Saturday, August 29, 2015

कोणती शहरे "स्मार्ट" करत आहात?



"स्मार्ट सिटी" म्हणजे आधीच गजबजलेल्या, नागरी सुविधांवर ताण आलेल्या, सामाजिक प्रश्नांनी थैमान घातलेल्या, जवळपास चाळीस टक्के नागरिक झोपडपट्ट्यांतच राहणा-या शहरांना अजून अधिक बजबजपुरेत ढकलणे नव्हे. केंद्र सरकारने देशभरातील ज्या प्रस्तावित ९८ शहरांची घोषणा केली आहे हे पाहता या शहरांना "स्मार्ट" करण्यास काय वाव आहे हा प्रश्न पडेल. महाराष्ट्रातील या प्रस्तावित शहरांओऐकी काही शहरांत पाणीपुरवठ्यापासुनचा ताण आताच वाढला अहे. पुणे-मुंबई ठाणे सारख्या शहरांसाठी पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन धरणे बांधायला जागाच उपलब्ध नाही. शेतीसाठी पाणी कि शहरांतील नागरिक-उद्योगव्यवसायांसाठी पाणी हा पेच आजच खडा आहे. पुण्यासारख्या शहरात रस्ता-रुंदीकरणासाठीच स्पेस उपलब्ध नाही तर खेळाची मैदाने-बागा व सांस्कृतिक-समाजकेंद्रांसाठी कोठून असणार? 

दुसरीकडे खानदेश, मराठवाडा, कोकण व विदर्भ य भागातील लोक उपजिविकेसाठी याच शहरांकडे धावत आहेत. नको ती शहरे स्मार्ट करण्याचा डाव घतला तर हा विस्थापनाचा वेग अजून वाढेल. घरांच्या किंमती आताच सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. ती न परवडल्याने झोपडपट्ट्यांत जी वाढ होईल त्याचा विचर केलेला दिसत नाहे. म्हणजे एकीकडे विस्थापनामुळे प्रदेश बकाल होताहेत तर दुसरेकडे अतिरिक्त लोकसंख्येचा ताण वाढत असल्याने विद्रूप बकालपणा वाढत आहे. गरज असो अथवा नसो, धनाढ्य माणूस कोणत्याही भागातील असो, येथे एक तरी सदनिका घेऊन ठेवण्याच्या नादात आहे. कारण त्यांच्या भागांत विकासच नसल्याने त्यांना स्वाभाविकपणे पुण्या-मुंबईचे आकर्षन आहे.  हे आकर्षन आम्ही विकेंद्रित करण्यासाठी काय करत आहोत? 

भारताने विकेंद्रित विकासाची संकल्पना कधी राबवली नाही. मराठवाडा-विदर्भात रस्ते-रेल्वेचे जाळे उभारत त्या भागांत उद्योगधंदे कसे वाढतील यावर भर दिला नाही. त्यामुळे ना स्थानिक रोजगार आहे ना उद्योजकतेच्या संध्या. त्यामुळे हे भाग बकाल पडत चालले आहेत. 

खरी गरज आहे ती या अविकसित भागांतेल शहरे स्मार्ट करण्याची. स्मार्ट म्हणजे फक्त दिसायला देखणी शहरे नव्हेत तर त्यांच्या आसपासच उद्योग-व्यवसाय आणि रोजगाराच्या संध्या देणारी नवी शहरे. त्यासाठी आवश्यकता आहे ती या शहरांना वेगवान वाहतुकीने जोडण्याची. २४ तास वीजेची हमी देण्याची. तरच मोठे उद्योग इकडे येतील हे उघड आहे. लोकांना स्थानिक रोजगार मिळाला तर विस्थापनाचा दर कमी होईल. संतूलित विकास झाल्याने आताच डोईजड झालेल्या पुण्या-मुंबईसारख्या सहरांवर रोज वाढणारा ताण कमी होईल. अविकसित शहरांना विकसीत "स्मार्ट" करण्यासाठी येणारा खर्च पुणे-मुंबईला स्मार्ट करण्याचा आणि ते प्रयत्न अयशस्वी होण्यच्याच शक्यतांपेक्षा अंबेजोगाई, सिल्लोड, धुळे, परभणी, कोकणातील समुद्रालगतची निवडक शहरे अशा अविकसित भागांतील शहरांना स्मार्ट करण्यासाठी भांडवली खर्चही कमी होईल. जोडणारे रस्ते बीओटी तत्वावर बांधुण घेता येतील.

यामुळे या नव्या विकसित नगरांभोवतीच्या खेड्यांनाही स्मार्ट बनवण्याच्या संध्या उपलब्ध होतील. घरे पुण्या-मुंबईच्या तुलनेने स्वस्त मिळतील तर उद्योगधंद्यांचीही (जमीनीचे भाव कमी असल्याने) भांडवली गुंतवणूक कमे असेल. पण त्यासाठी मुळात चांगल्या वाहतुक व्यवस्थेची गरज आहे. हे नेटवर्क प्रस्थापित करणे अशक्य नाही. खरे तर हे पुर्वीच व्हायला हवे होते. राजकीय नेत्यांचे इच्छाशक्ती व दूरदृष्टी कमी पडली हेच काय ते खरे. आता आधीच कोलमडायला लागलेल्या शहरांना स्मार्ट करण्याच्या उद्योगालाही अदूरदृष्टीचेच म्हणावे लागेल. 

भारताला विकेंद्रित विकासाची गरज आहे. त्यासाठी अविकसित भागांतील शहरे विकसित करण्याची गरज आहे. तरच उद्योगधंदेही तेथे येतील हे वास्तव आहे. अन्यथा हा असंतुलित, केंद्रीभुत विकास भविष्यात अनेक सामाजिक संकटांना निमंत्रण देईल. अविकसित भागांत आजही मोठ्य प्रमाणावर असंतोष आहे. त्याचा भविष्यात उद्रेक करत सामाजिक संतुलन बिघडण्याच्या शक्यता अधिक आहेत. 

स्मार्ट शहर म्हणजे नेमके काय हे सरकारी धोरणात स्पष्ट नाही. स्मार्ट शहर म्हणजे सामान्यांनाही परवडन्याजोगे निवारे, उपजिविकेची मुबलक साधने आपल्याच परिसरात उपलब्ध करून देत नागरी सुविधांची रेलचेल असेल अशी शहरे ही माझी व्याख्या आहे. आज शासनाने जी महाराष्ट्रातील प्रस्तावित स्मार्ट शहरांची यादी प्रसिद्ध केली आहे त्यात या बाबींना वाव नाही हे उघड आहे. लोकसंख्येचा या शहरांत आधीच एवढा विस्फोट झाला आहे कि नवा आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यासाठी पुण्याच्या साठ किलोमीटर परिसरातही जागा उपलब्ध होत नाही हे कटू वास्तव लक्षात घेतले तर तुम्हे पुणे-मुंबईला काय आणि कसे स्मार्ट कराल हा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. या शहरांसाठी नागरी सुविधांचे काही प्रकल्प केवळ जागांअभावी बसकन मारुन बसले आहेत. तुम्ही यासाठी जागा उत्पन्न करणार कशा हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो. या शहरांतील बिल्डर लोबीला उलट मोकळे रान, जे आहेच, ते जास्तच मिळेल आणि "आहे रे" व "नाही रे" यातील दरी वाढत जाईल. हा धोका आजच गंभीर झाला आहे. त्यात तेल ओतण्याचे काम शासनाने करु नये.

त्यामुळे विकासाचा समतोल राखण्यासाठी विकेंद्रीकरणाची कास धरत अविकसील प्रदेशांतील शहरांनाच उद्योगधंद्यांसह स्मार्ट करण्याचा सर्वांनी चंग बांधने अधिक संयुक्तिक राहील याबाबत मराठी मनात शंका असता कामा नये.

Thursday, August 27, 2015

शूद्र म्हणजे कोण?

शूद्र म्हटले कि हा अवहेलनेचा, समाजातील दुय्यमत्व दर्शवणारा शब्द वाटतो. . शूद्र हा हिंदू धर्मातील चवथा वर्ण समजायची एक प्रथा आहे. पण मुळात सत्य काय आहे हे तपासायचे कष्ट कोणी घेतले नाहीत. वैदिक्धर्मात फक्त आणि फक्त तीनच वर्ण आहेत व ते म्हणजे ब्राह्मण, राजन्य (क्षत्रिय) आणि वैश्य. ऋग्वेदात पुरुषसुक्त वगळता शूद्र हा शब्द  कोठेही येत  नाही. पुरुषसुक्तात क्षत्रिय हा शब्दही येत नाही. येतो तो "राजन्य". अन्य अवैदिक समाजांची दास, दस्यू, अशीही  नांवे येतात. पण ऋग्वेतोत्तर काळात ही समाजनामे अचानक गायब होतात. मग अचानक वैदिक ग्रंथांत शूद्र हे नांव कोठूण आले?

वैदिक संस्कार, वेदांचे अधिकार फक्त तीन वर्णांनाच आहेत हे सत्य सर्वांना माहित आहे. म्हणजेच हे तीनच वर्ण वैदिक धर्माचे आहेत. शूद्र वैदिक असते तर त्यांनाही हे अधिकार काही प्रमाणात का होईना असते हे उघड आहे. पण तसे धार्मिक वास्तव नव्हते व नाही. मग शूद्र नेमके कोण आहेत, त्यांचा धर्म काय हे पहायला पाहिजे.

यासाठी आपण अन्य विद्वानांनी शूद्र कोण याबद्दल काय मत दिले आहे हे पाहुयात.

१) "शूद्र हे मुळात एखाद्या अवैदिक (अनार्य) टोळीचे नांव असावे." -राज पृथी,  Indian Caste System, edited by R.K. Pruthi, Discovery Publishing House, 2004, page 72.
२) "तीन वर्णांच्या बाहेर जो समाज होता त्याला शूद्र हे नांव वापरले गेले." - वि. का. राजवाडॆ, राधामाधवविलासचंपू, प्रस्तावना.
३) "शूद्र हे आधी एखाद्या टोळीचे नांव असावे. नंतर हे नांव जोही कोणी अनार्य आहे, अवैदिक आहे वतीन वर्णांच्या बाहेर आहे अशा सर्वांनाच, परकीयांनाही उद्देशून वापरले गेले. सुत्रांच्या दृष्टीने जेही कोणी तीन वर्णांचे नाहीत ते शूद्र."- देवदत्त भांडारकर, Some Aspects of Ancient Indian Culture, By D. R. Bhandarkar, 1989, page 12.
४) "शूद्र हे मुळचे क्षत्रीय होते. ब्राह्मणांनी त्यांचे उपनयन करणे बंद केल्याने शूद्र हा चवथा वर्ण बनला."- डा. बाबासाहेब आंबेडकर, शूद्र पुर्वी कोण होते?

आपण आधीच पाहिले आहे कि ऋग्वेदात शूद्र हा शब्द  एकदाच व सर्वात उशीराची रचना असलेल्या पुरुषसुक्तात येतो. हा धर्म स्थापन झाला तो दक्षीण अफगाणिस्तानात. भारतात हा धर्म आला तो प्रचाराच्या माध्यमातुन. दास-दस्यु हे अफगाणिस्तान-इराणातील लोक. ते मागेच राहिल्याने भारतिय समाजांना काहीतरी संबोधन देणे आवश्यक होते. ते शूद्र या शब्दाने साधले.

सर्वात महत्वाची बाब अशी कि शूद्र या शब्दाला कोणत्याही भाषेत (वैदिकही) काहीच अर्थ नाही. या शब्दाच्या व्युत्पत्ती कोणत्याही भाषेतुन साधता आलेली नाही. त्यामुळे हा शब्द कोणत्यतरी मूळ प्राकृत शब्दाचा अपभ्रंश असावा असे स्पष्ट दिसते. म्लेंच्छ हा शब्द  मेलुहा या शब्दाचा वैदिक अपभ्रंश आहे असे पुरातत्ववेत्ते अहमद हसन दानी व थापर यांनी दाखवून दिले आहे. (The Indus Civilization, by A. H. Dani and B. K. Thapar, page 274,)शूद्र या शब्दाचेही असेच असणार हे उघड आहे. अर्थात आपल्याला आज मूळ शब्द माहित नाही. परंतु "असुरद्र" या शब्दाचा हा अपभ्रंश असू शकेल असे माझे मत आहे.

शूद्र हे तीन वर्णांबाहेरचे लोक हे मत, अगदी बाबासाहेबांचे मत गृहित धरले तरी स्पष्ट होते. ब्राह्मण एवढे प्रबळ होते कि ते अगदी सर्वच (संख्या कितीही असो) क्षत्रियांचे उपनयन करायचे थांबवतील एवढे शक्तीशाली होते हे मत आता पुराव्यांवरुन टिकत नाही. वैदिक साहित्याने, स्मृती-सुत्रांनी  शुद्रंवर बंधने लादली असे साधारणपणे मानले जाते. ते प्रत्यक्षात पाळले गेले काय हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यातच आपल्या सांस्कृतिक प्रश्नाचे मूळ आहे.

शिशूनाग, नंद व सम्राट चंद्रगुप्त (व त्याचे वंशज) हे शूद्र (अवैदिक) होते हे सर्वमान्य आहे. सातवाहन ते यादव या सत्ताही शूद्र होत्या. दक्षीणेत व पुर्वोत्तर बलीदेशात शुद्र राजेच राज्य  करतात हे ब्राह्मण ग्रंथांनी स्पष्ट म्हणून ठेवले आहे. याचाच अर्थ असा कि वैदिक धर्माला लागू असलेल्या धार्मिक बंधने शुद्रांना लागू नव्हती व ती त्यांनी कधी पाळलेली दिसतही नाही. याचे कारण हा भारतातील मुळचा अवाढव्य समाज होता. या पुर्वापार शैवप्रधान धर्म पाळणा-या लोकांना वैदिकांनी शूद्र हे नांव दिले. यापलीकडे शूद्र या शब्दातुन अवहेलना अथवा हरलेले लोक असा अर्थ काढणे अनैतिकासिक आहे. उलट सर्वच महान सम्राट शुद्रांतुन निर्माण झाले हे सत्य आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. नंदांनी नाश केल्याने भविष्यात भारतात सर्वच शूद्र राजे राज्य करतील हे पुराणांतरी येणारे विधान लक्षात घायला हवे.

पाली सहित्यात येणारा "खतिय" हा शब्द क्षत्रियवाचक आहे असे मानण्याचाही प्रघात आहे. वि. का. राजवाडे गौतम बुद्धस "व्रात्य" क्षत्रीय (म्हणजे क्षत्रियत्वाचे वैदिक संस्कार न झालेला) म्हणतात. याचाही अर्थ अवैदिक क्षत्रीय असा होतो. पण खतीय म्हणजे क्षत्रीय नव्हे. मोठ्या प्रमाणात शेती करणा-या लोकांना खतीय (क्षेत्रिय) म्हणत असे डा. आ. ह. साळुंखे यांनी सप्रमाण दाखवुन दिले आहे. हे सत्यही आहे. शुद्धोदनाकडॆ हजार नांगरांनी नांगरावी लागेल एवढी शेती होती त्यामुळे त्याला (व बुद्धालाही) खतीय म्हटले गेले आहे. उत्तरेत शेताला अजुनही खेत म्हणतात. खेतीय-खतीय म्हणजे शेतजमीनींचे मालक. शेतकरी. याचा क्षत्रिय शब्दाशी संबंध नाही.

थोडक्यात शूद्र शब्दातुन काही शोधत बसत, अवहेलनात्मक वापरत बसत आपली फसवणूक करुन घेण्याची आवश्यकता नाही. आज ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो तो कथित शुद्रांचा धर्म आहे. वैदिक धर्म अजुनही स्वतंत्र असून त्याच्या धर्मप्रथाही स्वतंत्र आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल.


Tuesday, August 25, 2015

मानव संस्कृतीचे अपराधी....आयसिस!




आयसिस (इस्लामिक स्टेट्स) या दहशतवादी संघटनेने सिरिया व इराकमध्ये जो दहशतवादाचा विस्फोट घडवला आहे तो समस्त मानवजातीला काळीमा फासणारा आहे यात शंका बाळगायचे कारण नाही. २०११ पासून या संघटनेने निर्माण केलेल्या हिंसक संघर्षात दोन लाखाहुन अधिक ठार झालेले आहेत.आयसिसच्या दहशतवाद्यांनी हाती पडलेल्या सिरियन/इराकी नागरिकांसह परकीय नागरिक व पत्रकारांची ज्या नृशंस पद्धतीने हत्या केली आहे ती "सैतानी" या शब्दातच वर्णन करता येईल.

