Sunday, November 11, 2018

शनिवारवाडा १८१८: पेशवाई बुडाली त्याची गोष्ट

शनिवारवाडा १८१८:  पेशवाई बुडाली त्याची गोष्ट

१० नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : १४ मिनिटं


पेशवाई बुडाली ती १८१८ साली. त्याला यावर्षी बरोबर २०० वर्षं पूर्ण झाली. पण त्याची काहीच चर्चा झाली नाही. तसं पाहायला गेलं तर १८०२ पासूनच पेशवाई बुडायला सुरवात झाली होती. पुढच्या सोळा वर्षांत ती पार बुडाली. हा सोळा वर्षांचा प्रवास आजही महत्त्वाचा आहे.

पेशवाईचा अस्त १८१८ साली झालाअसं साधारणपणे आपण समजतो. या घटनेला यंदा दोनशे वर्ष पूर्ण झाली आहेत. पण पेशवाईचा अस्त म्हणजे कायहे नेमकं समजावून घेण्यासाठी पेशव्यांचा सार्वभौम राजकीय सत्ताधारी म्हणून अंमल नेमका कधीपासून संपलाहे पाहावं लागतं. पेशवाईचा अंतकाळ अत्यंत दुर्दैवी घटनांनी भरलेला आहे. 

दुसऱ्या बाजीरावाला पळपुटा बाजीराव’ अशी पदवी समाजानं कधीच बहाल करून टाकलीय. दुसऱ्या बाजीरावाचा वासनांध, मत्सरीखुनशी आणि तेवढाच भेकड स्वभाव इतिहासात नेहमीच चर्चेत राहिलाय. मराठेशाहीला उत्तुंग नेतृत्वाची गरज होतीनेमक्या त्याच काळात कचखाऊ,नेभळा आणि वासनांध पुरुष पेशवेपदी आल्यामुळं देशाचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं.

नारायणराव पेशवा यांच्या खुनाचा आरोप असलेल्या रघुनाथराव पेशव्यांचा आनंदीबाईपासून झालेला पुत्र म्हणजे दुसरा बाजीराव. सत्ताभिलाषी असलेले रघुनाथराव हे इंग्रजांना मिळाल्यानं पहिलं इंग्रज मराठा युद्ध झालं. दुसऱ्या बाजीरावाचा जन्म झालातो रघुनाथराव आणि आनंदीबाई नजरकैदेत असताना. वयाच्या एकोणिसाव्या वर्षापर्यंत तो नजरकैदेतच वाढला. त्यानंतर त्याची सुटका झाल्यानं तोपर्यंत त्याला कोणतंही औपचारिक शिक्षण मिळालं नाही. तसंच राज्यकारभाराचेही कोणते धडे मिळाले नाही. शिवाय जनतेत त्याची प्रतिमा नेहमीच एका खुन्याचा मुलगा अशी राहिली.

सवाई माधवराव निपुत्रिक. त्यांनी आत्महत्या केल्यानंतर पेशवाईची गादी कोणाकडे जाणार,असा संघर्ष निर्माण झाला. दौलतराव शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मदतीनं दुसऱ्या बाजीरावाला पेशवाईची वस्त्रं मिळाली. पण खरी सत्ता त्याच्या हाती नव्हतीच. तो दौलतराव शिंदेबाळोजी कुंजीर आणि सर्जेराव घाटगे यांच्या हातचं बाहुलं बनून राहिला. या साऱ्या वातावरणात त्याचा विषयांधलोभीमत्सरी आणि खुनशी स्वभाव उसळ्या घेत राहिला. त्याचं दर्शन शक्य तितकं त्यानं घडवलं.

