Friday, October 14, 2022

भारताचे पूर्वेचे द्वार: आसाम


 


आसाम हे भारताचे पूर्वेचे द्वार आहे अशी प्राचीन मान्यता आहे. एके काळी कामरूप व प्राग्ज्योतीष नावाने ओळखला जाणारा हा प्रदेश भारतातून पूर्वेकडे जाणा-या व्यापारी मार्गांच्या जाळ्याने भरलेला होता. चीन, म्त्यानामार ते पार थायलंडमधील संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचा सुंदर मिलाफ येथे पहायला मिळतो ते या व्यापारी मार्गांवरून झालेल्या सांस्कृतिक देवान-घेवाणीमुळे तसेच मानवी स्थलांतरांमुळे. येथील स्थापात्यावाराही पौर्वात्य शैलीचा प्रभाव आहे. येथून नेपाळ, तिबेट, चीन व दक्षिण-पूर्व आशियातील अनेक देशांशी व्यापारी संपर्क होत होता. नैऋत्य चीनच्या भागातून अनेक रानाती टोळ्या येथे वसल्या असल्याचा उल्लेख मध्ययुगातील एका अरबी व्यापा-याने करून ठेवला आहे. आता स्मृतीन्तही धूसर झालेला दक्षिण रेशमी मार्गही शेवटी आसाममार्गेच एकीकडे पाटलीपुत्र तर दुसरीकडे ब्रह्मदेश येथे पोचत होता.  भारतातून महत्वाच्या व्यापारी शहरांशी हे मार्ग जोडलेले असल्याने हिमालयातील व पश्चिमोत्तर भारतातील मार्ग जसे आर्थिक समृद्धीचा ओघ भारतात आणत होते तसेच आसाममधून जाणारे मार्गही वैभवाचा मार्ग बनलेले होते. असे असले तरी आसाममधल्या प्राचीन मार्गांचे व्हावे तसे संशोधन अद्याप झालेले नाही हे एक कटू वास्तव आहे.

 

अर्थात प्राकृतिक उत्पातांमुळे या मार्गांवरही संकटे कोसळली होती याचे उल्लेख चीनी साधनांनी जपून ठेवलेले आहेत. मध्ययुगात या भागात वारंवार झालेल्या भूकंपांमुळे भूस्खलन होऊन अनेक रस्ते बंद पडले होते याच्या नोंदी उपलब्ध आहेत. भूकंपांमुळे पर्वतांच्या उंची कमी होणे, नद्यांचे प्रवाह बदलने अथवा पूर्णपणे अडवले जाणे यामुळे शक्यतो नद्यांच्या बाजूनेच जाणारे मार्गही नष्ट होणे शक्य आहे. तसाही हा प्रदेश भूकंपप्रवण आहे. भूकंपाची आपत्ती आसामवर पुन:पुन्हा ओढवते. गेल्या साडेतीनशे वर्षांत या प्रदेशात सात वेळा मोठाले भूकंप झाले१९५० चे हादरे जगात नोंद झालेल्या सर्वांत जोराच्या तीव्र भूकंपांपैकी होते आणि १८९७ चा भूकंप तर मानवेतिहासातील सर्वांत तीव्र भूकंपांपैकी एक होता. दक्षिण रेशीममार्ग का विस्मरणात गेला याची कारणे या प्राकृतिक उत्पातात आहेत. असे असले तरी व्यापार मात्र थांबला नाही. साहसी व्यापा-यांनी नव्या वाटा शोधल्या व जोखीम पत्करत आपले उद्योग सुरूच ठेवले. लोकांचेही येणे जाणे सुरूच राहिले. चीनचा युनान भाग लगतच असल्याने दुर्गम भागांतूनही नवे मार्ग काढले गेले असे दिसते.

