Tuesday, June 29, 2021

अनिश्चिततेचे तत्व आणि ज्योतिषशास्त्र

 अनिश्चिततेचे तत्व आणि ज्योतिषशास्त्र


अनिश्चिततेचे तत्व जसे सूक्ष्मयामिकीला कवटाळून बसले आहे त्याहीपेक्षा जीवनाला त्याने जास्त ग्रासून टाकले आहे. म्हणजे अनिश्चिततेच्या हेलकाव्यांवर आपले जीवन झुलत असते. पुढच्या क्षणी काय होईल याचे भाकीत अगदी योजनाबद्ध कृती केली तरीही वर्तवता येणे अशक्य असते. मुळात जीही काही कृती केली ती जे परीणाम घडवते ती स्थितीच अनिश्चित आणि प्रति क्षणी बदलणारी असते त्यामुळे परिणामही वेगवेगळी रुपे घेतात आणि अपेक्षित रूपे मात्र कवेत येतच नाहीत. साकार होतच नाहीत. आणि काही वेळा कृतीचे अपेक्षित परिणाम दिसतात हे खरे असले तरी ते अपेक्षित परिणाम पुन्हा अनपेक्षित शक्यतांना जन्म देतात हेही आपल्या अनुभवाला येत असते. एकुणातच अनपेक्षितता आपले जीवन व्यापते. पण अनपेक्षिततेत अपेक्शितता आणायचा मानवी प्रयत्न असतो आणि कोणतीतरी शक्ती अपेक्षित असेच घडवू शकेल या अपेक्षेतून ईश्वरासकट ज्योतिष नावाचे भविष्य अशास्त्रसुद्धा डावाला लावले जाते. जेथे शास्त्रातच मुळात अनिश्चिततेचे तत्व राज्य करीत असताना, किंवा ती अनिश्चितता हीच निश्चितता आहे की नाही हेही सध्या तरी ठामपने सांगू शकत नसतांना ईश्वर किंवा भविष्य शास्त्र निश्चित आहे असे जे मानतात ते काही गंभीर चूक करतात असे म्हणणे भाग आहे.

अनिश्चितता सूक्ष्म स्तरावर जशी लागू पडते तशीच ती वैश्विक स्तरावरही लागू पडते. म्हणजे सूर्याचा उदयास्त निश्चित वेळेला होण्याचे भाकीत “वेळ” नावाच्या संकल्पनेत काही काळ (म्हणजे कदाचित कोट्यावधी वर्ष) खरे होऊ शकत असले तरी कोणत्या काळात आणि नेमके कधी आणि कशामुळे या वेळा बदलू शकतील याचे भाकीत करता येणार नाही. कारण मुळात ही भाकिते मर्यादित काळचौकटीच्या परिप्रेक्ष्यात केली गेलेली असतात. प्रकाशवेग हा स्थिर मानून सध्या वैश्विक गणिते मांडली जातात. पण तोही स्थिर नाही असे म्हणण्यासारखी स्थिती आहे. प्रबळ गुरुत्वाकार्षानाच्या स्थितीत त्याचा वेग अथवा दिशा बदलते. म्हणजेच त्या सापेक्षतेत त्या प्रकाशाचा काळ बदलतो. प्रकाशसापेक्ष काळ आणि मनुष्यसापेक्ष काळ हा सारखाच असेल असे म्हणणे अथवा मानने ही मानवी सापेक्षता झाली पण ते सत्य आहे असे म्हणावे अशी निरपेक्ष स्थिती मुळात अस्तित्वात नसते. म्हणजेच प्रकाशाचा वेग वेगवेगळ्या प्रबळ गुरुत्वक्षेत्रांतून जातांना बदलत असेल तर निश्चितता प्रकाशवेग या स्थिरांकाने गिळंकृत करते असे म्हणणे भाग आहे. म्हणजे सूक्ष्म स्तरावरच नव्हे तर व्यापक स्तरावरही अनिश्चितता हे तत्व अबाधित राहत असून विश्व हे एकच ठरलेल्या (पूर्वनिर्धारित? नियमांप्रमाणे चालते असे म्हणणे चुकीचे होऊन जाईल. एक गणित एका स्थितीत चालू शकते पण दुस-या स्थितीत ते बादही होऊ शकते हे विद्न्यानानेच आपल्याला शिकवले आहे.

विश्वाच्याच वर्तनाचे भाकीत जेंव्हा अशक्य आहे तेंव्हा मानवी जीवनाचे/वर्तनाचे भाकीत करता येईल असे जेंव्हा मानले जाते, असे शेंडा-बुडुख नसलेले विषयही अभ्यासक्रमात येऊ लागतात तेंव्हा मानवी युगाची वाटचाल ही पुन्हा आदिम अशास्त्रीय आणि अज्ञानी युगाकडे चालली आहे असे म्हणावे लागते.

याचा अर्थ हा नाही की आजचे विज्ञान “ज्ञानी” आहे. ते नाही. आणि म्हणूनच त्याची एक महत्ता आहे. काहीही झाले तरी ते आजच्या मानवाच्या प्रज्ञेचे उच्चांक गाठलेले टोक आहे. यात पुढेही भर पडेल. अनेक सिद्धांत बाद होतील. नवे सिद्धात येतील. पण ते अग्रगामी राहण्यासाठी. मागे जाण्यासाठी नव्हे. काळ सांत आहे की अनंत आणि दोन्ही स्थितीत कालाचे वर्तन आणि वास्तव काय असेल हे आपल्याला आज तरी माहित नाही. काही गृहीतके धरून सिद्धांतान केले जाते ते काही समस्या सोडवण्यासाठी. समग्र विश्वव्यवहारांचे गणित अद्याप गवसलेले नाही.

