मध्यरात्र उलटून गेली होती. माझे लिहिणे सुरुच होते. दंगावुनच गेलो होतो मी माझ्या पात्रांत, घटनांत. पुढच्या संभावना लिहिता लिहिताच दृष्टीसमरुन तरळत होत्या. बाहेर निरव शांतता. क्वचित कधी पहारेक-याचा काठी आपटण्याचा आवाज. पण त्या आवाजाने मी कधीच डिस्टर्ब झालेलो नाही. उलट निरवतेच्या पाठीवरील सपकाराच वाटे तो. त्याखेरीज निरवताही कशी कूस बदलणार?
कोणास ठाऊक, मला मृत्य्चे अनिवार कुतुहल आहे. माझ्या अनेक कादंब-या मृत्युचे गूढ उलगडायचा प्रयत्न करतात. हाती काही अंतिम असे लागले नाही तरी संभावना अनेक आहेतच की! त्या शोधायला मला खूप आवडते. कधी कधी मी निखळ तत्वज्ञानाच्या रस्त्याने चालतो तर कधी चमत्कृतीपुर्ण कथानकेही वापरतो. लोकांनाही आवडतात वाचायला. त्यांना त्या समजलेल्या असतातच असे नाही. अनेकदा तर असे होते कि लिहितांना जे माझ्या मनातही नव्हते ते गृहित धरून समिक्षकही समिक्षा करतात. हसू येते मला ते वाचून. पण चालायचेच. मनुष्याचे मन कशाबद्दल काय विचार करेल हे कधी उमजलय का कोणाला?
मी लिहिणे थोडे थांबवले. अत्यंत वेगाने टायपत असल्याने बोटे दुखायला लागली होती. लिहित असलेला प्रसंग एका उंचीवर आला होता. त्याला अजून कसे उंचीवर नेता येईल? विचार करायलाही अवकाश हवा होता.
मी थोडा मागे रेललो. लिहिलेले पुन्हा वाचले. मग पाणी प्यायलो. बाथरुममद्ध्ये गेलो. मुततांना मला एक भन्नाट कल्पना सुचली. दोन तीन ओळी उडवून आता जे सुचले ते जोडत नेले कि प्रसंगाची दाहकता, त्यातील मर्मभेदीपणा अजून वाढणार होता. मी बाहेर आलो. खुर्चीवर बसून की प्यड वेगाने बडवू लागलो.
तेवढ्यात डोअरबेल वाजली.
आधी लक्षच दिले नाही. टायपण्याचा वेगही कमी केला नाही. पण पुन्हा एकदा डोअरबेल वाजली.
मग लक्षात आले कि ही मध्यरात्र आहे आणि तरीही कोणी बेल वाजवतय. वाटलं, वाचमन असेल. मी नाईलाजाने चडफडत...तळतळाट देत उठलो. काय असेल याचं काम? कधी असा येत नाही तो. काहीतरी गंभीर झालं असावं का? पण मग चेयरमनची नाहीतर सेक्रेटरीची बेल वाजवावी ना...मलाच कशाला ताप?
दार उघडलं. दुर्गंधीचा एक अस्पष्ट भपकारा आला. बाहेरचा दिवा पेटवला. धक्काच बसला. समोर वाचमन नव्हता. एक ओंगळ धोतर, का काय असेल ते, वस्त्र कमरेला गुंडाळलेला दाढी वाढलेला तरुण उभा होता...
आणि त्याच्या कपाळाभोवती एक रक्ताळलेले जीर्ण वस्त्र होते.
आणि त्याचा चेहरा वेदनांनी पिळवटलेला होता.
आणि त्याच्या नाकावरून रक्त ओघळत होते.
कोण आहे हा?
कोणी मारलय का त्याला?
आणि येथे कसा आला हा?
हा तर तसा शहराबाहेरचा भाग.
रात्री कुत्रंही फिरकत नाही इकडे.
चोर वगैरे सोडून.
माझा घसा कोरडा पडला.
बरे तोही माझ्याकडॆ वेदनांनी ओथंबलेल्या डोळ्यांनी अपलक पहात होता. काही बोलत नव्हता. काही सांगत नव्हता कि मागत नव्हता. मी दार बंद करुन वाचमनला बोलावून या अभद्र माणसाला हाकलून द्यायचा निर्णय घेतला व दार लावू लागलो.
"मला आत येवू द्यात. मला काही नको. फक्त जरा तेल हवे आहे...माझ्या जखमेवर लावायला. बोलायला मिळाले तर बोलायलाही मला हवेच आहे." त्याच्या स्वरात आर्जवही नव्हते कि धमकीही नव्हती. एक सपाट पण शुद्ध आवाज. रात्रीच्या निरवतेच्या स्तब्ध तारेवर उमटलेले झंकार जसे.