त्याने त्याचे उपकारकर्ते नाना फडणवीस यांना कैदेत टाकलं. पेशव्यांचेच सरदार असलेल्या मल्हारराव होळकरांच्या बेसावध छावणीवर हल्ला करून त्यानं दौलतरावांच्या सैन्याच्या हातून मल्हाररावांचा खून घडवला. हेतू होतातो दौलतराव शिंद्यांच्या घशात होळकरी प्रदेश घालून द्रव्य मिळवण्याचा. या खुनी हल्ल्यातून यशवंतराव आणि विठोजी होळकर कसेबसे सुटले. पण त्यांनी पेशव्यांची सत्ता धुडकावून लावत दौलतराव शिंदेंशी युद्धाचा डाव मांडला. होळकरी प्रांत सोडवण्याचा प्रयत्न सुरू केला.

दुसऱ्या बाजीरावाला दौलतराव शिंदे यांचं वर्चस्व मनोमन मान्य होतंच असं नाही. पण सत्तेसाठी आपल्या विधवा सावत्र आयांशी युद्ध करू शकणारा दौलतराव आपल्याला जुमानेल,अशी शक्यता त्यालाही वाटत नव्हती. त्यामुळं १८०० पासूनच दुसऱ्या बाजीरावानं गुप्तपणे पुण्यातील इंग्रज वकीलाशी सलोख्याचं बोलणं चालू केलं. खरं म्हणजे सत्तेची सूत्रं त्याच्या हातून कधीच निसटलेली होती. तो केवळ नामधारी पेशवा होता. सत्तेची सूत्रं विखुरलेल्या अवस्थेत मराठशाही सरदारांच्या हाती गेली होती. त्यांच्यातही आपसी संघर्ष होतेच. दौलतरावांच्या आहारी गेलेल्या दुसऱ्या बाजीरावाला आपण आपल्याच बुडाला चुड लावत आहोत,याची कल्पना का आली नाहीकिंबहुना तो पाचपोच त्याच्यात नव्हताच.

यशवंतराव होळकरांनी ठेवलेल्या साध्या मागण्या ऐकण्याचंही औदार्य त्यानं दाखवलं नाही. त्याची परिणती अशी झाली कीयशवंतराव होळकरांनी शेवटी ६ जानेवारी १७९९ला राज्याभिषेक करून घेत सार्वभौमता घोषित केली. पेशवाईतील एक बुरुज अशा रीतीनं स्वतंत्र झाला. खुद्द नाना फडणवीस यांनी होळकर बंधूंना साकडं घातलं की बाजीरावाच्या नादानीनं रयतेची रया गेली आहे. दौलतरावांचे पेंढारी सर्वत्र रयतेचीच लूट करत आहेत. त्यामुळं तो बंदोबस्त करायला विठोजी होळकर पेशव्यांच्या प्रांतात उतरले. पण बाजीरावानं विठोजी होळकरांना कपटानं पकडून १६ एप्रिल १८०१ रोजी त्यांची शनिवारवाड्यासमोर हत्तीच्या पायी तुडवून क्रूर हत्या केली. त्याचीच परिणती पुढे हडपसरच्या युद्धात झाली.

२५ ऑक्टोबर १८०२ ला उत्तरेतून मराठ्यांचे प्रांत काबीज करत आलेल्या यशवंतराव होळकर आणि दौलतराव - दुसरा बाजीराव यांच्या फौजांमध्ये हडपसर इथं घनघोर युद्ध झालं. या युद्धात आपली हार होते आहेहे दुसऱ्या बाजीरावाच्या लक्षात येताच त्यानं पळ काढला. डोणजेमार्गे तो आधी रायगडावर आणि नंतर वसई इथं इंग्रजांच्या आश्रयाला निघून गेला. दुसऱ्या बाजीरावाला परत आणण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यावर यशवंतरावांनी साताऱ्याहून दुसऱ्या बाजीरावाचा सावत्रभाऊ अमृतरावासाठी पेशवाईची वस्त्रं आणून दिलीपण अमृतरावाची ती वस्त्रं स्वीकारण्याची हिम्मत झाली नाही. पण तरीही कारभार मात्र अमृतरावाच्याच हाती गेला.

