मरतुकडी मराठी साहित्य-संस्कृती वैश्विक कशी होणार?
साहित्य-संस्कृतीचे जतन-वर्धन-विकसन हे प्रत्येक सुसंस्कृत समाजाचे कर्तव्य मानले जाते. साहित्य हे समाजमनाचा आरसा आहे असे समजले जाते. कोणता समाज नेमका कसा आहे हे समजाऊन घ्यायचे तर साहित्य व वाचनसंस्कृतीचेच मापदंड लावले जातात. या पार्श्वभूमीवर आपण एकूण मराठी साहित्य व वाचनसंस्कृतीचा विचार केला तर लक्षात येईल की आपली ही संस्कृती अत्यंत बाल्यावस्थेत आहे. तिची जी काही वाटचाल होत आहे ती खुरटलेली आणि रोगग्रस्त आहे. आज लेखकांपासून ते पार ग्रंथालयांपर्यंत असलेली साहित्य-संस्कृतीची साखळी नैतिक व आर्थिक भ्रष्टाचाराने पोखरलेली असल्याचेच सध्याचे चित्र आहे.
मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळावा, ती वैश्विक व्हावी यासाठी जिवाच्या आकांताने प्रयत्न करनारे प्रा. हरी नरकेंसारखे विचारवंत एकीकडे आहेत तर दुसरीकडे मराठी ही संस्कृतोद्भव भाषा असल्याचा सनातनी हेका धरणारे त्या मार्गात खीळही घालत आहेत. आजवर जेवढय़ाही भाषांना अभिजाततेचा दर्जा मिळाला तो सर्व त्या-त्या भाषकांत आपल्या भाषेबद्दल एकमुखाने असलेल्या जिव्हाळ्यामुळे. परंतू महाराष्ट्र हे एकमेव कमनशिबी राज्य असावे जेथे मराठी भाषकच आपणच विकसित केलेल्या गैरसमजांना सबळ पुराव्यांच्या प्रकाशात सोडण्याऐवजी अडसर बनत आहेत. खरे तर सर्व राजकीय पक्ष-संघटनांनी यासाठी एकत्र यायला हवे…पण ते कसे होणार?
शंकर सारडांसारखे समीक्षक म्हणतात कि मराठी साहित्य एवढे समृद्ध व्हावे कि एक दिवस मराठी साहित्त्यिकाला नोबेल मिळावे! हा आशावाद सत्यात कधीच येवू शकणार नाही असे नाही,पण मग मराठी साहित्याचीच यत्ता काय यावर आधी विचार केला पाहिजे. मराठीतील आजतागायत गाजलेल्या कादंबर्या बव्हंशी ऐतिहासिक अथवा परकीय कल्पना चोरुन लिहिलेल्या आहेत हे वास्तव काय सांगते?
वाचन संस्कृतीची सुरुवात बालपणापासून होत असते. पाश्चात्य भाषांत बाल, किशोर, कुमार साहित्याची अत्यंत सृजनशील अशी विपुल प्रमाणात निर्मिती होत असते. त्यामुळे मुलांना लहान वयातच वाचनाची गोडी लागते. यात रहस्य, थरार, गूढ, अद्भुतरम्य अशा विविधरंगी साहित्याचा समावेश असल्याने व साहित्यिक दर्जाही उत्तम असल्याने मुलांना आपापल्या आवडीनुरुप विपूल साहित्य उपलब्ध असते.