"तुला वेड लागलंय. परक्या लोकांना एवढ्या रात्री कोण घरात घेइल? आणि मला काम आहे...जा तू..."
"मला तेल हवेय माझ्या जखमेवर लावायला. किती काळ गेला...कोणी देत नाही. गांवात नाही कि वस्तीवर नाही. शहरांत तर नाहीच नाही. मला फक्त तेल द्या...एखादे स्चचःअ फडके असेल तर तेही द्या. मला तुम्ही निराश करू नका...शेवटी तुम्ही माझ्यावर कादंबरी लिहिलिय..."
"तू...तू....तुम्ही " मी जवळपास ओरडलोच...
"होय. मी अश्वत्थामा!"
मी आनंदातिरेकाने बेशुद्धच पडलो असतो.
मला काय प्रतिक्रिया द्यावी हेही सुचत नव्हतं.
भानावर आलो. त्याचा हात हाती घेतला. विनम्रातिविनम्र स्वरात म्हणालो...."या आत या. मला क्षमा करा...मी ओळखलं नाही तुम्हाला. पण खरं म्हणजे तुम्ही आजही आहात यावर काडीएवढाही विश्वास नव्हता मला."
"पण असलो पाहिजे ही आशाही होती. नाही?"
"हो." मी शरमत म्हणालो. त्याला आत आनले. हालमधील दिवा लावला आणि त्याला सोफ्यावर बसवले. "आशाच काय तेवढी अजरामर आणि आपण मर्त्य. आज जीवंत वाटणारी सृष्टी उद्या आपल्या सभोवती नसणार...आपण कोठे असणार...प्रश्नच प्रश्न. थांबा हं एक मिनिट...आधी तेल आणतो. कि असं करु...माझ्याकडे जुन्या चिघळल्या जखमांवर लावायचे एक मलमही आहे. ते लावू कां? लवकर बरी होईल ती जखम..."
त्याने त्याच सनातन खंबीर खिन्नतेने मान हलवली.
"नको. माझी जखम बरी होणारी नव्हे हे तुला माहितच आहे. बरे तेल लावल्यानेही वेदना कमी होतात असे आता काही राहिलेले नाही. वेदनांनी माझी साथ युगानुयुगांसाठी पकडली आहे. सवयच झाली आहे मला वेदनांची...इतकी कि जर यदाकदाचित त्या बंद झाल्या तर वेडा होईल मी! पण जखमेवर तेल लावत राहण्याची भ्रामक सवयही युगांची आहे. ती जात नाही. कपाळावरच्या जखमेवर स्वच्छ पट्टी नसली कि अस्वस्थ व्हायला होतं. तेलच आण. आणि स्वच्छ कापड. बघतोहेस ना किती जीर्ण झालंय ते? किती भटकलो. कोणी तेलही दिलं नाही कि कापडाची साधी पट्टीही. आता ही पट्टी जीर्ण चिंधी झालीय केंव्हाही अशीच गळून पडेल अशी."
मी पटकन किचनमद्धे गेलो. लाईट लावली. तेलाची किटली शोधायला जरा वेळ लागला. घरधनीन घरात नसेल तर अशा वेळी काय होतं याची चरफड झाली. मी बाहेर किटली घेऊनच आलो. आता स्वच्छ कापड. पण ब्यंडेजच लावले तर? फर्स्ट एड किट हालमधेच होतं. मी ते कपाटातून काढलं.
"ते नको." अश्वत्थामा म्हणाला.
"का? हे अत्यंत स्वच्छ असतं...हायजिनिक...माफ करा...निर्जंतूक...हेच बरे राहील तुमच्या जखमेवर..."
"असेल. पण मला कापडच हवं"
"बरं" मी म्हणालो. पण असं कापड घरात कोठलं? मी बेडरुममद्ध्ये आलो. माझा एक शुब्र शर्ट होता...इस्त्री घालून ठेवलेला. मी तो बाहेर काढला. परत हालमद्ध्ये आलो. फर्स्ट एड किटमधील बारकी कात्री काढली आणि शर्टाचा पाठचा भाग कापून काढत त्याची अशा रितीने घडी केली कि अनेक काळ टिकेल.
"आपण जरा तुमची जुनी पट्टी काढू. जखम स्वच्छ करू. मग ही पट्टी मी बांधून देतो."