ज्योतिष शास्त्र हे अत्यंत मुर्खपणावर आधारीत अशास्त्र आहे. मुळात विश्वात सारे काही अनिश्चित आणि म्हणूनच अभविश्यीत असताना व्यक्तीचे अथवा घटनांचे भविष्य मर्यादित ग्रह-नक्षत्राधारित वर्तवने म्हणजे बिनबुडाच्या सिद्धांतावर ठोकताळे बांधत लोकांना मूर्ख बनवणे आहे. अवकाशातील प्रत्येक गोलातून/वस्तुतून निघणा-या गुरुत्वीय व विद्युत चुंबकीय लहरींचा प्रारनांचा परिणाम माणसावर (जीवसृष्टीवर) ढोबळमानाने होतच असतो यात वादाचा मुद्दा नाही. पण येथे असे कारक संदर्भव्यूह अक्षरश असंख्य आहेत. त्यांच्यापासून निघणा-या वेगवेगळ्या तरंगलांबीच्या आणि प्रकारच्या लहरीही एकमेकांशी कशा वर्तन करतात आणि नंतर काय परिणाम दाखवतात हे सध्या तरी गणिताला समजने अवघड आहे. त्या एकमेकांशी करणारे वर्तनाचे गणित आणि त्याचा एकुणातील परिणाम आणि त्याला प्रत्येक जीव देत असलेला प्रतिसाद आणि त्या आधारीत त्याचे वर्तन आणि त्या वर्तनातून दिसून येणारा अथवा होणारा परिणाम याचे गणित जोवर करता येत नाही आणि एका व्यक्तीच्या वर्तनामुळे इतरांवर होणारे असंख्य उपपरीनाम मोजता येत नाहीत, कारणमीमांसा करता येत नाही आणि आगावूच हे परिणाम वर्तवता येत नाहीत तोवर भविष्य शास्त्र हे सर्वस्वे त्याज्ज्य असले पाहिजे असे म्हणावे लागते. सध्याचे मर्यादित ग्रह, छद्म ग्रह (रांहुं-केतू) आणि भासमान नक्षत्रे या आधारावर त्यांचे कसले\ही भौतिक परिमाण माहित नसतांना केलेले चुकार गणित कोणतेही आनि कसलेही भविष्य वर्तवू शकत नाही.

अनिश्चिततेच्या तत्वाला उत्तर म्हणून ईश्वर शोधला गेला तो एक प्रकारे भयभीत जीवांचा आधार होता हे मान्य केले तरी तो फक्त मानसिक आधार होता...वास्तव नव्हते हे नीट लक्षात घेतले पाहिजे. मुळात जीवांचे काय कि सृष्टीचे काय, वर्तन मर्यादित काळाच्या परीप्रेक्शात काही प्रमाणात भविष्य वर्तवता येण्यासारखे असले तरी सूक्ष्मात जायला लागते तसे ते भविष्यही अनिश्चित होते हे प्रत्ययाला येते. ही सापेक्षतेची मर्यादाही आणि विशालताही. निरपेक्ष स्थितीत विश्वाचे आणि जीवामात्रांचे वर्तन कसे असेल हे शोधायला आपल्याकडे अजून कोणता सिद्धांत नाही. आणि त्या स्थितीत मुळात मानवाचे स्थान अथवा अस्तित्व काय असू शकेल काय हा वेगळा प्रश्न उपस्थित होईल.

असे म्हणूयात की तेही भाविष्य अज्ञात आहे. मग माणसांच्या भविष्याची मातब्बरी ती काय?

केवळ पोट भरण्याची संधी काहींना मिळावी यासाठी असे अभ्यासक्रम राबवण्यात येणार असतील तर मग या देशाचे भविष्य काय असेल?

(क्रमश:)

Monday, June 28, 2021

ओबीसींचे हित कशात?

ओबीसींचे हित कशात?