वसईला गेलेल्या दुसऱ्या बाजीरावानं इंग्रजांशी १८०२ ला मांडलिकीचा तह केला. त्या तहानुसार पेशव्यांची सार्वभौमता कागदोपत्रीही राहिली नाही. त्या तहातील अटी होत्या - सहा हजारांची इंग्रजी फौज दुसऱ्या बाजीरावाच्या तैनातीत राहीलइंग्रजांच्या सल्ल्याखेरीज तो कोणताही करारमदार करू शकणार नाहीसव्वीस लाखांपेक्षा अधिक उत्पन्न देणाऱ्या जिल्ह्यांवर इंग्रजांचा अधिकार चालेलकोणाशीही परस्पर युद्ध घोषित करण्याचा अधिकार त्याला राहणार नाही.

थोडक्यात दुसऱ्या बाजीरावानं या तहामुळं आपलं संपूर्ण स्वातंत्र्य गमावलं. त्याची सार्वभौमता गेली. तो केवळ इंग्रजांचा एक मांडलिक उरला. दरम्यान तो पुण्याला येत नाहीहे स्पष्ट झाल्यावर अमृतरावानं यशवंतराव होळकरांशी एक करार केला. या करारानुसार यशवंतरावांनी अमृतरावाला खालीलप्रमाणं मदत करायची होती.
१. रायगडावर कैदेत असलेल्या सवाई माधवरावांच्या पत्नीलायशोदाबाईंना मुक्त करून अमृतरावांचा मुलगा तिला दत्तक घ्यायला लावायचा आणि त्याच्यासाठी पेशवाईची वस्त्रे सातारकर छत्रपतींकडून देववायची.
२. या बालपेशव्याचा प्रतिनिधी म्हणून अमृतरावाने दौलतीचा कारभार पाहायचा.
३. अमृतरावाला यशवंतरावांनी पूर्ण संरक्षण द्यायचं आणि शिंद्यांचा बंदोबस्त करायचा.
या बदल्यात अमृरावानं यशवंतरावांना युद्धखर्च आणि हा वरकड खर्च यासाठी एक कोटी रुपये द्यायचे.

थोडक्यातआता दुसरा बाजीराव हा पेशवा नाही आणि स्वत: पेशवेपदाची वस्त्रंही स्वीकारायची मनोवस्था नाहीया स्थितीत असा मार्ग काढला गेला. दुसऱ्या बाजीरावाची सत्ता जातेययाचा कसलाही खेद पुण्यातून अथवा पेशव्यांचा अंमल असलेल्या प्रदेशातून उमटला नाही. कोणी विरोधही केला नाही. याचाच एक अर्थ असा कीदुसऱ्या बाजीरावाची सद्दी संपली आहेयाची जाणीव जनमानसाला झाली होती. ही स्थिती इंग्रजांच्या लक्षात येताच ते स्वत: दुसऱ्या बाजीरावाला घेऊन पुण्याला यायला निघाले.

हे समजताच अमृतरावानं पुण्यातून पळ काढला आणि जाता-जाता लुटालूट माजवत त्यानं ती लूट हत्तीउंट गाड्यांवर लादून नेलीती पाहता पुण्याचाच नव्हे तर नशिकपंचवटीराहुरी,चाकणवरही त्याने दरोडे टाकले. म्हणजे अमृतरावही काय लायकीचा माणूस होताहे सहज लक्षात येतं. प्रजेशी कोणालाच काही घेणं-देणं उरलेलं नव्हतं. खरंतर ही सुरवात शाहू महाराज गेल्यानंतर नानासाहेब पेशव्यांपासूनच झाली होती. नानासाहेब पेशव्यांनी खुद्द छत्रपतींचा जामदारखाना लुटला होता. रमणेब्राह्मण भोजनं यातच पेशवे स्वतःचा वेळ आणि पैसा घालवत. आपल्यावरील कर्ज निवारण्यासाठी ते पानिपत युद्धाच्या वेळेसही मोहिमा काढण्यासाठी नाना सरदारांच्या मागे लागत.

