Saturday, December 1, 2018

हिंदू आणि वैदिक धर्मेतिहासाची धाडसी मांडणी



हिंदू आणि वैदिक धर्मेतिहासाची धाडसी मांडणी
संजय क्षीरसागर...


'हिंदू धर्म आणि वैदिक धर्माचा इतिहास' हे आजवरच्या सांस्कृतिक संघर्षाच्या मांडणींना छेद देत नवे आकलन धाडसाने मांडणारे संजय सोनवणींचे नवे संशोधनात्मक पुस्तक. या पुस्तकाने भारतीय धर्मासंदर्भात आजवर केल्या गेलेल्या ब्राह्मणी व बहुजनीय मांडणीलाही सर्वस्वी नाकारले आहे. पण ही नुसती नकारघंटा नसून आपला सिद्धांत मांडतांना त्यांनी संशोधकीय शिस्त वापरत पुरातन काळापासून ते अगदी २०१६ पर्यंत झालेल्या संशोधनांतून समोर आलेल्या पुराव्यांकडे चिकित्सक दृष्टीने पाहिले आहे. या पुस्तकाचा आवाका फार मोठा असून त्यांनी अभिजन म्हणवणाऱ्यांचा वैदिक धर्म, तर बहुजन म्हणवणाऱ्यांचा हिंदू धर्म अशी विभागणी करत आजवरच्या सांस्कृतिक संघर्षाला वेगळेच परिमाण दिले आहे. असे करताना त्यांनी पुराव्यांचे डोंगर उभे केले असल्याने ही मांडणी फेटाळता येणेही तेवढे सोपे नाही. आजवर ब्राह्मण-ब्राह्मणेतर ते आर्य-अनार्य हा भेद केंद्रस्थानी घेत संस्कृतीसंघर्ष मांडला गेला. त्यात आक्रमक ब्राह्मण किंवा आर्य हे श्रेष्ठच आहेत आणि त्यांनी अनार्यांना किंवा बहुजनांना अन्याय्य वागणूक दिली, त्यांच्यावर जातिसंस्था, तर काहींवर अस्पृश्यता लादली हे महत्त्वाचे गृहीतक होते. महाराष्ट्रातही हा वाद गेली दीडेकशे वर्ष धुमसत आहे. या वादाचे समाधानकारक निवारण अद्यापही होऊ शकलेले नाही हे एक वास्तव आहे. या वादावर एक तर कायमचा पडदा पडण्याची अथवा नवीनच संघर्ष उद्भवण्याची शक्यता या पुस्तकामुळे निर्माण झाली आहे.

वेद हेच आपल्या धर्माचे मूलस्रोत आहेत असे मानतात आणि जे, वैदिक संस्कार करवून घेतात ते वैदिक धर्माचे लोक असून, सिंधू संस्कृतीपासून जे शिव-शक्तिप्रधान व आगम/तंत्राधारित प्रतिमापूजेचा धर्म पाळतात ते हिंदू धर्माचे लोक आहेत हे मुख्य सूत्र या पुस्तकात असंख्य पुराव्यांच्या परिप्रेक्ष्यात मांडले गेले आहे. ब्राह्मण-ब्राह्मणेतर, आर्य-अनार्य अथवा अभिजन-बहुजन या भेदात्मक जाणिवा आजवरच्या संस्कृती संघर्षामागे असल्या, तरी आजवर सर्व विद्वानांनी दोन्ही समाजधारांना 'हिंदू' या एकाच धर्माचे असे गृहीत धरले होते. जो संघर्ष होता तो अभिजनांनी वा वैदिक आर्यांनी बहुजन अथवा अनार्यांवर केलेल्या अन्यायाबाबत. त्याच्या विरोधात अनेक सामाजिक चळवळी झाल्या व आजही होत आहेत. जातिअंताच्या चळवळीही सुरु आहेत, पण सोनवणींनी आपल्या पुस्तकात या संघर्षामागील दोन्ही पक्षांची जी गृहीतके आहेत त्यांचा पाया उखडून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

प्रस्तुत पुस्तकात त्यांनी वैदिक आणि हिंदू हे दोन्ही धर्म स्वतंत्र असल्याचे सिद्ध करण्यासाठी जवळपास साडेतीनशे संदर्भ दिले आहेत. आतापर्यंत सामोरा न आलेला हिंदू अर्थव्यवस्थेचा इतिहासही सिंधुकाळापासूनच्या श्रेणी, कुल व गणसंस्थेच्या माध्यमातून समोर आणला आहे. या संस्थांचे उत्थान व पतन यात हिंदुधर्माचा उत्कर्ष व ऱ्हास कसा होत गेला व अंततोगत्वा हिंदुधर्म वैदिक तत्त्वज्ञानाच्या मायाजालात कसा अडकत गेला, याचे विदारक दर्शन या पुतकात प्रथमच झाले असून वैदिक धर्माला राजाश्रय देणारा गुप्तकाळ वैदिकांसाठी सुवर्णकाळ असला तरी हिंदुंच्या आर्थिक पडझडीला हा काळ कसा कारणीभूत झाला याचे विवेचन सोनवणींनी करुन भारताच्या अर्थेतिहासाकडे व म्हणूनच समाजेतिहासाकडेही पाहायची नवी दृष्टी दिली आहे.

