Wednesday, May 9, 2012

जगातील आद्य व्याकरणकार कच्छायन


पाणिनीचा काळ हा आपण इसवी सनाचे दुसरे शतक ते दुसर्‍या शतकाचा मध्य असा सिद्ध केला आहे. आता प्रश्न असा उपस्थित होईल कि मग भारतातील आद्य व्याकरण कोणी व कोणत्या भाषेचे लिहिले? या प्रश्नाचे उत्तर आहे कच्छायन (कच्छायनो) हा आद्य व्याकरणकार असून गौतम बुद्धाच्या आदेशाने त्याने पाली भाषेचे व्याकरण लिहिले.कच्छायनाचा काळ गौतम बुद्धाच्या समकालीन असून तो इसपु. ६०० असा येतो.


स्वत: पाणिनीने आपल्या अष्टाध्यायीत आपला पुर्वसुरी म्हणून कच्छायनाचा आदरपुर्वक उल्लेख केलेला असून कच्छायनाने दिलेल्या अनेक नियमांची त्याने उसनवारी केली आहे. (A Pali Grammar on the basis of kacchaayana by Francis mason-page i, ii.) यावरुनही कच्छायनाची प्राचीनता लक्षात येते. डा. बुह्लेर यांनी कच्छायन हा ब्राह्मण नव्हता व तो शाक्यमुनीचा सर्वोत्तम शिष्य होता असे स्पष्टपणे नमूद करून ठेवले आहे.

गेल्या शतकापर्यंत कात्यायन व कच्छायन एकच असावेत असा भ्रम होता, परंतु पाली भाषेचे कच्छायनाच्या व्याकरणाचे ग्रंथ सीलोन व ब्रह्मदेशात सुस्थितीत मिळाल्याने हा भ्रम दूर झाला. याचे खरे श्रेय श्री. जी. टर्नर, जेम्स अल्विस व फ़्रांसिस मेसन या विद्वानांकडे जाते. १८५५ मद्धे जेम्स अल्विस यांना टर्नर श्रीलंका (तेंव्हाचे सीलोन) येथे व नंतर ब्रह्मदेशातही कच्छायनाचे व्याकरण भूर्जपत्रांवर लिहिलेले सापडले व ते त्यांनी १८५५ मध्ये कलकत्त्यावरुन प्रसिद्ध केले. पुढे या विद्वानांनी या व्याकरणाचे अनुवाद व आपल्या अभ्यासपूर्ण प्रस्तावनाही ग्रंथरुपाने प्रसिद्ध केले.असे असूनही आपल्या विद्वानांनी तिकडे लक्ष पुरवले नाही हा एक दोषच आहे असे दिसते. या ग्रंथांमुळे पाणिनी सांगितला जातो तेवढा पुरातन नाही हेही सिद्ध झाले. कच्छायनाचे व्याकरण आठ भागांत असून पाणिनीनेही आपल्या व्याकरणाचे आठ अध्याय केले यावरुनही कच्छायनाचे पाणिनीवरील ऋण दिसून येते. आपल्याकडे दुर्दैवाने हा व्याकरणकार कधी प्रसिद्धीस आला नाही. कात्यायन या नांवाच्या अनेक व्यक्ति झाल्या असून व्याकरणकार कात्यायन हा पाणिनीचा समकालीन होता हे आपण आधीच सिद्ध केलेले आहे व पाणिनी कच्छायनाचे ऋण मान्य करत असल्याने पालीचा व्याकरणकार कच्छायन हा कात्यायन असू शकत नाही हे उघड आहे. कच्छायनाने पालीचे (मागधीचे) व्याकरण बुद्धाच्या आदेशावरुन लिहिले व या व्याकरणाची सुरुवातच बुद्धाच्या एका वाक्याने होते. ते असे-

"अट्ठो अक्खरा सन्नतो..."

(अक्षरांमुळे भाव समजतो.)

येथे येणारा अक्खर हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. बुद्धाच्या वेळी लिहिण्याची कला अवगत होती हे यावरुन सिद्ध होते. म्यक्समुल्लर यांचा भारतीयांना लेखनाची कला अवगत नव्हती हा दावाही फेटाळला जातो. अल्विस यांनी त्यांच्या Introduction to Kachchayana's Grammar of the Pali Language या ग्रंथात आवर्जून नमूद केले आहे कि बुद्धकाळी लेखनाची चांगली प्रथा होती व स्त्रीयांनाही लिहिणे शिकवले जात असे.