मी सर्वप्रथम श्री. बालाजी शिंदे यांनी ओबीसींच्या राजकीय, सामाजिक व आर्थिक समस्यांना मुलभूत हात घालत एक दिशादर्शक अभ्यासू पुस्तक लिहिले आहे याबद्दल त्यांचे मन:पूर्वक
अभिनंदन
करतो. सध्या ओबीसींचे राजकीय आरक्षण संकटात पडले असता आणि त्याच पार्श्वभूमीवर ओबीसींची स्वत:च्याच अधिकारांवर होणा-या अतिक्रमणाबाबत अनास्था असतांना एकुणातच ओबीसी आरक्षणाचा व महाराष्ट्रातील सर्वच सामाजिक चळवळीचा ओबीसी दृष्टीकोनातून घेतलेला सखोल परामर्श आणि जागोजागी नोंदवलेली परखड निरीक्षणे हे या पुस्तकाचे बलस्थान आहे. सर्व ओबेसीन्नी ते वाचायला हवे. त्त्यावर चिंतन-मनन करून आपल्या विचारदृष्टीत परिवर्तन घडवून आणायला हवे.
श्री. शिंदे म्हणतात ते खरे आहे कि ओबीसी समाज ओबीसी म्हणून एकत्र येत नाही. फक्त आपापल्या जातीच्या प्रश्नांसार्ठी एकत्र येतो. जातींची उतरंड आणि त्यातून निर्माण झालेले दुराभिमान एवढे कि सर्व ओबीसींना सर्वसंमत होइल अशा नेतृत्वाचाही उदय होऊ शकत नाही. खरे म्हणजे ओबीसी ही “ओळख” जेवढ्या समर्थपने बनायला हवी होती तशी ती निर्माण झालेली नाही. परिणामी ओबीसी प्रवर्गातील वेळोवेळी सामील झालेल्या जातींमुळे एकंदरीत संख्या तर वाढत गेली पण पदरात काही पडले नाही कारण अपेक्षित ओबीसी ऐक्य निर्माण झाले नाही. भारतीय राजकारणाला संपूर्ण नवी दिशा स्वबळावर देता येईल एवढी क्षमता असतांनाही राजकीय दृष्ट्या सर्वात मागे राहिलेला हा समाज आहे. स्वाभाविकच प्रगतीची अन्य दारेही कधी धडपणे खुली झाली नाही. अन्यायाला प्रखर उत्तरही देता येणे शक्य झाले नाही.
ओबीसींमधील आपापल्या जातीविषयकचे दुराभिमान आणि उतरंडीची (उच्च-नीचतेची) विघातक मानसिकता असंख्य जातीय बेटे निर्माण करते. याचे निराकरण कसे करायचे हा प्रश्न ओबीसी नेते व विचारवन्तांसमोर प्राधान्याने असायला हवा. ओबीसींचे स्वतंत्र राजकीय, आर्थिक व सामाजिक तत्वज्ञान निर्माण करावे लागेल कारण त्याशिवाय कोणतीही सामाजिक उद्दिष्टे साकार करता येणार नाहीत. ओबीसींचा अन्य राजकीय पक्षांनी आजवर केवळ फायदाच उचललेला आहे हे वास्तव आपल्यासमोर आहे. किंबहुना आज ओबीसींची सर्वार्थाने कत्तल केली जात आहे आणि त्याचा ज्या प्रमाणात निषेध व्हायला हवा होता त्या प्रमाणात मुळीच झालेला नाही. किंबहुना हा समाज “विचारमृत” झाला आहे कि काय अशी शंका येते. या औदासिंन्यातून समस्त ओबीसींनी बाहेर पडणे ही काळाची तातडीची गरज आहे.
ओबीसी विचारवंत व नेते यांना त्यांच्या व्यक्तिगत जातींत मर्यादित करून त्यांच्या सर्वव्यापी विचारांनाही संकुचित करण्याचे उद्योग ओबीसी समूहाच्या अंगलट आजवर आलेलेच आहेत. श्री. बालाजी शिंदे यांनाही त्याचा कटू अनुभव घ्यावा लागलेला आहे. असे अनेक नेते- विचारवंत असतील. असे होऊ देणे लज्जास्पद आहे.
बालाजी शिंदे यांनी अत्यंत तळमळीने व परखडपणे हे पुस्तक लिहिले आहे. त्याला अभ्यासाचा आणि अनुभवांचा भरभक्कम आधार आहे. अनेक अज्ञात बाबी या पुस्तकाच्या रूपाने समोर येत आहेत. त्याहीपेक्षा यातील सर्वहिताय विचार ओबीसीन्साठी प्रेरक आहे. परिवर्तनाच्या वाटेवरील प्रत्येक कार्यकर्त्याला दिशा देण्याचे सामर्थ्य या पुस्तकात आहे.
मी पुन्हा श्री. बालाजी शिंदे यांच्या प्रस्तुत पुस्तकाला शुभेच्छा देतो आनि त्यांचे
अभिनंदन
करतो.
-संजय सोनवणी

Saturday, June 19, 2021

वैदिक धर्मी कोण?

 

अनेक खोडसाळ व्यक्ती वादाचे सर्व मुद्दे संपले कि,

 

 "आजच्या भारतात वैदिक धर्मी कोण?"

 

 हा मुख्य प्रश्न विचारत असतात. त्यांना मी अनेकदा उत्तर दिले असले तरी या व अशा काही प्रश्नांची उत्तरे हिंदूंना माहित असले पाहिजे.

 

 “आजच्या भारतात ...” हा शब्द वापरला जातो तेंव्हा “कालच्या भारतात वैदिक होते...” हे त्यांना मान्य असते. काळाच्या भारतात जे वैदिक होते त्यांनी धर्मांतर केल्याने किंवा वेदमान्यता काढून घेतल्याने ते हिंदू बनलेले नाहीत म्हणजे ते आजही वैदिक आहेत हे उघड आहे.

 

वैदिक म्हणजे वेदाधिकार, वेदोक्ताचा जन्मजात अधिकार व वैदिक संस्कारांचा अधिकार आणि जन्मसिद्ध वर्ण असणारे ते वैदिक.

 

अनेक म्हणतात, “आम्ही तर वेदांचे तोंडही पाहिले नाही...संस्कारही पाळत नाही मग आम्ही वैदिक कसे?”

 

धर्मग्रंर्थाचे तोंड पाहिले कि नाही, वेदोक्त संस्कार ते पाळतात की नाही हा प्रश्न नसून पाळायची इच्छा असेल तर ते पाळायची त्यांना वैदिक धर्माची अनुमती. वैदिक धर्मत्व हे कायमच रहाते.

 

हे सर्व वैदिक अधिकार असणारे तीन वर्ण, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रीय व वैश्य हे होत.

 

पण क्षत्रीय व वैश्य आज कोण आहेत आणि कोण नाहीत हे ज्याने त्याने वेदाधिकार आहे कि नाही यावरून ठरवावे.

