Wednesday, July 16, 2014

राष्ट्रांची फसवी सार्वभौमता!

 एक जग : एक राष्ट्र (४)


राष्ट्रवाद हा शिकवावा लागतो. ती नैसर्गिक प्रेरणा नाही. लहानपणापासून पालक व नंतरच्या समाज व शैक्षणिक जीवनात आपले राष्ट्र, त्याच्या समृद्ध परंपरा, उज्ज्वल इतिहास आणि चारित्र्यसंपन्नतेच्या ख-या-खोट्या संकल्पनांचा मारा करत आपापल्या राष्ट्राबाबतचा जाज्वल्य अभिमान निर्माण सर्वत्रच केला जात असतो. याचा अर्थ "राष्ट्रवाद" ही नैसर्गिक प्रेरणा नाही. समुहजीवनासाठी व सुरक्षिततेसाठी जसा आदिम काळात टोळीवाद विकसीत झाला तसाच आधुनिक काळात राष्ट्रवाद विकसीत झाला आहे असे म्हणता येईल.

कोणत्याही राष्ट्राचा इतिहास अथवा परंपरा स्वतंत्र बेटासारख्या नसतात. कोणत्याही प्रदेशाचा इतिहास हा अन्य प्रदेशांशी निगडित असतो. परंपरांबाबतही असेच म्हणता येईल. पुरातन काळापासून, जेंव्हा जमीनीवर मालकी ही संकल्पनाही उदयाला आलेली नव्हती तेंव्हापासून, मनुष्य हा सर्वच बाबतीत देवान-घेवान करत आला असल्याचे आपल्याला दिसून येईल. एवढेच नव्हे तर कालौघात जे अयोग्य वटले त्याचा त्याग करत नव्या संकल्पना विकसीत करत गेला असल्याचे दिसून येईल. संपर्काची साधने ज्या काळात अतीव मर्यादित होती त्या काळातही सिंधू संस्कृती आणि मेसोपोटेमियन संस्कृती परस्पर देवाण-घेवाण करत असल्याचे इतिहासात पाहता आपल्याला दिसते. अमुकची संस्कृती श्रेष्ठ आणि तमुकची कनिष्ठ असे ठरवायचे कोणतेही प्रमाण उपलब्ध नसून संस्कृत्यांची अंगभूत वैशिष्ट्ये ही त्या त्या समाजांच्या प्रदेशनिहाय निकडीतून जन्माला आलेली आपल्याला दिसतात. अरबांचे टोळीजीवन व श्रद्धा-संकल्पना ही त्यांच्या वाळवंटी प्रदेशातील अपरिहार्य निकड होती. त्यातील टोळीअभिमान आणि आक्रमकता आणि त्या अनुषंगाने जन्माला आलेल्या नैतिक संकल्पनांकडे त्यांच्या अधिवासाच्या परिप्रेक्षात पहाव्या लागतात. सुपीक प्रदेशातील नैतिक तत्वे आणि त्यांची नैतिक तत्वे यांची तुलना होऊ शकत नाही. पण ती आपण करत असतो आणि सांस्कृतिक तुलना करत जात असतो, ही चुक नव्हे काय?

तरीही त्यांच्यात आणि अन्यांत सांस्कृतिक देवाण-घेवाणी झालेल्याच आहेत हे वास्तव कसे नाकारता येईल?

थोडक्यात राष्ट्राच्या सीमा टोळीपद्धतीने ठरवत, आंतर्गत तथाकथित सार्वभौमता जपत संस्कृती आणि इतिहासाचे वितरण आपापल्या सोयीनुसार करत त्यांचा गौरव रुजवत जी राष्ट्रभावना तयार केली जाते तिचा अंतिम उद्देश्य तरी काय असतो?

इतर राष्ट्रांशी आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक स्पर्धा करत राष्ट्राच्या नागरिकांमद्ध्येही तीच स्पर्धाभावना निर्माण करणे हे यामागील वरकरणी कारण आहे असे म्हणता येईल. परंतू त्याचे लाभ कितपत होतात? की त्याचे तोटेच अधिक आहेत?

