एक पत्रकार व वादग्रस्त (अ)योगगुरू रामदेवबाबा यांचे सहकारी वेदप्रताप
वैदिक यांनी आपल्या पाकिस्तान भेटीदरम्यान स्थानिक पत्रकाराच्या मदतीने
मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा मूख्य सूत्रधार हाफीज सईद याची २ जुलैला
भेट घेतली. ही भेट सईद व वैदिक यांनी नाकारलेली नाही. या भेटीमुळे भारतात
वादळ उठणे स्वाभाविक होते. २६/११ च्या जखमा अजुनही ओल्या असतांना, या
हल्ल्यामागील सुत्रधारांना जेरबंद करण्याच्या अथवा पाकिस्तानात घुसून ठार
मारण्याच्या वल्गना वैदिकवादी एकीकडे करत असतांना वेदप्रताप वैदिक यांनी
खुद्द सईदचीच भेट घ्यावी व काश्मिरसंबंधातही अत्यंत स्फोटक विधान करावे
याचा अर्थ नीट समजावून घ्यावा लागणार आहे. मोदी सरकारच्या कथनी आणि करणीत
केवढे अंतर आहे हेही या निमित्ताने लोकांनी समजावून घावे लागणार आहे.
भाजपाच्या मागील कार्यकालात कंदाहार प्रकरण झाले होते व मौलाना अजहर मसूद
सहित तीन अतिरेकी खुद्द तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या बंदोबस्तात
कंदाहारला मूक्त करण्यात आले होते हेही या निमित्ताने प्रकर्षाने आठवते.
दहशतवाद्यांशी लढ्याबाबत भाजपा व तिच्या मातृसंस्था तोंडी कितीही उग्रवादी
भाषा वापरत असले तरी त्यांची कृती मात्र विपरित असल्याचे दिसून आले आहे.
अशा परिस्थितीत भाजपचेच समर्थक पत्रकार जेंव्हा भारताला मोस्ट वांटेड
असलेल्या हाफीज सईदला भेटतो तेंव्हा प्रश्नचिन्ह उठणे स्वाभाविक आहे.
हाफीज सईद कोण आहे?
लष्कर ए तय्यबा या सध्या जगभर बंदी असलेल्या
दहशतवादी संघटनेची समाजसेवी शाखा म्हणजे जमात-उद-दवा. या संघटनेची
पाकिस्तानात अनेक धर्मादाय इस्पितळे आहेत. काही शाळाही ही संघटना चालवते.
वरकरणी समाजसेवी बुरखा पांघरल्यामुळे जगभरातून या संघटनेकडे देणग्यांचा पूर
वाहत असतो. वरकरणी समाजसेवा हा या संघटनेचा उद्देश दिसत असला तरी तरुण
दहशतवाद्यांची भरती करणे, त्यांना प्रशिक्षण देणे, कृतीकार्यक्रम आखणे व
अंमलातही आनणे ही कामे ही संघटना करत असते. या संघटनेचे अनेक दहशतवादी
प्रसिक्षण केंद्रे पाकव्याप्त काश्मिरमधील मुजप्फराबाद या भागात आहेत.
२६/११ च्या मुंबई हल्ल्यातील सहभागी कसाबसहित सहभागी तरुणांना प्रशिक्षण
याच भागातील तळांवर दिले गेले. तेथुनच त्यांना मुंबईला समुद्रमार्गे रवाना
करण्यात आले. २६/११ चा आतंक कोणीही भारतीय विसरू शकत नाही.