त्याहीपेक्षा आयसिसने पुरातन मानवी सांस्कृतिक ठेव्यांना नष्ट करण्याचा जो चंग बांधला आहे तो आजच्या सर्व मानवी जातीला हादरवुन सोडणारा आहे. खरे तर हा भाग पुरातन काळापासून (इसपू ५०००) सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत समृद्ध. मेसोपोटेमियन, असिरियन, ब्यबिलोनियन,सुमेरियन अशा अनेक महान संस्कृत्या येथे उदयाला आल्या. या संस्कृत्या तत्कालीन ज्ञात जगाशी व्यापारी वत्यामुळेच सांस्कृतिक नाळ जोडून होत्या. सिंधू संस्कृतीशीही त्यांचा व्यापार चाले. भारतिय व्यापा-यांनी तेथे वसाहतीही वसवल्या होत्या. भारतियांना ते लोक "मेलुहा" देशाचे म्हणत. या विविध काळात जन्माला आलेल्या संस्कृत्या अत्यंत सहिष्णू होत्या. त्याच भुमीत अत्यंत असहिष्णू, विध्वंसक  व हिंसक  तांडव गेली अनेक दशके उफाळलेले असावे आणि आयसिसने या पुरातन सांस्कृतिक ठेव्यांना नष्ट करायचा चंग बांधावा ही अत्यंत शरमेची बाब  आहे.

ताजी घटना अशी कि आयसिसने सिरियातील पामिरा येथील पुरातन बल शामिन हे मंदिर तहस नहस करून टाकले. जागतिक वारसा म्हणून या मंदिराला युनेस्कोने घोषित केले होते. मुळात हे मंदिर अवशेषरुप उरले असले तरी त्या अवशेषांतुनही त्याची भव्यता व कलात्मकता उर दडपवत होती. पामिरा हे  नगर अठराव्या शतकात प्रवाशांनी शोधले होते. दुस-या महायुद्धनंतर याचे शिस्तबद्ध उत्खनन करत वाळवंटाखली जवळपास गाडले गेलेले हे नगर नव्या सुर्यप्रकाशात आणले गेले होते. हे नगर आणि तेथील भव्य मंदिर आता स्मृतिशेष झाले आहे.

मार्च १५ मध्ये खोस्राबाद येथील राजा सार्गो याने वसवलेले सनपुर्व ७२१ मधील नगर उध्वस्त केले. हे नगर इराकमधील. येथे अनेक राजवाडे होते. एके काळी ही असिरियाचे राजधानी होती. या नगराला भरभक्कम तटबंदी होती. हेही नगर लुटारुपणे उध्वस्त केले गेले आहे.  बगदादपासून १८० मैलांवर  असलेले हत्रा हे एक असेच पुरातन अवशेषग्रस्त नगर. हे एके काळी व्यापाराचे मोठे केंद्र होते. तेही आयसिसने नष्ट केले. या नगरातील राजप्रासाद अत्यंण्त भव्य व कलात्मक वास्तुरचनेने शोभित. पण आता हेही स्मृतिशेष.

Khorsabad

याहीपेक्षा मानवी संस्कृतिच्या इतिहासातील अनमोल ठेव्यांचा विध्वंस निमरुद येथे केला गेला. टायग्रिस नदीच्या काठी वसलेले हे शहर असिरियन साम्राज्याची दुसरी राजधानी होती. सनपुर्व नवव्या शतकात राजा असूर नसिरपालाच्या कारकिर्दीत हे नगर अत्यंत भरभराटीला आले होते. ब्रिटिश पुरातत्वविदांनी टॆकाडाखाली गाडले गेलेले हे नगर विसाव्या शतकाच्या आरंभी शोधले. प्रसिद्ध लेखिका अगाथा ख्रिस्तीही या उत्खनन मोहिमेच्या वेळेस प्रत्यक्ष हजर होत्या. येथे हस्तीदंतापासून बनवलेल्या हजारो कलात्मक प्रतिमा ववस्तू मिळाल्या. येथील मुर्त्या तर अत्यंत प्रमाणबद्ध  नेत्रदिपक अशा होत्या. मार्च २०१५ मध्येच आयसिसने अक्षरश: बुलडोझर फिरवुन हे नगर, त्यातील प्रतिमा नष्ट करुन मानवतेच्या उरावर गंभीर घाव घातला.



यानंतर मोसुल येथील पुराणवस्तू संग्रहालयातील पुरातन ठेवेही नष्ट केले गेले. तेल शेख हमाद, मारी, दुरा युरोपा, सालाहदिनचा किल्ला ई. जवळपास अन्य दहा पुरातन ठेव्यांना असेच नष्ट करण्यात आले. थोडक्यात आयसिसने पुरातन इतिहासाचे अनमोल ठेवे नष्ट करत संपुर्ण मानवी संस्कृतीशी अक्षम्य असा द्रोह केला आहे. बामियानच्या बुद्धप्रतिमा तोफगोळ्यांनी उध्वस्त करुन टाकणा-या तालिबान आणि आयसिसमद्धे काहीएक फरक नाही.

जगात युध्ये होत असतात. राजकीय व धार्मिक वर्चस्वाचे रक्ज्तरंजित संघर्ष जगाला नवे नाहीत. संस्कृतीला अवरुद्ध करणारे हे विनाशक प्रवाह असतात. मुर्त्यांचे आयसिसला वावडॆ आहे. या मुर्त्या शिल्लक राहिल्या तर मुर्तीपुजकांचा धर्म पुन्हा डोके वर काढू शकतो हा त्यांचा वेडपट तर्क आहे. जगात असंख्य धर्म आले आणि गेले. टिकले ते त्या लोकांनी आपल्या प्रतिभेने निर्माण केलेले वास्तु व प्रतिमांचे जग. असिरियनांचा, मेसोपोटेमियनांचा धर्म जगातुन कधीच संपला. धर्म मानवनिर्मित असलेली एक काल्पनिक श्रद्धा-संकल्पना आहे. कालौघात त्यात बदल होणे अपरिहार्य असते. पण कोणा धर्मग्रंथात कोणत्यातरी एका काळात अमुक लिहिले म्हणून आम्ही आजही त्याचे शब्दश: पालन करु असे म्हणत मानवाच्याच पुर्वजांनी निर्माण केलेल्या अनमोल ठेव्यांना नष्ट करू म्हणत उन्मादी हिंसेने-विध्वंसकतेने तशी कृती करणारे माणूस म्हणायच्या योग्यतेचे कसे असतील?

आयसिस या पुरातन ठेव्यांना नष्ट करत असतांना काही बहुमोल वस्तुंची तस्करी करुन आपल्या दहशतवादी कारवायांसाठी धन मिळवते असाही आरोप आयसिसवर आहे. त्यात तथ्य नसेल असे नाही. पण असे सांस्कृतिक ठेवे विकणे आयाबहिणी विकण्यासारखे लाजीरवाने आहे हे आयसिसला कळायचा मार्ग नाही. किंबहुना  जगातील सर्वच्विध्वंसक प्रवृत्तीच्या लोकांना मानवी व्यवहारांतुन दुर करणे गरजेचे बनून जाते ते यामुळेच!

सद्दाम हुसेनवर  रासायनिक अस्त्रे आहेत असा आरोप करत त्याच्यावर युद्ध लादत, खुनशी फाशी देणारे अमेरिकन व युरोपियन जग या सांस्कृतिक वारशाच्या विनाशाबाबत गप्प आहे. आयसिसच्या नंगानाचाला मात्र उत्तर देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघही भुमिकाहीन आहे असेच सध्याचे चित्र आहे. यामुळे आयसिसला मदत पुरवणारे नेमके कोण आहेत हा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. तेलाच्या झपाट्याने उतरत असलेल्या किंमती व त्यामुळे निर्माण होत असलेला  आर्थिक दहशतवादही आपल्याला समजावून घ्यावा लागेल. काट्याने काटा काढायचा असा डाव जर अमेरिकी-युरोपिय जग खेळत असेल तर जसे तालिबान अमेरिकेवर उलटले तसेच एक दिवस आयसिसही यांच्यावर उलटल्या शिवाय राहणार नाही हे त्यांना समजावून घ्यावे लागेल.

दरम्यान जे अलौकिक सांस्कृतिक ठेवे आयसिसने नष्ट केले ते मानवी जगाला आहे त्या स्वरुपात पाहण्यास उपलब्ध नाहीत. पहायचे ते चित्रांतुन. आयसिस व तिचे पडद्याआडचे समर्थक मानवघाती म्हणुनच भविष्यात ओळखले जातील हे मात्र निश्चित!

Sunday, August 23, 2015

सम्राट चंद्रगुप्त मौर्य


भारतीय संसदेच्या प्रांगणात भारताच्या पहिल्या सम्राटाचा एक प्रतिकात्मक पुतळा स्थानापन्न करण्यात आला आहे व त्याखाली गौरवाने लिहिलेय- "Shepherd boy-Chandragupta Maurya dreaming of India he was to create". विशेष म्हणजे हा पुतळा हिल्डा सेलेगम्यन या  आंतरराष्ट्रीय किर्तीच्या महिला शिल्पकाराने तयार करुन संसद भवनाच्या परिसरात बसवण्यासाठी दान दिला होता. एका धनगर पुत्राने भारताचे विराट स्वप्न पाहिले. ग्रीकांविरुद्धचा पहिला स्वातंत्र्यलढा उभारला. त्यांना भारतातून अथक प्रयत्नांनी  हुसकले आणि नंतर मगध सम्राट धनानंदाचा पराभव करीत आपली एकछत्री सत्ता उभारली. भारतीय लोकशाहीने त्याला वाहिलेली ही मानवंदना आहे यात शंका नाही. हा गौरवशाली इतिहास आपण येथे थोडक्यात पाहुयात.

मोरिय कुळ

चंद्रगुप्ताचे "मौर्य" हे आडनाव कसे आले, त्याचे मूळ काय यावर इतकी परस्परविरोधी माहिती जातककथा, जैनसाहित्य, पुराणे व ग्रीक साधनांत आलेली आहे कि कोणीही गोंधळून जावे. कोणी नंद राजाला मुरा नांवाच्या दासीपासुन झाला म्हनून मौर्य तर कोणी मोरिय गणातील म्हणून मौर्य अशा व्युत्पत्त्या दिल्या आहेत. भारतात इतिहासलेखनाची पद्ध्गतच नसल्याने पुराणकारांनी जेथे माहिती नाही तेथे स्वरचित दंतकथा घुसवल्या. खुद्द नंद घराण्य़ाच्या उगमाबद्दल व या घराण्यात किती राजे झाले याबाबत एकवाक्यता नाही. त्यामुळे आपल्याला विविध साधनांतुन आलेल्या माहितीचे तर्कशुद्ध विश्लेशन करीत सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागतो.

नंद घराणे अवैदिक, (शूद्र) राजघराणे होते याबाबत कोणाच्याही मनात दुमत नाही. या घराण्याचा पहिला शासक महापद्म नंद याने शिशुनाग राजवंशानंतर आपली सत्ता मगधावर प्रस्थापित केली. (इसपू ३९५). काही साधनांनुसार पहापद्म नंद हा शिशुनाग वंशातील शेवटचा राजा नंदीवर्धिन अथवा महानंदिन (इसपू ३६७-३४५) या राजाचा अनौरस मुलगा होता असे दिसते आणी त्यात (औरस असो कि अनौरस) तथ्य असावे असे दिसते. हे खरे असले तर नंद घराणे शिशुनाग वंशीयांचाच पुढील विस्तार होता असे म्हणावे लागेल.  चंद्रगुप्त याच वंशातील धनानंदाच्या मुरा नावाच्या दासीपासून झालेला पुत्र म्हणून मौर्य हे मात्र अन्य साधनांशी तुलना करता टिकत नाही. कसे ते आपण पाहुच.

पुराणकारांनी नंद घराणे हे क्षत्रियांचे संहारकर्ते असल्याने भविष्यात भारतात पुढील सर्व राजे शूद्र (अवैदिक) असतील अशी घोषणा केली. याचे कारण म्हणजे नंद घराण्याने शिशुनाग वंशीय राज्याचा फार मोठा विस्तार केला. उत्तर भारतातील तत्कालीन अनेक जानपदे, महाजानपदे येथील राजवटी नंदांनी हटवत आपली सत्ता प्रस्थापित केली त्यामुळे नंदांना परशुरामानंतरचे सर्व-क्षत्रीय-संहारक ही पदवी वैदिक पुराणकारांनी दिली असल्यास नवल नाही. मौर्यही आपसूक शूद्रच ठरत असल्याने त्यांनाही नंदांसोबतच शूद्र ठरवण्याच्या नादात मुरादासीची दंतकथा निर्मण केली गेली असे स्पष्ट दिसते. प्रसिद्ध इतिहासकर राधाकुमूद ब्यनर्जीही या कथेला "पुराणकारांची भाकडकथा" असे म्हणतात. एकंदरीत नंद घराणे वैदिक धर्मविरोधी होते एवढेच तथ्य यातून दिसते.

बौद्ध साहित्यानुसार चंद्रगुप्त हा मोरिय गणातील तरुण होता. (महावंस) हा गण पिप्पलीवन येथील होता असे दीर्घनिकायात म्हटले आहे व हा गण शाक्य गणाशी निगडित होता असेही सुचवलेले आहे. मोरियनगरातील म्हणुनही मौर्य असे बौद्ध सहित्य सांगते. अशाच एका कथेनुसार चंद्रगुप्ताचा गण कोसलनरेश विडुडभाच्या शाक्यांवरील हल्ल्यानंतर हिमालयात आश्रयाला गेला. हा विभाग मोरांसाठी प्रसिद्ध असल्याने  या लोकांना मोरीय म्हणू लागले. जैन साहित्यानुसार चंद्रगुप्त हा मयुरपालन करणा-या खेड्याच्या प्रमुखाच्या मुलीचा पुत्र होत म्हणून त्याला मौर्य हे नांव पडले.

 वरील विविध कथा पाहिल्या तर त्या परस्परविरोधी व गोंधळाच्या आहेत हे उघड आहे. भारतात पुरातन काळी अनेक राजारहित गणराज्ये किंवा राजा निवडनुकीने निवडणारी गणराज्ये होती. ही राज्ये प्राय: लहाण असत. या गणांची नांवे अनेकदा त्यांच्या कुलचिन्ह/देवक यावरुन पडत. नागवंश, गरुडवंश, सुर्य-चंद्र वंश इत्यादि नांवे त्यांना प्रिय असलेल्या प्राणी/पक्षी/ग्रह-तारका अथवा वृक्षांवरुनही पडत. आजही भारतात ही देवकप्रथा पाळली जाते. चंद्रगुप्त मोरिय गणातील तरुण असावा याला अजुन एक पुरावा ग्रीक साहित्यात येतो. मोरिय नांवाचा गण  तेंव्हा खरेच अस्तित्वात होता. अजून एक कथा उत्तरविहारअट्ठ्कथेत येते. ती सत्याच्या ब-यापैकी जवळपास जाते.

या कथेनुसार चंद्रगुप्ताचा पिता मोरिय गणाचा प्रमुख होता. शत्रुच्या आक्रमणामुळे मोरिय गणाला स्थलांतर करावे लागले. सीमेवर झालेल्या चकमकीत त्याला मरण आले. ्त्याच्या दुर्दैवी आणि प्रसंगवशात दरिद्री झालेल्या विधवेला तिच्या भावांनी पुष्पपुर नावाच्या शहरात आणले. तेथे त्याचा मेंढपाळ (अथवा गोपालक) मामा होता त्याच्याकडे चंद्रगुप्ताला सुरक्षेस्तव ठेवले. मामाने पुढे चंद्रगुप्ताला एका शिका-याला विकले. शिका-याने किशोर चंद्रगुप्ताला आपल्या गायी व मेंढरे वळायच्या कामाला लावले. त्याच्यातील न्ययप्रियता व  राजपदाची कांक्षा तेंव्हापासून झळकत असे व सोबती मेंढपाळांशी तो राजाप्रमाणे वर्तन करे. अशाच एका प्रसंगी त्याला चाणक्याने पाहिले व या मुलात लोकविलक्षण प्रतिभा आहे हे ओळखून त्याला आपल्यासोबत नेले.