कोणतेही राष्ट्र अलग बेटाप्रमाणे स्वतंत्र आणि इतरांपासून पुरेपूर अलिप्त असे अस्तित्वात असुच शकत नाही. जागतिक घडामोडींचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम हा सर्वच राष्ट्रांवर होत असतो. कोणत्याही राष्ट्रात दुष्काळ पडला, युद्धजन्य स्थिती निर्माण झाली अथवा युद्धे सुरु झाली तरी त्याचा परिणाम दुरान्वयानेही ज्या राष्ट्रांशी नाही अशांवरही त्याचा अपरिहार्य परिणाम होतो हे आपण रोजच्या घडामोडींमधुन पाहतो. भांडवलबाजार ते अन्न-धान्याच्या भावांचे इंडेक्स त्या घडामोडींवर ठरतात, फक्त राष्ट्रांतर्गतच्या घडामोडींमुळे नाही. परराष्ट्र धोरणे, (कोणाशी मैत्री, कोणाशी शत्रुत्व, कोणाबाबत अलिप्तता), आर्थिक धोरणे आणि व्यापारनीति ठरवतांना जागतिक संदर्भ अतलपणे येत असतात. या धोरणांत सातत्याने जागतिक बदलत्या स्थितीनुसार बदल घडवावेच लागतात हे उघड आहे. असे निर्णय घेतांना वर्चस्वतावादी राष्ट्रांची धोरणेही विचारात घ्यावी लागतात, नव्हे अनेकदा त्यांचेच ऐकावे लागते.  तशी धोरणे ठरतात.

या राष्ट्रांच्या निर्णयप्रक्रियेवर प्रभाव टाकणारा अजून एक मोठा प्रभावशाली घटक असतो व तो म्हणजे बडे भांडवलदार. अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राच्या आर्थिक आणि सामरिक निर्णयप्रक्रियेवर अमेरिकन उद्योजकांची केवढी पकड आहे हे आपल्याला माहितच आहे. प्रत्येक राष्ट्रात हे होते. बहुराष्ट्रीय कंपन्या तर अनेक देशातील सरकारे अप्रत्यक्षपणे स्वत:च चालवत असतात हे अनेक उदहरणांवरून सिद्ध होईल. अनेक सरकारे उलथवली जातात ती स्वदेशाचे सहकार्य घेत आपली अर्थसत्ता निर्माण करण्यासाठी भारताचे एफ. डी. आय. च्या कच्छपी लागणे, नवा भुमीग्रहण कायदा आनणे ई. घटना या दृष्टीने पहाव्या लागतात. माध्यमे बव्हंशी या भांडवलदारांच्याच ताब्यात असल्याने आपणास अनुकूल जनमत तयार करणे, एखाद्या गोष्टीची अपरिहार्यता लोकांना पटवून देणे यासाठी ते माध्यमांचा चपखलपणे कोणाच्या लक्षात येऊ न देता वापर करतात. लोकांना कोणती माहिती द्यावी आणि कोणती देवू नये याची चाळणी आधीच लागलेली असल्याने सर्वसामान्य नागरिकांना सत्याचा पत्ता कधीच लागत नाही. हाती पडतात ते सत्याचे विकृत तुकडे. आणि त्याच आधारावर ते नागरिक मतदाने करतात आणि सार्वभौम नागरिकाचा असार्वभौम अधिकार बजावण्यात खूष राहतात.

मुळात कोणत्याही राष्ट्राची सार्वभौमता ही एक फसवी बाब आहे. तिला वास्तवाचा कसलाही आधार नाही हे मात्र कोणी लक्षात घेत नाही.

मग अशा परिस्थितीत "राष्ट्र" या संकल्पनेचे काय होते? ती लोकनियुक्त हुकुमशहा, अनिर्बंध भांडवलदार यांना ज्ञानाच्या मुलभूत नागरी अधिकारांवर घाला घालत निरंकुश राजसत्ता आणि अर्थसत्ता उपभोगू देण्याचे साधन आहे कि काय?

आपल्याला यावर मुलभूत विचार करायला हवा!

10 comments:

  1. जे फसवं नाही असं या जगात काय आहे?

