Wednesday, December 12, 2018

रक्त हिटलरचे


Image result for rakta hitlarache storytel


हिटलर हे जगाच्या इतिहासातील सर्वात मोठे खलपात्र आहे. असे असले तरी तो ब-याच लोकांचा नायकही आहे. विसाव्या शतकाचा प्रथमार्ध गाजवला तो त्यानेच. त्याच्या समोर तत्कालीन अनेक खलपुरुष झाकोळले गेले. ज्याने दोन अणुबॉम्ब टाकुन क्षणार्धात दोन-अडिच लाख माणसं मारुन टाकनारा व किरणोत्सर्गाने लक्षावधी लोकांचे जीवन होरपळून काढणरा क्रुरकर्मा, जो ट्रुमन, त्याबद्दल मात्र सहसा कोणी कटुतेने बोलतांना तुम्हाला दिसणार नाहीत. क्रौर्याचा इतिहास जवळपास सर्वच राष्ट्रांनी जपला आहे. असे असले तरी कशाला क्रौर्य म्हणायचे आणि कशाला नाही हे अत्यंत सोयिने ठरवले जाते. क्रौर्य हे कोणाचेही वाइटच असते म्हणून सर्वच क्रुरांचा निषेध केला पाहिजे हे माणसाला पटत नाही हेही अजबच असले तरी मानवी सत्य आहे.

असो. कादंबरीकार म्हणून मला द्वितीय महायुद्धाचा काळ हा आव्हानात्मक वाटत असला तरी मी त्यावर लिहिले नाही. पण एकदा हिटलरचा विचार करीत असता सहज मनात कल्पना आली, या हिटलरला मुलगा असता, त्याला वाचवुन एकनिष्ठ नाझींनी त्याला दुर कोठेतरी अज्ञात ठिकाणी हलवले असते तर तो मुलगा मोठा झाल्यावर त्याने काय केले असते?

इव्हा ब्राउन ही त्याची प्रेयसी होती हे सर्वज्ञात आहे. आत्महत्या करण्याआधी त्यांनी लग्नही केले होते असे मानले जाते. या इव्हानेच त्या मुलाला जन्म देताच मुलाला सुरक्षितपणे हिटलरने अन्यत्र हलवले असणे या कल्पनेत अशक्य नव्हते. मी सर्व संभावनांवर विचार करु लागलो. न्युरेंबर्ग खटल्याचे काही कागदपत्रही तपासले. अनेक नाझी नेते अर्जेंटिनासारख्या देशात पळून गेले होते. खटल्यात ते कधीही समोर आले नव्हते. मोसादने काहींना शोधुन ठार मारले असले तरी काही अजुनही अज्ञातवासातच होते. मार्टिन बोरमान हा असाच एक हिटलरचा हस्तक. त्याचीही माहिती काढली. त्यातुन ही कथा फुलारत गेली. तिचेच नांव "रक्त हिटलरचे"

या कादंबरीचा नायक अर्थातच समीर चक्रवर्ती. त्यावेळीस जगात अजब घटना घडत होत्या. जर्मनीला दुभागणारी भिंत पाडली गेली होती. नवनाझीवाद जर्मनीत फोफावू लागला होता. हे वर्तमानातले सत्य मला कादंबरीची विश्वसनीय पार्श्वभुमी तयार करतांना कामाला आले. कादंबरीत मी याच काळात रॅम्से द टेक्सन हे विचित्र नांव धारण करणा-या आंतरराष्ट्रीय माफियाचा उदय दाखवला. त्याचे खरे हेतु गुन्हेगारीचे दिसत नाहीत हे तो जेंव्हा क्युबात झालेल्या अटकेनंतरही पलायन करतो तेंव्हा इंटरपोलच्या लक्षात येते. फ्रांसमध्ये समीर चक्रवर्तीला पाचारण करण्यात येते. डेव्हन नांवाचा अधिकारी टेक्सनला शोधुन ठार मारायची कामगिरी समीरला देतो. समीर अथक संघर्षातुन, रहस्याच्या गुंत्यातुन शेवटी टेक्सनला शोधतो. यातुन आंतरराष्ट्रीय राजकारण, गुन्हेगारी आणि समाजव्यवस्थेचेही गुंतागुंतीचे बनलेले धागेदोरे उलगडत राहतात. समीर या प्रक्रियेत त्यालाच नव्हे तर त्याच्या जन्मरहस्यालाही शोधतो. पण तो त्याला ठार मारत नाही. त्याला सुभाषबाबु आठवतात आणि तो त्याला पोलिसांहाती सोपवतो.

थरार कादंबरी लिहिने अनेकांना सोपे वाटते, पण ते तसे नसते. वास्तव आणि कल्पनांचा मेळ अशा कादंब-यांत घालतांना सर्वात अधिक कष्ट घ्यावे लागतात. ही कादंबरी खूप गाजली. खूप जणांनी तिची तुलना "सेवन्थ सिक्रेट"शीही केली. सेवन्थ सिक्रेटमध्ये हिटलरने आत्महत्या केलेलीच नव्हती, तो नंतरही जीवंतच होता असे दाखवून एक रहस्य गुंफले होते. ती कादंबरी उत्कृष्ठच होती यात वादच नाही. पण हिटलरला मुलगा असणे व त्याने आधुनिक काळात नवनाझीवादाचे प्रवर्तन करणे वास्तवाशी जवळीक साधणारी कल्पना होती. कारण जर्मनीत तेंव्हा तसे घडतही होते.

रहस्य, थरार, जर्मनी, फ्रांस ते अर्जेंटिनापर्यंत पसरलेले या कथेचे धागेदोरे आणि त्यातील हिटलरपुत्राचे थर्ड राईश पुन्ह उभारण्याचे स्वप्न या भोवती फिरणारी ही कादंबरी. या कादंबरीने मला मराठीतील पहिला आंतरराष्ट्रीय थरारकादंबरीकार होण्याची संधीही मिळाली. या कादंबरीच्या आठ आवृत्या झाल्या.

आता ही कादंबरी श्राव्य माध्यमात जागतिक पातळीवरच्या स्टोरीटेल या स्विडीश प्रकाशन संस्थेतर्फे प्रसिद्ध झाली आहे. समीर चक्रवर्ती हा खरा भारतीय महानायक त्यामुळे जगभरच्या थरारप्रेमींना पुन्हा भेटतो आहे. लोकप्रिय होतो आहे. हा थरार ऐकण्यासाठी https://www.storytel.com/in/en/books/116434-RAKTA-HITLERCHE या लिंकला भेट द्या.

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...