हाफीज सईद हा या संघटनेचा प्रमूख आहे. २६/११ च्या गुन्ह्यातील तो मुख्य
सूत्रधार व आरोपी असून भारताने त्याला ताब्यात देण्याची मागणी
पाकिस्तानकडे नोंदवली आहे. पण अद्याप तरी पाकिस्तानने त्या मागणीला
वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत.सईद हा स्वत: अत्यंत बंदोबस्ताने व
पुरेसे गुपित पाळून रहात असतो. एका पत्रकाराने "हाफीज सईदला भेटायला आवडेल
का?" असे विचारल्यावरून आपण होकार दिला व पत्रकाराने फोन करुन भेट ठरवून
दिली असा दावा भारतात परतल्यावर वैदिक यांनी केला आहे. वैदिक यांचे कार्य
फक्त पत्रकारितेपुरते मर्यादित असते तरी अशी भेट सहजी कोणी घालून देवू शकते
यावर कोणाचा विश्वास बसणार नाही.
वेदप्रताप हे बाबा रामदेवांचे निकटचे सहकारी मानले जातात. पाकिस्तानात
ते सईदला मोदींचा दूत म्हणुन भेटल्याची चर्चा माध्यमांत व राजकीय वर्तुळांत
आहे. त्य्यामुळे ही भेट निखळ पत्रकार म्हनून जर वैदिक यांनी घेतली असती तर
त्या भेटीचा वृत्तांत त्यांनी लगेच प्रसिद्ध केला असता. पण तसे घडलेले
नाही. त्यामुळे ही एका पत्रकाराने स्वतंत्रपणे घेतलेली भेट आहे या दाव्यात
कितपत तथ्य असेल? या भेटीत सईद यांनी आपल्याला ते मोदींना शत्रु मानत नसून
आपण दहशतवादी नसल्याचे व आपल्या विरुद्ध अपप्रचार केला जात असल्याचे
सांगितले असे म्हटले आहे.
मोदी समर्थकांच्या दृष्टीने ही भेट म्हणजे "मोदी-कावा" असून सईदला धडा
शिकवण्याच्या रणनीतीचा एक भाग असू शकते. मोदीमाहात्म्य ज्यांच्या डोक्यात
खुपच गेले आहे आणि मोदी म्हणजे कुटील बुद्धीमत्तेचे धनी आहेत या
विश्वासाच्या जाळ्यात अडकले आहेत त्यांना एक प्रश्न पडायला हवा तो हा कि
अशी भेट झाली म्हणजे सईदला पकडायची अथवा ठार मारण्याची दिशा कशी मिळेल?
विघातक दहशतवादी कारवायांची आखणी करून जो त्यांना अंजाम देवू शकतो, ज्याचे
जगभर शत्रू आहेत तो माणूस आजवर जर सुरक्षित राहू शकतो तो एका पत्रकाराला
भेट दिल्यानंतरही स्वत:ची सुरक्षितता राखु शकणार नाही काय?
ही भेट का घेतली? ही शिळोप्याच्या गप्पा मारायला झालेली भेट निस्चित
नव्हती हे शेंबडे पोरही सांगू शकेल. त्या भेटीत खरोखर काय चर्चा झाली हे
स्वत: सईद किंवा वैदिक सांगत नाही तोवर कदाचित आपल्याला समजणारही नाही.
प्रश्न असा आहे कि भारताच्या शत्रू क्रमांक एकला वैदिक यांनी भेटावे काय?
वर म्हटल्याप्रमाणे एक पत्रकार म्हणून तो अधिकार त्यांना नक्कीच आहे. परंतू
ते मोदींचे प्रतिनिधी म्हणून भेटले असतील तर मात्र अत्यंत गांभिर्याने या
प्रकाराकडे पाहिले पाहिजे. ते जर सईद यांच्या मनात भारत वा मोदी यांच्याबदल
काय चालले आहे हे जानण्यासाठी भेटले असतील तर त्याला मुर्खपणा या सदरात न
टाकता देशद्रोह या सदरात टाकून त्यांच्यावर कारवाई करायला हवी, कारण भारतीय
न्यायालयांनी एकदा निर्नय दिल्यानंतर त्यात उठाठेव करण्याचा अधिकार
कोणत्याही नागरिकाला नाही.
