Friday, June 10, 2022

दौलत बेग ओल्डी हे नाव कसे पडले?

  


काराकोरम खिंडीच्या जरा आधीच लेह-यारकंद मार्गावरील हिवाळी आणि उन्हाळी व्यापारी मार्ग एकत्र येत. ही जागा खिंडीतून वर येणा-या अथवा खाली जाणा-या व्यापा-यांच्या थांब्याचे ठिकाण होते. त्याचे नाव दौलत बेग ओल्डी कसे पडले याचा इतिहास पाहणे रंजक ठरेल.

सुलतान सैद खान हा यारकंद-खोतान येथील सन १५१४ ते १५३३ या काळात मोगल खानातीचा राजा होता तर दुघ्लक जमातीचा अमीर मिर्झा मोहम्मद हैदर हा त्याचा मुख्य सेनानी होता मिर्झा भारतात मुघल राजवट आणणा-या बाबरचा मामेभाऊ होता व तो इतिहासकार म्हणूनही प्रसिद्ध आहे. त्याने लिहून ठेवल्यानुसार सुलतान सैद खानाचा काळ सुबत्ता आणि शांततेचा होता. सन १५३२मध्ये सुलतान सैद खानने काश्मीर आणि तिबेटला लुटण्यासाठी एक मोहीम काढली. मिर्झा हैदरला सोबत घेऊन तो ससैन्य निघाला. पण काराकोरम खिंड पार करताच तेथील उंचीमुळे विरळ असलेल्या प्राणवायुमुळे व कडाक्याच्या थंडीमुळे तो श्वसनाच्या आजाराने त्रस्त झाला.  बरे होण्यासाठी त्याला  तेथेच काही काळ मुक्काम ठोकावा लागला. बारा झाल्यावर तो पुढे निघाला आणि नुब्रा खोरे त्याने उध्वस्त केले. पुढे सुलतान कारगीलवरून बाल्टीस्तानकडे जायला निघाला तर झोजीला खिंड जिंकून मिर्झा काश्मीरकडे निघाला. बाल्टीस्थानमध्ये वेळीस इस्लामचाच प्रभाव होता. तेथील लोकांनी सुलतानाचे स्वागत केले पण ते होते शिया पंथीय. सुलतान तर कडवा सुन्नी. त्यामुळे त्याने तेथील जनतेवर अनन्वित अत्याचार केले. अनेकांना ठार मारले तर हजारो नागरीकांना गुलाम केले.

दरम्यान मिर्झा हैदर द्रास जिंकून झोजीला खिंड उतरून काश्मीरमध्ये प्रवेशला. तेथील राजाने त्याचे चांगले स्वागत केले. तात्पुरते मांडलिकत्व मान्य करत राजाने सुलतान सैद खानाच्या नावाने नाणीही पाडली. नंतर दोघे परत फिरले व लडाखमध्ये त्यांची भेट झाली. सुलतानाने मिर्झा हैदरला तिबेटवर आक्रमण करण्याची सुचना दिली आणि तो यारकंदला परत जायला निघाला. परत जात असता त्याला पुन्हा श्वसनाच्या आजाराने त्रस्त केले. काराकोरम खिंडीजवळच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यानंतर त्याचा तेथे मृत्यू झाला. त्याला तेथेच पुरण्यात आले. ते स्थान म्हणजेच दौलत बेग ओल्डी. दौलत हा शब्द “दुघ्लक” या जमातनावाचा तर ओल्डी हा ‘उल्डी’ या उघूर शब्दाचा अपभ्रंश असून मिर्झा हैदरनेच या ठिकाणाचे नाव दुघ्लक बेग उल्डी असे केले होते. “जेथे श्रेष्ठ व धनाढ्य लोक मरतात अशी जागा” असाही या शब्दाचा उघूर भाषेत अर्थ होतो. पुढे ते दौलत बेग ओल्डी असे कायम झाले.

सुलतान सैद खानाचा मृत्यू झाल्यावर यारकंद मध्ये सत्तासंघर्ष उफाळून आला. अब्दुर रशीद खान हा सुलतान सैद खानाचा मुलगा स्पर्धकांची हत्या करून नवा सुलतान बनला. त्याने मिर्झा हैदरला तिबेटहून परत यायचा आदेश पाठवला. तिबेटमध्ये हैदरची सेना विशेष पराक्रम गाजवू शकली नाही. निरोप आल्यावर तो परत फिरला खरे पण यारकंदला येईपर्यंत त्याच्याजवळ फक्त पंधरा-वीस सैनिक उरले होते. या अपयशामुळे त्याला अज्ञातवासात जावे लागले. त्याला बदक्षण (पूर्वोत्तर अफगाणिस्तान) येथील त्याच्या मामीने आश्रय दिला. येथे मात्र त्याला मोगल साम्राज्याने सामील करून घेतले आणि त्याचे उन्नती झाली. सन १५४० मध्ये बाबरपुत्र हुमायुनच्या आदेशाने त्याने पुन्हा काश्मीरवर स्वारी केली. तेथील सत्तेचा पराजय करून त्याने नाजूकशाह याला सुलतानपदी आरूढ केले. पुढे हुमायूनने काबुल जिंकल्यानंतर मिर्झा हैदरने नाजूकशाहला हटवले आणि मुघल सम्राटाच्या नावे नाणी पाडायला सुरुवात केली. येथेच त्याने ‘तारीख-इ-रशिदी’ हा आठवणी व इतिहास सांगणारा ग्रंथ लिहिला. पुढे काश्मिरी लोकांनी केलेल्या विद्रोहात झालेल्या युद्धात त्याचा १५५० मध्ये मृत्यू झाला. त्याचे दफन श्रीनगर येथेच केले गेले.