खऱ्या अर्थानं राज्यविस्तार हा पेशव्यांचा हेतच नव्हता. लोभीपणा आणि खुनशी हाव यांनी पेशव्यांचा कब्जा घेतला होता. दुसऱ्या बाजीरावानं त्यावर विकृत कळस चढवला. तो तर धनिकांना चक्क शनिवारवाड्यात बोलावून त्यांच्याकडून पैसे काढल्याखेरीज सुटका करत नसे. तासन्‌तास उभं करणंकोरड्यांचे फटके देणेत्यांच्या बायकांनाही न सोडणं असले राज्यकर्त्याला न शोभणारे असभ्य प्रकार करत असे. शिवाय त्याचे पेंढारी पेशव्याच्याच प्रांतात मनमुक्त लूट करत हे वेगळंच.

थोडक्यात प्रजेचा अनिवार छळ सुरू होता. व्यवसाय, शेतीकडे लक्ष द्यायला फुरसत नव्हती. त्यात पुण्यात अस्पृश्यांवर अमानवी बंधनं लादली गेली. म्हणजे त्यांनी मध्यान्हीच्या वेळेशिवाय शहरात यायचंच नाही. कारण काय तर त्यांची सावली कोणा ब्राह्मणावर पडली तर विटाळ होईल. शिवाय पाऊलखुणा पुसल्या जाव्यात म्हणून कमरेला झाडूतर थुंकायला गळ्यात मडकं असलंच पाहिजेअसा दंडक. सनातनी कट्टर वैदिकतेचं स्तोम वाढवण्याचं विकृत काम दुसऱ्या बाजीरावानं केलं.

त्याच्या कारकिर्दीत शनिवारवाडा नुसता कटकारस्थानांचं केंद्र बनला नव्हतातर त्याचं रुपांतर कुंटणखान्यात झालं होतं. त्याची विषयलालसा एवढी की सरदारांच्या बायकांनाही तो आपल्या शयनगृहात हरप्रयत्ने आणत असे. सर्जेराव घाटगे आणि बाळोबा कुंजीर त्यांना स्त्रिया मिळवून देण्याचं काम करत घाटग्यांबाबत तर जदुनाथ सरकार म्हणतात, ‘तो निव्वळ बायकांचा दलाल होता!’ यामुळं झालं असं की अनेक सरदार दुसऱ्या बाजीरावासाठी अधिकची लग्ने करत. त्या बायका त्याच्यासाठी राखून ठेवत. काही सरदारांनी पुणेच सोडलं. तर एका सरदाराच्या बाबतीत त्याच्याच बायकोला बाजीरावाकडे पाठवायचा प्रसंग उद्‌भवल्यावर त्यानं आत्महत्या केली.

म्हणजे प्रजेलाच लुटणंआपल्याच सरदारांच्या पत्नी विषय वासनेसाठी वापरणंते आपल्याच लोकांविरुद्ध कटकारस्थानं करणं, यामुळं पेशवाई आधीच लुळी-पांगळी झाली होती. त्याच्यामुळं यशवंतराव होळकरांनी त्याची साथ सोडून स्वतंत्र मार्ग पत्करला. तरीही त्याची खुनशी वृत्ती सुटली नाहीत्यामुळं हडपसरचं युद्ध होऊन यशवंतरावांहातीच पराभव स्वीकारत आपलं सार्वभौमत्व गहाण ठेवावं लागलं.

सार्वभौमता या अर्थानं पाहिलंतर पेशवाईचा अस्त ३१ डिसेंबर १८०२ रोजीच झालाअसं म्हणावं लागतं. १३ मे १८०३ ला इंग्रजांनी पुन्हा गादीवर बसवला गेलातो एक नामधारी पेशवा. अन्य सरदारांचं म्हणावं तर २३ सप्टेंबर १८०३ रोजी असई आणि नंतर आडगांव इथं वेलस्लीनं शिंदे आणि भोसलेंचा निर्णायक पराभव केला. या युद्धातील पराजयामुळं भोसलेंनी १७ डिसेंबर १८०३ ला देवगांव इथं तर शिंदेंनी ३० डिसेंबर १८०३ ला सुर्जी अंजनगांव इथं इंग्रजांशी तह केला. अशा रीतीनं मराठा राजमंडळ इंग्रजांच्या अंकित झालं. स्वत:चे अनेक प्रांत कायमचं गमवावं लागलं आणि संपूर्ण स्वातंत्र्य नष्ट झालं. पण या घटनेला पेशवाईचा अस्त’ म्हटलं जात नाहीते केवळ तांत्रिक कारणांनी.