पण माझे बोलणे पुरे व्हायच्या आधीच त्याने आधीची जीर्ण पट्टी अक्षरशा उपसून काढली. आभाळावर रक्त ओकणारा सुर्य असावा तशी त्याची भळभळती जखम उघडी झाली. मी शहारून गेलो. हादरुन गेलो. येथेच याचा तेजस्वी मणी होता. तेज लोपले होते. नव्हे कृष्णाने ते उपसून, हिरावून घेतले होते. तेथे होती आता एक चिरवेदना देणारी जखम. मी शर्टाच्या उरलेल्या अवशेशांनी त्याचे चेह-यावरचे रक्त पुसू लागलो. मग जखमेपर्यंत गेलो...पण स्पर्ष करायची हिंम्मत होईना. वेदना होतील. मी थबकलेलो पाहून त्यानेच माझ्या हातातील कापड ओढून घेतले आणि स्वतंच्याच हातांनी खसखसून जखमही पुसली. असे करतांना त्याचा चेहरा वेदनांनी पिळवटत होता...पण कोणताही आर्त उद्गार त्याच्या ओठांतून बाहेर आला नाही.
माझा चेहरा पिळवटला जात होता...जणू ती जखम माझ्याच शरीरावरची होती.
त्याने आपली जखमही पुसली. रक्ताचे नवे थेंब आपोआप सनातन शापासारखे पुन्हा जखमेवर उगवले. ते असेच अनंत काळ उगवत राहणार होते. त्याने हलक्या हातांनी ते टिपले.
"पाण्याने चेहरी धुऊन घेऊयात...मी पाणी आणतो...कि चलता बाथरुममद्ध्ये?"
तो जरा रेलला होता. डोळे मिटून आपल्या वेदनांना गिळू पाहत होता. त्याच्या उघड्या छातीवरही साकळलेल्या-ताज्या रक्ताचे ओघळ होते. मी पटकन उठलो. बाथरुममधुन पाण्याची बादलीच आणली. दुसरा शर्ट काढला. तोही आणला. पाण्यात बुडवून त्याचे छाती, चेहरा स्वच्छ करू लागलो. एवढे सोपे नव्हते ते. कित्तेक वर्षांचे साकळले रक्त ते! याला अंघोळ घालायला हवी. मी त्याच्याकडे पाहिले. माझ्या डोळ्यांतील भावना जणू त्याने वाचल्या होत्या.
"स्नान नको. मी नेहमी स्वच्छ जलाशयांत स्नान करतो. पण आजकाल ते शोधायला फार पायपीट करावी लागते. असो. मी शोधेन एखादा तसा पाणवठा. तू खूप केलेस माझ्यासाठी. आता जरा तेल लाव जखमेवर आता. मग मी माझी पट्टी बांधतो." तो म्हणाला.
मी किटलीतून चमच्याने त्याच्या जखमेवर तेल ओतले. ओघळ वाहिले...पण त्याच्या चेह-यावरची वेदना विश्रांत होतांनाही दिसत होती.
"आता बास...." तो म्हणाला. मी घडी केलेले शर्टाचे कापड उचलले आणि माझी मदत नाकारत जखम झाकत मस्तकाभोवती गुंडाळली आणि हलकेच गाठ मारली.
"आता जरा बरे वाटतेय. हा मला विसावा नाही. माझ्या वेदनांना विसावा आहे. त्यांनी तरी किती काळ आकांतत रहायचे? त्यांना विसावा हवा. मलाही हवा. वेदनांच्या निगूढ सावलीतील विसावा जरा बरा असतो. त्यांनाही कंटाळा आलेला असतो ना माझ्या सोबत रहायचा? त्या बिचा-या काय करणार शेवटी? हे माझे विधीलिखित कि वेदनांचे हे समजले नाही मला कधी."
माझ्या मनात अनंत प्रश्न उमदळत होते.
मला सर्वांचे उत्तरे पाहिजे होती.
पण याला भुकही लागली असेल याची जाणीव झाली आणि मी भौतिक प्रश्न विचारला...
"तुम्हाला भूक लागली असेल. घरात आहे, वाढू का?"
त्याने माझ्याकडे पाहिले. वेदनामय हास्य केले. म्हणाला-
"मला भूक लागत नाही. पोटातील आतड्यांनी कधीच अन्न मागणे सोडून दिलेय. मागणी असते फक्त वेदनांची...तेल तेल आणि तेल...कोणत्या युगात आजही जगतात या वेदना कोणास ठाऊक!"
