Friday, December 23, 2022

रेशीम मार्गावरील जगप्रसिद्ध प्रवासी!


 




रेशीम मार्गावरून इस्तंबूलपासून चीनपर्यंत प्रवास करणारे असंख्य व्यापारी होऊन गेलेत. दुर्दैवाने त्यांनी आपल्या प्रवासाबद्दल काही लिहून ठेवले असले तरी ते आज अभावानेच आपल्याला उपलब्ध आहे. भारतातून रेशीम मार्गावरूनच चीनपर्यंत बौद्ध धर्म पसरला असला तरी त्या बौद्ध भिक्षुंनी प्रवासवर्णने लिहिलेली नसल्याने या मार्गावरील त्यांच्या आठवणी व निरीक्षणे उपलब्ध नाहीत. सातव्या शतकातील प्रसिद्ध चीनी विद्वान ह्यु-एन-त्संग याचा मात्र अपवाद. बौद्ध धर्माबाबत अपार आस्था असल्याने हा रेशीम मार्गाने प्रवास करत भारतात आला होता. चीनला परत गेल्यानंतर चीनी सम्राट तायझोंगच्या  इच्छेनुसार आपले प्रवासवर्णनही लिहले. त्याचे हे लेखन आजही इतिहासकार आणि पुरातत्वविदांसाठी इतिहासातील अनेक गाळलेल्या जागा भरण्यासाठी उपयुक्त ठरते आहे.

 

त्यानंतर काही काळातच इत्सिंग हा चीनी भिक्षुही भारतात आला आला होता. त्याने प्रवासात लिहिलेल्या दैनंदिन्याही नंतर प्रसिद्ध करण्यात आल्या. रेशीममार्गावरील व भारतातील राज्ये, तेथील समाजजीवन व एकंदरीत धार्मिक स्थिती यावर त्यातून मोठा प्रकाश पडतो.

 

पण रेशीम मार्गावरून चीनपर्यंत प्रवास करणा-या इटालियन मार्को पोलोची कहानी मात्र विलक्षण अशी आहे. मार्को पोलो मुळचा व्हेनिस शहरातील. त्याचे वडील निकोलो व चुलते माफ्फेओ हे दोघेही व्हेनिसमधील नामांकित व्यापारी होते. व्यापारानिमित्त ते व्होल्गा नदीखोऱ्यापासून इस्तंबूलपर्यंत प्रवास करीत असत. मार्को आपल्या आईच्या पोटातच होता तेंव्हाही निकोलो व माप्फ्फेओ बंधू व्यापारासाठी बाहेर पडलेले होते. जागतिक व्यापारी पटलावर काही बदल होण्याची चिन्हे दिसू लागल्याने आलेल्या संधीचा फायदा घ्यायचे त्यांनी ठरवले.  

 

रोमन काळापासून चीन, भारतादी अतिपूर्वेकडील आशियाई देशांशी ज्या खुष्कीच्या मार्गाने व्यापार चालत असे, तो मार्ग अब्बासी खिलाफतीच्या कालखंडात यूरोपियनांसाठी बंद झाला होता. पण चंगीझखानाचा नातू हूलागूखान याने बगदादची अब्बासी खिलाफत नष्ट केल्यावर, म्हणजे १२५८ नंतर, हा मार्ग पुन्हा यूरोपियन व्यापाऱ्यांसाठी खुला झाला. या संधीचा फायदा घेऊन १२६० मध्ये निकोलो व माफ्फेओ यांनी साहस करून मध्य आशियातील बूखारा गाठले. बूखारा हे त्यावेळेसही मोठे आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र होते. तेथे कुब्लाईखानाच्या राजदूताशी त्यांची भेट झाली व त्याच्याबरोबरच ते चीनला गेले. मध्ययुगीन काळात चीनमध्ये जाणारे ते पहिले यूरोपीय व्यापारी होते.

 

पेकिंगमध्ये त्यांनी कूब्लाईखानाची भेट घेतली. त्याने निकोलो व माफ्फेओ यांचे स्वागत केले आणि काही काळ त्यांना ठेवूनही घेतले. जवळपास पंधरा वर्षांच्या नंतर १२६९ मध्ये पोलो बंधू इटलीला परतले. तोवर निकोलोच्या पत्नीचा मृत्यू झालेला होता तर पंधरावर्षीय मार्कोच्या दृष्टीने  पिताही हयात नव्हता. पण बापाला पाहून पोरक्या मार्कोला बरे वाटले असल्यास नवल नाही.

 

चीनमधून निघताना कुब्लाईखानाने पोपला उद्देशून चीनमध्ये १०० ख्रिस्ती मिशनरी पाठवावेत या अर्थाचे निकोलोकडे दिलेले होते. पण पोप चौथा क्लेमेंट याच्या मृत्यूमुळे आणि नवीन पोपच्या निवडणुकीच्या विलंबामुळे ते पोहोचते करू शकले नाहीत.

 

प्रवास आणि व्यापाराची वृत्ती स्वस्थ बसू देत नाही म्हणून अवघ्या दोन वर्षांत म्हणजे १२७१ साली पोलो बंधू सतरा वर्षांच्या मार्कोसह पुन्हा चीनकडे व्यापारासाठी निघाले. ते एकर येथून जेरूसलेमला आले. तेथून ते उत्तरेकडे प्रवास करीत सिरियाच्या किनारी आले. त्याच ठिकाणी त्यांना आपला मित्र दहावा ग्रेगरी हा पोप म्हणून निवडला गेल्याची बातमी समजली. त्यामुळे ते परत रोमला आले. १२७१ मध्ये पोपचा निरोप घेऊन ते निघाले. पोपने मिशन-यांची पुरेशी व्यवस्था केली नाही. त्यांच्याबरोबर अवघे दोनच मिशनरी आर्मेनियाच्या सरहद्दीपर्यंत आले. पुढे प्रवास करायची त्यांची हिम्मत झाली नाही. आयाश येथून इराणच्या आखातावरील हॉर्मझ या बंदरात आले. तेथून जलमार्गाने चीनला जाण्याचा त्यांचा विचार होता परंतु जहाज मिळू न शकल्याने त्यांनी रेशीम मार्गाने जावयाचे ठरविले.

 

इराणचे दुष्कर असे वाळवंट ओलांडून ते अफगाणिस्तानातील बाल्ख शहरी आले. येथून ते ऑक्ससमार्गे वाखान येथे आले. नंतर पामीर पठार ओलांडून ते थंड वाळवंट काश्गर, यार्कंद, खोतानमार्गे लॉप नॉर सरोवराच्या किनाऱ्याशी आले. नंतर पुढे पुन्हा गोबीचे वाळवंट  लागले. ते पार करून १२७५ मध्ये ते चीनमधील शांगडू शहरी दाखल झाले.