पुढील प्रश्नाकडे वळण्याआधी वरील दंतकथांवरुन काय स्पष्ट होते हे पाहुयात. मोर हे देवक असलेल्या कुळात/गणात चंफ़्द्रगुप्ताचा जन्म झाला होता. हे कुळ परंपरेने पशुपालनाशी संबंधीत होते. त्याचे वडील त्याच्या जमातीचे प्रमूख असतील किंवा नसतीलही, परंतू हे पश्चिमोत्तर भारतातील अनेक पशुपालक घराण्यांप्रमाणे एक होते. मोर हे मौर्य घराण्याचे देवक/कूलचिन्ह होते याचे पुरावे खुद्द सम्राट अशोकाने आपल्या काही शिलालेखांवर वसांची येथील स्तुपावर मयुरचिन्हे कोरून आपल्यासाठी सोडले आहेत. नंदनगढच्या अशोकस्तंभाच्या पायथ्याशे मयुरप्रतिमा दिमाखात चित्रीत केलेली आहे. हे पुरावे पाहुन पुरातत्वविद सर जोन मार्शल यांनीही मान्य केले कि मोर हे चंद्रघुप्ताच्या घराण्याचे प्रतीकचिन्ह आहे हे वास्तव  या प्रतिमा घडवणा-यांनी जीवंत ठेवले आहे.

असो.

सर्व दंतकथा चंद्रगुप्त या काळात मगध (आताचा बिहार) प्रांतात आश्रयाला आला होता असे सुचवितात. पुष्पपूर म्हणजे कुसूमपुर अर्थात पाटलीपुत्र असा अर्थ बव्हंशी विद्वानांनी लावला आहे. परंतू  चंद्रगुप्ताच्या आरंभेच्या काळातील घटना पाहिल्या व चाणक्याच्याही जीवनाशी तुलना केली तर सत्य वेगळेच असल्याचे लक्षात येते.

चाणक्य हा एक विद्वान होता. त्याला ब्राह्मण (वैदिक) मानले जाण्याचे प्रथा असली तरी त्यात तथ्य दिसत नाही. तो तक्षशिला येथील तत्कालीन जगप्रसिद्ध विद्यापीठात नुसता शिकला होता असे नाही तर तेथील अध्यापक होता असेही म्हटले जाते पण त्यालाही आधार नाही. चाणक्य मुळचा कोठला व  त्याचे खरे नांव काय याबद्दलही घोळ आहेतच. काही विद्वान त्याला दाक्षीणात्य मानतात तर काही तो मुळचा तक्षशिलेचाच होता असे मानतात. चाणक्याचा मगधाशीही घनिष्ठ संबंध असून तो पाटलीपुत्रास नेहमी जात असे असेही मानले जाते. धनानंदाने त्याचा अपमान केल्याने या घराण्याचा विनाश केल्याशिवाय शेंडीला गाठ बांधणार नाही अशी प्रतिज्ञा त्याने केली होती अशी सुरस दंतकथा तर खुपच प्रसिद्ध आहे. पण तसे वास्तव नसावे व चंद्रगुप्ताचाही मगधाशी युवावस्थेत कधी संबंध आला असावा असे वाटत नाही. चाणक्य आणि अर्थशास्त्राचा लेखक कौटिल्य एकच मानण्याचाही प्रघात आहे पण तेही खरे नाही. या सर्वस्वी दोन वेगळ्या व्यक्ती आहेत आणि त्यांच्यात किमान सहाशे वर्षांचे अंतर आहे. चाणक्य अस्तित्वात मात्र होता हे त्याचा उल्लेख बौद्ध आणि जैन साहित्यही करत असल्याने मान्य करावे लागते. पण तो वैदिक होता की अवैदिक याबाबत खत्रीशीर माहिती उपलब्ध नाही.

पुष्पपुर हे पश्चिमोत्तर भारतातील कोणते तरी वेगळेच शहर असावे किंवा चंद्रगुप्त मुळचा कोठला हेच माहित नसल्याने जीही काही ऐकीव माहिती कथाकारांना मिळाली त्यावरुन त्यंनी कुसुमपुराशी हा संबंध ओढून ताणून जोडला असावा.

आपल्याकडे पुराणिकांनी नंद घराण्याला खूप बदनाम करुन ठेवले आहे. ते हीण कुळातील होते म्हणून ते लोकांत अप्रिय होते असे म्हणावे तर तथकथित "उच्च-कूल" ही बाब तेंव्हा अस्तित्वात नव्हती. शिशुनाग राजघराणेही मग तथाकथित हीन-कुलीनच होते व त्यांनी साम्राज्य या शब्दाची प्रत्यक्ष व्याख्या सिद्द्ध केली. अवैदिक घराण्यांना हीन मानण्याची वैदिक साहित्तिकांची प्रथा आहे.

नंद घराण्यात एकंदरीत नऊ राजे होऊन गेले. धनानंद हा अखेरचा. याचे मूळ नांव चंद्रमास (ग्रीक उच्चार क्झ्यंड्रमास) असावे व अलोट संपत्तीमुळे त्याला धनानंद हे टोपणनांव मिळाले असावे. याच्याकडॆ ८० कोटींची संपत्ती होती. महावंश त्याच्या संपत्तीच्या हावरेपणबद्दल त्याच्यावर टीका करतो. त्याच्या धनाढ्य़पणाची किर्ती तमिळनाडूपर्यंत पोहोचली होती. संगम साहित्यातील प्राचीन कवितेत धनानंदाचा उल्लेख "गंगा नदीच्या पुराप्रमाणे संपत्ती असलेला" असे वर्णन केले आहे. असे असले तरी धनानंद दानशाळांच्या मर्फत अलोट दान करत असे आणि दानशाळेचे प्रमुखपद एका ब्राह्मणाकडॆ असे अशाही नोंदी आहेत. चाणक्य स्वत: दानसंघाचा अध्यक्ष होता व याच काळात त्याचा व धनानंदाचा कलह झाला असेही काही कथा सुचवतात. तक्षशिलेचा विद्वान अध्यापक ते दानाध्यक्ष हा चाणक्याचा प्रवास असने शक्य नाही. पण धनानंद दानही करत असे असे दिसते.

धनानंदाबद्दलचा पुराणे-बौद्धसाहित्यातील  येणारे टीकात्मक उल्लेख जरा दूर ठेवले पाहिजेत. धनानंदाची सैनिकी शक्ती एवढी अपार होती कि खुद्द अलेक्झांडरचे सैन्य चीनाबच्या पुढे सरकायची हिम्मत करु शकले नव्हते हा प्रत्यक्ष इतिहास नजरेसमोर ठेवायला हवा. ग्रीक इतिहासकार प्लुटार्क नोंदवतो कि नंदांकडे दोन लाखांचे पायदळ, ८० हजारांचे घोडदळ, ८ हजार रथदळ आणि सहा हजारांचे हत्तीदळ होते.  यात काही आतिशयोक्ती जरी असली तरी लष्करीदृष्ट्या मगधाची शक्ती तत्कालीन जगात अचाट होती असे म्हणावे लागेल. केवळ या सैन्यशक्तीला घाबरुन अलेक्झांडरला अधिक पुर्वेकडॆ सरकण्याचा विचार सोडून द्यावा लागला. त्याच्या सैन्यातील बंडाळीमुळे अलेक्झांडरला परत जावे लागले अशी कारणे ग्रीक इतिहासकारांनी दिली असली तरी ती सारवासारव आहे हे उघड आहे. प्लुटार्कनेच पर्दाफाश केला आहे. आणि ग्रीकांचे संकट सामोरे ठाकले असता चाणक्यासारखा विद्वान मुत्सद्दी केवळ नंदाने अपमान केला म्हणून त्याच्या विनाशाची प्रतिज्ञा करत चंद्रगुप्ताकरवी ते कार्य पार पाडेल आणि त्यासाठी काही काळ का होइना देशात अराजकाची स्थिती आणत शत्रुला फायदा होऊ  देईल असे म्हणने वा तसा विचार करणे हा चाणक्याचा आणि चंद्रगुप्ताचाही अवमान आहे.

आणि तसा विचार करायचेही काही कारण नाही हे घटनाक्रम नीट समजाऊन घेतला तर लक्षत येईल. मुळात चंद्रगुप्ताने आपला संघर्षाचा आरंभ नंदांपासून केला नाही. अलेक्झांडरचे आक्रमण इसपु ३२६ मद्धे सुरु झाले. तो तेंव्हा तक्षशिला विद्यापीठात शिकत तरी होता किंवा त्या परिसरात राहत होता. चाणक्य त्या भागात तेंव्हा होता की नाही याबाबत शंका आहे कारण ग्रीक साधने जरी चंद्रगुप्ताचा उल्लेख करीत असली तरी चाणक्याबाबत ती अवाक्षरही काढत नाहेत. त्यामुळे चणक्याने ग्रीकांशी केलेला संघर्ष चाणक्याच्या प्रेरणेने केला असे विधान करता येत नाही.

पोरसचा पराभव आणि त्याचे मांडलिकत्वाची घटना याच वर्षी (इसपु ३२६) घडली. ग्रीकांनी तक्षशिलेसह बराच पंजाब आपल्या ताब्यात घेतला. सिंधु नदीचा पश्चिम भाग त्यांच्या ताब्यात आलेला होता. स्थानिक सत्ता कोलमडून पडल्या होत्या. आणि येथेच चंद्रगुप्ताचे अलौकिक कार्य सुरु होते. एक झुंजार सेनानी वनेता म्हणून तर चाणक्याचे कार्य एक कुटील मुत्सद्दी म्हणून.

ग्रीकांशी संघर्ष

अलेक्झांडर महत्वाकांक्षी होता. तत्कालीन ज्ञात जग  आपल्या सत्तेखाली आणन्याचे त्याचे स्वप्न होते. भारत जिंकला कि हे स्वप्न पुर्ण होईल असे त्याला वाटत होते. भारत जेथे संपतो तेथेच जगही संपते ही तत्कालील ग्रीकांची कल्पना होती. येथेवर तो सर्वत्र यशस्वी झाला होता. पण येथे गाठ आता पडणर होती ती चंद्रगुप्त आणि चाणक्याशी. परकीयांचे लोंढे बघुन दोघे कामाला लागले. त्यांच्याकडॆ धन नव्हते पण प्रबळ स्वातंत्र्यप्रेम होते. त्यांने सैन्य जमा करायला सुरुवात केली.कोण होते त्यांचे सैनिक? महावंस सांगते पंजाबमधील स्वातंत्र्यप्रिय गणंना एकत्र करत हे सैन्य उभारले गेले. योधेय गणही यात सामील होता.ग्रीक इतिहासकार जस्टिन म्हणतो , चंद्रगुप्ताने "दरोडॆखोरांचे" सैन्य उभारले. म्यक्डोनेल म्हणतो हे दरोडेखोर म्हणजे गणराज्यांचे नागरिक होते. या सैन्यात किरात, बाहीक, शिबी, उदुंबर, शुद्रक  वगैरे गणराज्यांतील नागरिकांचा समावेश होता. एरियन हा ग्रीक इतिहासकार म्हणतो त्या काळी पंजाबची भुमी स्वतंत्रताप्रिय गणराज्यांच्या टोळ्यांनी भरली होती. या पराक्रमी विजिगिषू लोकांना चंद्रगुप्ताचे प्रभावी नेतृत्व लाभले व पहिला स्वातंत्र्य संग्राम सुरु झाला. स्त्रीयांनीही या युद्धात  भाग घेतला.

राधाकुमुद बानर्जी म्हणतात, चंद्रगुप्ताने दिलेला लढा हा अलेक्झांडरच्या विजयांपेक्षाही नेत्रदिपक आहे. या लढ्यात सुरुवातीला विजय मिळाले नाही. हजारोचे सैन्य मारले गेले वा बंदी झाले. याचे कारण म्हणजे सारेच सैन्य हे प्रशिक्षित,अनुभवी नव्हते. पण चंद्रगुप्ताने हळू हळू या विखुरलेपणाला शिस्त आणली. गनीमी काव्याचा अवलंब सुरु केला. पोरस (पर्वतक) हा चंद्रगुप्ताला सामील झाला. बहुदा याच काळात कधीतरी चंद्रगुप्ताची भेट खुद्द अलेक्झांडरशी झाली. या भेटीत काय घडले याचा वृत्तांत उपलब्ध नाही. शिवाय ही भेट युद्धाच्या आधी कि मध्यकाली झाली हे नक्की नाही. त्यामुळे भेट झाली हे खरे असले तरी त्यावर अभिप्राय देता येत नाही.

पण या अनपेक्षित उठावामुळे अलेक्झांडर त्रस्त झाला. त्याला भारतात ग्रीकांच्या, अन्यत्र केल्या तशा वसाहती स्थापन करायच्या होत्या. त्यासाठी त्याने सहा छत्रप नेमले होते. सिंधू नदीच्या पश्चिमेला तीन तर पुर्वेला तीन. आहे तोच भाग तरी सुस्थिर आपल्या अंमलाखाली ठेवावा असे त्याला वाटने स्वाभाविक होते. पण चंद्रगुप्ताने आपल्या हस्तकांकरवी छत्रप निकानोर व फिलिप यांची हत्याही घडवून आणून अलेक्झांडरच्या मनसुब्यांना हादरा दिला. यामुळे ग्रीकांचे मनोधैर्य अजुनच ढासळले.

दरम्यान अलेक्झांडर परतीच्या वाटेला लागला होता. त्याचे परत फिरणे हा योगायोग नव्हता. आधी सतत जिंकण-या ग्रीकांन हताश व्हावे असे वाटावे हे घडणे दैवयोगही नव्हता. त्यामागे भारतीय गणांची एक सुसुत्र चाल होती ज्याचे नेतृत्व चंद्रगुप्ताने केले. ग्रीक छत्रपांचे पडणारे खुनही अपघात नव्हते तर त्यामागे एक सुसुत्र कट होता. इसपु ३२५ ते इसपु ३२३ या अवघ्या दोन वर्षाच्या काळात जगज्जेद्त्या सिकंदराला माघारी फिरावे लागले. छत्रपांच्या खुनांमुळे त्याने मागे सोडलेले साम्राज्याचे अंशही कोसळले.

ग्रीकंचा इतिहासकार जस्टिन म्हणतो,"या स्वातंत्र्यलढ्याचा नायक "सेंड्रोकोटस"(चंद्रगुप्त) होता. एका सामान्य कुळातला माणूस सम्राट होण्याच्या खरोखर योग्यतेचा होता. हा एक अलौकिक शक्तींनी भरलेला तरुण. याने अलेक्झांडरचाही प्रत्यक्ष भेटीत अपमान केला. त्याला मारायची आज्ञा दिली तर हा पावलांच्या चपळाईने निसटला.....याने दरोडॆखोरांची फौज प्रेरित करुन जमवली अणि ग्रीकांची सत्ता उलथुन टाकले."

जस्टिन हे नि:संदिग्धपणे सांगतो कि ग्रीकांविरुद्धच्या स्वातंत्र्ययुद्धाचा नायक चंद्रगुप्त होता. जस्टिन हा इसवी सनाच्यादुस-या शतकात झालेला रोमन (ल्यटिन) इतिहासकार. आपला पुराणकार नव्हे. ग्रीक साधनांतुन अभ्यास करुन त्याने हा निष्कर्श काढला आहे. आमचे पुराणकार शेंडीच्या दंतकथा रंगवत चंद्रगुप्त व चाणक्याने दिलेल्या, सामान्य लोकांच्या मदतीने दिलेला माहान लढा यावर अवाक्षरही काढत नाहीत हे विशेष!

एका अर्थाने चंद्रगुप्ताचा पहिला स्वातंत्र्यलढा इसपू २२३ मद्ध्ये संपला. नंदांशी त्याने केलेला संघर्ष यानंतरचा आहे.  त्या संघर्षाचा संबंध चाणक्याने केलेल्या प्रतिज्ञेशी नाही हे मी वरच सांगितले आहे. त्यामागील कारणे नंद शूद्र होते, अन्यायी होते यात नसून नंदांच्या नऊ पिढ्यानंतर लोपलेल्या साम्राज्य विस्ताराच्या आकांक्षांच्या झालेल्या अंतात आहेत. जेंव्हा चंद्रगुप्त व त्याचे साथी गणराज्ये ग्रीकांशी लढत होती खरे तर नंदांनीही आपले अपार सैन्यबळ घेऊन साथीस यायला हवे होते. मग लढा सोपा झाला असता. पण धनानंद गप्प बसला. त्याचे अचाट सैन्यबळ कामाचे ठरले नाही. ग्रीकांच्या आक्रमणामुळे  व त्यांनी केलेल्या अत्याचारांमुळे पश्चिमोत्तर सीमा नुसत्या सुरक्षित नव्हेत तर विस्तारायला हव्यात हे चंद्रगुप्ताच्या लक्षात आले नसले तरच नवल!

 मगध त्या काळात भारताची सांस्कृतिक राजधानी होती. शैव, वैदिक, जैन, बौद्ध, आजीवक, श्रमण, चार्वाकादि तत्वज्ञानांची केंद्रे मगधात होती. पाटलीपुत्र ही राजकीय सत्तेचे राजधानी. आजच्या दिल्लीला जिंकले म्हणजे जसा भारत जिंकला तसे पाटलीपुत्र जिंकले म्हणजे भारताची प्रभुता असा समज त्या काळी होता. नंद अल्पसंतुष्ट व अदूरदृष्टीचे बनले होते. त्यामुळे त्यांना मागे सारून आता नव्या नवोन्मेषी सत्तेची गरज होती.