वैदिक धर्मानुसार क्षत्रीय आणि वैश्य वर्ण नष्ट झालेले आहेत. स्वत:ला अनेक क्षत्रीय समजत असले तरी त्यांना कोणतीही धार्मिक मान्यता नाही. असेल तर त्यांनी स्वत:ला वैदिक धर्मीय समजून घ्यायला हरकत नाही.  

 

वेदकक्षेच्या बाहेरचे, सिंधुकालीन संस्कृतीपासूनचा (पेगन) शिव व देवीप्रधान प्रतिमापुजनाचा धर्म पाळत आले आहेत ते (ज्यांना वेदांनी शूद्र म्हटले आहे आणि शूद्र या शब्दाची कोणतीही वैदिक अथवा संस्कुत उपपत्ती नाही) ते आज हिंदू म्हणता येतात. हिंदू शब्दही परिपुर्ण नाही पण हा शब्द सिंधू या शब्दावरुन आला असल्याने तो ब-यापैकी ग्राह्य धरता येईल. हिंदू धर्माला तान्रिक, आगमिक, शैव अशी पुरातन नावे होतीच.

 

यावर काही  आक्षेप घेतात कि वैदिकही हिंदू देवतांचे पुजन करतात, पौरोहित्य करतात मग ते अहिंदू कसे?

 

वैदिक धर्मात मुर्तीपुजेला स्थान नाही. पण सुमारे चवथ्या शतकापासून वैदिक मुर्तीपुजक बनले याची कारणे मुलत: पोटार्थी आहेत. यज्ञ थांबण्यच्या प्रक्रियेतुन उत्पन्नाचा पर्याय म्हणून आलेला हा भाग आहे. पण वैदिक जेंव्हा हिंदू देवतांची पुजा करतात तेंव्हा संदर्भ सोडून असलेले पुरुषसुक्त आणि विधीत गोत्र मात्र जाणीवपुर्वक आणत असतात. म्हणत आपल्या वैदिकत्वाची आठवण बरोबर जोपासतात. शिवावर रुद्राभिषेक घातला जातो...प्रत्यक्षात वैदिक रुद्र आणि हिंदू शिवाचा तीळमात्र संबंध नाही.

 

 शिवाय भारतातील आजचे वैदिक दोन प्रकारचे आहेत. श्रौत वैदिक (हे मुळीच मूर्तीपूजा करीत नाहीत. हे मुळ धर्माशी इमानदार असतात.) दुसरे म्हणजे स्मार्त वैदिक. हे बव्हंशी दिडेक हजार वर्षांच्या पूर्वी धर्मांतरीत झालेले मुळचे हिंदूच आहेत. धर्मांतरीत वैदिकांनी वैदिक होतांना आपले मुळचे धार्मिक संस्कार काही प्रमानात कायम ठेवले. (म्हणजे कुलदैवत वगैरे) पण ते हिंदू नाहीत.  त्यांना स्मार्त त्यामुळेच म्हटले जाते.

 

वैदिक हा सर्वार्थाने स्वतंत्र धर्म आहे, त्याचे स्वत:चे तत्वज्ञान आहे आणि वैदिक मंडळी स्वाभाविकपणे वैदिक स्तोम माजवत असतील तर त्यात वावगे काही नाही. वैदिकांना हिंदू म्हणवून घ्यायचाही स्वाभाविकपणे अधिकार नाही.

 

Wednesday, June 16, 2021

सव्यसाची

 सव्यसाची.... (आता स्टोरीटेलवर!)

- संतोष देशपांडे


आज खूप दिवसांनी काही विलक्षण वाचनाचा आनंद लाभला. अनेक वर्षांपासून मी जिच्या शोधात होतो, ती संजय सोनवणी यांची सव्यसाची ही कादंबरी परवा हाती पडली. अक्षरशः तुटून पडल्यागत ही कादंबरी एका बैठकीत वाचून काढली. अगदी पहिल्या पानापासून ही कादंबरी पकड घेत जाते. खरं तर ही कादंबरी नव्हे तर एका संक्रमणकाळाची गाथा आहे. बंगालच्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक पार्श्वभूमीवर अलगद उलगडत जाणारा थरार `सव्यसाची`मधून अनुभवायास मिळतो. यातील प्रत्येक पात्र, त्याची स्वतःची अशी कहाणी आणि त्यांची परस्परांधील अनिवार्य अशी गुंफण क्वचितच अशी पाहायला मिळते.
कथानक त्यातील पात्रांमधील अंतरंगाचे दर्शन घडवून आणताना कथेचा प्रवाह, वेग कुठंही कमी होत नाही. संजय सोनवणी यांच्या शेकडो साहित्यकृतींमधील माझ्या दृष्टीने ही सर्वश्रेष्ठ म्हणता येईल.
याची कारणं अनेक आहेत. एक म्हणजे, यातील दाखवलेला कालखंड हा देशात जागतिकीकरणाचे वारे वाहू लागली तेव्हाचा आहे. त्याचवेळी राजकीय पटलावर झपाट्याने बदलत असणारं जातीय व धार्मिक ध्रूवीकरण आणि त्या अनुषंगानं त्याचा समाजातील शेवटच्या घटकावर होत असणारा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम यात टिपला गेला आहे. समतेचं तत्वज्ञान आणि नैतिकतेच्या गोष्टींमधील फोलपणा प्रत्येकाच्या मनातील विचारांवर किती गहिरा आघात करीत राहतो, हे त्रिकालाबाधित सत्य यातून मांडलं गेलं आहे.
सव्यसाची म्हणजे नेमकं कोण, ही एक व्यक्ती आहे की प्रवृत्ती? दोन्ही हातांनी लक्ष्याचा वेध घेऊ शकणाऱ्या अर्जूनास सव्यसाची असं म्हटलं जातं. डावे-उजवे-मध्यममार्गी अशा सर्वांच्याच राजकीय जाणीवांचा, उणीवांचा आरसा जणू या कादंबरीतून आपणापुढं येतो. अर्थात, जेव्हा आरशात इतरांना पाहण्यासाठी आपण डोकावतो, तेव्हा त्यात आपणही स्वतःस दिसणं अपरिहार्यच नव्हे का....
आज आपण बंगालचं राजकारण जे काही अनुभवतो आहोत, त्याची मूळं सुमारे २१ वर्षांपूर्वी लिहिण्यात आलेल्या या कादंबरीत पानोपानी आढळतील. बाबरीचं पतन, त्यातून देशाच्या राजकारणाची बदललेली कूस आणि कोणत्याही देशांतर्गंत बदलांविना अथवा अंतर्गत तयारीविना आमंत्रित केल्या गेलेल्या जागतिकीकरणाचे समाजातील एकूणच मानसिकेतवर होत जाणारे परिणाम एका थरारपटासम यातून उलगडत जातात.
सुमारे साडेपाचशे पानांची ही कादंबरी केवळ फिक्शन म्हणून न राहता तो काळाची स्पंदनं टिपणारा एक कालातीत दस्तऐवज बनतो, प्रत्येकाच्या मनात दडलेल्या `सव्यसाची`चं एक अद्भूत दर्शन घडवतो. हीच कादंबरी बंगालीमध्ये असती, तर कदाचित तिचा यथोचित गौरव झाला असता, असं राहून राहून वाटतं.

