Sunday, November 25, 2018

शबरीमलाला पुन्हा जाणारच! - तृप्ती देसाई



पुणे- केरळ प्रशासनाने मला कोची विमानतळावरुनच परतायला भाग पाडले असले तरी मी पुन्हा केरळला जाणार असून शबरीमला देवस्थानात प्रवेश करुन अय्यप्पाचे दर्शन घेणारच. कोणत्याही धर्माच्या प्रार्थनास्थळात स्त्रीयांना प्रवेश नाही असे कोणत्याही देवाने सांगितलेले नाही. घटनेने दिलेल्या मानवी स्वातंत्र्याच्या कक्षेत स्त्रीयांचे प्रार्थनास्वातंत्र्य परंपरेच्या नांवाखाली नाकारले जाणे हा केवळ न्यायालय व घटनेचा अवमान नाही तर खुद्द देवांचाही अवमान आहे असे मत शबरीमला आंदोलनात सहभागी असलेल्या तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले. त्या आदिम हिंदू महासंघाने आयोजित केलेल्या "शबरीमला: महिला स्वातंत्र्य आणि संविधान" या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात बोलत होत्या. या परिसंवादात ज्येष्ठ लेखक-संशोधक संजय सोनवणी, युवा विचारवंत सतीश पानपत्ते, गायत्री पाठक, स्नेहल ठाणगे व अनन्या कडले यांनी सहभाग घेतला.
केवळ केरळ प्रशासनाने पुकारलेल्या असहकाराच्या धोरणामुळे आपल्याला कोची विमानतळावरुनच कसे परतावे लागले याचे अनुभव सांगत देसाई म्हणाल्या की हा आस्थेचा विषय नसून त्या नांवाखाली राजकारणाचा विषय बनवला गेला आहे आणि संघाची पुरुषसत्ताकवादी सनातनी विचारधारा त्यामागे काम करत आहे. आपण या प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष करणारच असून आदिम हिंदू महासंघाने घेतलेल्या स्त्रीस्वातंत्र्यवादी भुमिकेचे त्यांनी स्वागत केले.
संजय सोनवणी म्हणाले की आठशे वर्षांपुर्वी ज्या दैवताचे अस्तित्वही नव्हते त्या देवाचे मार्केटिंग करण्यासाठी वैदिक पुरोहितांनी भाकडकथा रचत महिलाबंदी लादली आणि भोळ्या भाविकांनी ती स्विकारली. वैदिक अथवा हिंदू धर्मशास्त्रांत रजोदर्शनास अपवित्र अथवा त्या काळात अस्पृष्य मानले गेलेले नाही. हिंदू धर्मात प्रथमपासून स्त्रीयांना समतेचे स्थान आहे, पण ते पुरुषप्रधान वैदिक संस्कृतीच्या प्रभावात खालावले गेले आणि स्त्रीयांवर अतोनात बंधने लादली गेली. या वैदिक प्रभावातून मुक्त होत हिंदूंनी स्त्रीयांचे बरोबरीचे स्थान मान्य केले पाहिजे आणि त्यांच्या स्वातंत्र्याची महत्ता जपली पाहिजे.
सतीश पानपत्ते यांनी शबरीमला मंदीरांत महिलांना प्रवेश द्यावा या सुप्रिम कोर्टाच्या घटनात्मक भुमिकेचे स्वागत केले आणि म्हणाले की महिला स्वातंत्र्य हा केवळ सामान्य समजदारीचा विषय असून सामान्य धर्मस्थानांच्या कथित परंपरागत नियमांना संविधानिक मुल्ये व कायदे बाद ठरवत असतात. “परिवर्तनशील आणि कालसुसंगत हिंदूहितवाद” या प्रवाही विचारात आपण भेदभाव सोडुन बदल स्वीकारले पाहीजे. “सतिप्रथा, बालविवाह” या परंपराच होत्या पण आपण त्या सोडल्या! हा प्रवाहीपणा जतन झाला नाही तर हिंदू धर्माचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे नुकसान होईल.
गायत्री पाठक, स्नेहल ठाणगे, व अनन्या कडले यांनीही स्त्रीयांचे खालावलेले सामाजिक स्थान, त्यांच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा लिंगभेदाच्या जाणीवांतून केला गेलेला संकोच आणि त्यातून होत असनारी घुसमट आपल्या भाषणांतुन व्यक्त केली. गणेश अटकाळे यांनी प्रास्तविक व सुत्रसंचालन केले.

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...