कारण मांडलिक स्वरूपातही का होईनापेशवा आपल्या पदावर होता. दिल्लीचा बादशहाही अशाच तांत्रिक कारणांनी अजूनही दिल्लीचा शासक होता. खरा पण एकही आदेश तो इंग्रजांच्या सल्ल्याशिवाय काढू शकत नव्हता. भारतीय लोकांना नामधारी असली तरी एतद्देशियच केंद्रीय सत्ता लागतेहे त्यांना माहीत होते. किंबहुना तेही नाणी पाडताना एका बाजुला बादशाही छाप ठेवतच होते. पेशवेही त्याला अपवाद नव्हते. भारतात याला अपवाद होतेते फक्त यशवंतराव होळकर. त्यांनी स्वत:चीच दोन्ही बाजूला आपलीच मुद्रा असलेली स्वतंत्र नाणी पाडण्याचं धोरण सुरू केलं. याचा अर्थ भारतात वास्तव अर्थानं होळकर वगळता एकही सार्वभौम सत्ता उरली नव्हती आणि त्यांचा इंग्रजांशी विजयी संघर्ष सुरुच होता. पण भारतातील अन्य संस्थानं तोवर इंग्रजांचे मांडलिक बनून चुकली होती.

१८०२च्या मांडलिकत्वाच्या तहानंतर दुसरा अध्याय सुरू होतोतो म्हणजे मांडलिकानं मालकांपासून स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नांचा. वसईच्या अवमानकारक तहानं तसंही आता त्याला शांत बसावं लागत होतं. पण मत्सरी स्वभावामुळं त्यानं इंग्रजांच्याच मदतीनं पटवर्धन,रास्तेंसारख्या सरदारांचाही पाडाव करण्याचा व्यूह त्याने रचला. पण एल्फिस्टननं १८१२ साली पंढरपूरच्या तहान्वये पेशव्यांचा तो बेत हाणून पाडला. इतर काही करता येत नाही म्हणून त्याच्याच अखत्यारीत असलेल्या बाबींत त्यानं ढवळाढवळ सुरू केली.

छत्रपती प्रतापसिंहांना अपमानस्पद वागणूक देत राहाणंहे एक प्रकरण. छत्रपतींनाच कैदेत टाकण्याची मजल गाठणारा पेशवाअशी दु:ष्कीर्ती त्यानं प्राप्त केली. छत्रपतींच्या कागाळ्यांकडे आधी इंग्रजांनीही दुर्लक्षच केलं. त्या काळात स्वत: इंग्रजच आणि समस्त इंग्लंड अडचणीत असल्यानं त्यांना बंडाच्या डोकेदुख्या वाढवायच्या नव्हत्या. १८०५ पासूनच पेशवा त्र्यंबकजी डेंगळेच्या प्रभावाखाली येऊ लागला होता. त्यानं स्वत:हून किंवा बाजीरावाच्या सल्ल्यानं इंग्रजांविरुद्ध मांडलिक मराठा सरदारांच्या मदतीनं उठावाचा प्रयत्न सुरू केला. या सर्वांत एक घटना घडली ती म्हणजे बडोदा संस्थानच्या गायकवाडांच्या पंतप्रधानपदी असलेल्या गंगाधरशास्त्री यांच्या खुनाची घटना!