मी काही बोललो नाही. प्रश्नांचीही एक वेळ असते. आश्चर्याची भावना ओसरायचीही एक वेळ असते. समोर माझ्या चक्क अश्वत्थामा होता. मी त्याच्यावर वीस-बावीस वर्षांपुर्वी कादंबरीही लिहिली होती. प्रचंड गाजलेली. कादंबरी लिहितांना अश्वत्थाम्याची भळभळती जखम हे मी एक प्रतीक म्हणून घेतले होते. तेंव्हा मी एक जवान, अतिउत्साही आणि सर्वांनाच आव्हाने देत सुटलेला वेडा पीर होतो. आज पुलाखालून खूप पाणी गेले आहे. म्रूत्युबद्दल मी जोही काही विचार करतो ते मरण हे एक वास्तव आहे हे मान्य करुनच. त्यात भाकड पुराणकथांतील अश्वत्थाम्याच्या चिरंजीवित्वाला स्थान नाही. मी बुद्धीवादी झालोय. चिरंजिवित्व हे थोतांड आहे आणि मृत्यू हे वास्तव आहे हे मी मानय केलेच आहे...जरी माझी पात्रे ते मान्य करत नाहीत.
कारण हे वास्तव आणि इच्छाजगातील द्वंद्व आहे. भावनिकता माझी इश्वर मान्य करते आणि माझा बुद्धीवाद तो मान्य करुच शकत नाही.
पण समोर अश्वत्थामा आहे.
म्हणजे त्याचे वेदनामयी चिरंजिवित्व हे वास्तव आहे.
वास्तव काय आहे?
भ्रम काय आहे?
वास्तव हे सत्यच असते काय?
भ्रम हेच सत्य असले तर?
काहीच सत्य नसेल तर?
मला माहित नाही. मी माझ्या विचारांच्या धुक्यातून शांत बसलेल्या अश्वत्थाम्याकडे पाहतो. मी स्वप्नात नाही हे मला चांगलेच माहित आहे कारण मी स्वप्नांवरच कथा लिहित होतो याची आठवण मला टक्क आहे आणि मी माझ्या कथेचा उत्कर्षबिंदू अजून उंचीला जावा यासाठी काय नवी कल्पना लढवली याची आठवणही ताजी आहे.
तेंव्हा ना मी स्वप्नात आहे ना मी भ्रमात आहे.
माझ्या समोर अश्वत्थामा आहे...
पुरातन काळातून आलेला.
हे वास्तव आहे.
हा भ्रम आहे.
ही कल्पना आहे.
आणि तरीही अश्वत्थामा माझ्यासमोर आहे हे सत्य आहे.
पण ते जग कदापि मान्य करणार नाही.
याच्या सोबत सेल्फी घेऊयात का काही?
अवघे विश्व चकीत होईल.
खरेच?
लोक त्या फोटोला ’धुर्तपणे केलेली फालतू आणि खोटारडी प्रसिद्धी’ म्हणतील.
नकोच ते.
जे माझ्यापुरते आणि माझ्यासाठी आहे तेच सत्य. बाकीच्यांना ओरडून सांगण्यात काय अर्थ?
मी पुन्हा अश्वत्थाम्याकडे पाहिले. त्याच्या कपाळावर आताच बांधलेली पट्टी, जखम ज्या जागी होती, तिथे लालसर झालीय. त्याचा अनंत काळचा भुतकाळ याक्षणी माझे वर्तमान आहे आणि त्याची पुरातन वेदना आता मी भोगतो आहे.
"तुम्हाला माझ्याशी काहीतरी बोलायचेही होते..."
मी कसाबसा आठवून म्हणतो.
"हं...खूप काळ झाला मी कोणाशीच बोललेलो नाहीय....माई तेल द्या तेल...एवढे सोडून...आणि त्यालाही आता काळ उलटला. कोणी तेल दिले नाही कि जखमेवर बांधायला कपड्याचा नवा तुकडा...कोणी माझ्यासाठी दारही उघडले नाही. भूत-पिशाच्च समजत...."
आणि त्याने वेदनांनी ओथंबलेला चेहरा जरा खाली झुकवला.
मी आकांतमय झालो.
काय विचारावे त्याला? मनात प्रश्न उमदळताहेत आणि तरीही विचारावे वाटत नाही. सारे कुतुहलच जणू मरून गेलेय. अश्वत्थामा आहे. ती कल्पना नाही. महाभारत खरेच घडलेय. या माणसाने निद्रिस्त वीर खरेच मारलेत. पण किती काळ झाला त्याला? कल्पनाच वाटावी अशीच ती घटना. कादंबरीत मी ती अगदी जीव तोदून रंगवली होती. दुष्ट पांडव आणि सृष्ट कौरव आणि कर्णाप्रमाणेच दुर्योधनासाठी अखेरपर्यंत जीवापाड संघर्ष करणारा अश्वत्थामा.
