थितीला तोंड देईल..." असे मुलभुत शिक्षण द्यायला मात्र आम्ही तयार नाही. पाल्याची नैसर्गिक बुद्धीमत्ता कशी फुलेल, बहरेल यासाठी योग्य वातावरण व शिक्षण पद्धती हवी हे आम्हाला समजत नाही. आम्ही किती फी भरतो त्यावर शिक्षणसंस्थांचा दर्जा ठरवतो. पण मुलात खोट अभ्यासक्रमात आहे...परिक्षा पद्धतीत आहे हे मात्र कधी समजावून घेत नाही.

शिक्षणाचेही मुलभूत तत्वज्ञान असते याचा विसर सर्व व्यवस्थेला पडला आहे. त्यातुनच बनचुकेगिरी, बनवेगिरी व शैक्षणिक व्यभिचाराला उत आला आहे. आम्ही शिक्षणाच्या निमित्ताने शिक्षण देणा-यांना व्यभिचारी व्यापारी बनायला प्रोत्साहन देत पुढील पिढ्यांचे पंख छाटुन टाकण्याच्या उद्योगाला हातभार लावत आहोत हे पालकांच्या लक्षात येईल तो सुदिन! आम्हाला भविष्यातील आव्हानांचा वेध घेत त्या आव्हानांवर स्वार होणारी पिढी घडवायची आहे आणि त्याचा मार्ग आम्ही ही पिढी कशी घडवायला हातभार लावतो यावर अवलंबून आहे. 

(Article published in dainik Sanchar)

1 comment:

  1. नेहमीच्या पध्दतीने जबाबदारीनेच लिहिलेला लेख.शिक्षण पध्दतीच्या वास्तवाचा चांगला उल्लेख केलेला आहे. मात्र सरांनी आपल्या राजकीय अजेंडयावर हा विषय इतर प्रश्नांसोबत प्राधान्याने घ्यायला हवा. त्यासाठी मोठा सार्वजनिक पाठींबा एकमत /आंदोलन करावे लागेल. समाजातील नव्या उमेदीचे विचारवंत,विद्यापीठातील तज्ञ,सामान्य जनता,व्यापारी, उदयोग व्यवसायी,सर्वांचे तर्कशुध्द गतिमान /काळाला धरुन तसेच प्रामाणिक मार्गदर्शन होणे अपेक्षित आहे. एक Civic sense सारखा विषय जो रोजच्या जगण्यावागण्याव्यवहार संबधी,मनासंबधी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक/सवय करुन घेईल असा विचाराधीन हवा. असे बरेच अनेकजण अनेक पध्दती सुचवू शकतात. संजय सर सतत इतिहास संशोधनासारख्या सतत जुन्याचा नव्याने शोध घेतांना सद्यस्थितीच्या सतत नव्याने विचार करण्याच्या पध्दतीने विचार करतात हे अतिशय प्रसन्नतेकडे नेणारे आम्हा वाचकांच्या दृष्टीने एक मेजवानीच ठरत असते. एखाद्यावेळेस प्राचिन भारत किंवा नंतरच्या भारतातील वेगवेगळया खाद्य संस्कृतीचेही त्यांच्याकडून समन्वयवादी दिशा दिग्दर्शन/मार्गदर्शन अपेक्षित आहे.

    ReplyDelete

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...