Sunday, December 4, 2016

राजन्य-क्षत्रीय व शूद्र : एका भ्रमाची कथा!


पुरातन भारताचा इतिहास लिहितांना विद्वानांनी, मग ते देशी असोत कि पाश्चात्य, अनेक चुकीच्या दृष्टीकोनामुळे अनेक चुका करुन ठेवल्या आहेत. पहिली महत्वाची चूक ही आहे कि त्यांनी अनेक आजची सामाजिक/धार्मिक व सांस्कृतिक गृहितके गतकाळावर लादली. मुळात आजची गृहितके मुळात निर्माणच का झाली यावर त्यांनी विचार केला नाही. त्यामुळे अनेक वास्तवे सामोरी असतांनाही मान्य गृहितकांनाच त्रिकालाबाधित सत्य मानल्यामुळे जेही काही विश्लेशन केले गेले, मांडण्या केल्या गेल्या, त्यातून भ्रम जोपासणे अथवा चुकीचे सिद्धांत मांडण्यापलीकडे काही साध्य झाले नाही व समाजालाही त्याचा विशेष उपयोग झाला नाही. वैदिक मांडणीला विरोध करणा-या विद्वानांनीही वैदिक चष्म्यातुनच गतकालाकडे पाहिल्याने त्यांचे तथाकथित क्रांतीकारक सिद्धांतही फोल ठरले व द्वेषाखेरीज समाजाच्या हाती काही लागले नाही. मुळात वैदिक विद्वानांचीही गफलत होऊ शकते अथवा वास्तव माहित असुनही काही कारणांमुळे ते उघड न करण्याच्या प्रवृत्तीमुळे अथवा स्वभ्रमित गृहितकांवरच अविवेकी श्रद्धा ठेवल्यामुळे सत्यदर्शन तुरळकच राहिले. ज्ञानाच्या सीमा विस्तारुनही या वृत्तीमुळे आपले ज्ञान हे परंपरागतच राहिले.

येथे आपल्याला आपल्या समाज मुळाचच आधी विचार केला पाहिजे. पुरुषसूक्त हे विषमतावादी वर्णव्यवस्थेचे जन्मदाते आहे असे सारेच विद्वान मानत आले  आहेत. सर्व विचारधारांनी या गृहितकाच्याच आधारावर आपली व्यूहरचना ठरवली आहे. खरे तर सर्वच विद्वानांना हे माहित आहे कि पुरुषसुक्तात क्षत्रीय हा शब्द येतच नसून राजन्य हा शब्द येतो. म्हणजे, वर्णरचना उतरंडीची आहे हे मान्य केले तर राजन्य हा दुस-या क्रमांकावर आहे. किंबहुना क्षत्रीय शब्दाला ऋग्वेदप्रणित (व नंतरच्याही मध्य-वैदिक साहित्यात) वर्णरचनेत स्थानच नाही आणि हे प्रत्येक विद्वानाला माहित आहे व होते.

शूद्र हे कोणा एका समाजाचे नांव नसून या नांवाची टोळी पश्चिमोत्तर भारतात, उत्तर सिंध प्रांतात, पार इसपू चवथ्या शतकापर्यंत तरी अस्तित्वात होती हेही सर्व विद्वानांना माहित होते व आहे. शूद्र टोळीसहित असंख्य वेगवेगळ्या नांवांच्या टोळ्या भारतभर पसरल्या होत्या हेही त्यांना माहित आहे. असे असुनही "शूद्र" या संकल्पनेचे स्पष्टीकरण करतांना या वास्तवाचा विचार केला गेला नाही ही एक वस्तुस्थिती आहे. 

ऋग्वेदात दहाव्या मंडलातील ९०वे सुक्त सोडता व त्यातही ऋचा क्र. १२ सोडता मुळात शूद्र शब्द संपुर्ण ऋग्वेदात कोठेही येत नाही. जर शूद्र नामक एक समाज होता, चवथा वर्ण अथवा एक समाजहिस्सा होता तर या समाजाशी वैदिक लोकांची पुर्वी कधीच भेट झाली कशी नव्हती? ऋग्वेदात दास-दस्यू,-पणी-पख्त-पर्शू इत्यादि समाज व टोळ्यांची नांवे मुबलक वेळेस येतात, कारण त्यांना ते लोक माहित होते. काहींशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते तर काहींशी शत्रुत्वाचे. दास-दस्युंशी तर वैरच होते. असे असतांना यापैकी एकाही टोळीचा अथवा समाजाचा उल्लेख न येता शूद्र या अपरिचित टोळीचे नांव पुरुषसुक्तात कसे येते यावर पुर्वीच विचार व्हायला हवा होता.

गृहित असे धरले गेले कि आक्रमक आर्यांनी येथील लोकांना पराजित केले व या हरलेल्या लोकांना शूद्र असे नांव दिले व चवथ्या वर्णात सामावून घेतले. एकोणिसाव्या शतकात हा सिद्धांत त्यावेळच्या उपलब्ध अल्पज्ञानामुळे हा सिद्धांत पचनी पडणेही सोपे होते. पण तरीही समांतर साहित्य, महाभारत जरी पाहिले असते तर त्यातही शूद्र टोळीचा अन्य टोळ्यांसमवेत स्वतंत्र उल्लेख केला गेलेला आहे, तो का, हा प्रश्न पडायला हवा होता. नंतर आर्य आक्रमण सिद्धांत बाद झाला कारण त्याला पुष्टी देणारा एकही पुरावा समोर आला नाही. पण वैदिक धर्म भारतात आला हे तर वास्तव होते. मग ही घटना कशी घडली असावी यावर पुरेसे पुरावे उत्खनित व वैदिक साहित्याने दिलेले असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. तीच बाब राजन्य या तथाकथित दुस-या वर्णाबाबत घडली. राजन्य जाऊन क्षत्रीय कसे उगवले असावेत यावरही विचार करण्याची गरज विद्वानांना भासली नाही. 

पुरुषसुक्तातील ती ऋचा अशी आहे-
ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः ।
ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत ॥१२॥

आधी आपण राजन्य या वर्गाचा विचार करू. (वर्ण म्हणनेही तसे धाडसी ठरेल कारण ऋग्वेदात, विशेषत: या सुक्तात वर्ण हा शब्द येत नाही.) पण आपण आधी राजन्य या वर्गाचा विचार करू कारण वदिक साहित्यातून स्मुतींतून राजन्य हा शब्द क्रमश: गायब होऊन त्याची जागा क्षत्रीयाने घेतलेली दिसते. असे का झाले यावर दिले जाणारे ढोबळ व अतार्किक उत्तर म्हणजे राजन्य व क्षत्रीय हे दोन्ही शब्द समानार्थी आहेत. पण खरे काय आहे हे आपण पाहुयात.

ऋग्वेद व अथर्ववेदात राजन्य ही संज्ञा राजकुळातील, म्हणजे राजाचे सगे-संबंधी (मग राजा आजी असेल वा माजी) यांना लावली गेली आहे. ऐतरेय ब्राह्मणात देवयज्ञात राजन्याने क्षत्रीयाला भाग घेण्यासाठी विनंती करावी असे म्हटले आहे. ब्राह्मण साहित्यात राजन्य व क्षत्रीयांत संघर्ष असल्याचे सुचन अनेक ठिकाणी केले गेलेले आहे. ऐतरेय ब्राह्मणापर्यंतच्या कालापर्यंत तरी राजन्य अस्तित्वात होते. (ऐ. ब्रा. १.५.२) कौशितकी उपनिषदही राजन्य व क्षत्रीयात फरक करते. ऋग्वेदात ९ वेळा क्षत्र हा शब्द येतो तर राजन्य अनेकदा. तेथेही दोन्ही एकच असल्याचे कसलेही सूचन नाही. शतपथ ब्राह्मणातही राजपूत्र, राजन्य व क्षत्रपुत्र हे शब्द येतात. येथेही राजन्य व क्षत्रीय वेगळे असल्याचे दाखवले आहे. 