    ReplyDelete
  2. आप्पा - बर का बाप्पा - तुला वेळ आहे का ? संजय काय सांगतोय ते आपण समजून घेऊ या ! आणि त्याला काही प्रश्न विचारुया !किंवा तू उत्तरे दे - तेही चालेल
    बाप्पा - हं , बोल चालेल !
    आप्पा -राष्ट्रवाद ही नैसर्गिक प्रेरणा नाही ? मग शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले , किंवा बांगला देशाने लढा दिला ,अमेरिकेने स्वातंत्र्य युद्ध केले ते उगीचच का रे बाप्पा - ?का शिवाजी महाराजाना पण कुणी भांडवलदारांनी पैसा पुरवला होता ?
    बाप्पा - संजायालाच उत्तर देऊ दे !आणि परंपरेने धर्मपण कोणताही असो कालबाह्य झाला पाहिजे , नाही का ? पण संजय सुद्धा शिवधर्म हवाच असेच सांगत असतो - ते कशासाठी ?संजय धर्माविरोधी का नाही बोलत ? फक्त वैदिकानाच विरोध कशाला ?
    आप्पा - तू म्हणतो आहे ते अगदी खरे आहे , त्या हिशोबाने आजचे सत्य जे आहे ते म्हणजे परिपक्व भांडवलशाही ! त्याशिवाय जगबुडी होईल - कारण समाजवाद जगणे म्हणजे खोटारड पणा आहे - समाजवाद हा निराशेतून निर्माण होतो -त्याला परोपकाराचे अधिष्ठान असल्यामुळे तो स्वतःच्या पायावर उभाच राहू शकत नाही -
    बाप्पा - आज भौतिक ज्ञान हे अमेरिके सारख्या देशाला सुद्धा तिसऱ्या जगात अपग्रेड करावेच लागते कारण त्यांना त्यांचे तंत्रज्ञान विकायचे असते !भारत देश हा वर्किंग अनार्की आहे , त्याची संस्कृती आणि तत्वज्ञान हे भोंगळ आहे जगायच्या लायकीचे नाही !
    आप्पा - आपली सर्व दर्शने आणि तत्व ज्ञाने आपल्याला स्वातंत्र्य मिळवू देऊ शकली नाहीत आपला देश हा एक प्रचंड कडबोळे आहे
    बाप्पा - जगन्नाथाचा रथाच जणू !कसा खेचला जातो ते माहित नाही - निदान एका दिशेने तरी खेचतात की नाही , आणि खेचण्याचे तत्व ज्ञान तरी नक्की एक आहे का ?
    आप्पा - शैव काय आणि वैष्णव काय - भांडवलदारांना त्याचे काहीच सोयर सुतक नाही !तुम्ही शेंडी ठेवा किंवा सुंता करा त्यांना त्याचे काहीच कौतुक नाही
    त्यांना त्यांचा माल विकला गेला पाहिजे ! बस्स - तुम्ही दारासमोर रांगोळी काढता का - किंवा पहाते बांग देता , ते त्यांचे क्षेत्रच नाही !
    बाप्पा - संजय म्हणतो तसे सिंधू संस्कृती आणि मेसापोतेमिया यांच्यात व्यापार होताच होता - ते काही शैव आणि वैष्णव असे भांडत बसले नाहीत ! देशाची प्रगती ही व्यापार आणि टेक्नोलोजी यावरच अवलंबून आहे !
    आप्पा - मग त्या दृष्टीकोनातून शिवाजी महाराजांनी स्वराज्य का निर्माण केले ? बांगला देश का जन्माला आला ?बंगाली संस्कृती हि कशी समजावून घ्यायची ?
    छत्रपतींचे राज्य हे इतर मुसलमान राज्यापेक्षा कोणत्या बाबतीत वेगळे होते ? त्याचा ड्रायव्हिंग फोर्स काय होता , आणि तो आजच्या राजकारणात आपण का नाकारत चाललो आहोत ?
    बाप्पा - चीनमध्ये रमझानला बंदी आहे आणि भारतात मुस्लिमांचे तुष्टीकरण चालू आहे हे कसे समजून घ्यायचे ?
    आप्पा - सच्च्या भांडवलदाराला यात काहीच गम्य नसते , त्यांचे कायदे हे सामाजिक स्वच्छतेचे असतात , त्यांना निर्मिती क्षमता अपेक्षित असते
    बाप्पा - मोघल इथे का आले आणि इंग्रज इथे का आले ते अभ्यास करण्यासारखे आहे
    आप्पा - पण संजय सर आपल्याला समजावून सांगतील का ?