 

मार्कोने चीनमध्ये मंगोल भाषेचा अभ्यास केला. मार्कोची हुषारी, विशेषत: त्याचे भाषाप्रभुत्व, बहुश्रुतता आणि नम्रता या गुणांनी कूब्लाईखान खूष झाला. १२७७ मध्ये खानाने मार्कोची नागरी सेवेत नेमणूक केली. अंगच्या गुणांमुळे थोड्याच अवधीत कूब्लाईखानाच्या तो खास मर्जीतील समजला जाऊ लागला. त्याला खानाने अनेक देशांत आपला राजकीय प्रतिनिधी म्हणूनही पाठवले. त्याने तिबेट, ब्रह्मदेश, कोचीन, श्रीलंका, ईस्ट इंडीज बेटे, भारत इ. भागांना भेटी दिल्या. त्याच्या प्रवासवर्णनात उत्तर भारत वगळता कन्याकुमारी, भारताचा प. किनारा, रामेश्वर ते अंदमान-निकोबारपर्यंतच्या प्रदेशाचे सखोल विवेचन आलेले आहे. एका परकीयाच्या नजरेतून तेराव्या शतकातील भारत पाहणे एक मनोद्न्य अशी बाब आहे.

 

सतरा वर्षे चीनमध्ये काढल्यानंतर पोलोंना मायदेशाची ओढ लागली परंतु कूब्लाईखान त्यांना सोडण्यास राजी नव्हता पण त्याच सुमारास तशी एक संधी चालून आली. इराणचा प्रदेश कूब्लाईखानाच्या भावाचा नातू ऑर्गून याच्याकडे होता. त्याची मंगोल वंशातील पत्नी मरण पावली. त्याला दुसरा विवाह करायचा होता पण आपली दुसरी पत्नीही त्याच वंशातील करण्याची त्याची इच्छा होती. यासाठी त्याने आपल्या दूतास खानाकडे पाठविले. तेव्हा कूब्लाईखानाने कोकचीनया राजकन्येस इराणला पाठविण्याचे ठरविले. या कामगिरीवर जाण्यास पोलोंखेरीज इतर कोणीही माहितगार व्यक्ती नव्हती. त्यामुळे कूब्लाईखानाने पोलोंना मायदेशी जाण्याचे परवानगी दिली व आपलीही कामगिरी पार पाडायला सांगितले. पोलोंबरोबर त्याने फ्रान्स, स्पेन येथील राजांना आणि पोपला मैत्रीपूर्ण संदेशही पाठविले.

 

मग मार्को पोलो आपला पिता, चुलता, राजकन्या कोकचिन आणि प्रशियाचे दूत यांच्यासह १२९२ मध्ये चिंगज्यांग (झैतून) बंदरातून निघाला. वाईट हवामानास तोंड देत मलॅका सामुद्रधुनीतून निकोबार बेटे, श्रीलंका, भारत या मार्गाने अडीच वर्षांनी ते इराणला पोहोचले. प्रवासकाळात त्यांच्याबरोबर असलेले प्रशियाचे दोन दूत मरण पावले. त्याच काळात त्यांना कूब्लाईखानाच्या मृत्यूची वार्ता समजली. ज्याच्यासाठी भावी वधू म्हणून  कोकचिनला घेऊन चालले होते  त्या ऑर्गूनचाही त्याच सुमारास मृत्यू झाला. शेवटी तोड म्हणून कोकचीनचे लग्न ऑर्गूनच्या मुलाशी लावण्यात आले.

१२९५ मध्ये परतल्यावरही मार्को अनेक राजकीय कामगि-यांत व्यस्त होताच. १२९८ मध्येच व्हेनिस आणि जिनेव्हामध्ये युद्ध पेटले. या युद्धात मार्कोने भाग घेतला. या युद्धात मार्कोला युद्धकैदी म्हणून पकडण्यात येऊन जिनेव्हातील तुरुंगात ठेवण्यात आले. तेथे त्याच्याबरोबर पीसा येथील रुस्टीचेल्लो नावाचा एक लेखकही बंदी होता. मार्कोने त्याला आपल्या प्रवासाचा वृत्तांत सांगितला. त्याने या वृत्तांतावर आधारित द बुक ऑफ मार्को पोलो हे पुस्तक तुरुंगातून सुटल्यानंतर तयार केले. थोड्याच कालावधीतच सर्व यूरोपभर या पुस्तकाची प्रसिद्धी झाली.

युरोपियन जगताला तेंव्हा सुदूर पूर्वेकडील जगाबद्दल विशेष ज्ञान नव्हते. या पुस्तकात मार्कोने पाहिलेले देश, तेथील लोक व समाजजीवन, पशुपक्षी इत्यादींची वर्णने आहेत. त्याने लिहिलेली आशियाई देशांची वर्णने यूरोपात विशेष लोकप्रिय ठरली. ख्रिस्तोफर कोलंबस याच्याकडे मार्को पोलोच्या पुस्तकाची एक लॅटिन आवृत्ती होती. नवे जग शोधण्यासाठी मार्को पोलोची मदत होईल यावर त्याचा विश्वास होता. व्हेनिस येथे मार्को पोलोचे निधन झाले. एक साहसी प्रवाशी म्हणून मार्कोची जगाच्या इतिहासात नोंद झाली.

 

-संजय सोनवणी

 

Saturday, December 17, 2022

उंबरठ्यावर आलेली जगबुडी!


 

 


“कसं होईल या जगाचं?” या चिंतेने व्यापलेले लोक जगात कमी नाहीत. काहींच्या चिंता या व्यक्तीसापेक्ष असतात तर काही मोजक्या लोकांच्या चिंता या विश्वसापेक्ष व अभ्यासावर आधारित असतात. स्टिफन हॉकिंग्ज या विश्वविख्यात शास्त्रज्ञाने मागे येत्या शंभर वर्षात एकतर मानवजातीला परग्रहावर रहायला जावे लागेल किंवा मानवजातच नष्ट होईल असे भाकीत वर्तवले होते. त्यांच्या भाकितामुळे जगभर खळबळ उडणे स्वाभाविक होते. ज्या वेगाने मनुष्य पृथ्वीतलाचे वाटोळे करत निघाला आहे तो वेग पाहता मानवजात नष्ट होईल किंवा त्याला अन्यत्र कोठे परग्रहावर आश्रय शोधावा लागेल हे भय संवेदनशील विचारवंतांना व वैज्ञानिकांना वाटत असल्यास नवल नाही. पण या भयाकडे आपण गांभिर्याने पाहिले पाहिजे. पण त्यापेखा मानवाचे या धरातलावर राहणारे सह-निवासी आहेत त्यांचा ज्या वेगाने –हास होतो आहे अथवा केला जातो आहे तो पाहता एक दिवस माणसालाही आपला गाशा येथून गुंडाळावा लागेल ही केवळ काल्पनिक भीती नव्हे तर वास्तव आहे हे आपल्या लक्षात येईल.

 

पृथ्वीवर आजमितीस ८० लक्ष जीव प्रजाती आहेत आणि त्यातील पंधरा हजार प्रजाती या आता नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत. पृथ्वीच्या इतिहासात नैसर्गिक कारणांनी नष्ट झालेल्या जैव प्रजातींची संख्या मोठी असली तरी त्यांचा नष्ट होण्याचा वेग कमी होता. पण आता मानवनिर्मित कारणांमुळे हा वेग भयावह गतीने वाढला आहे असे जैव-शास्त्रद्न्य सांगत असतात पण ते हव्यासात दंग झालेल्या आम्हा बधीर लोकांना ऐकू येत नाही.