तो माझ्याकडे टक लावून पाहत होता. त्याच्या वेदनाळलेल्या चेह-यावर मंद स्मिताचा गुलाबही उलल्यासारखे मला वाटले. कि भास होता तो?
"हे बघ...सारं घडलं आहे ते जसं लिहिलं गेलं तसच घडलं असं नाही. जे लिहिलं गेलं ते लिहिणा-याचं मत होतं...त्याला समजलेल्या घटनांचं आकलन होतं आणि काव्यात लिहितांना त्यानं आपल्या प्रतिभेनं त्या घटनांना अजून वेगळंच रूप दिलं. ज्या घटनांत मी स्वत: सामील होतो, मी स्वत: निर्णय घेतले आणि वागलो त्या घटनाही मला त्या वेळेस समजल्या होत्या तशाच होत्या असेही नाही. तसेच ज्याही कृत्या मी केल्या असे मला वाटते त्या कृत्याही जशा घडल्या असे मला वाटले तशाच घडल्या असेही नाही."
मी गोंधळलो.
"म्हणजे, व्यासांनी लिहिले ते खरे नाही? ते त्रिकालज्ञानी होते ना? ते खोटे कशाला लिहितील?"
"त्यांनी खोटे लिहिले असे मी कधी म्हणालो? त्यांना जे कळलं, त्यांनी त्याचं जसं आकलन केलं आणि काव्यमय शब्दांत प्रतिभेचे फुलोरे जोडत लिहिलं. त्यांच्या दृश्टीने त्यांनी जे आकलन केले व लिहिले ते खरेच आहे. त्यांनी लिहिलं. ते वाचून तुही तुज्या कल्पनाशक्तीचा वापर करत महाभारत उलटे पालटे करुन टाकलेच कि! दुर्योधनाला...कौरवांना सारे जग वाइट म्हणत असतांना तो वाईट कसा नव्हता हे महाभारतातील घटनांतुनच दाखवून दिलेसच कि! आता व्यास खरे कि तू खरा?"
"पण...पण कौरवांवर महाभारताने अन्याय केला. दुरोधनाने प्रजेशी कधी वाइट वर्तन केलं नाही. तो जुगारी नव्हता. कौरवांनी मिळून एकाच स्त्रीला फशी पाडून ल्तिच्याशी ग्न नाही केलं. त्याने कोणालाही कपटाने नाही मारलं. ते जाऊदे, गुरु व पितामहांना मारणारे खरे अपराधी कि ज्यांनी धर्मानेच वागायचे ठरवत मरण पत्करले ते पापी? व्यासांना कसला धर्म अभिप्रेत होता? अधर्मच कि!"
तो जरा रेलून बसला. वेदनांची लाट थोपवण्यासाठी क्षणभर डोळे मिटले.
"हे तुझे आकलन. ते त्यांचे आकलन. त्यात मी माझ्या आकलनाची भर कशाला घालू? आणि धर्म म्हणजे तरी काय रे? माणसागणिक धर्माच्या व्याख्या बदलत जातात. रोजच...क्षणोक्षणी बदलत जातात. मग धर्म म्हणजे काय? कोणाचा धर्म आणि कोणत्या वेळचा त्याचा धर्म? असे काही नसते. म्हणजे धर्मच नसतो. पण तो असल्याचा...आणि आपल्याच बाजुचा असल्याचा भ्रम मात्र नक्कीच असतो."
"तुम्ही अजब बोलत आहात...पण तुम्ही हजारो वर्ष भटकताय भालावर वागवत नियतीचा निघृण शाप! तुम्हाला जास्त माहित. बोला तुम्ही...ऐकतो मी."