नवनवे पुरावे समोर येत असतानाही विद्वानांनी एकोणिसाव्या शतकातील आर्य गृहीतकावर आधारित आकलन व इतिहासाच्या मांडणीत दुरुस्त्या न केल्याने काय गोंधळ माजले याचेही साधार विवेचन या पुस्तकात आहे. अगदी भारत ते असिरियापर्यंत पोहोचलेल्या असुर संस्कृतीचे प्रादेशिक भेद लक्षात न घेतले गेल्याने ऋग्वेद व ब्राह्मण साहित्यातील देवासुर नेमके कोठले आणि हिरण्याक्षापासून सुरु होणारे असुर नेमके कोठले याचा वेध न घेताच वर्चस्वतावादी आणि त्याला विरोध करण्यासाठी बहुजनीयांची त्याच्या अगदी उलट म्हणजे न्यूनगंडात्मक रडवी मांडणी केली गेल्याने दोन्ही पक्षांच्या हातून सत्य सुटले असा सोनवणींचा दावा आहे.

हिंदू धर्माचा उगम सिंधुकाळापर्यंत पाच हजार वर्षं मागे जातो. वैदिक धर्म हा अफगाणिस्तानातील हेल्मंड (हरहवैती) नदीच्या प्रांतात स्थापन झाला तो सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी. अवेस्ताही त्याच काळात रचला जात होता. जरथुस्ट्राचा धर्म आणि वैदिकांच्या धर्मात संघर्ष झाला. त्यात तीनेक हजार वर्षांपूर्वी जरथुष्ट्री (पारशी) धर्माचे सामर्थ्य वाढल्याने काही वैदिकांना विदेघ माथवाच्या नेतृत्वाखाली मायभूमी सोडत सिंधु नदीच्या खोऱ्यात शुद्र टोळीच्या राज्यात आश्रय घ्यावा लागला. तेथे स्थिरस्थावर झाल्यानंतर वैदिक धर्माचा प्रसार करण्याचे काम सुरु झाले. काही हिंदुंनी या धर्मात प्रवेशही केला असला, तरी बव्हंशी लोक पुरातन धर्माशीच नाळ टिकवून राहिले. भारतातले आजचे बहुतेक वैदिक हे युरेशियन किंवा कथित आर्य रक्ताचे नसून धर्मांतरित आहेत, असाही सिद्धांत त्यांनी उपलब्ध पुराव्यांनिशी मांडला आहे.

ब्रिटिशकाळात केवळ वैदिक धर्मीयांशीच अधिक परिचित झालेल्या युरोपियन विद्वानांनी वैदिक साहित्यातच हिंदुंचाही इतिहास शोधायचा प्रयत्न केला आणि त्यातून जे नवे सिद्धांतन आले ते हिंदुंनाच कसे मारक ठरले, याचेही विवेचन सोनवणींनी हिंदु कोड निर्मितीच्या इतिहासातून स्पष्ट केले आहे.

सोनवणी हे रुढार्थाने विद्रोही संशोधक नाहीत. त्यामुळे त्यांच्या लेखनात आक्रस्ताळेपणा अथवा कसलाही अभिनिवेश कोठेही डोकावत नाही. त्यांनी ब्राह्मणी (त्यांच्या भाषेत वैदिक) मांडणी जशी नाकारली आहे, तशीच आजवरची बहुजनीय मांडणीही नाकारली आहे, पण त्यामागे केवळ नाकारायचे म्हणून नाकारायचे असा दृष्टिकोन या पुस्तकात दिसत नाही, तर पुरावे काय सांगतात व पूर्वीचे आकलन कसे दूषित आहे, हे तर्कावर पटवून देण्याचा प्रयत्न ते करतात. त्यासाठी त्यांनी जवळपास सर्व ज्ञानशाखांचा उपयोग केला आहे. संदर्भांसाठी ते केवळ वैदिक साहित्यावर विसंबून नाहीत, तर प्राकृत साहित्य, शिलालेख, नाणकीय पुरावे ते अवेस्ता आणि असिरियन ते इजिप्शियन पुरातन साहित्याचा आधार घेतात.

हिंदुंना (म्हणजेच बहुजनांना) वैदिक धर्माच्या प्रभावातून स्वतंत्र करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यांना त्यांची स्वतंत्र वाट दाखवत त्यांचा स्वतंत्र इतिहास सांगण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे हिंदुंत आत्मभान येत वैदिक प्रभाव झुगारता येईल व सामाजिक संघर्षाला पूर्णविराम मिळेल अशी सोनवणींची कल्पना असू शकते.

(महाराष्ट्र टाईम्स (संवाद) मध्ये प्रकाशित)

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...