 

पृथ्वीवर एकूण पाच वेळा झालेल्या नैसर्गिक उत्पातांमध्ये व्यापक प्रमाणात जलचर-भूचरांचा संहार होऊन तत्कालीन अस्तित्वात असलेल्या प्रजाती समूळ नष्ट झाल्याची नोंद मिळते. शेवटचा असा महा-विनाश साडेसहा कोटी वर्षांपूर्वी झाला होता. हा विनाश मोठ्या अशनीपातामुळे झालेल्या वातावरण बदलामुळे झाला याबाबत शास्त्रद्न्यांचे एकमत आहे. पण आता जो सहावा महा-विनाश सुरु आहे याचे कारण मानवनिर्मित असून त्यात खुद्द मानवाचे अस्तित्वही धोक्यात येत आहे याची जाणीव अद्याप मानवाला पुरेशी झालेली आहे असे दिसत नाही.

 

पृथ्वीवरील जलवायूमान हे नेहमीच बदलते राहिलेले आहे. त्यामुळे इतिहासात अनेक संस्कृती नामशेष झाल्या आहेत. उदाहरणच द्यायचे झाले तर चीन ते मेसोपोटेमिया अशा विस्तृत क्षेत्रात सनपूर्व १७५०च्या आसपास अशाच पर्यावरण बदलामुळे पावसाचं प्रमाण कमी होत गेलं. बारमाही वाहणा-या नद्या फक्त मौसमी नद्या बनल्या. त्यामुळे शेती उत्पादन आणि निर्यातही घटल्याने लोक नागरी संस्कृतीकडून ग्रामीण संस्कृतीकडे वळाले. शहरं ओस पडली. एकार्थाने सिंधू संस्कृतीसह तत्कालीन प्रगत असलेल्या संस्कृतीचा -हास सुरू झाला. श्रीमंतीची जागा दारिद्र्याने घेतली हे उत्तर-हरप्पन संस्कृतीच्या अवशेषांवरून लक्षात येतं. याच भागात दर हजार-बाराशे वर्षांनी ओलं आणि सुकं चक्र आल्याचा इतिहास नोंदवला गेला आहे.

आज कोणाचा विश्वास बसणार नाही पण महाराष्ट्राचं पुरा-पर्यावरण हे चांगलंच पावसाळी होतं. इतकं की महाराष्ट्रातील बहुतेक जमिनी पानथळ होत्या. पानघोड्यांसारखे प्राणी त्यात सुखनैव विहार करत असत. नंतर मात्र कोरडं आणि निमपावसाळी चक्र सुरू झालं. त्यातही ओली आणि सुखी आवर्तनं येतच राहिली. सन १०२२पासून महाराष्ट्रात मोठे दुष्काळ पडू लागले. ११९६चा दुर्गाडीचा दुष्काळ तर तब्बल १२ वर्षं टिकला. मानवी वसाहतींची वाताहत याच काळात झाली. महाराष्ट्रीय संस्कृतीतही आमूलाग्र बदल होऊ लागले. यानंतर १६३०पर्यंत असे छोटे-मोठे २५० दुष्काळ महाराष्ट्रात पडल्याची नोंद व्ह्यन ट्विस्ट नामक एक डच व्यापारी करतो. १६३० सालच्या दुष्काळाचं हृदयद्रावक वर्णन तुकोबारायांनी करून ठेवलंच आहे. तेव्हाही पुण्यासकट गावंच्या गावं ओस पडली होती. पोट भरायला लोक जिकडे तिकडे भटकत होते. मोरलँड नावाचा इतिहासकार सांगतो की १६३०च्या दुष्काळात एक शेर रत्नं दिली तर मोठ्या मुश्किलीने एक शेर कुळीथ मिळत असे.

 

आताही मोठमोठ्या धरणांमुळे पाण्याचा प्रश्न सुटला आहे असे शहरी लोकांना वाटत असले तरी भविष्यात तिसरे महायुद्ध झाले तर ते केवळ पाण्यामुळेच होईल असे अनेक विद्वान म्हणत असतात. अन्नसुरक्षेचा प्रश्न आजच भयावह बनलेला आहे. शेतीची उत्पादन क्षमता आता कमाल पातळीवर गेली असून आता अन्न-धान्य उत्पादनात दरवर्षी १% पेक्षा अधिक वाढ होणे शक्य नाही असे जागतिक कृषीतद्न्य म्हणत असतात. त्याच वेळेस नादिया ड्रेकसारख्या पर्यावरणतज्ञही म्हणतात की आज बारा जैव प्रजाती रोज नष्ट होत आहेत. याच नष्ट होणा-या प्रजातींच्या रांगेत आज मनुष्यही उभा आहे हे मात्र कोणी लक्षात घेत नाही हे दुर्दैव आहे. कोरोनाच्या आपत्तीमुळे तरी जग शहाणे होईल अशी एक आशा होती पण ती फोल ठरल्याचे आपल्याच लक्षात येईल.

 

मनुष्याने औद्योगिक क्रांतीनंतर नैसर्गिक साधनस्त्रोतांचा बेसुमार उपसा करत निसर्गाचे संतुलन पुरते घालवलेले आहे. पुढे हा वेग वाढताच राहील. दुसरी बाब अशी की माणसाने कृत्रीम साधनांच्या बळावर आपले आयुष्यमान वाढवले असले तरी लोकसंख्येचे प्रमाण हे नैसर्गिक समतोलाशी विसंगत बनलेले आहे. पर्यावरणाबाबत सारेच जरी बोलत असले तरी प्रत्यक्षात प्रामाणिक प्रयत्नांची वानवा आहे हे आपण नुकत्याच झालेल्या पॅरिस कराराची कशी लगोलग वासलात लावायचे प्रयत्न सुरु झाले त्यावरून लक्षात येईल. एकंदरीत जीवसृष्टीला लायक असलेला हा एकमात्र पृथ्वी नामक ग्रह, पण त्यावरील अत्याचार "अमानवी" म्हणता येतील असेच निघृण आहेत. यामुळे सर्वच प्रजातींच्या एकंदरीतच जगण्याच्या पद्धती, जैविक संरचनेतील बदल आणि त्यातून उद्भवणारी संकटे यातून आपण स्वत:च स्वत:साठी विस्फोटक "जैविक बॉम्ब" तयार करत नेत असून त्यात आपलाच नव्हे तर अन्य जीवसृष्टीचाही विनाश आहे हे आपल्या लक्षात येईल.

