Friday, June 24, 2022

आपण त्यांचेही ऐकायला हवे!




अनेकदा आपण राष्ट्रीय आणि सामाजिक प्रश्नांकडे एकतर्फी पाहत असतो. मग ते पाहणे सकारात्मक असो कि नकारात्मक. आपल्याकडे येणा-या माहितीचा अर्थ आपण कशा रीतीने काढतो हे येणारी माहिती मुळात तटस्थ असते कि पूर्वग्रहदुषित कि विशिष्ट विचारांचे समर्थक पैदा करण्यासाठी यावर अवलंबून असते. मुळात माहिती देणारे लोक आणि ज्याच्याबद्दल किंवा ज्यांच्याबद्दल माहिती देण्यात येत असते त्यांचे स्वत:चे असे काही म्हणणे आहे कि नाही हे मात्र आपल्यापासून अज्ञात असते. किंबहुना असे काही म्हणणे असू शकते यावरच आपला विश्वास नसतो. आपला विश्वास किंवा अविश्वास हा आपल्यापर्यंत जी साधने माहिती पोचवतात त्यांच्यावरच असतो. आणि हे माहिती पुरवणारे घटक आहे त्या सामाजिक अथवा राष्ट्रीय प्रश्नाचे आकलन करून घेण्यात खरोखर कितपत समर्थ आहेत याचे मात्र आपल्याला भान असतेच असे नाही. जेंव्हा काश्मीर किंवा उत्तर-पूर्व राज्यांतील समस्यांबाबत आपण हिरीरीने चर्चा करत असतो तेंव्हा तर हे भान आम्ही पुरेपूर गमावलेले असते. आमचे प्रेम, सहानुभूती अथवा द्वेषही वांझोटे होऊन जातात कारण आम्ही मुळात ज्यांच्याबद्दल प्रश्न आहे त्या लोकांनाच त्या प्रश्नाबाबत काय वाटते हे समजण्यात कमी पडलेलो असतो. स्वाभाविकपणेच आमचे कोणत्याही प्रश्नाचे आकलन तेवढेच वांझोटे होत जात निव्वळ प्रतिक्रियावादी बनत जाते ते त्यामुळेच. आणि प्रश्नाचे आकलन कमजोर पडले तर त्यावर शोधलेली अथवा प्रिय वाटलेली उत्तरेही निखालस दिशाहीन असतील हे सांगण्याची आवश्यकता नाही.
काश्मीर हा तसा गेली तीसेक वर्ष गाजत असलेला विषय. पंडितांचे हत्याकांड, स्थलांतर, तेथे उफाळून आलेला दहशतवाद, कलम ३७० बद्दलची परस्परविरोधी आकलने आणि शेवटी ते कलमच रद्द करण्यात येणे, सर्वत्र पसरलेला किंवा पसरवण्यात आलेला मुस्लीम द्वेष किंवा तेथील हिंसाचाराकडे पाहण्यातील विशिष्ट वर्गाचे बोटचेपे धोरण, पर्यटकांनीच पाठ फिरवल्याने तेथील कोसळलेली अर्थव्यवस्था, पाकिस्तानची भूमिका इत्यादी असंख्य बाबींची देशभरात हिरीरीने चर्चा झालेली आहे. अनेक मतमतांतरे आहेत. या सा-यात राहून गेलेली बाब म्हणजे खुद्द तेथील नागरीकांना, मग ते हिंदू असोत कि मुस्लीम, या सा-याबद्दल काय वाटते, ते या बाबींकडे कसे पाहतात, त्यांच्या भावविश्वावर याचा नेमका कसा परिणाम झालेला आहे आणि ते या सा-याकडे नेमके कसे पाहतात ही. त्यामुळे आपल्या आकलनात एकंदरीत एकतर्फीपणा आलेला असतो. आपली मते प्रभावित होतात ती त्रयस्थ लोकांच्या आकलनातून, ते थेट आकलन नसते.