याउलट अत्यंत केविलवाणे असे मराठीचे चित्र आहे. मुळात मुलांसाठी लिहिण्याचीच आपल्या साहित्त्यिकांना लाज वाटते. भा. रा. भागवतांचा अपवाद वगळला तर आजीवन बाल-किशोरांसाठी लिहिणारा लेखक नाही. पण आता तेही आउटडेटेड झाले आहे. जे आजकाल सहित्य प्रसिद्ध होते त्याची लायकी जवळपास शुन्यवत अशीच आहे. अपवादाने अधुन-मधुन एखाददुसरे चांगले पुस्तक येते खरे, पण एखाद-दुसर्या अपवादांनी बाल-किशोर मराठी वाचनाकडे वळण्याची शक्यता नाही. वाचनाची सवय लहानपणापासून लागली तर मुलांच्या मनोविश्वावर सकारात्मक परिणाम होतो याचे भान आपल्याला कधीच नव्हते. आजही नाही. प्रकाशक जी काही मुलांसाठीची म्हणवली जाणारी पुस्तके काढतात ती अक्षरशः कोणत्यातरी शासकीय योजनेत त्यांची वर्णी लावण्यासाठी. त्यामुळे दर्जाचा विचार व अपेक्षा करता येत नाही. ही पुस्तके शेवटी शाळांच्या कपाटांत वा गोदामांत सडणार आहेत हे जसे प्रकाशकांना माहित असते तसेच खरेदी करणार्या शासकीय अधिकार्यांनाही. त्यामुळे मुलांच्या आवडींचा, त्यांच्यातील वाचनसंस्कृतीचा विचार कोण आणि का करेल? ज्याचा हिस्सा त्याला मिळ्ण्याशी मतलब! जेथे बालसाहित्यात असा लेखक/ विक्रेता व ग्राहक यांच्या संगनमताने एवढा भ्रष्टाचार होतो त्यांच्या संस्कृतीबद्दल काय बोलावे?
वाचकांच्याही यत्ता असतात. बाल-किशोर साहित्याचा अभाव आहे, ठीक. पण मग पुढे तरी काय? ज्याला पहिलीतच यश नाही त्याने एकदम एम.ए. ला बसवावे…ज्याने आधी काही सकस असे वाचलेलेच नाही त्यांच्या हाती जी.ए. द्यावेत अशी अपेक्षा करता येत नाही. वाचनाची सवय लागायला वाचकाला आधी रंजक साहित्य हवे असते. तेही दर्जेदार असायला हवे. आपल्याकडे त्याचीही वानवा. रहस्यकथा, गुढकथा, भयकथा, थरारकथा, विनोदी साहित्य….आहे कोठे? जे आहे ते रुपांतरीत अथवा अनुवादित…येथल्या मातीत जणु कसलेही रहस्यच नाही कि काय?
परकीय कथावस्तुंवर आधारीत का होइना मराठीत एके काळी रंजक सहित्याची मोठी लाट होती. गो. ना. दातार ते शिरवळकर एवढा प्रवास मराठीने केला. लाखो लोकांना वाचक बनवले. वाचनालये गजबजु लागली ती याच लेखकांमुळे. हेच वाचक मग अधिक गंभीर साहित्याकडे वळाले.
पण मग ही परंपरा खंडितच झाली. मराठी समिक्षकांनी रंजक लेखकांना साफ नाकारले. रंजक लेखक हा साहित्यिकच नसतो हे म्हणतांना त्यांनी अगाथा ख्रिस्ती, रेमंड च्यंडलर, चेस, गार्डनर अशा असंख्य लेखकांना मात्र जगाने नुसते डोक्यावर घेतले नाही तर राष्ट्रीय पुरस्कारही दिले याकडे दुर्लक्ष केले. पण आपल्याकडे अशा रितीने हिणवून घेत मग रंजक लेखन करायला कोण पुढे येणार? स्वतंत्र प्रतिभेने नव्या काळाशी सुसंगत, अधिक व्यापक परिमाणे घेवून येणारे नवे रंजक पण अनुभवविश्वात भर घालणारे साहित्यिक मराठीने निर्माण केले नाहीत. मारिओ प्युझो, जेफ्री आर्चर, गफोरसीथ…छे. आमची मजल तेथवर गेलीच नाही. आम्ही अवलंबून राहिलो मग अनुवादांवर. मराठीतील जीही काही वाचन संस्कृती आहे ती थोडीफार या रंजक साहित्याच्या अनुवादांमुळे. मराठी साहित्त्यिकांचे योगदान त्यात अल्पांश आहे हे नाईलाजाने म्हणावे लागत नाही काय?