 

नैसर्गिक कारणाने, उत्क्रांतीच्या टप्प्यांवर आपल्या पुर्वज मानव प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. निएंडरथल मानव नष्ट होऊन फार फार तर ४० हजार वर्ष झालीत. आजचा माणुस अवतरून फारतर दीड लाख वर्ष झालीत. सहा अब्ज वर्षांच्या पृथ्वीचा इतिहासात ही दीड लाख वर्ष म्हणजे अत्यंत किरकोळ आहेत. पण आजच्या आहे त्या होमो-सेपियन प्रजातीच्या माणसातून किंवा आहे हा मानव नष्ट होत नव्याच जैविक-संरचनेतुन पुढचा नवा मानव उत्क्रांत होईल अशी नैसर्गिक स्थितीच जर आम्ही ठेवली नाही तर मानव-प्रजातीचा प्रवाह कोठेतरी थांबणार अथवा हे नक्कीच आहे. आणि या प्रदुषित पर्यावरनातून समजा नवा मानव उत्क्रांत झाला तरी तो बौद्धिक व शारिरीक दोषांनी पुरता ग्रासलेला नसेल असे कशावरून? आणि समजा तो त्या प्रदुषित स्थितीला तोंड देण्यास समर्थ जरी बनला तरी त्याचे जैव विश्व मात्र अत्यंत आकुंचित झालेले असेल.

 

आपल्याला शाश्वत जीवनशैलीचाच अंगीकार करत आज बिघडत गेलेले पर्यावरण किमान आहे असेच राहील हे पाहिले पाहिजे. उंटावरची शेवटची काडी कधी पडेल हे सांगता येणे अशक्य आहे करण अखिल जीवसृष्टीच परस्परांशी अशा साखळीत गुंतलेली आहे की नेमकी कोणती कडी तुटली तर सर्वविनाशक चेन रिऍक्शन सुरू होत संपुर्णच कडेलोट होईल हे सांगता येणार नाही. विज्ञानाचा आधार हा विशिष्ट मर्यादेपर्यंतच असू शकतो कारण विज्ञानालाही आजच्या मानवी प्रजातीच्या बौद्धिक सर्वाधिक झेपेच्या मर्यादा आहेत हे विसरून चालणार नाही. हव्यासखोरीत अडकून आपल्या मर्यादा न ओळखण्याची गंभीर चूक आपण करीत आहोत. आपल्याला या उंबरठ्यावर आलेल्या जगबुडीपासून सावध व्हायला हवे!

 

-संजय सोनवणी 

Saturday, December 10, 2022

जागतिकीकरण आणि आपण

  

 



आधुनिक काळात जागतिकीकरण हा परवलीचा शब्द बनलेला आहे. यामुळे जग हे एक ग्लोबल खेडे बनले आहे असे सातत्याने म्हटले जाते. जागतिकीकरणाचे भले-बुरे परिणामही नेहमी चर्चेत असतात. जागतिकीकरणामुळे स्थानिक संस्कृती प्रदूषित होत आहेत असेही प्रचार केले जातात. पण जागतिकीकरण नवीन नाही हे मात्र लक्षात घेतले जात नाही. पुरातन काळी जेंव्हा आंतरराष्ट्रीय व्यापार खुष्कीच्या मार्गाने व नंतर सागरी मार्गानेही सुरु झाले तीच जागतिकीकरणाची प्राथमिक सुरुवात होती. भारतातुन रेशमी/सुती वस्त्रांपासुन ते मसाल्यांपर्यंतचे पदार्थ अरबस्थान, ग्रीस, इजिप्त, चीन अशा वेगवेगळ्या जात व तिकडुन सोने, रेशीम, घोडे, ते मद्यादि अगणित वस्तु भारतात येत असत. व्यापाराबरोबरच संस्कृतीचेही आदान-प्रदान होत असे. किंबहुना परस्पर संपर्कामुळे तसे होणे अपरिहार्यच होते. यात धार्मिक संकल्पनांचीही उधार-उसनवारी होती. उदा. सूर्य पुजा ही भारतियांनी पश्चिम आशियातुन मगी लोकांकडुन घेतली. पारशी, बौद्ध, इस्लाम इत्यादी धर्म युरेशियासहित आफ्रिकाभर पसरले ते या व्यापारी मार्गांवरून सुलभ झालेल्या दळणवळनातून. अगदी येशू ख्रिस्तही व्यापारी तांड्यांसोबत भारतात आला होता असे वीरचंद गांधींसारखे विद्वान म्हणतात. बौद्ध भिक्षुंनी व्यापारी मार्गांवर तांड्यांसोबत जातच मध्य आशिया ते चीनपर्यंत बौद्ध धर्म पसरवला. वैद्न्यानिक संकल्पना, मुलभूत औषधी व खगोल विज्ञान ते अनेक शास्त्रीय संकल्पना सर्वत्र पसरायला सहाय्य मिळाले ते या व्यापारी मार्गांचेच. वनस्पती-प्राणी ते वस्त्र-प्रावरणाच्या शैलीही यामुळे पसरल्या. स्थानिक शिल्पकला, वास्तुकला यावरही मोठा प्रभाव पडला.

हे येथेच थांबले नाही. संपर्कामुळे व अपरिहार्य गरजेपोटी परस्पर भाषांतही एकमेकांचे शब्द मिसळत गेले. सैनिकी हालचालींनाही व्यापारी मार्गांनी साथ दिली. अलेक्झांडरचे भारतापर्यंत आलेले आक्रमण असो कि चंगेझखानाचे संपूर्ण आशीयावरचे आक्रमण, तेही या मार्गांनीच झाले. खरे तर व्यापारी मार्ग हे जागतिक इतिहासाचे सक्रीय साक्षीदार राहिलेले आहेत.

जगभर अनेक संस्कृत्यांनी कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या संस्कृतीवर राज्य तरी केले वा गुलाम तरी झाल्या. रोमने प्रदिर्घ काळ युरोप व उत्तर आफ्रिका ते आशिया खंडाच्या काही प्रदेशावर साम्राज्य गाजवले. त्यातुनही त्या भागांत रोमनांश संस्कृती निर्माण झाली. तसेच त्यापुर्वी ग्रीकांश संस्कृत्या बनल्याच होत्या. भारतात ग्रीक, शक, हुण, कुशाण यांनी प्रदिर्घ काळ राज्ये गाजवली...अर्थात त्यांनी येथील संस्कृतीचा काही भाग उचलला तर त्यांच्या संस्कृतीचा काही भाग एतद्देशीयांनी स्वीकारला. ही सांस्कृतिक सरमिसळ सातत्याने होत राहिलेली आहे. यालाच आपण जागतिकीकरण म्हणतो.

