Saturday, December 10, 2016

...जहां पे कोई भी बुरा न था!


Image result for qaiser khalid


"शउरे अस्त्र" हा कैसर खालिद यांचा कविता संग्रह. काव्यात उर्दुचे स्थान अत्यंत उंच दर्जाचे राहिले आहे. अमीर खुस्रो, मीर साहेब, मिर्झा गालीब ते मुनव्वर राणा यासारख्या शायरांनी/कवींनी मानवी जीवनाचे अद्भूत तत्वज्ञान आपल्या काव्यातून प्रकट केले. यामद्ध्ये युवा पिढीतील खालिद साहेबांच्या शायरीने अभिमानाने मिरवावे एवढी उंची गाठलेली आहे.


उर्दू शायरीच्या प्रेमात पडला नाही असा कोणी क्वचित असेल. इतके कि कोणत्याही भाषेतला वक्ता असो, बोलतांना तो एखादा उर्दू शेर सुनावणार नाही असे सहसा होत नाही. हीच उर्दु शायरीची जनमानसातील स्थानाची पावती अहे. हिंदी चित्रपटांतील उर्दू अथवा उर्दूमिश्रीत हिंदी गीतांनी ब-याचशा उर्दू शब्दाचे अर्थही भिन्नभाषकांना माहित असतात. त्यामुळे उर्दू शायरी समजावुन घेण्याला एवढी जड जात नाही. कैसर खालिदांच्या या संग्रहाच वैशिष्ट्य म्हणजे कठीण उर्दू शब्दांचे अर्थही तळटीपांत दिल्याने वाचकांचे काम सोपे होते. लयही समजते आणि अर्थपुर्णताही होते.


मानवी मनाचा अथांग शोध घेणे हे तत्वज्ञ कवीचे प्रधान वैशिष्ट्य असते. त्याच वेळीस प्रेम, मानवी संबंध, सामाजिक जाणीवा यांच्याशीचेही नितळ नाते अशाच तलगर्भी कवीचे असते. खालिद यांच्या शाय-या अशाच निरंतर शोधात निघालेल्या मनाचे दर्शन घडवतात हे या संग्रहाचे वैशिष्ट्य आहे.


मानवी जीवनाची शोकांतिका अभिव्यक्त करतांना शायर म्हणतो-


"कौन फिर वक्त के मारों को बचाने निकले
जब मसीहा ही यहां खून बहाने निकले"


"न मिल सकी कहीं घर से सिवा हमें वहशत
पलट के इसीलिये कदमों को घर ही जाना था"


"सबकी अपनी-अपनी दुनिया, हर इक अपने हाल में मस्त
लाशें हर सू ख्वाहिशे-दिल की बिखरी थी दफनाता कौन"


शायर मानवी मनाची स्पंदने टिपतो. कधी व्याकूळ होतो कधी घायाळ होतो. जगातील दांभिकतेचे डंख सतावतात तेंव्हा शायर म्हणतो-


"जब झूठ की रंगीनी सच्चाई को डस बैठी

तब हमने उसूल अपने ए यार बदल डाले"


या निराशांतही एक प्रचंड आशावाद आहे. किंबहुना आशा जीवनाची मात्रएक प्रेरणा आहे जी माणसाला पुढे जायला उद्युक्त करते. हा अजरामर आशावाद खालिद यांच्या शायरीतून तेजाने झळकतो. ते एका शायरीत म्हणतात-


"फिर बहा ले गई इक लहर नई, ख्वाबों को
फिर से हम ताजा घरोंदों को बनाने निकले"


सामाजिक जाणीवा जीवंत असणे प्रत्येक साहित्यिकाचे प्रधान लक्षण आहे असे मानले जाते. खालिद त्याला अपवाद नाहीत. अनेक कवितांतून त्यांची सामाजिक जाणीव अत्यंत काव्यात्मकतेने प्रकट होत राहते. एके ठिकाणी ते म्हणतात-


"और क्या होना था तहजीबों के टकराव से
कुछ लकीरें लिए नक्शे पे सियासत आई"


"आती है क्या कही से कोई भी नवीदे-सुबह
पढिए तो जख्म छपते हैं अखबार में बहुत"


शायर, इश्क आणि शायरी यातील नाते सर्व वाचक जाणतातच. खालिदांसारखा युवा शायर यात मागे कसा राहेल? त्यांचे नजाकत पहा-


"हिज्रो-विसाल तेरा, हुस्नो जमाल तेरा
है ’मीर’ की गजल सा ये खुद्दो खाल तेरा"


आणि याच शायरीत शायर म्हणतो-


"तू आफताबे-आलम बनकर यहां चमकता

होता अगर कहीं दिल भी विशाल तेरा"

तत्वज्ञ-कवी होणे सोपे नाही. खालिदांच्या शायरीत ठिकठिकाणी तत्वज्ञानाची पखरण झालेली पहायला मिळते.


"फिर लौटना है सबको उसी इक मकाम पर
हां उस जगह जहां पे कोई भी बुरा न था"


आणि


"यूं भी देता है पता होने का अपने कोई
कल जो अफलाक पे था आज छुपा खाक में है"


केवळ शायरीबरोबरची ही सफर नसते तर शायराच्या अंतस्थ हृदयात दडलेल्या कोलाहलाशी हितगूज असते. ती करायला "शउरे अस्त्र" वाचायला हवे. हा कवितासंग्रह सान्निध्य बुक्स (दिल्ली) यांनी प्रकाशित केला असून मूल्य रू. २२५/- आहे. महाराष्ट्राच्या  उर्दू अकादमीने त्यांना या कवितासंग्रहासाठी सन्मानित केले आहे. "दश्ते-जां" हाही संग्रह प्रकाशित झाला आहे. अनेक मुशायरेही त्यांनी गाजवले आहेत. यु ट्युबवर तुम्ही त्यांना पाहू व ऐकुही शकता.


मी कैसर खालिद यांना भविष्यातील वाटचालीसाठी मन:पुर्वक शुभेच्छा देतो!


No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...