खरे तर प्रधानमंत्री पदाच्या शपथग्रहण सोहोळ्याच्या वेळीसच पाकिस्तानी
राष्ट्राध्यक्षांना जी विशेष वागणूक दिली गेली व कलम ३७० ची चर्चा ज्या
वेगाने उठवली गेली व त्याच्या शंभरपट वेगाने दाबून टाकली गेली तेंव्हाच या
प्रकरणात काहीतरी शिजते आहे याची कल्पना यायला हवी होती.
काश्मिर आणि वैदिकांचे तारे!
वैदिकांनी हाफीज सईदचे भेट घेतली
हे भेटीच्या पुरेशा तपशिलाच्या अभावात दिर्लक्षीत करता येईल. परंतू
काश्मीरबाबत आपली जी भुमिका पाकिस्तानात डान न्युज (Dawn News) वाहिनीवर
मुलाखत देतांना वैदिक यांनी मांडली आहे ती जास्त विघातक, विभाजनवादी आणि
पाकधार्जिनी आहे.
वैदिक यांच्या मताप्रमाणे व्याप्त काश्मिर आणि सध्याचा भारताचा भाग
असलेला काश्मिर यांतील जनतेने एकत्र यावे व स्वतंत्र राष्ट्र म्हणून
स्वातंत्र्य उपभोगावे व त्याला पाकिस्तान आणि भारताने सहाय्य द्यावे.
स्वतंत्र काश्मिरी, त्यांचे उद्योग आणि वैभव यामुळे सध्याचा काश्मिर खरोखरच
स्वर्ग बनेल. त्यांचे नागरिक इस्लामाबाद-कराचीतील नागरिकांप्रमाणे जसे
स्वतंत्र असतील तसेच भारतातील नागरिकांप्रमाणेही स्वतंत्र असतील.
अशा रितीने त्यांनी मुलाखत देतांना काश्मिरच्या स्वतंत्र अस्तित्वाचे
तत्वज्ञान मांडले. भारतात आल्यानंतर त्यांनी या मुलाखतीबाबत छेडले असता
आपले म्हनने १८० अंशाच्या कोनात बदलले व धादांत खोटे बोलत "मला जी आजादी
म्हणायचीय ती माणसाला-नागरिकाला असनारी आजादी" म्हणायचे होते." असे विधान
केले. हेही विधान अजब अशासाठी आहे कि काश्मिरमधील (पाकव्याप्त काश्मिर
वगळता) पारतंत्र्यात आहेत असे त्यांना म्हनायचे आहे काय?
भाजपच्या मागील कार्यकालाच्या दरम्यान व्याप्त काश्मिर पाकिस्तानला
कायमचा देऊन टाकावा आणि सध्याची ताबारेषा हीच आंतरराष्ट्रीय सीमा मानण्यात
यावी असे म्हनायची टूम निघाली होती. पुण्यातही या विषयावर एका काश्मिरी
विद्वानाचे व्याख्यान झाले होते. आता वैदिकांच्या मुखातून त्याही पुढची
मुक्ताफळे बाहेर पडत आहेत. यातून देशात एक वैचारिक गोंधळ उडवून देण्याचा
डाव नाही असे कोण म्हणेल?
वैदिक हे रा. स्व. संघाचे हस्तक आहेत असा आरोप राहूल गांधींनी केला
आहे. तसेच वैदिक व हाफीज सईद यांचीही भेट घालून देण्यात पाकिस्तानातील
भारतीय उच्चायुक्तालयाने पुढाकार घेतला असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त
केला आहे. राजकीय आरोप किती गांभिर्याने घ्यायचे हा प्रश्न असला तरी
त्यांचे महत्व कमी होत नाही. मुळात एका बिनीच्या दहशतवाद्याशी शत्रू
राष्ट्रातील पत्रकाराची भेट होऊ शकते ती वर म्हटल्याप्रमाणे शिळोप्याच्या
गप्पांसाठी नव्हे. या मुलाखतीनंतर जर वैदिक काश्मिरबाबत आपले तारे तोडत
असतील तर आधीची सईदबरोबरची भेट ही वेगळ्या दृष्टीकोनातून पहावी लागते तरच
या दोन बाबींचा उलगडा होण्यास मदत होऊ शकते.