चंद्रगुप्त आता या कार्यासाठी सिद्ध झाला.

नंद साम्राज्याशी संघर्ष

जसा ग्रीकांशी चंद्रगुप्ताने कसा लढा दिला याची नोंद भारतातील धर्माश्रयी पुराणकारांनी ठेवली नाही तशीच नंदांशी चंद्रगुप्ताने कसा लढा दिला याचीही नीटशी नोंद नाही. दंतकथांतुन हाही इतिहास शोधावा लागतो. चंद्रगुप्ताने मगधाच्या सीमेवर  हल्ले करत पाटलीपुत्रापर्यंत फोचायची आधी चाल खेळली. पण त्यत सुरुवातीला त्याला अपयशे आली.

महावंसातील एक दंतकथा सांगते कि, चंद्रगुप्ताच्या हेराने एका खेड्यातील महिलेच्या चंद्रगुप्ताबाबतच्या वक्तव्याची माहिती त्याला दिली.ती अशी होती...तिचा मुलगा रोटीच्या कडा तशाच ठेऊन फक्त मधलाच भाग खायचा. त्यामुळे रोटी लगेच संपायची. यावर ती महिला मुलाला म्हणाली,

"तू चंद्रगुप्तासारखाच वागतो आहेस!"
"का असे म्हणलीस?" मुलाने विचारले.
"तोही वेड्यासारखा आघाडीची शहरे ताब्यात न घेता सरळ राजधानीत घुसून सम्राट बनु पाहतोय!"

चंद्रगुप्ताने सुरुवातीला मगधावर आक्रमण करतांना जिंकलेल्या भागावर आपले प्रशासन व सैनीकी बळ ठेवण्यावर लक्ष दिले नव्हते असे या दंतकथेवरुन दिसते. चंद्रगुप्ताला सिकंदराशी लढायला मदत करणारी पराक्रमी सेना होती. नंदांचे सैन्य प्रबळ होतेच. पण तो संख्येचा दबदबा होता हे चंद्रगुप्ताने सिद्ध करुन दाखवले. तरीही त्याला नंदांना पराजित करायला तब्बल दोन वर्ष अथवा त्याहून अधिक काळ लागला.

चंद्रगुप्ताने पाटलीपुत्राचा परिसरही ताब्यात घेतला. पाटलीपुत्राला वेढा  घातला. धनानंदाने पराजय मान्य केला. आता त्याच्याकडे ना सैन्यही उरले होते कि बळ अथवा धनही.

हरलेल्या शत्रुला मारण्याची तशीही भारतीय परंपरा नाही. धनानंद ठार मारावा असा दुष्टही नव्हता. माहिती मिळते ती अशी- धनानंदाला पाटलीपुत्रातुन निष्कासित करण्यात आले. त्याला सोबत त्याच्या दोन्ही पत्न्या आणी त्याच्या रथात बसेल एवढे धन घेऊन जाण्याची परवानगी देण्यात आली.

इसपू ३२१ मद्ध्ये चंद्रगुप्ताचा अभिषेक खुद्द चाणक्याने केला असे दंतकथा सांगतात. धनानंदाचे अथव नंद घराण्याच्या वंशजांचे नांव इतिहासात नंतर पुसलेच गेले.

चंद्रगुप्ताने उर्वरीत भारत व पश्चिमोत्तर भारत तर ताब्यात घेतलाच पण पर्शियापर्यंत मोहिमा करुन तेथील ग्रीक शासक सेल्युकस निकेटरलाही नमवले. नंतर मैत्र साधले.त्याला ५०० हत्ती भेट दिले तर त्याच्या कन्येला पत्नी म्हणून स्वीकारत वैश्विक मैत्रीचा आदर्शही घालून दिला.

चंद्रगुप्त मौर्य, भारताचा अद्वितीय सम्राट, स्वातंत्र्याचा आद्य उद्गाता एका मेंढपाळ/पशुपालक समाजात जन्माला आला. वैदिक सत्तेला जसे नंदांनी उलथुन लावले तसेच चंद्रगुप्तानेही. चंद्रगुप्ताने उत्तरकाळात जैन धर्म स्विकारला असे जैन सुत्रे सांगतात. ते अशक्य नाही. मुद्राराक्षस नाटकात चाणक्यही त्याची सतत "वृषल"(शूद्र) म्हणून हेटाळणी करतांना दिसतो. हे नाटक चवथ्या शतकानंतर, जेंव्हा वर्णाहंकार वाढू लागले होते, तेंव्हा कधीतरी लिहिले गेले आहे. पण आज हेच नाटक ऐतिहसिक मानले जावे हे दुर्दैव आहे.ते एक नाटक आहे. चंद्रगुप्त होऊन गेल्यानंतर सात-आठशे वर्षांनंतर लिहिले गेलेले आहे याचे भान आम्हाला नाही. आम्हाला अजून माणसाला माणूस समजायची दानत नाही. त्याच्या भव्यता या जाती-वर्णांच्य फुटपट्ट्यांनी मोजता येत नाहीत हे समजत नाही.

-संजय सोनवणी 

Thursday, August 20, 2015

सहज विचार....

1

सर्वात महत्वाची बाब म्हनजे शेती हा अजुनही भारतीय अर्थव्यवस्थेचा व ५५% जनजीवनाचा मुख्य आधार आहे हे लक्षात घेऊन शेतीमालाधारित लघू ते मध्यम उद्योग, अगदी खेडोपाडीही काढण्यासाठी का उत्तेजन दिले गेले नाही हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. भारतात आजही ३०% फळ-भाजीपाला पुरेशा साठवणुकीच्य साधनांचा अभाव, वाहतुकीच्या अपु-या सुविधा यामुळे वाया जातो. निर्जलीकरणासारख्या वा अन्य खाद्योद्योगांच्या सोप्या तंत्रज्ञानाच्या पद्धती आम्ही ग्रामीण शाळा-कोलेजांमधून अभ्यासक्रमातुनच जर शिकवल्या असत्या तर दोन बाबी नक्कीच झाल्या असत्या. शेतमाल म्हणजे राष्ट्रीय साधनसंपत्तीच आहे. ती वाया जाण्यापासून वाचली असती. मुल्यवर्धकता आली असती. आणि ग्रामीण तरुणांना रोजगारही स्थानिक पातळीवरच उपलब्ध झाले असते. होलंड व इंग्लंडमध्ये मी अनेक अत्यंत छोट्या ते बहुराष्ट्रीय प्रक्रिया उद्योगांना भेटी दिल्या. मांस-मासळीपासुन ते भाजीपाल्यांचे निर्जलीकरण कसे केले जाते हे पाहिले. आपल्याकडे उन्हात वाळवण्याची कला आहे. सुक्या मासळीची एकटी देशांतर्गत बाजारपेठच १७ हजार कोटींची आहे. जगभर मागणी आहे. परंतू सोप्या असलेल्या तंत्रज्ञानाशीही आम्ही आमच्या नागरिकांना ओळख करून दिली नाही. त्याचा परिपाक म्हणजे ग्रामीण व किनारपट्ती भागात वाढत चाललेली बेसुमार बेरोजगारी.
म्हणजेच विकेंद्रीकरण, कि ज्यायोगे लोकसंख्याही योग्य प्रमाणात वितरीत होईल, पाणी ते वीज यासारख्या मुलभूत सुविधांवर आज पडलाय तसा अतिरेकी ताण पडनार नाही आणि घरापासून ते जमीनींच्या किंमतीही आटोक्यात राहतील. आजवर आम्ही ते केले नाही. आतातरी ते करण्याची गरज आहे.
दुसरे म्हणजे पंतप्रधानांनी १०० स्मार्ट सिटी बनवण्याचा संकल्प सोडला आहे. या आधीच बजबजलेल्या शहरांना "स्मार्ट" करण्याची गरज नाही तर अविकसीत भागांतील निवडक शहरे "स्मार्ट" बनवण्याची गरज आहे. अशा शहरांना सर्व पायाभूत सुविधा कशा उपलब्ध होतील हे पाहण्याची गरज आहे. पुणे-मुंबईसारख्या शहरांत नवीन उद्योगांना परवानग्या देण्याचे थांबवले पाहिजे, लोकसंख्येचा ताण आता पुढे किमान वाढणार नाही हे पाहिले पाहिजे. प्रगत देशांनी आपल्या प्रत्येक संसधनांचा व्यावसायिक वापर अत्यंत कुशलतेने केला आहे. विकेंद्रीकरणाचे धोरणही राबवले आहे. ते आपल्याला जमलेले नाही. ते आता तरे जमायलाच हवे.

* * *
2

खेदाने म्हणावे लागते कि आम्ही परिवर्तनास लायक असा समाज नाही. आम्हाला नेमका कशाचा विरोध, का आणि कसा करावा याची समज अद्याप नाही. आमचे विरोध हे आमच्या केवळ अहंभावातून आलेले आहेत. विरोधांना सत्य आणि तथ्य याचे पाठबळ नसले तर ते विरोधही हास्यास्पद होऊन जाणार हे आम्हाला समजत नाही. किंबहुना पुरोगामीपणाचे, परिवर्तनाचे तत्वज्ञानच आमच्याकडे नाही असे वाटावे अशी स्थिती आहे. तत्वज्ञानाचा पाया केवळ सत्य हाच असतो हे आम्हाला कोणीतरी शिकवायची गरज आहे. आम्ही उलट आमच्याच अहंकाराभिमानात बेभान होत इतस्तता: दगड फेकत बसु तर परिवर्तन तर सोडाच, आपल्याच मार्गात आपण रोडे निर्माण करून ठेवू. पुढे जाण्याची, सत्यशोधनाची बाब तर दुरच.

* * *
3

माणसाला आपल्या कमतरतांची, उणेपणाची जाण असल्याने त्या न्यूनगंडावर मात करण्यासाठी त्याने आपल्या प्रतिभेने सुपर ह्युमन दैवते निर्माण केली.
आपले राष्ट्र, आपला प्रांत, आपला धर्म आणि आपली जात याच्या अहंभावांना जपण्यासाठी आपापल्या राष्ट्र, प्रांत, धर्मातीलही व्यक्तींची सुपर ह्युमन दैवते बनवली.
आपापले दैवत श्रेष्ठ ठरवण्यासाठी ते जे नव्हतेच अशी मुल्ये, जी स्वत:ला कधी पाळायचीच नव्हती , त्यांच्यावर लादली.
आपल्यातील न्युनांवर तोकडे समाधान शोधले.
माणसांचा इतिहास हा त्याच्या न्युनगंडाचा इतिहास आहे.
म्हणुनच त्याला दैवते लागतात.
नि हीच माणसाची शोकांतिका आहे!

* * *

4

अभिव्यक्ति ही माणसाची उपजत प्रेरणा आहे. अभिव्यक्ती आहे म्हणून संस्कृती आहे. अभिव्यक्ती, मग ती भाषा असो, वास्तुकला, चित्रकला, साहित्य ते अर्थव्यवहार असो...वा अन्य कोणतेही कृत्रीम माध्यम...ज्यातुन माणूस व्यक्त होतो...असते अभिव्यक्तीच.
आम्ही जेही काही...कोणत्याही माध्यमांतुन आज अभिव्यक्त होतो ती एकुणात आमची आजची संस्कृती दाखवते आणि भविष्यातील संस्कृतीचे दिशादर्शन करते.
म्हणुनच आजच्याच अभिव्यक्तीबद्दल आम्ही आत्ताच अधिक सजग असले पाहिजे!
नसलो, तर आम्ही संस्कृती पुढे नेणे तर दुरच, पण संस्कृती, जी आहे म्हणतो...नि जी कधीकाळी अतिमहान होती म्हणत तीबाबत आजही जो उरबडवेपणा करतो, त्यासारखा बाष्कळपणा करणारे अन्य असंस्कृत जीव जगात असू शकतील काय?

* * *

5

विश्व अथांग आहे. आपल्या ज्ञात विश्वात अब्जावधी आकाशगंगा आहेत. एकेका आकाशगंगेत मोजता येणार नाहीत एवढे आपल्या सुर्याच्या हजारो-शेकडोपट मोठे तारे आहेत. पृथ्वीसदृश जे ग्रह मिळतात तेही एवढे अवाढव्य आहेत कि आपण कल्पनाही करु शकत नाही. तो गुरू-बिरू तर क्षुल्लक बालक. पृथ्वीची त्यात मिजास काय?
असे म्हणतात कि ज्ञात विश्वाचा व्यासच १६ अब्ज प्रकाशवर्षे आहे. तो अजुनही अधिक असू शकेल...किंवा कमीही.
या पसा-यात हा मनुष्य किती छोटा! दुर्लक्षणीय घटक.
तरीही तो महान आहे कारण आहे त्या विश्वाचा शोध घेण्याचा, ते समजावून घेण्याचा तो किमान प्रयत्न तरी करतो!
पण त्याचे क्षुल्लकत्व एवढेच कि तो माणसालाच समजावून घेण्याचा प्रयत्न करत नाही!
या विरोधाभासातून आम्ही कधी बाहेर पडू?

* * *

6

मानवी धारणा या खरेच प्रागतिक असतात काय? अनेकदा स्वत:ला प्रागतिक समजणारे आपल्याच धारणांचे नीट विश्लेषन करू न शकल्याने स्वत:ला प्रागतिक समजत, पुरोगामी समजत प्रतिगामी होत जातात. याचे मूळ कारण म्हणजे प्रतिगामीपणा काय आणि पुरोगामीपणा काय याच्याच व्याख्या त्यांना स्पष्ट नसतात.
शेकडो-हजारो वर्षांपुर्वी अमूक होते तसेच वर्तन, तशीच संस्कृती, तेच ग्रंथ आणि त्यातील तशाच्या तशा मान्यता वर्तमानातही पुजनीय/भजनीय व अंतिम सत्य मानतो व तसे वर्तन वर्तमानातही करायचा प्रयत्न करतो वा तशा भावना/विचार तरी जपत इतरांनीही तसेच वागावे व तसाच विचार करावा असा प्रयत्न करतो तो प्रतिगामी असतो असे आपण मानतो. प्रतिगामीपणाला काळ व समाजाचे वा व्यक्तीचे बंधन नसते. पाच-पन्नास वर्षांपुर्वीचे विचारही जो वरीलप्रमाणेच मानतो तोही तेवढाच प्रतिगामी असतो.
पुरोगामीपणाची व्याख्या जरा व्यापक आहे. ती जीवनाची सारी अंगे स्पर्शते. मग ती भौतिक असोत, ज्ञानात्मक असोत वा निखळ वैचारिक असोत. जोही कोणी काल होता त्या स्थितीपेक्षा आज वैचारिक/ज्ञानिक/आर्थिक उत्थान करीत उद्या याहीपेक्षा मोठा पल्ला गाठायचा प्रयत्न करत असतो आणि अधिकाधिक मानवतावादी जो होत जातो त्याला आणि त्यालाच फक्त पुरोगामी म्हणता येते.

* * *

7

जोवर आपण आपल्या मनावर साठलेल्या मालिन्याच्या, आता कणखर बनुन गेलेल्या पुटांना जीव तोडून खरवडून काढत नाही, तोवर आपण माणसाकडे आणि भवतालाकडे नितळ नजरेने पाहू शकणार नाही. द्वेष, घृणा, स्थार्थादि भावनांनी आपल्याला नको एवढे प्रदुषित केले आहे. एवढे कि आपण ’मनुष्य’ म्हणवून घेण्याच्याही योग्यतेचे राहिलेलो नाही. खर-या-खु-या माणसांचा आदर करण्याचीही योग्यता राहिलेली नाही. ’दांभिकतेचा कळस’ म्हणूनच आजच्या मानव म्हणवणा-या प्राण्याचे वर्णन करावे लागेल. आमचा परमेश्वराकडे अथवा अंतिम सत्याकडचा प्रवास सोडा...’माणूस’ होण्याच्या दिशेने थोडा जरी प्रवास सुरु झाला तर किती बरे होईल!


Tuesday, August 18, 2015

माझ्या दृष्टीने तरी बाद!