मराठी साहित्यिकांची (किती जणांना साहित्त्यिक म्हणायचे हा प्रश्नच आहे.) सर्वात मोठी समस्या ही आहे कि एक पुस्तक प्रकाशित होते न होते, त्याला पारितोषिक कसे मिळेल, त्यावर परिचय कसे येतील…मग त्यावर आधारित पुढचे डाव काय..फायदे काय यातच लेखक गुंतून पडत जातो. एकदा तर मी एका लेखकाची कादंबरीचे हस्तलिखित वाचलेलेही नसता मला सांगितले कि ही कादंबरी तुम्ही फक्त प्रकाशित करा, राज्य शासनाचा पुरक्कार मिळणारच आहे. तो एवढय़ा ठामपणे बोलत होता कि त्याने काहीतरी फिल्डींग लावलेलीच आहे याची मला खात्रीच पटली. मी ती कादंबरी नाकारली. दुसर्या वर्षी त्याच्या कादंबरीला खरोखरच पारितोषिक मिळालेले होते. आपल्या साहित्त्यिक पुरस्कारांच्या या यत्तेवर कोणाही सुजाण वाचकाला शरम वाटायला हवी कारण बव्हंशी पुरस्कार हे अक्षरशः मॅनेज केलेलेच असतात याबाबत कोणीही शंका बाळगू नये. पुरस्कारप्राप्त पुस्तक वाचणे ही एक शिक्षाच बनून जाते आणि वाचक गंडवला जातो. लेखक 10 टक्के कोटय़ातील फ्लॅट मिळवायला पात्र ठरतो…काय वाचन संस्कृती वाढवणार?
तो कशाला आपली साहित्त्यिक म्हणूनची यत्ता वाढवायचा प्रयत्न करेल?
अशा कुपमंडूक साहित्त्यिकांकडून नोबेल विनर साहित्त्यिक निर्माण होईल कसा? वैश्विकतेला कवेत घेत मानवी जीवनाचे असंख्य पदर उलगडून दाखवत वाचकाला प्रगल्भ करणार्या कलाकृती निर्माण होतीलच कशा? तसे होणार नसेल तर वाचन संस्कृती बहरेलच कशी?
मराठीत गाजलेल्या (बव्हंशी गाजवल्या गेलेल्या) कृती या तुलनात्मक साहित्याच्या अंगाने पहायला गेले तर अजुनही प्राथमिक पातळीवर आहेत असे प्रसिद्ध तुलनाकार समीक्षक डॉ. आनंद पाटील म्हणतात हे खरेच आहे.
मुळात ज्या लेखकांना स्वतःच जीवनाला निधडय़ा छातीने सामोरे जाता येत नाही, अनुभवविश्वात भर घालता येत नाही ते साहित्यिक वाचकांना कोणते नवे जीवनदर्शन घडवणार आहेत? नेमाडेंसारखा साहित्यिकही जेथे आपली नीतिमत्ता प्रसंगी गहाण ठेवू शकतो तर इतरांची काय कथा? मग कशी मराठी भाषा समृद्ध होणार आहे? कसा वाचक समृद्ध होणार आहे? वाचक हा देशाचा नागरिक असतो. त्याच्या जडणघडणीत साहित्याने मोलाचा हातभार लावावा अशी अपेक्षा असते. परंतु आपले साहित्य एकूणातच त्याला दुबळ्या मानसिकतेच्या पोचट अनुभवविश्वातच अथवा इतिहास-पुराणकालीन तथाकथित गौरवगाथांतच गुंगवून ठेवू पाहत असेल तर सक्षम व समृद्ध नागरिक कसा घडणार? मराठी साहित्य कसे वैश्विक होणार?
संजय सोनवणी
(published in today's Navshakti)http://navshakti.co.in/aisee-akshare/113375/
"नेमाडेंसारखा साहित्यिकही जेथे आपली नीतिमत्ता प्रसंगी गहाण ठेवू शकतो तर इतरांची काय कथा?"
ReplyDeleteयाचा अर्थ नाही समाजाला.असे काय नेमाडेंनी केले कि तुम्ही असे शब्द वापरत आहात म्हणजे खरेच तसे काही आहे का असेल तर आम्हालाहि समजु दे.लेख डोळ्यात खरेच अंजन घालणारा आहे पण तो खरे तर लेखकांना वाचनास द्यायला हवा. सामुदायिक वाचन व्हायला हवे.
रंजकतेचा मुद्दा तुम्ही एकदम योग्य मांडला आहे. गंभीर, अमूर्त पद्धतीच्या लेखनाकडे जायचा प्रवास रंजकतेतून होऊ शकतो किंवा बऱ्याच जणांचा होतोच. आणि तो पाहिला टप्पाच ढिसाळ आहे.
ReplyDelete