वैदिक हे हिंदुत्ववादी (पक्षी वैदिकवादी) विचारसरणीचे आहेत. रा. स्व.
संघाशी ते सरळ निगडित् नसले तरी अशा अनेक विद्वानांप्रमाणे ते
अप्रत्यक्षरित्या संघाचे काम पुढे नेत असतात. सध्या मोदी आणि संघ
यांच्यातील संबंध ताणले गेलेले आहेत हे ज्या पद्धतीने भाजपावर स्वत:चे
वर्चस्व बळकट करत नेत संघाचे पंख कापत चालले आहेत त्यावरून दिसून येते.
अमित शहांसारख्या वादग्रस्त इसमाला त्यांनी भाजपाची अध्यक्ष नेमण्याची
परंपरागत पद्धतही मोडकळीस काढत ज्या पद्धतीने अध्यक्षपदावर आणले ते
संघाच्या कर्मठ (बे)शिस्तपद्धतीला साजेशे नाही. संघाचा ३७० चा अजेंडा एका
मंत्र्याने जोरात उचलला आणि मोदींच्याच इशा-यासरशी गपगार झाला. मोदींवर
मुस्लिमद्वेषाचे आरोप आहेत तसेच गुजरातेतील मुस्लिम कत्तलीचेही आरोप आहेत
हे वास्तव आहे. तसेच देशपातळीवर घडवावे असा संघाचा होरा असल्यास आश्चर्य
नाही. परंतू मदरसे आणि हाज यात्रेबाबतची मोदी सरकारची भुमिका संघाच्या पचनी
कशी पडनार?
त्यामुळे वैदिक हा मोदीचा दूत कि रा, स्व. संघाचा दूत हा प्रश्न आला कि
वैदिक संघाचा दूत असून मोदींना ब्यकफुटला नेण्याचे कारस्थान असण्याची
शक्यता वाटने स्वाभाविक आहे. संघ परंपरेला ते साजेशे आहे. अनेक
घातपातांसाठी संघप्रणित हिंदुत्ववादी दहशतवादी संघटनांनी पाकिस्तानी
दहशतवाद्यांचे सहाय्य घेतल्याचे आरोप आहेत. समझौता एक्स्प्रेस स्फोटांचे
उदाहरण बोलके आहे. अशा स्थितीत वैदिकची सईदशी भेट भारतीय उच्चायुक्तालयाने
घालून दिली कि दस्तुरखुद्द आयएसआयने हेही तपासले गेले पाहिजे.
वैदिक यांची हाफीज सईदशीची भेट ही पत्रकारितेच्या दृष्टीकोनातून झालेली
नाही हे उघड आहे. त्यामागील कुटील डाव काय होते हे आपल्याला कदाचित
समजणारही नाही. परंतू काश्मीर स्वतंत्र व्हावा हे आपले मत जाहीरपणे आणि
तेही पाकिस्तानात व्यक्त करून त्यांनी देशद्रोह केला आहे. . त्यांच्यावर
यथोचित कारवाई व्हायलाच हवी यात शंका नाही. सर्वच विरोधी पक्षांनी (स्वत:
मोदींनीही) याबाबत तळाशी जाऊन सत्यशोधन करायला हवे.
पाकिस्तानशी युद्ध हाच पर्याय असा साहसवाद दाखवत सातत्याने प्रचार
करना-या संघाची व भाजपाची ही नीति आता म्हणे "मित्रनीति" मद्ध्ये बदलली आहे
आणि तिचे स्वागत करा असे त्यांचेच बगलबच्चे सांगत फिरत आहेत हे अजुनच
विनोदी आहे. एक तर त्यांनाच "संघनीति" अजून समजलेली नाही किंवा ते उर्वरित
भारतियांना मुर्ख समजत आहेत.
(हा लेख ताज्या "कलमनामा" साप्ताहिकात प्रसिद्ध झाला आहे.)