    ReplyDelete
    Replies
    1. हा बोगस आप्पा बापा पुन्हा इथंही थिडपडलाच!

      Delete
  3. का हो महाशय ,
    सतीची प्रथा , केश वपन , या विषयी तुमच्या टाळ कुट्या संतानी कधीच आवाज उठवला नाही - असे का बरे ?तुकारामाना एकही अभंग रचता आला नाही - की केशवपन आणि सती जाणे हे अधर्म आहे , धर्माविरुद्ध आहे ?ते जर शिवाजी महाराजांचे राजगुरू होते असा खोटा डंका आजकाल पिटला जातोय तर त्यांनी एकदाही छत्रापतीना याबाबत सांगितले नाही ?
    सर्व संत जर बहुजन समाजाचे सुधारक होते आणि लाखोंच्या संख्येने ते आशाधी कार्तिकी करत होते तर त्यांनी या सामाजिक सुधारणा का नाही केल्या !
    संजय साहेब तुम्ही तरी उत्तर द्या !

    ReplyDelete
    Replies
    1. @Anonymous July 17, 2014 at 1:55 AM

      मित्रा, संतांचे कार्य हे त्या काळाला अनुरूपच होते, त्या काळाचे ते समाज सुधारकच होते.

      Delete
  4. संजय सर ,
    आर्थिक व्यवहार करायला जरी राष्ट्र हि कल्पना सध्या सोयीची असली तरी तिची गरज आहे का ?
    माझ्या मते बाजारीकरणाला ह्या देश कल्पनेचा चांगलाच हातभार लागतो - तसेच धर्म या कल्पनेचे आहे हे आपण बघतो !
    आज धर्म म्हणजे अगदी ढोबळमानाने काय अस्तित्वात आहे ?
    असे कबूल करावे लागते की आपल्या अडचणी सोडवणारी एक घटनाबाह्य अशी सामाजिक सोय अशीच धर्माच्या अस्तित्वाची कबुली द्यावी लागते
    लोकलमध्ये चालणारे जपजाप्य , सरकारी ऑफिसात असणारे गुरुवार शनिवारचे प्रस्थ ,
    असंख्य गंडे ताईत तोडगे आणि महाराज यांनी समाज खुष असतो आणि त्याला भांडवलदारांचा काहीच विरोध नसणार -
    नेमकी तीच गोष्ट राष्ट्र या कल्पनेची सुद्धा आहे आज जगात जितके नैसर्गिक रिसोर्सेस आहेत त्याच ठिकाणी नेमके अमेरिकेचे शिरकाव करण्याचे ध्येय आहे , कारण यापुढे प्रदूषण ग्रस्त आणि प्रदूषणमुक्त अशीच जगाची वाटणी होणार आहे
    जगात लोकसंख्येचा स्फोट फक्त हिंदुस्तान आणि चीन इथेच आहे ते एक महा प्रचंड आकर्षण भांडवलदारी जगाला आहे , भारतात कधीच क्रांती होणार नाही अशी काळजी त्या महासत्ताच घेतील ,चीन भारतावर आक्रमण करणार नाही अशी काळजीही त्या महासत्ताच घेतील
    त्यामुळे आपण टाळकुटे पण करायला काहीच हरकत नाही !
    ऑलिम्पिक मधील आपलं रेकोर्ड अत्यंत केविलवाणे आहे
    सामाजिक आरोग्याचे दिवाळे वाजले आहे
    आपला देश जगवला जात आहे , त्यात आपले कर्तुत्व काहीच नाही मोदी आणि गांधी यांना उगीचच वाटत असते की आपण या देशाला बदलू शकतो - पण या देशात होणारी घुसखोरी आणि
    कोते राजकीय नेतृत्व यामुळे देशाची सर्व प्रगती कसर लागल्या सारखी कुरतडली जाते
    आपण एक कुणीतरी म्हटल्या प्रमाणे आपले अस्तित्व महासत्तांच्या हवाली करून खालच्या मानेने जगणारे प्रजाजन आहोत , आपण जगवले जातोय हे एक भयानक सत्य आहे
    आता हल्ला करून देश जिंकायची गरज संपलेली आहे तो घात्याताला व्यवहार आहे हे महासात्ताना समजते , महासत्ता यापुढे आपले सर्व खनिज लुबाडून घेतील ,आज अरब तेलावर्कुनचा ताबा आहे ?
    पण हे आपण समजून घेत नाही , we have missed the bus !
    वेळ आली की जात धर्म वैदिक अवैदिक , स्पृश्य अस्पृश्य ,शैव वैष्णव हिंदू आणि मुसलमान , आर्य - अनार्य असा वाद घालायला आपल्याला पूर्ण वेळ आणि बळ असते - आपण फक्त इतिहासात रमतो
    आणि आपला इतिहास थोर आहे अशी आपली गोड समजूत आहे
    तिथे आपण कोणत्याही महासत्तेला शरण जात नाही - आणि हीच तर ग्यानबाची मेख आहे !
    पृथ्वीराज घोरपडे