 म्हणजेच जगाला जागतिकीकरण नवे नाही. फार तर एवढेच म्हणता येते कि जौद्योगिकरणापुर्वी त्याचा वेग अत्यंत मंद होता तर औद्योगिक क्रांतीनंतर, म्हणजे अठराव्या शतकानंतर तो वाढला. संगणक व माहितीजालाच्या क्रांतीनंतर तर तो वेग एवढा वाढला आहे कि एखाद्याला भोवळच यावी. जागतीकीकरण हे मानवी विकासात जसे सहायक झालेले आहे तसेच ते कधी कधी संस्कृतीप्रवाहाला रोखणारेही झालेले आहे. असे असले तरी जागतिकीकरणाचे महत्व कमी होत नाही. ते मानवी जगाला नवीनही नाही. जोवर मानवात आर्थिक आणि राजकीय/धार्मिक प्रेरणा जिवंत आहेत तोवर मनुष्य नवनव्या बाजारपेठा शोधतच राहणार व त्यात विक्रेय अशा वस्तूंचे उत्पादन (व सेवाही) निर्माण करताच राहणार. मानवाचा हाच इतिहास राहिलेला आहे आणि आज काही नवे होत आहे असे नाही याचेही आपल्याला भान असले पाहिजे. राजवट कोणाची आहे त्यावर व्यापार वाढतो किंवा थांबतो असे साधारणपणे मानले जाते. व्यत्ययाचे असे क्षण येत असले तरी लोक नव्या व्यवस्थांशीही जुळवून घेतात ते केवळ गरजेपोटी.

आपला वायव्य प्रांत प्राचीन काळापासून विविध सत्तांच्या तडाख्यातून गेला आहे. तरीही तेथे तक्षशिलेसारखी रेशीम मार्गावरची महत्वाची व्यापार केंद्रे होतीच. तक्षशिला आज आपल्याला माहित असते ती तेथील प्राचीन विद्यापीठामुळे. पण या विद्यापीठाला दान देणारे बव्हंशी मार्गावरून व्यापार करणा-या व्यापारी श्रेण्या असत. त्या काळात नाणी पाडण्याचे अधिकारही श्रेण्यांना असत असे देशभरात सापडलेल्या नाण्यांवरून लक्षात येते. तक्षशिलेच्या गांधार प्रांतात श्रेण्यांना गांधारी प्राकृतात नेगम अथवा नेकम असे म्हणत असत. या नाण्यांवरील छाप खरोस्टी लिपीतील आहेत.  नंतर मात्र शक, ब्यक्ट्रियन अशी तत्कालीन परकीय सत्तांनी पाडलेली नाणी दिसतात. याचा अर्थ वायव्य प्रांत परकीय अमलाखाली गेलेला होता. पण व्यापार थांबला असे मात्र दिसत नाही. तक्षशिला काबुल-कंदाहार पासून बाल्खपर्यंत येथून जसा व्यापार केला जाई तसाच गिलगिटच्या दिशेने मिंटाका मार्गाने मध्य आशियाशी व्यापार होत असे. त्यामुळेच ते या मार्गांवरील महत्वाचे केंद्र होते आणि त्यामुळेच ते भरभराटीला आलेले होते हे आजही तेथे सापडलेल्या अवशेषांवरून लक्षात येते. सहाव्या शतकात मात्र हुणांच्या आक्रमणात हे शहर व तक्षशिलेच्या विद्यापीठासहित पूर्ण उध्वस्त करण्यात आले. तरीही व्यापारी गप्प बसले नाहीत. त्यांनी पुरुषपूर (सध्याचे पेशावर) हे व्यापाराचे केंद्र बनवले व व्यापार पुन्हा भरभराटीला आणला. थोडक्यात आपत्ती व्यापाराला आणि म्हणून जागतिकीकरणाला थांबवू शकत नाही. किंबहुना मानवी दुर्दम्य आकांक्षा त्याला सर्व आपत्तींवर मात करायला शिकवत असतात.

सध्या चीन पुरातन व्यापारी मार्गांचे पुनरुज्जीवन करत आहे. भारताशी त्याचे झालेले सारे संघर्ष हे केवळ पुरातन व्यापारी मार्गांवर स्वामित्व मिळवण्यासाठी झाले व होत आहेत हे सहज लक्षात येते. भारतही मध्य आशियाशी खुश्कीच्या मार्गाने कसे व्यापारी संबंध वाढवता येतील या प्रयत्नात आहे. पूर्वेशी जोडले जाण्यासाठी स्टिलवेल मार्ग बांधायचा प्रयत्नही त्यासाठीच आहे परंतु त्यात दुर्दैवाने अद्याप यश आलेले नाही. असे असले तरी चीनला जोडणा-या चौदा हजार फुट उंचीवरील नथू-ला खिंडीसाठी १९६७ साली झालेल्या लढ्यात भारतीय सैन्याने ही खिंड राखली. आता ही खिंड चीनशी व्यापारासाठी काही प्रमाणात खुली आहे.

खरे तर जागतिकीकरण हे एकतर्फी असू शकत नाही. ते तसे असणे हा जागतीकीकरण या शब्दाचा अवमान आहे. पण भारताच्या दृष्टीने पाहिले तर सध्याचे जागतिकीकरण ब-याच अंशी एकतर्फी आहे असे आपल्या लक्षात येईल. प्राचीन व्यापार हा दुहेरी होता. भारतीय उत्पादनांना जागतिक बाजारपेठ होती. आयातही त्यामुळे परवडणारी व भारताच्या श्रीमंतीत भर घालणारी होती. त्याच बरोबर सांस्कृतिक आदान-प्रदानही स्वेच्छेचा मामला होता. आता तशी स्थिती राहिली आहे असे दुर्दैवाने म्हणता येत नाही.

आता व्यापारी मार्गांवरच अवलंबून राहिले पाहिजे अशी स्थिती नाही. त्यामुळे भौगोलिक कारणांमुळे आशियाशी आपण सरळ जोडले जावू शकत नाही. हे वास्तव मान्य करूनही आपण उत्पादन व व्यापार वाढवू शकतो. त्यासाठी भारतीय लोकांना आपले प्राचीन काळी अस्तित्वात असलेली, जिवंत असलेली विजीगिषु, उत्पादक आणि व्यापारी वृत्ती जागृत करावी लागेल. नोक-यांची मानसिकता सोडून उत्पादक मानसिकता जोपासावी लागेल. तरच जागतिकीकरण ख-या अर्थाने भारताला देणा-यांच्या बाजूचेही बनवेल. अन्यथा आज आपली अवस्था केवळ घेणा-यांच्या बाजूची आहे तशीच राहील. ज्ञानात असो, संस्कृतीत असो कि उत्पादकतेत असो, आमचे आज जगाला भरीव योगदान काय हा प्रश्न आजच्या नव्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आम्हाला पडला पाहिजे. पण आम्ही वृथाभिमानाच्या वांझ गप्पा करत वर्तमान व भविष्य खराब करत राहण्यात जोवर धन्यता मानत राहू तोवर जागतिकीकरणात ख-या अर्थाने आपले स्थान निर्माण करू शकणार नाही हेही तेवढेच खरे!

-संजय सोनवणी

Friday, December 9, 2022

मिथके जेंव्हा इतिहास बनू लागतात...