 

आसामचा इतिहासही रंजक आहे. इथे पुराश्मकालापासून मानाच्वी वस्त्या असल्याचे पुरावे मिळाले आहेत. कालिकापुराण  योगिनीतंत्र  या ग्रंथांतून ज्या अनेक प्राचीन राजांची नावे येतातते दानव व असुर होते असे उल्लेख आहेतमार्हरांग वंशाच्या दानवांचा पराभव करून प्राग्‌ज्योतिषपुरचे राज्य स्थापणारा नरकनरकाचा मुलगा भगदत्त यांची वर्णने महाभारतभागवतात येतातशांखायन गुह्यसंग्रह  रामायण यांत कामरूपाचा उल्लेख आहेनरकभगदत्तमाधवजितारी आणि आशीर्मत्त या चार वंशांनी प्राचीन आसामात राज्य केलेअसे वंशावळींवरून दिसते.  परंतु चवथ्या शतकापर्यंतचा आसामचा इतिहास अस्पष्ट आहेया शतकाच्या मध्यास वर्मन वंशाचा मूळ पुरुष पुष्यवर्मन याने कामरूपात राज्य स्थापलेअसा अंदाज आहेया वंशातील महेंद्रवर्मन (४५०८०) याच्या काळापासून कामरूपाचे महत्त्व वाढू लागले. प्रसिद्ध चीन्वे प्रवासी ह्यु-एन-त्संग हाही सम्राट हर्षवर्धनाच्या काळात कामरूप येथे आला होता. त्याने आसामचे मनोद्न्य वर्णन आपल्या प्रवासवर्णनात केले आहे. येथे सर्वत्र प्रवेशलेली वैदिक संस्कृती मात्र शिरकाव करू शकली नाही याचे कारण येथील समाजावर असलेला तंत्रांचा आणि शाक्त पुजाविधीन्चा अमिट असा प्रभाव. पुढे येथे ब्रह्मदेशातून आलेल्या स्थलांतरितानी सत्ता स्थापन केली व “आहोम” घराणे सत्तेवर आले. तेराव्या शतकाच्या सुरुवातीस आहोम जमातीचा नायक सुकाफा पतकाई पर्वतरांगा ओलांडून सध्याच्या लखिमपूरसिबसागर जिल्ह्यांच्या दक्षिण भागात आलातेथील स्थानिक वन्य जमातींना जिंकून आहोमांनी राज्यविस्ताराला सुरुवात केली. नंतर त्यांचे राज्य जवळपास एकोणीसाव्या शतकापर्यंत कायम राहिले. आसाम हे नाव “आहोम” याचाच अपब्रांश आहे असे भाषाविद मानतात. आसाम हे बनाव प्रचलित झाल्यावर जुने कामरूप हे नाव पूर्ण मागे पडले. यांच्याही कारकिर्दीत पूर्व-पश्चिमेचा व्यापार अव्याहत सुरु होता. इतका कि आसाम हा आपल्या व्यापारे भागीदार बनावा यासाठी इस्ट इंडिया कंपनीने विशेष प्रयत्न केले आणि पुढे तर आहों राजांची सत्ताच बरखास्त करून टाकली.

 

