Tuesday, April 11, 2017

पुण्यश्लोक अहिल्या!

(एकपात्री प्रयोगासाठी)

अवघ्या जीवनानेच जिच्याशी संगर मांडला, जिचे सुखाचे क्षण हाती येतात न येतात हिरावले गेले नि दुर्भाग्याच्या खोल खाईत जिला भिरकावले गेले ती मी अहिल्या. अहिल्याबाई होळकर. जग मला आज पुण्यश्लोक म्हणते. लोकमाता म्हणते. टिपु सुलतान मला "तत्वज्ञ महाराणी" म्हणे. ब्रिटिश मला अठराव्या शतकातील सर्वित्कृष्ठ महिला प्रशासक म्हणत. आज देशातील एक पुरातन मंदिर सापडणार नाही ज्याचा मी जिर्णोद्धार केला नाही. एक नदी नाही जेथे मी घाट बांधले नाहीत. रस्ते किती बांधले...किते दुरुस्त केले हे आता मलाही आठवत नाही.  पांथस्थांसाठी देशभर किती बारवा बांधल्या याची तर गणतीही कधी केली नाही.

माळव्याची महाराणी म्हणून मी माझी कामे माळव्यापुरतीच सीमित ठेवली नाहीत. माझे श्वसूर मल्हारबाबांची राष्ट्रीय दृष्टी नेहमीच माझ्या नसानसांत खेळ्त राहिली. शेकडो शासक राज्य करत होते त्या देशाला अखंड धाग्यात गुंफले ते मी!

इंदोरला...महेश्वरला उद्यमी नगरे म्हणून मी भरभराटीला आणले. प्रजेला सूख होईल असे असंख्य कायदे केले. यात्रेकरुंना लुटणा-यांनाच यात्रेकरुंचे रक्षण करायला लावले. त्यांना पोटापाण्यालाही दिले. माझे नांव निघाले तरी दुष्टही सज्जन बनून जात. रंगेल लावण्या लिहिणारेही भक्तीरसाचे महिमान गाऊ लागावेत असे माझे महिमान. देशात शासक कोणीही असो...अहिल्यादेवींना लोकहिताचे काम करायचे आहे असे म्हटले कि कोणी आडकाठी केली नाही. माझे...थोरल्या सुभेदार मल्हाररावांनी पराक्रमाच्या जोरावर स्थापिलेले राज्य...इंदोर...एक छॊटासा तुकडा...पण माझे राज्य केवळ इंदोरवरच नव्हते. अवघ्या देशावर चालायची माझी आध्यात्मिक आणि नैतिक सत्ता.

होय.

इंग्रजी कवयित्री जोआना बेली म्हणते..."अहिल्या म्हणजे परमेश्वराला पडलेले सुंदर स्वप्न!"

होय. त्रिखंडी किर्ती झाली माझी. माझ्या हयातीत. पण या सा-यांमागे माझ्या काळजात सतत हेलकावणारा यातनांचा धगधगता ज्वालामुखी होता. एकामागुन एक आलेल्या झंजावातांनी मला कोलमडवुन टाकण्याचा चंग बांधला होता जसा. एक गेले कि दुसरे संकट माझ्यावर हिमकड्यांप्रमाणे कोसळायला सज्ज असे.

खराय कि सांबसदाशिवाने  मला कोसळु दिले नाही. कोलमडु दिले नाही. चिरंतन सखा असल्यासारखा तो माझ्या सोबत माझा हात धरून चालत राहिला. लोकांच्या वेदनांच्या कालडोहात  आपली दु:खे विसर्जित करायला सांगत राहिला.

आणि मी जगले ती वेदनांच्या लाटांवर स्वार होत दि:कालाच्या सीमा पार करण्यासाठी. होय...मी जगले ती प्रजेची आई होण्यासाठी! मला स्वत:ला ना पुरतं पुत्रसूख मिळालं...ना कन्यासूख...सारी सुखं येत माझ्या ओंजळीत...पण बुडबुड्यासारखी. काही आनंद मला मिळतो न मिळतो तोच हिरावून घेतले जाण्यासाठी. होय. दु:खाने माझी पाठ न सोडण्याची प्रतिज्ञाच केली होती जशी!

