Friday, June 10, 2022

जर पुरोगामित्व बदनाम केले जात असेल तर जबाबदार कोण?


 

पुरोगामी हा शब्द फुर्रोगामी असा वापरत त्या शब्दाला जाणीवपूर्वक बदनाम केले जाते आहे. सेक्युलर हा शब्द फेक्युलर असा उच्चारून सेक्युलरीझमला हेतुपुरस्सर बदनाम केले जाते आहे. एकंदरीत या प्रतिगामी झुंडी आपल्या ट्रोलशक्तीच्या आधाराने पुरोगाम्यांना नामोहरम करायचा प्रयत्न करत आहेत असा आरोप केला जातो. या संदर्भात अनेक वादळी चर्चाही केल्या जातात. या प्रतीगाम्यांना प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्नात पुरोगामीही तेवढ्याच जोमाने प्रतिगामी गटांवर फॅसिस्ट अथवा भक्त हा शिक्का मारत त्यांना बदनाम करत बसतात, एकुणातच पुरोगामीही झुंडी बनवत पुरोगामित्वाचे मुख्य लक्षणच हरपून बसतांना दिसतात.

 

येथे मुद्दा हा आहे कि पुरोगामीपणा म्हणजे नेमके काय? सेक्युलरिझम म्हणजे नेमके काय? या प्रश्नांची उत्तरे विचारायला गेले तर कथित पुरोगामी आणि प्रतीगामीही उघडे पडतात कारण त्यांना या संज्ञाचा अर्थ नीटपणे माहित असतोच असे नाही. पुरोगामी सर्व मानव समान आहेत, माणसात परिवर्तन होत असते हे जाणून त्या मानवतावादी परिवर्तनासाठी प्रबोधनात्मक कार्य लेखन, वक्तृत्व व आपल्या वर्तनातून करत असतात. पुरोगामीपणा जीवनाची सारी अंगे स्पर्शतो. मग ती भौतिक असोत, ज्ञानात्मक असोत वा निखळ वैचारिक असोत. जोही कोणी काल होता त्या स्थितीपेक्षा आज वैचारिक/ज्ञानिक/आर्थिक उत्थान करीत उद्या याहीपेक्षा मोठा पल्ला गाठायचा प्रयत्न करत असतो आणि अधिकाधिक मानवतावादी जो होत जातो त्याला पुरोगामी म्हणता येते. तो सार्वजनिक जीवनात कोणत्याही धर्माचे अवडंबर माजवत नसल्याने वा कोणत्याही धर्मावर द्वेशापायी तुटून पडत नसल्याने तो इहवादी, म्हणजेच सेक्युलर आहे असे मानले जाते.

 

 पुरोगामी हा परिवर्तनवादी असतो हे ओघानेच आले. स्वत:सोबतच समाज आणि एकुणातील शोषणकारी  व्यवस्था यात बदल घडवण्याचा तो प्रयत्न करीत असतो. सर्व समाजच एका व्यापक ध्येयाकडे वाटचाल करेल अशी आशा तो बाळगून असतो. त्यात द्वेष, विखार यांचा लवलेशही नसतो. समाज पुरोगामी, परिवर्तनवादी बनावा असा प्रयत्न करणे हे सुदृढ समाज निर्मितीसाठी आवश्यक आहे असे विवेकी लोक मानतात. याउलट अतिरेकी राष्ट्रवादाची/धर्मवादाची निर्मिती करत लोकांना एकव्युहात आक्रमकपणे सामावून घेण्याचा प्रयत्न करत, अर्थवाद, वंशवाद अथवा धर्मवादाला आधारास घेत जी सामाजिक व राजकीय व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो त्याला फॅसिझम म्हणतात व या तत्वज्ञानाच्या एकनिष्ठ पाईकास फॅसिस्ट असे म्हणतात. यात मानवी स्वातंत्र्य, मानवता, विचारांचा खुलेपणा याला स्थान नसते. फॅसिझम कोणत्यातरी तत्वाला, धर्माला वा अर्थरचनासिद्धांताला टार्गेट करत त्याला शत्रू घोषित करत असतो. आपली सारी व्युहरचना त्या वास्तविक अथवा काल्पनिक शत्रुच्या नायनाटासाठी वापरत समाजात संघर्ष निर्माण करत वर्चस्वतावादाला जिंकण्यासाठी मदत करत असतो. 

 

प्रत्यक्षात आजकाल पुरोगामीपणाची व्याख्या बव्हंशी प्रतीगामीपणात विरघळून गेली आहे असे आपल्याला वास्तव जीवनात डोकावून पाहिले तरी सहज लक्षात येईल. यातून पुरोगामीपणा राहिलाच कोठे हा प्रश्न निर्माण झाल्यास आश्चर्य नाही.