Saturday, June 12, 2021

इतिहासातील कृष्णविवरे आणि सम्राट खारवेल




 भारताच्या इतिहासात अनेक कृष्णविवरे आहेत. अनेक राजे, सम्राट व विद्वानही काळाच्या कुपीत बंदिस्त झाले असल्याने ते आपल्याला माहित नसतात. अनेक राजे त्यांचा इतिहास प्रयत्नाने शोधता येण्यासारखा असूनही केवळ इतिहासकारांच्या अनास्थेमुळे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे जनसामान्यांसाठी अज्ञातच राहतात. भारतातील पूर्वोत्तर राज्ये असोत, काश्मीर, लडाख असोत, त्यांचा प्राचीन ते मध्ययुगीन इतिहास मुख्य प्रवाहातील इतिहासकारांनी अदखलपात्र ठरवल्यामुळे त्याबद्दलही लोकांना विशेष माहिती नसते. खरे तर प्रत्येक राज्याचा, त्यातील राजकीय-सामाजिक-सांस्कृतिक घडामोडींचा इतिहास मिळून देशाचा इतिहास तयार होतो. त्यातून राष्ट्रीय भानही विस्तारायला मदत होते, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. पण दुर्दैवाने अजून आपला इतिहास तेवढा प्रगल्भ झालेला नाही. त्यावर धार्मिक, जातीय व प्रांतिक अस्मितांचाच मोठा पगडा आहे, हे आपल्या लक्षात येईल;

पण त्यामुळे आपण काय गमावतो हे आपल्या लक्षात यायला हवे. उदाहरणार्थ आपल्याला काश्मीरच्या आठव्या शतकातील सम्राट ललितादित्याने सुदूर तुर्कस्तानपर्यंत आपले साम्राज्य कसे पसरवले आणि चीन व तिबेटला कसा शह दिला, याचा इतिहास माहित नसतो. १८३६ मध्ये लडाख जिंकून तो काश्मीरला जोडणारा सेनापती जोरावरसिंग आपल्या इतिहासाच्या खिजगणतीत नसतो. आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या सोमनाथ मंदिराचा पहिला जीर्णोद्धार करणारा आणि नंतर जैन धर्म स्वीकारणारा पराक्रमी सम्राट कुमारपाल दुर्लक्षित ठेवला जातो. ही खूप थोडकी उदाहरणे झाली; पण धार्मिक, प्रांतिक आणि सामाजिक गंड असेलल्या इतिहासकारांनी इतिहासाची अक्षम्य हानी करून ठेवली आहे, असे दुर्दैवाने म्हणावे लागते.

माहितीच कोठेही उपलब्ध नाही म्हणून अज्ञात राहिलेल्या राजे-सम्राटांची तर यादी खूप मोठे भरेल. काही राजे तर आपल्याला केवळ नाणी आणि शिलालेखांमुळे माहित आहेत. त्यांचे कार्यकतृर्त्व आणि त्यांचे काळाला काय योगदान होते, हे आपल्याला कदाचित कधीच समजणार नाही. माहितीच उपलब्ध नाही म्हणून कोणी अज्ञात राहणे ही बाब आपण समजू शकतो; पण धार्मिक-पांथिक कारणामुळे माहिती उपलब्ध होण्यासारखी असूनही कसलाही प्रयत्न न करणे हा एक दोष आहे. त्यामुळेच मौर्य घराण्यातील सम्राट अशोकाचा नातू जैनधर्मीय सम्राट संप्रती किंवा सम्राट कुमारपाल कधीही इतिहासकारांच्या खिजगणतीत नसतो.