राजन हा शब्द गणराज्य अथवा टोळी नायकाला वापरला जात होता. राजन हा निवडला गेलेला असे अथवा वंशपरंपरागत. त्याचे जे निकटचे संबंधी होते त्यांना राजन्य ही उपाधी होती व नवा राजन हा राजन्यांतुनच निवडला जात असे. पुरुषसुक्ताने केवळ या आणि याच वर्गाला समाजव्यवस्थेत दुसरे अथवा समांतर स्थान दिले आहे. क्षत्र अथवा क्षत्रीयाला नाही. 

क्षत्र या शब्दाचे अनेक अर्थ लावण्यात आले आहेत. क्षत्र म्हणजे शक्ती, जो दुस-यांना क्षती पोहोचवतो तो क्षत्र असा अर्थ जवळपास सर्वमान्य आहे. हा एक प्रकारे ऋग्वेदकालीन सरंजामदारांचा वर्ग होता. विश (खेडी व त्यातील राहणारे शेतकरी/पशुपालक) त्यांनी आपल्या अधीन केलेली असत व संरक्षणाच्या, विस्ताराच्या मोबदल्यात ते राजातर्फे करही गोळा करत. पण त्यांची संख्या अत्यल्प अशी होती. असे असले तरी वैदिक समाजात राजन्य व क्षत्र (क्षत्रीय शब्दही अपवादानेच ऋग्वेदात येतो.) हे दोन स्वतंत्र वर्ग होते हे वास्तव आहे. मनुस्मृतीत राजन्य व क्षत्रीय शब्द आलटुन पालटून येतात पण जेथे जेथे राजन्य शब्द येतो तेथे विवक्षित आज्ञा दिसतात ज्या क्षत्रीय शब्द येतो तेंव्हा वेगळ्या आहेत. पण मनुस्मृतीतील पुरुषसुक्तात राजन्याऐवजी क्षत्रीय शब्द वापरला गेला आहे. वेदप्रामाण्याची वासलात मनुस्मृतीच कशी लावते हेही येथे पाहण्यासारखे आहे. तरीही मनुस्मृतीतही राजन्य हा वेगळा गट असल्याचे दिसते.

मग प्रश्न असा पडेल कि असे असुनही पुरुषसुक्त फक्त राजन्यांचाच उल्लेख करते, क्षत्रीयाचा का नाही? नंतरच्या कालात क्षत्रीय शब्दाला मोठे वलय मिळाले असले तरी मुळात वैदिक वर्णव्यवस्थेत हा वर्गच सामील नाही. राजन्य हा वर्ग नंतरच्या काळात संपला असला तरी राजन्य शब्दाला हटवून क्षत्रीय शब्द तेथे टाकला गेला नाही. किंबहुना क्षत्रीय हा वर्णच नाही. असला तर राजन्य आहे. मग यामागे नेमकी काय कारणे आहेत हे शोधल्याखेरीज राजन्य व अस्तित्वात नसलेले शूद्रांचे बनवण्यात आलेले कोडे उलगडणार नाही. 

यासाठी प्रथम वैदिक धर्माचा प्रवास समजावून घ्यायला हवा. 

सर्व आर्य आक्रमणवादी/स्थलांतरवादी विद्वान हे मान्य करतात कि वैदिक आर्य हे अफगाणिस्तानातुन विविध टोळ्यांनी भारतात उतरले. आर्य आक्रमण अथवा स्थलांतर सिद्धांत फोल असला तरी ऋग्वेदाची रचना ही अफगाणिस्तानात झाली हे ऋग्वेदात येणा-या भुगोलातून व टोळ्यांच्या नांवांवरून स्पष्ट दिसते. वैदिक लोकांचे पारशी धर्माशी असलेले संघर्षही त्यात विस्ताराने नोंदले गेलेले आहेत. असे असले तरी दोन्ही धर्मात विरुद्धार्थाने साम्यही खूप आहे. पारशी धर्मातही यज्ञच मुख्य आहे, पण तो अहिंसक आहे. अवेस्त्यात जे देव आहेत ते ऋग्वेदात दुष्ट अर्थाने, पण समान नांवाने,  अवतरतात तर अवेस्त्यात जे दुष्ट आहेत ते वैदिक साहित्यात देव म्हणून येतात. अवेस्त्याचा भुगोल हा उत्तर अफगाणिस्तान (जुना बल्ख्स, आता ब्यक्ट्रिया) हा आहे तर ऋग्वेदाचा भुगोल हा दक्षीण अफगाणिस्तान असून हेल्मंड (संस्कृत (सेतुमंत) नदीचे खोरे हा आहे. वैदिक सरस्वती नदी "हरस्वैती" या नांवाने आजही तेथेच वाहते आहे. (पर्शियन भाषेत स चा ह होतो.) या नदीच्याच परिसरात बव्हंशी वेद रचला गेला. दक्षीण अफगाणिस्तानचे नांव आताआतापर्यंत (ग्रीक रेकोर्डनुसार) "अरियाना" होते. धर्म-विभेदामुळे त्या प्रांतात राहणा-या व सीमाभागातील तुराणी (तुर्वश), पख्तून (पख्त), बलोची (भलानस), इत्यादि समाजांशी त्यांचे कधी वैर तर कधी अजून दुस-या शत्रुशी लढायची वेळ आली तर सख्य हा प्रकार ऋग्वेदात अनेकदा येतो. या नांवाच्या टोळ्या आजही अस्तित्वात आहेत. याचा अर्थ एवढाच कि या धर्माचा विकास हा दक्षीण अफगाणिस्तानात झाला. या धर्मियांचे विशेष्त: झरथुष्ट्राच्या धर्माशी वैर होतेच पण सोबतच यज्ञ न करणा-या, इंद्राला देवता न मानणा-या दास, दस्यू, पणी, पुरू अशा अन्य समाजांशीही वाद होते. दाशराज्ञ युद्ध यातुनच लढले गेले. 

हा धर्म भारतात कसा आला याची पुराकथा शतपथ ब्राह्मणाने जतन करुन ठेवलेली आहे ती अशी-

"सरस्वतीकाठी राहणा-या विदेघ माथवाने गौतम राहुगण या आपला पुरोहित व अग्नीसोबत पुर्वेकडे वाटचाल सुरु केली. उत्तरगिरीला (हिंदूकुश) पार करत नद्या कोरड्या करत व अरण्ये जाळत ते सदानीरा नामक नदीपर्यंत आले. विदेघ माथवाने अग्नीला विचारले कि आम्ही कोठे निवास करू तेंव्हा अग्नीने सांगितले कि या नदीच्या पुर्वेला निवास कर. तिथे नापीक, दलदल असलेल्या जमीनी होत्या. तेथे विदेघ माथवाने अग्नी स्थापन केला." (श.ब्रा. १.४.१, १४-१७).

वैदिक शैलीत लिहिल्या गेलेल्या या पुराकथेवरून विदेघ माथव नांवाचा कोणी एक राजा अथवा राजन्य आपल्या पुरोहित व अल्प-स्वल्प अनुयायांसह भारतात आला. त्याला त्याचा प्रदेश का सोडावा लागला याचे उल्लेख नसले तरी तशी राजकीय व धार्मिक परिस्थिती बनल्याने विदेघाला आपला प्रदेश सोडावा लागला हे उघड आहे. पारशी धर्माचे अनुयायीही मुस्लिमांचे अत्याचार वाढल्यानंतर भारतातच आश्रयार्थ आले होते. त्यापुर्वी ही वेळ पारशी लोकांमुळे वैदिकांवर आली होती असे दिसते. 

सदानीरा नदी म्हणजे नेपाळमधून वाहत येत गंगेला मिळनारी गंडकी नदी होय असे काही विद्वान मानतात. पण महाभारतातील कथांनुसार सदानीरा नदी  गंडकी नसून गंडकी व शरयुमधुन वाहनारी कोणतीतरी अज्ञात नदी असावी असे दिसते. अमरकोशानुसार तर सदानीरा नदी हे बंगालमधील वाहणा-या कर्तोया नदीचेच एक नांव आहे असे दिसते. खरे तर या नांवाची  एकही नदी नाही. सदानीरा म्हणजे "पाण्याने सदैव भरलेली नदी" व हे नांव कोणत्याही बारमाही नदीला लागू पडू शकते. वरील पुराकथेनुसार हा भाग दलदलीचा व नापीक होता असेही दिसते. 