"हं...खूप काळ बोलावसं कोणाशीतरी असं वाटत होतं खरं. पण आता ती इच्छा अचानक मेलीय. काय बोलायचे? कशासाठी? स्वत:शीच बोलत आलोय अनंत काळ...एवढं कि बोलणंही असंबब्ध होऊन जावं. निरर्थक. काळाच्या पडद्यावर कसलाही ठसा न उमटवता विरून जातं. बोलणं. जे विरून जातं ते खरे कसे असेल? ज्या घटनाही विरुन जातात त्या तरी ख-या कशा? तर तू महाभारत उलटे-पालटे करून टकले. मला न्याय देण्याचा प्रयत्न केलास. घटना त्याच होत्या...पण तू त्याला तत्वज्ञानाची डूब देत सत्य-असत्याबाबत नवे प्रश्न निर्माण केले. महाभारत द्रौपदीसाठी नाही कि कौरवांच्या दुष्टपणामुळे नाही, द्रोणचार्यांंना दृपदाने जेथे अवमानित केले तेथेच पुढचे महाभारत घडणार हे अटळ झाले असेही तू लिहिलेस. असेलही तसे. नाहीतर दृपदाने द्रौपदी आणि धृष्टद्युम्नाला कशाला जन्म दिला असता? द्रौपदीला पाच भावांशी कसे लग्न करू दिले असते? तर्क तसा बरोबर आहे. काव्य लिहितंनाहे व्यासांनाही पाच भावांशी एका स्त्रीचा विवाह खटकत होताच. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पाच कथा बनवल्या...स्पष्टिकरण करण्यासाठी. हे ठीक आहे. पण खरेच तसे होते का? म्हणजे खरे मला माहित आहे असे नाही. खरेच पाच जणांशी द्रौपदीने विवाह केला काय, हेही मला निश्चयाने सांगता येणार नाही. पण त्यांनी केला असे त्यावेळेस बाह्यात्कारी दिसत तरी होते तसे. पण दहा जणंशी जरी समज विवाह केला तरी ती दहा जणांची खरेच पत्नी झाली असे असते काय? म्हणजे प्रप्त कायदे व धर्मनियमांनी असूही शकेल. पंण माणसाचे मन या नियमांनीच बद्ध असते काय? द्रौपदीही तशीच बद्ध कशी असू शकेल? दिसणारी घटना, मनात चालणारी घटना आणि बाह्य व आंतरिक घटनांतील विभेद घटनेला नेमके काय स्वरुप देतील हे समजणे व त्याचे विश्लेशन करणे हा मानवी बुद्धीचा अपव्यय नाहे का? म्हणजे नेमके खरे काय हे केव:ळ बाह्य घटना ठरवणार काय?"
मी समजावून घेण्याचा प्रयत्न करत होतो, पण समजत नव्हते हेही खरे आहे. असे असले तरी जे समजले होते तसेच त्याला म्हणायचे असेलच असेही नाही कारण शब्द सारेच म्हणने वाहून नेतात असेही नाही. भाषेची ती मर्यादा नाही काय?
मी मौन राहिलो.
मला ऐकायचे होते....हजारो वर्षांत अब्ज-खर्बावधी माणसे होऊन गेली, पण त्यांना लाभले नव्हते ते भाग्य मला मिळाले नव्हते काय?
"हे तुझे भाग्य नाही. मुळात ते नसतेच. अचानक एखादी अनपेक्षित व मनासारखी घटना घडली तर ती भाग्य वाटते एवढेच. बघ ना, मी इतकी वर्ष, कि शतके?, गेली, इतक्या दारे ठोठावली...नाही उघडले त्यांनी दार. तुही नसतेस उघडले तर मला वाईट वाटले नसते. पण ते दुर्दैवी नव्हते तसा तुही सुदैवी नाहीस. हे बघ तुला माझ्या जखमेकडे पाहून वाटतेय कि मी दुर्दैवी आहे. शापित आहे. तसे काही नाही. ज्यांना मृत्यू आहे तेही मग तसे दुर्दैवीच कि! समजा मी अजरामर असतो आणि ही जखम नसती तर मला तू दुर्दैवी म्हणाला नसतास. पण जखम नसली तरी जखम असतेच. अजरामराच्या किंवा मर्त्यांच्या काळजात, मस्तकात एक तरी भळभळती जखम असतेच! माझी जखम तर बहेरची आहे...कपाळावरची आहे. मी सुदैवी नाही का मग?" तो कसनुसा हसला. परत उसासा सोडत म्हणाला-
"मग व्यासही अमर आहेत असे म्हणतातच कि! अगदी माझे मातूल कृपही अमर आहेत असे म्हणतात. मला नाही मात्र ते कधीच दिसले. कोणालाच नाही दिसले. त्यांच्या आतल्या भळाळत्या जखमेवर तेल कसे लावणार, माझ्या लावले तसे? ते जावू दे. त्यांना जखम, बाहेर असो कि आत, आहे कि नाही हे कोठे मला ठामपने माहित आहे? उगाचचची कल्पना ही कि आपल्याला असेल तसे तेथेही का नाही...माणुस विचित्र आहे खरा. देव-देवता तो मानसासारख्याच दिसत असतील, त्यांनाही पोरे-बाळे होत असतील...अशाच कल्पना करतो ना? आपल्याला पोरे होतात तशीच कोणा आदि-पित्यामुळे आदिमातेला गर्भ राहिला आणि ती सृष्टी प्रसवली अशी कल्पना नाही करत माणूस? माणसाच जग, त्याचे देव, त्याच्या सर्व झेपा त्याचा माणुसपणच्या मर्यादेतच असतात. त्याबाहेर नाही जावू शकत तो. आता हा मानवाला मिळलेला अटळ शाप आहे असे म्हणायचे काय?"