कोण मी? एक सामान्य धनगराची पोर. मराठवाड्यातील चौंडी या दुष्काळी गांवावरील धनगर पाड्याच्या पाटलाची...माणकोजी शिंदेची पोर. निजामाच्या अन्यायी राज्यात भरडल्या गेलेल्या सर्वच नागरिकांत आम्हीही. कसली स्वप्ने पडणार होती आम्हाला? मेंढरं घेऊन रानोमाळ भटकनं हाच ज्यांचा युगानुयुगांचा जगण्यासाठी धंदा त्यांना कोण वाली?

पण एक धनगर उदयाला आला होता. स्वपराक्रमाने बाजीराव पेशव्यांच्या साथीने देशात रणमैदान गाजवत होता. मल्हारी मार्तंडाचा अवतारच जसा...मल्हारराव होळकर! मल्हारराव आमच्यासाठी एक चमत्कार होता. त्याच्या पराक्रमाच्या एवढ्या कथा बनल्या होत्या कि एक महाकाव्यच बनलं असतं. आम्ही लहाणपणी त्याच्या कथा ऐकायचो. हरखून जायचो. होय...धनगर आजही तलवार गाजवू शकतात आणि कळीकाळाला धडकी भरवू शकतात हा विश्वास उरी दाटायचा. मेंढरांच्या कळपावर धाड घालायला आलेल्या लांडग्यांवर त्वेषाने भाला फेकतांना तीच रग अंगी दाटायची. मी आता कोठे नऊ वर्षाची झाली होते. चारचौघांसारखेच आपले आयुष्य जाणार या खंतेत होते. शंभु महादेवावर माझी अपरंपार श्रद्धा. त्याला मी विनवायची...ही अरिष्टे टळावीत म्हणून...त्यासाठी शक्ती दे म्हणून...

आणि महादेव खरोखरच इतक्या लवकर पावेल याची मी कल्पनाही केली नव्हती.

नदीकाठी मी वाळुत रेतीची शिवलिंगे बनवत बसले होते. भर माध्यान्ह. तळपतं उन. पण मला भान नव्हतं. घोड्यांच्या भरधाव टापांचा आवाज कानी पडलाच नाही. एकदम कानाजवळ आवाज आल्यावर पाहिलं...आणि क्षणाचाही विचार न करता शिवलिंगांवर ओणवी झाले. एकाएकी लगाम आवळले गेल्याचे, संतप्त कालव्याचे आणि घोड्यांच्या खिंकाळण्याचे आवाज कानी आले. मी पाहिलं. सैन्याचा एक जथाच तेथे उभा होता. संतापाने लालबुंद झालेला त्यांचा म्होरक्या माझ्यावर ओरडत होता. "चिमुरडे...टापांखाली चिरडुन मेली असतीस तर?"

त्याचा आवाज माझ्या कानांत शिरत नव्हता. मी अजुनही शिवलिंगांवर ओणवीच होते. तशीच मी म्हणाले, "माझ्या शिवाला या नतद्रष्ट घोड्यांनी तु्डवले असते तर? त्यापेक्षा मी मेली असती तरी चालले असते."

त्या म्होरक्याने माझ्या बाजुला पाहिले. रेतीतली शिवलिंगे जणु अवघ्या चराचर सृष्टीला आशिर्वाद देत होती. त्या म्होरक्याच्या राकट चेह-यावर पाहता पाहता समाधानाचे हसू फुलले. त्याने मला नांव-गांव विचारले आणि मग सरळ मला बापाच्या ममतेनं पुढे करुन आमच्या घरीच आला की!

तो म्होरक्या दुसरा तिसरा कोणी नाही तर मल्हारराव होळकर होता!

त्यांची माझी अशी अवचित भेट होईल याची मी कल्पनाही केली नव्हती. माझा माझ्यावरच विश्वासच बसत नव्हता. मल्हारराव होळकर आणि मी त्यांना एवढ्या जवळून पहातेय? छे...स्वप्नच असेल ते. पण होय. ते मल्हाररावच होते. माझे बाबा आणि आईही हरखून गेले होते.

खरा चमत्कार अजून वाट पहात होता. त्यांनी माझा हात त्यांच्या एकुलत्या चिरंजिवांसाठी...खंडेरावांसाठी.. मागितला. बाबा-आईंना स्वर्ग ठेंगणा पडला असेल. झाला. लवकरच माझा खंडेरावाशी विवाह झाला. मी ऋतुमती झाले आणि इंदोरला...माझ्या सासरी रवाना झाले. मातोश्री गौतमाबाईने मला आईची उणीव कधी भासू दिली नाही.