गायकवाड आणि इंग्रजांत त्या काळात सख्य होते. १८१५ मध्ये गायकवाडांनी इंग्रजांसंदर्भातील काही मुद्द्यांची चर्चा करायला गंगाधरशास्त्र्यांना पुण्याला पाठवलं. त्यांची पुण्यात हत्या झाली. त्र्यंबकराव डेंगळे यांनी कट करून त्यांची हत्या केलीअसा इंग्रजांनी आरोप केला. गंगाधरशास्त्री आणि त्रिंबकजी प्रकरणानंतर पेशवा-छत्रपती प्रकरणी निश्चित भूमिका घेणं भाग असल्याचं एल्फिन्स्टनला कळून चुकलं. त्यानं पेशव्यांच्या अपरोक्ष छत्रपतींकडे आतून संधान बांधायला सुरवात केली. त्याची अंतिम परिणती छत्रपती प्रतापसिंहांनी इंग्रजांचा आश्रय घेण्यात झाली.

नंतर पेंढाऱ्यांशी युद्धाच्या बहाण्यानं माल्कमच्या नेतृत्वाखाली इंग्रजांनी संभाव्य बंडखोरी करू शकतीलअशा सर्वच रजवाड्यांशी एक प्रकारे छुपे युद्ध पुकारलं. इकडं इंग्रजांनी गंगाधरशास्त्र्यांच्या खुन्यालाम्हणजे त्र्यंबकरावाला आपल्या हाती सोपवण्याची मागणी सुरू केली. बाजीरावासमोर पर्याय राहिला नाही. पण यामुळं पेशव्याची उरली सुरली इभ्रत मातीला मिळाली.

१८१७ च्या सुरुवातीला दुसऱ्या बाजीरावानं मैदानात उतरत इंग्रजांना आव्हान देण्याचा निर्णय घेतला. पण त्याच्यापाशी विशेष शक्ती उरलेली नव्हती. त्याच्या बरोबर बाळोबा कुंजीर होतेच. त्याने पेंढाऱ्यांच्या प्रमुखांशी संधान बांधायला सुरुवात केली. होळकरांचा जुना एकनिष्ठ अमीर खानालाही वळवण्याचा प्रयत्न झाला. सैन्य उभारायला आणि किल्ले दुरुस्त करायला सुरुवात झाली. पेशव्यांची ही अखेरची फडफड आहेहे लक्षात येताच एल्फिस्टननंही त्याचे डाव आखले. पण तोवर नागपूरकर भोसल्यांनीही मांडलिकत्वाचा तह करून टाकला होता.

१३ जून १८१७ ला इंग्रजांनी पेशव्याला इंग्रजविरोधी कोणत्याही कारवाईत सामील होणार नाहीअसा तहही करवून घेतला. त्याने त्याच्या अखत्यारीत असलेला कोकणही इंग्रजांच्या स्वाधीन केला. पाच नोव्हेंबर १८१७ ला शिंदेंनीही ग्वाल्हेर इथं इंग्रजांचं संपूर्ण सार्वभौमत्व मान्य करणारा तह केला. एका अर्थानं बाजीरावाची संपूर्ण कोंडी केली गेली. तरीही दुसऱ्या बाजीरावानं आपल्या इंग्रज तैनाती फौजेलाच फोडण्याचे प्रयत्न सुरू केले.

बापू गोखलेचं दडपण दुसऱ्या बाजीरावावर जास्त येऊ लागले ते युद्ध सुरू करण्यासाठी. गारपीरला तेव्हा इंग्रज सैन्य फारसं नव्हतं. प्रथम पुण्यातील इंग्रजी फौजेचा धुव्वा उडवून मग मुंबईकडून येणाऱ्या फौजेशी लढावंहा बापूचा सल्ला बाजीरावानं मानला नाही. पण २ नोव्हेंबर १८१७ रोजी एका इंग्रजावर गणेशखिंडीजवळ हल्ला झाल्यानं मात्र घटनांना वेग आला. याचा बदला इंग्रज घेतील ही भीती होती. आणि तसंच झालं. पाच नोव्हेंबरला युद्धाला तोंड फुटलं. खडकीत इंग्रजांपेक्षा अधिक सैन्य असलेल्या पेशव्याला तेवढ्यापुरता तरी निर्णायक विजय मिळवणं सोपं होतं. पण बाजीरावानं तिथंही मोडता घातला.