आर्य आक्रमणवाद्यांनी कुरु प्रांतातुन पुर्वेकडे वैदिक धर्म पसरवायला निघालेल्या आक्रमकांशी या कथेचा संबंध जोडला. पण कुरु प्रांत वेदांत येत नाही तर उत्तरकालीन ब्राह्मण ग्रंथांत येतो.  शिवाय हे आर्यांचे "विजयी आक्रमण" असते तर त्यांना ओसाड, दलदलीच्या भागात वसती करावी लागली नसती. प्रत्यक्षात गंगेचे खोरेही हजारो वर्षांपासून मानवी वसत्यांनी गजबजलेले असल्याचे असंख्य पुरातत्वीय पुरावे उपलब्ध आहेत. ते जेते असते तर निर्मनुष्य ठिकाणी वसती करायचे काही कारण नव्हते. शिवाय सरस्वती नदी भारतातीलच असे चुकीचे गृहितक घेतले गेले. भारतात सरस्वती होती तर ती कोणती याचे समाधानकारक उत्तर आजही विद्वान देवू शकलेले नाहीत. अफगाणिस्तानात मात्र ही नदी होती व आजही आहे. 

थोडक्यात काही वैदिक धर्मीय तत्कालीक परिस्थितीमुळे अफगाणिस्तानातील सरस्वती नदीचे खोरे सोडून, हिंदुकुश ओलांडत पश्चिमोत्तर भागात आले व स्थानिकांशी संघर्ष टाळण्यासाठी त्यांनी स्वत:ला गैरसोयीची पण इतरांना त्रासही होणार नाही अशी जागा निवडली. तेथे वाहणा-या नदीचे स्थानिक नांव माहित नसल्याने तिला "सदानीरा" असे नांव दिले. त्यामुळे अशा नांवाची नदी सापडत नाही. तेथे वस्ती करून त्यांनी जेवढे स्मरणात आहे तेवढे वेदवाड्मय शिस्तबद्ध रितीने मांडत त्यात भरही घातली. दहावे मंदल, विशेष्त: पुरुषसूक्त ही येथे आल्यानंतरची रचना आहे हे विद्वानांना मान्य आहे. उदाहरणार्थ म्यक्समुल्लर म्हणतो, "या सुक्तात प्रथमच ग्रीष्म, वसंत, व अन्य ऋतू अवतरतात जे इराणमद्ध्ये नाहीत व ऋग्वेदातही उल्लेखले गेलेले नाहीत. या सुक्ताची भाषाही अर्वाचीन आहे." (‘A History of Ancient Sanskrit Literature’, by F. Max Muller, Pub.: Williams and Norgate, , 1859, p. 557) थोदक्यात ऋग्वेदाचे संपादन व दहाव्या मंदलाचे बरेचसे लेखन हे भारतात आल्यावर झाले आहे.

पण नेमके कोठे व याच सुक्तात सर्वप्रथम शूद्र हा शब्द एक समाजघटक म्हणून का येतो या प्रश्नाचे उत्तर आपल्या समोरच आहे.
शूद्र नांवाची एक टोळी पश्चिमोत्तर भारतात, उत्तर सिंध प्रांतात रहात होती याबाबतचे अनेक पुरावे सुदैवाने उपलब्ध आहेत. अलेक्झांडरचा इतिहासकार डायोडोरस हा अलेक्झांडरच्या भारतावरील स्वारीच्या काळात त्याच्या सोबत होता. त्याने सिंध प्रांतातील सोद्राइंशी झालेल्या युद्धाचे व अलेक्झांडरने त्या प्रांतात एका नदीच्या काठी वसवलेल्या अलेक्झांड्रिया नगरीचे वर्णन करून ठेवले आहे. . (The Invasion of India by Alexander the Great-As described by Arrian, Q Curtius, Diodoros, Plutarch and Justin, edited by J. W. Mcrindle, page 354) सोद्राई हे नांव शूद्र शब्दाचा ग्रीक अपभ्रंश आहे हे सर्व विद्वान मानतात. अलेक्झांदरचे आक्रमण इसपू चवथ्या शतकात झाले हे सर्वविदित आहे त्यामुळे तोपर्यंत तरी ही जमात त्या भुभागात अस्तित्वात होती. इतिहासकार राम सरण शर्माही या विधानाला दुजोरा देतात व म्हणतात, "शुद्र एक टोळी (जमात) म्हणून इसपू चवथ्या शतकात होती याबाबत शंका नाही."  (Sudras in Ancient India: A Social History of the Lower Order Down to Circa A.D. 600 by RS Sharma).
महाभारतात शूद्र टोळीचे नांव अभिरांसोबत तर वारंवार घेतले आहे. युधिष्ठिराच्या राज्यारोहण समारंभापुर्वी उत्तरेकडे दिग्विजयासाठी गेलेल्या नकुलाला शूद्र टोळी प्रमुखाने नजराने दिले. भारत युद्धात शूद्र जमात अभिरांसह दुरोधनाच्या बाजुने लढली. इतिहासकार ग्यानचंद चौहान म्हणतात कि अभिरांसोबतच शूद्र टोळीचे इतके उल्लेख मिळतात कि महाभारत काळापर्यंत सिंध प्रांतात ही टोळी अत्यंत भरभराटीला आलेली होती असे स्पष्ट दिसते. ( (Some Aspects of Early Indian Society, by Gian Chand Chauhan, page 54) 

यावरून एक गोष्ट स्पष्ट होते व ती म्हणजे शुद्र हे सिंध प्रांतातील एका जमातीचे नांव होते. त्या प्रांतातच अनेक अन्यत्र अनेक स्वतंत्र नांव असलेल्या अभिर, शिबीसारख्या अनेक जमाती होत्या. प्रत्येक जमात अथवा गण स्वतंत्र नांवाने आपापल्या भुभागात भारतभर सुखनैव जगत होता.   

सिंध प्रांत हा अफगाणिस्तानाला सर्वात जवळ असल्याने भारतात आश्रयार्थ निघालेल्या वैदिक लोकांची भेट त्यांच्याशी झाली असणे अत्यंत स्वाभाविक आहे. त्याच भागातील एका सदानीरा असे नांव दिलेल्या निर्मनुष्य जमीनीवर त्यांनी रहायला सुरुवात केली. आधी माहित असलेले दास-दस्यू वगैरे पन्नासएक समाज मागे सुटलेले होते. शुद्रांनी (शूद्र जमातीच्या लोकांनी) वैदिकांनी आपल्या भागात रहायला हरकत घेतलेली दिसत नाही याचे एकच कारण संभवते व ते म्हणजे वैदिक संख्येने कमी होते व ते भांडखोर जमातींपासून दुरच राहू इच्छित होते, त्यामुळेच त्यांचा प्रवास अरण्यांतुन होत दलदलीच्या प्रदेशात स्थाईक होण्यात झाला. शूद्र जमात आधी त्यांच्या माहितीतच नसल्याने त्यांचे नांव अफगाणिस्तानात रचलेल्या ऋग्वेदात येण्याचा प्रश्नच नव्हता.  आणि ज्या जमाती माहित होत्या त्या मागे सुटल्याने शूद्र जमातीशिवाय शांततामय जगण्यासाठी पर्यायही नव्हता.शिवाय त्यांना पुर्व व दक्षीणेकडील भुगोलही माहित नसल्याने अथवा त्यांच्याशी संबंधही न आल्याने हा सर्व भाग शूद्रांचाच आहे असे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे.

आता आपण पुन्हा आपल्या मुळ प्रश्नाकडे वळुयात. राजन्य आणि शूद्र पुरुषसुक्तात का अवतरतात हे आपण पाहुयात.
१. शुद्रांच्या राज्यात त्यांना आपली पहिली वसाहत बनवावी लागली. येथे असतांना ते सर्वस्वी शुद्रांच्या सहकार्यावर अवलंबून होते. त्यांना अन्य प्रदेश व तेथील जमाती अद्याप माहित झालेल्या नव्हत्या. येथेच त्यांनी ऋग्वेदाची संगतवार पुनर्रचना करत नवीन भागही जोडला व अन्य वेदांचेही लेखन पुर्ण केले. किमान पाच-सहा पिढ्या त्यांना या भागात काढाव्या लागल्या.