    ReplyDelete
  5. व्यक्तीच्या जीवनात जसे आई वडील,भावंडे,मित्र मैत्रिणी,नातेवाईक,शिक्षकशेजारी वगैरे वगैरे अशी आपल्या जाणिवेची कक्षा विस्तारत जाते तशी टोळी,वस्ती,गाव,नगर ,राज्य याप्रकारे समाजाची कक्षा विस्तारत गेली असे म्हणावे का ?व्यक्तिगत जीवनात जात,धर्म,व्यवसाय हे जे घटक यापुढेही जाऊन सहकार्य,स्पर्धा आणि वैर वगैरेसारख्या गोष्टींना जन्म देतात आणि संघर्ष निर्माण करतात त्यावर राष्ट्रवाद हा उतारा म्हणायचा का?आणि या गोष्टी जेव्हा स्थानिक पातळीवरून वैश्विक पातळीवर जातात तेव्हा विश्वबंधुत्व किंवा नागरिकत्व याविषयी विचार केला पाहिजे असा आशय आहे असे मला वाटते.

    ReplyDelete
  6. संजय सर
    आपण वैदिक याची पाकिस्तान भेट यावर लिहिणे हि काळाची गरज आहे का ?

    मुघल इथे आले त्यांनी इथे राज्य केले ते परत गेले नाहीत
    मुस्लिमांना वेगळा देश दिला पण ते सर्व तिथे गेले नाहीत
    आणि इंग्रज इथे परक्या सारखे राहिले आणि इथे भौतिक ज्ञान गंगेची गंगोत्री आणून निघून गेले
    जाताना त्यांनी आपल्याला काय दिले ? त्यांनी जाताना विध्वंस नाही केला !
    यातून काय समजायचे ?
    आता शरद पवार यांच्या मुस्लिम आरक्षणानंतर देवगिरीच्या यादवांचा इतिहास नव्याने लिहायला पाहिजे - देवगिरीचा राजा चक्कर येउन खंदकात पडला !

    ReplyDelete
  7. कुटुंबाची मर्यादा आपण आपल्या परीने विकास करून स्वीकारली तशीच राष्ट्राचीही. दोन्हीकडे कुणी स्वतंत्र नाही आणि शोषणही युगानुयुगे जगभर चालूच आहे. तरी जगण्याला बंधन हवे म्हणून केलेली ही व्यवस्था आहे. ती पाळण्यात आनंद आहे हे न कळल्याने मर्यादाभंग होतात व सर्वांना त्रास होतो. सकारात्मक प्रबोधन करीत राहणे एवढे जो तो आपल्या परीने करू शकतो.

    ReplyDelete
  8. "हे विश्वची माझे घरं" कसा करू संसार???????????

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...