कच्छायनाच्या व्याकरणातील रुपसिद्धी भागावरच्या टीकेत, अंगुत्तर निकाय व महावंस मध्ये कच्छायनाची जी माहिती मिळते ती अशी:

"महाकच्छायन हा कच्छो नामक ग्रुहस्थाचा मुलगा होता. तो गौतम बुद्धाचा प्रिय शिष्य होता. बुद्धाने त्याची निवड पाली भाषेचे पहिले व्याकरण लिहिण्यासाठी केली तर सारीपुत्राची निवड विदेशांत धर्मप्रसारासाठी केली. गौतम बुद्धाने मांडलेल्या विचारांत विविध ठिकाणच्या भाषाभेदांमुळे अर्थसंभ्रम निर्माण होवू नये म्हणून पालीचे व्याकरण तयार करण्याची आवश्यकता बुद्धाला वाटली होती. व "अक्षरांमुळे भाव सिद्ध होतो" हे बुद्धवचन केंद्रस्थानी ठेवत, या वचनापासूनच सुरुवात करत "निरुत्तिपिटको" हा व्याकरण ग्रंथ कच्छायनाने सिद्ध केला."

सर्वच संबंधित ग्रंथ व कच्छायनाच्या व्याकरणावरील टीकाकारांनीही कच्छायन हा "थेर" (स्थविर)होता, गौतम बुद्धाचा सर्वोत्कृष्ठ असा बुद्धीमान शिष्य होता हे मान्य केलेले असल्याने कच्छायनाचा काळ नि:संशयपणे बुद्धाच्या समकालीन जातो हे सिद्ध होते व पाश्चात्य पंडितांचाही हाच निर्वाळा आहे. त्याने आपल्या व्याकरणाची रचना नियम, वृत्ती व उदाहरणे अशा स्वरुपात सुत्ररुपानेच केली आहे. यामुळे सुत्रपद्धतीचा निर्माताही कच्छायनच ठरतो.


बौद्ध धर्म जगभरात जेथे जेथे गेला तेथे तेथे कच्छायनाचे व्याकरणही गेले. आज आपल्याला त्याचे व्याकरण उपलब्ध झाले आहे ते ब्रह्मदेश, नेपाळ, तिबेट व सीलोनमधुन. भारतातुन बौद्ध धर्माची पीछेहाट झाल्यानंतर हा ग्रंथही बहुदा नष्ट झाला असावा. म्हणजे अद्याप तरी एकही प्रत भारतात सापडलेली नाही. असो.

आता कच्छायन हा बुद्धाच्या समकालीन असल्याने त्याचा काळ इ.स.पूर्व सहावे शतक असा येतो. आता तोवर जगभरात कोणत्या भाषांची व्याकरणे लिहिली गेली होती? आपल्याला ज्ञात असलेले जगातील प्राचीन व्याकरण ग्रीक भाषेचे असुन र्‍हिनस व अरिस्टार्कस यांचे असून ते इ.स.पूर्व च्या तिसर्‍या शतकातील आहे. त्यामुळे कच्छायन हा नुसता भारतातील नव्हे तर जगातील आद्य व्याकरणकार ठरतो.

बुद्धाला व्याकरणाची गरज भासणे स्वाभाविक आहे. याचे कारण म्हणजे मिशनरी पद्धतीने धर्मप्रचार करायचा असेल तर त्याची मुळ वचने अन्य प्रदेशांत अर्थ हरपुन बसु नयेत असे त्याला वाटणे स्वाभाविक होते. याचा अर्थ अन्य प्राकृत भाषांची व्याकरणे अस्तित्वात नव्हतीच असे नाही. कच्छायनाने अन्य "सुत्तन" चा उल्लेख केलेलाच आहे. परंतु मागधीतील मूळचा उपदेश अन्य भागांतील भाषाभेदांमुळे नियमीत करण्यासाठी स्वतंत्र व्याकरणाची आवश्यकता होती व ती कच्छायनाने पूर्ण केली.

येथे हे लक्षात घ्यायला हवे कि जगातील पहिला व्यक्तिप्रणित धर्म म्हणजे बौद्ध धर्म होय. महावीराच्या जैन धर्माला आधीच्या २३ तीर्थंकरांची पार्श्वभूमी होती. बौद्ध धर्मातही उत्तरकालात पुर्वबौद्ध ही संकल्पना उधारीने आली असली तरी ती मूळ बौद्ध धर्माचे अंग नव्हती. आजच्या कथित हिंदू धर्माने "अवतार" संकल्पना जैन व बौद्धांकडूनच उधार घेतली आहे हेही एक वास्तव आहे. धर्मकल्पनांची उधार-उसनवारी पुरातन काळापासून चालत आलेली आहे. उदा. इस्लाम धर्माने ज्यू धर्मातील अनेक संकल्पना जशाच्या तशा उचललेल्या आहेत.

सामान्यांना तशी व्याकरणाची गरज पडत नाही याचे कारण म्हणजे त्यांचे व्यवहार हे मर्यादित भौगोलिक परिप्रेक्षात असतात व संवादाचे कार्य निरलस चालुच असते. परंतु धर्मविस्तार व राज्यविस्तार हे हेतू असतात तेंव्हा भाषा प्रमाणित करावी लागते. याचमुळे वररुचीने सातवाहनांसाठी इ.स.पूर्व च्या पहिल्या शतकात "प्राकृत प्रकाश" हा ग्रंथ लिहुन माहाराष्ट्री प्राकृतला ग्रांथिक भाषा बनवण्याचे योगदान दिले. हालाची "गाथा सतसई" (उर्फ गाथा सप्तशती) वररुचीच्याच व्याकरणाचे नियम पाळते हेही येथे लक्षात घेतले पाहिजे.