२. पुरुषसूक्त हे वैदिक धर्मात वर्णव्यवस्था दृढ करण्यासाठी लिहिले गेले नाही. उत्तरकालात त्याचा गैरवापर वैदिकांनी केला असला तरी मुलचा तो उद्देश दिसत नाही. मुळात वर्ण हा शब्दच या सुक्तात अवतरत नाही. हे सुक्त भारतात आल्यानंतरचे आरंभकाळातील सुक्त आहे. हे संपुर्ण सुक्तही एकाच काळात रचले गेलेले नाही हेही स्पष्ट आहे. असे का हे पुढे स्पष्ट होईल.

३. या सुक्तात राजन्य हा शब्द अवतरतो. याचे कारण स्पष्टपणे हे आहे कि भारतात आलेल्या विदेघ माथव व त्याच्या निकतवर्तीय संबंधींची संख्या कर्मठ वैदिक ब्राह्मणाखालोखाल मोठी होती. अनेक वैश्यही त्यांच्या सोबत आलेले असावेत. संख्या राजन्यांची मोठी असल्याने त्यांची गणना या सुक्तात होणे स्वाभाविक होते. क्षत्रीयांचे नांव घेण्याचे काही कारणच नव्हते. कोणताही समाज नव्या ठिकाणी कायम राहण्याच्या इच्छेने येतो तेंव्हा त्यांच्यात अंतर्गत पुनर्रचना होते हा जागतिक अनुभव आहे. जुन्या चालीरिती नवीन प्रदेशात सोडाव्या लागतात तर नवीन धराव्या लागतात. वैदिक साहित्यात, प्रसंगी ऋग्वेदाशी विसंगत बाबी नंतरच्या वैदिक साहित्यात येतात याचे कारण हेच आहे. वैदिक धर्मात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र या रचनाबदलातुनच दिसून येते.

४. या सुक्तात शुद्रांना चवथे स्थान आहे अथवा सर्वात शेवटी नोंदवला गेला आहे ते अवमानार्थ नाही. आधी वैदिक धर्मियांची नोंद करणे स्वाभाविक आहे त्यामुळे त्यांची नोंद आधी आहे, एवढेच. एकुणातच त्यांना वर्तमानात ज्ञात असलेला व अन्य भुगोल व समाजाचे अज्ञान अथवा संपर्क नसल्याने व ज्यांच्या प्रदेशात आपण राहतो आहोत, सहकार्य घेत आहोत त्या समाजाची त्यांनी वैश्विक समाजात नोंद करणे स्वाभाविक आहे. ते भिन्न आनुवांशिकेचे, धर्माचे, राज्यव्यवस्थेचे आहेत याची जानही त्यांना होती व तीही पुरुषसूक्त व्यक्त करते. पुन्हा आपण त्या ऋचेकडे जावूयात.

ब्राह्मणोऽस्य मुखमासीद् बाहू राजन्यः कृतः
ऊरू तदस्य यद्वैश्यः पद्भ्यां शूद्रो अजायत 

विराट पुरुषाचे मुख हे ब्राह्मण झाले, बाहु हे क्षत्रीय झाले, मांड्या या वैश्य झाल्या तर शूद्र हे पायापासून जन्माला आले. येथे पाय हे शूद्र झालेले नाहीत. कारण ते त्या विराट पुरुषाच्या शरीराचे हिस्सेच नाहीत ही जाणीव त्यांना होती. त्यांची नोंद शेवटी केली गेली याचेही हेच कारण आहे. ज्या यज्ञात विराट पुरुषाचा बळी दिला तो उभा नव्हे तर आडवा. त्यामुळे शुद्रांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन परके, वैधर्मी, पण महत्वाचे असा दिसतो. ते वैदिक समाजव्यवस्थेचे भाग नाहीत ही जाणीव असल्याने  पाय हे शूद्र बनले नाहीत. त्यांची उत्पत्ती स्वतंत्र आहे हे त्यांना माहित आहे. अन्य जमाती भारतात असुनही त्यांचे नांव येत नाही कारण ते त्यांना माहितच नव्हते. किंबहुना अन्यत्र सर्व शुद्रच राहतात व शुद्रच राजे आहेत हा समज त्यांचा अगदी मनुस्मृतीच्या आरंभकाळापर्यंत होता हे मनुस्मृतीवरुनच स्पष्ट दिसते. 

५. वरील विधानाला यजुर्वेदातील “शूद्रार्यावसृज्येताम”  (यजुर्वेद १४/३०) हे विधान बळ देते. "शूद्र व आर्य यांना निर्माण करण्यात आले." याचा अर्थच असा होतो कि आर्य (म्हणजे वैदिक धर्मीय) व शूद्र यांची निर्मिती स्वतंत्रपणे झाली, हे दोन्ही वेगळे आहेत. येथेही अन्य जमातींचे नांव येत नाही कारण या ऋचेची रचना शुद्रांच्याच राज्यात झालेली आहे.

६. शुद्र जमातीच्या राज्यात वसाहती करून रहात असतांना त्यांना शेती, पशुपालनादि व्यवसाय चरितार्थासाठी करणे भाग होते. हे व्यवसाय करतांना मदतनीस म्हणून कर्मचा-यांची गरज भासने   स्वाभाविकच होते. आता कोण त्यांच्याकडे सेवक म्हणून राबनार? गरजू लोकांची समाजात कमतरता नसते. किंवा अधिक वेतनावर काम मिळनार असेल तर लोक सध्याचे उपजिविकेचे  साधन सोडून देतात. तसेच त्यांना जे सेववर्गातील लोक मिळाले ते स्वाभाविकच शूद्र जमातीतीलच गरजू लोक असनार. असा सेवकवर्ग वैदिक वसाहतींच्या जवळच स्वतंत्र वसाहतीत राहणार हे ओघाने आले. या काळात सेवकवर्गात नसलेल्या शुद्र राजासाठी अथवा शूद्र धनिकांसाठीही यज्ञ केले जात हेही महाभारत व मनुस्मृती नोंदवते. हे यज्ञ कृतज्ञतेपोटी अथवा दानदक्षीणेच्या प्राप्तीसाठी होत असत.

७. पुढे वेदांची पुनर्रचना, यज्ञविधींची मांडणी झाल्यानंतर वैदिकांनी शिष्य तयार करत काहींनी धर्मप्रचारार्थ पुर्वेकडे प्रस्थान ठेवले. यासाठे त्यांना पाच-सहा पिढ्या वाट पहावी लागले असणे संभवनीय आहे. वैदिक धर्मीयांना राजाश्रय देणारे पहिले राज्य कुरु होय असे ’द ऋग्वेदा’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ग्रिफिथ म्हणतो व महाभारतातील एकंदरीत इतिहासावरुनही हीच बाब स्पष्ट होते. अद्यापही वैदिकांना बिहार व त्यापारची राज्ये व विंध्याच्या दक्षीणेला असलेले प्रदेश व तेथील जमाती माहित नव्हत्या. ऐतरेय ब्राह्मण दक्षीणेकडे पौंड्र, औंड्रादि पन्नास शूद्र राजे राज्य करतात असे ऐकीव माहितीवरून म्हटले आहे. शूद्र म्हणजे अन्यधर्मीय जमाती अशी त्यांची भावना शुद्र टोळीच्या सहवासात दिर्घकाल राहिल्याने झाली असल्यास नवल नाही. शूद्र हे अन्य धर्मियांसाठी एक प्रकारे संबोधन बनले. कारण नंतरच्या काळात (महाभारत काळापर्यंत) भारतात शूद्रच नव्हे तर वेगवेगळी नांवे असलेल्या असंख्य जमाती राहतात हे त्यांना समजले होते.