भारतावर फक्त खैबर खिंडीतून आक्रमणे झाली असे मानले जाते पण ते खरे नाही. हिमालयीन भागातून येणा-या दुष्कर मार्गांवरूनही आक्रमणे झालेली आहेत. इतिहासात नोंदले गेलेले हे एक आक्रमण. हिमालयीन प्रदेशांतील घडामोडी मुख्य भूमीवरच्या लोकांना अज्ञातच राहत असल्याने असंख्य आक्रमणे व स्वा-या इतिहासाला अद्न्यातच आहेत असे म्हणावे लागते.

या स्थळावर अजून एक विलक्षण घटना नोंदली गेलेली आहे. एकोणीसाव्या शतकात ब्रिटीश व्यापारी व हेर एन्ड्रू दाल्ग्लीश हा या मार्गावरून व्यापार करत असे. त्याने दाद मोहम्मद या क्वेट्टा येथील पठाण व्यापा-याला काही कर्ज दिलेले होते. पण दाद मोहम्मदचे दिवाळे निघाले. यारकंदहून लेहला जात असतांना दाल्ग्लीश आणि मोहम्मदची दौलत बेग ओल्डी येथे भेट झाली. तेथे दोघांत भांडण झाले आणि या भांडणाची परिणती दाल्ग्लीशच्या खुनात झाली. पुढे ह्यमिल्टन बोवर या ब्रिटीश लष्करी अधिका-याने दाल्ग्लीशच्या खुन्याचा शोध घेत घेत त्याला शेवटी समरकंद येथे अटक केली पण १८९० साली दादने कोठडीतच आत्महत्या केली.  दौलत बेग ओल्डी येथे या एन्ड्रू दाल्ग्लीशची संगमरवरी स्मृतीशिला लावलेली आहे. असे कैक संघर्ष, खून, लुटपाट या मार्गांनी पाहिले असतील.

येथून प्राचीन व्यापारी मार्ग जायचे एवढेच या जागेचे महत्व नाही तर दौलत बेग ओल्डी ही भारताच्या दृष्टीने सामरिक दृष्ट्या अत्यंत महत्वाची जागा आहे. येथून आता अक्साई चीन (पांढरे वाळवंट) हा चीनच्या ताब्यात असलेला भाग अवघ्या नउ किलोमीटर अंतरावर आहे. हिवाळ्यात येथे तापमान उणे ५५ डिग्री इतके खाली जाते. बर्फाळ वादळे ही नित्याची बाब आहे. येथे ना कसले वन्य जीव आहेत ना वनस्पती.

चीनने झिंझियांग-ल्हासा हा मार्ग अक्साई चीनमधून बांधायला सुरुवात केल्याने भारत-चीन सीमावाद सुरु झाला. युद्धही झाले. १९६० साली दौलत बेग ओल्डी येथे भारतीतीय सैन्याने चौकी बनवली. १९६२ साली याचे लष्करी तळात रुपांतर करण्यात आले. या स्थानाचे चीनला शह देण्यातले महत्व ओळखून भारत सरकारने या स्थानाचा लष्करी विकास सुरु केला. जगातील सर्वात अधिक उंचीवरची धावपट्टीही येथे तेंव्हाच बनवली गेली.  भुकंपामुळे येथील धावपट्टी निरुपयोगी झाली होती पण ४३ वर्षांच्या अंतराळानंतर 2008 सालापासून येथे पुन्हा विमाने उतरायला लागली.

लष्करी हालचालीसाठी जुनेच दुष्कर मार्ग वापरावे लागत. यात जीवित’हानीचा धोका जसा असे तसाच तेथवर जाण्यातला विलंब आणि सामुग्री नेण्यात अडथळेही येत. त्यामुळे २००१ साली भारत सरकारने लेह ते दौलत बेग ओल्डी आधुनिक रस्त्याचे काम जुन्या हिवाळी मार्गावरून सुरु केले आणि ते २०१९ साली पूर्ण झाले. तेरा ते सोळा हजार फुट उंचीवरून हा मार्ग जातो. पण या मार्गामुळे लष्करी दळणवळण सुलभ झाले आहे.

मुळच्या व्यापारी मार्गावरील एक थांब्याचे स्थान म्हणून या जागेचे महत्व मात्र संपले आहे. मध्य आशियातील बहुतेक भाग आता चीनच्या ताब्यात गेल्याने १९२० नंतर या लेह-यारकंद मार्गावरील व्यापार पूर्ण थांबला आहे. पण १९१३-१४ मध्ये या मार्गावरून गेलेला अन्वेक्षक फिलीप्पो फिलिपी म्हणतो कि, “या मार्गावरील माल वाहतूक करणारे व्यापारी तांडे संख्येने फार मोठे आहेत. प्रवासाला कठीण असलेल्या देस्पांग पठारावरून हे तांडे एकतीस मैलांचे (५० किमी) अंतर दुष्कर ह्वामानात व बिकट भौगोलिक स्थितीतही एका दिवसात पार करतात हे फारच विशेष आहे.”

-संजय सोनवणी 

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...