मी एकदा मागेच एका लेखात म्हटले होते कि, "इतिहास हा मानवी मनावर प्रभाव गाजवणारा फार महत्वाचा घटक असतो. इतिहास हा कसा सांगितला गेला आहे यावर समाजाचे त्याबाबतचे आकलन अवलंबुन असते. असे असले तरी सामान्य माणसांवर वदंतांचा प्रत्यक्ष घडलेल्या इतिहासापेक्षा अधिक प्रभाव असतो असे आपल्याला सामान्यतया दिसून येईल. इतिहास हा जेत्यांचा वा समाजवर्चस्ववादी घटकांच्या वा वर्चस्ववादी होवू पाहणा-यांच्या मानसिक तुष्टीकरणासाठी लिहिला जात असल्याने तो तटस्थ व निरपेक्ष असतोच असे नाही. दुसरे असे कि इतिहासकार हासुद्धा एक मनुष्यच असल्याने त्याच्या लेखनावर त्याच्या समजुती, पुर्वग्रह आणि त्यानुरुप असलेल्या त्याच्या व्यक्तिगत आकलनाचा प्रभाव पडत असतो. अनेकदा एकाच पुराव्याचे आकलन/विश्लेषन इतिहासकारपरत्वे बदलते असते. या नियमाला अपवाद नसतात असे नाही. परंतु मग त्यांनाही त्यांच्या नव्य संशोधनामुळे सामाजिक पुर्वग्रहांना, रुढ समजुतींना धक्का बसत असल्याने लोकांच्या रोषाला तोंड द्यावे लागते आणि त्यातुन जी वादळे निर्माण होतात तशी पुर्वग्रहविरहित, संपुर्ण द्न्यान-चिकित्सात्मक इतिहाससंशोधनास खिळ बसते."

बाबासाहेब पुरंदरे यांना दिल्या जाणा-या पुरस्काराबद्दल राळ उठलेली आहे.  मी वेळॊवेळी अनेक परिप्रेक्ष्यात लेख लिहुन तसेच मिडियातील चर्चांत भाग घेऊन माझी मते व्यक्त केलेली आहेत. माध्यमांतील चर्चेत विचारले गेलेले प्रश्न या संदर्भातच आणी किमान वेळेत बोलावे लागते. आपलेही समाधान नाही आणि दर्शकांचेही. असो. मी येथे या वादामुळे निर्माण झालेले माझ्या मनातील प्रश्न व्यक्त करु इच्छितो. हे प्रश्न मला विचारले गेले नाहीत आणि मीही सविस्तर लिहिले नाही.

माझ्या दृष्टीने पुरंदरे हा विषय महत्वाचा कधीच नव्हता. माझी त्यांची ओळख नाही आणी मी त्यांचा वाचकही नाही. "राजा शिवछत्रपती"हे पुस्तक मला कोणत्या स्थितीत वाचावे लागले हे मी पुर्वेच लेखात स्पष्ट केले आहे. या पुस्तकातील काही विधानांवर घेतले जाणारे आक्षेप आणि ते सत्य आहेत कि नाही हा माझा उद्देश्य होता. मी आजही हेच ठामपणे सांगेल कि सर्व आक्षेप हे हेतुपुर्वक निर्माण केले गेलेले असून त्यात तिळमात्र तथ्य नाही. ते आक्षेप घेत पुरंदरेंना विरोध करणे अत्यंत चुकीचे आहे. किंबहुना लेनने केलेल्या बदनामीपेक्षा हे सोयीने अर्थ घेत केले गेलेले आरोप घातक आहेत व मी ते जाहीरपणे बोललोही आहे.

"राजाशिवछत्रपती" हा इतिहास ग्रंथ नाही. त्यामुळे इतिहासकाराला लावाव्या तशा काटेकोरपणाच्या कसोट्या त्याला लावता येत नाहीत. राजा शिवछत्रपती ही रुढ अर्थाने कादंबरीसदृश असली तरी कादंबरीच्याही शैलीपेक्षा वेगळी शैली यात आहे. मला ती शाहिरी शैलीही वाटत नसून आपल्या इष्ट दैवताबद्दल रसाळपणे सांगत वाचकांना त्यात दंगवू पाहणा-या आख्यानाची आहे. कादंबरीत किंवा आख्यानात इतिहासाची काही सुसंगती लागते तशी यातही आहे. पण ती अपरिहार्यपणे अशा वाड्मयप्रकारात आलंकारिक होत जाते. तशी आलंकारिकता या पुस्तकात आहेच. किंबहुना १९६० नंतरचा नववाचकवर्ग या भारतीय शैलीमुळे मोहित झाला नसला तरच नवल. पण आजच्या (काही) प्रगल्भ वाचकाला ही शैली न रुचण्याची तेवढीच शक्यता कारण वाड्मय शैल्यांत खूप क्रांती झाली आहे. पण हे २०१५ साली या आख्यानमय कादंबरीवरील टीकेची कारणे होऊ शकत नाहीत. मग शेक्सपियरवरही टीकेची झोड उठवावी लागेल.

तर मुद्दा लोकांचा हा नाहीच कि हा इतिहास आहे कि कादंबरी कि आख्यान. जर तो तुम्ही शब्दश: इतिहास मानत असाल तर तुम्ही मध्ययुगात जगत आहात. विश्वास पाटील,रणजित देसाई, मदन पाटील अशांच्याच कादंब-या इतिहासाची पुस्तके म्हणून अभ्यासक्रमात ठेवायला हवीत. इतिहासकारांनी  उगाचच इतिहासाची साधने, रियासती वगैरे लिहायच्या फंदात पडू नये. खरे म्हणजे इतिहासालाच हात लावू नये. हे कोणाला मान्य असेल तर असो. पण इतिहासाचे जग वेगळे आणि कादंबरीकाराचे वेगळे हे समजायची आमची सामाजिक लायकी उरली आहे काय हा माझ्या समोरील प्रश्न आहे.

इतिहास रुक्ष असतो. परस्परविरोधी माहित्या, मते, पुराव्यंनी गजबजलेला असतो. याचा अन्वयार्थ अनेक पद्धतींनी काढला गेला तरी तोही रुक्ष असतो. त्यात बौद्धिक/तार्किक कसरती असतात.  कोणते साधन कोणत्या प्रसंगाबाबत प्रमाण मानावे याचा गोंधळ होत असतो. इतिहास संशोधकाचा जसा वकूब तसा तो आपापले प्रमाण ठरवतो. भारतासरख्या देशात तर इतिहासलेखनाची परंपराच नव्हती. होती ती पुराणकारांची अनैतिहासिक परंपरा. ती आपण शिकतोय ती पाश्चात्य पद्धतीतून. अजून आपण त्यात बाल्यावस्थेत आहोत हे अमान्य करण्याचे कारण नाही.

म्हणजे इतिहासकारच अजून प्रगल्भ नाहीत, असंख्य पुरावे महत्वच समजत नसल्याने कालौघात नष्ट झालेले. ब्राह्मी/खरोष्टीतील उरले-सुरले शिलालेख जतन करायला नि वाचायला येथे ब्रिटिशांनाच यावे लागलेले. असंख्य ताम्रपट तर कधीच  मोडीत गेलेले. लिखित पत्रांचे/साधनांचे मग काय होणार? जेथे समाजाचीच अशी अनास्था असते तेथे इतिहासाचे वाटोळे होणार हे स्वाभाविकच आहे.

बरे, आपला अजुन एक प्रोब्लेम आहे. जातीय वर्चस्वतावाद.

तो कोणात आहे?

एके काळी, पुराणे सांगतात, वैदिक ब्राह्मण श्रेष्ठ कि वैदिक क्षत्रीय श्रेष्ठ असा वाद होता. हा वाद हिरिरीने लढला जायचा. पुढे क्षत्रियांची वैदिकता संपली. (ते का संपली यामागचे कारणमिमांसा वेगळी आहे.) पण तेही वैदिक धर्मानुसार शूद्र बनले.  पण त्यांच्यातील क्षत्रीय समज गेले नाही. हे कथित क्षत्रीय सरंजामदारच होते. आणि त्यांचा ब्राह्मणांशीचा वादही सनातनच होता. ब्राह्मणांनी पौराणीक साहित्यतून वैदिक धर्म व ब्राह्मणत्वचे अतोनात स्तोम माजवले. कथित क्षत्रिय साहित्यातुन का होईना बाद झाले. ब्राहमणांनी प्रत्यक्षात नसला तरी असा सुड घेतला असे म्हणावे लागेल.

आता वेळ कथित काही क्षत्रियांची आहे. ब्राह्मणांचे सारे काही नाकारायचे, ते बहुजनांचे द्वेष्टे आहेत असा प्रचार करायचा आणि समाजव्यवस्थेतून त्यांना हद्दपार करायचे अशी ही व्युहनीति असावी असे चित्र दिसतेय. शिवाजी महाराज हे सर्वांचे अभिमानस्थल. त्यांचीच बदनामी ब्राह्मणांनी केली असे ओरडायला सुरुवात केली तर  मोठा समुदाय आपल्या मागे येईल आणि ब्राह्मणद्वेषाला अधिक धार देता येईल असे त्यांना वाट्ते. हे वाटण्यातही चूक नाही.

पण ते विसरत आहेत कि हा काळ व्यक्तिगत अथवा एखाद्या जातीसमुहाच्या द्वेषांचे द्वेष करुन निराकरण करण्याचा नाही. माणूस जरा का होईना पुढे गेला आहे. छत्रपती शाहुंना वैदिक मंत्राभिप्रेत असतांना कोणी ब्राह्मण शुद्रांसाठीचे पौराणिक मंत्र म्हणतोय हे दाखवुन देणारे राजारामशास्त्री भागवत होते. शिवाजी महाराजांची जवळपास विस्मरणात गेलेली समाधी महात्मा फुलेंनी शोधली. त्यांचे समाधीचे जिर्णोद्धारकार्य टिळक,  केळकर यांनी केले तसेच तुकोजीराजांनी त्या कार्याला आर्थिक हातभारही लावला. शिवाजी महाराज स्वातंत्र्य चळवळीतही आदर्शभुत ठरले ते काही एकट्या कथित क्षत्रियांमुळे नव्हेत. म्हणजे एक काळ असा आला होता कि वैदिक आपल्या वैदिक अस्मिता सोडण्याच्या काळात आले होते तर अवैदिक समुदायही राष्ट्रकर्यासाठी जुने संघर्ष सोडायला तयार होते.

पुरंदरेंचे पुस्तक या संक्रमणकाळातील आहे हे लक्षात घ्यायला हवे. आज मराठ्यांनी लिहिलेल्या इतिहासग्रंथांत/कादंब-यांत जसा मराठेपणा डोकावतोच तसाच ब्राह्मणाने लिहिलेल्या पुस्तकात ब्राह्मणीपणा डोकावणे अपरिहार्य आहे. ही आपल्याच व्यवस्थेची अपरिहर्य अवस्था आहे. मानसिकता आहे. आणि हे वाचकंना समजावून घ्यावे लागते. समस्या अब्राह्मण व अमराठा समुदायांची आहे. पुरंदरे प्रकरणाने ती अपरिहार्यपणे अधोरेखित केली आहे. बाकी समुदायांनी आपली कुतरओढ क करुन घ्यायची?

वर्चस्व कोणाचे असावे, इतिहास खरा कोणाचा, कोण शिवद्रोही आहे हे असामयिक व अप्रस्तुत प्रश्न या वादाने निर्माण केले आहेत. त्याचे निराकरण कसे करायचे हा उद्याचा प्रश्न आहे आणी आपणा सर्वांना याचे उत्तर शोधावे लागेल.

यात इतिहास कोठे आहे? जातीयतेत इतिहास हरवुन जातो. जातियतेच्या जोखडांतून बाहेर पडणा-यांना जातियतेतच ढकलले जाते. इतिहासातील महान व्यक्तीवर प्रेम करतांना, रसभरितपणे त्यावर लेखन करतांना आधी आपण त्या महापुरुषाच्या जातीचे आहोत काय हे तपासून पाहणे अपरिहार्य बनून जाते.  त्या  जातीचे/धर्माचे असू तर मग कितीही अनैतिहासिक लिहिण्याची मुभा आपसूक मिळते. नसलो तर अनिवर्य काळजी घ्यावी लागते.

आणि हे जर असे आहे तर खड्ड्यात जाणारच ना इतिहास?

जातीतुन बाहेर पडत दुस-या जातीच्या महनियांबद्द्ल लिहायचे तरी कसे?

उद्या कोण उपटसुंभ "आमच्या महापुरुषांची बदनामी केली..." असे फुटकळ ओळींचे असंदर्भ उद्धरणे देत तुमच्यावर राळ उठवणार नाही हे कशावरुन? राळ उठवायची तंत्रे जातिपरत्वे वेगळी असली तरी राळ्ही राळच असते.

तर, पुरंदरे प्रकरणातुन शिकायचा बहुजनीय धडा असा ..

मला ब्राह्मण - मराठ्यांना सांगायचेय कि

तुमचे महापुरुष तुमच्याजवळच ठेवा. तुम्हाला हवे तसे ते प्रोजेक्ट करा....ज्यांनीही "बदनामी" केली असे वाटते त्यांच्याशी खुशाल भांडा...

आम्ही इतिहासाच्या मुडद्याच्या विध्वंसक जीवंतपणाला श्रद्धांजलि वाहत राहु.


तसेही आम्ही तुमच्या ऐतिहासिक इतिहासात खिजगणतीतही नव्हतो आणि आजही नाही.

थोडक्यात मराठेशाहीचा विषय माझ्या दृष्टीने तरी बाद!

परिक्षणावरील प्रतिक्रिया

शुध्दोदन आहेर यांनी लिहिलेल्या माझ्या "Origins of the Vedic Religion and Indus-Ghaggar Civilisation"  या पुस्तकाचे समिक्षण महाराष्ट्र टाईम्समद्ध्ये प्रसिद्ध झाले आहे. या परिक्षणातील काही निरिक्षणांमुळे माझ्या मित्रांमद्धे काही संभ्रम निर्माण झाला आहे. पहिली बाब अशी कि अफगाणिस्तानाजवळ वैदिक धर्म स्थापन झाला असे आहेर यांनी म्हटले आहे.मी पुस्तकात दक्षीण अफगाणिस्तान हा ऋग्वेदनिर्मितीचा भुगोल आहे व तो गांधारच्या पश्चिमेचा भाग आहे असे अनेक पुराव्यांनी सिद्ध केले आहे.

दुसरे असे कि वैदिक धर्म भारतात धर्मप्रचारकांमुळे पसरला हे माझे मत त्यांना मान्य नसावे असे दिसते. आर्य अथवा वैदिक टोळ्या भारतात पसरुन त्यांनी धर्म, वर्ण, जाती लादल्या असाव्यात असा त्यांचा तर्क असू शकतो. प्रत्यक्षात मुळात या अनुमानाला पुरावे नाहीत. शतपथ ब्राह्मणातील अवशिष्ट मिथ्थकथा (विदेघ माथवाची) काही प्रचारक सरस्वती (हरर्क्स्वैती) नदीपासून सदानीरा नदीपर्यंत पुर्वेला "अग्नी" (वैदिक धर्म) घेऊन आले याचा स्पष्ट निर्देश करते. धर्मप्रसारासाठी त्या धर्माच्या सर्वलोकांचे स्थलांतर आवश्यक नाही. बौद्ध धर्म प्रव्चारकांमार्फतच अन्यत्र पोहोचला हे उदाहरण आपल्या समोर आहेच. मी हे पुस्तकात सविस्तर दाखवले आहेच. शिवाय ब्भारतीय-अभारतीय य सीमा आजच्या राजक्जीय भुगोलाच्या परिप्रेक्षात पहता येणार नाहीत हेही लक्षात ठेवावे लागते.

आहेर यांनी मी या पुस्तकात जातीसंस्थेच्या उगमाबद्दल मौन पाळलेले आहे. हे खरेच आहे. कारण आजच्या स्वरुपातील जन्माधारित जातीसंस्था भारतात मुळात इसवेसनाच्या दहाव्या शतकापुर्वी अस्तित्वातच नव्हती हे मी माझ्या "जातिसंस्थेचा इतिहास" या पुस्तकात दाखवुन दिले आहे. वैदिकांची वर्ण व्यवस्था होती व  तीनच वर्ण वैदिक धर्मीय होते. शूद्र हा वर्ण नव्हता तर ते एतद्देशियांना दिलेले संबोधन होते. शूद्र या शब्दाची कोणतीही व्युत्पत्ती नाही. हा शब्द कदाचित एखाद्या मुळच्या प्राकृत शब्दाचा अपभ्रंश असावा हे मी मेल्लुहाचा (मेलुखा)संस्कृत अपभ्रंण्श "म्लेंच्छ" या शब्दावरुन दाखवुन दिलेले आहे. शुद्रांचा धर्म लिंगपुजाप्रधान/मुर्ती/प्रतिमापुजक होता तर वैदिकांचा धर्म यज्ञप्रधान होता. वैदिक आरंभीच्या प्रचारकाळातील साहित्यात (ब्राह्मण ग्रंथ व यजुर्वेदात) शूद्र हा शब्द अवमानार्थक येत नाही  हेही मी दाखवून दिले आहे. येथील बव्हंशी वैदिक धर्मिय धर्मांतरीत आहेत त्यामुळेच वैदिक धर्मियांत विविध प्रादेशिक आनुवांशिकी व भाषागटाचे लोक आहेत.