तो माझ्याकडे पाहतच बोलत होता. मंत्रमुग्ध झाल्याप्रमाणे मी ऐकत होतो. त्याच्या चेह-यावर आता वेदनाच्या कळवळाटाच्या आडून कसलेसे तेज झळकत होते. त्याची जखम रक्ताळली होती, जखमेवरचे कापड आता लालबुंद दिसत होते.
"मला नेमके काय घडले हे जाणायचेय. प्लीज. कसेही असो...भले ते तुमचे दृष्टीकोन असतील...चालेल. शंभर टक्के सत्य समजू शकत नाही हे मान्य...पण नेमके काय झाले? म्हणजे ते युद्ध...भगवान कृष्ण...दुरोधनाचा मृत्यू....उत्तरेचा गर्भ...ही जखम..."
तो बरेच क्षण माझ्याकडे टक लावून पाहत राहिला. आता त्याचा चेहरा गंभीर होता. स्वत:च्या वेदनेची जाण जणू उरली नव्हती त्याला.
"मला फक्त माझे वेदना आठवते आणि ही वेदना अशी कि वेदनेला मुळीच विसरू देत नाही. मी काय घडले हे कशात हरवले हे माहित आहे?"
मी निराशेने नकारार्थी मान हलवली.
"माझ्याशी घडलेल्या घटना, माझ्यापासून दुरस्थ घडलेल्या घटना, त्या घटनांनी कसे घडायला हवे होते त्या माझ्या वाटण्यातील घटना आणि ज्या घटना खरेच घडल्या कि नाहीत हे न समजता त्या जशा घडल्या असाव्यात असे जे मला वाटले त्या माझ्या अर्धकल्पित घटना...या सा-या जंजाळात ख-या घटनाच हरवून गेल्यात....त्यात या सतत अंतरीचा तळ ढवळून काढणा-या वेदना. असं समज तू लिहिलंस ना कादंबरीत ते जवळपास तसंच घडलं. त्यामागील प्रत्येकाचे खरे विचार भावना वेगळ्या असतील, सर्वच घटना व्यासांनीही लिहिल्या नसल्याने तुलाही माहित असण्याचे कारण नाही. तू त्या टाळल्यास किंवा रिकाम्या जागा भरायला तुझी कल्पना वापरलीस. आता या काळातील कल्पना त्या काळात कशा लागू होतील? तुला हस्तिनापुर काव्यात कसे आहे आणि प्रत्यक्षात कसे हे थोडेच माहित? बरे, कौरव शंभर नव्हते हे तू समजलास ते बरोबरच आहे. पण दुष्टांची संख्या जास्त दाखवल्याखेरीज नायकाचे महत्व ते काय राहणार? बरे, मी दुर्योधनाचा मित्र....मला नायक तो वाटला तरी तोही नायक नव्हताच! खरे तर कोणीच नायक नव्हता."
"कृष्णही नाही?"
तो हसला.
"ते जाऊदे. नायक अशी बाब मुळात अस्तित्वात असते काय? खलनायकाचेही तसेच! तोही कोठे अस्तित्वात असतो? कोणाला नायक ठरवायचे नि कोणाला खलनायक हे आधे कवि ठरवतात आणि मग त्यांना अनुसरणारे मुढ लोक. हा झगडा आहे. खरे तर आपल्या अंतरातला. तो बाहेरही होतो. स्वत:शी आणि इतरांशी...सतत लढत राहतो. प्रेमही या लढ्याचाच एक भाग नाही का?"
मला धक्का बसला होता, पण मी आतुरतेने त्याच्या बोलण्याची वाट पाहत राहिलो.
"हे बघ, वेदना झंझावातासारख्या उफाळताहेत....मला असह्य होते कधी कधी हे जगणे. असे वाटते कडेलोट करून घ्यावा. म्हणजे तसा प्रयत्न मी केला नाही असे नाहे. केला. पण वेदनेला मृत्यू असतो का कधी? ती अजरामरच असते. मी अमर नाही. अमर आहे माझी वेदना. ती आहे तोवर वेदनेसोबत फरफटत जाणे हीच आहे माझी नियती. हे बघ हे पहाड, हे घोंगावते वारे...हे मध्यम चंद्रप्रकाशात गुरफटून झोपलेले अरण्य....वेदनाच जणू थकून पहुडल्यात....हे विश्वच चिरवेदना आहे. वेदनेतुनच विश्वाचा जन्म झाला...माणसाचाही. मी अश्वत्थामा या सर्व वेदनांचे मुर्तिमंत रुपच नव्हे काय? मग मला कसा असेल मृत्यू?"