८.  नंतरच्या काळात कुरु राज्य हे त्यांचे धर्मप्रसाराचे प्रमुख केंद्र बनले. असे असले तरी कुरू राजांनी मात्र वैदिक धर्म स्विकारलेला दिसत नाही हे महाभारतावरून दिसून येते. पुरुरवा हा यज्ञविरोधी तर होताच पण त्याने अनेक यज्ञांचा नाश केला होता ही पुराकथा येथे लक्षात घ्यायला हवी. म्हणजेच राजाश्रय सर्वच कुरू वंशातील राजांनी चालू ठेवला असे दिसत नाही. नहुषाच्या काळात स्थानीय धर्म व वैदिक धर्मात संघर्ष उडाल्याचेही दिसते. 

९. या काळात वैदिक धर्मात भर पडली ती धर्मांतरांमुळे. कुरु नंतर पांचाल, मत्स्य, शुरसेन हे प्रांत व तेथील राजांनी या धर्माला उदार आश्रय दिला. याच्व्ह कालात राजन्य हे संबोधन क्रमश: गळत गेले कारण मुळ राजन्य आपले अस्तित्व कालौघात हरवत गेले. त्याजागी क्षत्रीय शब्दाभोवती वलय निर्माण करत येथील स्थानिक धर्मांतरीत राजांना व लढवैय्या समाजांना हे बिरुद बहाल केले गेले. तसेच वैश्यांचेही झाले. सामान्य शेतकरी व अन्य व्यावसायिकांना धर्मांतराचे काही कारणच नसल्याने फक्त धनाढ्य व्यापारी समाजांसाठी हे संबोधन राखून ठेवण्यात आले. हे संबोधन धर्मांतरितांनाच नव्हे तर वैदिक धर्माबाबत धर्मांतर केले नसले तरी त्याबाबत सहानुभुती असलेल्या, दान-दक्षीणा देणा-यांनाही स्वत:हून लावण्यात आले. त्यामुळेच पणींबाबत ऋग्वेदात द्वेषाचे भावना असुनही नंतरच्या काळात बुबू नामक धनाढ्य पणीसाठी यज्ञ करुन त्याची स्तुती करणा-या ऋचा रचण्यात आल्या. म्हणजेच राजन्य हा समाजवर्ग उरला नाही तर वैश्यांची व्याख्याच बदलली गेली. 

१०. विंध्याच्या दक्षीणेला हा धर्म बिहारमार्गे प्रचारित झाला तो सर्वात उशीरा. या काळात वैदिक धर्माला भरभराटीचे दिवस पहायला मिळाले. या काळात ब्राह्मण वर्णात जाऊ इच्छिणा-यांची संख्या अधिक होती. हा वर्ग आधीच्या स्थानिक धर्मातील पुरोहित वर्गच होता. राजाश्रय मिळेल त्या धर्माकडे कल असणे स्वाभाविक म्हणता येईल. जी. एस. घुर्ये हे प्रख्यात समाजेतिहासकारही ख-या खोट्या मार्गाने का होईना पण प्रतिष्ठा आणि अन्य लाभाच्या आशेने अनेक लोक पार आठव्या शतकापर्यंत या वर्णात जात होते असे आपल्या Caste and Race in India या ग्रंथात नमूद करतात. 

११. राजन्य हे संबोधन जाऊन क्षत्रीय जरी आले असले व त्याला दुसरा वर्ण म्हणायचे प्रथा असली तरी ते कधीच वास्तव नव्हते. थोडक्यात या वर्णाला वैदिक अधिष्ठानच नाही व नव्हते. नंतर हाही वर्ण वैश्यांप्रमाणेच बाद केला गेला हे वैदिक इतिहासच सांगतो हे वास्तव येथे लक्षात घेतले पाहिजे. थोडक्यात हा वर्ण चलनात नव्हता व हा वर्ण घेतल्याने व्यावहारिक फायदेही नव्हते. 

१२. धर्मप्रसार करायला बाहेर पडलेल्या व त्या त्या प्रदेशात स्वतंत्र वसाहती करुन राहणा-या वैदिकांना जशी पुर्वी सेवकवर्गाची गर होती तशीच पुढेही राहिली. प्रथेप्रमाणे या सेवकवर्गाला, मग ते कोणत्याही जमातीचे असोत, शूद्र हा शब्द सवयीने सर्रास वापरला गेला. अशा सेवकांच्या वसाहती वैदिक गांवांशेजारीच असल्याने वैदिक स्री-पुरुष व तथाकथित शूद्र सेवक स्त्री-पुरुष यांच्यात अनैतिक संबंध व संततीही वाढल्याने अशा सेवकवर्गावर अनेक बंधने लादली गेली. पण त्यांचा काही उपयोग झाला नाही असे वि.का. राजवाडे राधामाधवविलासचंपुच्या प्रस्तावनेत म्हणतात. स्मृतींना अभिप्रेत असनारे शूद्र हे शूद्र टोळीचेही लोक नव्हते कि शूद्र नामक कोणत्या चवथ्या वर्णाशी संबंधितही लोक नव्हते पण सेवकवर्गासाठी वापरले गेलेले ते एक संबोधन होते. हे असेच आहे हे खुद्द मनुस्मृतीही सिद्ध करते. "शुद्रांच्या राज्यात निवास करू नये." अशी आज्ञाच मनू देतो.  मनुस्मृतीच शुद्रांवर एवढी बंधने लागु करत असतांना त्याच वेळीस शुद्र राजे कसे होऊ शकतील हा प्रश्न विद्वानांना पडला नाही. पाणिनीनुसार दोन प्रकारचे शूद्र होते, अनिर्वसित शूद्र आणि निर्वसित शूद्र. निर्वसित शूद्र म्हणजे जे आर्यांच्या (वैदिकांच्या) सेवेत नसलेले, स्वतंत्र धर्म व जीवनयापन करणारे व अनिर्वसित शूद्र म्हणजे आर्यांच्या सेवेत असणारे. यावरून हे स्पष्ट होईल कि मनुचे नियम हे अनिर्वसित शुद्रांबाबत होते, बाहेरच्या समाजाबाबत लागू नव्हते. म्हणूनच तथाकथित शूद्र नुसते राजे बनत नसत तर व्यापार/कृषी इत्यादि मार्गांनी धनाढ्यही होत असत. इतिहासात पाहिले तर नंद साम्राज्यानंतर अपवाद वगलता सर्वत्रच शूद्र राजे दिसतात तसेच व्यापारी ते शेतकरी व अन्य निर्माणकर्ते समाजघटकही दिसतात. शुद्रांसाठी यज्ञ करुन दक्षीणा घेणा-या ब्राह्मणला श्राद्धात त्याज्ज्य मानावे अशीही आज्ञा मनु देतो. याचाच अर्थ असा कि शुद्रही वाटले तर यज्ञ करुन घेत, पण ते सेवकवर्गापैकी शूद्र नव्हेत हे उघड आहे. 

१३. इतर टोळ्यांची नांवे माहित होण्यापुर्वी शूद्र टोळीनंतर वैदिकांचा परिचय झाला तो व्रात्यांशी. व्रात्यांच्या प्रदेशातही वैदिक बराच काळ राहिले असावेत असे दिसते. व्रात्य हे टोळीचे नांव नव्हे. हा पूर्व पंजाबमधील अनेक टोळ्या मिळून बनलेला समाज होता. यांच्याबाबतही वैदिक साहित्यात सुरुवातीला अत्यंत चांगले मत आढळून येते. असे असले तरी धर्म-भेदामुळे वैदिक जसे कुरू प्रांतात शिरले तेथे त्यांनी व्रात्यांची निंदा सुरु केली. शूद्र एका टोळीचे नांव असुनही हा शब्द जसा वैदिकेतर समाजासाठी सर्रास वापरला तसाच व्रात्य शब्दही हीनार्थीने संस्कारहीन वैदिकांनाही वापरला जाऊ लागला. व्रात्य स्वत:ला काय म्हणत होते हे मात्र नेमके सांगता येणार नाही. अर्थात यावर आपण पुढे चर्चा करणारच आहोत व व्रात्य म्हणवला जाणारा समाज नेमका काय व कसा होता हे समजावून घेणार आहोत. येथे लक्षात घ्यायची गोष्ट एवढीच कि व्रात्य म्हटलेला समाज हा सिंधच्या पुर्वेस रहात होता व वैदिक व्रात्यांबाबत अवलंबून होते तोवर चांगले व अवलंबित्व संपल्यावर त्यांच्या जीवनशैलीचे निंदक बनले. 