त्या काळात शुद्रांची जातीसंस्था ही व्यवसायसंस्था प्रधान व परिवर्तनीय-लवचीक होती. ती अन्याय्य नव्हती. ती अपरिवर्तनीय बनली ती दहाव्याशतकानंतर. त्यामुळे आजच्या जातिसंस्थेची मुळे वैदिक प्रचारक भारतात आले त्या काळाशी घालणे अनैतिहासिक आहे. वैदिक येण्यापुर्वीच भारतात "सामाजिक" विभागणी झाली होती हे अन्य तज्ञांचे मतही चुकीचे आहे.

थोडक्यात जातिसंस्थेचा संबंध वैदिकांशी जोडता येत  नाही. ती कोणी लादलेली नाही. त्यामुळे माझ्या प्रस्तूत पुस्तकात त्याचा वेध घेणे अनावश्यक होते. दहाव्या शतकानंतर जातिसंस्था अपरिवर्तनीय बनली तिची कारणे समाज/राज/आर्थिक व प्राकृतिक अवस्थेत शोधावी लागतात. ती एकमेवाद्वितीय स्थितीय्त शोधल्या गेलेल्या जगण्याची शाश्वती मिळावी यासाठी निर्माण केल्या गेलेल्या बलुतेदारी/रयत व्यवस्थेत आहेत हे मी "जातिसंस्थेचा इतिहास" यात विस्ताराने चर्चिली आहेतच.

आहेर यांनी माझ्या पुस्तकाची दखल घेऊन विस्तराने व सहृदयतेने परिक्षण लिहिले व महाराष्ट्र टाईम्सनेही ते प्रकाशित केले याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. नाहीतर अनुल्लेखाने मारायचे अथवा उपहास करायची आपल्याच लोकांची प्रवृत्ती सनातन आहे. 

Sunday, August 16, 2015

वंचितांचे अर्थशास्त्र


ब्यंकेत अकाउंट उघडले म्हणजे आपोआप ब्यंकेत पैसे येत नाहीत किंवा कर्जेही मंजूर होत नाहीत. कारण पैसे जमा व्हायचे असतील तर ते कमवावे लागतात. पैसे  कमवायचे तर आहे त्या किंवा संभाव्य व्यवसायासाठी किमान भांडवल हवे. किमान नोकरी हवी. भांडवलच नाही म्हणून पैसे कमावता येत नाही आणि कर्ज हवे तर त्यासाठी जी पत लागते ती आधीच्या कंगालपणामुळे  नसतेच. त्यामुळे तोही मार्ग खुंटलेला असतो. थोडक्यात वंचित एका अर्थ-चक्रव्युहात सापडलेला असतो आणि शेवटी त्याचा अभिमन्यू होणार हे जवळपास निश्चित असते.

भारतात वंचितपणा हा बव्हंशी जातीसंस्थाधारित आहे. अनेक जातींचे पारंपरिक व्यवसाय नव्या जगात नामशेष झालेत. असे अनेक व्यवसाय आहेत जे आज उलट नवीन तंत्रज्ञान वापरत अवाढव्य जोमात आहेत, पण त्यात भांडवलदारांनी जातीविचार न करता नुसता त्यात प्रवेश केला नाही तर ते त्यात भांडवली व तंत्रज्ञान बळावर वर्चस्व गाजवत आहेत. कातडी कमावने, चप्पल-बुटांचे उत्पादन-विपणन ते लोखंड उत्पादन ते त्यापासुन आधुनिक साधने बनवणे यात अग्रेसर आहेत. ही औद्योगिक क्रांती होण्यापुर्वी याच व्यवसायांत पारंपारिक पद्धतीने उत्पादन करणारे लोक होतेच. लोकांच्या गरजा ते आपल्या कौशल्याच्या जोरावर भागवत होतेच. पण औद्योगिक क्रांतीने त्यांना सामावून घेतले नाही. त्यामुळे त्यांचे पारंपारिक व्यवसाय जवळपास हातातुन गेले. व्यवसाय गेले हे समजा एक वेळ ठीक. पण पारंपारिक व्यवसायामुळे चिकटलेली जात मात्र गेली नाही. जातीचा अभिशाप सुटला नाही. ना नव्या संध्या ना पारंपारिक क्षेत्रात राहण्याचा उत्साह हा अजून एक तिढा निर्माण झाला.

सुतार, लोहार, चांभार, वैदू, वडार ईईई आहे म्हणून सामाजिक अवहेलनेचे शिकार होत गेलेले हे घटक. ज्यांनी कधी कसलीही निर्मिती केली नाही त्यांनी याच सर्व व्यवसायांत नोक-या किंवा मालक्या गाजवत निर्माण केलेले तथाकथित बौद्धिक किंवा भांडवली वर्चस्व. सामाजिक अवहेलनेमुळे जगात सर्वच करत असलेल्या, आता प्रतिष्ठित बनलेल्या, व्यवसायांकडे घृणेने पहायला लागलेली सवय हा अजून एक तिढा. तेलही गेले आणि ब्रह्मचर्यही अशी ही गत. मी धनगर समाजाने सहकार क्षेत्रात पदार्पण करत पशुपालन उद्योगातही अग्रणी व्हावे असे म्हटले तर "आम्हाला पारंपारिक उद्योगांत जखडायचे नाही." असे काही तरुण बांधव म्हणाले. जखडू नये हे मान्य. पण म्हणून पारंपारिक व्यवसाय त्याज्ज्य कसा ठरतो? आधुनिकीकरण करता येईल कि नाही? जगात लाखो लोक, जे परंपरेने या व्यवसायांशी संबंधित नाहीत ते हा उद्योग करत नाहीत काय? ते करतात उपजिविका आणि व्यवसायावर नजर ठेऊन. पण दुर्दैव हे कि आम्ही केला तर त्याचा संबंध जातीशीच जोडला जातो, अवहेलनाच वाट्याला येते नि म्हणून तरुण स्वत:च्याच व्यवसायात अत्याधुनिक पद्धत आणू पहात नाहीत. जातीचीच अकारण लाज वाटते. उलट त्यातून बाहेर पडण्यासाठी झटतात. अवहेलनेपासुन वाचायची ही धडपड कोणत्यातरी नोकरीत जाऊन धडकण्यापर्यंत होते. पण असे किती तरुण आपल्या चक्रव्युहातुन बाहेर पडू शकतात?

बरे, समजा कोणाला आधुनिकीकरण करत आपलाच कोणताही परंपरागत अथवा नव्याने निर्माण झालेल्या व्यवसायक्षेत्रात पडायचे असले तरी आपली अर्थव्यवस्था आणी समाजव्यवस्था त्याला सकारात्मक आहे काय? पारंपारिक व्यावसायिक ज्ञानाला आम्ही आधुनिक तंत्रज्ञानात सामावुन घेतले काय?

नाही.

ब्यंका यात वंचितांकडून छोट्या-मोठ्या बचतींचे अवाढव्य भांडवल उभारत त्यातुन कर्जे (त्यातीलही नंतर  १०% तरी बुडित) देतात. सामान्य माणूस बचत करतो तर भांडवलदार म्हणवणारे कर्जे घेतात. हा एक विपर्यास आहेच. आमचे एक माजी मुख्यमंत्री म्हणाले होते, "स्वत:च्या भांडवलाने कधीच व्यवसाय करु नका. कर्ज घ्या." ही भांडवली मानसिकता आहे. कारण व्यवसाय डुबला तर दुसरे डुबतील, असा व्यावहारिक दृष्टीकोन आहे. समजा यातही वावगे नाही. पण कर्ज कोणाला द्यायचे हे ब्यंकांना ठरवता येत नाही ही खरी समस्या आहे. "पत" हा शब्द अत्यंत भोंगळ आहे. पत ठरवायचे निकश केवळ आणि केवळ आर्थिक आहेत, कागदोपत्री आहेत आणि त्यात प्रामाणिकपणाचे कसलेही पतांकन नाही. सामाजिक प्रतिष्ठा, तथाकथित शिक्षण आणि हितसंबंध हेच पतीचे निकश. अशा अवस्थेत भांडवल पुरवणारे भांडवलापासून वंचित राहतात आणि यांच्याच भांडवलातुन चतूर लोक भांडवलदार बनतात.

हाही एक तिढा आहे.

पण वंचिताला भांडवलाचेही संरक्षण द्यावे असा विचार आमच्या अर्थव्यवस्थेला सुचत नाही. आरक्षणाचे संरक्षण आज कुचकामी झाले आहे. त्याचा उपयोग त्या-त्या जाती-जमातींतील मुठभर नव-भांडवलदारांनाच झाला आहे. आपल्याच जाती-जमातीतील अन्यांना फायदा होण्यासाठी किमान दोन पिढ्यांनंतर तरी आपण ते वापरु नये ही सामाजिक जाणीव त्यांच्या ठायी नाही. समांतर आरक्षण आणि आरक्षणातील एकाही सवलतीचा (वय, फ़ी वगैरे) फायदा घेतला तर तुम्हाला आहे त्याच प्रवर्गात रहावे लागेल असे बजावत ओपन जागांण्वरील न्याय्य हक्क झुगारत नवे "ओपन आरक्षण" निर्माण केले गेले आहे. हेही वंचितांचे समग्र अर्थकारण बिघडवण्याचे कारस्थान आहे.

म्हणजे आरक्षणही काढून घेतले जातेय. ते पुर्ण होते तेंव्हाही सर्वच वंचितांना फायदा होईल अशी स्थिती नव्हती. आणि जे मागे राहिलेत त्यांना पायावर उभे राहता येईल यासाठी व्यवसायांसाठी आर्थिक भांडवलही नाही. सामाजिक अवहेलनेमुळे परंपरागत व्यवसाय पुढे रेटण्याची मानसिक हिम्मतही नाही.

भटक्या-विमुक्तांसाठीचे वसंतराव नाईक महामंडळ असो कि धनगरांसाठी बनवलेले शेळी-मेंढी महामंडळ असो. पहिल्याला  जो निधी मिळतो त्यातून लाभार्थी शोधावे लागतील आणि दुस-याला जो निधी मिळतो त्यात ५-५० शेळ्या पाळता येतील. ही महामंडळे काय धोरणात्मक आणी समाजाच्या आर्थिक उत्थानाचे काम करतात हा प्रश्न विचारला तर एकच उत्तर येते व तेम्हणजे राजकीय सोयींसाठी या महामंडळांवर झालेल्या नियुक्त्या. बाकी शून्य.

मग आपले वंचितांचे अर्थशास्त्र तरी नेमके अस्तित्वात आहे काय? कि वंचित हा केवळ राजकीय घोषणाबाज्यांचा शतकानुशतके परवलीचा शब्द राहणार आहे? ना आमची सामाजिक मानसिकता बदलायला तयार आहे ना राष्ट्रीय अर्थकारणाची मानसिकता. वंचितांचे ब्यंक अकाउंट काढून प्रश्न मिटु शकत नाही हे उघड आहे. प्रश्न आहे तो त्यांना ब्यंकेत जमा करण्यासाठी पुरेसे उत्पन्न कसे मिळेल आणि त्यासाठीचे आवश्यक भांडवल कसे मिळेल.

भांडवलदारी जागतिक मानसिकतेचा पाया असेल तर छोट्या-मोठ्या प्रमाणात सारेच भांडवलदार बनवावे लागतील. त्यासाठी आवश्यक भांडवलही व्यवस्थेलाच पुरवावे लागेल. "वंचितांचे अर्थशास्त्र" आपल्याला नव्याने बनवावे लागेल. येथे पाश्चात्य मोडॆल्स चालणार नाहीत. कारण त्यांची समाजव्यवस्था आणी आपली समाजव्यवस्था यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. पण आपल्या विद्वानांची त्यासाठी बौद्धिक आणी आत्मीय झेप घ्यायची तयारी आहे काय?   

Saturday, August 15, 2015

वैदिक धर्म-संस्कृतीचे उगमस्थान!

वैदिक धर्म-संस्कृतीचे उगमस्थान!

वैदिक धर्म-संस्कृतीचे उगमस्थान!
वैदिक धर्म-संस्कृतीचे उगमस्थान!
फोटो शेअर करा
>>शुद्धोदन आहेर 

वैदिक धर्म-संस्कृतीबद्दल भारतीयांना कायमच कुतूहल वाटत आलं आहे. परंतु 'ओरिजिन्स ऑफ द वेदिक रिलिजन अँड इंदुज-घग्गर सिविलायजेशन' (प्राजक्त प्रकाशन) या पुस्तकात लेखक-अभ्यासक संजय सोनावणी यांनी वैदिक धर्म व त्या धर्म-संस्कृतीचे आजचे समर्थक यांच्या मूळ स्थानाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे... 

वैदिक धर्म व त्या धर्म-संस्कृतीचे आजचे समर्थक यांचे मूळ ठिकाण कोणते आहे, या प्रश्नाने अनेक पाश्चात्य व भारतीय इतिहाससंशोधक, समाजशास्त्रज्ञ-विद्वानांना गेली दोन शतके झपाटून टाकले आहे. इंग्रजांचे राज्य भारतात स्थिरस्थावर झाल्यावर त्यांनी वसाहतवादी दृष्टिकोनातून भारताचा इतिहास लिहिला, हे सर्वमान्य तसेच स्वाभाविकदेखील आहे. येथील जातिसंस्थाधिष्ठित समाजाचा मुकुटशिरोमणी समजल्या जाणाऱ्या ब्राह्मण जातीला आपलेसे करण्यासाठी त्यांनी चाणाक्षपणे 'आर्य' वंशाचे (!) मूळ स्थान भारताबाहेरील युरोपच्या जवळपास 'शोधले'. या अशा प्रकारच्या मांडणीतून ब्रिटिश राज्यकर्ते, युरोपीय व भारतातील तथाकथित आर्यवंशीय हे जवळचे भाईबंद असल्याचा संदेश गेला. त्यातून स्वतःला आर्य समजणाऱ्या ब्राह्मण व तत्सम 'द्विज' जातींचा अहंगंड सुखावला जात असल्याने त्यांनी हा वसाहतवादी सिद्धांत उचलून धरला. भारताच्या राजकीय स्वातंत्र्याचे पहिले सर्वश्रेष्ठ नेते असणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी तर आर्यांचे व वैदिक धर्म संस्कृतीचे उगमस्थान थेट उत्तर ध्रुवापर्यंत नेले. अशा तऱ्हेने वैदिक धर्म संस्कृती व त्यांचे निर्माते-समर्थक हे मूळचे भारतीय नाहीत, हा सिद्धांत सर्वदूर पसरला. 

समस्त शोषित स्त्री शूद्रादि-अतिशूद्रांची स्थलकालपरत्वे यशस्वी चळवळ उभारणाऱ्या महात्मा फुले यांनी हाच सिद्धांत उलटा फिरविला, व जातिसंस्थेचे बळी असलेल्या समाजाला आत्मभान दिले. या आत्मभानाची झळ व्यवहारात बसल्यानंतरही वैदिक-धर्मसंस्कृती व त्यांचे निर्माते असल्याचा अहंगंड बाळगणारे आपल्या अभारतीय उगमाच्या सिद्धांताला चिकटून बसले होते. अगदी स्वातंत्र्योत्तर काळातही हीच परिस्थिती कायम होती. तथापि, समाजशास्त्रीय परिभाषेत 'बहुजनवाद' ही संज्ञा प्रचलित झालेल्या विशेषतः २०व्या शतकाच्या शेवटच्या दोन दशकांत, द्विज जातींच्या मूळ स्थानाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेला आला. यावेळेस चर्चा बहुजनवादाने सुरू केली होती व तथाकथित आर्यांचे 'अभारतीयत्व' अधोरेखित करण्याचे कार्य चालले होते. त्यातील धोका बदलत्या परिस्थितीमुळे लक्षात आल्याने, वैदिक धर्म संस्कृतीचे समर्थक खडबडून जागे झाले आणि इतिहासाची नव्याने मोडतोड करून नवनवीन 'संशोधन' (!) पुढे आणू लागले. वैदिक धर्म-संस्कृती ही मुळात भारतातीलच असून तिचे निर्मातेही मूळचे भारतीयच आहेत व येथूनच तिचा 'जगभर' (?) प्रसार झाला, असा या सगळ्या संशोधनाचा सारांश आहे! 