त्याचा चेहरा एकाएकी धुकट झाला होता. गार वा-याच्या झोताने माझ्या अंगावर शहारा आला. मी चमकून त्याच्या चेह-यावर खिळवलेली नजर वळवली. कोणता पहाड होता हा? हे अरण्य कसले होते? या आकाशात हा कसला चंद्र उगवला होता? काळ्या-निळ्या आभाळात हे कसले रंगित ठिपके विखुरले होते? माझा फ्ल्यट कोठे होता? मी कोठे होतो? हे काय होत होते?
मी पुन्हा पाहिले. अश्वत्थाम्याची धुसर आकृती त्या आभाळालाही जणू आव्हान देत उभी होती.
"होय. मी वेदना आहे आणि म्हणूनच अजरामर आहे. ते माझ्या मस्तकावरील मणी, उत्तरेच्या गर्भावर मी चालवलेले ब्रह्मास्त्र वगैरे सा-या कविच्या थापा."
"मग...मग ही जखम...?" मी त्या घोंगावणा-या वा-याला भेदून जाईल अशा आवाजात विचारलं.
"जखम?...हो आहे खरी. तेल मागणारी जखम. खरे तर सर्वच लोकांच्या आतल्या...बाहेरच्या वेदना आकांतत तेल मागत असतात. विसावा शोधत असतात. त्यांना एक प्रतीक हवे असते. त्यांनी ते माझ्यात पाहिले. आपल्या स्वत:च्या चिरवेदनेला एक समाधान शोधले. सर्वांची जखम मी माझ्या भाळा घेतली. रानोमाळी सैरावैरा फिरत दारोदारी तेल मागत राहिलो."
तो मौन झाला.
मी आसमंतावर नजर फिरवली. खरेच सृष्टी चिरंतन वेदनांच्या निगूढ छायेत पहुडली होती...तरे तिचे आर्त उद्गार पाना-फांद्यांतून उसळत होते. मी तरी मृत्यूवर एवढे चिंतन का करतो? हृदयाच्या तळघरात मीही माझ्या वेदना गाडून ठेवल्यात नि त्या अधनं मधनं कासाविस करत आव्हान देत असतात म्हणून. मरणावर उत्तर शोधावे वाटते कि वेदनांवर उत्तर शोधावे वाटते? मृत्यू वेदना नाही...आनंद आहे...पण आनंद कोठे आहे? कि सर्वच फक्त वेदना?
शोध वेदनेचा घ्यायचा कि मृत्युचा?
कि सारं खोटं?
मी आसमंतावर पुन्हा नजर फिरवली.
अश्वत्थाम्याकडे पाहिले.
ट्युबच्या प्रकाशात त्याच्या चेह-यावरील वेदना अधिकच गहि-या झालेल्या दिसल्या.
तो उठला.
"उशीर झाला आहे. मला आता जायला हवं."
"नको अश्वत्थाम्या..."
"मी तुझ्याजवळ आहेच कि...तुझ्या वेदनांच्या रुपात. जाता जाता एक सांगतो."
मी कुतुहलाने त्याच्याकडे पाहिले.
"तू एक प्रश्न उपस्थित करत अनुत्तरीत सोडून दिलास तुझ्या कादंबरीत..." तो दाराकडे चालता चालता म्हणाला.
"कोणता?"
त्याने दार उघडलं. बाहेर पाऊल ठेवत वळाला. म्हणाला,
"हेच... माझ्या आयुष्यात प्रेम करावं अशी स्त्री का आली नाही...म्हणजे तू संभावना दर्शवल्यास पण तुझा नायक मी...कदाचित मला जगावेगळा दाखवण्यासाठी तू तो अनुत्तरीतच सोडून दिलास."
"हो...नाही म्हणजे..."
"हे बघ मला आठवतं ते एकच सत्य...मी प्रेम केलं. आजही करतो."
मी अपार उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत राहिलो.
"कोण होती ती?"
त्याने मस्तकावरील पट्टी ठाकठीक केली. माझ्याकडे पाहिले. अस्फूट स्वरात म्हणाला...
"तीच कृष्णा...द्रौपदी..."
तो वळाला आणि पाहता पाहता निघुनही गेला. मी धावलो त्याच्यामागे.
पण तो नव्हता.
मागे उरली होती एक कधीच न शमणारी वेदना.
* * *