१४. शूद्र हा शब्द मुळात सिंधमधील एका टोळीचे नांव होते हे आपण पाहिलेच. भुगोलाच्या व अन्य समाजांची नांवे माहित नसल्याने तेही शूद्रच संबोधले गेले. फक्त व्रात्यांचा अपवाद. पण हे समाजनाम अथवा टोळीनाम नव्हते. (इंडियाच्या शोधात असलेल्या युरोपियनांनी इंडोनेशिया, इंडीज असे देश ते रेड इंडियन समाज अशी नांवे ते इंडियन नसतांनाही केवळ अज्ञानामुळे वापरली व ती कायमही झाली हे जसे घडले तसेच येथेही घडले. हिंदुस्तान हे नांच सिंधु नदीच्या खो-यातील लोकांसाठी आधी वापरले जात होते ते पुढे संपुर्ण देशाचे नांव कसे बनले हेही आपण पाहिले आहे.)  म्हणजे ती शूद्र टोळी वगलता देशात शूद्र म्हनवणारा कोणताही समाजघटक अस्तित्वात नसतांना हे नांव अवैदिक धर्मसमाजांसाठी सर्रास वापरले गेले असे आपण पाहू शकतो. असे असले तरी वैदिक ज्यांना शूद्र म्हणत होते ते प्रत्यक्षात मात्र आपापल्या टोळीनांवांनी अथवा व्यवसाय नामांनीच स्वत:ची ओळख देत राहिले. हा सिलसिला पार अकराव्या शतकापर्यंत चालू राहिलयाचे आपल्याला दिसते. त्यांनी स्वत:ची ओळख शूद्र म्हणून ठेवली नाही कारण ते शुद्र जमातीचे लोकच नव्हते. वैदिकांच्या दृष्टीने मात्र जे वैदिक नाहीत ते शुद्र ही मुळातील संकल्पना होती ती कायम राहिली. 

१५.. क्षत्रीय शब्द हा पुराप्राकृत भाषांना नवा नव्हता. ऋग्वेदाच्या समकालीन अवेस्तात "क्षत्रैय्या" (सम्राट) व "क्षत्र" (प्रदेश) हे शब्द विपुलपणे येतात तसेच राजन्यही. (उदा. पहा झामयाद यष्ट-८८-९०). हाच शब्द क्षत्रप या रुपात शकांनी (सिथियनांनी) अगदी भारतात आल्यानंतरही वापरणे चालुच ठेवले. उत्तर भारतातील प्राकृत भाषाही याच भाषाकुळाशी/प्रवृत्तीशी संबंधित असल्याने येथे हाच शब्द खत्री, खतीय या रुपाने अस्तित्वात होताच. त्याचा संबंध शेतीमालक/जमीनदारांशी संबंधित असल्याने वैदिक क्षत्रीय शब्द व खतियांत नंतर गोंधळ होणे अथवा ते समानार्थी वाटणे स्वाभाविक आहे. राजन्य शब्दाऐवजी ऋग्वेदात केवळ ९ वेळा येणारा क्षत्र हा शब्द क्षत्रीय करणे वैदिकांना सोपे गेले असले तरी क्षत्रीय हा मुळात वर्णच नाही याचे भान आलेले अजुनही दिसत नाही. उलट त्याचे स्तोम एवढे आहे को जो तो उठतो व स्वत:ची जात क्षत्रीय वंशीय आहे असे म्हणत रहातो. इतिहास मात्र त्याला साथ देत नाही. उलट सोमवंशीय अथवा सुर्यवंशीय राजघराणी वैदिक अर्थाने क्षत्रीय मुळाची कधीच नव्हती हे वास्तव आहे व त्यासाठी भरपूर पुरावे उपलब्ध आहेत. 

१६. क्षत्रीय व ब्राह्मणांत नंतरच्या काळात जे संघर्ष झालेत ते सर्व धर्मांतरितांतील आपापसातील संघर्ष आहेत. नवधर्मांतरीत क्षत्रीयांना ब्राह्मणांना वरचे स्थान देणे जड जात होते. बृहदारण्यकोपनिषद हे क्श्ढत्रीय आधी जन्माला आला आणि नंतर ब्राह्मण असे सांगते तर गौतम बुद्धही वर्णव्यवस्थेत खतियाचे स्थान सर्वात वरचे ठेवतो. थोदक्यात बुद्ध काळापर्यंत आदवी समाजरचना उभी बनल्याचे दिसते. असे असले तरी मुलात क्षत्रीय हा वर्णच नाही हेही भान सुटलेले दिसते. कौशितकी उपनिषद मात्र राजन्य व क्षत्रीय वेगळे आहेत असे स्पष्ट सांगते. 

म्हणजेच मुळात जे अस्तित्वात नाही त्याचे स्तोम माजवत, गोंधळ निर्माण करत अथवा बुद्धीभेद करत व करवून घेत स्वभ्रमांत भारतीय समाज अडकत जात नसलेल्या भेदभावांच्या गर्तेत कसा कोसळत गेला याचे हे एक विदारक चित्र आहे. विद्वानांनी वैदिक धर्माचा प्रवास कसा झाला व भारतात तो कसा पसरत गेला हा आलेख जरी नीट पाहिला असता तर गोंधळ सुटत एक स्वच्छ समाजचित्र समोर आले असते. मुळात हिंदू (अथवा आगमिक) धर्म व वैदिक धर्म वेगळे व दोहो धर्मांची व समाजव्यवस्थेची मुलतत्वे वेगळी हे माहित असुनही सोयिस्करपणे लक्षात घेतले न गेल्याने भारतीय समाजाची अक्षम्य हानी झाली आहे. क्षत्रियत्वाचे स्तोम जसे अकारण आहे तसेच शूद्र हा वैदिकांनी गुलाम केलेला अन्यायग्रस्त समाज हा भ्रमही अज्ञानदर्शक आहे. इतिहास त्याला साक्ष देत नाही हेच काय ते वास्तव आहे.

8 comments:

  1. लेख मोठा व उपयुक्त, पण काही मुद्दे खटकणारे,
    १) इतरत्र आपण म्हणता कि भारतीय लोक इतिहासलेखन योग्य करीत नाहीत व नव्हते, व परदेशी इतिहासकार लेखन अगदी योग्य करत होते, आता ह्या लेखात दोघेही लेखन योग्य करीत नाहीत म्हणून दोघानाही फाट्यावर मारले आहे.. ह्या लेखात परदेशी लेखकांनी काय झोल केले ते लिहायला हवे.
    २) पुरुश्सुक्ताचा वर दिलेली रुचा सोडता मागचा आणि पुढचा भाग पहिला असता ते एका स्वताच्या टोळीच्या ३ वर्गासाठी व दुसर्या शुद्र टोळीच्या वर्गासाठी लिहिले गेले असावे हे अतार्किक वाटते. अगदी आदिमानवाच्या काळात जेव्हा माणूस पशुसारखा राहत होता, संघटन करण्याची भाषा व विचार नव्हते तेव्हा त्याच्या अशा टोळ्या शिकारीसाठी एकत्र येत असू शकतात, पण वैदिक शब्दांचे व्यापक अर्थ विचारात घेता रुग्वैदिक काळात माणूस इतका अप्रगल्भ नव्हता हे दिसते. नक्कीच टोळ्या अशा पृथक जीवन जगात नव्हत्या. एकाच पुरुषाच्या शरीरातून जन्मालाला आलेले ४ वर्ग असे पृथक कसे काय असू शकतात? पुरुष सूक्ताच्या मूळ अर्थाबाबत गोंधळ झालेला दिसतो.
    ३) क्षत्रिय शब्द जर अवेस्त्यात आहे तर तो वैदिकांच्या पूर्वीच्या पिढीचा शब्द आहे, कारण आधी अवेस्त्यान व वैदिक एकत्र होते. ऋग्वेदात क्षत्रिय शब्द नाही म्हणजे ते नव्हतेच, किवा नंतर आले निर्माण झाले. कुणाची तरी भलामण करण्यासाठी निर्माण केले गेले हे म्हणणे अतार्किक आहे.
    ४) व्रात्य हा नुसता शब्द नसून व्रात्य क्षत्रिय, ब्राम्हण असे सगळे वैइदिक त्यत अंतर्भूत आहेत, ती एक टोळी होती कि कसे? नियमबाह्य वागणारे वैदिक ह्यांना व्रात्य हि संज्ञा वापरली गेली, ती पंजाबातल्या एका टोळीचे नाव होते का? पूर्वी वर्ण/वर्गवाचक असलेले शुद्र, क्षत्रिय, व्रात्य हे शब्द आता टोळीत कसे परावर्तीत व्हायला लागलेत बुवा? टोळी महत्वाची कि त्याला दिलेले गुणविशेषण महत्वाचे, व्रात्य म्हणजे नियम मोडणारे, टोळीवादावर वर जास्त भर दिसतोय लेखात