या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील तरुण लेखक-अभ्यासक संजय सोनावणी यांनी 'ओरिजिन्स ऑफ द वेदिक रिलिजन अँड इंदुज-घग्गर सिविलायजेशन' हा सुमारे अडीचशे पानी संशोधनपर ग्रंथ आंतरराष्ट्रीय ज्ञानभाषा असलेल्या इंग्रजीमध्ये लिहून महाराष्ट्राची बौद्धिक परंपरा जोपासण्याचे महत्कार्य केले आहे. वैदिक धर्म-संस्कृती व तिचे निर्माते यांचे मूळ स्थान नेमके कोणते आहे, या कुतूहलापोटी झालेल्या या संशोधनाने अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या आहेत. आर्यांच्या स्थलांतरणाचे विविध सिद्धांत, सरस्वती व घग्गर नद्यांचा प्रश्न, वैदिक व सिंधू-घग्गर संस्कृतीची तुलना, पारशी धर्मग्रंथ अवेस्ता व ऋग्वेदाचा भूगोल तसेच त्यांची समकालीनता आणि सर्वात शेवटी ऋग्वेदिक धर्म भारतात कसा पसरला; अशा सहा प्रकरणांत या ग्रंथाची विभागणी केली असून प्रत्येक प्रकरणांच्या शेवटी संदर्भांची व टिप्पणांची सूची दिली आहे. यावरून लेखकाने ‌केलेल्या प्रयासांची जाणीव होते. 

'आर्य' हा शब्द 'वंश' या अर्थाने वापरणे कसे अनैतिहासिक व समाजविघातक आहे, याचे विवेचन करताना लेखकाने एक मूलभूत प्रश्न उपस्थित केला आहे. स्वतःला वैदिक धर्म-संस्कृतीचे निर्माते समजणाऱ्या तथाकथित 'आर्य' लोकांनाच आपल्या उगमस्थानाची एवढी चिंता का पडली आहे? असा तो मूलभूत प्रश्न आहे. एकूणच मानवी समाजाचा इतिहास व संस्कृतीचा विकास पाहता, मानवी जनसंख्येच्या तुलनेत अक्षरशः चिमूटभर असणाऱ्या तथाकथित 'आर्य' लोकांनाच आपल्या उगमस्थानाच्या माध्यमातून वेगळेपणाचा अट्टाहास धरण्याची आवश्यकता का भासते? समजा, उद्या तथाकथित 'आर्य' लोकांचे उगमस्थान आफ्रिकेत अथवा चीन-मंगोलियात आढळले तरी त्यातून मानवी समाज-संस्कृतीच्या विकासात काय मौलिक भर पडणार आहे? 'युनेस्को' जाहीरनाम्याप्रमाणे, कोणताही वंश आपणांकडे विशिष्ट गुणधर्म असल्याने आम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत, असा दावा करू शकत नाही. तरीही तथाकथित 'आर्य'वंशीय आपल्या उगमस्थानाबाबत पर्यायाने अहंगंडाबाबत एवढे चिंताग्रस्त का झाले आहेत? अर्थात, या अशा प्रश्नांची उत्तरे स्वतःला वैदिक धर्म-संस्कृतीचे निर्माते-समर्थक समजणाऱ्या तथाकथित 'आर्य'वंशीय मंडळींनी देणे आवश्यक आहे. 

तथाकथित आर्यांच्या उगमस्थानाची चर्चा करीत असताना सिंधू संस्कृतीची चर्चा होणे अपरिहार्य आहे. पहिल्या प्रकरणाच्या उत्तरार्धात व दुसऱ्या-तिसऱ्या प्रकरणांत लेखकाने ही चर्चा विस्ताराने केली आहे. विशेषतः सिंधू संस्कृतीचे निर्मातेही आम्ही आर्यच (?) आहोत, असे 'संशोधन' (?) पुढे आणले जात असताना, अशा संशोधनातील फोलपणा दाखविण्यासाठी ही चर्चा विस्ताराने करणे आवश्यकच ठरते. याच अनुषंगाने केलेल्या विवेचनात लेखकाने असा निष्कर्ष काढला आहे की, सरस्वती नदी ही पारशी धर्मग्रंथ अवेस्तामध्ये नमूद केलेली 'हराक्षवैती' असून तीसुद्धा अभारतीय आहे. आपल्या निष्कर्षापुष्ट्यर्थ लेखकाने अवेस्ताच्या अभ्यासकांचे पुरावे जोडले आहेत. सध्या देशात सरस्वती नदीविषयी चाललेल्या चर्चेला नवे वळण देणारे असे हे संशोधन आहे. ज्ञानवृद्धीच्या दृष्टीने यावर मोकळेपणाने व पूर्वग्रहविरहीत सांगोपांग चर्चा होणे आवश्यक आहे. 

या ग्रंथाच्या एकूण विवेचनाचा आशय असा आहे की, वैदिक धर्म-संस्कृतीचा उदय हा आजच्या अफगाणिस्तानजवळच्या परिसरात झालेला आहे. एका अर्थाने, वैदिक धर्म-संस्कृती ही 'अभारतीय' आहे, असे लेखकाचे म्हणणे आहे. तथापि, ही अभारतीय वैदिक धर्म-संस्कृती संपूर्ण भारतभर पसरली कशी, असा प्रश्न स्वाभाविकपणे उद्‍भवतो. यांवर लेखकाचे असे प्रतिपादन आहे की, मिशनरी प्रवृत्तीच्या काही कष्टाळू प्रचारकांमुळे या अभारतीय संस्कृतीचा भारतभर प्रसार झाला! हे प्रतिपादन समाधानकारक नाही, हे उघड आहे. मात्र, लेखकाचा मुख्य विषय वैदिक धर्म-संस्कृतीचे उगमस्थान शोधणे हा असल्यामुळे त्या धर्म-संस्कृतीच्या प्रचार-प्रसाराने गौण स्थान मिळविल्यास फारसे आश्चर्य वाटत नाही. 

ज्ञानवंतांच्या जगात कोणत्याही नव्या संशोधनाची काटेकोर छाननी-तपासणी आवश्यक असली तरी वेगळे मुद्दे मांडणाऱ्या संशोधनाची उपेक्षाही केली जात नाही. आपल्याकडे मात्र आमच्या हितसंबंधांना पोषक काय आहे, याची चाचपणी करूनच एखाद्या व्यक्तीला जनमान्यता अथवा प्रतिष्ठा वगैरे देण्याचा प्रयत्न केला जातो. याउलट आपल्या हितसंबंधांना पोषक नसणाऱ्यांना बदनाम करण्याचेही प्रयत्न केले जातात. त्यातूनच मग गरोदर ब्राह्मण विधवांना मातृ-पितृ वात्सल्याने सांभाळणाऱ्या फुले-दम्पतीला ब्राह्मणद्वेष्टे ठरविण्याचे समाजविघातक प्रकार घडतात. त्यामुळेच की काय, संजय सोनवणी यांच्या या विचारप्रवर्तक ग्रंथाची जागतिक स्तरावर चर्चा होत असतानादेखील बुद्धिवादी महाराष्ट्र मात्र चिडीचूप आहे! संजय सोनावणी यांचे संशोधन अमान्य असल्यास त्यांना ज्ञानाच्या रणमैदानात खेचून त्यांच्या संशोधनाच्या चिंधड्या चिंधड्या उडविण्याचे धाडस दाखवायला काय हरकत आहे? हीच तर खऱ्या ज्ञानवृद्धीची लक्षणे असतात. मराठी समाज या ज्ञानवृद्धीपासून अलिप्त कसा काय राहू शकतो? 

याचा अर्थ हा ग्रंथ परिपूर्ण आहे, असा मुळीच नाही. ऐतिहासिक संशोधनाची एक अन्वेषणपद्धतसुद्धा असते. इंग्रजीत तिला 'मेथॉडॉलॉजी' म्हणतात. लेखकाने आपली अन्वेषणपद्धत सांगितलेली नाही. परंतु ती तर्कशास्त्राधारित असल्याचे जाणवते. वैदिक धर्म-संस्कृतीचे आजचे समर्थक हे ब्राह्मणी अन्वेषणपद्धतीस तर्कशास्त्राची जोड देत असल्याने त्यांचे प्रतिपादन प्रभावी ठरते. ही वस्तुस्थिती विचारात घेता लेखकाने फुले-आंबेडकरवादासारखी अन्वेषणपद्धती वापरली असती, तर या ग्रंथाचे बौद्धिक मूल्य कैकपटीने वाढले असते. विस्तृत संशोधन केलेल्या ग्रंथातील ही गंभीर उणीव आहे. 

ग्रंथातील दुसरी गंभीर उणीव म्हणजे जातिसंस्थेच्या उगम-विस्ताराबाबत बाळगलेले मौन! पारशी धर्मग्रंथ अवेस्ता व ऋग्वेदाच्या आधारे वैदिक धर्म-संस्कृतीचा उदय हा अभारतीय आहे, असे सिद्ध केले तरी या परकीय वैदिक धर्म-संस्कृतीच्या उगमस्थानात न आढळणारी वर्ण-जातिसंस्था भारतीय उपखंडातच का आढळते? शिवाय वैदिक धर्म-संस्कृतीचे बहुतांशी समर्थक हे वर्णजातीस्त्रीदास्य समर्थनाकडे का झुकतात? खरे पाहाता, 'परकीय' वैदिक धर्म-संस्कृती भारतात येण्यापूर्वीच येथे 'सामाजिक' विभागणी झाली होती, असेही अनेक संशोधकांचे म्हणणे आहे. वर्णजातिसंस्थेबाबत मौन बाळगल्यामुळे परकीय वैदिक धर्म-संस्कृतीचा व वर्णजातिस्त्रीदास्याचा परस्परसंबंध नेमका काय आहे? याविषयी वाचकांच्या पदरात काहीच पडत नाही. सैतानी जातिसंस्थेचे बळी असलेल्या या देशातील बहुसंख्य जनतेला आज वैदिक धर्म-संस्कृतीच्या उगमस्थानापेक्षा आपल्या भौतिक मुक्तीची जास्त आच लागलेली आहे. या दृष्टीने पाहता, या गंभीर उणीवेने सदर ग्रंथातील आशयघनता फार मोठ्या प्रमाणात गमावली आहे, असे म्हणणे भाग आहे. याशिवाय सदोष शब्द-वाक्यरचनेची काही मोजकी उदाहरणेही सांगता येतील. 

असे असले तरी वैदिक धर्म-संस्कृतीच्या समर्थकांनी 'वैचारिक' गोंधळ घातलेल्या आजच्या काळात या गोंधळाला रोखठोक प्रत्युत्तर देण्याचे महत्कार्य आंतरराष्ट्रीय स्तरावर केल्याबद्दल लेखक संजय सोनवणी अभिनंदनास पात्र आहेत. समतावादी छावणीने या ग्रंथाचे स्वागत करून त्यांवर जागोजागी साधक-बाधक चर्चा, परिसंवाद घडवून आणले पाहिजेत. याशिवाय, महाराष्ट्राच्या ज्ञानवैभवाला आंतरराष्ट्रीय पातळीवर दखलयोग्य ठरविल्याबद्दल महाराष्ट्राचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येक मराठी माणसानेही या ग्रंथाचे स्वागत करायला हवे!

Tuesday, August 11, 2015

ओवेसी...याकूब....उत्तरक्रिया!

गेले पंधरा-वीस दिवस याकुबच्या फाशीचा मुद्दा अनेक कारणांनी गाजला. गाजला म्हणण्यापेक्षा अक्षरश: धुरळा उठला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. याकुबला वाचवण्याचे सारे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर पुर्वघोषित तारखेला, 30 जुलै रोजी सकाळी सुमारे साडेसहा वाजता त्याला फाशी दिलीही गेली. त्यानंतर गाजली त्याची अंतयात्रा. हजारो लोक त्या अंतयात्रेत सहभागी झाल्याने अनेक लोक बिथरले. अंतयात्रेत सहभागी होनारे याकुबला हिरो मानतात किंवा त्याच्या कृत्याचे समर्थन करतात असे चित्र निर्माण करण्याचेही प्रयत्न झाले. पण या सर्व घडामोडींत कोणताहे अन्य अनुचित प्रकार घडला नाही एवढीच काय ती सध्याची तरी जमेची बाजू. 

पण याकुबमुळे तो मरतांनाही नकळतपणे काही प्रश्न उपस्थित झाले. ते प्रश्न त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणा-यांने जसे निर्मण केले तसेच त्याचे घृणा करणा-यांनीही उपस्थित केले. त्याच्या फाशीचे जसे राजकारण झाले तसेच धर्मकारणही झाले. प्रश्न याकुबच्या फाशीचा नसून यामुळे जे सामाजिक प्रश्न उपस्थित झाले आहेत त्यावर निकोपपणे चर्चा करण्याची गरज आहे. अफजल गुरु अथवा कसाबच्या फाशीमुळे कसलाही गदारोळ झाला नाही. कसाब हा बोलुन चालुन पाकिस्तानी नागर्रिक व या भुमीवर हल्ला करण्याचे दु:साहस करणारा दहशतवादी. त्याला कोणाचीही समाहानुभुती मिळण्याचा प्रश्न नव्हता. तशी ती मिळालीही नाही. किंबहुना या हल्ल्यातेल ठार मारले गेलेल्या दहशतवाद्यांवर या भुमीतील दफनभुमीत जागा दिली जाणार नाही असे मुस्लिम बांधवांनीच घोषित केले होते. अफजल गुरू हा भारताच्या सार्वभौमतेचा मानबिंदू असलेल्या संसदेवरील हल्ल्याचा मास्टरमाईंड. त्याच्याही फाशीचा मुद्दा चर्चेत आला नाही. याकूबमुळे मात्र चर्चेला थैमान आले. पहाटेपर्यंत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांनाही व्यस्त ठेवले गेले. एकीकडे कायदेशिर युद्ध तर दुसरीकडे सामाजिक-वैचारिक युद्धाचा आगडोंब उसळला. असे आताच का व्हावे? १९९३च्या विस्फोटांची धग त्यामागे होती असे म्हणावे तर तब्बल २२ वर्ष या खटल्याबाबत व याकुबबाबतही जवळपास मौनच होते. मग असे काय घडले किंवा घडवले गेले कि ज्यामुळे सामाजिक/धार्मिक धृवीकरण होण्याची वेळ येऊन ठेपावी?

आपल्याला याची कारणे शोधणे जास्त महत्वाचे आहे. याकुब मेमनला फाशी झाली. या भुमीच्या कायद्याच्या ज्याही तरतुदी आहेत त्यानुसार ती फाशी झाल्याने ती सर्वच नागरिकांना मान्य असण्यास कसलाही प्रत्यवाय नव्हता. भारतात आजवर हजारोंना विविध पण निघृण गुन्ह्यांतच फासावर लटकावले गेले आहे. नेमकी किती जणांना फाशी दिली गेलीय याची आकडेवारी भारत सरकारने कधीही प्रसिद्ध केली नाही. भारतात स्वातंत्र्यानंतर आजवर फक्त ५७ लोकांना फाशी दिली गेली असा शासनाचा दावा असला तरी युनियन ओफ डॆमोक्र्यटिक राईट्स या संस्थेने सरकारी कागदपत्रे तपासून १९५३ ते १९६३ या दहा वर्षांतच प्रत्यक्षात १४२२ फाशी दिल्या गेल्या असे नमूद केले आहे. अनेक संस्थांच्या वेगवेगळ्या पाहण्यांनुसार हेच आकडे वेगवेगळे असले तरी ते सरकारी दाव्यातील आकड्यांपेक्षा कितीतरी जास्त आहेत. थोडक्यात आजवर किमान दिडेकहजार लोकांना तरी फासावर लटकावले गेले आहे असा अंदाज बांधता येतो. सरकार खरी आकडेवारी का जाहिर करत नाही याकडे आपण नंतर वळू. पण याकुबच्या फाशीने मात्र समाजाला उन्मादी बनवले हे मात्र खरे.

याकूब हा मुंबईतील झालेल्या स्फोटांमागील कटाचा एक सुत्रधार व फायनांसर होता. त्याचा भाऊ टायगर मेमन आणि दाऊद इब्राहिम हे स्फोटांमागील मुख्य सुत्रधार अथवा मास्टर माईंड म्हणता येतील. त्यांना पकडायच्या वल्गना भरपूर झाल्या पण त्यांना आजतागायत पकडता आलेले नाही. म्हणजे या कटातील पकडला गेलेला व फाशीची शिक्षा झालेला हा एकमेव आरोपी. तो भारतिय यंत्रणांच्या हाती लागला कि तो स्वत:हून शरण आला, असल्यास कोणत्या अटींवर व तो जर शरण आला असेल तर त्याला फाशी दिली जाऊ शकते काय यावरही भरपुर वादळी चर्चा झाल्या आहेत. यातील सत्य-असत्य काय हे जनतेसमोर कधीही येणार नाही. सुनावणीतही या बाबीवर कोणी युक्तिवाद केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे याकूब शरण आला नव्हता किंवा त्याला गुप्तचर यंत्रणांनी कागदोपत्री शरण आल्याचे दाखवले नाही असे म्हणता आले तरी यातील संदिघ्धता कायम राहील हे उघड अहे.