 

वेडात दौडले वीर मराठे सात” वरून अनेक अंगाने वाद सुरु आहेत. इतिहासाच्या दृष्टीने पाहिले तर तथ्य वेगळेच असल्याचे लक्षात येते. कृष्णाजी अनंत सभासद यांनी केलेल्या वर्णनानुसार, 'त्यावरि प्रतापराव जाऊन बेलोलखानाशीं गाठले. नेसरीवरी नबाब आला. त्याने गाठीले. मोठे युद्ध झाले. अवकाल होऊन प्रतापराव सरनोबत तरवारीचे वाराने ठार झाले. रण बहुत पाडीले. रक्ताच्या नद्या चालिल्या.' (सभासद बखर) या लढाईत प्रतापराव गुजर यांच्यासोबत त्या युद्धात आणखी सहा वीरांना वीरमरण आलेअशी इंग्रज दुभाषी नारायण शेणवी यांच्या ४ एप्रिल १६७४ रोजीच्या पत्रात नोंद आहे. कोणत्याही विश्वसनीय साधनात इतर सहा वीरांची नावे सापडत नाहीत. त्यामुळे केवळ सात वीर बहलोलखानाच्या फौजेवर चालून गेले आणि बलिदान दिले ही कथा कितीही प्रेरणादायी वाटत असली तरी त्यात ऐतिहासिक तथ्य असल्याची शक्यता दिसत नाही. परंतु इतिहास हा आपल्याकडे नेहमीच वादाचा विषय होताना दिसतो.

 असे घडले...” ही हकीगत सांगतो तो इतिहास अशी आपण इतिहासाची साधारण व्याख्या करतो. पण जे सांगितले जाते त्याचे अनेक पदर असतात. जे सांगितले जाते ते खरेच तसेच्या तसे घडले होते हे ठामपणे सांगता येतेच असे नाही. अगदी पुरावे असले तरी त्या पुराव्यांचे आकलन इतिहासकारपरत्वे वेगळे असते. त्याचे वेगवेगळे अर्थ लावले जातात. पुन्हा पुराव्यांची विश्वासार्हता काय हा प्रश्न असतोच. अनेक पुरावे बदलले जातात किंवा अडचणीचे पुरावे नष्ट केले जातात. इतिहासाच्या अनेक बाबींकडे तर साफ दुर्लक्ष केले जाते. सध्या इतिहासाचे पुनर्लेखन करण्याच्या नादात तर अनेक इतिहास पुसूनच टाकायचे जाणीवपूर्वक प्रयत्न होताना आपल्याला दिसतात. त्यातील भयावहता आपल्या लक्षात अजून आलेली नाही.

बव्हंशी इतिहास हा जेत्यांचासत्ताधा-यांच्या वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणा-यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. आपल्याला आवडतो तोच खरा इतिहास असा समाज असणारे सामाजिक वर्ग असल्याने समाजमनही एकाच आणि समान इतिहासाकडेही वेगवेगळ्या दृष्टीने पाहतो. त्यामुळे इतिहासावरून असंख्य सामाजिक संघर्ष निर्माण होतात. इतिहासाने आपल्याला डावलले आहे अथवा आपल्यावर अन्याय केला आहे असे वाटणारे समाजघटकही संघर्षरत होतात. आपलाच इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करतात. त्यात अनेकदा अभिनिवेश असतो आणि पुराव्यांची सोयीनुसार मोडतोड करत आकलन केले जाते आणि नवाच इतिहास लिहिला जातो. पण तो काय आणि अगदी इतिहासकार म्हणून गांभीर्याने लिहिणा-या अभ्यासक/संशोधक इतिहासकारांनी लिहिलेला इतिहास काययात फार फरक नसतोच.

शिवायभारतीय इतिहासातून सुटून गेलेल्या अनेक बाबी आहेत. आपला इतिहास हा बव्हंशी राजकीय व धार्मिक इतिहास आहे. त्यात सामाजिक  व आर्थिक इतिहासाचा क्वचितच समावेश असतो. इतिहासकारांनी भारतीय इतिहासाची जी कालरेखा गृहीत धरून इतिहासाची जी मांडणी केलेली आहे तीच संशयास्पद असल्याने इतिहासरचनाही विस्कळीत व चुकीची झाली आहे. त्यामुळे भारतीय धर्मेतीहासाची रचनाच साफ बदलून गेलेली आहे. उदा. इसपू. १२०० च्या आसपास भारतात प्रवेशलेल्या वैदिक धर्मापासूनच भारतिय धर्मांचा इतिहास सुरु होतो या मताचा मोठा पगडा इतिहासकारांवर आहे. त्यातून येथील प्राचीन लोकधर्म (ज्याला आपण आज हिंदू म्हणतो) आणि समणव्रात्ययती  या वैचारिक संस्कृतीज्यातून जैनआजीवक आणि बौद्ध हे धर्म निर्माण झाले त्यांच्याही मुळांचा इतिहास झाकोळला गेला आहे किंवा दुषित झाला आहे हे आपल्या लक्षात येईल. वैदिकाश्रयी इतिहासरचना हा भारतीय इतिहास लेखनातील फार मोठा दोष आहे. त्यामुळे आपल्याला सत्याच्या किमान जवळ जाणारा इतिहास मिळत नाही.

असे असले तरी इतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्वाचा घटक असतो हे अमान्य करता येत नाही. किंबहुना इतिहास आपली समाजमानसिकता ठरवण्यात मोठा वाटा उचलत असतो. कोणात गर्व,  स्वाभिमान तर कोनात न्यूनगंड निर्माण करण्याचे कार्यही इतिहास करतो. हे अनेक इतिहास-लबाडांना माहित असल्याने ते इतिहासाचा आपला वर्चस्वतावाद रेटण्यासाठी अविरत प्रयत्न करत असतात. अनेकदा वदंताच इतिहास बनवला जातात. नव्हे त्याच सत्य असून तोच इतिहास आहे असा ग्रह करून दिला जातो. अगदी राम किंवा कृष्ण यांचा पुराकथांना अपरिवर्तनीय ऐतिहासिक सत्य मानत त्यावरूनही सामाजिक संघर्ष पेटवले जातात थोडक्यात इतिहास हा कसा सांगितला गेला आहेकोणी आणि कोणत्या हेतूने सांगितला आहे याचाच पगडा इतिहासावर आहे आणि यावर आधारित असलेले समाजाचे आकलन आहे. आणि असे असले तरी सामान्य माणसांवर वदंतांचा प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा अधिक प्रभाव असतो असे आपल्याला सामान्यतया दिसून येईल.

जे तटस्थपणे इतिहास लिहिण्याचा आपापल्या आकलनानुसार प्रयत्न करतात त्यांचेही अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषन इतिहासकारपरत्वे बदलते असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्य संशोधनामुळे सामाजिक पुर्वग्रहांनारुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते आणि त्यातुन जी वादळे निर्माण होतात तशी पुर्वग्रहविरहितसंपुर्ण ज्ञान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खिळ बसते.

मागे दिल्ली विद्यापीठातुन अभ्यासक्रमात असलेल्या "थ्री हंड्रेड रामायनाज" या रामकथा ही विविध ३०० वेगवेगळ्या प्रादेशिक संस्करणात कशी बदलली आहे याचा शोध घेणा-या ए. के. रामानुजन यांच्या प्रबंधाला काही परंपरावादीपुर्वग्रहांनी मंडित विद्यार्थी संघटनांनी तोडफोड आंदोलने करुन अभ्यासक्रमातुन मागे घ्यायला भाग पाडले होते. महाराष्ट्रात इतिहासावरून आजही कटू संघर्ष सुरूच आहेत. आंदोलने झालेली आहेत. किंबहुना इतिहासाच्या स्वार्थी आकलनातून आणि त्याच्या अतिरेकी अस्मितांच्या अवडंबरातून सामाजिक दुरावे वाढण्यास हातभारच लागलेला आहे. आणि त्याचा नकळत दबाव इतिहासकारांवर येतो आणि त्याचे लेखनस्वातंत्र्य नकळत हिरावले जाते.