    ReplyDelete
  2. आक्षेप क्रमांक २ - ऋग्वेदात दहाव्या मंडलातील ९०वे सुक्त सोडता व त्यातही ऋचा क्र. १२ सोडता मुळात शूद्र शब्द संपुर्ण ऋग्वेदात कोठेही येत नाही. जर शूद्र नामक एक समाज होता, चवथा वर्ण अथवा एक समाजहिस्सा होता तर या समाजाशी वैदिक लोकांची पुर्वी कधीच भेट झाली कशी नव्हती? ऋग्वेदात दास-दस्यू,-पणी-पख्त-पर्शू इत्यादि समाज व टोळ्यांची नांवे मुबलक वेळेस येतात, कारण त्यांना ते लोक माहित होते. काहींशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते तर काहींशी शत्रुत्वाचे. दास-दस्युंशी तर वैरच होते. असे असतांना यापैकी एकाही टोळीचा अथवा समाजाचा उल्लेख न येता शूद्र या अपरिचित टोळीचे नांव पुरुषसुक्तात कसे येते यावर पुर्वीच विचार व्हायला हवा होता.

    उत्तर – वेदांमध्ये म्हणजेच संहिता भागात की ज्यालाच आम्ही केवळ वेद ही संज्ञा देतो, त्यात इतिहास शोधण्याचा बालिश प्रयत्न करणे हे तुमच्यासारख्या स्वयंघोषित संशोधकांचे अजब तर्कट आहे.आपला ठरलेला आर्य-अनार्य, ब्राह्मण-क्षत्रिय-शुद्र असा वर्णभेद पेटवत राहणे आणि आपला कार्यभाग साधाय्साठी वेदांसारख्या ग्रंथांचा आधार घेणे हे तुमच्यासारख्या पाश्चिमात्यांची री ओढणाऱ्या तथाकथित संशोधकांचे नित्याचे कार्य आहे. असो तसेही हे आम्हांस काही नवीन नाही. आता उत्तर देतो !
    वेदांची रचना क्रमाक्रमाने मानणारे तुम्ही इतर वेदांचा संदर्भ हेतुपुरस्सर डोळे झाकून बाजूला ठेवता. त्यातही ऋग्वेदांतल्या दास-दस्यू, पणि-पख्त-परशू सारख्या शब्दांना मानवेतीहासाशी जोडणे हे वेदांचा अर्थ न कळण्याचे स्पष्ट द्योतक आहे.
    दस्यू शब्दाचा अर्थ – ऋग्वेदामध्ये दस्यू शब्दाचा अर्थ आहे
    दस्युं चोरं वृत्रं वा ! ऋग्वेद - १/३३/४
    दस्यु हे चोर किंवा वृत्र आहेत. आता निरुक्तकारांनी वृत्र कुणाला म्हटलेय तर “तत्को वृत्र:, मेघेति निरुक्तः” म्हणजे इथे वृत्र हा मेघ आहे. कुणी मनुष्य किंवा असुर नाही. त्याप्रमाणेच दस्यू हे देखील मेघ आहेत जे समुद्राचे पाणी पळवितात म्हणून त्यांना चोर म्हटले आहे.

    आता आर्य शब्दाचा अर्थ पाहू
    आर्य ईश्वर पुत्रः – निरुक्त ६/२६

    आता दस्यू शब्द निरुक्तात
    दस्युः दस्यतेः क्षयार्थादुपदस्यन्त्यस्मिन्नसा, उपदासयति कर्मणि ! ७/२३
    दस्यु क्षयार्थक दस धातूपासून बनतो, दस्यू मध्ये रस आकर्षिले जातात. तो वैदिक कर्मांचा नाश करतो. म्हणजेच दस्यू हे मेघ आहेत हे सिद्ध होते. कारण मेघांमुळे यज्ञ कसे बरे चालतील???
    पाश्चिमात्य ज्या सायानाचार्यांना प्रमाण मानतात त्यांनी पण दस्यू शब्दाचा अर्थ कुठेही जातीवाचक किंवा वंशवाचक केला नाही. काही पाश्चिमात्य देखील हे प्रामाणिकपणे मान्य करतात जसे की रोथ वगैरे ! अगदी मेक्स म्युलर आणि म्युअर सारखे देखी त्यातून “जातीय’ अर्थ निघू शकत नाहीत हे मान्य करतात. आता विल्यम म्युअर स्वतः त्याच्या ‘अर्यावार्तिक होम” नावाच्या ग्रंथात पृष्ठ क्रमांक २६० वर म्हणतो

    “I have gone over the names of the dasyus or Asuras mentioned in the RigVeda with the view off discovering whether any of them could be regarded as of Non-aryan or indigenous origin, but I have not observed any that appear to be of this charater>’
    अर्थ – ऋग्वेदामध्ये आलेल्या असुर आणि दासू नावांवरून मी ह्या दृष्टीने छाननी केली की त्यापैकी कुणाचा अनार्य किंवा एतद्देशीय मूल कळले जाऊ शकते, परंतु मला ह्या प्रकारचा एकही नाव मिळाले.”

    थोडक्यात पश्चिमात्यही वेदांमधल्या आर्य-अनार्य, दास-दस्यू शब्दांना मानवेतिहासाच्या रुपात किंवा वंशावादाच्या रुपात पाहत नाहीत. पण
    आता संजय सोनवणींना निरुक्त मुद्दामच मान्य करायचे नाही. केले तर आपले हेतू कसे सध्या कसे होणार म्हणून ते कौत्साचे उदाहरण देतात नेहमी.

    ReplyDelete
    Replies
    1. दास समाज आजही अफगाणिस्तानात आहे हे तुम्हाला माहित नसणे स्वाभाविक आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर डा. प्रमोद पाठक वाचा. अवेस्त्यातहे दख्युमा (श्रेष्तम दस्यू) शब्द येतो व तो झरथुस्ट्राचे एक संबोधन आहे हेही तुम्हाला माहित असण्याचे कारण नाही. पर्शू, पख्त इत्यादि टोळ्यांचे उल्लेखही "काल्पनिक" आहेत असे तुम्ही म्हणू शकता पण या जमाती आजही पख्तून, पर्शियन अस्तित्वात आहेत हेही तुम्हाला माहित असण्याचे कारण नाही.