त्यानं दुसऱ्या दिवशी निर्णायक हल्ला करण्याचा बापूचा बेत हाणून पाडला. पुण्यातील इंग्रजी सैन्य उखडण्याचं काम होणं शक्य असतानाही त्यानं तसं होऊ दिलं नाही. यामागे दुसऱ्या बाजीरावाची स्वार्थी आणि चंचल प्रवृत्ती कारण होती. एकीकडे इंग्रजांशी केलेला मांडलिकत्वाचा तह आणि दुसरीकडे आपले सरदार या कात्रीत तो बहुदा सापडला असावा.

तोवर जनरल स्मिथ पुण्याला सैन्य येऊन पोहोचला होता. आता गाठ त्याच्याशी होती. १६ नोव्हेंबर १८१७ रोजी येरवडा इथं युद्धाला तोंड फुटलं. मराठी सैन्यानं जनरल स्मिथच्या पलटणांवर चढाई केली. गोखलेपुरंदरेरास्तेआपटेपटवर्धन मंडळींनी बऱ्यापैकी पराक्रम गाजवला. गोसाव्यांची फौजही प्राणपणानं लढली. दुसरा बाजीराव त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं युद्धाचा अंत काय होणारहे लक्षात येताच सासवडकडे रवाना झाला. बाकीच्या सरदारांनीही तोच मार्ग पत्करला. पुणे स्मिथच्या निर्वेधपणे हाती पडलं. दुसऱ्याच दिवशीम्हणजे १७ नोव्हेंबर रोजी इंग्रजांनी शनिवारवाड्याचा ताबा घेतला आणि बाळाजीपंत नातूच्या हस्ते जरीपटका उतरवून इंग्रजी ध्वज फडकावला.

युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकला याचा अर्थ इतकाच की मांडलिक म्हणता येईलअशीही पेशवाई शिल्लक राहिली नाही. मांडलिकाचे मर्यादित का होईना जे अधिकार असतातते संपूर्णपणे संपुष्टात आले. म्हणजेच १८०२ ला सुरू झालेल्या अस्ताचा हा शेवट होता. पुढं बाजीरावाला पकडणं आणि त्याचं काय करायचं ते पुनर्वसन करणं हा केवळ उपचाराचा भाग होता. या घटनेनंतर पेशवाई राजकीयदृष्ट्या संपुष्टात आली हे मात्र खरे.

या घटनेनंतर जनरल स्मिथ आणि पेशव्याच्या पाठलागाचा खेळ सुरू झाला. दुसरा बाजीराव पळतोय आणि स्मिथ त्याचा पाठलाग करतोयअसा जवळपास दीड महिन्याचा हा पाठशिवणीचा खेळ चालला. या पळाच्या दरम्यान १ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगावला शिरुरवरून पुण्याला निघालेल्या एका इंग्रज तुकडीशी पेशव्याच्या सैन्याची अपघाती गाठ पडली आणि चकमकही झाली. पण चकमकीचाही अंत पाहायला न थांबता दुसरा बाजीराव छत्रपतींना घेऊन पुढं निघून गेला. बापु गोखले त्या सैन्याला थोपवत निर्णायक लढाई न करता अंधार पडू लागताच घाईनं बाजीरावाला मिळायला पुढं निघून गेला. कारण त्यांना भय होतंते पाठलागावर असलेल्या जनरल स्मिथच्या बलाढ्य फौजेचे. भीमा कोरेगांवला निर्णायक लढाई करून मग पुढं जावं, हा निर्णय घेणं आत्मघात ठरला असता.

११ फेब्रुवारीला इंग्रजांनी एक जाहीरनामा काढला आणि गंगाधरशास्त्र्यांच्या खुनाचं खापर त्र्यंबकजी डेंगळेंवर तर त्यामागे दुसऱ्या बाजीरावाचं डोकं असल्याचं जाहीर करत जनतेला अभय देण्यात आलं. ४ एप्रिलला इंग्रजांनी छत्रपतींच्या हस्तेच दुसऱ्या बाजीरावाला पेशवे पदावरून हटवल्याचा आदेश काढला. त्याची परिणती दुसऱ्या बाजीरावाला इंग्रजांच्या स्वाधीन होण्यात झाली. पुण्याकडे कधीही न फिरकण्याची अट घालत आठ लाखांच्या वार्षिक तनख्यावर बिठूरला रवाना केलं.