स्थानिक लोकांचे साहित्य, चित्रपट, नाटक, गीत, काव्य यातून स्थानिकांची मानसिकता आणि भावविश्व प्रकट होत असते. काश्मीरमध्ये नाट्यगृहे अथवा चित्रपटगृहे १९९० पासून बंद असल्याने काश्मीरी लोकांना अभिव्यक्तीचा तो मार्ग बंदच आहे असा एक सार्वत्रिक समज आहे. काश्मिरी साहित्य सहसा इतर भाषांमध्ये अनुवादितच होत नसल्याने तोही मार्ग तेथील लोकांची मनोवस्था व विचार समजावून घेण्यासाठी उपयुक्त नाही. सेन्सॉरमुळे किंवा राजकीय-दहशतवाद्यांच्या भयाने वृत्तपत्रीय लेखन अत्यंत सावध असल्याने त्यातूनही आपल्या हाती फारसे काही पडेल याची शक्यता नसते.
पण सरहद या संजय नहार यांच्या संघटनेने काश्मीरमध्ये शांती आणि सलोख्याचे काम करत ही कोंडी फोडायचा अपार प्रयत्न केलेला आहे. त्याच वेळी आपल्या चिनार प्रकाशनामार्फत काश्मीरचा इतिहास, तेथील साहित्य मराठी आणि इंग्रजी वाचकांसमोर आणण्याचे कार्य ते गेली तीसेक वर्ष करत आले आहेत. काश्मीरचा पुरातन इतिहास सांगणारे राजतरंगिणी असो, काश्मीरचा सम्राट ललितादित्य असो, काश्मीरचा श्रेष्ठ तत्वद्न्य अभिनवगुप्त असो कि काश्मीरचा गेल्या पाच हजार वर्षांचा इतिहास असो, या ग्रंथांचे अनुवाद अथवा मूळ संशोधन प्रसिद्ध तर केलेच पण प्रेम किशोर कौल यांनी लिहिलेल्या काश्मीरच्या पार्श्वभूमीवरील “गुल, गुलशन, गुलफाम” या महाकाव्यसदृश्य कादम्बरीचा अनुवाद तसेच गुलाम महम्मद मेहजूर या प्रसिद्ध काश्मिरी कवीच्या कवितांचा अनुवादही प्रसिद्ध केला. काश्मीरमधील लेखकांची व काश्मीरवरील अन्य लेखकांची पुस्तके प्रसिद्ध करत असतांना “उध्वस्त काश्मीर” सारखे स्वानुभवावरील पुस्तकही संजय नहार यांनी प्रसिद्ध केले.
पण आजच्या समाजावर चित्रपटाचा जेवढा प्रभाव पडतो तेवढा अन्य कशाचाही पडत नाही. काश्मीरची पार्श्वभूमी वापरणारे असंख्य चित्रपट प्रसिद्ध आहेत. तेथील स्वर्गीय निसर्गाची पार्श्वभूमी त्यात येत असली तरी काश्मीरचे खरे व्यक्तित्व त्यात झळकत नाही. अलीकडे या परंपरेला छेद देत काही चित्रपट काश्मीरच्याच लोकांना मुख्य स्थान देत काही चित्रपट बनवले गेले असले तरी ते तेथील दहशतवाद ते हेरगिरीसारख्या रंजक विषयासाठी काश्मीर ही स्फोटक पार्श्वभूमी होती म्हणून. त्यांचा हेतू व्यावसायिक होता. अलीकडेच प्रसिद्ध झालेले काश्मीर फाईल्स सारखे चित्रपट तर अत्यंत एकांगी असल्याने त्यातही एकच बाजू आलेली होती.
यात काश्मिरी लोकांची काय बाजू आहे याचे दर्शन घडत नव्हते. काश्मीरमध्ये पूर्ण लांबीचे चित्रपट बनत नसले तरी अनेक निर्माते-दिग्दर्शक आपल्या खिशाला खार लावून केवल अभिव्यक्तीच्या अनावर उर्मीपोटी लघुपट, माहितीपट आणि संगीताची निर्मिती करत असतात. ते प्रदर्शित होण्याची शक्यता नसल्याने त्यातून काही कमाई होण्याचे शक्यता नसली तरी आपले काही म्हणणे आहे आणि ते मांडले पाहिजे ही उर्मी सर्व समस्या, भय, दहशत यावर मात कशी करते याचे हे अलौकिक उदाहरण आहे.