      Delete
  3. आक्षेप क्रमांक ३ - सर्व आर्य आक्रमणवादी/स्थलांतरवादी विद्वान हे मान्य करतात कि वैदिक आर्य हे अफगाणिस्तानातुन विविध टोळ्यांनी भारतात उतरले. आर्य आक्रमण अथवा स्थलांतर सिद्धांत फोल असला तरी ऋग्वेदाची रचना ही अफगाणिस्तानात झाली हे ऋग्वेदात येणा-या भुगोलातून व टोळ्यांच्या नांवांवरून स्पष्ट दिसते


    उत्तर – अर्याक्रमण सिद्धांत थोतांड आहे हे सिद्ध झालेले असूनही सोनवाणींना तो पुन्हा पुन्हा रेटावासा वाटतो ह्यातच सर्व काही आले. वेदांतले आर्य आणि दास-दस्यू शब्दांचे अर्थ मी वर दिलेलेच आहेत. आपला स्वार्थी आणि दुष्ट हेतू उघड आहे हे इथे स्पष्ट होते !
    ऋग्वेदाची रचना ही अफघाणिस्थान येथे झाली हे सोनवणी ह्यांचे वचन तथ्यहीन आहे. कारण ज्या ऋग्वेदांतल्या तथाकथित भौगोलिक प्रदेशाचे ते वर्णन ह्या आपल्या कपोलकल्पित सिद्धांतासाठी करताहेत, त्याच ऋग्वेदांत गांधार, अयोध्या हे शब्द कोण्या भौगोलिक प्रदेशासाठी आले नसून ते कोणत्या अर्थाने आले आहेत हे आपण पाहूयात.
    वेद्शब्देभ्यः एवादौ पृथक संस्थाश्च निर्ममे !
    ह्या मनुवाचनाप्रमाणे वेदांतले शब्द हे आधी असून त्यानंतर पृथ्वीवरच्या भौगोलिक प्रदेशांची किंवा वस्तूंची नावे आली आहेत. कसे ते पाहूयात.

    आता अयोध्या हे नाव अथर्ववेदांमध्ये येते.
    अष्टचक्रा नव द्वारा देवानां पुरयोध्या ! तस्यां हिरण्ययः कोशः स्वर्गो: ज्योतिषावृतः !!
    तस्मिन् हिरण्यये कोशे त्र्यरे त्रिप्रतिष्ठिते ! तस्मिन् यद् यक्षमात्वन्वत् तद्वै ब्रह्मविदो विदुः !!
    अथर्ववेद – १०/२/३१-३२

    अर्थ – आठ चक्र आणि नऊ द्वार असलेली देवपुरी अयोध्या असूण ह्यात हिरण्यकोश आहे जो स्वर्ग ज्योतीने आवृत्त आहे. त्यामध्ये यक्ष हा आत्मा स्थित आहे ज्याला ब्रह्मविद लोक जाणतात !

    थोडक्यात इथली अयोध्या ही शरीररूपी नगरी असून तिचा रामचंद्राच्या अयोध्येशी जसा संबंध नाही, तद्वतच ऋग्वेदामध्ये आलेल्या गांधार, अरब (अर्व), रूम, रुश, अंग, बाल्हिक, मगध आदि शब्दांचा भौगोलिक प्रदेशांशी काहीही संबंध नाही. उलट हे सर्व शब्द नंतरच्या काळात त्यात्या प्रदेशांना आपल्या ऋषीमुनींनी दिली. ह्याचे प्रमाण वर मनुचे ‘वेद शब्देभ्यः” हे दिले आहे मी.

    ऋग्वेदामध्ये “यद्वा रुमे रुशमे” (८/४/२) असे शब्द असून आता ह्यावरून कुणी ऋग्वेदाची रचना रुस आणि रोम मध्ये झाली असा तर्क काढला तर त्याच्या बुद्धीमातेची आम्हांस केवळ कीवच करविसी वाटेल. तद्वतच वेदांत आलेले हे शब्द ह्या अर्थाने आहेत.

    आता मगध शब्दाचा अर्थ अथर्व वेदामाध्येच काय सांगितलाय ते पाहूयात.
    श्रद्धा पुंश्चली मित्रो मागधो विज्ञानम् !५!
    उषाः पुंश्चली मन्त्रो मागधो विज्ञानम् !१३!
    इरा पुंश्चली हंसो मागधो विज्ञानम् !१९!
    विद्युत पुंश्चली स्तयीत्नुर्मागधो विज्ञानम् !२५ !
    इथे पुंश्चली आणि मागध हे शब्द विद्युत ह्या अर्थाने आहेत आणि हे आकाशीय संबंधाने निर्माण होणारे आहेत असा अर्थ सूचित आहे.

    वेदांमध्ये वाल्हीक शब्द येतो जो हिंग ह्या आयुर्वेदिक वनस्पतीसाठी वापरला आहे जी आपण रोज खातो
    भावप्रकाश निघंतू हा आयुर्वेदिक शब्दकोश
    सहस्त्रवेधि जतुकं वाल्हीकं हिङ्गु राठम् ! हरितक्यदि वर्ग – १००
    वेदांमध्ये पंजाब आणि सौराष्ट्राचे वर्णन आहे असा तर्क अविनाश्चंद्र दास ह्यांनी त्यांच्या “रीग्वेदिक इंडिया” नावाच्या ग्रंथाथ काढला पण तोही चूकच आहे. कारण वेदांमध्ये कोणत्याही भौगोलिक प्रदेशाचे वर्णन नसून त्या अर्थाने नंतरच्या काळात त्या त्या प्रदेशांची नवे ठेवली गेली आहेत.
    थोडक्यात काय तर वेदांमध्ये इतिहास नाही.

    ReplyDelete
  4. संजय सोनवणी ह्यांचा वैचारिक लोचा !

    वरच्या लेखात ते आर्य बाहेरून आले असे सांगतात आणि त्यांच्या आधीच्या “ब्राह्मण कोण होते’ ह्या लेखात काय लिहितात ते पाहूयात !
    However there is no proof either in Veda’s or in any ancient so called Aryan scriptures that Aryan ever was a race that migrated to India. Also there are no physical proofs of such invasion.
    Then who were they?
    The word “Arya” appears in Rig Veda 36 times in 34 verses. Whenever this word is used it is addressed to the Clan of Sudasa only. (King Sudasa ruled a small unnamed kingdom that was situated on the banks of river Saraswati and he belonged to Puru clan. He promoted Yajna religion which was originally introduced by Bhrugu clan.) Rests of clans, such as Ikswaku ( In this clan Lord Rama took birth) Yadu (Clan of Lord Krisna), Anu, Bhalanas, Visanin, Matsya, Naga etc. were “Anarya’s” for the Vedic seers.
    To them “Arya” meant Noble Person. Not a race.
    To trace origins of these Vedic people we have ample of proofs available in Rig Veda’s itself.

    Vedics themselves were Das, Dasyu and Asuras!

    May be this statement will sound stunning but it is the only fact.

    Aryan invasion theory (AIT) proposes that Aryans invaded India from north and defeated Das, Dasyu and Asura’s.
    http://sanjaysonawani.blogspot.in/.../%E0%A4%AC%E0%A5%8D...

    ReplyDelete
    Replies
    1. हे तुमचे बाष्कळ विवेचन आहे. वैचारिक लोचा तुमचा झाला आहे. नीट वाचायची सवय नसली कि असे होते. आक्रमण/ वा मोठे स्थलांतर सिद्धांत (बाहेरुन भारतात वा भारतातून बाहेर) मी अमान्य केला आहे हे खरेच आहे. पण तुरळक होणारी स्थलांतरे जगभर झालीत. भारतात मुठभर वैदिक शरणार्थ्यांनी धर्म आणला असे मी म्हतले आहे. बौद्ध भिक्षुकांनी पार ब्यक्ट्रियात (उत्तर अफगाणिस्तान) विहार काढून बौद्ध धर्म पसरवला. त्याला कोंणी स्थलांतर अथवा आक्रमण म्हणत नाही. वैदिकांची थापेबाजी हाच मोठा चिंतेचा विषय आहे.

      Delete
  5. Very interesting article !Keep it up , Sanjayji !!!👍👌

    ReplyDelete
  6. वैदिक संस्कृति हळु हळु उत्कांत होत गेलेली आहे. विवाहाची प्रथा सर्वप्रथम इथेच सुरवात झाली. पत्नीचे महत्व, अग्निहोत्राची प्रथा एकपत्नीत्व, गोत्र याचा इतिहास बघा. सनातन प्रथा व वैदिक प्रथा नियम, हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत या मुळे तत्कालिन समाजसुधारकांनी वैदिक धर्म बनवला.

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...