केवळ शिलालेखावरून माहित असलेला अजून एक महत्त्वाचा सम्राट आहे आणि तो म्हणजे कलिंगचा सम्राट खारवेल. त्याने आपल्या शिलालेखात स्वत:च्या शासनकाळातील महत्त्वाच्या घटना कोरून ठेवल्याने तो इतिहासाला माहित असला, तरी समकालीन कोणत्याही, वैदिक, हिंदू अथवा जैन साधनांमध्ये त्याचा साधा उल्लेखही मिळून येत नाही; पण शिलालेखातील स्वत: खारवेलानेच ओरिसातील उदयगिरी लेण्यांतील हाथीगुंफा लेण्यात कोरवून घेतलेल्या १७ ओळींच्या लेखावरून त्याच्या कारकीर्दीतील महत्वाच्या राजकीय घडामोडींची माहिती मिळते. त्यावर संशोधन करून इतिहासातील एक अज्ञात पर्व उलगडायला मदत झाली असती; पण तसे विशेष प्रयत्न झालेले नाहीत.

शिलालेखात कोणताही संवत कोरलेला नसल्याने आणि लेखातील काही शब्द व वाक्ये कालौघात खंडित झालेली असल्याने निश्चित कालनिश्चिती करायला अडचण होत असली, तरी तत्कालीन राजांची नावे शिलालेखात असल्याने थोड्या कष्टाने का होईना आपण खारवेल आणि त्याचा काळ याबद्दल निश्चित माहिती घेऊ शकतो.

इसपु दुसऱ्या शतकात चेट घराण्यातील सम्राट खारवेल कलिंगच्या राजपदी आरूढ झाला. हे घराणे स्वत:ला महामेघवाहन असेही संबोधित असे. मौर्य साम्राज्य खिळखिळे झाल्यावर पुष्यमित्र शृंगाने मगधाची सत्ता बळकावली. त्याच वेळीस खारवेलाने कलिंग पुन्हा स्वतंत्र करून घेतले. तत्पूर्वी त्याचे चेट घराणे मौर्यांचे मांडलिक होते. या शिलालेखाची सुरुवातच जैन धर्मात अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या णमोकार मंत्राने सुरू झाली असून, या मंत्राच्या प्राचीनतेचा हा एक शिलालेखीय पुरावा आहे. एवढेच नव्हे, तर आपले देशनाम 'भारत' हे जर सर्वप्रथम येत असेल, तर ते याच शिलालेखात. त्यादृष्टीनेही या शिलालेखाचे ऐतिहासिक महत्त्व अपरंपार आहे.

खारवेल हा प्रजाहितदक्ष आणि सहिष्णू राजा होता. वयाच्या अवघ्या चोविसाव्या वर्षी तो सत्तेत आला. त्यानंतर त्याने लगेच सार्वजनिक बांधकामे व दुरुस्त्या हाती घेतल्या. त्याने तत्कालीन जैनेतर धर्मांच्या पूजा, प्रार्थनास्थळांच्या बांधणीलाही उदार हस्ते मदत केली. दुसऱ्या वर्षी त्याने सातवाहनांची सत्ता असलेल्या वैनगंगेच्या परिसरातील असिक प्रांतावर स्वारी केली. सातकर्णी व खारवेलामध्ये तह झाला व बदल्यात खारवेलाला हत्ती-घोडे आणि रथ खंडणीत मिळाले. रठीक आणि भोजक गणराज्यांनाही त्याने पराजित केले. तो योद्धा होता, तसेच उत्सवप्रिय संगीत-नृत्याताही रुची ठेवणारा होता. वयाच्या एकतिसाव्या वर्षी त्याला धुसी नामक पत्नीपासून एका पुत्राची प्राप्ती झाली.

त्याच्या पुढच्याच वर्षी त्याने राजगृहवर स्वारी केली. तेथून डीमित्रियस (पहिला) या यवन आक्रमकाला उखडून काढत मथुरेपर्यंत मागे रेटले. याचा काळ निश्चित असल्याने खारवेलाचाही काल निश्चित करायला मदत होते. सत्तेवर आल्यानंतर बारा वर्षांनी त्याने मगधावर स्वारी करून बृहद्रथ मौर्याला ठार मारून सत्तेवर आलेला पाटलीपुत्रचा राजा बहसतीमितला (बृहस्पतीमित्र) शरण आणले. बहसतीमित हे पुष्यमित्र शृंग (मूळ प्राकृत नाव-पूसमित सुग) या राजाचे आणि त्याच काळात झालेल्या राजाचे पर्यायी नाव मानले जाते. पुष्यमित्र शृंग त्याच काळात पाटलीपुत्र येथूनच राज्य करत असल्याने बहसतीमित आणि तो एकच होते याविषयी शंका राहत नाही. ही माहिती मगधाच्या मौर्योत्तर इतिहासावर एक महत्त्वाचा प्रकाश टाकते.

या स्वारीत खारवेलाने केलेली महत्त्वाची कामगिरी म्हणजे तीनेकशे वर्षांपूर्वी नंद राजांनी कलिंगला हरवून तेथील ऋषभनाथांची (अग्रजिन) प्रतिमा पाटलीपुत्र येथे नेली होती. ती त्याने सन्मानाने कलिंग येथे परत आणली. कलिंगचे साम्राज्य त्यावेळी ओडिशा, आंध्र, विदर्भ, तसेच मगधाच्या काही भागापर्यंत पसरले होते. त्याने विद्वानांना आपल्या राज्यात आश्रय दिला. जैन धर्मीय असूनही त्याने अन्य धर्मांबाबत तेवढाच आदरभाव ठेवला. हे सारे शिलालेखात नोंदलेले आहे.