दुसऱ्या बाजीरावाच्या व्यक्तिगत दृष्टीने हा त्याचा व्यक्तिगत अंत होतापण १८०२ ला वसईच्या तहान्वये त्यानं इंग्रजांचं मांडलिकत्व मान्य केलं तेव्हाच पेशवाईचा राजकीय सत्ता म्हणून अंत झाला होता. त्यामागं सर्वस्वी त्याचा विषयलंपटखुनशीमदांध आणि कारस्थानी स्वभाव होता. त्याच्या या मानसिकतेची आणि अस्थिर मनाची कारणं भलेही त्याच्या बालपणात दडलेली असतील. पण जे काही त्याच्या कारकिर्दीत घडले तो एक कलंक आहेयात वाद असू शकत नाही.

अशा पेशवाईचा अंत झाल्यानं प्रजेला दु:ख होण्याचं काही कारणच नव्हतं. उलट इंग्रजी अंमलाचा प्रजेनं सहर्ष स्वीकार केला. एका लुटारू, प्रजाहितविरोधी वागणाऱ्या पेशव्याचं पतन झाल्यानं प्रजेनं आनंदोत्सव साजरा केला असल्यास त्यात नवल नाही. काहींनी या आनंदप्रीत्यर्थ यज्ञही केले म्हणतात. पेशव्यांच्या भीषण पारतंत्र्यात राहण्यापेक्षा इंग्रज परकीय असले तरी त्यांच्या शासनाखाली राहणंप्रजेला हितकारी आणि सुखद वाटलं.

दुसरा बाजीराव हा एरवी उज्ज्वलतेनंविजिगिषु वृत्तीनं झळकणाऱ्या मराठी इतिहासातील एक काळेकुट्ट पर्व निर्माण करणारा अधम सत्ताधारी ठरला. दुर्दैव हे की त्याच्या काळातील त्याच्या सरदारांनीही त्याच्या वर्तनास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष साथ दिली. तो काळ कोणत्या मोहात सापडला होताहे समजत नाही.

शनिवारवाडा पहिल्या बाजीरावानं ज्या स्वप्नाळू हिकमतीनं उभारला होतातिला दुसऱ्या बाजीरावानं आपल्या नालायकीनं उद्ध्वस्त केलं. त्यामुळे शनिवारवाडा हे एक अभद्र आणि अमंगळ ठिकाण बनलं. त्यामुळंच आपला शासक कोणाच्या अंकित व्हावाआपला ध्वज जाऊन परकीय ध्वज यावायाचं प्रजेला कसलंही दु:ख झालं नाही. पहिल्या बाजीरावाने उभारलेल्या पेशवाईची अखेर दुसऱ्या बाजीरावानं केली ती अशी!
(Published on http://kolaj.in/published_article.php?v=journey-of-the-end-of-the-Peshwas-200-years-agoWY5856831&fbclid=IwAR2uwVHg67Wj3_NDAJS0BQs-Vjvl40aXrDpKhyXSEpJYq8p_qANH8AEtGtU )

4 comments:

  1. खूपच अनमोल माहिती सर.

    ReplyDelete
  2. खुप माहितीपूर्ण लेख. वरील लेखावरून एक गोष्ट लक्षात येते की दुसर्‍या बाजीरावाबरोबरच त्या वेळचे मराठा सरदारही मराठेशाहीच्या पतनास कारणीभूत ठरले. एकटा बाजीराव मात्र पुर्णपणे बदनाम झाला.

    ReplyDelete
  3. Nanasaheb great hoto...Tumhi pn brahmandveshtech ahat... Politics sagal kalat tumcha ..

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...