आसाममधून एकट्या चीनला जाणारे किमान पाच मार्ग होते. शिवाय नागा डोंगररांगांतून अनेक मार्ग म्यानमारवरून चीनला जात असत. सिचुआनमार्गे भूतान आणि तिबेटला जाणारेही मार्ग होते. चीनमधून रेशीम वस्त्रे आयात करण्याऐवजी ती आपणच का निर्माण करू नये असा विचार आसामी लोकांच्या मनात आला आणि त्यांनीही रेशमी वस्त्रांचे उत्पादन सुरु केले. काही विद्वानांच्या मते रेशीम उत्पादन हे पूर्वीपासून आसामी लोकांना माहित होते व ते पट्ट या नावाने त्याचे उत्मादन घेत. आजही आसामी लोक रेशमी कपड्यांना पट्ट असेच संबोधित करतात. या वस्त्रांची स्पर्धा चिन्यांना सहन न झाल्याने चीनी सम्राट अस्वस्थ झाल्याचेही उल्लेख मिळतात. किंबहुना “चीनापट्ट” नावाचे कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात उल्लेखलेले वस्त्र हे आसामध्ये बनवले जात असावे असा विद्वानांचा तर्क आहे. शिवाय उत्कृष्ठ रेशीम फक्त सुवर्णकुडम गावी मिळते असेही अर्थशास्त्रात नोंदवले आहे. हे सुवर्णकुडम म्हणजे आसाममधील सोनकुडीह हे गाव आहे असे विद्वान मानतात. म्हणजे रेशीम उत्पादानासाठे आसाम देशात प्रसिद्ध होते. बाणभट्टाच्या हर्षचरितमध्ये आसामचा राजा हर्शाला रेशमी वस्त्रे उपहार देतो असे उल्लेखलेले आहे. अर्थात रेशीम उत्पादनाची सुरुवात कोठेही झालेली असो, पण रेशमाने जगाच्या व्यापारावर अधिराज्य निर्माण केले होते यात कसलाही संशय नाही.

 

भारत हा चीनमधील चौकोनी बाम्बुन्चाही मोठा आयातदार होता. या बाम्बुन्ना चीनी क्वियांग म्हणत. या बाम्बुन्चा उल्लेख रामायणातही आलेला आहे. आसामही बाम्बुन्च्या उत्पादनात सुरुवातीपासून आघाडीवर राहिलेला आहे हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. किंबहुना पोकळ बांबूमधून स्फोटक दारू (सोरा)  वापरून क्षेपणास्त्रे डागन्याचा शोध प्रथम आसाममध्ये लागला व तो व्यापा-यांकरावी चीनमध्ये पोचला असेहे मानणारा आज मोठा विद्वत्वर्ग आहे. जगभरात शोध पसरले त्यात व्यापारे मार्गांचा जसा वाटा आहे तसाच अनेक साथरोग पसरन्यातही या मार्गांचा हातभार लागलेला आहे असे आपल्याला इतिहासात डोकावले कि लक्षात येते.

इशान्य भारतातील सर्वच राज्यांचा सिचुआन, युनान, ते दक्षिणपूर्वेच्या भागांशी संबंध होता. त्यामुळे वांशिक मिश्रण होणेही स्वाभाविक होते. आसाममधील आहोंम हे ताई गटाशी संबंधित होते. आसाममधील भातशेतीतही त्यांनी अभिनव पद्धती आणल्या. ताई लोक थायलंड ते युनानपर्यंत पसरलेले आहेत. हे लोक ब्रिटीश काळापर्यंत तिबेटमधून भारतात येणारे मार्ग वापरत होते. नथू-ला खिंडीमार्गे जसा एक मार्ग होता तसेच भूतानमधून येणारेही दोन मार्ग होते. त्यामुळे या लोकांचे प्राबल्य इशान्य भारतात असणे स्वाभाविक आहे. अर्थात हा प्रवास एकेरी नसतो. भारतातुनाही पूर्वेकडे अनेक स्थलांतरे झालेली आहेत. म्यानमारचे राजे स्वत:ला बुद्धाच्या शाक्य वंशाचे समाजात असत. त्यांच्या मते त्यांचे पूर्वज भारतातून येऊन इरावती नदीच्या खो-यात वसले होते. दावत बॉन्ग राजांनी नागा राजकन्यांशी विवाह केले होते असेही इतिहासावरून दिसते. युनान (दक्षिण चीन) मध्येही उत्तरपूर्वेतील अनेक जमाती स्थलांतरीत झाल्या. एका अर्थाने आसाम व पूर्वोत्तर भागातील राज्ये ही संस्कृती संगमाचा एक महत्वाचा सेतू बनली यात शंका नाही.

 

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...