माझे पती खंडेराव! उमदे आणि पराक्रमी. काहीच वर्षांत ते रणमैदानही गाजवू लागले. सुभेदारांनी त्यांच्यावर स्वतंत्र स्वा-याही सोपवल्या. बुंदीचा उमेदसिंगचा राजपाट असो कि जयपुरच्या गादीवर माधवसिंगाची स्थापना....खंडेरावांनी युद्धात वीरश्रीही गाजवली आणि मुत्सद्देगिरीही. चंद्रावतांची रामपु-याची जहागिरी होळकरांना जशी मिळाली तशीच हिंगलाजगडचीही. त्यांचाही पराक्रम होताच तसा! मल्हाररावांच्या पराक्रमाची पताका खंडेराव त्रिखंडात नेईल असे सारे म्हणत. मी आनंदी होते. भाग्यशाली समजत होते स्वत:ला.

पण तसे व्हायचे नव्हते. सुखाचे क्षण अवचित हिरावले जातात तसेच झाले.

दिल्लीला सुरजमल जाट उपद्रव देत होता. मल्हारराव व शिंदे त्यावेळीस दख्खनेत होते. दिल्लीचा जिम्मा खंडेरावांवर होता. जाटाला फिरोजशहा कोटलालाच रोखून मागे ढकलले ते खंडेरावांनी जाटावर आक्रमण करावे आणि त्याचा पुरता बंदोबस्त करावा अशी पातशहाची इच्छा होती. पण पेशवा व मल्हाररावांचा आदेश नव्हता. पातशहा खंडेरावांची विनवणी करत होता...मनधरनी करत होता. पण खंडेरावांनी पातशहाने दिलेली खिल्लतही नाकारली. ते आदेशाचीच वाट पहात होते.

आला. मामंजींचा आदेश आला ..."जाटाचे पारिपत्य करावे..."

झाले. खंडेराव आपली अवघी दोन हजारांची सेना घेऊन जाटाच्या पाठीशी लागले. जाटाचा मुलुख बेचिराख करायला सुरुवात केली. जाटाला कसा प्रतिकार करावा हेच सुचेना. तो घाबरला. खडेराव ऐकत नाही तर त्यानं पुणे दरबाराशी सलुख चालवला. चाळीस लक्ष खंडणी देतो पण खंडेरावांना मागे घ्या असे विनवू लागला. ह्यांची दहशत खाऊन कुंभेरीच्या किल्ल्यात जाउन लपला. खंडेरावांनी कुंभेरीला वेढा घातला. तोवर राघोबादादा, शिंदे आणि मल्हाररावही तेथे येऊन पोहोचले. गड बाका. किल्ल्याच्या आडुन सुरजमल जाटाने हल्ले चालुच ठेवले. खंडेराव किल्ल्याचा एक तरी तट कसा ढासळवता येईल या प्रयत्नांत होते.

त्या दिवशी युद्ध ऐन भरात होते. सुरजमलच्या डोळ्यात खंडेराव सलत होता. तटावरून त्याने निशान साधायला लावले.

साक्षात कळीकाळ यावा तसा तो तोफेचा लोळ खंडेरावावर पडला. माझे सर्वस्व हरपले. मी विधवा झाले.

काय उरलं होतं आता जगात? पतीसोबत सती जावे...स्वर्गी तरी त्यांच्या साथीत जगावे. मी तयारी करायला सांगितले. माझ्या सवतीही तयार होत होत्या. सर्वत्र मरणाच्या विकराळ छाया नाचत होत्या. गौतमाबाई जशा मूक-बधीर बनून गेल्या होत्या. मल्हारराव संतापाने बेभान झाले होते. ते सुरजमल जाटाला म्हणाले, "जाटा...कुंभेरीचा किल्ला उध्वस्त करुन त्यावर मी गाढवाचा नांगर फिरवीन आणि कुंभेरीची माती गंगेत विसर्जित करीन!" तेवढ्यात मी सती जातेय असे कोणीतरी त्यांना सांगुइतले. ते धावत आले,. एवढा करारी महायोद्द्धा पण गलितगात्र झाला होता. त्यांनी मला शुभ्र साडीत पाहिले आणि हंबरडा फोडला..."जाऊ नकोस पोरी...या म्हाता-याला अनाथ करणार आहेस का तु? अगं...आता तुच माझा खंडेराव...नको जाऊस पोरी...नको जाऊस..."