 

धर्मांध जसे नेहमीच टोळीवादाचा आश्रय घेतात तसेच जर पुरोगामी म्हणवनारे गटही टोळीवादालाच शरण जात आपापल्या अवांच्छणीय अज्ञानातून जन्मलेल्या स्वार्थांना साध्य करण्यासाठी झटत असतील तर त्याला पुरोगामी कसे म्हणता येईल? अशाने प्रतिगामित्व अथवा फॅसिझम संपणार नाही तर तो दुप्पट गतीने वाढत सर्वांनाच आपल्या विळख्यात घेत सर्वनाश करेल यात शंका बाळगण्याचे काही कारण नाही.  झुंडशाही ही पुरोगामीपनात/परिवर्तनतावादात बसत नाही याचे भान आपल्याला यायला हवे. प्रतिगामी जे करतात तेच पुरोगामी करत असतील तर दोघेही प्रतिगामीच राहतील आणि परिवर्तनाची शक्यताच संपुन जाईल हे आपल्याला समजायला हवे. “अमुक जातीचे/धर्माचे लोक कधीच बदलू शकत नाही” हा विश्वास जेंव्हा सामाजिक चळवळीतील विचारवंत व्यक्त करतात तेंव्हा त्यांचा परिवर्तनाच्या सिद्धांतावरच विश्वास नाही हे स्पष्ट होते. उजवे आणि डावे यातील भेद येथेच गळून पडतो आणि सारे वेगळ्या प्रकारे फॅसिस्टच आहेत असे म्हणावे लागते. कारण परिवर्तनवाद यात कोठेच रहाणार नाही आणि सारेच एका अपरिवर्तनीय आणि म्हणूनच अनैसर्गिक विचारकोठडीत बंदिस्त होऊन जातील.

 

माणुस हाच कोणत्याही सर्जनशील विचारकाचा केंद्रबिंदु असतो. फॅसिस्ट लोकही माणसे असतात. कोणी फॅसिस्ट म्हणून जन्माला येत नाही. मनुष्य प्रवाहपतित होत जेंव्हा एखाद्या विचारधारेचा टोकाचा समर्थक बनतो तेंव्हा तो आपसूक फॅसिस्ट बनलेला असतो. पुरोगामी म्हणवनारेही याच व्याख्येत येतात. मुळात विषय परिवर्तनाचा असतो. मनुष्य एखाद्या विचारधारेच्या टोकाशी जात असेल तर त्याची मानसिकता समजावून घेण्याची जबाबदारी व त्याला बदलवण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी ख-या परिवर्तनवाद्यावर येते. कोणालाही मानवतावादी, स्वतन्त्रतावादी अर्थाने बदलवण्याचा प्रयत्न न करता त्याला सरळ वाळीत टाकने, त्यांना काहितरी लेबल चिकटवून अस्पृश्य मानणे किंवा जी व्यक्ती ज्या आता पटत नसलेल्या गोटातून वा विचारव्युहातून बाहेर पडू इच्छिते तिला झुंडशाही वापरत पुन्हा मुळच्याच गोटात वा विचारव्युहात अमानवीपणे ढकलणे आणि गोटबंदिस्त व विचारबंदिस्त होऊन विरोधकांनाही तसेच करायला भाग पाडणे हा एकविसाव्या शतकातील गंभीर वैचारिक व नैतिक गुन्हा आहे हे आपण समजावून घ्यायला हवे. परिवर्तनाची शक्यताच यामुळे मावळून जाते हे येथे लक्षात घेणे आवश्यक आहे.

 

आपलाच गोट वा विचारव्यूह सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन उभा आहे हा गर्व बाळगत आज कथित प्रतीगामी आणि पुरोगामी एकाच स्तरावर आले आहेत कि काय हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे.

खरे तर सर्वच वैचारिक झुंडी एका परीने फॅसिस्टच झालेल्या आहेत असे म्हनायला प्रत्यवाय नाही. विचारांचा कडवेपणा हे फॅसिस्ट असल्याचे लक्षण असेल तर पुरोगामी म्हनवनारे लोकही फॅसिस्टच होत आहेत असे म्हणता येईल.

 

याचे कारण म्हणजे आजकाल सर्व विचारधारा, डाव्या असोत कि उजव्या, त्यांच्यात शेवटी फॅसिस्ट गट बनतांना दिसतात. सारे आपापल्या गटाचे अलिखित संकेत पाळतात व ते म्हणजे गट-विचाराशी "गद्दारी" करायची नाही. अशा गद्दारांना सामाजिक माध्यमांतुन "नारळ देणे" ही नित्याची बाब असते. एवढेच नाही तर कोणत्या ना कोणत्या झुंडीत नुसता प्रवेश मिळवायचा नाहीय तर त्या गटाचे वैचारिक (?) नेतृत्वही करायचे या आकांक्षेने पछाडलेले अनेक तथाकथित विचारवंतही जीवाचा आटापिटा करतांना दिसतात. हा आटापिटा अनेकदा कीव येण्याच्या पातळीवर जातो. ते आपण आपापल्या गटाशी निष्ठावंत राहण्याचा वा आपण आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करतातच पण सर्वांपेक्षा जास्त उग्र भाषा वापरली तरच आपले नेतृत्व उंचावेल असा त्यांचा भ्रम असतो. कोणतीही झुंड शेवटी उग्र होत जात शेवटी फॅसिस्ट बनते ती अशी. यात पुरोगामीपण आणि सेक्युलरिझम कोठे राहतो? आणि सारेच जर कोणत्या ना कोणत्या प्रकारचे प्रतीगामीच होत गेले तर आपले सामाजिक भविष्य काय?

 

यामुळेच जर पुरोगामीपणा आजकाल बदनाम केला जात असेल तर पुरोगामी म्हणवणा-या प्रत्येकाने आपले कोठे चुकते आहे याचे आधी आत्मपरीक्षण केले पाहिजे. आपल्या विचारांना तपासून घेत नवी मांडणी केली पाहिजे. गतकाळातील महनीयांच्याच विचारांना अर्धवट पद्धतीने अंधपणाने शिरोधार्य मानत विचारांत नवी कोणतीही मौलिक भर न घालता भविष्याकडे पाहणे हेही प्रतीगामीपणाचेच लक्षण आहे हे आपल्याला समजावून घ्यावे लागेल.

 

-संजय सोनवणी

Published in Navshakti

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...