 खरे तर इतिहास संशोधनकार्यात कोणतीही ऐतिहासिक व्यक्ती वा तीसंबंधाचे लेखन चिकित्सेला मुक्त वाव देणारे असले पाहिजेतरच इतिहासाचे आकलन समृद्ध होण्यास मदत होवू शकते. परंतु भारतीय जनमानसाला अशी चिकित्सा सहसा मान्य नसते. आपल्याला जसा आवडतो तोच आणि तसाच इतिहास या आग्रहामुळे आणि मागणी तसा पुरवठा करू पाहणा-या “राजकारणी” इतिहासकारांमुळे इतिहासाचे काय होते हे आपण सहज पाहू शकतो.


खरे तर इतिहासाच्या गाभा-यात श्रद्धेला वा पुर्वग्रहांना मुळी प्रवेशच नसतो. निखळ सत्त्याचा शोध हेच इतिहासकाराचे कार्य असायला हवेमग व्यक्तीगत आकलन भिन्न का असेना. जे सामोरे येईल ते सत्य किती का कटु असेनात्याची निर्भीड मांडनी केलीच पाहिजे. परंतु जातीय झुंडशाह्या मुलतत्ववादी बनत अशा मांडण्यांना अनेकदा सुरुंग लावतात. परंतु हाच छुपा का होईनामुलतत्ववादी दुर्गुण बव्हंशी इतिहासकारांत घुसला असल्याने त्यांच्या संशोधनाला व त्याहीपेक्षा त्यांच्या मांडनीला जातीय पुर्वग्रहांची पुटे चढलेली आपल्याला दिसतातमग ते कोणत्याही जाती/धर्माचे का असेनात.

आपला बहुतेक इतिहास मिथकेदंतकथा आणि आत्मप्रौढी किंवा न्युनगंडात्मक आणि बचावात्मक पद्धतीने लिहिला गेला असल्याने आपल्या इतिहासाचे सर्वांगीण तथ्यात्मक दर्शन घडेल आणि त्याच पद्धतीने आकलन करून घेतले जाईल अशी स्थिती नाही. आपला अगदी मध्ययुगीन इतिहाससुद्धा सत्याचे केवळ धूसर दर्शन घडवतो तर मग प्राचीन इतिहासाची बाब वेगळी. मिथकांना काटेकोरपने वगळत अथवा त्यांची नि:पक्ष चिकित्सा करत तटस्थ इतिहास मांडायची आपल्या इतिहासकारांना मुळात सवयच नाही. त्यामुळे आपल;याला निखळ इतिहास आहे कि नाही हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

-संजय सोनवणी

Saturday, December 3, 2022

भाषेचा जन्म कसा झाला?


 


जगात भाषेद्वारा अभिव्यक्त होणारा एकमेव प्राणी म्हणजे मनुष्य होय. किंबहुना त्याला भाषा येणे हेच त्याला अन्य प्राणीविश्वापेक्षा वेगळे पाडते. असे असले तरी भाषेचा जन्म कसा झाला याबाबत अजूनही सर्वसंमत सिद्धांत जन्माला आलेला नाही. जगातील सर्व मानवी जमाती भाषेच्या जन्माचे श्रेय निशंकपणे परमेश्वराला देत असतात. परमेश्वरानेच भाषा निर्माण केली म्हटले कि पुढील प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नसते. पण आधुनिक काळात मात्र भाषेच्या जन्माबाबत काही सिद्धांत जन्माला आले आणि त्यावर हिरीरीने चर्चाही होत असतात. याचे करण म्हणजे कोणती भाषा श्रेष्ठ हा उपप्रश्न ओघाने निर्माण होतो आणि आपापल्या भाषेचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाषेचाच उपयोग करायचा असतो किंबहुना त्यासाठीच भाषेचा उदय कसा झाला असावा व तिच्या प्रगतीचे टप्पे काय असावेत याबाबत सतराव्या शतकापासुनच तत्वद्न्य,  ते भाषाविद चर्चा करु लागले होते. त्यांच्यात एकमत न होता विवादच वाढु लागल्यानंतर १८६६ मद्धे लिंग्विस्टिक सोसायटी ओफ प्यरिसने या विवादावरच बंदी घालण्याइतपत मजल गाठली होती. आजही भाषांचा विवाद कधी कधी टोकाला जातांना आपण पाहतो. “संस्कृत भाषाच आधीची असून तिच्यापासून सर्व भाषा निर्माण झाल्या” असे अशास्त्रीय मतही हिरीरेने प्रचारित केले जाते तेही वर्चस्ववादाच्या भावनेपोटीच. पण मुल प्रश्न अनुत्तरीतच राहतो तो हा कि मुळात भाषेचा जन्म कसा झाला ती क्षमता मनुष्यप्राण्यातच का?

जगात आजमितीला ६८०९ (किंवा अधिक)  भाषा आहेत. काही भाषा मृत झाल्या असुन काही मृत होण्याच्या मार्गावर आहेत. जोवर ती भाषा बोलणारा मानवी समुदाय पुरेपुर नष्ट होत नाही तोवर अन्य भाषांचे कितीही आक्रमण झाले तरी मुळ भाषेचा गाभा त्या-त्या भाषेचे अनुयायी जपुन ठेवतात हेही एक वास्तव आहे. भाषा ही मानवी मनाची मुलभुत (Innate) गरज आहे असे मत सिग्मंड फ्राईड याने स्पष्ट नोंदवुन ठेवले आहे आणि त्यात अमान्य करण्यासारखे काही नाही.

माणसाचे नैसर्गिक वैशिष्ट्य म्हणजे त्याला विविध व गुंतागुंतीचे आवाज काढता येतील असे स्वरयंत्र लाभलेले आहे. तो निसर्गातील अनेक आवाजांची नक्कलही करू शकतो. भाषेच्या जन्माच्या आणि विकासाच्या इतिहासात स्वरयंत्राने मोलाची कामगिरी बजावलेली आहे. पण केवळ आवाज काढता येतात तेवढ्याने भाषेचा जन्म होऊ शकत नाही. मानवी उत्क्रांतीच्या कोणत्यातरी टप्प्यावर भाषा अचानक अवतरली असे काही विद्वान मानतात.  नोआम चोम्स्की या मताचा पुरस्कर्त्ता असून या मतामागे प्रामुख्याने मानवी गुणसुत्रांत होणारे काही अचानक बदल त्याने ग्रुहित धरले होते. मानवी शरीरातीलविशेषता: मेंदुतील जैवरसायनी बदलांमुळे भाषेचा उद्गम झाला अशा या सिद्धांताचा एकुणातील अर्थ आहे. अजून एक विचारप्रवाह आहे तो म्हणजे भाषा हा मानवी मनातील (मेंदुतील) मुलभुत गुणधर्म असून गुणसुत्रांनीच त्याची नैसर्गिक बांधणी मानवी मनात केली आहे व त्यामुळेच भाषेंचा जन्म झाला आहे. किंबहुना माणसात भाषेची गुणसूत्रे उपजतच असतात असा एकूण या म्हणण्याचा मतितार्थ आहे.