त्यांच्या हंबरड्याने माझं काळीज गलबललं. आलम हिंदुस्तानला "मल्हार आया..." अशी हूल उठली तरी दहशत बसायची. तो महायोद्धा मल्हारराव काळीज फाटेल असा आक्रोश करत होता. चितेकडे अंतिम श्वास घेण्यासाठी निघालेली माझी पावले थबकली. होय. खंडेराव जित्ता होता या अहिल्येच्या रुपात. मल्हारबांना आक्रोशू देण्याचा मला कसलाही अधिकार नव्हता.

मी थांबले. मागे आले. त्यांचे डोळे पुसले.

जगायचा निर्णय घेतला ते पुन्हा पुन्हा मरण्यासाठी.

मल्हाररावांनी नि गौतमाबाईंनी मला राजपाट चालण्यासाठी लागते ते सारे मला शिकवले. मल्हाररावांच्या लष्करी मोहिमांना लागणारी सामग्री पुरवण्याचे काम मी करु लागले. सिरोंच्याचा जागीरदार अडवणुक करत होता तर त्यालाही मी युद्ध करुन वठणीवर आणले. दोहदवर मी हल्ला करून त्याची गढी उध्वस्त केली. मल्हाररावांची सून काय चीज आहे हे मी दाखवून दिलं. मला राज्य चालवता येत होते तशी तलवारही. वेळ पडल्यावर तिचे पाणी दाखवायला मी कचरत नसे.

पानिपत झाले. पराक्रमाची शर्थ गाजवुनही पराजयाचा कलंक लागला. सर्वस्वाचा घात होता तो पराजय. मल्हारराव तरीही मराठेशाहीची गेलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवायला झटत होते. इंग्रजांशीही लढत होते. पण ते आता थकले होते. त्यात गौतमाबाईंचे निधन झाले. माझ्यासाठी तर माझी आईच गेली. मल्हाररावांना एवढे थकलेले आणि निराश मी कधी पाहिले नव्हते. गौतमाबाई गेल्या आणि मागोमाग तेही अनंताच्या प्रवासाला निघून गेले.

माझा मुलगा मालेराव आणि मुलगी मुक्ताबाई. मालेराव मात्र अत्यंत पोरकट आणि क्रुरबुद्धी होता. पण न्यायाप्रमाणे होळकर गादी त्याच्याकडे आली. त्याला वेडाचे झटके येत व त्यात तो अनेकदा क्रौर्याची परिसीमा गाठे. माझे अंत:करण जळत असे. प्रजेवरचा अन्याय पाहवत नसे. खुपदा मला हस्तक्षेप करावा लागे. त्याला दुखवावे लागे. पण इलाज नव्हता. लवकरच तोही आजारी पडला. त्या आजाराने त्याला गिळंकृत केले. मी पुन्हा एकदा रिक्त झाले. शून्य झाले. दुर्भाग्याचे तडाखे उसंत देत नव्हते.

मुक्ताबाईचा मी बालविवाह होऊ दिला नव्हता. बालविवाहाला माझा विरोध होता. पण ती आता वयात आली. पण तिचे रुढीपरंपरेने लग्न करणेही मला मान्य नव्हते. त्यावेळीस मी राजधानी महेश्वरला हलवली होती. राज्यात दरोडेखोरांच्या टोळ्या उपद्रव देत होत्या. मी दरबारात पण ठेवला..."जो तरुण या दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल...त्या तरुणाशी मी माझ्या मुक्तेचा विवाह लावून देईन!"

शास्त्री-पंडितांना रुचणारी गोष्ट नव्हती ही. जातीपातींच्या हीण प्रथांनी कुजलेल्या समाजालाही ते मान्य कसे होणार? पण मी ठाम होते. माझा मनगटावरील पराक्रमावर विश्वास होता. यशवंतराव फणसेने खरेच दरोडेखोरांचा बंदोबस्त केला. मी मुक्ताचा विवाह त्याच्याशी मोठ्या धामधुमीत लावून दिला.