सरहदने या चित्रपटांना काश्मीरच्या खो-याबाहेर काढून जगासमोर आणण्यासाठी काश्मीरमध्ये बनलेल्या चित्रपटांसाठी जगातील पहिला जम्मू-काश्मीर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुणे येथे आयोजित केला. या महोत्सवामध्ये भाग घेण्याचे आवाहन करताच आठवड्याभरात ८० पेक्षा जास्त प्रवेशिका आल्या. त्यातून चाळीस लघुपट निवडण्यात आले. ११ ते १५ जून २०२२ या काळात हे चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. काश्मीरीनी काश्मीरच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या या चित्रपटांत जे एरवी आपल्यापर्यंत पोचत नाही असे वेगळेच लोकजीवन, संघर्ष, दहशतवादामुळे उध्वस्त होत असलेले भावविश्व आणि विपरीत स्थिती भोगत असतांना त्यांच्या मनात उसळणारे परस्परविरोधी भावनांचे कल्लोळ आणि त्यातही फुलत असलेले माणुसकीचे अजरामर बंध याचे विराट दर्शन या चित्रपटांमधून होत होते. “हे काश्मीर पाहिलेच नाही, मुस्लीम एवढे वाईट नसतात एवढेतरी आम्हाला कळाले, पंडितांच्या प्रश्नाची दुसरीही एक बाजू आहे हे या महोत्सवातील काही चित्रपटांमुळे समजायला मदत झाली” यासारख्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया प्रेक्षक देत होते. ‘स्कॅटर्ड’, ‘द हिंदू बॉय’, “कंदील” यासारखे चित्रपट सामाजिक प्रश्नांवर भेदक भाष्य करतात. चित्रपटनिर्मितीसाठी आवश्यक तांत्रिक सुविधांचा अभाव आणि चित्रीकरणासाठी अत्यावश्यक असणारी स्थैर्याची स्थिती नसतांनाही काश्मीरमध्ये होत असलेली सृजनात्मक निर्मिती अवाक करणारी आहे. काश्मीर किंवा आपल्याला तसे अज्ञात असलेले उत्तर-पूर्वेतील राज्यातील लोकजीवनावर तेथीलच लोकांनी निर्माण केलेले चित्रपट हे देशभर अशा महोत्सवांमधून दाखवले गेले तर आपल्याला दुसरीही बाजू समजावून घ्यायला मदत तर होईलच, आपले आकलनही एकतर्फी बनणार नाही. देश समजावून घ्यायचा तर हे अत्यावश्यक आहे.
साहित्य-चित्रपट हे कोणत्याही समाजाचा आरसा आहे असे मानले जाते. लोकांच्या भावना, आशा-आकांक्षा यांचे प्रतीबिंब त्यात पडलेले असते. ते न जाणता कोणतेही राज्य व तेथील लोक यांच्याबद्दल मत बनवणे ही स्वत:चीच दिशाभूल आहे हे आपल्याला समजावून घ्यावे लागेल.
-संजय सोनवणी
(नवशक्ती मध्ये प्रकाशित))

1 comment:

  1. नमस्कार सर, आमच्या येत्या दिवाळी अंकात एखादा लेख/ कथा पाठवता येईल कां ? माझा इमेल kokatayash@gmail.com

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...