Tuesday, October 4, 2022

स्वातंत्र्य

 संस्कार माणसाचे स्वातंत्र्य संकुचितच नव्हे तर अनेकदा चिरडुनही टाकतात हे सत्यच आहे. माणसाचे स्वातंत्र्य तो बोलायलाही शिकला नसतो तेंव्हापासुनच हिरावले जाण्याची सुरुवात होते. मानसिक पारतंत्र्यात वाढायची सवय झालेले आपली मुले/नागरिक तसेच परतंत्र रहावेत आणि त्यांना त्यात पारतंत्र्याचाही आभास होऊ नये अशा दक्षता घेतात. पण हे जगभर होते. पारतंत्र्य ही आपली मानसिक गरज बनून जाते ती अशी.

संस्कृती हीच मुळात कृत्रीम बाब आहे. कारण ती नैसर्गिक गोष्टींना सोयीनुसार बदलवून बनवलेली असते. पुर्ण निसर्गवादी राहता आले तर कदाचित स्वतंत्र असण्याचा अनुभव तरी येईल, पण पुन्हा (संस्कारांनी विशिष्ट धारणांचे बनल्यामुळे) त्यांना पुन्हा नैसर्गिकपणा "शिकवावा" लागेल. मग तोही तेवढाच कृत्रीम होण्याचा धोका नाही काय? मला वाटते "उत्स्फुर्ततावाद" स्वत:हुन समजुन घेणे, तसे वागणे कदाचित मानवी प्रेरणांना बदलवू शकेल...पण दुस-यांना बदलवण्याचा प्रयत्न करणे चुकीचेच ठरेल. कारण त्यामुळे तेही पुन्हा बदलवण्यचे संस्कारच असतील.
मला येथे ग्रीकांचा नियतीवाद आठवतो. चुकीचा असेल, पण ज्याची त्याची एक नियती असते हे क्षणभर मान्य केले तर अमूक तशा अवस्थेत (वैचारिक/सामाजिक) का आहे हे प्रश्न छळत नाहीत. आपल्याला करावे वाटते ते करत रहावे, सांगत रहावे...पण त्यामुळे अमुक एक परिणाम होईल याची अपेक्षा करण्यात काय अर्थ? शेवटी ज्याची त्याची "मर्जी"... म्हणजेच स्वातंत्र्य....
बदल हा स्वेच्छेचा विषय असतो. कोणी जग बदलवू म्हणत असेल तर तो मुर्खांच्या नंदनवनात वावरत असतो. महान नेते, अवतार, धर्मसंस्थापकही त्यांच्या अनुयायांना पुर्णतया बदलू शकले नाहीत हा आम्हा मानवांचाच इतिहास आहे. बदलाचा प्रयत्न करावा वाटणे ही व्यक्तीची स्वेच्छा आहे. स्वीकारायचे अथवा नाही, नाकारायचे तर काय नाकारायचे ही व्यक्तींची स्वेच्छा आहे. या स्वेच्छेला नमस्कार करुन आपापले स्वेच्छेचे कार्य करत रहावे, बदलावे वाटले तर बदलावे....ज्याला बदलावे वाटेल तोच बदलणार आहे. कृत्रीमतेचा सोस सोडला तर हे संस्कार आणि संस्कृत्यांचे सोसही किमान कमी तरी होतील.
माणसाला संपुर्ण स्वातंत्र्य देता / घेता येत नसेल तर किमान बाह्य बंधनांची संख्या तरी कमी करता यायला हवी. व्यक्तीला त्याच्या उत्स्फुर्ततेने जगता यायला हवे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी

    महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी -संजय सोनवणी   आम्ही मराठी माणसे इतिहासात फार रमतो. बरे, ज्याही इतिहासात आम्ही रमतो तेवढ्या ...