या शिलालेखामुळे इसवी सनपूर्व दुसऱ्या शतकातील इतिहासावर काही प्रमाणात प्रकाश पडतो आणि आपले अनेक गैरसमज दूर व्हायला मदत होते; पण दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्षच केले गेले आहे. शिवाय शिलालेखाचे वाचन तर अनेकदा जाणीवपूर्वक सदोष पद्धतीने केले गेले आहे की काय अशीही शंका येते.

खारवेलाचा इतिहास सखोलपणे शोधला गेला, तर इतिहासातील अनेक गाळलेल्या जागा भरून निघायला मोठी मदत होईल. पुष्यमित्र शृंगाचा, सातवाहनांचा, परकीय आक्रमणांचा आणि एकुणातच तत्कालीन इतिहास नव्याने दुरुस्त करून घ्यावा लागेल आणि इतिहासाची कालरेखा किमान सुसंगत करता येईल. ज्यांची माहिती मिळणे अशक्य आहे त्यांचा इतिहास वगळता किमान ज्यांची थोडीतरी माहिती उपलब्ध आहे ती समकालीन इतिहासाच्या अनुषंगाने परिपूर्ण करता येणे अशक्य नाही, हे मी सम्राट ललितादित्याचा इतिहास लिहून दाखवून दिले आहे; पण त्यासाठी धार्मिक, पांथिक, प्रांतीय आणि जातीय अस्मितांची झापडे उतरवावी लागतील.

अन्यथा मागील लेखात लिहिल्याप्रमाणे भविष्यात केवळ एकांगी असा केवळ वैदिक दृष्टीतील इतिहास शिल्लक राहील आणि इतिहासाने ठेवलेल्या पाउलखुणा पुरेपूर पुसट होऊन एके दिवशी विस्मृतीत जातील. ही इतिहासाची अक्षम्य अशी हानी असेल.

Wednesday, June 2, 2021

लोककल्याणकारी द्रष्टी राज्यकर्ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

 


 जनतेने धर्मराज युधिष्ठिरानंतर फक्त अहिल्याबाई होळकरांना उत्स्फूर्तपणे पुण्यश्लोक असा किताब बहाल केला. त्या थोर शिवभक्त होत्या.  शेकडो राज्यकर्त्यांत वाटल्या गेलेल्या तत्कालीन भारत देशाला त्यांनी मंदिरेघाटरस्तेधर्मशाळा आणि बारवांच्या माध्यमातून जोडण्याचे अचाट कार्य केले. आपल्या संस्थानाच्या बाहेर पाहण्याची तत्कालीन राज्यकर्त्यांची प्रवृत्ती नसतांनाही त्यांनी फक्त आपल्या होळकर राज्याचा विचार न करता सोमनाथ ते केदारनाथ आणि दक्षीणेत पार रामेश्वरमपर्यंतच्या भुभागांत आपली निर्माण कार्ये केली. त्यातून देशाला जोडण्याचे कार्य केले. त्या कामांनी त्यांची ख्याती देशभरात चिरंतन राहिली आहे. पण अहिल्याबाईंची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांचे प्रशासन! अठराव्या शतकातील भारतातील सर्वश्रेष्ठ प्रशासिका असा त्यांचा गौरव ब्रिटिश पार्लमेंटने केला आहे. देशातील सर्वच रजवाडेही त्यांचा गौरव करत असत. त्यामुळे त्यांच्या इंदोर संस्थानाबाहेरच्या कोणत्याही समाजकार्याला कोणीही आडकाठी केली नाही.


अहिल्यादेवींचे प्रशासन हे राजकेंद्री नसून समाजकेंद्री होते. शिवभक्त अहिल्यादेवींनी प्रजेतच शिव पाहिला. समाजातील सर्व घटकांना समान न्याय हे त्यांचे वैशिष्ट्य होते. निपुत्रीक विधवांची संपत्ती जप्त करण्याचा परंपरागत कायदा त्यांनी रद्द तर केलाच पण विधवांना दत्तक पुत्र घेता येईल असे कायदे बनवले. अहिल्यादेवींचे महत्वाचे क्रांतीकारी कार्य म्हणजे त्यांनी स्थापन केलेली महिलांना लष्करी प्रशिक्षण देणा-या संस्थेची स्थापना. या संस्थेतून अक्षरश: हजारो स्त्रीया प्रशिक्षीत झाल्या. खुद्द अहिल्यादेवींनी आपले स्वत:चे असे ५०० महिलांचे लढवैय्या पथक स्थापन केले होते. भारताच्या इतिहासातील प्रशिक्षित महिलांचे हे पहिलेच लष्करी पथक!

ही एक सामाजिक क्रांती होती. अहिल्यादेवींनी आपल्या राज्यात कररचना सौम्य व समानतेच्या तत्वावर ठेवली होती. इंग्रजांनी त्यांचे शासन देशात सुस्थापित झाल्यानंतर अहिल्यादेवींच्या कररचनेचा आधार घेतच आपली कररचना केली. तत्पुर्वी कररचना ही रजवाड्यांच्या मर्जीप्रमाणे असे. त्यामुळे श्रीमंत लोकही आपल्या वैभवाचे प्रदर्शन टाळत असत. अहिल्यादेवींच्या राज्यात मात्र तशी परिस्थिती नव्हती. प्रत्येकाच्या जिवित-वित्ताची हमी घेतलेले असे अहिल्यादेवींचे कल्याणकारी राज्य होते. त्या रोज दरबारात उपस्थित असत व प्रत्येक प्रजाननाची तक्रार ऐकून लगेच निर्णय देत किंवा गुंतागुंतीचे विषय न्यायखात्याकडे स्वत: पाठवत.