ज्या कारणांमुळे बुद्धाला व सातवाहनांना आपापल्या भाषांचे व्याकरण असावे असे वाटले नेमक्या त्याच कारणांनी पुढे वैदिक धर्मियांनाही त्याची गरज भासली. ती कशी व केंव्हा याबाबत आपण पुढील लेखात चर्चा करुयात.



.

6 comments:

  1. 1. http://en.wikipedia.org/wiki/%C5%9A%C4%81ka%E1%B9%AD%C4%81yana

    2. http://en.wikipedia.org/wiki/Yaska

    It has a lot of conflicts with your views. Can you please explain?

    ReplyDelete
  2. Dear Amit,

    Wikipedia is not at all authorized and authenticated information source. I can also type on wikipedia and can say MR. AMIT had written 1st Vyakaran before 10,000 Years :)

    This blog writer has written this article after lot of research.

    ReplyDelete
  3. प्रिय अमितजी, सागर भंडारे यांनी उत्तर दिलेलेच आहे. आजतागायत एकच समज असा होता कि संस्कृत भाषा ही पुरातन असून इंडो-युरोपियन भाषासमुदायाची जननी आहे. परंतु दुर्दैवाने ते सत्य नाही. सत्य असे आहे कि संस्कृत भाषा ही अत्यंत उत्तरकालात ग्रांथिक कारनांसाठी निर्माण झालेली, पाली (मागधी) भाषेच्या पावलावर पावूल ठेवत निर्माण झालेली भाषा आहे व हे सिद्ध करणारी असंख्य प्रमाणे उपलब्ध आहेत. यास्काचा (आश्वलायनाचाही) काळ मी पुढच्याच्झ लेखात पुराव्यानिशी सिद्ध करणार असल्याने आता येथेच त्याबाबत लिहित नाही. म्यक्समुल्लर हे संस्कृतचे विद्वान असले तरी ते असंख्य बाबतीत खोटे पडलेले आहेत हे याच लेखावरुनही लक्षात आले असेल अशी आशा आहे. पाणिनी व पतंजली हे शैव असल्याने ते पुरातन ठरले असते तर मला खचितच आनंद झाला असता, परंतु संशोधकाने पुराव्यांनाच आधार घेत सत्य मांडायला हवे असे माझे स्पष्ट मत आहे. दुर्दैवाने आपले संशोधक अजुनही इंडो-युरोपियन भाषागट हा कालबाह्य सिद्धांत मान्य करत संस्कृत सर्व भाषांची जननी हा निरर्थक सिद्धांत मांडतात हेच खरे दुर्दैव आहे. मागधी, अर्धमागधी, माहाराष्ट्री प्राकृत, व्रचदा सिंधी ई. भाषा याच पुरातन आहेत हेच काय ते सत्य आहे. आपल्या प्रतिक्रियेबदल आभार.

    ReplyDelete
  4. Interesting article. Have you give thought to fact of geographical division between Shraman culture and Vedic culture. I always find the the geographical divide quite potent in this. Shraman being evolved more on the eastern side of the Indian subcontinent and Vedic culture on the North-Western side. Also classical Sanskrit of the Rigveda is fairly closer to Iranian language like Avestan. I agree with your deduction that Panini standardize Sanskrit after the standardizing of Pali. I work in the field of computers where lot of languages are evolving at the same time and they do influence each other. In compiter languages also there is a geographical divide influencing the their evolution. They seem to borrow lot of grammar from each other. I find similarities in the spoken languages as well in case of Hinduism after the initial heavy Sanskritization in post-Panini era the religion came under influence of Prakrit and it is converting to Prakrit languages. Same with Buddhism Thervada Buddhist text is mostly in Pali but Mahayana text is quite Sanskritized.

    ReplyDelete
  5. संस्कृत भाषॆचे नांवच सुचवते की ती एक संस्कार करण्यात आलेली म्हणजे कृत्रिम भाषा आहे.पाली ही प्राकृत म्हणजे नैसर्गिक म्हणजेच लोकांची बोलीभाषा होय.त्यामुळे निश्चितच प्राकृत ही संस्कृतची जननी ठरते.प्राकृत भाषेने बुद्धवचनांचे पालन केल्यामुळे तिचे नांव पालि पडले.

    ReplyDelete
  6. Dear Sanjay ji,
    Sorry for off topic question. May I have a list of all the books you have written ??? I haven't come across any such list on your blog. Thanks.

    ReplyDelete

वैदिक व्यवस्थेचे भारतीय समाजव्यवस्थेवरील परिणाम

एतद्देशीय शिव-शक्तीप्रधान हिंदू धर्मात व समन संस्कृतीतून निघालेल्या समाजात व्यवसायनिष्ठ विभाजनी झालेली असली तरी तिला जन्माजात अधिष्ठान नव्हत...