मला वाटले आता तरी सौख्याचे दिवस आले. प्रजेसाठी देशभर काम तर करतच होते...पण व्यक्तिगत आयुष्यात मात्र स्थैर्य येतच नव्हते. कटकारस्थाने थांबत नव्हती. रामपु-याचा जागीरदार बंडाच्या पावित्र्यात होता तर मला स्वत:ला मोहिम काढावी लागली. ठार मारले त्याला मी त्या युद्धात. शांततेची आणि पावित्र्याची प्रतिमा म्हणून विख्यात अहिल्याबाई रणचंडीही होऊ शकते हे जसे मी एकदा राघोबादादालाही दाखवले होते तसेच रामपुरच्या चंद्रावतांनाही दाखवले.

मला लवकरच नातू झाल्ला. नथु. त्याला अंगीखांदी खेळवत वृद्धापकाळाचे दिवस कंठावेत म्हटले...तर अल्पसा ज्वर आल्याचे निमित्त झाले...नथु...नथु गेला.

पाठोपाठ माझा पोटच्या पोरासारखा जावई..यशवंतराव...तोही आजारपणात गेला.

माझे एक एक अवयव छाटत होती माझी नियती.

मुक्ताने सती जायचा निर्णय घेतला.

किती आकांत केला मी. नाही. पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती. अटल होती. ऐकता पोर ऐकत नव्हती. एकाएकी मी निस्त्राण झाले. अलिप्त झाले. निर्विकार झाले. जीवन मला अगदी परके परके वाटू लागले. येथे काहीच खरे नाही. काहीच चिरंतन नाही. सारं काही अळवावरच्या पाण्यासारखे. मी उभारलेली मंदिरे भलेही चिरंतन राहतील...पण वेदना मात्र माझ्या नश्वर देहासोबतच नष्ट होतील. वेदनाही ख-या नाहीत. आनंदही खरा नाही. ते नांवही खरे नाही. ते यशही खरे नाही. मग खरे आहे तरी काय?

कि नुसतेच भ्रम?

माझी मुक्ता माझ्या डोळ्यांसमोर चितेवर चढली. निष्प्राण यशवंतरावाचे मस्तक तिने धीराने मांडीवर घेतले. अलिप्तपणे मी सारे पहात होते. माझ्या डोळ्यांत अश्रुचा एक टिपूस नव्हता. हे सारे जसे काही स्वप्नात घडत आहे अशा अलिप्ततेने मी सारे पहात होते.

आगींनी माझ्या पोटच्या लेकराला वेढले. तिच्या किंचाळ्या माझ्या कानावर पडल्या...आगच ती. शेवट आगीत आणि जगणेही आगीत...

या धगधगत्या ज्वालांत जीवंतपणी सतत जळण्याचे नांव अहिल्याबाई आहे.

हे रस्ते...हे घाट...ह्या सराया...ही मंदिरे...ते उभारुन दिलेले असंख्य व्यवसाय...भरभराटीला आणलेले उद्योग...

प्रजेचं पोटच्या पोरांप्रमाने केलेलं प्रतिपालन...

मलातरी स्वप्नवतच वाटतंय!

तुम्हालाही वाटत असेल!

एक अहिल्या होती...सर्वांची अहिल्या...माणुसकीची अहिल्या....पण तीच अहिल्या खरी होती कि

वेदना, वंचना आणि हताशांच्या दाटून येणा-या भग्न काळोखाच्या सावलीत एकाकी जगत राहिलेली...भोगत राहिलेली अहिल्या खरी होती?

मला नाही माहित! मी ते शोधण्याचा तसा प्रयत्नही केला नाही. माझा सांब सदाशिव आहे. त्यानेच मला तुमच्यासाठी बोट धरून चालवले हेच काय ते खरे! त्यानेच मला अपार वेदना सहन करायची शक्ती दिली हेच काय ते खरे!

अहिल्या जनांची होती आणि जनांसाठीच मेली हेच काय ते सत्य!

3 comments:

  1. विठ्ठल कोळपेApril 11, 2017 at 7:45 PM

    खूप छान सर

    ReplyDelete
  2. खरच खूप छान सर.... मानाचा जय मल्हार

    ReplyDelete
  3. Sonawani Saheb,
    Choundi he gav marathwadya madhe nasun, ahmednagar jilhyatil jamkhed talukyat yete .

    ReplyDelete

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...