मुंबईतील स्फोटंमागे पार्श्वभुमीहे समजावून घ्यायला हवी. अयोध्येतील बाबरी मशिद त्याजागी असलेल्या मुळच्या राममंदिराला उध्वस्त करुन बाबराने बांधली असा दावा हिंदुत्ववादी संघटनांचा होता. त्यासाठे वेळोवेळी रथयात्रा काढून देशभरात शिस्तबद्ध रितीने मुस्लिमविरोधी वातावरण तापवण्यात आले होते. अनेक भडकावू वक्तव्ये निरंतर केली जात होती. ६ डिसेंबर १९९२ रोजी ही मशिद लालकृष्ण अडवाणींच्या उपस्थितीत बेभान जमावाने पाडली. त्याच दिवशी दुपारपासून ते जवळपास २० जानेवारी १९९३ पर्यंत मुंबईत दंगली व भोसकाभोसकीच्या घटना होत राहिल्या. या दंगलीत जवळपास ९०० लोक मुंबईत ठार झाले. त्यात ५७५ मुस्लिम तर २७५ हिंदू होते. बाबरी मशिदीला पाडण्यात हिंदुत्ववाद्यांचा उन्माद जसा कारणीभूत होता तसाच मुंबईतील दंगलीच्या प्रकरणातही महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी पक्षाचा भडकावू हातभार होता. श्रीकृष्ण आयोगाने दंगली भडकावल्याबद्दल आरोपी क्रमांक एक शिवसेनेला केले होते. अर्थात श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल कधीही स्विकारला गेला नाही. 

या पार्श्वभुमीवर डाउद ग्यंगने मेमन बंधुंना हाताशी धरुन जगातला पहिला साखळी विस्फोटांचा भयंकर दहशतवाद घडवून आणला. ही घटना शुक्रवार १२ मार्च १९९३ साली, म्हणजे मुंबईतले दंगे शमुन दोन महिनेही झाले नव्हते तेंव्हा घडली. तेरा ठिकाणी साखळी पद्धतीने जे विस्फोट केले गेले त्यात साडेतिनशेहुन अधिक लोक ठार झाले तर दिड हजाराच्या आसपास लोक घायाळ झाले. खरे तर गुल मोहम्मद नांवाच्या पाकिस्तानातुन विस्फोटके बनवणे ते उडवणे याचे प्रशिक्षण ग्घेऊन आलेल्या एका व्यक्तीने पोलिसांना तीन दिवस आधीच (९ मार्च ९३) पोलिसांना संभाव्य स्फोटमालिकेचा कबुलीजबाब दिला होता. नौपाडा पोलिसांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नव्हता हेही येथे नमूद करण्यासारखे आहे. किंबहुना संघटित व शिस्तबद्ध मुस्लिम दहशतवादाची सुरुवात या घटनेपासून सुरु झाली असे म्हणता येते. त्याची बीजे बाबरी मशिदीच्या उध्वस्त करणा-या घटनेत आहेत हे वेगळे सांगायची गरज नाही.

राजकीय स्वार्थासाठी भारतिय समाजांचे विभाजन करणे हा हेतू यात दिसतोच, पण मुंबई स्फोट प्रकरणाच्या निमित्ताने पाकिस्तानला यात येथीलच लोकांच्या मदतीने उतरता आले. भारतात द्वेषाची मालिका वाहत राहिली. त्यातुन गोध्रा असो कि त्या घटनेची "प्रतिक्रिया" म्हणून गुजरातेतील प्रायोजित दंगली, मालेगांवातील हिंदुत्ववाद्यांचे स्फोट असोत कि जर्मन बेकरीतील अतिरेकी मुस्लिमांनी केलेले स्फोट. ही भयंकर हिंसक प्रकरणे घडत राहिली. दोन धर्म परस्परांसमोर शत्रुभावनेने उभे राहत एकमेकांवर हिंसक कुरघोड्या करण्याचा हा उपक्रम जो सुरु झाला आहे तो कोठे थांबेल हे सांगता येणार नाही. त्यामुळे याकुबची फाशी व त्याआधी आणि नंतर सोशल मिडिया ते माध्यमांतुन जो उन्मादीपणा दाखवला गेला तो केवळ याकूब या व्यक्ती फार महत्वाची होती म्हणून नव्हे तर त्यामागील षड्यंत्राचाही विचार करणे भाग आहे. 

खासदार असदुद्दिन ओवेसी यांनी "याकुब मुस्लिम आहे म्हणून त्याला फाशी दिली जातेय..." असे विधान करुन या प्रकरणाला धार्मिक रंग दिला. पुढे हे विधान आपण केले नसून इतरांनी केलेल्या तशाच अर्थाच्या विधानाचे समर्थन केले असे म्हणत राजीव गांधींच्या व बेअंतसिंग यांच्या मारेक-यांना राजकीय संरक्षण आहे तसे ते याकुबला नसल्याने त्याला फाशी दिले जाते आहे. बाबरी मशिदीला उध्वस्त करणारे, मुंबई दंग्यांबाबतचा श्रीकृण आयोगाने दोषी ठरवलेयांचे काय करणार"...असे प्रश्न उपस्थित करत मुंबईतील स्फोटांमागील सुत्रधार आणि तत्समान घटनांतील बाबु बजरंगी, कोडनानी यांना समान शिक्षा होत त्यांना फाशी का नाही असाही प्रश्न उपस्थित केला. ओवेसींचे राजकारण मुस्लिम व दलितांचे एकत्रीकरण करत वेगळी फळी उभारायचे राजकारण चालु आहे. त्यांना त्यात यशही मिळतांना दिसत आहे. 

एके काळी कोंग्रेस हीच मुस्लिमांना तारणहार वाटत असे. पण त्यांचा भ्रमनिरास झाला. आपण व्होटब्यंकेसाठी फक्त वापरलो गेलो हे त्यांच्या नवशिक्षित पिढीला उमगले असेल तर त्यात आश्चर्य नाही. आजवर मुल्ला-मौलवींच्याच संगतीत राहत धार्मिक भावना जोपासणारे आता स्वत:लाच एक स्वतंत्र राजकीय शक्ती बनवण्याच्या प्रयत्नांना लागलेले दिसतात. त्यात याकूब प्रकरणाने ओवेसींच्या राजकारणाला गती दिली आहे व त्याचा फायदा ओवेसीसारखे बुद्धीमान राजकारणी घेणार नाहीत असे नाही. साक्षी महाराजांनी ओवेसींना पाकिस्तानात जा असाही अनाहुन धमकीवजा सल्ला दिला आहेच. या मुद्द्यांवर कोंग्रेसही काही वेगळे बोलत नाही. ती जवळपास ओवेसींचेच मुद्दे मांडत होती.  

सर्वसामान्य समाजातही याकुबवरुन तीन तट पडले आहेत. पहिला सर्वात प्रबळ गट आहे तो म्हणजे हिंदुत्ववादी म्हणवणा-या संघटनांचा व त्यांच्या समर्थकांचा. दुसरा गट आहे तो म्हणतो याकुबला फाशी द्या पण मग इतर सर्व तत्सम घटनांतील हिंदुत्ववादी आरोपींनाही फासावर लटकवा. तिसरा गट, जो अल्प्संख्य आहे, म्हणतो कि फाशीची शिक्षाच रद्द करा. यातील पहिल्या गटाने दुस-या गटांवर देशद्रोही, पाकिस्तानात जा ते शिवराळ भाषेत आरोप केलेले आहेत. दुसरा गटही आपल्या पद्धतीने साध्वीपासून कोडनानीपर्यंत आरोपांच्या फैरी झाडलेल्या आहेत. "पुरोगामी" हा शब्द गेल्या दोन-तिन आठवड्यात प्रकटपणे एक शिवी बनवून टाकला आहे. याकूबच्या अंतयात्रेला जी गर्दी उसळली त्यावरुन हिंदुत्ववाद्यांमद्धे मुस्लिम द्वेषाची अजून कारंजी उसळली. देशभक्तीची प्रमाणपत्रे वाटण्याचा ठेका घेतल्याप्रमाणे उन्माद केला गेला. इतका कि मुस्लिमांनाही बचावाच्या पवित्र्यात जावे लागले. वृत्तपत्रांनीही याबाबत नि:संदिग्ध भुमिका घेतलेली दिसत नाही. किंबहुना सध्याच्या वातावरणातील विखाराने कोणीही भांबावुन जावे अशी स्थिती निर्माण झाली आहे. 

यात काही वास्तवे आपल्याला पहायला हवीत. पंजाब सरकार बेअंतसिंगांच्या खुन्यांना व तमिळनाडू सरकार राजीव गांधींच्या खुन्यांना फासावर लटकवण्यास अनुकूल नाही. याकुबचा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ आहे तसा त्यांचाही आहे. मुंबईतील, गुजरातेतील दंगली ्भडकवणारे, दंगलखोरांच्या पाठीशी उभे राहणारे तर मोकाट आहेत. हजारो लोक ठार झाले. त्या गुन्ह्यांचे गांभिर्य नाही कि काय? मुद्दलात बाबरी मशीद पाडल्यानंतर हे सुडसत्र सुरु झाले तेंव्हा मुळ घटनेतील आरोपींचे काय? कि ते राजकीय नेते अथवा त्यांना राजकीय संरक्षण आहे म्हणून ते मोकाट आहेत? 

एकाला फाशीची शिक्षा न्याययंत्रणेने दिलेली आहे. त्याला बचावाची संधी शेवटपर्यंत दिली आहे. कायद्याच्या सर्व कसोट्या, डावपेच वापरुन झाल्यानंतरही याकुबचा गुन्हा दयायोग्य नाही म्हणून त्याला फाशी दिले गेले आहे. न्याययंत्रणेने आपले आपल्या देशाच्या घटना व कायद्यांचे कसोशीने पालन केले आहे. वाद त्याबद्दल नाही. नसावाही. पण फाशीला मागील घटनाक्रमामुळे धार्मिक रंग येणे अपरिहार्य होते. आणि ते तसे झालेलेही आहे. एकाला शिक्षा मग दुस-याला का नाही हा कायदेशिर प्रक्रियेचा भाग आहे हे मान्य केले तरी ज्यांना फाशीची शिक्षा होऊन प्रक्रियेचे अंतिम टोक गाठले आहे अशा बेअंतसिंग आणि राजीव गांधींच्या खुन्यांच्या शिक्षेची अंमलबजावणी होत नाही तर त्याचा अर्थ आपली राजकीय व न्यायव्यवस्थाही पुरेशी सक्षम नाही असा अर्थ निघत असेल तर चूक कोणाची? न्यायालये ही स्वायत्त संस्था असेल तर तीत राजकीय हस्तक्षेप का असावा? म्हणजे आपली लोकशाही अजून प्रगल्भ झालेली नाही असेच नाही काय? अजून ज्यांना शिक्षाच ठोठावली गेलेली नाही अशा साध्वी प्रज्ञासिंग वगैरेंबाबत विधान करणे गैरच आहे. पण तेही खटले वेगाने चालवले जावेत याबद्दल आपले (सरकारचे) नेमके काय धोरण आहे?

खरे म्हणजे कसलेही धोरण नसणे हेच आपले धोरण आहे. ज्या वेळीस राजकीय दृष्ट्या योग्य व फायद्याचे वाटेल ते आपले धोरण असते हा आजवरचा अनुभव आहे. याकुबच्या फाशीमुळे मुस्लिम समुदायांना पुन्हा एकदा असुरक्षित वाटू लागण्याची शक्यता आहे. तिचा फायदा पाकिस्तान अथवा आयसिससारख्या कृरकर्मा संघटना येथील काही स्थानिकांना हाती धरुन दहशतवादी कारवाया करण्याचा वा तसा प्रयत्न करण्याचा धोका आहेच. सरकारला त्याची जाण नाही असे नाही. पण यातुन भारतीय समाजांचे धृवीकरण होत ओवेसी ते हिंदुत्ववादी पक्षांचे काही फायदे झाले तरी अंतत: नुकसान एकुणातील समाजाचेच होणार आहे. १९९२ नंतर हजारो लोक दंगली ते दहशतवादी घटनांत ठार झालेत. सर्वांच्याच मनावरील, या ना त्या कारणाने झालेल्या जखमा अजून ओल्या आहेत. आपला समाज प्रगल्भ नाही हे याकूबनिमित्ताने उसळलेल्या उन्मादातुन दिसून आले आहे. एका फाशीसाठी लोक एवढे उन्मादी होतात, बेभान होतात आणि त्याचा एक इव्हेंट बनवतात ही बाब चिंतेची आहे. कायदासुडाचे तत्व वापरतो कि नाही, फाशीची शिक्षा असावी कि नसावी यावर आपण वेगळी चर्चा करु. (माझ्या मते भारतातुन फाशीची शिक्षा रद्द व्हायला हवी.) पण येथे हे लक्षात घेतले पाहिजे कि कोणालाही मारण्याची कायदा शिक्षा देतो तेंव्हा त्याकडे उन्माद-आनंद अथवा दु:खाने किंवा सुडाची पुर्ती झाली या भावनेने नव्हे तर पुरेशा गांभिर्याने पहायला शिकले पाहिजे. किंबहुना तीच संस्कृती व सामाजिक जाणीवांची प्रगल्भता आहे. उन्मादी व सुडाच्या पुर्ततेची भावना, जो फासावर लटकतो त्याने केलेल्या कृत्याच्या वेळीसच्या, उन्मादी सुडी भावनांपेक्षा वेगळ्या नसतात. थोडक्यात आपणही छुपे, अक्रिय पण मानसिकतेने हिंसक बनलेलो असतो. 

हिंदुत्ववादी लोकांना जसे शिकावे लागेल तसेच धर्मांध मुस्लिमांनाही. यामुळे आपण एकुणातील समाजाचेच विभाजनी करत द्विराष्ट्रसिद्धांताची पुन्हा पायाभरणी तर कर नाही आहोत ना हे पहावे लागेल. गंभीरपणे चिंतन करावे लागेल. खरे तर ओवेसींनी मुस्लिमांना राजकीय आकांक्षा देण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यात लोकशाहीत काहीएक वावगे नाही. पण त्यामागील हेतु पहायला हवेत. दुसरे ओवेसी जी भाषा वापरतात ती नुसती निंद्य नव्हे तर सुडसत्राला चेतवणारी आहे. त्यांना तसेच साक्षी महाराज व त्यांच्या हिंदुत्ववादी पंथातील जे उग्रवादी लोक आहेत त्यांना जेलमद्ध्ये डांबा ही मागणी करणे अधिक योग्य राहील. हे भडकावू लोक स्फोटकांपेक्षाही विघातक आहेत याबाबत शंका बाळगण्याचे कारण नाही. 

याकूबची फाशी हे एका माणसाला कायद्याने दिलेले मरण असेल. कायदा सर्वांचाच असतो. तो अस्तित्वात आहे तोवर त्यातील तरतुदी अमान्य करता येत नाहीत. त्यात सुधारणांचे प्रयत्न मात्र करता येतात. फाशीची शिक्षा असावी कि नसावी यावर तेवढेच व्यापक चर्चा करावी लागेल. त्याही पुढे जाऊन ज्यांना फाशीच्या शिक्षा ठोठावल्या गेल्यात त्यांची अंमलबजावणी का झाली नाही हेही चिंतन करावे लागेल. सरकार आणि न्यायव्यवस्था यातील सीमारेषा नि:संदिग्ध बनवावी लागेल आणि राजकीय कारणांनी शिक्षा अंमलात आनने किंवा टाळणे हे प्रकार घडता कामा नयेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दहशतवादाचे गुन्हे ज्यंच्याही विरुद्ध आहेत त्यांचे खटले वेगाने चालवणे. त्या वेळीस जोही काही कायदा असेल त्याप्रमाणे अधिकाधिक शिक्षा दिली गेली पाहिजे.

याकूबबाबत उन्माद करण्याचे काही कारण नाही कि कोणी खेदही करण्याचे कारण नाही. खेद वाटलाच तर आपल्याला आपल्याच मनोवृत्तींचा वाटला पाहिजे. 

-संजय सोनवणी

(चपराकमध्ये प्रसिद्ध झालेला लेख!)

जनानखान्यांचे अद्भुत विश्व!

  जनानखाना, ज्याला अंत:पूर, राणीवसा किंवा हरम असेही म्हटले जाते त्याबाबत समाजामध्ये अनेक समजुती प्रचलित आहेत. शत्रूच्या जिंकलेल्या स्त्रीय...