राज्यातील व्यापार उदीम बाढावा यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले. महेश्वरला वीणकरांना स्थायिक करून त्यांनी वस्त्रोद्योगाला प्रोत्साहन दिले. ते इतके यशस्वी ठरले की माहेश्वरी साड्या व अन्य वस्त्रे भारतीय बाजारपेठ व्यापून उरले. आजही ती ख्याती पुसलेली नाही. उद्योग-व्यापाराच्या समृद्धीतूनच रोजगार निर्माण होतो आणि रयतेचे स्थायी कल्याण होते हे तत्व त्यांनी आपल्या आचरणातून पाळले. इंदोर हे त्या काळी एक छोटे खेडे होते. अहिल्यादेवींनी इंदोर हे एका औद्योगिक नगरामद्धे परिवर्तीत करण्याचा चंग बांधला. फलश्रुती अशी कि इंदोर एका भव्य शहरात बदलले. आज ती मध्य प्रदेशाची आर्थिक राजधानी आहे.


अहिल्यादेवींचा समकालीन इतिहासकार स्टुअर्ड गोर्डन म्हणतो, त्या काळात देशभरात अंदाधुंदी चालू असतांना अहिल्यादेवींचा प्रदेश मात्र अठराव्या शतकातील सर्वात शांततेचा आणि भरभराटीचा होता. अहिल्यादेवींचे सामाजिक व आर्थिक भान कसे होते हे पाहिले तर आजही थक्क व्हायला होते. रानावनांतून जाणा-या यात्रेकरुंना भिल्ल लुटत असत. अहिल्यादेवींनी सैन्य पाठवून त्यंचा बंदोबस्त करण्यापेक्षा भिल्ल असे का करतात याचा शोध घेतला. उत्पन्नाची कसलीही साधने नसल्याने भिल्ल लुटारु बनले आहेत हे लक्षात येताच त्यांनी भिल्लांना कसण्यासाठी शेतजमीनी दिल्या. एवढ्यावरच त्या थांबल्या नाही तर भिल्लांवरच यात्रेकरुंना सुखरुप इप्सित ठिकाणी अल्प मोबदल्यात पोहोचवण्याची जबाबदारी दिली. भिल्ल यात्रेकरुंकडुन या कामासाठी जो मोबदला घेत त्याला "भिलवाडी" म्हणत. यामुळे भिल्लांच्या उदरनिर्वाहाचीही सोय झाली आणि यात्रेकरुंना होणारा उपद्रव संपला.

इंग्रजांबद्दल अहिल्यादेवींचे मत आणि धोरण दूरदृष्टीचे होते. १७७७ साली पेशव्याला लिहिलेल्या पत्रात त्या म्हणतात, इंग्रज गोडबोल्या आणि अस्वलासारखा धूर्त आहे. त्याच्याशी संग करू नका. तो गुदगुल्या करुन मारेल. अस्वलाला ठार मारायचे तर त्याचा तोंडावरच आघात करावा लागतो." हे कार्य पेशव्यांना जमले नसले तरी पुढे महाराजा यशवंतराव होळकरांनी इंग्रजांचा धोका लक्षात घेऊन त्यांना अनेक युद्धांत धूळ चारली.


अहिल्यादेवींची किर्ती त्या काळात जगभर पोहोचली होती. युरोपमधील स्त्रीस्वातंत्र्यवादी चळवळीच्या त्या आदर्श बनल्या होत्या. जोआना बेली या ब्रिटिश कवयित्रीने तर अहिल्यादेवींवर इंग्रजीत खंडकाव्य लिहिले. या खंडकाव्यात जोआना बेली म्हणतात, "तीस वर्षांचा तिचा शांततामय राज्यकारभार, प्रजेच्या आशिर्वचनांनी ओथंबलेली तिची भूमी.  आया त्यांच्या लहानग्यांना म्हणतात...खुद्द ब्रह्मदेवाने आपल्या भूमीवर राज्य करण्यासाठी तिला पाठवले...एक राजस हृदयी, कोमल अंत:करणाची आणि बुलंद व्यक्तिमत्वाची ती अहिल्या!"

ही कोमल अंत:करणाची स्त्री तेवढीच कठोर होती. तिचे संस्थान जप्त करून घशात घालण्यासाठी राघोबादादा पेशवे सैन्य घेऊन महेश्वरवर चालून आले होते, तेंव्हा अहिल्यादेवींनी त्याला निरोप पाठवला..."मी एक अबला आहे, असहाय स्त्री आहे, या भ्रमात कोणी राहू नये. माझ्याकडे पाचशे महिलांचे सैन्य आहे. मी त्यांच्यासह भाला घेऊन रणांगणात उभी ठाकले, तर तुमचे मनसुबे जागीच जिरतील.....तुम्ही हरलात तर तुम्हाला जगात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. मी कोणत्या प्रकारची अबला आहे, हे रणांगनावरच कळेल!"

अहिल्यादेवींच्या कार्याचे असंख्य पैलू आहेत. जगभरच्या स्त्रीयांसाठी त्या अक्षय्य प्रेरणास्त्रोत आहेत. लोककल्याणकारी राज्य कसे चालवावे याचं आदर्श वस्तुपाठ आहे. आणि देश जोडणारी निर्मितीकार्य करणा-या त्या द्रष्ट्या राष्ट्रमाता आहेत. त्यांना त्यांच्या जयंतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

-संजय सोनवणी

 

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...