अलीकडेच टेकुमेश फिच यांनी "मातृभाषा" सिद्धांत डार्विनच्या नाते-निवड सिद्धांताचा आधार घेत मांडला होता. या सिद्धांतानुसार आई आणि मुल यांच्यातील संवादाच्या निकडीतुन भाषेचा उदय झाला असावा.  हीच पद्धत निकटच्या नातेवाईकांसाठीही वापरली गेल्याने भाषेच विस्तारही झाला असावा असे हा सिद्धांत सुचवतो. अर्थात या सिद्धांतावरही आक्षेप घेतले गेले. कारण अपत्याशी संवाद अन्य प्राणीजगतही साधायचा प्रयत्न करतेचपण त्यातून भाषेचा उगम झालेला नाही हे एक वास्तव आहे.

मानवी मेंदू आणि भाषा यात निकटचा संबंध असावा असे वाटून काही शास्त्रद्न्य मेंदुच्याच अंतरंगाचा अधिक अभ्यास करु लागले. मानवी मेंदूतील ब्रोका आणि वेर्निक क्षेत्र हे भाषेच्या क्षमतेवर परिणाम करतात हे लक्षात आले असले तरी भाषेचा जन्म कोठून होतो या प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. अन्य प्राण्यांमध्येही अत्यंत मर्यादित का होईना पण काही भाषा असते. ती काही शब्द व हावभाव यापुरती मर्यादित असते हा अनुभव आहेच. म्हणजे अभिव्यक्तीची मुलभूत प्रेरणा आणि भाषेच्या जन्माचा जवळचा संबंध असला पाहिजे हे तर निश्चित आहे.  आदिम काळातील भयजनक आणि आनंदाचीही स्थिती त्याला अभिव्यक्तीसाठी प्रेरित करत त्यातून जगभरच्या मानवी समुदायांमध्ये भाषेचा जन्म झाला असावा.

मानवाचे मुलभूत वैशिष्ट्य म्हणजे तो विचार करतो. तो भावनाशील प्राणी आहे. निसर्गाने त्याला स्वरक्षणासाठी अन्य नैसर्गिक हत्यारे न दिल्यामुळे समूह करून राहणे त्याला भाग होते. या सामुहिक निकडीतून परस्पर संवादासाठी अर्थपूर्ण शब्दांची निर्मिती करत आदिम शब्दसंग्रह तयार झाला असावा. हे आदिम शब्द हेच भाषेचे निर्मितीकारण ठरले. त्यातून प्राथमिक बाबी, उदा. भूक, तहान, झोप, शत्रू, धोकेदायक आणि मित्र प्राणी यांचे निर्देश करता येणे सोपे झाले आणि उपयुक्ततेमुळे तिचा जाणीवपुर्वकही विकास सुरु केला. आपापसातील टोळ्यांच्या सहचर्यातून शब्दांची देवान-घेवाण करत शब्दसंग्रहही वाढत गेले. टोळीजीवनातून मनुष्य बाहेर पडल्यावर नव्या जीवनाशी जुळवून घेण्यासाठी त्याला अधिक शब्दांची गरज पडली आणि त्यातूनच प्राथमिक व्याकरणही निर्माण झाले. जीवनातील जटीलता जशी वाढते तशी भाषाही नवनव्या शब्दांची निर्मिती करत अर्थवाहकता निर्माण करण्यासाठी काटेकोर व्याकरणाची निर्मिती करते. मानवी भावनिक आंदोलने टिपण्याच्या उर्मीतुनही भाषा प्रगल्भ होत जाते. मानवी जीवनातील शेतीचा शोध हा जेवढा महत्वाचा टप्पा आहे तेवढाच हा टप्पा भाषेच्या विकासात मोठा हातभार लावणारा टप्पा आहे. भाषा आणि मानवी संस्कृती हातात हात घालूनच चालत आलेली आहे.

थोडक्यात संवादाची निकड हेच मानवी भाषिक क्षमतेला विकसित करणारे कारण झाले. या निकडीची तीव्रता जेवढी जास्त तेवढीच भाषेची विकसनशीलताही जास्त. खरे तर साधारणपणे एकाच कोणत्यातरी आदीम काळात कोणातरी माणसाच्या तोंडातून निघणा-या शब्दाला सामुहिक मनाने अर्थ दिला, जतन केला तेथेच भाषेचा जन्म झाला. भाषा ही सामुहिक मनाची निर्मिती आहे. त्यामुळेच एका भागात राहणा-या लोकांना तेथील भाषा समजते, संवाद करता येतो. अन्य भाषा शिकल्या जातात आणि शब्द-व्याकरणही समृद्ध होत जाते. प्रमुख जनसमुहांपासून अलग राहणा-या लोकांची भाषा मात्र तेवढी विकसित होत नाही कारण त्यांचे जीवनही तेवढे गुंतागुंतीचे नसते. कोणातरी एखाद्या मानवी गटाने श्रेष्ठ भाषा निर्माण केली आणि ती इतरांवर लादली ही मते आता कालबाह्य झाली आहेत. या मतांमागे केवळ वर्चस्वतावादी भावना होत्या. भाषा या जागतिक सामुहिक मानसिकतेतून व आपापल्या प्रादेशिक भूगर्भशास्त्रीय प्रभावातील वैशिष्ट्यपूर्ण मानसिकतेतून निर्माण झाल्या आहेत. म्हणून जगात भाषांचे प्रमाणही मोठे आहे. पण जसजसे जग अजून जवळ येत जाईल तसतसे भाषांची संख्याही कमी होत जाईल आणि सध्याच्या भाषांमधूनच एकच एक वैश्विक भाषेची निर्मिती होईल.

कोणत्याही भाषेचा अभिमान असणे आणि भाषाश्रेष्ठत्वाचा अहंकार असणे यात फार मोठा फरक आहे. भाषा हे मानवी संस्कृतीचे संचित असल्याने त्याबद्दल अभिमान बाळगणे योग्यच. पण भाषेचा अहंकार बाळगत अमुक एकच भाषा श्रेष्ठ मानणे अमानवीय आहे. जगातील एकही भाषा आज पूर्णपणे स्वतंत्र राहिलेली नाही एवढा अन्य भाषिक प्रभाव सर्वच भाषांनी तिच्या निर्मिती काळापासून पचवलेले आहेत. भाषा हे संवादाचे, अभिव्यक्तीचे मोलाचे साधन आहे आणि भाषेमुळेच आपण “माणूस” ठरतो हे विसरता कामा नये.

-संजय सोनवणी


जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...